प्रत्यक्षाहुनि प्रतिमा विलक्षण..

आपण स्वत:बद्दलच्या किमान पाच प्रतिमा मनात बाळगत असतो आणि सोयीनुसार सयुक्तिक प्रतिमा धारण करतो. त्यामुळे आपली खरीखुरी, अगदी प्रामाणिक, पारदर्शक प्रतिमा कोणती हे कित्येकदा आपल्यालाच ठरविता येत नाही. धारण केलेल्या प्रतिमा आणि आपले अस्सल स्वरूप यातील अंतर जर बरेच असेल तर, आणि शिवाय त्या विविध प्रतिमांमधले अंतरही खूप असेल तर, कळत-नकळत आपल्या मनात आणि स्वभावात तणाव तयार होतात. जर कुटुंबातील वा आपल्या मित्रपरिवार- सहकाऱ्यांमधील सर्वच जण अशा बहुविध स्व-प्रतिमा घेऊन वावरत असतील, तर कुटुंबातील व आपल्या नात्यांमध्ये तणावच नव्हे तर संघर्षच निर्माण होतात.
कारण आपला संवाद वा विसंवाद त्या व्यक्तीशी नसतोच. आपली धारण केलेली (जाणीवपूर्वक वा अजाणता) प्रतिमा आणि त्याने धारण केलेली प्रतिमा यातला तो विसंवाद असतो. याला ‘मल्टिपल इमेज सिन्ड्रोम’ असे म्हणतात. अशा प्रतिमा फक्त स्वत:च्या स्वरूपाबद्दलच नसतात तर आपल्या जातीबद्दल, धर्माबद्दल, देशाबद्दल, भाषिक समूहमनाबद्दलही असतात. उदाहरणार्थ, ‘मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही’, ‘पंजाबी-शीख हे दिलखुलास-बिनधास्त असतात’, ‘इंग्रज माणूस खडूस असतो’, ‘फ्रेंच अतिशहाणा असतो’, ‘जर्मन कठोर असतो’ वगैरे.
या वा अशा प्रतिमा सामूहिक अनुभवातून (वा गैरसमजुतीतून) तयार होतात, पण त्या अनेकदा सर्वमान्य होतात, कारण त्यात कुठेतरी वास्तवाचा भास होतो. पण प्रत्यक्षात अनेक मराठी माणसे मोडायच्या ऐवजी वाकताना आपण पाहतो. भिडस्त व चांगली फ्रेंच (आणि बंगाली!) माणसेही आपल्याला भेटतात आणि अजिबात कठोर नसलेला मृदू जर्मनही दिसतो. याउलट ‘दिलखुलास-बिनधास्त’ पंजाबमधील शीख तरुणांमध्ये आत्महत्येचे, डिप्रेशनचे, गर्दचे प्रमाण वाढते आहे असे तेथील अभ्यासक सांगतात. म्हणजेच प्रतिमा वा गैरसमज जितके खरे असतात/भासतात त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात ते अवास्तव असतात- जरी त्या ‘अवास्तव’ प्रतिमांना वास्तवात आधार असतोच.
असे असले तरी वास्तवापेक्षा अशा स्व-प्रतिमा आणि पर-प्रतिमाच आपले सामाजिक संबंध, कौटुंबिक नाती आणि नोकरी-व्यवसायातील संबंध ठरवीत असतात. प्रत्यक्षाहूनही प्रतिमेला हे अवास्तव महत्त्व कधी प्राप्त होऊ लागले? लेखाच्या सुरुवातीला काही तज्ज्ञांचा निर्वाळाही दिला आहे की, प्रत्येक माणूस स्वत:बद्दलच्या किमान पाच प्रतिमा मनात बाळगत असतो. त्या कोणत्या वा कशा स्वरूपाच्या आणि तशा प्रतिमा करण्याचे कारण काय असते?
काही प्रतिमा-तज्ज्ञ असे मानतात की, या विविध प्रतिमा म्हणजे आपले सुरक्षाकवच, लाभ देणारे साधन, प्रतिस्पध्र्याला नामोहरम करण्याचे आयुध अशी अनेक प्रकारची ‘कामे’ करतात. ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’, ‘डिस्कव्हरी’ वा ‘नॅशनल जिओग्राफिक’ चॅनल्स पाहणाऱ्यांना आता हे माहीत आहे की, अनेक सरपटणारे प्राणी विशिष्ट काळात, विशिष्ट परिस्थितीत, विशिष्ट वातावरणात आपल्या त्वचेचा रंग आणि डिझाइनही बदलतात. आपण ज्याची शिकार करणार त्याला अंदाजही येऊ नये म्हणून आजूबाजूच्या वनस्पतीचा, गवताचा, पानांचा रंग धारण करून निपचित पडून राहिलेला सरडा वा तत्सम कुणी प्राणी आकस्मिकपणे त्या ‘शिकारी’वर हल्ला करतो. पक्षीही त्यांच्या पिसांचे रंग बदलतात. कधी मादीला आकर्षित करण्यासाठी, तर कधी शिकारप्राप्तीसाठी. (परंतु प्राण्यांना खरोखरच किती रंगज्ञान वा रंगभान असते, त्यांना नक्की काय व कसे दिसते यावर संशोधन चालू आहे. अनेकांना होणारे सृष्टीज्ञान चक्क ‘ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट’ असते. रंगीत चॅनल त्या बिचाऱ्यांना उपलब्ध नसतात, असे आता नवे संशोधन सांगते. जे रंगांचे तेच ध्वनीचेही. मादीला आकर्षित करण्यासाठी केलेले ‘ध्वनिसंयोजन’ आणि आपल्या सहकाऱ्यांना धोक्याचा इशारा देण्यासाठी केलेली ध्वनिनिर्मिती वेगवेगळी असते.)
माणसाला आपला रंग बदलता येत नाही. पण प्रतिमा बदलता येतात. (विशिष्ट परिस्थितीनुसार ध्वनिसंयोजनही आपल्या संवादात करता येते- कधी अतिनम्र, कधी आक्रमक, कधी उद्धट, कधी आदरार्थी, तर कधी लाचार!)
आपल्या मनातील एक प्रतिमा असते की, आपण लोकांना कसे दिसलो वा भासलो पाहिजे. त्या कल्पनेनुसार ती प्रतिमा सजवायचा आपला प्रयत्न असतो. आपण स्मार्ट आहोत असे भासवायचे असेल तर त्या अनुषंगाने आपली भाषा, वेशभूषा, हावभाव ठरतात. परंतु, प्रत्यक्षात आपण जरा बावळटच आहोत किंवा तितके स्मार्ट नाही, स्मार्ट माणसांसारखा आपल्यात आत्मविश्वास नाही आणि केसांचा तसा भांगही नाही असे जर त्याला मनातल्या मनात वाटत (खुपत) असेल तर दोन प्रतिमा तयार होतात- एक ‘सेल्फ इमेज’ आणि दुसरी ‘प्रोजेक्टेड इमेज’. तिसरी प्रतिमा आपणच तयार करतो की, आपण इतरांना कसे दिसत असू! (म्हणजे आपल्या योजनेप्रमाणे की वेगळेच!) चौथी प्रतिमा म्हणजे पूर्णत: व्यावसायिक गरजेतून धारण केलेली. एखादा गुप्तहेर समाजात बेमालूम वावरतो आणि जराही सुगावा देऊ लागत नाही की, तो नक्की कसा आहे आणि काय करतो. याबद्दल तर त्याला तशी प्रतिमा निर्माण करायचे प्रशिक्षणच दिलेले असते. (जगातील हेरकथांमध्ये अशा अनेक चित्तथरारक पण पूर्णपणे सत्य अशा कहाण्या आहेत.) पाचवी प्रतिमा असते आपल्या व्यवसायामुळे निर्माण झालेली. (प्रेम चोप्रा बिचारा केव्हाही खलनायकच भासतो- प्रत्यक्षात अतिशय सभ्य व कुटुंबवत्सल असूनही. किंवा जॉनी वॉकर, केश्टो मुखर्जी हे पक्के दारुडे असावेत असा समज प्रचलित होतो- प्रत्यक्षात दोघेही दारू अजिबात पीत नसत.)
अनेक मानसशास्त्रज्ञांच्या मते जोपर्यंत आपले खरे स्वरूप अबाधित असते तोपर्यंत प्रतिमा आटोक्यात असतात. परंतु जेव्हा त्या प्रतिमाच मूळ व्यक्तिमत्त्वाला व्यापून टाकतात तेव्हा जो असमतोल तयार होतो त्यातून अनेक प्रकारच्या मानसिक समस्या निर्माण होतात.
यासंबंधात मागे एका लेखात काहीसे विवेचन आले आहे. त्यामुळे त्याची पुनरुक्ती करीत नाही. परंतु एक मुद्दा मात्र पुन्हा अधोरेखित करणे आवश्यक आहे. जाहिरातींचे जग हे अशा प्रतिमांच्या खेळावर उभे असते. गेल्या लेखातील वास्तव-अवास्तवाचा मुद्दा हा मिथकांच्या संदर्भात होता. तोच मुद्दा आधुनिक बाजारपेठीय संस्कृतीने जाहिरात कलेद्वारे आणला आहे. टीव्ही (विशेषत: रंगीत टीव्ही) आल्यानंतर जाहिरातींद्वारे आपल्या ‘अनकॉन्शिअस’ला चुचकारून आपल्यावर वेगवेगळ्या प्रतिमा (आणि मिथके) लादल्या जात असतात. त्यातील अतिशयोक्तीने आपण फसत नाही. (म्हणजे असे आपण मानतो!) उदाहरणार्थ, आयोडिन असलेले मीठ अन्नात होते म्हणून मुलगी हुशार आणि पुढे कलेक्टरही झाली. किंवा विशिष्ट सोप पावडर वापरल्याने शर्ट अधिक शुभ्र होऊन प्रमोशन मिळाले वा शाळेत पहिला नंबर आला किंवा विशिष्ट ब्रँडचा चहा ऑफर केल्यामुळे लग्न जमले आणि एखादे शीतपेय प्यायल्यामुळे क्रिकेट सामन्यात शतक झळकवले! बहुतेकजण अशा अवास्तव (पण आधुनिक) मिथकांना फारशा गांभीर्याने घेत नाहीत. पण त्या प्रतिमांच्या मार्फतच तो चहाचा, शीतपेयाचा, सोपचा ब्रँड रूढ होत जातो. म्हणजेच आधुनिक भांडवली-बाजारपेठीय- चंगळवादी व्यवस्थेला प्रतिमा-मिथक निर्मिती ही गरजेची गोष्ट आहे. पौराणिक कथा, महाकाव्यातील वा धर्मकथांमधील मिथकांचा सामाजिक-सांस्कृतिक ‘रोल’ हा नैतिक नियमनाचा होता. हा फरक महत्त्वाचा आहे.
परंतु त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायला हवे की, प्रतिमा-निर्मितीचे मूळ एकाच प्रकारच्या मानसिकतेतून तयार होते. अर्न्‍स्ट डिक्टर या मनोविश्लेषणतज्ज्ञाने याबद्दल विशेष संशोधन केले होते. माणसाच्या खोल-खोल अंतर्मनात शिरून त्याच्या सुप्त आशा-आकांक्षा, अपेक्षा-शंका, भय व दबलेल्या इच्छा यांचा शोध घेतल्यास त्याचे व्यक्तिमत्व संतुलित, तणावमुक्त करता येईल आणि ती व्यक्ती खऱ्या आत्मविश्वासाने जगू शकेल असे डिक्टर यांचे मत होते.
हजारो माणसे अवास्तव महत्त्वाकांक्षा बाळगतात, आपण त्या उच्चपदासाठी लायक असूनही डावलले गेलो आहोत, असा गंड मनात बाळगतात, असाध्य महत्त्वाकांक्षेच्या मागे झपाटल्यासारखे लागतात, मग ती महत्त्वाकांक्षा पुरी होत नाही हे दिसताच ती काहीही करून पूर्ण करण्यासाठी कट-कारस्थाने करतात. कित्येक खून, आत्महत्या अशा सुप्त वा अर्धप्रकट महत्त्वाकांक्षांमुळे होतात आणि त्यांचा मानसिक आधार प्रतिमांमध्ये असतो. जर ‘सेल्फ इमेज’ आणि ‘प्रोजेक्टेड इमेज’ यांच्यात अंतर नसेल तर तसे होणार नाही, असे सांगून आजचे मानसशास्त्रज्ञ असे सांगतात की, अलीकडे वाढलेले हार्ट प्रॉब्लेम्स, बीपी, शुगर, डिप्रेशन व पर्यायाने काही गंभीर आजार हे या प्रतिमा-असमतोलाने झालेले आहेत.
अर्न्‍स्ट डिक्टरच्या मानस सिद्धांतांवर प्रयोग व चिंतन करून व्हॅन्स पॅकार्ड या जाहिरातशास्त्र लेखकाने आधुनिक प्रतिमाशास्त्राचे नियमच सांगितले. काही प्रातिनिधिक ग्राहकांचे ‘डेप्थ इंटरव्ह्यूज्’ घेऊन, म्हणजे त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात शिरून समाजाचे ‘सामूहिक अंतर्मन’ समजणे शक्य आहे हा तो नियम. आजही या तंत्राच्या आधारे जाहिराती बनविल्या जातात. (आता तर चित्रपट, टीव्ही मालिका, साहित्यसुद्धा या तंत्राचा आधार घेऊन केले जाते.) म्हणजेच प्राणीसृष्टीत ज्या गोष्टी- म्हणजे अन्न, पाणी, निवारा, पुनरुत्पादनाची आंतरिक गरज- या गोष्टी साध्य करण्यासाठी शारीरिक बदल घडवून आणण्याची सोय निसर्गाने काहींच्या बाबतीत केली आहे, त्याप्रमाणे माणसाला त्यासाठी प्रतिमानिर्मितीची क्षमता बहाल केली आहे. परंतु त्या प्रज्ञेमुळे माणूस अधिक प्रगल्भ झाला हे जितके खरे, तितकेच तो अधिकाधिक प्रतिमाग्रस्त सापळ्यात अडकू लागला हेही खरे.
व्यक्तिगत प्रतिमा जेव्हा सामाजिक अस्मिता म्हणून आविष्कृत होतात तेव्हा त्यातून प्रक्षोभ, क्रांती, युद्ध असे काहीही निर्माण होऊ शकते. हिटलर ही अशीच एक अवास्तव मिथक-प्रतिमा तयार झाली होती, ज्यामुळे काहींना स्फूर्ती मिळाली, तर काहींच्या मनात भयाचे काहूर निर्माण केले. आपला देश, धर्म, संस्कृती, भाषा, परंपरा यांचे वास्तव रूप आणि प्रतिमांनी सजलेले मिथकरूप हे सर्व आधुनिक संघर्षांचे कारण आहे. तालिबानी वा तामिळ वाघ स्वेच्छेने ‘मानवी बॉम्ब’ व्हायला तयार होतात आणि आपले प्राण गेले तरी प्रतिमा उजळून निघेल हा विश्वास त्यांना वाटतो तो त्यामुळेच. एखाद्याची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ आहे अशी टिप्पणी आपण नेहमी ऐकतो त्यामागचे सूत्रही तेच.
अ‍ॅलन डे बॉटन या लेखकाने ‘स्टेटस अँग्झायटी’ या नावाचे जे पुस्तक लिहिले आहे त्याचाही निचोड या प्रतिमा-असमतोलातच आहे. आपण एकटे पडलो आहोत, आपल्याला कुणी ‘रिस्पेक्ट’ देत नाही, आपण हुशार नाही, आपल्याला घरात, ऑफिसात, समाजात किंमत नाही असे समजून कुढत बसणारी माणसे स्वत:चा घात करतात आणि आपल्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च करून, बडय़ा बडय़ा पाटर्य़ाना हजर राहून, श्रीमंत-प्रतिष्ठितांच्या सहवासाच्या खोटय़ा कहाण्या रचून काही जण कधी ना कधी वास्तवाच्या खड्डय़ात कोसळतात. दोन्ही प्रतिमा घातकच. न्यूनगंड आणि उच्चभ्रू अहंगंड या दोन्हीचे मूळ अवास्तव आत्म-प्रतिमांमध्येच आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष रिचर्ड निक्सन हे अशाच परस्परविरोधी गंडांचे ‘व्हिक्टिम’ होते. कित्येक प्रथितयश लोकांना ते यश इतके झपाटून टाकते की, ते स्वत:लाच ‘लार्जर दॅन लाइफ’ समजू लागतात. ते जोपर्यंत त्याच प्रतिमाविश्वात रमतात तोपर्यंत ते हास्यास्पद झाले तरी त्यांना कळत नाही. पण कधी तरी वास्तव येऊन आदळते आणि ते केविलवाणे होतात. राजकारणातील आणि मीडियातील अनेकांना या अवास्तव आत्मप्रतिष्ठेच्या प्रतिमेने घेरलेले असते. त्यामुळेच मंत्रिपद गेले (वा आमदारपद, नेतेपद गेले) की गाडय़ांचा ताफा, हुजऱ्यांचे घोळके, चमच्यांचे पुंजके लोप पावतात. मग मीडियाही त्यांच्याकडे ढुंकून पाहात नाही. मग या स्वयंभू नेत्यांची धुसफूस-चिडचीड होते. परंतु, खुद्द टीव्ही- फिल्म्स- वृत्तपत्रात काम करणाऱ्यांनाही याच व्याधीने पछाडलेले असते. त्यांना मिळणारे महत्त्व, ती प्रतिष्ठा, ती सामाजिक ओळख त्या मीडियातील स्थानामुळे असते हे ते विसरतात. मग त्यांचा ‘नटसम्राट’ होतो वा सतीश आळेकरांच्या नाटकातील ‘बेगम बर्वे’! परंतु तशी अवस्था होण्यासाठी प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्री, प्रथितयश लेखक, टीव्ही अ‍ॅन्कर वा संपादक, ‘ज्येष्ठ’ पत्रकारच असले पाहिजे, असे नाही. त्या त्या पदाचे वा यशाचे अवास्तव रूप त्या माध्यमांतूनच तयार होत असते.
आपला चेहरा, आपले नाव, आपला दबदबा सतत आपल्या माध्यमातून दिसत असतो. म्हणजेच आपली अवास्तव ‘सेल्फ इमेज’ हीच आपली ‘प्रोजेक्टेड रिअल इमेज’ आहे असे पदोपदी ‘सिद्ध’ होत असते. त्यामुळे खऱ्याखुऱ्या आत्मप्रतिमेला प्रकट व्हायला संधीच नसते. अशा व्यक्ती प्रकाशझोतातून दूर गेल्या की, कधी कधी वेडय़ापिशा होतात, कधी कधी आपल्या भूतकालीन गौरवातच रममाण होतात, तर कधी आपला दबदबा तसाच आहे असे गृहीत धरून कुटुंबात, समाजात वागतात. लोक काही काळ ‘न्यूसन्स’ म्हणून दुर्लक्ष करतात, पण कधीतरी उघड अपमान करतात. कधी ना कधी तो अवास्तवतेचा आरसा भंग पावतोच. परंतु तो आरसा न फुटता जो आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखून वागतो-व्यवहार करतो, त्याच्या नशिबी अशी दुरवस्था येत नाही.  ‘मॅच्युरिटी’, आत्मजाणीव, सुज्ञता आणि समतोल या गोष्टी आपल्या व्यक्तिमत्त्वात, स्वभावात, व्यवहारात आणणे हे म्हटले तर सोपे आहे, म्हटले तर कठीण. परंतु तशा आत्मज्ञानासाठी ‘सिलॅबस’ नसते आणि ‘पदवी’ही! त्याची पहिली परीक्षा असते ती ‘प्रतिमा-मुक्ती’ची- ‘मल्टिपल इमेज सिन्ड्रोम’मधून बाहेर पडण्याची. कारण तो सापळा आपणच तयार केलेला असतो!

कुमार केतकर ,
शनिवार, २१ नोव्हेंबर २००९

मिथक : अवास्तवातील वास्तव


अमेरिकेतील एका विद्यापीठात एक ‘ब्रेन स्टॉर्मिग सेशन’ आयोजित केलेले होते. ‘डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडीज्’ या विभागाने ते खुले चर्चासत्र हॉलिवूडच्या मदतीने ठरविले होते. चर्चेत सहभागी झाले होते हॉलिवूडच्या चित्रपटांचे कथा-पटकथा लेखक, दिग्दर्शक, त्यांच्या मार्केटिंग खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, ‘मीडिया स्टडीज्’ विभागातील विद्यार्थी, मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ आणि पुराण वाङ्मय, मिथके व महाकाव्यांचे अभ्यासक. सर्व मिळून २५-३० जण असतील.
विषय होता ‘द रोल ऑफ इमॅजिनेशन अ‍ॅण्ड फॅन्टसी इन लिटरेचर अ‍ॅण्ड सिनेमा’, म्हणजे कल्पनाशक्ती आणि अवास्तव कल्पनाविलास यांचा साहित्य-चित्रपटातील उपयोग. कोणते चित्रपट चालतात, कोणते पडतात, कोणते साहित्य प्रदीर्घ काळ लोकमानसावर कब्जा करून राहते, कोणती मिथके लोकांना भावतात आणि का, ही व अशी सूत्रे त्या दोन दिवसीय चर्चासत्रात गुंफलेली होती.

कोणीही निबंध-प्रबंध वाचायचे नाहीत, पॉवर-पॉइंट प्रेझेन्टेशन करायचे नाही, लांबलचक भाषण करायचे नाही असे दंडक त्या चर्चासत्राला होते. खऱ्या अर्थाने ‘ब्रेन स्टॉर्मिग’! आपला जो काही अभ्यास वा अनुभव असेल त्याचा संदर्भ द्यायचा, पण तोसुद्धा त्या चर्चेची संगती आणि गती सांभाळून. म्हणजे चर्चेत उपस्थित झालेला मुद्दा विशिष्ट टप्प्यावर यायच्या आतच कुणी विषयांतर केले वा वेगळाच मुद्दा मांडला, तर सूत्रसंचालक त्याला थांबवत असे आणि चर्चा पुन्हा रुळावर आणत असे.
अशा प्रकारच्या चर्चासत्रात अधिक शिस्त लागते, संबंधित मुद्दय़ांवर एकाग्रता ठेवावी लागते, दुसरी व्यक्ती काय म्हणते आहे, याबद्दल पूर्ण आदर बाळगावा लागतो, आपलेच म्हणणे दामटण्याची प्रबळ इच्छा दूर करावी लागते, अहमहमिका, आवाज चढवून बोलणे आणि ‘अहं’ हे बाजूला ठेवल्याशिवाय अशी चर्चासत्रे फलदायी होत नाहीत. सूत्रसंचालकाने सुरुवातीलाच स्पष्ट केलेले असते की, येथे कुणीही सर्वज्ञ नाही आणि आपण एकत्र मिळून त्या ‘फिनॉमिनन’चा शोध घेत आहोत- ‘फिनॉमिनन ऑफ इमॅजिनेशन अ‍ॅण्ड फॅन्टसी’!
कल्पनाशक्ती आणि अवास्तव कल्पनाविलास या एकमेकांशी निगडित असणाऱ्या संकल्पना वाटल्या, तरी त्यात महदंतर आहे. कल्पनाशक्ती तरल आणि तीव्र असेल तर वास्तवतेच्याच चौकटीत कथा-कादंबरी उभी राहते, पण त्याच कल्पनाशक्तीला अवास्तव कल्पनाविलासाचे घोडे जुंपले की ते अक्षरश: चौखुर उधळते. मिथके आणि फॅन्टसी निर्माण होतात ती त्या अवास्तवातून, परंतु त्या फॅन्टसीचे इमले वास्तवाच्या पायावरच उभे असतात, म्हणूनच लोक आपल्या दैनंदिन जीवनात संदर्भ देतात ते त्या फॅन्टसीज् आणि मिथकांचा- जणू ती मिथकेच वास्तव आहेत.
राम, सीता, लक्ष्मण, भरत- अगदी दशरथ, कौसल्या, कैकयी ही अस्सल वास्तव पात्रे रंगवताना एकदम दहा तोंडांचा रावण कुठून येतो? तो विविध (अमानवी) रूपेही धारण करतो! हनुमान इकडून तिकडे संपूर्ण पर्वत नेतो, अवघी लंका पेटवून देतो- इतिहास (खरा वा काल्पनिक) सांगता सांगता अवास्तव मिथके आकार घेतात. रामायण हे केवळ महाकाव्य आहे की इतिहास, हा वादच आहे.
येशूला सुळावर चढविले जाणे दोन हजार वर्षांपूर्वी वास्तव होते. याहीपेक्षा अघोरी शिक्षा सर्व समाजांमध्ये दिल्या जात असत, परंतु येशूच पुन्हा अवतरतो आणि त्या चमत्काराने त्यानंतरचा वास्तव इतिहास घडतो. ( ‘द जीझस पझल : डिड ख्रिश्चॅनिटी बिगिन विथ अ मिथिकल ख्राइस्ट?’ असा एक वाद उपस्थित करून येशू हे मिथक आहे, असे प्रतिपादन काहींनी केले होते. अपेक्षेप्रमाणे याला व्हॅटिकनने आक्षेप घेतला होता.)
कुरुक्षेत्रावर युद्ध होणे वास्तव आहे, परंतु त्या युद्धाचा ‘आँखो देखा हाल’ संजयने अंध धृतराष्ट्राला राजमहालात बसून सांगणे (टीव्ही चॅनेल नसतानाच्या काळात) हे अवास्तव कल्पनाविलासाचे नाटय़मय चित्रण. (अर्थातच पुष्पक विमान, वज्रास्त्रे अशा अनेक ‘हाय-टेक’ गोष्टी रामायण- महाभारत काळात खरोखरच होत्या असे प्रामाणिकपणे मानणाऱ्यांचाही वर्ग आहे. त्यांना ऐतिहासिक पुराव्याची गरज भासत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून फॅन्टसी हेही तत्कालीन वास्तवच!)
जगात जितके समाज आहेत त्या सर्व समाजांमध्ये स्वर्ग, नरक, सर्वशक्तिमान देव, राक्षस-महाराक्षस, भूत-पिशाच्च अशा संकल्पना रूढ आहेत. त्यांना वास्तवाचा आधार द्यायची त्यावेळच्या माणसांना (आणि आजही बऱ्याच जणांना) गरज वाटली नाही. किंबहुना मिथके व फॅन्टसी ही त्यांच्या वास्तव जीवनाचा भाग झाली होती. मायथॉलॉजीस्- म्हणजे मिथक-पुराणकथा ही माणसाची मानसिक गरज आहे, असे त्या चर्चासत्रात एका प्राध्यापकाने सुचविले. किंबहुना अशी अनंत मिथके नसती तर माणसाची संस्कृतीच निर्माण झाली नसती, असे त्याचे प्रतिपादन होते. प्राणीसृष्टीतील इतर कुणीही अशी मिथके निर्माण करीत नाही, पण अगदी प्राचीन आदिवासीही त्यांच्या सामाजिक जीवनाला मात्र मिथकांचा आधार देतात.
प्राण्यांचा बळी देणे, कुठच्या तरी उग्र भासणाऱ्या दगडी पुतळ्यावर त्या प्राण्याचे रक्त शिंपडणे, त्या पुतळ्याभोवती फेर धरून नाचणे, तो ‘देव’ प्रसन्न करून घेणे वा एखाद्या राक्षसाला वा पिशाच्चाला चित्र-विचित्र कर्मकांड करून शांत करणे, मृताला ‘पुढच्या प्रवासासाठी’ मार्ग सुकर करून देणे, ती मृत व्यक्ती ‘भूत’ म्हणून पुन्हा आपल्यात येऊ नये म्हणून विविध प्रकारचे (अघोरीसुद्धा!) मंत्र-तंत्र करणे- अशी शेकडो उदाहरणे देता येतील. (श्राद्ध, सर्वपित्री अमावस्या, दृष्ट काढणे, विशिष्ट खडय़ांच्या अंगठय़ा घालणे, गंडे बांधणे, ‘शांत’ करणे असे असंख्य प्रकार आजही जगभर चालू आहेत.) या सर्व बाबींमध्ये अंधश्रद्धा आहेच, पण त्या चर्चासत्रात भाग घेणाऱ्यांना प्रश्न पडला होता तो हा की, मिथके आणि फॅन्टसी यांची माणसाला गरज का भासली व आजही का भासते? श्रद्धा-अंधश्रद्धांचे मूळ त्या मिथकांमध्येच तर आहे आणि तरीही मिथके म्हणजे अंधश्रद्धा नव्हेत.
या मुद्दय़ावर निरूपण करताना एका हॉलिवूडच्या पटकथा लेखकाने म्हटले की, जेव्हा त्या मिथकांमधील श्रद्धा-अंधश्रद्धा गळून पडू लागल्या (वा आपल्याला तसे वाटले!) तेव्हा स्टार ट्रेक, स्टार वॉर्स, स्पायडरमॅन, बॅटमॅन असे चित्रपट निर्माण झाले. विश्वसंचार करणारी अवकाशयाने निर्माण झाली. प्रकाशाच्या वेगाने जाऊ शकणारे यान आणि त्यामुळे लक्षावधी वर्षांचे आयुष्य लाभलेला माणूस चित्रपटात आला. ‘मॅट्रिक्स’सारख्या ‘ट्रायॉलॉजी’त एकाच वेळी अनेक ठिकाणी अवतरणारी, अदृश्य होऊ शकणारी, माणसाच्या मूळ प्रेरणांचा शोध घेत घेत त्या अमोघ शक्तीचे अस्तित्व प्रकट करणारी ‘वास्तवातली’ माणसे हॉलिवूडने जन्माला घातली.
शेक्सपियरच्या नाटकातील भूत-पिशाच्चसुद्धा वास्तवच असतात (म्हणजे होतात!) परंतु सर्व मानसशास्त्रज्ञ, इतिहासकार, राजकारणी, विचारवंत आजच्या ‘ह्युमन प्रेडिकामेंट’चे वर्णन करतानाही शेक्सपियरचेच दाखले देतात, त्यातलेच संवाद उद्धृत करतात. भूत-पिशाच्च दुय्यम होतात आणि नाटकातली पात्रे ही आपल्या आजूबाजूची, ओळखीची माणसं वाटू लागतात. आज ४०० वर्षे होऊन गेली तरी शेक्सपियर आणि चार हजार वर्षे होऊन गेली तरी रामायण-महाभारत हे आपल्याला आजचे संदर्भ वाटतात, याचे एक कारण मानवी स्वभावातील काही भाव रूप बदलून पण मुळात तसेच राहिले आहेत, असे बहुतेकांना वाटत असते, हे आहे. वास्तवाचे चित्रण प्रभावी असेल तर ते काहीही अवास्तव पेलू शकते, असे त्या हॉलिवूडच्या लेखकाचे म्हणणे होते. (ते त्यांच्या आणि आपल्याही चित्रपटात दिसतेच!)
जोसेफे कॅम्पबेल (१९०४-१९८७) हा एक मोठा मिथक-संशोधक होता. जगातील अनेक समाजांमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथा, पुराण वाङ्मय, धर्मग्रंथ, चित्रकला, शिल्पकला, कुलदैवते, अगदी चमत्कार आणि अंधश्रद्धा या सर्वाचे अफाट संकलन करून त्याने एक निष्कर्ष काढला होता तो असा की, त्या सर्व मिथक आणि फॅन्टसीज्मध्ये समान सूत्र आहे. त्या सूत्राच्या आधारे माणूस आणि त्याच्या जीवन प्रेरणा समजून घेता येतील. त्या प्रेरणांमध्ये सर्वात प्रभावशाली आहे ती ‘द पॉवर ऑफ मिथ’. माणूस केवळ ऐहिकतेवर जगत नाही. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य या गोष्टी लागतातच, पण माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त होऊ लागतो तो त्याच्या कल्पनाविलासामुळे, फॅन्टसीज्मुळे, साहित्य-महाकाव्य आणि चित्र-शिल्पकलांमुळे.
नाहीतर माणसाला पिरॅमिड्स बांधायची काहीही ‘गरज’ नव्हती. चंद्रावर जायचीही निकड नव्हती. विश्वजन्म व विश्वरचनेचा शोध घ्यायची गरज नव्हती. माणूस झपाटला जातो तो मिथकांमुळे आणि ते झपाटलेपण एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित नसते. समाजाला एक ‘कलेक्टिव अनकॉन्शियस’ किंवा सामूहिक अंतर्मन असते, या कार्ल गुस्ताव युंग या मानसशास्त्रज्ञाच्या सिद्धांतावर कॅम्पबेल यांनी अधिक चिंतन- संशोधन केले होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे माणसाच्या ऐहिक गरजा अगदीच कमी असतात. (दुर्दैवाने त्याही पुऱ्या होत नाहीत), पण त्याची मानसिक झेप अथांगतेकडे झेपावत असते. त्यातूनच मिथके तयार होतात. कॅम्पबेल यांचा ‘द हीरो विथ अ थाऊजंड फेसेस’ हा मूलभूत ग्रंथ आणि ‘द पॉवर ऑफ मिथ’चा सिद्धांत यांनी अवघे विचारविश्व व कलाविश्व ढवळून निघाले होते.
‘स्टार वॉर्स’ या १९७७ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाचा प्रेरणास्रोत कॅम्पबेल यांच्या त्या दोन ग्रंथांत होता, असे जेव्हा जॉर्ज ल्युकास या हॉलिवूडच्या चित्रपट दिग्दर्शकाने सांगितले, तेव्हा काहीशी खळबळ माजली होती, परंतु त्यानंतर अनेक निर्माते- दिग्दर्शकांनी त्यांच्यावर कॅम्पबेल यांच्या ग्रंथांचा व सिद्धांतांचा कसा प्रभाव पडत होता, हे सांगायला सुरुवात केली.
काही तर्ककठोर विज्ञानवाद्यांनी कॅम्पबेल यांची ‘फॅन्टसीवादी’ आणि मिथकांचे अवास्तव स्तोम माजविणारा लेखक/विचारवंत म्हणून संभावना केली होती, परंतु त्या टीकेने कॅम्पबेल कधीही अस्वस्थ झाले नाहीत. त्यांच्या मते सर्व कला, साहित्य मनात जन्माला येते. आणि ती कला कितीही वास्तव जीवनातून निर्माण झाली असली तरी तिचा आविष्कार कल्पनाविलासातूनच होत असतो. कल्पनाशक्तीला मुक्त वाव मिळाला की अवास्तव वाटणारी मिथके आणि फॅन्टसीज जन्माला येतात. ते अपरिहार्य आहे इतकेच नव्हे तर त्यामुळेच जीवनात आनंद निर्माण होतो. कॅम्पबेल यांच्या जीवनाचे एक सूत्र होते- ‘फॉलो द ब्लिस’! प्रत्येक माणसाने मनात निर्माण होणाऱ्या त्या कल्पनास्रोताच्या, आनंद देणाऱ्या प्रेरणांच्या आधारेच जीवन जगायला पाहिजे. ऐहिकता, संपत्तीसंग्रह, लोभ यातून तो आनंद मिळणे शक्य नाही, असे त्यांचे मत होते. कॅम्पबेल संन्यास घ्यायला सांगत नव्हते, नि:संग व्हायला सांगत नव्हते की ऐहिकतेचा त्याग करायला सांगत नव्हते. त्यांच्या दृष्टिकोनातून ऐहिकतेत अडकून पडले की सर्जनशीलता आणि आनंद या दोन्ही गोष्टींना माणूस मुकतो. कॅम्पबेल यांची १९२४ साली जे. कृष्णमूर्ती यांच्याशी भेट झाली होती. अर्थातच कृष्णमूर्ती तेव्हा थिऑसॉफी चळवळीतील ‘ऑर्डर ऑफ द स्टार’चे सर्वोच्च ‘गुरू’ होते. पुढे पाच वर्षांनी कृष्णमूर्तीनी ती संस्था विसर्जित केली. परंतु कॅम्पबेल तेव्हाच, म्हणजे १९२४ सालीच कृष्णमूर्तीच्या ज्ञानाने व व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. त्यानंतरच कॅम्पबेल यांनी भारतीय पुराणकथा, मिथके, महाकाव्ये आणि उपनिषद-वेदांचा अभ्यास कुरू केला होता. त्यांना जर्मन, फ्रेंच, लॅटिन भाषा येत होत्याच; त्यांनी नंतर संस्कृतचाही अभ्यास केला.
कॅम्पबेल यांनी हाही प्रश्न उपस्थित केला की, माणूस सामूहिकरीत्या मिथके कधी तयार करू लागला? त्याच्या मनाला मुक्त विहार करून देऊन तो फॅन्टसी का व केव्हा करू लागला?
गेल्या ‘त्रिकालवेध’ स्तंभात (७ नोव्हेंबर २००९)  क्लॉड लेव्ही स्ट्रॉस या फ्रेंच ‘स्ट्रक्चरॅलिस्ट’ ऊर्फ संरचनावादी विचारवंताच्या सिद्धांतांविषयी थोडक्यात मांडणी केली होती. मानवी समूह हे जन्म व मृत्यू या दोन टोकांच्या दरम्यान जे जीवन जगतात त्याला अनेक रूढी, कर्मकांडे, परंपरा, व्यवहार यांनी गुंफलेले असते व त्या अनुषंगाने येणारे संकेत, नियम यांनी जोडलेले असते. त्यातून एक सामूहिक सामाजिक-सांस्कृतिक संरचना तयार होते. त्या संरचनेशिवाय माणसाचे सामाजिक जीवन उभे राहात नाही, असे त्याचे म्हणणे होते. याचा अर्थ लेव्ही स्ट्रॉस रूढी वा कर्मकांडांचे समर्थन करीत नव्हता. मानववंशशास्त्रज्ञ या नात्याने तो, सुमारे १० हजार वर्षांत विविध समाज कसे उभे राहिले, याचे विश्लेषण करीत होता. त्याचप्रमाणे कॅम्पबेल यांनी माणसाच्या जीवनात मिथक व फॅन्टसी आणि एकूणच कल्पनाविलासाला काय स्थान आहे याबद्दल चिंतन-संशोधन केले. त्यांच्या दृष्टिकोनातून रामायण, महाभारत, बायबल, पुराण, कुराण हा सर्व प्रभावी कल्पनाविलास आहे आणि पिरॅमिडस्पासून ते विश्वशोध घेणारी अवकाशयाने हा सर्व सर्जनशील फॅन्टसीचा प्रभाव आहे.
एका दृष्टिकोनातून असेही म्हणता येईल की, सर्व कला व विज्ञानही त्या मिथक व फॅन्टसीज्चा विलक्षण चैतन्यशील आविष्कार आहे-ऐहिकतेच्या पलीकडे जाणारा आणि तरीही याच भौतिक वास्तवात जन्माला येणारा सर्जनशील व आनंददायी आविष्कार!


कुमार केतकर ,
शनिवार, १४ नोव्हेंबर २००९

अपौरुषेय आहे वंश मानवाचा!

जन्म आणि मृत्यू : या दोन टोकांमध्ये जे घडते, बिघडते, सजते, विस्कटते, बदलते, स्थिरावते, आजारपणात विकल करते वा अपघातात जायबंदी 
, आनंद व दु:खाच्या चक्रात फिरवते, त्याला आपण जीवन म्हणतो. जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये जाणता-अजाणता केलेला प्रवास. काही अत्यल्प अपवाद वगळता हा प्रवास १०० वर्षांच्या आतच असतो. प्रत्येक देशातील आयुष्यमान (आयुष्यरेषा!) वेगवेगळे. अफगाणिस्तानमध्ये तेथील यादवीमुळे ते आयुष्यमान ५० च्या आत आले आहे आणि सुस्थित अमेरिकेत ९०-१०० पर्यंत.
समाज कुठचाही असो, कोणत्याही धर्माचा असो, भाषा- बोली कोणतीही असो, भौगोलिक परिसर कसाही असो- या जीवनप्रवासातील काही टप्प्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. मग तो मानवी समूह बर्फाळ उत्तर ध्रुवावरील आíक्टक प्रदेशात असो, वा अ‍ॅमेझॉन जंगलात खूप आत, बाकी ‘सिव्हिलायझेशन’पासून सर्वार्थाने दूर. अंदमान परिसरात आजही अतिप्राचीन जीवनपद्धतीत राहणारा आदिवासी असो वा आफ्रिका खंडातील निबिड जंगलात गुजराण करणारी टोळी.
जगातील भाषिक समूहांची संख्या अडीच हजार की सहा हजार या वादात जायचे कारण नाही. भाषा एकच असली तरी अनेक समूह असून ते विशिष्ट जीवनपद्धती आणि संस्कारशैलींनी अंतर्गतरीत्या विणलेले असतात. त्यापैकी बहुतेक समूहांचा प्रयत्न ती वीण शक्यतो उसवू नये असा असतो. उदाहरणार्थ, आपण ज्यांना ‘एस्किमो’ म्हणून ओळखतो, ते कॅनडाच्या उत्तर भागातील बर्फाळ आíक्टक प्रदेशात असोत वा ग्रीनलँडमधील बिनबर्फाच्या प्रदेशात असोत वा रशियन सायबेरियात. अफाट पसरलेल्या पण वैराण (मात्र खनिजसमृद्ध) आणि शेती अशक्य असलेल्या या भागांमध्ये एकूण दीड-दोन लाख लोकच राहतात. त्यांच्यातही तीन भाषा-बोली आहेत. युपीक (मुख्यत: सायबेरियात), अ‍ॅल्यूत (अलास्कात) इन्यूपिअ‍ॅक (ग्रीनलँडमध्ये). पण विरळ वस्ती आणि कमी लोकसंख्या असूनही त्यांची एक सामूहिक जीवनशैली, संस्कार, मूल्ये, नैतिक नियमावली अशी वीण असतेच. ‘एस्किमो’ शब्दाचा स्थूल अर्थ : शिकार करून कच्चे मांस खाणारी माणसे. परंतु मानवी हक्क संघटनांनी ही त्या समाजाची अपमानकारक ओळख आहे, अशा प्रचाराला सुरुवात केल्यावर युनोने त्यांना ‘इन्यूयीट’ (Inuit) असे नाव त्यांच्याच सांस्कृतिकतेच्या आधारे दिले.
मुद्दा हा की भाषा, धर्म, देश, वंश या व्यापक संज्ञांच्याही पलीकडे, त्यांच्या अंतर्गत अनेक समूहजीवन पद्धती असतात. त्या पद्धती कशा निर्माण होतात, रूढ होतात, त्यांच्यातील नैतिक नियमावली कशी ठरते (कुणी ठरवलेली असते आणि कोण ती ‘अमलात’ आणत असतो) हे व असे अनेक प्रश्न म्हणजे मानववंशशास्त्राला अजूनही पूर्ण न उकललेली ‘सिव्हिलायझेशनल पझल्स’!
जन्म आणि मृत्यू या दोनच अटळ गोष्टी. त्या सर्वानाच लागू. पण त्या दोन टोकांमध्ये असलेले काही टप्पे सर्व मानवी समूहांना- टोळ्यांना, आदिवासींना, खेडय़ांना- शहरांना व महानगरांनाही लागू पडतात. उदाहरणार्थ, मूल जन्माला आल्यावर केले जाणारे समारंभ, विवाह (वा घटस्फोट), व्यवसाय/काम: शिकार, शेती, नोकरी इ., वृद्धत्व, मृत्यू व त्यानंतरचे अंत्यसंस्कार. याशिवाय काही उत्सव असतात, सण असतात, कुलदैवत-स्मरण समारंभ असतात. पूजा-अर्चा, सामूहिक प्रार्थना, श्रद्धा-अंधश्रद्धा व त्या अनुषंगाने येणाऱ्या चालीरीती, संकेत व नियम इत्यादी.
प्रत्येक मानवी समूहाची म्हणजे भाषिक- धार्मिक- भौगोलिक- वांशिक उपसमूहांची, वस्त्यांची, टोळ्यांची, आदिवासींची एक स्वयंनिर्मित आचारसंहिता असते. ती पाळली जाते की नाही हे पाहणारी एक अंतर्गत यंत्रणा असते. न पाळल्यास शिक्षा असते आणि जन्म-विवाहापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत (भूत-पिशाच्चांनाही शांत करण्यापर्यंत!) एक सविस्तर नियमावली असते. यापैकी काहीच ‘वैज्ञानिकते’च्य वा तर्काच्या कसोटीवर बसविता येत नाही वा सिद्ध करता येत नाही. मानवी समूह ही जी ‘सांकेतिक संरचना’ करतो त्यातूनच प्रत्येक माणूस त्यांचा सामाजिक व्यवहार करीत असतो. ती ‘सांकेतिक संरचना’ ही तर्क वा विज्ञानावर आधारलेली नसली तरी तिचा अभ्यास मात्र वैज्ञानिक पद्धतीने करता येतो!
हे हजारो, खरे म्हणजे लाखो, मानवी समूह म्हणजे ‘सिव्हिलायझेशनल ब्लॉक्स’. या ब्लॉक्स ऊर्फ विटांची प्रचंड वैश्विक इमारत म्हणजे ‘ह्यूमन सिव्हिलायझेशन’. परंतु प्रत्येक ब्लॉक म्हणजे एक बऱ्याच अंशी स्वायत्त असलेले ‘स्ट्रक्चर’. अशी हजारो/लाखो स्ट्रक्चर्स. त्यांच्यात काही समान गुणधर्म असतात/दिसतात, पण अनेक असमान गुणधर्मही अगदी विरोधी वा शत्रूवत वाटावे, असेही असतात.
माणूस नावाच्या प्राण्याचे हे गुणधर्म मुळातूनच तपासल्याशिवाय, त्यांचा शोध घेतल्याशिवाय, भाषा कशी विकसित होत गेली, श्रद्धा-अंधश्रद्धा- रूढी कशा निर्माण झाल्या, परंपरा व संकेत कसे रुजत गेले, माणसा-माणसातील परस्परसंबंध व त्यातील उतरंड कशी ठरत गेली, स्त्री-पुरुष संबंधातील नैतिकतेचे निकष कसे निर्माण झाले व त्यातूनच विवाह- नियमावली कशी बदलत गेली, या व अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार नाही, हे ओळखून काही विज्ञाननिष्ठ मंडळींनी शोध सुरू केला. त्यातूनच अ‍ॅन्थ्रॉपॉलॉजी ऊर्फ मानववंशशास्त्र, सोशियॉलॉजी म्हणजे समाजशास्त्र, एथिक्स म्हणजे नीती- संकल्पनाशास्त्र अशा ज्ञानशाखा निर्माण झाल्या. या ज्ञानशाखा जेमतेम दीड- दोनशे वर्षांच्या आहेत.
अशा ज्ञानशाखांना पदार्थविज्ञानशास्त्राचे वा रसायनशास्त्राचे निकष लावणे शक्य नसते. कारण मानवसमूह प्रयोगशाळेत टाकून व त्यांच्यावर प्रक्रिया करून वा त्यांच्या जीवनशैलीचे सुप्त समीकरण तयार करून समजून घेता येत नाहीत. अस्तित्वात असलेल्या समूहांचाच अभ्यास म्हणजे समाज (विशेषत: प्राचीन) हीच प्रयोगशाळा. परंतु जे समूह (टोळ्या, दूर जंगलात राहणारे आदिवासी समूह इत्यादी) ‘आधुनिकतेने भ्रष्ट’ झालेले नाहीत, ते अगदी शुद्ध म्हणजे ‘प्युअर’ स्थितीत अभ्यासण्यासाठी अशा बऱ्याच संशोधक मंडळींनी गेल्या शतकात पुढाकार घेतला.
चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीविषयक संशोधनाने, कार्ल मार्क्‍सच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तन संबंधातील सिद्धांत मांडणीने आणि सिग्मंड फ्रॉईडच्या मनोविश्लेषणाच्या प्रयोगांमुळे मानववंशशास्त्राला एक (वा अनेक) दिशा उपलब्ध होऊ लागल्या होत्या. त्या संशोधनांमध्ये इतके विविध, सुरस व चमत्कारिक विषय होते की अनेकजण त्याकडे आकृष्ट झाले. शिवाय त्यात साहसही होते. कारण नरभक्षक टोळ्यांच्या सामाजिक जीवनापासून ते भटक्या-विमुक्त पद्धतीने राहणाऱ्या समूहांपर्यंत आणि शेतीस्थित समाजापासून ते भारतीय उपखंडातील जाती समूहांपर्यंत सर्व समाज या संशोधकांच्या ‘प्रयोगशाळे’त समाविष्ट झाले.
या संशोधकांची एक मोठी फळीच तयार झाली. फ्रॅन्झ बोआज, आल्फ्रेड क्रोबर, पॉल रॅडिन, ब्रोनिस्लॉ मॅलीनोव्हस्की, रुथ बेनेडिक्टस, मार्गारेट मीड, एमिल डर्कहाईम, लेस्ली व्हाईट असे बरेचजण. त्यांच्यात आणखीही एक प्रकांड विद्वान- संशोधक होता. त्याचे नाव क्लॉड लेव्ही स्ट्रॉस. चारच दिवसांपूर्वी लेव्ही स्ट्रॉस मरण पावले- वयाची १०० वर्षे पूर्ण केल्यानंतर. (त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९०८ मध्ये बेल्जियममध्ये झाला होता. मृत्यू ३ नोव्हेंबर २००९) त्यांनी या मूलभूत ‘स्ट्रक्चर्स’चा अभ्यास करून त्यातून एक सिद्धांत मांडला. म्हणून त्यांना ‘स्ट्रक्चरॅलिस्ट’ म्हणून ओळखले जाऊ लागले. विशेषत: १९६० ते १९७० च्या दशकात लेव्ही स्ट्रॉसवाद्यांचा एक ‘इंटेलेक्च्युअल’ पंथच निर्माण झाला होता. मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीत बसून दुर्गा भागवतही त्याच्या सिद्धांतावर त्यांचे भाष्ययुक्त प्रवचन करीत असत. आपल्या देशातही मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मंडळींनी भरीव कार्य केले आहे. (जी. एस. घुर्ये, एम.एन.श्रीनिवास, इरावती कर्वे, दुर्गा भागवत आणि ‘सब-ऑल्टर्न स्टडीज’ या ज्ञानशाखेत काम करणारे बरेच जण.) या ज्ञानशाखेत अभ्यास करणारा निरीक्षक संशोधक हाच एक महत्त्वाचा घटक असल्याने त्याचे निष्कर्ष व्यापक वा सर्वसमावेशक नसतात, सब्जेक्टिव असतात, अशी टीका असते. ती टीका व तत्संबंधी वाद बाजूला ठेवूया. कारण टीकाकारांनाही हे मान्य करावेच लागते की, या मंडळींनी केलेली माणसाच्या सामूहिक जीवनशैलीबद्दलची निरीक्षणे हा एक ‘सिव्हिलायझेशनल स्टडीज्’मधील मोठा आधार आहे. स्वभावशास्त्र आणि माणसाच्या सांस्कृतिकतेचे, प्रेरणांचे आणि श्रद्धांचे स्रोत समजून घेण्यासाठीही या सर्व संशोधनाचा प्रचंड उपयोग झाला आहे.
जगातील सर्व समाजांमध्ये विवाह आणि स्त्री-पुरुष संबंध यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय विवाहसंस्थेविषयी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिलेल्या मूलभूत ग्रंथाला तितकीच महत्त्वाची कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची प्रस्तावना आहे.
लग्न, संसार, कुटुंब, तडजोडी, मुलांचे संगोपन, त्यांच्यावरचे संस्कार, त्यांच्या जीवनाची घडी आणि पुन्हा त्यांची मुले, त्यांची वाढ, त्यांची लग्ने, त्यांचे संसार.. अशी साखळी वर्षांनुवर्षे चालू आहे. त्यातच स्त्री-पुरुषांमधील विषमता, स्त्रियांचे दुय्यम स्थान, वारसा हक्कांबद्दलचे वाद, विवाहबाह्य वा विवाहपूर्व स्त्री-पुरुष संबंध (हल्लीच्या काळात प्रकर्षांने आलेले समलिंगी संबंध) येथपासून ते अगदी साध्या वाटणाऱ्या (पण अनेकदा गंभीर बनणाऱ्या) विवाह समारंभातील होम-सप्तपदीपासून ते मानपान असा तो एक महाप्रकल्पच असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील तो एक महत्त्वाचा ‘टर्निग पॉइंट’ मानला जातो.
ही विवाहसंस्था व संकल्पना इतकी महत्त्वाची कशी झाली, मार्क्‍स-एंजल्स म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रॉपर्टी’ हा त्यातील एकमेव कळीचा मुद्दा आहे की, इतर अनेक सामाजिक-सांस्कृतिक घटक आहेत, याबद्दल गेली बरीच वर्षे वाद चालू आहेत. विवाहसंस्था व संस्कार याबद्दलचे लेखन, नियम संकेत तर सुमारे पाच हजार वर्षे वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचलित आहेत. मोनोगामी (एक पत्नी-एक पती पद्धती) पॉलीगामी (बहुपत्नी विवाह पद्धती) पॉलीअ‍ॅन्ड्री (बहुपती विवाह पद्धती) या ढोबळपणे माहीत असलेल्या स्त्री-पुरुष संबंधांपलीकडेही यात इतके वैविध्य आहे आणि संकेत, नियम, कायदे, रीतीभाती असूनही ते सर्व तोडून, झुगारून ‘स्वतंत्र’ संबंध ठेवणे प्रचलित आहे की, एकूणच ‘स्ट्रक्चर्स’ किती अभेद्य असतात याबद्दल प्रश्न पडावा.
ही ‘स्ट्रक्चर्स’ आणि ही नियमावली कोणी ‘मुखिया’ वा कोणी ‘मनू’ निर्माण करत नसतो, परंतु जगभरच्या सर्व मानव-समूहांमध्ये सामाजिक उतरंड आणि प्रत्येकाची ‘पायरी’ मात्र तयार होत राहते. या अपौरुषेय संरचनांचा अभ्यास म्हणजेच मानववंशशास्त्राचा अभ्यास!
गर्भपात हा तर अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्हा आहे. आपल्या देशात अलीकडेच वाद पेटला होता तो किती दिवसांचा गर्भ असताना गर्भपात कायदेशीर मानावा या मुद्दय़ावर. बहुतेक धर्मशास्त्रांनी गर्भपात पापसदृश म्हणजे निषिद्ध ठरविला आहे. ‘अनैतिक’ संबंधातून जन्माला आलेल्या मुलांना ‘अनाथ’ वा ‘अनैतिक’- इल्लेजिटिमेट चिल्ड्रेन असे संबोधू नये असे बालहक्क परिषदांचे म्हणणे आहे. मुले किती असावीत हा प्रश्नही सरकारच्या, कायद्याच्या कक्षेत असता कामा नये, असे काही स्वातंत्र्यवादी संघटनांचे म्हणणे आहे. चीनने ‘एक दांपत्य-एकच मूल’ असा दंडक घातल्यानंतर अनेक ‘बेकायदेशीर मुले’ जन्माला आली! काही स्त्रीमुक्तीवादी संघटनांनी असे कोणतेही बंधन घालणे हे स्त्री-स्वातंत्र्याच्या विरोधात आहे असे म्हटले तर कित्येक चिनी स्त्रियांनी स्टिरॉईड्स व तत्सम औषधे घेऊन आपल्याला पहिल्याच खेपेस जुळे व्हावे म्हणून ‘यशस्वी प्रयत्न’ केले. ‘एकच मूल’ हा कायदा असला तरी जुळे झाल्यास काय, याबद्दल चिनी कायद्यात तरतूद नव्हती.
म्हणजेच जगातील सर्व प्रदेशात आणि सर्व मानवी समूहांमध्ये विवाह- संसार- मले- वारस हे प्रश्न सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहेत. (जगात असंख्य स्त्रिया त्यांना मूल झाले नाही म्हणून ठार मारल्या जातात, घरातून बाहेर काढल्या जातात वा त्या आत्महत्या करतात.) आता विज्ञानाच्या मदतीने ‘स्पर्म बँक’च्या माध्यमातून, टेस्ट टय़ूब प्रयोगातून, गर्भाशय ‘भाडय़ाने’ देऊन मूल होण्याची ‘सोय’ झाली असली किंवा ‘७२ अवर्स’सदृश गोळ्या घेऊन मूल न होऊ देण्याची सुविधा आली असली तरी त्यातून नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. जी गोष्ट स्वाभाविक, नैसर्गिक व सहज मानली गेली होती, त्या स्त्री-पुरुष संबंधांभोवती प्रत्येक समाजाने अगदी सविस्तर ‘नैतिक-सांकेतिक संरचना’ म्हणजे ‘स्ट्रक्चर्स’ तयार केली आहेत.
मानववंशशास्त्रज्ञांच्या पुढे हे नैतिक- मानसशास्त्रीय- प्रशासकीय मुद्दे नसतात. त्यांचे संशोधन असते ते अशा प्रकारची ‘स्ट्रक्चर्स’ मुळात तयारच कशी झाली हे शोधणे. ते नीट समजले तरच एकूण मानवी व्यवहारावर प्रकाश पडेल असे त्यांना वाटते. कारण माणसाने तयार केलेली मिथके, रूपककथा, कर्मकांडे, कुलदैवते व त्या अनुषंगाने येणारे पूजापाठ, प्रार्थना इतकेच काय, विविध कलाविष्कार, विचार हे सर्व त्या ‘स्ट्रक्चर्स’मधून जन्माला आले आहे. लेव्ही स्ट्रॉस तर म्हणत असत की, ‘प्राचीन-  रानटी- असंस्कृत’ माणूस वा समाज हे वर्णनच चुकीचे आहे. कारण तथाकथित ‘आधुनिक- शहरी- सुसंस्कृत’ माणूस व समाज हा त्याच ‘स्ट्रक्चर्स’चा भाग असल्याने मुळातून बदलत नाही. लेव्ही स्ट्रॉस यांनी त्यांच्या ‘मायथॉलॉजिक्स’, ‘ट्रीस्ट ट्रॉपिक्स’ आणि ‘टॉटेमिझम’ या ग्रंथातून त्यांचे सिद्धांत मांडल्यानंतर जगभरच्या विचारवंतांमध्ये एकच खळबळ माजली होती. त्यांच्या सिद्धांतांना आधार होता तो त्यांनी ब्राझिल आणि नॉर्थ अमेरिकेतील, अजूनही अस्तित्वात असलेल्या ‘प्राचीन’ मानवी समूहांच्या केलेल्या अभ्यासाचा.
लेव्ही स्ट्रॉस यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी अनेक फ्रेंच विचारवंत पुढे आले. एकूणच ही सर्व चळवळ म्हणजे स्ट्रक्चरॅलिस्ट, डिस्ट्रक्चरॅलिस्ट्स, मॉडर्निस्ट्स, पोस्ट-मॉडर्निस्ट्स, पोस्ट- स्ट्रक्चरॅलिस्ट्स मुख्यत: फ्रान्समधील विद्यापीठांमध्ये हिरीरीने व अटीतटीने चालू होती. त्यात सहभागी झालेल्या मायकेल फुको, रोलॅन्ड बार्थ, जॅक्विस डेरिडा यांनी पुढे स्वतंत्र संशोधन- चिंतन करून समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि अर्थातच मानववंशशास्त्र यात मोलाची भर घातली.
युरोपातील व अमेरिकेतील अशा वैचारिक चळवळींनी, ज्ञानप्रसाराने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे संचित जमा झाले आहे ते मानवी संस्कृतीचे एक विलक्षण वैभव आहे. त्यांना केवळ बरोबर-चूक, योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक असे निकष लावून चालत नाही. कारण ते संशोधनाच्या आणि सापेक्षतेच्या चौकटीत बसविलेले असते. कोणत्याही समाजाची प्रगल्भता लक्षात येते ती अशा संशोधनातून, चिंतनातून, प्रबंधांमधून. त्यातूनच नाटके, चित्रपट, साहित्य, चित्र व शिल्पकला नवनवीन आकार घेते आणि आशयाला अधिक अर्थ प्राप्त करून देत राहते.
महाराष्ट्रापुरता (किंवा देशापुरताही) विचार करताना यात आपण नक्की कुठे आहोत? सेन्सेक्स आणि ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सबरोबर आपल्या ‘वैचारिकतेच्या इंडेक्स’चेही भान, भाषेचा अतिरेकी व उग्र अभिमान बाळगताना असायला हवे!कुमार केतकर, 

शनिवार, ७ नोव्हेंबर २००९

अशक्यतेचे आव्हान


आणखी एक हजार वर्षांनी किंवा पाच हजार वर्षांनी हे जग कसे असेल? (किंवा हे जग असेल की त्यापूर्वीच प्रलयात नष्ट झालेले असेल वा कधीतरी अणुयुद्धात बेचिराख झालेले असेल? असे प्रश्न सहसा आपल्याला त्रस्त करीत नाहीत. आपली नजर आपल्या संभाव्य आयुष्यमानापुरती वा फार तर तीन-चार पिढय़ा पुढे इतकीच जाऊ शकते. म्हणजे आणखी तीन-चारशे वर्षांनी काय असेल येथपर्यंत जाते. अमेरिकेत मात्र अशा प्रकारची भविष्यवेधी चर्चासत्रे नित्यनियमाने चालू असतात.
पण इतिहासाचा, अतिप्राचीन इतिहासाचा, प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास करणारी संशोधक मंडळी शेकडो वर्षे मागे जातात. जीवशास्त्राचा आणि मानववंशशास्त्राचा ऐतिहासिक अभ्यास करणारे संशोधक, तर लक्षावधी-कोटय़वधी वर्षे मागे जातात. ‘ज्युरासिक पार्क’ हा चित्रपट फक्त करमणुकीसाठी काढला गेला नव्हता. लक्षावधी वर्षांपूर्वीचे जग ‘डीएनए’ प्रक्रिया करून, डायनॅसोरसहित, आज उभे करता येईल का, या अगदी वास्तव वैज्ञानिक प्रश्नामधून निर्माण झालेले ते कथानक होते. जगभरच्या कोटय़वधी लहान मुलांना आणि (मोठय़ांनाही), डायनॉसोरबद्दल कुतूहल व अभ्यासही करण्याचे वेड त्या चित्रपटामुळे लागले. (चित्रपट, टीव्ही नसताना, सुमारे १५० वर्षांपूर्वी, टारझनच्या कादंबऱ्यांनी जंगल जीवन, प्राचीन आफ्रिका आणि आधुनिक जीवन याबद्दल असेच वाचकांना झपाटून टाकले होते.) जर इतक्या प्राचीन भूतकाळात शिरून, हाडांचे सापळे वा अन्य अवशेष जमा करून, माणूस त्यावेळचे आपले जग विज्ञान आणि कल्पनाशक्तीने उभे करू शकतो, तर भविष्यातले का नाही? काही फिजिसिस्ट्स् म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्रज्ञांनी तर पृथ्वीची, सूर्यमालिकेची आणि विश्वाचीच अखेर कशी होईल (म्हणजे प्रलय-अणुयुद्धांनी नव्हे, तर अगदी रीतसर, जन्म-वाढ-मृत्यू या चक्रानुसार) यावर ग्रंथ-निबंध-प्रबंध लिहिले आहेत. त्यावर चर्चासत्रेही झाली आहेत. त्या सर्व चर्चाना मुख्य आधार असतो, तो गणिताचा आणि आजवर झालेल्या सर्व शाखांतील वैज्ञानिक संशोधनाचा. पण मुख्य जिज्ञासा असते ती अशक्य, अगम्य, अथांग असलेल्या विश्वाची, जीवसृष्टीची आणि आपल्याला या गोष्टींचे आकलनच कसे होते (वा खरोखरच होते का?) या प्रश्नाची. पण माणसाने अगदी सुरुवातीपासून अशक्यतेचे आव्हान स्वीकारले आहे. आपण नेहमी एक सुविचार वाचत आलो आहोत- ‘जगात अशक्य असे काहीही नाही’, तरीही दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी ‘अशक्य’ असल्याचे म्हणत असतो. माणसाने गेली सुमारे (किमान) दहा हजार वर्षे शक्य-अशक्यतेच्या सीमा पुढे ढकलत, ढकलत नेल्या आहेत. हे माणसाला शक्य झाले ते त्याच्या प्रज्ञेच्या, कल्पनाशक्तीच्या आणि सामूहिक जीवनाच्या जोरावर. इतर कोणत्याही प्राण्याला शक्याशक्यतेच्या सीमा ओलांडता आलेल्या नाहीत.
काही हजार वर्षांपूर्वीचे वाघ, हत्ती वा हरीण जसे जीवन जगत होते, तसेच आजही जगतात. (याचा अर्थ त्यांना स्वत:चे ‘व्यक्तिमत्त्व’ नसते असे नाही. त्यांचा अभ्यास करणारे सर्वजण वाघ वा हत्ती वा अन्य प्राण्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांविषयीही सांगतात. मुद्दा हा की त्यांना ‘काळा’चे परिमाण नसल्याने आणि प्रज्ञा/कल्पनाविस्ताराची क्षमता नसल्याने ते ‘अशक्यतेचे आव्हान’ स्वीकारू शकत नाहीत.) माणसाच्या अचाट कुतूहलामुळे आणि प्रयोगशीलतेमुळे, निरीक्षण आणि अनुभवाचा ‘डेटाबेस’ तयार केल्यामुळे त्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा व जीवनशैलीचा अभ्यास करून माणसाने स्वत:च्या क्षमतेच्या पलीकडचे विश्व निर्माण केले आहे.
पक्ष्यांना उडताना पाहून, आपल्यालाही का उडता येऊ नये हा प्रश्न माणसाला पडला नसता, तर ‘थर्मोडायनॅमिक्स’चा अभ्यास करून, गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादा ओलांडून, महाकाय आकाराचे विमान बनवून, एकाच वेळेस पाच-सातशे प्रवाशांना (त्यांच्या सामानसहित) उडणे शक्य झाले नसते. अगदी प्राचीन गुहांमध्ये काढलेल्या चित्रांतून आणि पुराणकथांमध्येसुद्धा माणसाने स्वत:च्या अनेक मर्यादांवर मात करणे शक्य होईल अशी चित्रे/कहाण्या रंगविल्या आहेत.
माणूस जन्माला आल्यापासून इतर प्राण्यांपेक्षा तसा असहाय आहे. जितक्या झपाटय़ाने मांजरांची पिल्ले, गायींची वासरे, वाघांचे बछडे इत्यादी प्राणी जन्माला आल्यानंतर ‘स्वतंत्र’ होतात, तसे माणसाचे नाही. पहिली १२-१५ वर्षे लहान मुले आई-वडील, कुटुंब, समाज (पूर्वी टोळ्या) यांच्यावर अवलंबून असतात. शिवाय माणसाला चित्त्यासारखे वा हरणासारखे वेगाने पळता येत नाही, वाघासारखे पंजे वा दात त्याला नाहीत, वानराप्रमाणे या झाडावरून त्या झाडावर झेपावता येत नाही, माशांप्रमाणे जन्मभर पाण्यात राहता येत नाही, पक्ष्यांप्रमाणे उडता येत नाही.. वगैरे वगैरे. या सर्व असहायतेतून मार्ग काढण्यासाठी माणसाने अशक्यतेवर मात करायचे ठरविले- म्हणजे अगदी विचारपूर्वक वा योजनाबद्धरीत्या नव्हे, तर निसर्गाने दिलेल्या क्षमता-अक्षमता ओलांडल्याखेरीज जगणेच शक्य होणार नाही म्हणून.
खरे म्हणजे आता तो प्राचीन माणसाला पडलेला प्रश्न उरलेला नाही. बहुतेक शारीरिक-नैसर्गिक मर्यादांवर माणसाने मात केली आहे असे म्हणता येईल. ‘जिनोम’ प्रकल्प सिद्ध झाल्यावर मधुमेहापासून कॅन्सपर्यंत आणि अगदी किडनी-लिव्हरपासून ते डोळ्यांच्या वा कानांच्या आजारावरही ‘विजय’ मिळविता येईल, असा आत्मविश्वास शास्त्रज्ञांना आहे. खरे म्हणजे, आता तर वैज्ञानिकांची झेप अमरत्व प्राप्त करता येईल, असे म्हणण्यापर्यंत गेली आहे.
ज्याप्रमाणे ‘ज्युरासिक पार्क’च्या माध्यमातून माणूस लक्षावधी वर्षे, माणसाच्या जन्माच्याही अगोदर कित्येक लक्ष वर्षे मागे गेला, त्याप्रमाणे ‘स्टार ट्रेक’ या चित्रमालिकेतून तो हजारो/लाखो वर्षे पुढे गेला. प्रकाशाच्या वेगालाही मागे टाकून, सूर्यमालिकेच्या सीमाच नव्हे, तर विश्वातील तारासमूहांनाही ओलांडून, ‘स्टार ट्रेक’चे प्रवासी विश्वसंचार करतात. असा विश्वसंचार जर माणसाचे आयुष्यमान कित्येक हजार वर्षांचे नसेल, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तयार करता आला नसेल आणि अवकाशयानातील संगणक-संदेश यंत्रणा अक्षरश: पूर्णपणे स्वयंचलित नसेल, तर करताच येणार नाही. ‘स्टार ट्रेक’च्या कथेने, त्यातील प्रत्येक भविष्यकालीन पात्राने आणि वैज्ञानिकदृष्टय़ा त्यात असलेल्या शास्त्रशुद्धतेने अवघ्या जगाला इतकी मोहिनी घातली होती की, ‘ज्युरासिक पार्क’ प्रमाणे तीही एक ‘ग्लोबल इंडस्ट्री’ झाली. लहान मुले तर ‘स्टार ट्रेक’मधील प्रत्येक पात्राचे चरित्र, स्वभाव, बोलण्याची शैली यांची हुबेहूब नक्कल करू लागली होती. सर्व कार्टून चॅनल्सवरील ‘स्टार ट्रेक’सदृश कथा दाखविल्या जाऊ लागल्या. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यक्रमात अनुभवण्याची शक्यता अजिबात नाही (अमरत्व वा विश्वसंचार) त्याबद्दल इतके वास्तव वाटावे असे आकर्षण आबालवृद्धांना का वाटते? त्या आकर्षणात जितका दुर्दम्य आत्मविश्वास आहे, तितकाच विज्ञान-तंत्रज्ञानावरील (अवास्तव!) विश्वासातही आहे.
नेमके हेच रहस्य उलगडण्यासाठी किंवा त्या ‘अशक्यते’चा शोध घेण्यासाठी अमेरिकेत एक हजार, पाच हजार वा दहा हजार वर्षांनंतरचे जग वा त्यावेळचे मानवी जीवन कसे असेल यावर चिंतन करण्यासाठी चर्चासत्रे आयोजली जातात. गंमत म्हणजे त्यात भाग घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपण केलेले अंदाज वा भाकीत किती खरे ठरेल, हे खात्रीलायकरीत्या समजण्याची अजिबात शक्यता नाही. मग हा नसता उपद्व्याप कशाला असे कुणीही विचारू शकेल.
आयझ्ॉक अ‍ॅलिमोव या जगद्विख्यात वैज्ञानिक-लेखकाने जेव्हा ‘फाऊंडेशन ट्रायॉलॉजी’ नावाची तीन खंडांची विश्वसंचाराची कादंबरी ३०-३५ वर्षांंपूर्वी लिहिली, तेव्हा तिचा प्रचंड बोलबाला झाला. त्याचप्रमाणे त्याने ‘फॅन्टास्टिक व्हॉयेज’ नावाची वैद्यकीय-विज्ञानाची कादंबरी लिहिली, तेव्हाही त्यातील शस्त्रक्रियांच्या शक्यतांवर बरीच उलटसुलट चर्चा झाली. पण या दोन्ही कादंबऱ्यांमधील संकल्पना व विज्ञान आज प्रत्यक्ष उपयोगात आणले जात आहे. विज्ञानाच्याच आधारे विज्ञान-साहित्य लिहिले जात होते, पण विज्ञान-साहित्याची झेप विज्ञानाच्याही मर्यादा ओलांडून जाऊ लागली होती.
असे असूनही ‘विज्ञान-साहित्या’ला ‘अभिजात साहित्या’चा दर्जा वा प्रतिष्ठा दिली जात नव्हती. काहीतरी सुरस, चमत्कारिक, अचाट, विकृत आणि अशक्यप्राय लिहून लोकांचे रंजन करणारे वा त्यांना भीती दाखविणारे साहित्य म्हणून विज्ञान-वाङ्मयाकडे पाहिले जात असे. अधिकृत मानले गेलेले विज्ञान-साहित्य नक्की केव्हा जन्माला आले, याबद्दलही मतभेद होऊ शकतात. ‘फ्रॅन्केस्टीन’ ही मेरी शेली हिची कादंबरी एक आद्य व अभिजात विज्ञान-साहित्यकृती मानली जाते. मेरी शेली ही जगप्रसिद्ध कविराज शेली यांची प्रेयसी व नंतर पत्नी. तिने वयाच्या १९ व्या वर्षी, १८१६ साली ही कादंबरी लिहिली.
खरे म्हणजे तेव्हा विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास फारसा झाला नव्हता. माणसाच्या जन्म-मृत्यूचे, थडग्यात पुरलेल्या शवाचे, त्या थडग्यातून ती व्यक्ती परत जन्माला येऊ शकेल का, याबद्दलचे चिंतन-संशोधनही तेव्हा झाले नव्हते. स्मशानाबद्दलची भीती, थडग्यातून कुणीतरी बाहेर येईल ही धास्ती, भूत-पिशाच्चाचे भय हे जगभर होतेच. पण वैज्ञानिकतेच्या आणि कल्पनाशक्तीच्या कसोटीवर ‘शास्त्रशुद्ध’पणे बेतली गेलेली ती पहिली कादंबरी आहे, असे विज्ञान-साहित्याचे अभ्यासक व इतिहासकार सांगतात.
गेल्या २०० वर्षांत शेकडो विज्ञान-कथा-कादंबऱ्या, चित्रपट-टीव्ही मालिका निर्माण झाल्या आहेत. पण अगदी आणि अलीकडच्या १९७० च्या दशकापर्यंत या वाङ्मय प्रकाराला रसिकांनी व समीक्षकांनी ‘मान्यता’ दिली नव्हती. विज्ञान-साहित्यात आघाडीवर होते अमेरिका, रशिया आणि इंग्लंड.
अमेरिका हा देश अगदी सुरुवातीपासून प्रयोगशीलतेबद्दल प्रसिद्ध आहे. काही जण तर छद्मीपणे म्हणतात की, युरोपातील रेनेसाँचा काळ संपत आला आणि जे युरोपियन अमेरिकेत स्थायिक झाले त्यांनी तेथे रुजवला. युरोपप्रमाणे अमेरिकेला दीर्घ इतिहासाच्या वा सांस्कृतिकतेच्या शृंखलांनी अडकवून ठेवलेले नव्हते. कोलंबस अमेरिकन भूमीवर उतरल्यापासून (१४९२) अमेरिकेचा इतिहास सुरू होतो, असे विधान सध्या प्रतिष्ठितपणाचे मानले जात नाही. कारण कोलंबसपूर्वी ज्या ‘नेटिव अमेरिकनां’च्या वस्त्या तेथे होत्या, त्यांना इतिहासातून बाहेर फेकण्याची वृत्ती त्यात दिसते, असे सध्या मानले जाते. परंतु आधुनिक इतिहासाची, विज्ञानाची सुरुवात साधारणपणे त्या सुमारास होती हे मान्य करायला हवे. विज्ञानपद्धती त्या शतकात रूढ झाली. किंबहुना सीमेपलीकडे जाऊन व्यापार करण्याची, त्यासाठी जहाजे बांधण्याची, दुर्बिणी शोधण्याची, दीर्घ प्रवासात बदलत्या हवामानाची शास्त्रशुद्ध नोंद घेण्याची, दिशांची, ऋतूंची, भूगोलाची कुतूहलवृत्ती तेव्हा झपाटय़ाने वाढू लागली.
अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढय़ानंतर (१७७६) तेव्हा नवीनच जन्माला आलेल्या त्या देशाला काही युरोपियन परंपरांच्या बेडय़ांमधून बाहेर पडायचे होते. पण धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धाही होत्याच, त्याचप्रमाणे वंशवाद आणि गुलामगिरीही. साधारणपणे अमेरिकन यादवीनंतर (अब्राहम लिंकन आणि १८६०-६५) तेथील विज्ञानाने-तंत्रज्ञानाने झेप घ्यायला सुरुवात केली. आजही सर्वार्थाने व सर्व विज्ञान शाखांमध्ये अमेरिकाच आघाडीवर आहे- आणि विज्ञान-साहित्यातही.
रशियात लेनिनप्रणीत कम्युनिस्ट क्रांतीनंतर विज्ञान-तंत्रज्ञानाला जे प्रचंड महत्त्व दिले गेले, त्यामुळे त्याही देशात विज्ञान-साहित्य, विज्ञान-चित्रपटांची एकच लाट आली. आपल्याला सहज लक्षातही येत नाही, पण हे सत्य आहे की शीतयुद्धाच्या काळात, रशिया-अमेरिकेतील स्पर्धेमुळे विज्ञान-तंत्रज्ञानात आणि समांतरपणे विज्ञान-साहित्यात जेवढी प्रगती झाली, तेवढी ‘शांतते’च्या काळात झालेली नाही. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व नंतर गेल्या ६० वर्षांत आलेले बरेच साहित्य त्या पाश्र्वभूमीवर तयार झाले आहे.
‘ज्युरासिक पार्क’चा संदर्भ ‘बायॉलॉजिक वॉरफेअर’शी म्हणजे जैविक शस्त्रास्त्रांशी जोडता येऊ शकेल. ‘स्टार ट्रेक’चा संदर्भ ‘स्टार वॉर्स’शी जोडता येईल. दीर्घ पल्ल्यांच्या अग्निबाणांचा आणि त्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या युद्ध-विज्ञान कादंबऱ्यांचा संदर्भ अवकाशातील स्पर्धा म्हणजे ‘स्पेस कॉम्पिटिशन’शी जोडता येईल.
‘द डे आफ्टर’- कार्ल सागान या विज्ञान लेखकाच्या अणुयुद्धाच्या शक्यतेतून लिहिली गेलेली कादंबरी व चित्रपट आणि चार वर्षांपूर्वी आलेला ‘द डे आफ्टर टुमॉरो’ हा चित्रपट (ग्लोबल वॉर्मिंग व क्लायमेट चेंज) हेही इशारे देणारे आहेत. म्हणजेच शक्याशक्यतेचे आव्हान पेलण्यासाठी विज्ञान-लेखकांनी सादर केले आहेत.
अशक्यतेचे आव्हान पेलण्यासाठी जसे आशावादी लागतात, तसेच निराशावादीही. निराशावादी इशारे देतात, भीती दाखवतात आणि आशावादी त्यावर मात करण्याचे मार्ग स्पष्ट करीत जातात.
कुमार केतकर
शनिवार, ३१ ऑक्टोबर २००९