ओबामांच्या खांद्यावर.. कुणाचे ओझे?
बराक ओबामांनी इतिहासाच्या गुहेत प्रवेश केला आहे। यापूर्वी कोणत्याही अमेरिकन अध्यक्षाने असे धाडस केलेले नाही. हे केवळ धाडस नाही. तो विलक्षण धोकाही आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाचा इतिहास वेगळ्याच आवर्तनात गेला होता. ते आवर्तन अण्वस्त्र-क्षेपणास्त्रांचे होते. हिरोशिमा- नागासाकीच्या आण्विक हाहाकारानंतर चारच वर्षांनी, १९४९ साली, कम्युनिस्ट रशियाने अणुस्फोट चाचणी घडवून आणली। त्यानंतर शीतयुद्धाने अवघ्या जगाला वेढले. दुसऱ्या महायुद्धाने इतिहासाबरोबरच भूगोलही बदलला होता. शीतयुद्धाचा मुख्य हेतू होता, तो बदललेला राजकीय भूगोल जपणे. अवघ्या जगाचे संहारक रणांगण किंवा ‘किलिंग फिल्ड’ झाले तरी हरकत नाही, पण महासत्तांनी अमानुष स्पर्धा मात्र चालूच राहिली पाहिजे, असा विडाच जणू अमेरिका आणि रशियाने उचलला होता.परस्परांना नामोहरम करण्यासाठी वा सतत कुरघोडी करण्यासाठी कितीही लोकांची प्राणहानी झाली तरी हरकत नाही, लाखो लोक निर्वासित झाले तरीही पर्वा नाही, इतिहास आणि भूगोल विपर्यस्त आणि विकृत करावा लागला तरीही फिकीर नाही-अशा रितीने शीतयुद्धाचे टोलेजंग आणि चिरेबंदी बुरूज उभारले गेले होते.त्या शीतयुद्धाच्या धुमश्चक्रीतून निर्माण झाले पॅलेस्टिन-इस्रायल संघर्ष, कोरियन युद्ध, व्हिएतनाम-कंबोडिया, इंडोनेशिया, चीन-भारत, क्यूबा, बर्लिनची भिंत, अंगोला-मोझांबिक, चिली, ग्वाटेमाला, निकारागुआ, नेटो, एसीआन, वॉरसा तह, इजिप्त आणि अरब राष्ट्र, तुर्कस्थान, इराक, अफगाणिस्तान, दहशतवाद, उग्र इस्लामवाद, तालिबान, भारत-पाकिस्तान-काश्मीर, इराण इ. इ. म्हणजेच सुमारे ६० वर्षांचा इतिहास त्या शीतयुद्धाच्या छायेत गेला आहे. सीआयए आणि केजीबी या अमेरिकन व रशियन हेरखात्यांनी घडवून आणलेली कट-कारस्थाने-कुभांडांनी कित्येक राजवटी उधळल्या गेल्या आहेत, राष्ट्रप्रमुखांचे खून झाले आहेत. खरी-खोटी यादवी युद्धे घडवून आणली गेली आहेत, रासायनिक आणि जैविक अस्त्रे बनविली गेली आहेत आणि अवघ्या जगाचा विध्वंस काही मिनिटांत घडवून आणू शकणारी ‘स्टार वॉर्स’ची महासंहारक अस्त्रे निर्माण केली गेली आहेत. या शीतयुद्धातील मुख्य खलनायक ही अमेरिकेची ओळख आहे,परंतु याच अमेरिकेने जगाला व्यक्तीस्वातंत्र्य, माध्यमस्वातंत्र्य, आधुनिकता, ज्ञान-विज्ञान क्रांती, नॅशनल जिओग्राफीक, नासा, हॉलीवूड, नील आर्मस्ट्राँग, जाझ-रॉक-पॉप म्युझिक, मार्टिन ल्यूथर किंग आणि बराक ओबामाही दिले आहेत. डॉ. जेकील आणि मिस्टर हाईडप्रमाणे अमेरिका ही एकाच वेळेस नायक आणि खलनायक म्हणून विसावे शतकच व्यापून राहिली आहे.बराक हुसेन ओबामा यांच्या खांद्यावर त्या विसाव्या शतकाचे आणि मुख्यत: ६० वर्षांतील शीतयुद्धाचे, ते महाओझे टाकले गेले आहे. ज्या विलक्षण चैतन्याने, दुर्दम्य आशावादाने आणि आत्मविश्वासाने ओबामा पावले टाकत आहेत ते पाहिले की थक्क व्हायला होतेच, पण काळजीही वाटू लागते. त्यांनी गुरुवारी कैरोत भाषण करताना म्हटले आहे की, ‘आपल्याला आता नव्या जगाचे चित्र रेखाटायचे आहे, त्यानुसार नवे जग बनवायचे आहे, युद्ध आणि हिंसाचाराच्याऐवजी संवाद आणि वाटाघाटींतून प्रश्न सोडवायचे आहेत. सामर्थ्यांपेक्षा समंजसपणा आणि शस्त्रास्त्रांपेक्षा साहित्य-कलांना वाव द्यायचा आहे. अमेरिकन सिव्हिलायझेशन आणि इस्लामिक संस्कृती यांच्यात संघर्ष नाही तर ऐतिहासिक समन्वय होऊ शकतो. इस्लामने जागतिक प्रगतीला प्रचंड योगदान दिले आहे. आजचे सिव्हिलायझेशन हे जगातील विविध संस्कृतींच्या मिलाफातून उभे राहिले आहे. ज्यांना वाटते की इस्लाम म्हणजे हिंसा व क्रौर्य, त्यांनी त्या धर्माचा खरा अर्थ ओळखलेला नाही. कुराणात करुणेचे महत्त्व सांगितले आहे, असहाय्य असलेल्यांना मदत करायचे आवाहन केले आहे, निष्पापांना ठार मारणे हे पाप मानले आहे आणि तरीही आज जगात जणू इस्लाम व पाश्चिमात्य जग हे परस्परविरोधी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.’ओबामांनी भाषण केले कैरो विद्यापीठात. तरुण विद्यार्थी-विद्यार्थिनींच्यासमोर. त्यांच्या भाषणाला टाळ्यांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळाला त्याचे प्रतिध्वनी जगभर गेली दोन दिवस घुमत राहिले आहेत. ओबामांचे भाषण जगभरच्या सर्व दूरचित्रवाणी वाहिन्यांवर, एकूण २८ भाषांमध्ये आणि एकूण एक इस्लामी देशांमध्ये प्रसृत केले गेले. त्यांनी मुख्यत: त्यांना उद्देशून म्हटले की, इस्लामी राष्ट्रांच्या नेत्यांनी आणि अमेरिकेने मनात आणले तर इस्राएल-पॅलेस्टिन, पाकिस्तान-अफगाणिस्तान, इराण असे सर्व प्रश्न आटोक्यात येतील आणि सुटूही शकतील. पण त्यासाठी इस्राएलला आपला दुराग्रह सोडून सौम्य व्हावे लागेल, पॅलेस्टिनला समजूतदारपणा दाखवावा लागेल आणि इस्लाममधील उग्रवाद्यांना आक्रमकता सोडून द्यावी लागेल!गेल्या कित्येक वर्षांत अशा प्रकारचे आवाहन कोणत्याही राष्ट्रप्रमुखाने इतक्या गांभीर्याने व थेटपणे केलेले नाही. ओबामांनी तर त्याहीपुढे एक पाऊल टाकले आणि इराणमध्ये सीआयएने १९५३ साली केलेल्या कारस्थानी सत्तापालटाचा संदर्भ देऊन ती एक मोठी चूक होती, असे म्हटले. इराणच्या त्या घटनेचा संदर्भ देऊन ओबामा खरोखरच इतिहासाच्या अथांग वाटणाऱ्या गुहेत शिरले आहेत. कारण तो काळच, म्हणजे १९४९ ते १९६९ ची दोन दशके, प्रचंड उलथापालथींनी विस्कटली होती.चीनमध्ये माओंच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट क्रांती यशस्वी झाली ती १९४९ सालीच. अमेरिकेने माओंच्या चीनला मान्यता द्यायचे नाकारले. त्याऐवजी चैंग कै शेक यांनी ज्या फोर्मोसा (तैवान) बेटावर अमेरिकेच्या मदतीने आश्रय घेतला, त्या बेटाला अमेरिकेने चीन म्हणून मान्यता दिली होती. स्टॅलिनचा रशिया आणि माओंचा चीन असे दोन बलाढय़ कम्युनिस्ट देश निर्माण झाले होते. त्यापैकी रशियाने स्वत:ची अण्वस्त्रे बनवायला घेतली होती. चीन आणि रशिया यांच्या मदतीने दक्षिण-पूर्व आशियातील व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया हे देश त्यांची फ्रेंच साम्राज्यवादाच्या विरोधातील स्वातंत्र्य चळवळ अधिक तीव्र करीत होते. कोरियातील संघर्ष तर इतका प्रखर झाला होता की, तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात तर होत नाही ना अशी भीती व्यक्त केली जात होती. आफ्रिकेतील काँगो व इतरही लहान-मोठय़ा देशात यादवीला सुरुवात झाली होती. बहुतेकांचे आदर्श होते लेनिन, माओ आणि काही ठिकाणी महात्मा गांधी आणि नेहरू!भारताच्या स्वातंत्र्याने ब्रिटिश साम्राज्याला जबरदस्त धक्का बसला होता. एकूणच युरोपात साम्राज्यवादाला अमेरिकेने दत्तक घेतले होते आणि त्या सर्वच गौरवर्णीय, वसाहतवादी साम्राज्यवादी देशांना धास्ती वाटू लागली होती की ही स्वातंत्र्याची, समाजवादाची, लाल क्रांतीची लाट आणखी पसरली तर ती त्यांनाही गिळंकृत करून टाकील. युरोप-अमेरिकेतील लेखक, कवी, चित्रकार, नाटककार, चित्रपटकार- अगदी हॉलिवूडही लाल-गुलाबी होऊ लागले होते! अमेरिकेचे तर धाबेच दणाणले होते. त्यातूनच निर्माण झाली कम्युनिस्टविद्वेषाची एक राजनीती. जीवनाचे असे एकही क्षेत्रही नव्हते की जेथे अमेरिकेने सीआयएच्या मार्फत हस्तक्षेप केला नाही. त्याचा प्रतिकार करण्यासाठी तसेच आपल्या धोरणाचा प्रसार करण्यासाठी रशिया व चीननेही आपल्या विचारांचे, संघटनांचे व हेरांचे जाळे फेकले.जगभरच्या स्वातंत्र्यचळवळींचा आशय होता लोकशाही-समाजवादाचा आणि काही ठिकाणी सशस्त्र समाजवादी क्रांतीचा. इराणमध्येही लोकशाही माध्यमातून १९५१ साली मोहम्मद मोसादेक यांची निवडणूक झाली. ते पंतप्रधान झाले. इराणी जनतेचा तेव्हा ब्रिटिशांच्या वसाहतवादाला तीव्र विरोध होता. इराणमधील खनिज तेलावर ब्रिटिशांचा कब्जा होता. पंतप्रधान मोसादेक यांनी तेल धंद्याचे राष्ट्रीयीकरण करून ब्रिटिश अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली. अगोदरच साम्राज्य खिळखिळे झालेल्या ब्रिटनने अमेरिकेच्या मदतीने इराणमध्ये मोसादेक राजवटीला सुरूंग लावायला सुरुवात केली. दोन वर्षांनी, १९५३ साली, सीआयएने ब्रिटिशांच्या मदतीने मोसादेक यांची राजवट उलथून टाकली आणि आपल्या कह्यात राहू शकणाऱ्या पेहलवी राजघराणाच्या शाहला सिंहासनावर बसविले. शाहच्या राजवटीची व अर्थकारणाची मुख्य सूत्रे अमेरिकेतच होती. सीआयने शाहच्या ‘सवाक’ या हेरखात्याची रनचा करून दिली आणि त्यांच्या पोलिस व गुप्तहेरखात्याला प्रशिक्षण दिले.आंतरराष्ट्रीय स्तरावर कम्युनिझमविरोधी लढाईत इराण हा अमेरिकेचा मुख्य तळ झाला. भारतीय उपखंडात पाकिस्तान हाही अमेरिकेचा राजकीय व लष्करी अड्डा झाला. इराण आणि भारताचे शेकडो वर्षांचे राजकीय व सांस्कृतिक संबंध होते. सन १९३५ पर्यंत इराण म्हणजे पर्शिया होता. इराण-पर्शियामधील मुस्लिम शिया पंथाचे. पर्शियन म्हणजेच इराणी हे अरब नव्हेत. ते आशियाई म्हणूनच (आणि आर्यनसुद्धा!) स्वत:ची ओळख करून देतात. इराणी-पर्शियन-शिया समाजाला भारताबद्दल आत्मीयता वाटण्याचे एक कारण त्यांचे ‘आर्यवंशीय मूळ’. अतिशय देखणे, सुदृढ आणि उमद्या स्वभावाचे म्हणून ओळखले जाणारे इराणी लोक शाहच्या राजवटीत पोलिसांच्या व गुप्तहेरांच्या जाचात व धाकात असत. शाह यांची सत्ता १९५३ साली आली- पण साधारणपणे १९७७ नंतर त्यांच्याविरुद्धचा असंतोष भूमिगत पद्धतीने संघटित होऊ लागला. शाहच्या पोलिसांनी जसजसा तो असंतोष दडपण्यासाठी अटकसत्रे सुरू केली, तसतसा प्रक्षोभ वाढतच गेला. शाहची राजवट अमेरिकेच्या वतीनेच कारभार करीत असल्याने तो प्रक्षोभ अमेरिकेच्या विरोधात जाऊ लागला.या सर्व काळात आयातोला खोमेनी फ्रान्समध्ये होते. साधारणपणे १९७८ च्या सुरुवातीपासून शाह राजवटीच्या विरोधात जाहीर निदर्शने होऊ लागली. अमेरिकन वकिलातीवरही निषेध मोर्चे येऊ लागले. शाहच्या पोलिसांनी एका प्रचंड मोर्चावर गोळीबार केला. त्यानंतर वातावरण अधिकच भडकले. जानेवारी १९७९ मध्ये इराणचे जानेमाने शाह पळून गेले. फेब्रुवारीच्या एक तारखेला खोमेनींचे तेहेरान या राजधानीत आगमन झाले तेव्हा त्यांच्या स्वागताला ५० लाख लोक आले होते. ‘खोमेनींची क्रांती’ म्हणून ओळखला जाणारा सत्तापालट इतक्या झपाटय़ाने व सहज झाला की, जगात कुणाला फारसे कळायच्या आतच खोमेनींच्या ‘इस्लामिक रिव्होल्यूशनरी कौन्सिलने सूत्रे हाती घेतली. अमेरिकन वकिलातीतील सर्वाना या क्रांतिकारकांनी ओलीस ठेवले आणि थेट अमेरिका शत्रू असल्याचे जाहीर केले.अमेरिकेतील अध्यक्ष कार्टर यांना इराणच्या परिस्थितीवर काबू ठेवता न आल्याने ते १९८० च्या अध्यक्षीय निवडणुकीत पराभूत झाले. रोनाल्ड रिगन निवडून आले आणि अमेरिका-इराण यांचे संबंध आणखीनच बिघडले. इराणला कोंडीत पकडण्यासाठी अमेरिकेने इराकला (म्हणजे थेट सद्दाम हुसेन यांनाच) मदत केली आणि इराक-इराण युद्ध घडवून आणले. त्या युद्धात दोन्ही देशांची खूपच हानी झाली. ते युद्ध १९८९ साली संपले. त्याच वर्षी सोविएत युनियननेही अफगाणिस्तानातून फौजा काढून घेतल्या. (सोविएत फौजा १९७९ सालीच, इराणमध्ये खळबळ चालू असताना, अफगाणिस्तानात घुसल्या. हा काळ शीतयुद्धातील अटीतटीचा मानला जातो.)पाकिस्तान-अफगाणिस्तान-इराण पट्टय़ातील राजकारण बदलले ते तेव्हापासून. (१९७९ च्या एप्रिलमध्ये झुल्फिकार भुत्तोंना फाशी देऊन लष्करशहा झिया उल हकने आपली पाकिस्तानवर पकड घट्ट केली.)अमेरिकेला या सर्व प्रदेशात आपला प्रभाव टाकण्यासाठी पाकिस्तानची गरज होती आणि सोविएत फौजांना नामोहरम करण्यासाठी इस्लामी मूलतत्त्ववादाची गरज होती. पण इराणला शत्रूस्थानी ठेवून अफगाणिस्तानात तालिबान्यंना, पाकिस्तानच्या आयएसआयमार्फत मदत करणाऱ्या अमेरिकेची सर्व दृष्टिकोनातून प्रत्यक्षात कोंडीच होत होती. सोविएत युनियनची शकले झाल्यानंतरही (१९९१) अमेरिकेला त्या भागात जम बसविता आलेला नाही.ओबामांनी जाहीरपणे म्हटले की, अमेरिकेच्या गंभीर चुकांमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याचप्रमाणे इस्लामच्या व इराणच्या वैज्ञानिक-सांस्कृतिक कामगिरीबद्दलही पाश्चिमात्य देशांनी उपेक्षा केली. ‘इराण-भारत-चीन’ हा आशियातील एक ‘सिव्हालायझेशनल ट्रँगल’ मानला जातो. त्याचा थेट संदर्भ दिला नसला तरी ओबामांनी परराष्ट्रनीती आमूलाग्र बदलायला सुरुवात केली आहे.‘सलाम वालेकुम’ अशी भाषणाची सुरुवात करून, कुराणातील वचने उद्धृत करून, स्वत:चा मुस्लिम भूतकाळ थेट सांगून, सिव्हिलायझेशनचे संदर्भ देऊन इराण, इस्लामी देश, भारत व चीन यांच्याबरोबर नव्याने संबंध प्रस्थापित करणारी भाषा करणारा हा पहिला अध्यक्ष आहे. आपल्याला जगाची पुनर्रचना करायची आहे आणि तीसुद्धा युद्ध, दहशतवाद, हिंसेशिवाय असे सांगणाराही हा पहिला अध्यक्ष आहे. भूतकाळाचा विचार करून भविष्य घडविण्याचा हा प्रयत्न क्रांतिकारकच म्हणावयास हवा. इतिहासाचे ओझे भविष्यकाळावर टाकण्याऐवजी त्या भविष्याला विध्वंसक भूतकाळापासून मुक्त करण्याचा हा प्रयत्न आहे. ओबामांनी त्या इतिहासाचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेतले आहे.!
कुमार केतकर