प्रत्यक्षाहुनि प्रतिमा विलक्षण..

आपण स्वत:बद्दलच्या किमान पाच प्रतिमा मनात बाळगत असतो आणि सोयीनुसार सयुक्तिक प्रतिमा धारण करतो. त्यामुळे आपली खरीखुरी, अगदी प्रामाणिक, पारदर्शक प्रतिमा कोणती हे कित्येकदा आपल्यालाच ठरविता येत नाही. धारण केलेल्या प्रतिमा आणि आपले अस्सल स्वरूप यातील अंतर जर बरेच असेल तर, आणि शिवाय त्या विविध प्रतिमांमधले अंतरही खूप असेल तर, कळत-नकळत आपल्या मनात आणि स्वभावात तणाव तयार होतात. जर कुटुंबातील वा आपल्या मित्रपरिवार- सहकाऱ्यांमधील सर्वच जण अशा बहुविध स्व-प्रतिमा घेऊन वावरत असतील, तर कुटुंबातील व आपल्या नात्यांमध्ये तणावच नव्हे तर संघर्षच निर्माण होतात.
कारण आपला संवाद वा विसंवाद त्या व्यक्तीशी नसतोच. आपली धारण केलेली (जाणीवपूर्वक वा अजाणता) प्रतिमा आणि त्याने धारण केलेली प्रतिमा यातला तो विसंवाद असतो. याला ‘मल्टिपल इमेज सिन्ड्रोम’ असे म्हणतात. अशा प्रतिमा फक्त स्वत:च्या स्वरूपाबद्दलच नसतात तर आपल्या जातीबद्दल, धर्माबद्दल, देशाबद्दल, भाषिक समूहमनाबद्दलही असतात. उदाहरणार्थ, ‘मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही’, ‘पंजाबी-शीख हे दिलखुलास-बिनधास्त असतात’, ‘इंग्रज माणूस खडूस असतो’, ‘फ्रेंच अतिशहाणा असतो’, ‘जर्मन कठोर असतो’ वगैरे.
या वा अशा प्रतिमा सामूहिक अनुभवातून (वा गैरसमजुतीतून) तयार होतात, पण त्या अनेकदा सर्वमान्य होतात, कारण त्यात कुठेतरी वास्तवाचा भास होतो. पण प्रत्यक्षात अनेक मराठी माणसे मोडायच्या ऐवजी वाकताना आपण पाहतो. भिडस्त व चांगली फ्रेंच (आणि बंगाली!) माणसेही आपल्याला भेटतात आणि अजिबात कठोर नसलेला मृदू जर्मनही दिसतो. याउलट ‘दिलखुलास-बिनधास्त’ पंजाबमधील शीख तरुणांमध्ये आत्महत्येचे, डिप्रेशनचे, गर्दचे प्रमाण वाढते आहे असे तेथील अभ्यासक सांगतात. म्हणजेच प्रतिमा वा गैरसमज जितके खरे असतात/भासतात त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात ते अवास्तव असतात- जरी त्या ‘अवास्तव’ प्रतिमांना वास्तवात आधार असतोच.
असे असले तरी वास्तवापेक्षा अशा स्व-प्रतिमा आणि पर-प्रतिमाच आपले सामाजिक संबंध, कौटुंबिक नाती आणि नोकरी-व्यवसायातील संबंध ठरवीत असतात. प्रत्यक्षाहूनही प्रतिमेला हे अवास्तव महत्त्व कधी प्राप्त होऊ लागले? लेखाच्या सुरुवातीला काही तज्ज्ञांचा निर्वाळाही दिला आहे की, प्रत्येक माणूस स्वत:बद्दलच्या किमान पाच प्रतिमा मनात बाळगत असतो. त्या कोणत्या वा कशा स्वरूपाच्या आणि तशा प्रतिमा करण्याचे कारण काय असते?
काही प्रतिमा-तज्ज्ञ असे मानतात की, या विविध प्रतिमा म्हणजे आपले सुरक्षाकवच, लाभ देणारे साधन, प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्याचे आयुध अशी अनेक प्रकारची ‘कामे’ करतात. ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’, ‘डिस्कव्हरी’ वा ‘नॅशनल जिओग्राफिक’ चॅनल्स पाहणाऱ्यांना आता हे माहीत आहे की, अनेक सरपटणारे प्राणी विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट वातावरणात आपल्या त्वचेचा रंग आणि डिझाइनही बदलतात. आपण ज्याची शिकार करणार त्याला अंदाजही येऊ नये म्हणून आजूबाजूच्या वनस्पतीचा, गवताचा, पानांचा रंग धारण करून निपचित पडून राहिलेला सरडा वा तत्सम कुणी प्राणी आकस्मिकपणे त्या ‘शिकारी’वर हल्ला करतो. पक्षीही त्यांच्या पिसांचे रंग बदलतात. कधी मादीला आकर्षित करण्यासाठी, तर कधी शिकारप्राप्तीसाठी. (परंतु प्राण्यांना खरोखरच किती रंगज्ञान वा रंगभान असते, त्यांना नक्की काय व कसे दिसते यावर संशोधन चालू आहे. अनेकांना होणारे सृष्टीज्ञान चक्क ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ असते. रंगीत चॅनल त्या बिचाऱ्यांना उपलब्ध नसतात, असे आता नवे संशोधन सांगते. जे रंगांचे तेच ध्वनीचेही. मादीला आकर्षित करण्यासाठी केलेले ‘ध्वनिसंयोजन’ आणि आपल्या सहकाऱ्यांना धोक्याचा इशारा देण्यासाठी केलेली ध्वनिनिर्मिती वेगवेगळी असते.)
माणसाला आपला रंग बदलता येत नाही. पण प्रतिमा बदलता येतात. (विशिष्ट परिस्थितीनुसार ध्वनिसंयोजनही आपल्या संवादात करता येते- कधी अतिनम्र, कधी आक्रमक, कधी उद्धट, कधी आदरार्थी, तर कधी लाचार!)
आपल्या मनातील एक प्रतिमा असते की, आपण लोकांना कसे दिसलो वा भासलो पाहिजे. त्या कल्पनेनुसार ती प्रतिमा सजवायचा आपला प्रयत्न असतो. आपण स्मार्ट आहोत असे भासवायचे असेल तर त्या अनुषंगाने आपली भाषा, वेशभूषा, हावभाव ठरतात. परंतु, प्रत्यक्षात आपण जरा बावळटच आहोत किंवा तितके स्मार्ट नाही, स्मार्ट माणसांसारखा आपल्यात आत्मविश्वास नाही आणि केसांचा तसा भांगही नाही असे जर त्याला मनातल्या मनात वाटत (खुपत) असेल तर दोन प्रतिमा तयार होतात- एक ‘सेल्फ इमेज’ आणि दुसरी ‘प्रोजेक्टेड इमेज’. तिसरी प्रतिमा आपणच तयार करतो की, आपण इतरांना कसे दिसत असू! (म्हणजे आपल्या योजनेप्रमाणे की वेगळेच!) चौथी प्रतिमा म्हणजे पूर्णत: व्यावसायिक गरजेतून धारण केलेली. एखादा गुप्तहेर समाजात बेमालूम वावरतो आणि जराही सुगावा देऊ लागत नाही की, तो नक्की कसा आहे आणि काय करतो. याबद्दल तर त्याला तशी प्रतिमा निर्माण करायचे प्रशिक्षणच दिलेले असते. (जगातील हेरकथांमध्ये अशा अनेक चित्तथरारक पण पूर्णपणे सत्य अशा कहाण्या आहेत.) पाचवी प्रतिमा असते आपल्या व्यवसायामुळे निर्माण झालेली. (प्रेम चोप्रा बिचारा केव्हाही खलनायकच भासतो- प्रत्यक्षात अतिशय सभ्य व कुटुंबवत्सल असूनही. किंवा जॉनी वॉकर, केश्टो मुखर्जी हे पक्के दारुडे असावेत असा समज प्रचलित होतो- प्रत्यक्षात दोघेही दारू अजिबात पीत नसत.)
अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते जोपर्यंत आपले खरे स्वरूप अबाधित असते तोपर्यंत प्रतिमा आटोक्यात असतात. परंतु जेव्हा त्या प्रतिमाच मूळ व्यक्तिमत्त्वाला व्यापून टाकतात तेव्हा जो असमतोल तयार होतो त्यातून अनेक प्रकारच्या मानसिक समस्या निर्माण होतात.
यासंबंधात मागे एका लेखात काहीसे विवेचन आले आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करीत नाही. परंतु एक मुद्दा मात्र पुन्हा अधोरेखित करणे आवश्यक आहे. जाहिरातींचे जग हे अशा प्रतिमांच्या खेळावर उभे असते. गेल्या लेखातील वास्तव-अवास्तवाचा मुद्दा हा मिथकांच्या संदर्भात होता. तोच मुद्दा आधुनिक बाजारपेठीय संस्कृतीने जाहिरात कलेद्वारे आणला आहे. टीव्ही (विशेषत: रंगीत टीव्ही) आल्यानंतर जाहिरातींद्वारे आपल्या ‘अनकॉन्शिअस’ला चुचकारून आपल्यावर वेगवेगळ्या प्रतिमा (आणि मिथके) लादल्या जात असतात. त्यातील अतिशयोक्तीने आपण फसत नाही. (म्हणजे असे आपण मानतो!) उदाहरणार्थ, आयोडिन असलेले मीठ अन्नात होते म्हणून मुलगी हुशार आणि पुढे कलेक्टरही झाली. किंवा विशिष्ट सोप पावडर वापरल्याने शर्ट अधिक शुभ्र होऊन प्रमोशन मिळाले वा शाळेत पहिला नंबर आला किंवा विशिष्ट ब्रँडचा चहा ऑफर केल्यामुळे लग्न जमले आणि एखादे शीतपेय प्यायल्यामुळे क्रिकेट सामन्यात शतक झळकवले! बहुतेकजण अशा अवास्तव (पण आधुनिक) मिथकांना फारशा गांभीर्याने घेत नाहीत. पण त्या प्रतिमांच्या मार्फतच तो चहाचा, शीतपेयाचा, सोपचा ब्रँड रूढ होत जातो. म्हणजेच आधुनिक भांडवली-बाजारपेठीय- चंगळवादी व्यवस्थेला प्रतिमा-मिथक निर्मिती ही गरजेची गोष्ट आहे. पौराणिक कथा, महाकाव्यातील वा धर्मकथांमधील मिथकांचा सामाजिक-सांस्कृतिक ‘रोल’ हा नैतिक नियमनाचा होता. हा फरक महत्त्वाचा आहे.
परंतु त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला हवे की, प्रतिमा-निर्मितीचे मूळ एकाच प्रकारच्या मानसिकतेतून तयार होते. अर्न्‍स्ट डिक्टर या मनोविश्लेषणतज्ज्ञाने याबद्दल विशेष संशोधन केले होते. माणसाच्या खोल-खोल अंतर्मनात शिरून त्याच्या सुप्त आशा-आकांक्षा, अपेक्षा-शंका, भय व दबलेल्या इच्छा यांचा शोध घेतल्यास त्याचे व्यक्तिमत्व संतुलित, तणावमुक्त करता येईल आणि ती व्यक्ती खऱ्या आत्मविश्वासाने जगू शकेल असे डिक्टर यांचे मत होते.
हजारो माणसे अवास्तव महत्त्वाकांक्षा बाळगतात, आपण त्या उच्चपदासाठी लायक असूनही डावलले गेलो आहोत, असा गंड मनात बाळगतात, असाध्य महत्त्वाकांक्षेच्या मागे झपाटल्यासारखे लागतात, मग ती महत्त्वाकांक्षा पुरी होत नाही हे दिसताच ती काहीही करून पूर्ण करण्यासाठी कट-कारस्थाने करतात. कित्येक खून, आत्महत्या अशा सुप्त वा अर्धप्रकट महत्त्वाकांक्षांमुळे होतात आणि त्यांचा मानसिक आधार प्रतिमांमध्ये असतो. जर ‘सेल्फ इमेज’ आणि ‘प्रोजेक्टेड इमेज’ यांच्यात अंतर नसेल तर तसे होणार नाही, असे सांगून आजचे मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की, अलीकडे वाढलेले हार्ट प्रॉब्लेम्स, बीपी, शुगर, डिप्रेशन व पर्यायाने काही गंभीर आजार हे या प्रतिमा-असमतोलाने झालेले आहेत.
अर्न्‍स्ट डिक्टरच्या मानस सिद्धांतांवर प्रयोग व चिंतन करून व्हॅन्स पॅकार्ड या जाहिरातशास्त्र लेखकाने आधुनिक प्रतिमाशास्त्राचे नियमच सांगितले. काही प्रातिनिधिक ग्राहकांचे ‘डेप्थ इंटरव्ह्यूज्’ घेऊन, म्हणजे त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात शिरून समाजाचे ‘सामूहिक अंतर्मन’ समजणे शक्य आहे हा तो नियम. आजही या तंत्राच्या आधारे जाहिराती बनविल्या जातात. (आता तर चित्रपट, टीव्ही मालिका, साहित्यसुद्धा या तंत्राचा आधार घेऊन केले जाते.) म्हणजेच प्राणीसृष्टीत ज्या गोष्टी- म्हणजे अन्न, पाणी, निवारा, पुनरुत्पादनाची आंतरिक गरज- या गोष्टी साध्य करण्यासाठी शारीरिक बदल घडवून आणण्याची सोय निसर्गाने काहींच्या बाबतीत केली आहे, त्याप्रमाणे माणसाला त्यासाठी प्रतिमानिर्मितीची क्षमता बहाल केली आहे. परंतु त्या प्रज्ञेमुळे माणूस अधिक प्रगल्भ झाला हे जितके खरे, तितकेच तो अधिकाधिक प्रतिमाग्रस्त सापळ्यात अडकू लागला हेही खरे.
व्यक्तिगत प्रतिमा जेव्हा सामाजिक अस्मिता म्हणून आविष्कृत होतात तेव्हा त्यातून प्रक्षोभ, क्रांती, युद्ध असे काहीही निर्माण होऊ शकते. हिटलर ही अशीच एक अवास्तव मिथक-प्रतिमा तयार झाली होती, ज्यामुळे काहींना स्फूर्ती मिळाली, तर काहींच्या मनात भयाचे काहूर निर्माण केले. आपला देश, धर्म, संस्कृती, भाषा, परंपरा यांचे वास्तव रूप आणि प्रतिमांनी सजलेले मिथकरूप हे सर्व आधुनिक संघर्षांचे कारण आहे. तालिबानी वा तामिळ वाघ स्वेच्छेने ‘मानवी बॉम्ब’ व्हायला तयार होतात आणि आपले प्राण गेले तरी प्रतिमा उजळून निघेल हा विश्वास त्यांना वाटतो तो त्यामुळेच. एखाद्याची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ आहे अशी टिप्पणी आपण नेहमी ऐकतो त्यामागचे सूत्रही तेच.
अ‍ॅलन डे बॉटन या लेखकाने ‘स्टेटस अँग्झायटी’ या नावाचे जे पुस्तक लिहिले आहे त्याचाही निचोड या प्रतिमा-असमतोलातच आहे. आपण एकटे पडलो आहोत, आपल्याला कुणी ‘रिस्पेक्ट’ देत नाही, आपण हुशार नाही, आपल्याला घरात, ऑफिसात, समाजात किंमत नाही असे समजून कुढत बसणारी माणसे स्वत:चा घात करतात आणि आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करून, बडय़ा बडय़ा पाटर्य़ाना हजर राहून, श्रीमंत-प्रतिष्ठितांच्या सहवासाच्या खोटय़ा कहाण्या रचून काही जण कधी ना कधी वास्तवाच्या खड्डय़ात कोसळतात. दोन्ही प्रतिमा घातकच. न्यूनगंड आणि उच्चभ्रू अहंगंड या दोन्हीचे मूळ अवास्तव आत्म-प्रतिमांमध्येच आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन हे अशाच परस्परविरोधी गंडांचे ‘व्हिक्टिम’ होते. कित्येक प्रथितयश लोकांना ते यश इतके झपाटून टाकते की, ते स्वत:लाच ‘लार्जर दॅन लाइफ’ समजू लागतात. ते जोपर्यंत त्याच प्रतिमाविश्वात रमतात तोपर्यंत ते हास्यास्पद झाले तरी त्यांना कळत नाही. पण कधी तरी वास्तव येऊन आदळते आणि ते केविलवाणे होतात. राजकारणातील आणि मीडियातील अनेकांना या अवास्तव आत्मप्रतिष्ठेच्या प्रतिमेने घेरलेले असते. त्यामुळेच मंत्रिपद गेले (वा आमदारपद, नेतेपद गेले) की गाडय़ांचा ताफा, हुजऱ्यांचे घोळके, चमच्यांचे पुंजके लोप पावतात. मग मीडियाही त्यांच्याकडे ढुंकून पाहात नाही. मग या स्वयंभू नेत्यांची धुसफूस-चिडचीड होते. परंतु, खुद्द टीव्ही- फिल्म्स- वृत्तपत्रात काम करणाऱ्यांनाही याच व्याधीने पछाडलेले असते. त्यांना मिळणारे महत्त्व, ती प्रतिष्ठा, ती सामाजिक ओळख त्या मीडियातील स्थानामुळे असते हे ते विसरतात. मग त्यांचा ‘नटसम्राट’ होतो वा सतीश आळेकरांच्या नाटकातील ‘बेगम बर्वे’! परंतु तशी अवस्था होण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्री, प्रथितयश लेखक, टीव्ही अ‍ॅन्कर वा संपादक, ‘ज्येष्ठ’ पत्रकारच असले पाहिजे, असे नाही. त्या त्या पदाचे वा यशाचे अवास्तव रूप त्या माध्यमांतूनच तयार होत असते.
आपला चेहरा, आपले नाव, आपला दबदबा सतत आपल्या माध्यमातून दिसत असतो. म्हणजेच आपली अवास्तव ‘सेल्फ इमेज’ हीच आपली ‘प्रोजेक्टेड रिअल इमेज’ आहे असे पदोपदी ‘सिद्ध’ होत असते. त्यामुळे खऱ्याखुऱ्या आत्मप्रतिमेला प्रकट व्हायला संधीच नसते. अशा व्यक्ती प्रकाशझोतातून दूर गेल्या की, कधी कधी वेडय़ापिशा होतात, कधी कधी आपल्या भूतकालीन गौरवातच रममाण होतात, तर कधी आपला दबदबा तसाच आहे असे गृहीत धरून कुटुंबात, समाजात वागतात. लोक काही काळ ‘न्यूसन्स’ म्हणून दुर्लक्ष करतात, पण कधीतरी उघड अपमान करतात. कधी ना कधी तो अवास्तवतेचा आरसा भंग पावतोच. परंतु तो आरसा न फुटता जो आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखून वागतो-व्यवहार करतो, त्याच्या नशिबी अशी दुरवस्था येत नाही.  ‘मॅच्युरिटी’, आत्मजाणीव, सुज्ञता आणि समतोल या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वात, स्वभावात, व्यवहारात आणणे हे म्हटले तर सोपे आहे, म्हटले तर कठीण. परंतु तशा आत्मज्ञानासाठी ‘सिलॅबस’ नसते आणि ‘पदवी’ही! त्याची पहिली परीक्षा असते ती ‘प्रतिमा-मुक्ती’ची- ‘मल्टिपल इमेज सिन्ड्रोम’मधून बाहेर पडण्याची. कारण तो सापळा आपणच तयार केलेला असतो!

कुमार केतकर ,
शनिवार, २१ नोव्हेंबर २००९

No comments:

Post a Comment