बातम्यांचे 'मार्केट'!

ई-टीव्ही मराठीवर बातम्यांचे प्रसारण सुरू झाले त्याला अलीकडेच दहा वष्रे पूर्ण झाली. ई-टीव्हीनंतर २४ तास चालणाऱ्या अन्य मराठी वृत्तवाहिन्याही सुरू झाल्या. आणि आता त्या चांगल्या स्थिरावल्याही आहेत. या वृत्तवाहिन्यांच्या काळात ‘बातमी’चे बदललेले स्वरूप, वाहिन्यांमुळे वृत्तपत्रांमध्ये आणि एकूणच बातम्या देण्याच्या पद्धतीत झालेले बदल आणि या नव्या माध्यमाच्या मर्यादा यावर एक दृष्टिक्षेप-
बातमी म्हणजे काय? ज्ञानेश्वरांच्या काळात वर्तमानपत्रे वा टीव्हीच्या वृत्तवाहिन्या नव्हत्या. तेव्हा जर अशी माध्यमे असती तर प्रचंड गदारोळ माजू शकला असता. ज्ञानेश्वरांनी जिवंतपणे घेतलेली समाधी ही ‘लीड स्टोरी’ झाली असती. तेव्हा छपाईचा शोध लागला नसल्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’वर उलटसुलट प्राध्यापकी चर्चा वर्तमानपत्रांतून झाली नाही. कुणी सांगावे, खुद्द ज्ञानेश्वरांच्या मराठी शब्दयोजनेवर कडाडून टीकाही झाली असती आणि काही स्वयंभू विद्वान संपादकांनी ज्ञानोबांनाच चार शब्द सुनावले असते. टीव्हीच्या वृत्तवाहिन्यांनी त्यांच्या जिवंत समाधीचे ‘लाइव्ह’ चित्रण केले असते. त्या काळात अशी समाधी घ्यायला बंदी वगैरे नसावी. नाहीतर तत्कालिन पोलिसांनी ज्ञानेश्वरांना अटकच केली असती! आणि ‘ज्ञानेश्वरांच्या अटकेमुळे सर्वत्र खळबळ’ किंवा ‘समाधीचा प्रयत्न फसला’ अशा बातम्या वृत्तपत्रांमध्ये वा वाहिन्यांवर झळकल्या असत्या. सुदैवाने (किंवा दुर्दैवाने!) तेराव्या शतकात प्रसारमाध्यमे नव्हती. त्यानंतर सुमारे ३०० वर्षांनी छपाईचा प्राथमिक शोध लागला आणि त्यानंतर आणखी सुमारे दीड-दोनशे वर्षांनी युरोपातील पहिली-वहिली वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली.
शेक्सपियरच्या काळात आणि नंतर क्रॉमवेलच्या काळात पत्रकवजा ‘बातमीपत्रे’ प्रसिद्ध होऊ लागली होती. पण साक्षरता कमी. (बातम्यांचा मुख्य प्रसार ‘मौखिक’ म्हणजे ‘वर्ड ऑफ माऊथ’मार्फत होत असे. गावगप्पा हे तत्कालिन मौखिक वर्तमानपत्र!) वृत्तपत्र छापून प्रसिद्ध केले तरी वाचता येणाऱ्यांची संख्या अत्यल्प होती.
क्रॉमवेल (ज्याने इंग्लंडमधील पहिली लोकशाही क्रांती घडवून आणली, राजाचा ‘न्याय्य’ पद्धतीने शिरच्छेद घडवून राजेशाही कायमची नष्ट झाल्याचे घोषित केले. परंतु १३ वर्षांनंतर पुन्हा राजेशाही प्रस्थापित झाली! असो.) आणि शिवाजीमहाराज हे थोडय़ाफार वर्षांच्या फरकांनी समकालीन. सुदैवाने (किंवा दुर्दैवाने!) महाराजांच्या काळातही वृत्तपत्रे नव्हती व वाहिन्याही नव्हत्या. वाहिन्यांनी त्यांच्या राज्याभिषेकाचा महागौरव सोहळा थेट प्रक्षेपित केला असता आणि त्यानंतर त्यांची विशेष मुलाखत घेऊन ‘भविष्यातील महाराष्ट्र’ कसा असेल, याबद्दल प्रश्नही विचारले असते. (अर्थातच महाराजांना महाराष्ट्राची आज झालेली दुर्दशा तेव्हा सांगता आली नसती. आणि आपल्या नावाने सर्व राजकीय पक्ष त्यांचे सत्तेचे राजकारण करतील, हाही अंदाज त्यांना आला नसता. त्यांना वाटले असते की, त्यांच्या स्वराज्याचे आदर्श तरी निदान पाळले जातील!)
मुद्दा हा की, ‘बातमी’ म्हणजे काय, याची व्याख्या काही प्रमाणात जरी तशीच राहिली असली तरी प्रथम दैनिके आणि नंतर वृत्तवाहिन्या आल्यावर ती व्याख्या बदलत गेली आहे आणि ‘आयपॅड’, ‘आयपॉड’, ‘कींडल’ व त्यानंतर येणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्रांतीनंतर अधिकच बदलत जाणार आहे.
गणपती दूध प्यायल्याची ‘बातमी’ (सप्टेंबर १९९५) इतक्या वेगाने पसरली, की महाराष्ट्रात व देशातच नव्हे, तर थेट लंडन-न्यूयॉर्कमध्येही खळबळ माजली. कारण तिकडच्या ‘प्रगत’ अनिवासी भारतीयांनी भराभर दूध विकत आणून घरातल्या गणपतीला पाजायला सुरुवात केली. खरे म्हणजे तेव्हा मोबाइल फोन्सचे आजच्यासारखे वैश्विक जाळे नव्हते. ‘एसएमएस’ करण्याचा त्यामुळे प्रश्नच नव्हता. ‘इंटरनेट’सुद्धा इतके ‘वर्ल्डवाइड’ नव्हते. तरीही काही तासांत ती (अर्थशून्य) बातमी जगभर पसरली आणि लोक आपणहून त्या बातमीवर (आजपर्यंत) चर्चा करीत राहिले. (सुदैवाने) तेव्हा वृत्तवाहिन्या नव्हत्या, नाहीतर बिचाऱ्या गणपतीला किमान आठवडाभर सर्व चॅनल्सवर दूध पीत बसावे लागले असते. शेकडो बुवा-बाया त्यानिमित्ताने मुलाखती द्यायला आले असते आणि या चमत्काराच्या ‘वैज्ञानिक’ आणि ‘आध्यात्मिक’ बाजू वाहिन्यांनी लोकांसमोर मांडली असती. चॅनल्स अशा ‘चमत्कारां’ची बातमी शोधतच असतात. काही वर्षांपूर्वी ‘गंगा अवतरली’ ही ‘बातमी’ पसरल्यामुळे अनेकांनी गलिच्छ खाडय़ांमधून तांबे-बाटल्या भरून पाणी आणले आणि प्यायले होते. त्या चमत्काराचा ‘आँखो देखा हाल’ दिसल्यामुळे लाखो लोक ते पाणी प्यायला समुद्राकडे वा जवळच्या खाडीकडे वळले होते.
‘बातमी’ला प्रत्यक्ष वा सत्य घटनेचा आधार लागतो, असे आपण सर्वसाधारणपणे मानतो. परंतु ‘अफवा’ वा एखादी ‘गावगप्पा’ वा ‘गॉसिप’ यासुद्धा आता ‘न्यूज’ वा ‘ब्रेकिंग न्यूज’ या सदरातच जमा झाल्या आहेत. शिवाय बातमी ‘प्रथम’ कुणी दिली, यालाही अवास्तव महत्त्व प्राप्त झाले आहे. ‘बातमी’ महत्त्वाची की कुणी प्रथम दिली, हे महत्त्वाचे?
हे ‘प्रथम’ बातमी देण्याचे प्रकरण आता इतके हाताबाहेर गेले आहे की, कोणतीही शहानिशा न करता बातमीरूपी अफवा वा गावगप्पा जरी हाती लागली तरी ती आता थेट चॅनलवर येऊन आदळते! मग ती बातमी ‘अभिषेक बच्चनचे लग्न अगोदरच झाले होते’ ही असो वा विधान परिषदेच्या निवडणुकीत विजय सावंत पडले- ही असो. या दोन्ही बातम्या काही तासांतच खोटय़ा ठरल्या. पण तेवढय़ा काळात त्यांनी सर्व वाहिन्यांवर हंगामा माजवला होता. अभिषेक प्रकरणात तर एक तोतया पत्नी कम् पूर्वप्रेयसी चॅनलवर आणून तिची मुलाखतही घेण्यात आली होती.
वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्या आता तर ‘बातमी’, तिच्यावरची प्रतिक्रिया, त्या प्रश्नाविषयी (म्हणजे बातमीतून उपस्थित होणाऱ्या मुद्दय़ाविषयी) एखाद्या प्रतिष्ठिताचे मत आणि त्या मताला होणारा विरोध- हे सर्व ‘न्यूज’ म्हणवूनच खपवतात. त्यामुळे सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांच्या विवाहाला तर भारत-पाकिस्तान या दोन देशांमधील संघर्षांचे रूप प्राप्त झाले होते. अक्षरश: २४ तास या ‘बातमी’ला चर्चा- परिसंवादाचे स्वरूप आले होते. आणि ते ‘न्यूज’ वा ‘ब्रेकिंग न्यूज’च्या माध्यमातून खपविले जात होते.
‘बातमी’ आणि एखाद्या विषयावरचे एखाद्याचे मत या तशा भिन्न गोष्टी आहेत. परंतु एखादा मंत्री, विरोधी पक्षाचा पुढारी, विचारवंत, सेलिब्रेटी, अभिनेता यांच्या वावदूक मतांना वा त्यांच्या ब्लॉग्जवरील निर्थक भाष्यांनाही आता ‘बातमी’चा दर्जा प्राप्त झाला आहे. साहजिकच बातमी व मत यांत काही सीमारेषाच न उरल्यामुळे निखळ बातमी व त्या बातमीमुळे उपस्थित होणाऱ्या मुद्दय़ावर नि:पक्ष मतप्रदर्शन हे आता अर्थशून्य ठरू लागले आहे.
वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या कोणत्याही विषयावर कुणाचेही मत तितक्याच ‘गांभीर्याने’ आणि तत्परतेने घेत असल्यामुळे कोणत्या विषयावर कोणाचे विचार ग्राह्य असू शकतात, कोणत्या ‘मता’चा काय प्रभाव पडायला हवा, याचेही भान सुटले आहे. कुणीतरी अतिरेकी (वा अतिउत्साही) आणि बेजबाबदार पत्रकार वा चॅनलवाला काहीतरी प्रक्षोभक (आणि असंबद्ध) बोलतो, किंवा कुणा पुढाऱ्याच्या कुठल्यातरी भडकावू भाषणाची ध्वनीचित्रफित दाखवतो आणि त्यामुळे दंगाही पेटतो.
लोकशाही व्यवस्थेत माध्यमस्वातंत्र्य असायला हवे, याचा अर्थ कुणालाही काहीही, केव्हाही, कसेही, कुठेही जाहीर विधान करून ते प्रसृत करण्याचा अधिकार- असा नाही. ‘अमुक अमुक केले नाही तर एखादी संस्था पेटवून देऊ’, किंवा ‘अमुक-तमुक व्यक्तीला गावात येऊ देणार नाही’ अथवा ‘त्याला रस्त्यात चपलेने मारू’- ही व याहूनही अधिक उग्र विधाने वृत्तवाहिन्यांद्वारे प्रसृत केली गेली आहेत. यात बातमी काय? त्याच्या या विधानांमुळे जातीय वा भाषिक दंगल पेटली तर ती दंगलच मग बातमी होते. पण त्या दंगलीला कारणीभूत ठरलेले ते अनाठायी विधान हे बातमी म्हणून दिले गेल्यामुळे असा गंभीर प्रसंग उद्भवलेला असतो. माध्यमांमुळे (वृत्तपत्रेसुद्धा! केवळ वाहिन्या नव्हेत!) आता वेगळ्याच प्रकारचे सामाजिक- मानसिक- सांस्कृतिक ताणतणाव निर्माण होऊ लागले आहेत.
मार्शल मॅक्लुहान या जगप्रसिद्ध माध्यमतज्ज्ञाने सुमारे ५० वर्षांपूर्वी जेव्हा म्हटले की, ‘जग आता एक खेडे झाले आहे’ (वर्ल्ड नाऊ इज ए ग्लोबल व्हिलेज!), तेव्हा त्याला असेही सुचवायचे होते की, माध्यमांमुळे आता जगाचा चव्हाटा- असेच माध्यमांना रूप येणार आहे. गंमत म्हणजे मॅक्लुहान यांनी जेव्हा ते भाष्य केले तेव्हा मोबाइल नव्हते, इंटरनॅशनल टीव्ही चॅनल्स आणि त्यांचा २४ तास उपग्रह संचार नव्हता. इंटरनेट नव्हते. आणि आयपॅड- आयपॉडही नव्हते. परंतु मॅक्लुहानसारख्या द्रष्टय़ा विचारवंताला हे तेव्हाच लक्षात आले होते की, चव्हाटय़ावरून गावगप्पा- अफवा- स्कॅण्डल्सना आता जागतिक स्वरूप येणार आहे!
एकेकाळी असे मानले जात होते की, माध्यमप्रसारामुळे लोकशाही समर्थ व्हायला मदत होईल आणि विविध साहित्य-कलांचा वैश्विक प्रसार होऊन जग अधिक सांस्कृतिक समृद्धी प्राप्त करू शकेल. प्रत्यक्षात मात्र माध्यमांमार्फत तंटेबखेडे, बेदिली, अशांतता, गुन्हेगारी, जातीय-धर्मीय कटुता आणि समाजजीवनात अरेरावी आणि बेदरकारी वाढताना आपण पाहत आहोत.
माध्यमांवर नियंत्रण करणेही आता पूर्णत: अशक्य होत आहे आणि अधिकाधिक अशक्य होत जाणार आहे. भविष्यकाळात कोणताही हुकूमशहा, कोणतेही सरकार, कोणतेही प्रशासन, कोणतीही न्यायव्यवस्था माध्यमांवर नियंत्रण करू शकणार नाही. त्याचप्रमाणे सर्व माध्यमसंस्था एकत्रितपणे (आणि नि:पक्षपातीपणाने) ‘सेल्फ रेग्युलेशन’ ऊर्फ आत्मनियंत्रण करायला तयार होणार नाहीत. याचं एक कारण म्हणजे- माध्यम बाजारपेठेतील स्पर्धा! प्रत्येक चॅनलचे मुख्य उद्दिष्ट स्पध्रेत टिकून प्रतिस्पध्र्यापेक्षा अधिक नफा मिळवणे हे आहे/ असते. त्यामुळे नियंत्रणाचे निकष स्वीकारले तरी सर्व चॅनल्स ते निकष दीर्घकाळ पाळण्याची शक्यता अजिबातच नाही. दुसरे कारण आहे- तंत्रज्ञानाचा विलक्षण वेगाने होणारा विकास!
पूर्वी प्रसारमाध्यमांना ‘मास मीडिया’ म्हणजे ‘लोकमाध्यम’ म्हणून संबोधले जात असे. वस्तुत: त्यात ‘लोकां’चा फारसा सहभाग नसे. रेडिओ व दूरचित्रवाणी सरकारी नियंत्रणाखाली असल्यामुळे जे सरकार सत्तेत असेल, त्याने ठरविलेले निकष हेच नियंत्रणाचे निकष होते. पुढे उपग्रह आले. खाजगी चॅनल्स आले. केबलवाले आले. डिश अ‍ॅन्टेना आल्या. मोबाइल फोन आले. या मोबाइल्सवर चॅनल्स दिसायची सोय झाली. मोबाइल फोन्सद्वारे चलत्चित्र पाठविण्याची सोय झाली. व्हिडिओकॅम अधिकाधिक स्वस्त आणि पोर्टेबल होत गेले, त्यावरील चित्र व ध्वनी अधिक स्पष्टपणे प्रसृत होऊ लागले. आणि हळूहळू प्रत्येक व्यक्ती स्वतच्या चॉइसप्रमाणे कार्यक्रम पाहू लागली. ज्याप्रमाणे ‘फोटोशॉप’मुळे मूळ छायाचित्राला सोयीनुसार बदलता येऊ लागले, त्याचप्रमाणे प्रत्येक ‘मोबाइल फोन युजर’ स्वतला पाहिजे त्याप्रमाणे कार्यक्रम आता ऑर्डर करू शकणार आहे. आज (गेल्या फक्त चार वर्षांत) ‘यू-टय़ूब’ने तर माध्यमांच्या सर्व भौगोलिक, सांस्कृतिक, कायदेशीर सीमारेषा तोडलेल्या आहेत. आणखी ‘फोर जी’ वा ‘फाइव्ह जी’च्या उत्क्रांतीनंतर प्रत्येकजण स्वतचे वर्तमानपत्र आणि स्वतचा चॅनल स्वतच्या मोबाइलवर पाहू शकेल! ‘सिटीझन जर्नालिस्ट’ या संकल्पनेमुळे तर आता प्रत्येकजण पत्रकार आणि प्रत्येकजण वाचक, तसंच प्रत्येकजण चित्रपटकार आणि प्रत्येकजण दर्शक होऊ शकणार आहे. ही अतिशयोक्ती नाही, तर लवकरच येणारी तांत्रिक वस्तुस्थिती आहे.
माहिती-माध्यमक्रांतीचा स्फोट इतका ‘विश्वव्यापी’ असेल, याची कल्पना ना विज्ञान-तंत्रज्ञान तज्ज्ञांना आली होती, ना माध्यमकर्मींना! पण यापुढच्या काळात त्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या अराजकी शक्तींशी सामना करीत करीतच पुढचा प्रवास करावा लागणार आहे.
परंतु सर्व निराशाजनकच आहे, असेही नाही. याच तंत्रज्ञानाच्या विकासातून, अराजकी शक्तीतूनही नवीन निकष जन्माला येणार आहेत. लोकशाही आणि सांस्कृतिकतेलाही अधिक प्रगल्भ व्हावे लागणार आहे. त्यासाठी सुज्ञांना, विचारी लोकांना आणि विविध प्रकारच्या पत्रकारितेत काम करणाऱ्यांना नव्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आतापासूनच सज्ज व्हावे लागणार आहे!

कुमार केतकर , रविवार १८ जुलै २०१०.