‘पाकिस्तानचे काय होणार?
या वस्तुस्थितीचे विवेचन करणारा लेख। ‘पाकिस्तानचे काय होणार?’आणि‘पाकिस्तानमध्ये काय होणार?’हे दोन्ही प्रश्न वरवर समानार्थी वाटले तरी त्यातील अनुस्यूत अर्थ वेगवेगळे आहेत।‘पाकिस्तानचे काय होणार?’ या प्रश्नात अंतर्भाव आहे तो असा : पाकिस्तानची पुन्हा फाळणी होणार का? सिंध, पंजाब, बलुचिस्तान आणि नॉर्थ-वेस्ट फ्राँटियर प्रॉव्हिन्स (NWFP) ऊर्फ वायव्य सरहद्द प्रांत किंवा पश्तुनिस्तान असे चार स्वतंत्र देश निर्माण होऊन पाकिस्तान लयाला जाईल का? ‘पूर्व पाकिस्तान’ म्हणून ओळखला जाणारा प्रदेश १९७१ साली स्वतंत्र होऊन त्यातून बांगलादेश निर्माण झाला; आता उर्वरित पाकिस्तानची शकले होणार का? तशी शकले झाली तर ते भारताच्या (आणि जगाच्या) हिताचे असेल का? तसे चार स्वतंत्र देश झाल्यास सैन्यही विभागले जाऊन ते देश आपापल्या सीमा ठरविण्यासाठी परस्परांमध्ये यादवीसदृश युद्ध करतील का? म्हणजेच पाकिस्तानचे ‘बाल्कनायझेशन’-युगोस्लावियाच्या विघटनाप्रमाणे होईल का? मग भारताला आणखी चार शत्रू निर्माण होतील, की त्यांच्यापैकी काही भारताचे मित्र होतील? चीन आणि अमेरिका, तसेच युरोप पाकिस्तानचे असे विघटन होऊ देतील का? हे व असे प्रश्न ‘पाकिस्तानचे काय होणार?’ या प्रश्नात समाविष्ट आहेत.मात्र, ‘पाकिस्तानात काय होणार?’ या प्रश्नात असे गृहीत आहे की, पाकिस्तान नावाचे स्वतंत्र राष्ट्र राहणार, पण तेथे काय घडणार? म्हणजे झरदारी यांची सत्ता जाऊन पुन्हा लष्करशाही प्रस्थापित होणार का? नवाझ शरीफ पुन्हा सत्ताग्रहण करतील का? की असेच शह-काटशह होत अराजक अधिकच उग्र रूप धारण करणार? तशी निर्नायकी झाल्यास ती किती काळ चालू राहणार? भारतावर त्या बेबंदशाहीचे काय परिणाम होणार? त्या अंदाधुंदीतून आकस्मिकपणे भारत-पाक युद्ध भडकणार का ? व तसे ते भडकल्यास त्याचे अणुयुद्धात पर्यवसान होणार का? लोकशाही आणि लष्करशाही- दोघांना दूर सारून तालिबानी टोळ्या पाकिस्तानवर कब्जा करतील का?वर व्यक्त केलेल्या शक्यतांपैकी खरोखरच काहीही घडू शकते. परंतु त्यापैकी काही नजीकच्या, तर काही दूरच्या भविष्यात घडू शकणाऱ्या गोष्टी आहेत. परंतु मुद्दा असा आहे की, याचा ‘कर्ता-करविता’ कोण असेल? तसेच त्या ‘कर्त्यां-करवित्या’च्या हातात किती सूत्रे आहेत? आणि भरकटू लागलेल्या या देशाचे भवितव्य आता नियतीच्या हाती आहे की इतिहासाच्या नियमांनुसार जे घडायचे/ घडवायचे ते घडेल?पहिली गोष्ट म्हणजे आता यापुढे पाकिस्तानात र्सवकष लष्करी राजवट येणे जवळजवळ अशक्य आहे. याचा अर्थ असा नव्हे की, लष्करप्रमुख कयानी वा अन्य कुणी ज्येष्ठ लष्करी अधिकारी तशी राजवट आणू इच्छित नाही. परंतु आता त्यांची तशी इच्छा असली तरी गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानातल्या सर्वच नद्यांमधून इतके पाणी वाहून गेले आहे (आणि त्याबरोबर राजकीय गाळही), की तसे साहस कुणी करणार नाही.जगातील लष्करशाही वा हुकूमशाही/ एकाधिकारशाही वा राजेशाही व्यवस्थांच्या विरोधात (बहुतेक वेळा) विद्यार्थी, वकील, कामगार, शेतकरी यापैकी कुणीतरी वा यापैकी दोन वा तीन घटक जेव्हा संघटित होतात, तेव्हा ती व्यवस्था कोलमडते. सर्वसाधारणपणे अशा आंदोलनांचे नेतृत्व मध्यमवर्गाकडे, त्यांच्यातील वा प्रस्थापित वर्तुळातील (एलिट) महत्त्वाकांक्षी व्यक्तींकडे असते. जेव्हा मध्यमवर्गाचा पाया ठिसूळ होतो वा प्रस्थापित वर्गात फूट पडते, तेव्हा लष्करशहांना वा हुकूमशहांना राज्य चालविणे अशक्य होते. लष्करातील बहुसंख्य सैनिक जरी गरीब, ग्रामीण शेतकऱ्यांमधून आलेले असले तरी बराचसा अधिकारीवर्गाचा थर हा मध्यमवर्गातून आलेला असतो.पाकिस्तानातील मध्यमवर्ग आज मुख्यत: वकील व न्यायाधीश, पत्रकार आणि लेखक, कलाकार, प्राध्यापकवर्ग यांच्या नेतृत्वाखाली बऱ्यापैकी संघटित झालेला आहे. त्यांनी जनरल मुशर्रफ यांना केवळ आव्हान दिले नाही, तर ते देशभर रस्त्यावर उतरले आणि गोळीबारात काहींनी प्राणही गमावले. ही प्रक्रिया सहजरीत्या घडली नाही. याच वर्गातील एक मोठा विभाग सुरुवातीची काही वर्षे मुशर्रफ यांचा समर्थक होता. किंबहुना त्यांचे समर्थन असल्याशिवाय मुशर्रफ यांना राज्यशकट चालविणे शक्यच झाले नसते. या समर्थकांच्या पाठिंब्याने व मदतीनेच बाकी संस्थांवर (मीडिया, न्यायव्यवस्था, नोकरशाही, शिक्षणसंस्था) लष्करी दादागिरीचा वचक बसविणे पाकिस्तानातील लष्करशहांना शक्य होत असे. गेली २० वर्षे- म्हणजे १९८८ साली झालेल्या जनरल झिया ऊल हक यांच्या अपघाती मृत्यूनंतर (हत्येनंतर!) पाकिस्तानी प्रस्थापित वर्तुळात व मध्यमवर्गात असंतोष वाढू लागला होता आणि त्यांच्यात फूटही पडू लागली होती. परंतु त्या असंतोषाला राजकीय नेतृत्व व संघटना नसेल तर तो असंतोष दडपून टाकता येतो. झिया यांच्या मृत्यूनंतर साडेतीन महिन्यांनी- २ डिसेंबर १९८८ रोजी बेनझीर भुत्तो पंतप्रधान झाल्या. परंतु लष्करशहांना तसेच पंजाबी- पठाणी धनाढय़ सरंजामदारांना बेनझीर यांची राजवट मानवणे शक्य नव्हते. लष्करात मुख्यत: पंजाबी- पठाणी अधिकारीवर्ग आहे. त्यांच्या मदतीने ६ ऑगस्ट १९९० रोजी म्हणजे दीडच वर्षांनी बेनझीर यांची सत्ता बरखास्त केली गेली. पाकिस्तानी व्यापारी, उद्योगपती, जमीनदार हे नवाझ शरीफ यांच्या बाजूने होते. प्रस्थापित वर्तुळातील ही (राजकीय) फूट लष्करशहांच्या पथ्यावर पडली होती. परंतु मध्यमवर्गीय असंतोष आटोक्यात येत नसल्यामुळे १९९३ च्या निवडणुकीत बेनझीर भुत्तो पुन्हा निवडून आल्या. परंतु त्यांचे सरकार कसेबसे तीन वर्षे टिकले. (१९ ऑक्टोबर १९९३ ते ५ नोव्हेंबर १९९६) बेनझीरच्या कारकीर्दीत वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिले गेले, ‘एनजीओज्’ना, स्त्रियांच्या व कामगारांच्या संघटनांना उत्तेजन दिले गेले. त्यातूनच नवा स्वायत्त, महत्त्वाकांक्षी, उदारमतवादी मध्यमवर्ग वाढत गेला. हा वर्ग अधिक विस्तारला तर सरंजामशाही व लष्कर यांच्यात फूट पडून लष्कराचे महत्त्व कमी होईल, हे ओळखून लष्कराने नवाझ शरीफ यांच्याबरोबर संगनमत केले.नवाझ शरीफ यांना लष्कराच्या मदतीने पहिल्यांदा पंतप्रधान केले गेले होते, ते बेनझीर यांची उचलबांगडी झाल्यावर आणि निवडणुकीवर जरब बसवून- म्हणजे १९९० साली. पण प्रस्थापित सत्ताधारी वर्तुळातील फूट वाढत होती. नवाझ शरीफ लष्कराच्या पूर्ण अधीन जायला तयार नव्हते. त्यामुळे त्यांचे सरकार १९९३ मध्ये सुमारे तीन वर्षांनी बडतर्फ केले गेले होते.पाकिस्तानातील सरंजामदारांना खरे म्हणजे उदारमतवाद वा लोकशाही संस्था मानवत नाहीत. आज तरी नवाझ शरीफ हे लोकशाही चळवळीचे एक नेते झाले असले आणि त्यांनी न्यायसंस्थेच्या स्वायत्ततेचा मुद्दा उपस्थित करून न्यायाधीशांच्या फेरनियुक्तीची मागणी केली असली तरी याच नवाझ शरीफ यांनी १९९७ साली दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर तत्कालिन मुख्य न्यायाधीशांच्या चेंबरवरतीच गुंड धाडले होते. सेनादल प्रमुखांच्या मदतीने हे सर्व दादागिरीचे प्रकार चालत असत. झरदारी यांची भ्रष्टाचारी व्यक्ती म्हणून बदनामी झाली असली तरी परिस्थिती ओळखून त्यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर लोकशाही परंपरा रुजवायचा आणि भारताबरोबर संबंध सुधारायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला होता. परंतु पंजाबी-पठाणी लष्करी अधिकाऱ्यांनी नवाझ शरीफ यांच्या मदतीनेच झरदारींभोवती घेराव टाकायला सुरुवात केली होती. तो वेढा तोडण्यासाठी झरदारी यांनी प्रतिहल्ला केला आणि शरीफ बंधूंना राजकारणातून बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला. पण तो प्रयत्न त्यांच्याच अंगाशी आला. कारण झरदारी हे पंजाबी वा पठाणी नाहीत. आणि आता तर ते भुत्तो कुटुंबीय आहेत. सिंध प्रांतातील लोकांच्या पाठिंब्यावर भुत्तो कुटुंबियांची राजकीय प्रतिष्ठा उभी होती. साहजिकच पंजाबी लष्करप्रमुखांना व राजकीय पुढाऱ्यांना सिंधचे नेतृत्व चालण्यासारखे नव्हते, म्हणूनच हा संघर्ष उभा राहिला. याचा अर्थ असा नव्हे की, सर्व पंजाबी-पठाणी राजकीय पुढारी आणि लष्करी अधिकारी हे नेहमीच हातात हात घालून चालतात. नवाझ शरीफ यांनीच त्यांच्या दुसऱ्या कारकीर्दीत (१९९७-९९) जनरल मुशर्रफ यांची नियुक्ती केली होती. मुशर्रफ जरी मुहाजिर असले तरी त्यावेळेला त्यांच्या पाठीशी पंजाबी अधिकारी होते. नवाझ शरीफ यांना मुशर्रफच आपल्याला वेढा घालताहेत, असे जाणवू लागल्यावर त्यांनी मुशर्रफ यांची आकस्मिक बडतर्फी करून त्यांचे विमानही पाकिस्तानात उतरवू द्यायचे नाही, असे आदेश काढले होते. परंतु मुशर्रफ यांनी तो डाव नवाझ शरीफ यांच्यावरच उलटवला आणि शरीफ यांना अटक करून देशाबाहेर हाकलून दिले.आज नवाझ शरीफ जिवंत आहेत, ही त्यांची पुण्याई नसून अमेरिकेने पाकिस्तानमध्ये पर्याय ठेवण्यासाठी केलेली सोय आहे. पाकिस्तानमधील तमाम लष्करी अधिकारीवर्ग, नोकरशहा आणि राजकीय पुढारी हे व्हाइट हाऊसच्या रमण्यातले डॉलर-अधाशी लाचार आहेत. अशा सरंजामी पाकिस्तानात नव्या ऊर्मीचा उदारमतवादी मध्यमवर्ग वाढत असतानाच परंपरावादी इस्लामी मूलतत्त्ववादही तिथे फोफावतो आहे.१९९३ ते १९९७ या चार वर्षांच्या काळात पाकिस्तानचे राज्यशकट जरी भरकटत असले तरी याच सुमारास अफगाणिस्तानात अमेरिकेने आयएसआयच्या मदतीने तालिबानचे भूत उभे करायला मदत केली होती. सोविएत युनियनने १९८९ मध्ये अफगाणिस्तानातून फौजा काढून घेतल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय पोकळीत पाकिस्तानने (अर्थातच अमेरिकेच्या साहाय्याने) आपला तळ तयार केला होता. या लष्करी विस्तारवादामुळे पाकिस्तानच्या सेनादलांना कॉर्पोरेट उद्योगसमूहांचे स्वरूप प्राप्त होत गेले. फक्त प्रस्थापित वर्गालाच नव्हे, तर मध्यमवर्गालाही या लष्करी कॉर्पोरेट सेक्टरमध्ये ‘करिअर ऑपॉच्र्युनिटीज’ निर्माण झाल्या.हाच काळ जागतिकीकरणाचा आहे. युरोप आणि अमेरिकेचे भांडवल चीन व भारताप्रमाणे पाकिस्तानातही येऊ लागले. सरंजामशाही, लष्कर, उद्योग-व्यापार यांना समांतर असा बहुराष्ट्रीय भांडवलदारांचा वर्ग आपली मुळे पसरू लागला होता. त्यातूनच एक नव-मध्यमवर्ग, हाय-टेक संस्कृती आणि स्वातंत्र्याचा विचार रुजू लागला होता. या नव-मध्यमवर्गाचे रोल मॉडेल अर्थातच अमेरिका हे होते. अमेरिकन फॅशन, अमेरिकन म्युझिक, अमेरिकन टीव्ही चॅनल्स आणि नियतकालिके- एकूणच अमेरिकन लाइफस्टाईलबरोबर इंग्रजी बोलण्याचा अमेरिकन ‘अॅक्सेंट’ही या नव-मध्यमवर्गात रुळू लागला.हे एकूणच रसायन प्रक्षोभक होते. अणूचे विभाजन केल्यामुळे जशी स्फोटक शक्ती तयार होते, तशीच शक्ती पाकिस्तानात तयार होत होती. एका बाजूला याच अमेरिकेच्या व मध्यमवर्गीय लष्करी अधिकाऱ्यांच्या मदतीने तालिबान्यांना- म्हणजे उग्र धर्मवाद्यांना आर्थिक व वैचारिक उत्तेजन दिले जात होते आणि दुसऱ्या बाजूला अमेरिकाप्रणीत स्वातंत्र्य- स्वैराचाराच्या जीवनशैलीला नव-मध्यमवर्गात प्रतिष्ठा मिळत होती. ज्या कनिष्ट मध्यमवर्गाला या नव्या जीवनशैलीत प्रवेश मिळत नव्हता, तो पैशासाठी वा करिअरसाठी तालिबानी वृत्तीकडे आकर्षित होत होता. धर्मवाद, जातीयवाद, पंथवाद वा सांस्कृतिक- भाषिकवाद- अस्मितावाद फोफावतात ते अशा भडक विषमतेमुळे! मुळात आर्थिक-सामाजिक रूपात असलेली विषमता सांस्कृतिक माध्यमातून प्रक्षोभ धारण करते. (भारतातही ही प्रक्रिया चालू आहे. कधी ती साहित्य संमेलनात वारकऱ्यांच्या रूपाने प्रकटते, तर कधी चार्ली चॅप्लिनच्या पुतळ्याच्या विरोधात. कधी मुलींनी जीन्स-टी शर्टस् घालून पब्जमध्ये जाण्याच्या विरोधात, तर कधी ‘व्हॅलेन्टाइन डे’च्या विरोधात) या प्रक्षोभाला आता ‘तालिबानी’ स्वरूप येऊ लागले आहे. त्यामुळे एक आहे तो लष्कराने व आयएसआयने पोसलेला प्रशिक्षित दहशतवाद आणि दुसरा आहे- समाजातील विषमतेमुळे निर्माण झालेला सांस्कृतिक तालिबानी दहशतवाद.पाकिस्तानी लष्करप्रणीत तालिबानला आता अमेरिकाच वेसण घालीत आहे. तालिबानी भस्मासुर आता अमेरिकेवर (आणि युरोपवर) उलटल्यामुळे पाकिस्तानी लष्करावर अमेरिकेचा पूर्वीप्रमाणे भरवसा उरलेला नाही. पाकिस्तानी लष्कराने सत्तेवर कब्जा केला आणि आतूनच तालिबान्यांनी सर्व सत्ताकेंद्रे ताब्यात घेतली तर अण्वस्त्रेसुद्धा त्यांच्या- म्हणजे दहशतवाद्यांच्या नियंत्रणाखाली येतील, ही धास्ती अमेरिकेला आहे. म्हणूनच पूर्वी कायम पाकिस्तानी लष्कराला आणि लष्करशहांना पाठीशी घालणारी अमेरिका आता पाकिस्तानातील लोकशाही शक्तींच्या- म्हणजेच वकील, पत्रकार, लेखक, कलाकार, प्राध्यापक आदींच्या बाजूने उभी आहे.अमेरिकेने उघडपणे या नव-मध्यमवर्गीय स्वातंत्र्य- अस्मितेला पाठिंबा दिल्यामुळेच मुशर्रफ यांना पदच्यूत व्हावे लागले आणि बेनझीर भुत्तोंना पाकिस्तानात येण्याचीच नव्हे, तर तुफानी लोकशाही प्रचार करण्याची संधी द्यावी लागली. बेनझीर पंतप्रधान होण्याची निश्चित शक्यता दिसत असतानाच त्यांची हत्या झाली. ती हत्या लष्करप्रणीत तालिबान्यांनी, सांस्कृतिक तालिबान्यांच्या सहकार्याने केली होती. या दोन्ही तालिबान्यांचा लोकशाहीलाच विरोध आहे. परंतु आता सेनादलातील उच्चपदस्थांना अमेरिकेच्या तालावर नाचावे लागत आहे. म्हणजेच पाकिस्तानी लष्कराला राजकीय भूमिका असेल, पण प्रत्यक्ष सत्ता नसेल. हस्तक्षेप राहील, पण राष्ट्रपती वा पंतप्रधानपद त्यांच्याकडे असणार नाही. अमेरिकेला आज इराणपेक्षाही किंवा उत्तर कोरियापेक्षाही धास्ती वाटते ती पाकिस्तानची. कारण अर्थातच हे की, पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तालिबानी टोळ्यांनी आपले अधिराज्य प्रस्थापित केले आहे. सुमारे आठ वर्षे (१९९४-२००२) पाकिस्तानच्या मदतीने व अमेरिकन डॉलर आणि शस्त्रास्त्रे यांच्या बळावर उभ्या राहिलेल्या पाकिस्तान-तालिबानी आणि अफगाण-तालिबान्यांच्या टोळ्या आता केवळ भारतीय उपखंडातच नव्हे, तर जगभर धिंगाणा घालत आहेत.त्या धिंगाण्याला आवर कसा घालायचा, हे अमेरिकेला कळेनासे झाले आहे. अमेरिकेने पाक-अफगाण सीमेवर आणखी मोठय़ा प्रमाणावर सैन्य पाठवायचे ठरविले आहे. जितक्या जास्त प्रमाणावर व अधिक सुसज्ज अमेरिकन सैन्य खुद्द पाकिस्तानात व त्याच्या सीमेवर असेल, तितक्या प्रमाणात पाकिस्तानमधील सत्तेला व लष्कराला आपल्या काबूत ठेवता येईल, असे अमेरिकन मुत्सद्दय़ांना वाटते.विशेष म्हणजे आजच्या घडीला अमेरिकन सैन्य पाकिस्तानात असणे हे भारताच्याही हिताचे आहे. जर अमेरिकेने सैन्य काढून घेतले तर पाक-तालिबानी आणि अफगाण-तालिबान्यांच्या सुसज्ज टोळ्या सीमेवर युद्ध पुकारतील आणि देशांतर्गतही दहशतवादी हल्ले संघटित करतील. ही भीती भारतालाच नव्हे, तर पाकिस्तानलाही आहेच. मुंबईच्या हल्ल्यानंतर भारत लवकरच सावरला, पण पाकिस्तान मात्र बेनझीरच्या हत्येनंतर गेल्या १५ महिन्यांत अजूनही सावरलेला नाही.तालिबान्यांना हवे आहे भारत-पाकिस्तान युद्ध. युद्धकाळात जी अस्वस्थता पसरते आणि धर्म वा देशभावना उद्दीपित होतात, त्यातून त्यांना हाहाकार माजवता येतो आणि हाहाकारात दहशत बसविणे अधिक सोपे जाते.या सर्व परिस्थितीत ‘पाकिस्तानचे काय होणार?’ वा ‘पाकिस्तानात काय होणार?’ हे ठरणार आहे. पाकिस्तानचे विघटन अमेरिकेला परवडणारे नाही. कारण मग तालिबान्यांच्या ताब्यात चार सत्ताकेंद्रे जाऊ शकतात. आज एकच सत्ताकेंद्र नियंत्रणाखाली ठेवताना अमेरिकेच्या नाकीनऊ येत आहेत. पाकिस्तानी लष्कराने सत्ता ताब्यात घेणेही अमेरिकेला चालणार नाही. म्हणजे उरला लोकशाहीचा पर्याय. प्रश्न हा नाही की, झरदारी अध्यक्ष राहणार की नवाझ शरीफ येणार! आता नव-मध्यमवर्गाला पाठिंबा देऊन लोकशाही संस्था, व्यापार, तंत्रज्ञान आणि भांडवल/ बाजारपेठ विस्तार करणे शक्य आहे, ते लोकशाहीमधून वा किमान लोकशाहीच्या फार्समधूनच!अमेरिकेच्या इतर देशांत होणाऱ्या हस्तक्षेपाला विरोध करणारे डावे पाकिस्तानमधील अमेरिकेच्या हस्तक्षेपाला तसा विरोध करताना दिसत नाहीत. कारण तालिबान्यांनी अवघ्या भारतीय उपखंडालाच वेढलेले आहे॥ आपल्याकडे रुजलेल्या लोकशाहीला आणि पाकिस्तानात रुजू पाहणाऱ्या लोकशाहीलाही! आपल्या सेक्युलॅरिझमला आणि पाकिस्तानात निर्माण होणाऱ्या उदारमतवादी शक्तींनाही! परंतु तालिबान्यांचा हा वेढा जसा बाहेरून आहे, तसाच आतूनही आहे. कारण धर्माधता आणि दहशतवाद ही फक्त इस्लामची लक्षणे नाहीत. आता तर उग्रवादी हिंदूही या इस्लामी मूलतत्त्ववादाचेच अनुकरण करू लागले आहेत.पाकिस्तानमधील ही स्फोटक परिस्थिती नेमकी भारतात निवडणुकांच्या मोहिमेच्या काळात आली आहे. त्या स्फोटाचे सुरुंग जसे त्या देशात आहेत तसेच भारतातही आहेत!
कुमार केतकर
इतिहासाचे नवे आवर्तन
इतिहासाचे नवे आवर्तन
बहुतेक भारतीयांना ‘फोरेन’ म्हणजे मुख्यत: युरोप-अमेरिका, फार तर जपान हे देश वाटतात. मादागास्कर, सुदान किंवा लाओस, कंबोडिया वा उरुग्वे, निकारागुआ या व अशा सुमारे दीडशेहून अधिक देशांना ‘फोरेन स्टेटस’ नाही. त्यातसुद्धा अमेरिकेला जाण्याची ‘क्रेझ’ ही १९६० च्या दशकात सुरू झाली आणि १९९० तर ती असंख्य मध्यमवर्गीयांचा ध्यासच बनून गेली. अमेरिकेची ‘क्रेझ’ प्रथम आयआयटीच्या (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) बी.टेक. कोर्सपासून सुरू झाली आणि नंतर आयआयएमने (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट) ती लाट अधिकच उंचावर नेली.अमेरिकेबद्दल इतके विलक्षण आकर्षण कशामुळे आणि कधी निर्माण झाले? आनंदीबाई जोशी सव्वाशे वर्षांपूर्वीच अमेरिकेला गेल्या होत्या, पण पुण्या-मुंबईच्या ब्राह्मण वर्गात तशी उत्सुकता त्यानंतर फारशी निर्माण झाली नाही. भारतातल्या शहरी, सुशिक्षित मध्यमवर्गात हॉलिवूडच्या चित्रपटांचे आकर्षण होते. अगदी १९३० ते १९५० च्या काळात ग्रेटा गाबरेपासून ते कॅथरिन हेपबर्नपर्यंत, जेम्स स्टय़ुअर्टपासून क्लार्क गेबलपर्यंत (असे खूप ‘स्टार्स’ आहेत की ज्यांनी मध्यमवर्गीयांच्या हृदयात घर केले होते) आणि लॉरेल हार्डी, मार्क्स ब्रदर्स, चार्ली चॅप्लिनपर्यंत कित्येक नावे घराघरात पोचली होती. हॉलिवूडने अमेरिका नावाची प्रतिमा, एक स्वप्ननगरी भारतात आणली होती. तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीही बहरलेली होती. (‘बॉलिवूड’ या नावाने तिचे बारसे झालेले नव्हते) दिलीपकुमार, राज कपूर तसेच नर्गिस-गीता बाली अशा अनेक नटय़ा, आताच्या परिभाषेत तरुणांच्या ‘हार्ट थ्रॉब्स’ झाल्या होत्या. त्या वेळच्या हिंदी चित्रपटांवरही मुख्य संस्कार हॉलिवूडचाच होता. सगळे नायक त्यांच्या विरहाची गाणी दर्दभऱ्या आवाजात पियानोवर बसून म्हणत. नायक आणि खलनायक लांबलचक अमेरिकन मोटारींमधून-प्लायमाऊथ, फोर्ड वगैरे-फिरत. (तेव्हा अगदी मोजक्या सरंजामी श्रीमंतांकडेच त्या मोटारी असत.) अमेरिकन सिगारेट्सची फॅशनही तेव्हाच रुजली. असे असूनही प्रत्यक्ष अमेरिकेला जाण्याची ‘क्रेझ’ मात्र १९६० च्या अखेरीस सुरू झाली. म्हणजे ज्या मध्यमवर्गीयांना हॉलिवूडने १९३० ते १९५० च्या काळात भारावून टाकले त्यांच्या नातवंडांपर्यंत अमेरिका मध्यमवर्गीयांची ‘मक्का’ झाली नव्हती.एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपासून ते अगदी १९६०-७० पर्यंत ‘फोरेन’ म्हणजे मुख्यत: इंग्लंड! पूर्ण ब्रिटनसुद्धा नव्हे. फक्त इंग्लंड आणि त्यातही लंडन हे मुख्य आकर्षण. मधल्या काळात म्हणजे साधारणपणे १९२५ ते १९३५ या दशकाच्या अलीकडे-पलीकडे जर्मनीबद्दल आकर्षण होते. पुण्या-मुंबईतच नव्हे तर अगदी कलकत्त्यातही जर्मनी, तसेच फ्रान्स हे देश सुशिक्षित मध्यमवर्गीयांना आकर्षून घेत असत. जर्मन व फ्रेंच भाषा शिकण्याची (समांतर) फॅशन तेव्हा रुजू झाली. काही जणांचे जर्मनीबद्दलचे आकर्षण तर थेट नाझी व हिटलर यांच्यापर्यंत होते. (अजूनही त्या आकर्षणाचे वारसदार आहेत.)पोर्तुगालची गोव्यात वसाहत होती, पण पोर्तुगालबद्दल देशात तसे कुतूहल निर्माण झाले नाही. पहिली ईस्ट इंडिया कंपनी डच होती, पण तितके नेदरलँडबद्दलही आकर्षण नव्हते. इंग्रजांचे राज्य होते आणि त्यांनी इंग्रजी भाषाच नव्हे तर त्यांच्या साहित्य-कलाही या मध्यमवर्गात रुजविल्या होत्या. शेक्सपियर, शेली ते शॉ आणि वर्डस्वर्थ ते वुडहाऊस हे इंग्रजी शिकलेल्यांचे ‘आयकॉन्स’ होते. शेरलॉक होम्स ते अॅगाथा ख्रिस्ती यांच्या कथा-कादंबऱ्या या वर्गात चवीने (आणि प्रतिष्ठेने) वाचल्या जात.लंडनला जाऊन शिक्षण घेणे याला तर प्रचंड प्रतिष्ठा होती. पंडित नेहरू असोत वा स्वा. सावरकर, सी.डी. देशमुख असोत वा स.गो. बर्वे, रँग्लर परांजपे असोत वा जयंत नारळीकर, इंग्लंडला भारतीय सुशिक्षितांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. विशेष म्हणजे स्वातंत्र्यचळवळीत-अगदी स्वदेशी मोहीम चालू असतानाही इंग्लंडबद्दल द्वेष वा नफरत वा शत्रुत्वाची तशी भावना नव्हती.त्या काळचे कित्येक कम्युनिस्ट तर इंग्लंडला प्रथम फक्त शिकायला गेले आणि तिकडून येताना मार्क्स-लेनिनवाद बरोबर घेऊन आले. भारतातल्या कम्युनिस्टांची वैचारिक व सांस्कृतिक नाळ ही इंग्लंडशी (ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीशी) जोडलेली होती. कम्युनिस्टांची टवाळी उडवताना समाजवादी आणि संघवाले म्हणत की, ‘मॉस्कोत पाऊस पडू लागल्यावर, भारतातले कॉम्रेड्स् इकडे छत्र्या उघडतात.’ परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोविएत युनियनच्या (म्हणजे प्रत्यक्षात रशियाच्याच) बाजूचा असला तरी इथल्या कॉम्रेड्स्वर मॉस्कोचा संस्कार कमी आहे. याचे एक कारण इंग्रजी भाषा आणि दुसरे कारण म्हणजे मार्क्स-एंगल्सचे सर्व वाङ्मय भारतात आले ते इंग्लंडमधून. मॉरिस डॉब आणि हॅरॉल्ड लास्की यांच्यासारख्या डाव्या ब्रिटिश मंडळींकडून समाजवादी-साम्यवादी विचार भारतात आला. इंग्रजी साम्राज्यवादाच्या विरोधात लढणारे महात्मा गांधी असोत वा सुभाषचंद्र बोस वा अगदी मोहमद अली जीना हे सर्व ‘बॅरिस्टर’ होते!डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अमेरिकेतील शिक्षणाचाही संस्कार असला तरी त्यांची उदारमतवादी, चिकित्सक आणि समाजशास्त्रीय विचारपद्धती मुख्यत: ब्रिटिश वारशातूनच आली होती. फाळणीअगोदर आणि नंतर हजारो सुशिक्षित मुस्लिमांनाही आधार इंग्लंडचाच होता. त्या काळात म्हणजे १९७० च्या अगोदर इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या हिंदू-मुस्लिमांची आता तेथे तिसरी-चौथी आणि पाचवीही पिढी ‘लंडनस्तानी’ झाली आहे. (याच नावाने गौतम मलवानी यांची कादंबरीही प्रसिद्ध झाली आहे.)स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्लंडची राणी एलिझाबेथ प्रथमच भारतात आली असताना तिचे ‘दर्शन’ घ्यायला जी अलोट गर्दी जमली होती, ती पाहून ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही खात्री पटली की आपल्याविरोधात ‘चले जाव’ असा आदेश जरी काढला गेला होता तरी आपल्याबद्दल येथे शत्रुत्वाची भावना अजिबात नाही.त्या काळी इंग्लंडला कुणी जात, तेव्हा तो ‘विलायते’ला गेला असे म्हटले जात असे. जणू ‘विलायत’ म्हणजे फोरेन’ आणि ‘फोरेन’ म्हणजे इंग्लंड! वस्तुत: ‘विलायत’ या नावाचा प्रांत आहे तुर्कस्तानात आणि तो भाग मुस्लिम व्यापाऱ्यांनी व्यापलेला आहे. जेव्हा युरोपबरोबर व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे (वास्को-द-गामाच्या सामुद्री मार्गाच्या साहसी शोधापूर्वी) तेव्हा हिंदू व मुस्लिम व्यापाऱ्यांना तुर्कस्तानमधून जावे लागत असे. ‘विलायत’ हा युरोपला जातानाचा एक मोठा ‘ट्रेड हॉल्ट’ किंवा व्यापाऱ्यांचा थांबा. तुर्कस्तानमध्ये, विशेषत: इस्तंबूलमध्येही, बहुसंख्य मुस्लिम लोकच असले तरी त्यांची जीवनशैली मात्र युरोपियन आहे. चर्च आणि मशिदी या देशात एकाच ठिकाणी आहेत. जगातले लाखो पर्यटक हा धर्म-बंधुत्वाचा वास्तुशास्त्रीय वारसा बघायला इस्तंबूलला जातात. टर्कीला ‘नाटो’चे (नॉर्थ अॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सदस्यत्व मिळाले आहे, पण युरोपियन संघात तुर्कस्तानला सामील करून घ्यायला काही देशांचा विरोध आहे. (म्हणजे तुर्कस्तानने धर्मबंधुत्वाचे धोरण घेतले असले तरी युरोपातील ख्रिश्चन राष्ट्रांना मात्र त्यांचा ‘इस्लाम’ अजूनही काहीसा ठसठसतो.)सुमारे हजार वर्षांपूर्वीच्या ख्रिश्चन व मुस्लिमांच्या हिंस्र संघर्षांमुळे-क्रूसेड्समुळे-अजूनही पारंपरिक युरोपियनांच्या मनात ठसठस आहे. म्हणूनच अमेरिकेने इराकवर (आणि अफाणिस्तानवर) केलेल्या हल्ल्यांना जॉर्ज बुश यांनी अनावधानाने (?) ‘क्रूसेड्स्’ असेच संबोधले होते. ब्रिटन थेट अमेरिकेबरोबर युद्धात उतरले आणि सुरुवातीला विरोध करून शेवटी फ्रान्स व जर्मनी (बाकी युरोपनेही) त्या युद्धाला पाठिंबा दिला. त्यामुळे ‘क्रूसेड्स्’च्या जखमा भळभळू लागल्या आणि टर्कीवरही नव्याने इस्लामचा शिक्का मारला गेला.सुमारे ५०० वर्षांपूर्वी कॉन्स्टॅन्टिनोपल (म्हणजेच इस्तंबूल) या तुर्की राजधानीवरचा युरोपचा ताबा युद्ध व यादवी यामुळे सुटला. त्यामुळे भारतीय उपखंडातून विलायतमार्गे युरोपला जाणाऱ्या व्यापाऱ्यांचा मार्ग खुंटला. युरोपला मसाल्याचे पदार्थ, सिल्क व इतर बऱ्याच वस्तू आशियातून जात. तो व्यापार चालू ठेवायचा असेल तर नवीन मार्ग शोधायला हवा. त्यातूनच कोलंबस आणि वास्को-द-गामा हे साहसी खलाशी हिंदुस्तानच्या शोधाला निघाले. कोलंबस स्पॅनिश आणि वास्को-द-गामा हा पोर्तुगीज. कोलंबस थडकला तो अमेरिकेच्या किनाऱ्यावर. त्याला वाटले, भारतीय उपखंड गवसला. प्रत्यक्षात त्याला ‘सापडली’ होती अमेरिका. खरे म्हणजे अमेरिकेला त्यापूर्वी, सामुद्री मार्गाने चिनीही गेले होते. शिवाय अमेरिका ‘शोधून’ काढण्याचा प्रश्न नव्हताच. कारण त्या विशाल भूभागावर वस्ती होती, प्राथमिक स्वरूपातील शेती होती आणि स्थानिक संस्कृतीही होती. पण कोलंबसच्या ‘शोधा’नंतर युरोपियन तिकडे जाऊन, स्थानिकांना ठार मारून वा त्यांना देशोधडीला लावून तेथे प्रस्थापित झाले. म्हणूनच युरोपातील काही इतिहासकार अमेरिकेला युरोपचे व रेनेसाँचे ‘एक्स्टेन्शन’ किंवा ‘सिव्हिलायझेशन’चा विस्तार मानतात.परंतु या गडबडीत कोलंबसच्या हातातून हिंदुस्तान मात्र निसटला होता. तो वास्को-द-गामाला (१४९८ साली) ‘सापडला.’ भारतीय उपखंडात प्रगल्भ आणि प्रगत समाजव्यवस्था होती, उत्पादनतंत्र होते, प्रशासन व तत्त्वज्ञानही होते. (अगदी जातीव्यवस्थेच्या उतरंडीसहित!) वास्को-द-गामाच्या मार्गाने मग इतर युरोपियन भारताच्या दिशेने येऊ लागले. जर्मन (१५०३ साली) आणि त्यानंतरच्या शतकभरात डच, फ्रेंच, ब्रिटिश व्यापारासाठी आले. या युरोपियनांना आपल्या भाषा येत नव्हत्या. हवामान, शेतीव्यवस्था माहीत नव्हती. इथल्या छोटय़ा राजवटींची कल्पना नव्हती. आपल्याकडचे टोळीजीवन, सुसंघटित कुटुंबजीवन, रीतिरिवाज, नीतिनियम काहीही माहीत नव्हते. या भागात आपल्याला सत्ता काबीज करता येईल वा करावी असे वाटण्याचाही तसा प्रश्न नव्हता. त्यांना फक्त व्यापार करायचा होता.परंतु खुद्द युरोपात तेव्हा आपापसात प्रचंड धुमश्चक्री चालू होती. इंग्लंडविरुद्ध फ्रान्स, स्पेन विरुद्ध पोर्तुगाल, रशिया विरुद्ध फ्रान्स असे तुफानी संघर्ष चालू होते. ते मुख्यत: व्यापाराच्या स्पर्धेतूनच चालले होते. साहजिकच ते सर्व संघर्ष आपल्या भूमीपर्यंत येऊन थडकले. युरोपातील परस्परांच्या युद्धात कोण जिंकते वा हरते यावर भारतीय उपखंडातील व्यापारावर कोणाचा कब्जा राहणार हे ठरू लागले होते. पोर्तुगीजांनी ‘शोधून’ काढलेल्या हिंदुस्तानमध्ये डचांची ईस्ट इंडिया कंपनी आली आणि पुढे प्लासीला फ्रान्स आणि इंग्लंडची लढाई होऊन फ्रेंच हरले आणि भारत हळूहळू ब्रिटिशांची वसाहत बनला. याच काळात युरोपियन देश अशाच लढाया, स्पर्धा, तह आणि तंटे अमेरिकेतही करीत होते.भारतात इंग्रजांनी १७५७ साली फ्रेंचांना अखेर नामोहरम केले, पण १७७६ साली इंग्रजांनाच ‘अमेरिकनांनी’ पराभूत करून ‘स्वतंत्र अमेरिका’ घोषित केली. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक व्यापार-व्यवस्थेत खळबळ माजली. अमेरिकनांच्या ‘स्वातंत्र्ययुद्धात’ फ्रान्सने मदत केली होती. त्याच फ्रान्समध्ये त्यानंतर १७८९ साली क्रांती झाली आणि युरोपातील आधुनिक विचारांच्या पर्वाला सुरुवात झाली-त्याचबरोबर औद्योगिक क्रांतीला आणि बाजारपेठांच्या विस्तारालाही. युरोपातील तत्त्वज्ञान, साहित्य-कला, जीवनशैली आणि एकूणच व्यापार-संस्कृतीही त्या विस्तारित साम्राज्याबरोबर पसरली. युरोपबद्दल भारतीयांना वाटणारे आकर्षण तेव्हापासूनचे आहे. तेव्हा ब्रिटनने इतर युरोपियन देशांच्या पुढे आघाडी मारलेली असल्यामुळे एकूणच ‘इंग्लिश’ भाषा व संस्कृतीचा प्रसार झाला. भारतात आधुनिकता (युरोपियन अर्थाने) आली ती इंग्लंडमधून आणि म्हणूनच अगदी स्वातंत्र्यचळवळीतही महात्मा गांधी म्हणत, ‘आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध अजिबात नाही-फक्त त्यांनी येथे राज्य करू नये, ते आमचे आम्ही करायला समर्थ आहोत!’दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच्या २० वर्षांत ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य झपाटय़ाने मावळू लागला. त्यांचे साम्राज्य लयाला जाऊ लागले तसतसा अमेरिकेचा दबदबा वाढू लागला. कारण आता समृद्धीची दालने अमेरिकेत खुली होत होती. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड- यांच्याबद्दलचे आकर्षण कमी होत गेले. ३०-४० वर्षांत अमेरिकेने तंत्रज्ञान आणि भांडवली अर्थकारण याद्वारे जागतिक प्रभुत्व प्रस्थापित केले. त्यातूनच अमेरिकेला जाण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाली.आता इतिहास नवीन आवर्तन घेतो आहे. अमेरिकेला मंदीने वेढा टाकला आहे आणि त्यांच्या समृद्धीचा सूर्यही मावळतीला लागला आहे।
कुमार केतकर
अव्वाचे सव्वा आणि स्वावाचे अव्वा.
अव्वाचे सव्वा आणि स्वावाचे अव्वा.
आज जागतिक ग्राहकदिन। ग्राहकाचे आणि सेवाक्षेत्राचे स्वरूप गेल्या दशकभरात पार बदलून गेले आहे। विशेषत: ‘मॉल्स’चे भारतातील आगमन हे या बदलाचे दर्शनी रूप ठरले आहे। जागतिक मंदीच्या पाश्र्वभूमीवर ग्राहकांच्या आजच्या मानसिकतेची कारणे आणि सेवाक्षेत्राचे भवितव्य याबद्दलचे विवेचन करणारे लेख-
भारतातील नव-मध्यमवर्गाचा उदय, टेलिव्हिजनचे खासगीकरण, टीव्ही कमर्शियल्सची नवी संस्कृती, ‘मीडिया अँड एन्टरटेनमेंट’ ऊर्फ माध्यम व करमणूक उद्योगाचा अमर्याद विस्तार, सेलेब्रिटी कल्चर, कॉम्प्युटर्सचा प्रसार, मोबाईल फोन्सची अचाट वाढ, नवी परदेशी कार मॉडेल्स, फॅशन शोज्.. ‘फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स’ (एफ् एम्सीजी) म्हणजे वेगाने वाढलेल्या नव-ग्राहकांच्या गरजा व अपेक्षा, ब्यूटी कॉन्टेस्टस् आणि सौंदर्यप्रसाधनांची अफाट सांस्कृतिक मान्यता व त्याबरोबर आलेले ब्यूटी पार्लर्स व ‘जिम्स’.. आणि या सर्वाबरोबर ‘अमेरिका’ नावाची प्रस्थापित झालेली सांस्कृतिक महासत्ता- या व अशा सर्व गोष्टी गेल्या फक्त दोन दशकांत एक प्रकारच्या विस्फोटक पद्धतीने प्रकट झाल्या आहेत. ‘शॉपिंग मॉल्स’ हा याच नव-ग्राहक संस्कृतीचा झगमगीत आविष्कार.सुमारे २० वर्षांची ही नवमध्यमवर्गाची दिवाळी आता एकदम काळवंडल्यासारखी भासू लागली आहे. शॉपिंग मॉल्समधली गर्दी अजून तितकीशी ओसरली नसली तरी खरेदीचे आकडे झपाटय़ाने उतरू लागले आहेत. त्याचे कारण अर्थातच मंदीचा जागतिक भोवरा. या आर्थिक मंदीचे केंद्र अमेरिकेत आहे. एक बलाढय़ आर्थिक व लष्करी महासत्ता आकस्मिकपणे या भोवऱ्यात सापडावी, याबद्दल सध्या जगात सर्वत्र चिंता, कुतूहल तसेच भीती व गूढ व्यक्त होत आहे. या विषयावर इतके चिंतन तसंच लेखन, चर्चा आणि परिसंवाद सुरू आहेत, की त्यामुळे तरी या प्रकरणावर पुरेसा प्रकाश पडावा असे वाटू लागले. प्रत्यक्षात मात्र विश्लेषण आणि कार्यकारणमीमांसेपेक्षा महत्त्वाचे आहे ते या भोवऱ्यातून सुरक्षितपणे बाहेर कसे यायचे, याचे तंत्र! सध्या भले भले तज्ज्ञ त्याच ‘तंत्र-मंत्रा’च्या शोधात आहेत. जागतिक लोकप्रियतेच्या लाटेवर आरुढ झालेले बराक
हुसेन ओबामा आता या लाटेतच बुडणार, अशा अर्थाची भाकिते बरेच पत्रपंडित करू लागले आहेत। ओबामांचे सहकारी त्यांना सोडून जात आहेत. आणि जर त्यांचा लोकप्रियतेचा निर्देशांक झपाटय़ाने आणखी घसरला तर २०१२ च्या अध्यक्षीय निवडणुकीत त्यांचा पराभव होणे अटळ आहे, असेही लिहिले- बोलले जात आहे.गेल्या २० वर्षांत सगळ्याच बाबतीत ‘अव्वाच्या सव्वा’ वाढ झाली होती. त्यामुळे तमाम नवमध्यमवर्ग या ‘अव्वाच्या सव्वा’ संस्कृतीत इतका मश्गुल झाला होता की, एकदम त्या ‘सव्वाचा अव्वा’ होईल आणि कदाचित ‘अव्वा’ही हातातून निसटेल, असे कुणाला वाटले नव्हते.२० वर्षांपूर्वी आर्थिक वाढीचा दर तीन-साडेतीन टक्क्य़ांच्या वर जाईल, असेही फारसे कुणी म्हणत नसे. साधारणपणे १९९२-९३ च्या सुमाराला चार-पाच टक्के वाढ होईल, असे अतिशय अभिमानाने रिझव्र्ह बँकेचे तज्ज्ञ सांगत असत. विशेष म्हणजे १९९१ साली याच रिझव्र्ह बँकेने सुमारे २० टन सोने लंडनच्या बँकेकडे तारण ठेवून त्या बदल्यात कर्ज घेतले होते. कर्जसुद्धा अशासाठी, की त्याअगोदर घेतलेल्या कर्जाचे व्याज फेडायला पैसे नव्हते म्हणून! मग फक्त दोन-तीन वर्षांतच आर्थिक वाढीचा दर एक-दोन टक्क्य़ांनी पुढे जाण्याची शक्यता तज्ज्ञ मंडळींना का वाटू लागली होती?या प्रश्नाचे उत्तर जितके ‘जागतिक’ आहे, तितकेच ‘स्वदेशी’ आहे.मिखाईल गोर्बाचेव यांनी सोविएत युनियनमध्ये १९८६-८७ साली ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्ट्रॉयका’चे म्हणजेच लोकशाहीकरण व आर्थिक पुनर्रचनेचे धोरण अंमलात आणायला सुरुवात केली. हा हा म्हणता ते लोण पूर्ण युरोपात पसरले. बर्लिनची भिंत १९८९ साली कोसळली ती याच ‘जनांचा प्रवाहो’च्या आक्रमतेमुळे. म्हणजेच आजच्या जगाचा पहिला ‘कट-ऑफ पॉइंट’ किंवा कलाटणी देणारा ‘ग्लोबल इव्हेन्ट’ शीतयुद्धाची ती भिंत पडण्याचा होता. त्यापूर्वीची- म्हणजे १९४९ ते १९८९ ही ४० वर्षे शीतयुद्धाने व्यापलेली होती. जगाचे अर्थकारण आणि राजकारण शीतयुद्धाच्या संदर्भाशिवाय समजणेही अशक्य होते. पॉल केनेडी वा नीआल फग्र्युसन यांच्यासारखे ज्येष्ठ आर्थिक इतिहासकारच नव्हेत, तर विविध विचारांचे निरुपणकार एकमेकांच्या विरोधात असले, तरी एक गोष्ट मान्य करीत असत- ती म्हणजे शीतयुद्धाची सार्वत्रिक छाया! (भारतातील काही भाष्यकारांना इतिहासाचे भान नसल्यामुळे त्यांना ही प्रक्रिया समजणेही कठीण जात असे. असो!)शीतयुद्धाच्या त्या शेवटच्या टप्प्यात जागतिक अर्थकारणाने बाजारपेठीय आवर्तन घ्यायला सुरुवात केली. कधी नव्हे ते अमेरिकन आणि युरोपियन भांडवल पूर्व युरोपातील समाजवादी देशांत आणि खुद्द सोविएत युनियनमध्ये येऊ लागले. याच काळात मॅक्डोनाल्ड आणि मायकेल जॅक्सन, हॉलिवूड आणि पिझ्झा हट मॉस्को-लेनिनग्राडमध्ये अवतरले. त्या भागात नवमध्यमवर्ग आणि नवग्राहक जन्माला आला तो १९८८ ते १९९१ याच काळात. सोविएत युनियनचे विघटन झाल्यानंतर शीतयुद्ध ‘अधिकृतपणे’ संपले. मात्र त्या शीतयुद्धाचा आर्थिक- सांस्कृतिक वारसा नव्या पर्वात सतत आपले डोके वर काढत होता. परंतु आता युरो-अमेरिकन भांडवलाला पाय फुटले. नवीन बाजारपेठा तयार झाल्या. त्या बाजारपेठांमध्ये खरेदी करण्याची ऐपत असलेला, चांगले पगार असलेला नवमध्यमवर्ग जन्माला आला आणि त्या वर्गाला लागणाऱ्या ‘फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स’ विकणाऱ्या शॉपिंग मॉल्सचा उदय झाला.भारतात १९९१-९२ साली आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाली, हा योगायोग नव्हता. सोविएत युनियन आणि पूर्व युरोपातील समाजवादी व्यवस्था लयाला गेल्यानंतर भारताच्या निर्यातीची ‘हमखास बाजारपेठ’ही बंद झाली. ‘डॉलर’ हे सर्वमान्य आंतरराष्ट्रीय विनिमयाचे चलन बनले. सुमारे २० वर्षांपूर्वी डॉलरचा दर मॉस्कोत एका रुबलला एक डॉलर असा होता. काळ्या बाजारात मात्र एका डॉलरला दोनशे रुबल्स मिळत असत. पुढे १९९१ साली सोविएत युनियनचे विघटन झाल्यावर खुल्या बाजारात एक डॉलरला चार हजार रुबल्स मिळत असत. अशा रीतीने अमेरिका ही एक आंतरराष्ट्रीय आर्थिक ‘डॉलर सत्ता’ बनली. त्यातूनच बाजारपेठीय भांडवली अर्थशास्त्राला प्रतिष्ठा प्राप्त झाली. त्या ‘डॉलर सत्ते’चा दबदबा जसजसा वाढत गेला तसतसा अमेरिकेचाही सार्वत्रिक गजर होऊ लागला. प्रत्येक संस्कृतीला प्रतीके लागतात. ते त्या- त्या ‘संस्कृतीचे ब्रँड’बनतात. बर्गर आणि बार्बी, डिस्नेलँड आणि डिस्कव्हरी चॅनल, एम.टीव्ही आणि मायक्रोसॉफ्ट ही अमेरिकेची प्रतीके त्यांच्या मार्केटिंग डिपार्टमेंट्सनी शॉपिंग मॉल्समध्ये देखण्या पद्धतीने मांडली. या नव्या डॉलरविस्ताराच्या नवभांडवली काळात ज्या बहुराष्ट्रीय कंपन्या जगभर पसरल्या, त्यातून नवी वेतन-संस्कृती जन्माला आली. भारतीयांचे आणि रशियनांचे, चिन्यांचे आणि व्हिएतनाम्यांचे पगार व बोनस आता डॉलर्समध्ये ठरून रुपयांमध्ये व त्या- त्या देशांच्या चलनांमध्ये मिळू लागले. त्यातूनच पुढे ‘आऊटसोर्सिग’चा जन्म झाला. त्यावेळेस डॉलरचा दर ४२ ते ४८ रुपये होता. म्हणजेच एक हजार डॉलर पगार ठरला तर त्याचे ४८ हजार रुपये मिळू लागले. दोन हजार डॉलर्स पगार म्हणजे महिन्यालाच लक्षाधीश होण्याची संधी प्राप्त झाली. भारतातल्या सॉफ्टवेअर इंजिनीयरला दोन हजार डॉलर पगार देणे अमेरिकन कंपनीला स्वस्तात पडत असे/ पडते. कारण त्याच कामासाठी अमेरिकन तरुणाला चार ते पाच हजार डॉलर द्यायला लागत होते. याच पद्धतीने विविध वस्तूंचे उत्पादन करणारे कारखाने- खेळण्यांपासून मोटारीपर्यंत- भारत, चीन, व्हिएतनाम आदी देशांमध्ये उभारले जाऊ लागले. म्हणजे कारखानदारी असो वा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट- निर्यात झाल्याने अमेरिकेतील नोकऱ्या जाऊ लागल्या, पण अमेरिकन कंपन्यांची समृद्धी मात्र वाढू लागली.अमेरिकेतील वित्त-भांडवली कंपन्या आणि एकूणच कॉर्पोरेट सेक्टर समृद्ध होऊ लागला. त्यामुळे नोकऱ्या कमी होऊनही अमेरिकन मध्यमवर्गाची सुबत्ता वाढतच गेली. या वित्तीय कंपन्यांनी भारत व अन्य देशांत गुंतवणूक सुरू केली आणि ते शेअर बाजारातही उतरले. जो सेन्सेक्स पूर्वी तीन हजारापर्यंतही जात नसे, तो २० हजारांपर्यंत पोहोचला.म्हणजेच डॉलरच्या दरात पगार, बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरी, आऊटसोर्सड् व्यवसाय आणि गुंतवणुकीवर चढत जाणारा डिव्हिडंड अशी ‘इंडियन रोप ट्रिक’ नव-मध्यमवर्गाला सापडली. या नवभांडवली अर्थव्यवस्थेत रममाण झालेला अमेरिकन नवमध्यमवर्ग तर अक्षरश: चौखूर उधळला. त्याच्याबरोबर भारतातला मध्यमवर्गही चेकाळला. त्यातूनच अमेरिकन बँकांना व विमा कंपन्यांना नवा चेव आला. त्यांनी सुलभ हप्त्यांनी, हलक्या व्याजांनी कर्ज द्यायला सुरुवात केली. त्या कर्जाच्या व त्यावरील व्याजांच्या रकमा त्या ‘रोप ट्रिक्स’मधील कल्पनेप्रमाणे हवेत गेल्या. इतक्या उंच, की त्यांचा जमिनीशी असलेला संबंधच तुटला. हळूहळू कर्जाचे व्याज, कर्जाचे हप्ते परत येणे कमी होत गेले. पैसे तर वसूल व्हायलाच हवेत! नाही तर जमाखर्चाचा ताळेबंद कसा करणार? व्याज येईना, कर्जही फिटेना. हे पाहून वित्तीय कंपन्या दिवाळखोरीत जाऊ लागल्या. मंदीला सुरुवात झाली ती अशा ‘फायनॅन्शिअल स्लो पॉयझन’ने. आता हे विष अमेरिकेच्या एकूण अर्थव्यवस्थेत शिरले आहे. परंतु अमेरिकेची अर्थव्यवस्था शीतयुद्धानंतरच्या २० वर्षांत जगाला जोडली गेल्यामुळे तो संसर्गजन्य रोग आता जागतिक अर्थव्यवस्थेलाही जडला आहे. त्यातूनच अमेरिकेतील सुमारे ४० प्रमुख कंपन्या, बँका, वित्तसंस्था देशोधडीला लागल्या व त्यांच्यावर अवलंबून असलेले उद्योगधंदे लिलावात निघाले. साहजिकच नोकऱ्या गेल्या, पगार कमी केले गेले, बोनस मिळणे बंद झाले, आऊटसोर्सिगवर गदा आली, ‘एचवन बी’ व्हिसांवर कुऱ्हाड कोसळली आणि शॉपिंग मॉल्समध्ये येणारी पैशाची आवकही आटू लागली. म्हणजेच खरेदी घटू लागली. हे जगभर चालू आहे; फक्त भारतात नव्हे! परंतु हा तर या आर्थिक अराजकाच्या नाटकातील फक्त पहिला अंक आहे. गेल्या वर्षी याच स्तंभातून या अराजकाचे ढग जमा होत असल्याचा इशारा दिला गेला होता. आता त्या ढगांनी काळोखी आणायला सुरुवात केली आहे. ‘शॉपिंग मॉल्स’मधील झगमगणारे दिवेही आता मिणमिणते होऊ लागले आहेत. ‘सव्वाचे अव्वा’ होऊ लागले आहेत आणि सर्वानाच ‘रोप ट्रिक’ लक्षात येऊ लागली आहे.
कुमार केतकर
विनाशकाले विपरित 'धर्म'
विनाशकाले विपरित 'धर्म'
अलिकडेच तीन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या। एक मुंबईत, दुसरी ढाका येथे आणि तिसरी ब्रुसेल्सला। तीनही ठिकाणी चर्चासत्रांचा मुख्य विषय होता- ‘धर्म आणि दहशतवाद’. ‘धर्म’ हा हिंसेची वा हत्याकांडाची प्रेरणा कशी होऊ शकतो? गांधीजींची हत्या करणारा नथुराम कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थाने प्रेरित झालेला नव्हता, तर प्रखर ‘हिंदुत्वाने’भारलेला होता. इंदिरा गांधींना ठार मारणारे शीख सुरक्षा गार्डस् हेही धर्मभावनेने झपाटलेले होते. फाळणीच्या वेळी झालेला लक्षावधी लोकांच्या हिंसेचा आगडोंब, दक्षिण आणि उत्तर आर्यलडमधील कॅथलिक आणि प्रोटेस्टंट ख्रिश्चनांमधील १०० वर्षे चालू राहिलेला हिंसाचार, इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यात आजही चालू असलेले घनघोर युद्ध या सर्वामागे ‘धर्म’ हीच ‘उदात्त प्रेरणा’ आहे. ‘९/११’ आणि ‘२६/११’ या दोन घटनांमध्ये (११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क व वॉशिंग्टनवर आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे) ‘धर्म’ हाच प्रेरणास्रोत होता. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी म्हटले आहे की, ‘धर्म’ या संकल्पना व संस्थेमागील प्रचंड सामथ्र्य लक्षात घेऊन जगातील दहशतवाद व युद्ध यांना कायमचा विराम देणे शक्य आहे। तिबेटचे दलाई लामा यांनाही वाटते की, धर्म हा जागतिक शांततेचा संदेश देऊ शकतो. काही स्वयंभू विचारवंतांना वाटते की, ‘पूर्वेकडील’ धर्म व तत्त्वज्ञान, संस्कृती व परंपरा या ‘पश्चिमेकडील’ धर्म-परंपरांपेक्षा अधिक प्रगल्भ, शांततावादी आणि उदात्त आहेत. जणू काही तत्त्वज्ञान हे भौगोलिकतेवर अवलंबून आहे, चिंतन-मननावर नाही.या ‘पूर्व’ग्रहातून बौद्ध, हिंदू, इस्लाम हे कुणीच मुक्त नाहीत. पूर्वेकडील देशात ‘अध्यात्म’ आहे आणि पश्चिमेकडे ऐहिकता व चंगळवाद आहे असाही एक समज या ‘पूर्व’सुरींनी प्रसृत केला आहे. कित्येक शतकांमध्ये चीन, जपान, कंबोडिया, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये झालेला हिंसाचार पाहिला की या तथाकथित पूर्वेच्या तत्त्वज्ञानाबद्दल असलेला प्रचार किती पोकळ आहे, हे सहज लक्षात येईल.हा सर्व इतिहास परिचित असूनही मुंबई व ढाका येथील परिषदांमध्ये जे ‘इस्लाम’चे समर्थक (आणि अर्थातच दहशतवादाचे विरोधक) होते, त्यांच्या मते त्यांच्या धर्माचा चुकीचा व विकृत अर्थ लावला गेल्याने ‘इस्लामी दहशतवाद’ निर्माण झाला व मुस्लिम समाज बदनाम झाला. हिंदुत्त्ववाद्यांचे तर प्रतिपादन असे की, त्यांचा ‘धर्म’ हा खऱ्या अर्थाने ‘वैश्विक’ आणि ‘आध्यात्मिक’ आहे. त्यामुळे इहवाद आणि त्याच्या अनुषंगाने येणारा लोभ, सत्ताकांक्षा, हिंसा, युद्ध हे ‘हिंदू’ तत्त्वज्ञानात व धर्मात बसूच शकत नाही. (आपल्या भूमिकेची चाल न बदलता हे विद्वान तितक्याच ओजस्वीपणे महाभारत, कुरुक्षेत्र आणि कृष्णाचा अर्जुनाला दिलेला युद्धाचा संदेशही सांगतात.) बौद्ध धर्माचा संस्कार असलेल्या जपान व चीनने फक्त विसाव्या शतकातील केलेल्या आक्रमणांची व हिंसाचाराची नोंद घेतली तरी त्या इतिहासाबद्दल तसला ‘गैरसमज’ राहणार नाही. ‘इस्लाम’इतकाच ज्यूंचा धर्म अती-कडवा आहे आणि ज्यूही त्यांच्या विचाराच्या जागतिक प्रतिष्ठापनासाठी विध्वंस करायला तयार आहेत, हे तर दिसतेच आहे.इस्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी ‘बीबीसी’च्या पॅनोरमा’ कार्यक्रमात १९७१ साली एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, ‘इस्रायलला युद्धाचा व त्याच्या अस्तित्वाचा धोका वाटला तरी फक्त सर्व अरब प्रदेशच नव्हे, तर अवघे जग विध्वंसात लोटून द्यायलाही आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.’इस्रायलने आज प्रत्यक्षात अमेरिकेलाच स्वत:पुढे लोटांगण घालायला लावले आहे. तेही धर्माचा, परंपरांचा आधार घेऊनच. आपला धर्म व आपली पुराणे सर्वात प्राचीन व प्रगल्भ आहेत असे ज्यूंचे मत आहे आणि ‘इस्लाम’ हा त्यांनी त्यांचा आद्य शत्रू मानला आहे. (पूर्वी त्यांचा हा वैरभाव ख्रिश्चनांबद्दल होता.) अर्थातच हे विचार कडव्या, धर्माध ज्यूंचे आहेत, ज्याप्रमाणे कडवे इस्लामीही तशाच इर्षेने पेटलेले आहेत. म्हणूनच इस्रायल-पॅलेस्टिन यांच्यातील संघर्ष हा जगाला विनाशाच्या वणव्यात लोटू शकतो.ज्यूंचा जेहोवाह (किंवा याहवेह) या प्रचंड सामथ्र्य असलेल्या ग्रामदेवतेचा पगडा त्या समाजावर आजही आहे. या जेहोवाहने ज्यूंच्या अब्राहम या पुराणपुरुषाशी एक करार केला आहे. ‘हा कॅनानचा सारा प्रदेश (म्हणजे इस्रायल) अनंतकालपर्यंत तुझ्या वंशजांच्या मालकीचा राहील. त्यांचा देव मीच असेन. तूसुद्धा, तसेच तुझ्या पुढील पिढय़ातील वंशजांनीसुद्धा हा माझ्याबरोबरचा करार पाळण्याचे वचन दिले पाहिजे.’ या करारात जेहोवाहने पुढे आयझ्ॉक, जेकब, मोझेस यांनाच नव्हे तर सर्व ज्यू पिढय़ांना बांधून घेतले आहे. ‘इस्रायल जमात हे माझे पहिले अपत्य आहे. मीच इस्रायलींचा पवित्र आणि तुम्हाला अभय देणारे एकमेव देव!’ मोझेसला दहा आज्ञा फर्मावताना त्याने बजावले आहे की, ‘अन्य कुठल्याही देवाची पूजा करू नका. मला प्रतिस्पर्धी सहन होत नाहीत. जे माझ्याविरुद्ध जातात वा माझा द्वेष करतात त्यांना आणि त्यांच्या तिसऱ्या-चौथ्या पिढीपर्यंतच्या वंशजांनाही मी कडक शिक्षा देतो.’ (संदर्भ व भाषांतर : मानवैकात्मकता- अर्थात मानवजातीच्या पुनर्बाधणीचा नवा विचार. लेखक श्रीराम त्र्यंबक गोडबोले. त्रिदल प्रकाशन, मुंबई)सध्या सर्वत्र असे मानले जाते की दहशतवादी मुख्यत: इस्लाम धर्माचे आहेत. इस्लाममध्ये इतर धर्मीयांना म्हणजेच काफिरांना (!) ठार मारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण जग ‘इस्लामी’ करण्याचा त्यांचा कार्यक्रम (कट!) आहे आणि त्या ‘उदात्त ध्येयासाठी’ ते मरायला तयार आहेत. प्रत्यक्षात कडवे ज्यू आणि कट्टर इस्लामवादी हे आपल्या प्रखर ‘धर्मप्रेमा’पोटी जगाच्या विनाशाला तयार आहेत.इस्लामचा धर्म म्हणून उदय सुमारे १५०० वर्षांपूर्वी झाला आहे. तिसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत पूर्व रोमन साम्राज्याचे सत्ताधीश आणि पर्शियाचे तत्कालिन राज्यकर्ते यांच्यात घमासान संघर्ष चालू होता- सिरिया, इजिप्त आणि आशिया मायनर या भागात स्वत:चा अंमल प्रस्थापित करण्यासाठी. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर असंतोष आणि अस्थैर्य, अराजक आणि अंदाधुंदी या प्रदेशात माजली होती. ती स्थिती दूर करून स्थैर्य व शांतता प्रस्थापित करण्यासाठी महमद पैगंबरांनी प्रयत्न केला. (पैगंबराचा जन्म ५७१ सालचा वा त्या सुमाराचा.)ख्रिस्ती धर्माचा उदय दोन हजारांहून अधिक वर्षांचा. बेथलहेम, पॅलेस्टिन (त्यावेळचा) येथे हीब्रू प्रवचन करणारा येशू हा मूळचा ज्यू! येशूच्या प्रवचनांमुळे आपले जणू आसनच अस्थिर होते आहे, असे वाटू लागल्यामुळे रोमन सत्ताधीशांच्या अधिकाऱ्यांनी येशूला सुळावर चढविले. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे काही किलोमीटरच्या एकाच परिसरात जन्माला आलेले धर्म परस्परांच्या विरोधात कडवे होण्याचे कारण त्या भागातील अतिशय तीव्र असा सत्तासंघर्ष. त्या सत्तासंघर्षांचे मूळ व्यापारात आणि व्यापारविस्तारातच होते. सामुद्री मार्ग निर्माण होण्यापूर्वी व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे. त्या व्यापारात प्रचंड स्पर्धा असे. ज्याची त्या खुष्कीच्या महामार्गावर सत्ता प्रस्थापित होईल तो त्या भागाचा चक्रवर्ती- हा महामार्ग म्हणजे सिरिया-बाबिलॉनमधून मृतसमुद्र व लालसमुद्रमार्गे इजिप्तला जाणारा पट्टा.त्या काळात, म्हणजे शेतीची अर्थव्यवस्था स्थिर होत असतानाच्या काळात आणि टोळी अवस्थेतून माणूस पूर्णपणे बाहेर यायच्या अगोदर, ज्या देवदेवतांच्या दंतकथा प्रचलित होत्या त्याच वेगवेगळी रुपे धारण करून सर्व धर्माच्या पुराणात गेल्या. परंतु अजून एका प्रश्नाचे निर्णायक उत्तर कुणालाही देता आलेले नाही. इतर प्राणीमात्रात नसलेली विद्वेषाची भावना आणि धर्माग्रहाच्या नावाखाली धर्मांधता ही सिव्हिलायझेशनच्या क्रमात कशामुळे वाढायला लागली असावी? युगोस्लावियाच्या विघटनातही सध्या पसरत असलेली धर्मवादाची लाट प्रकट झाली होती.या पाश्र्वभूमीवरच वर उल्लेखिलेल्या तीन परिषदांचे संयोजन केले गेले होते. ‘धर्म आणि दहशतवाद’ या विषयावरील तेथील चर्चेला आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे परिमाणही लाभले होते. त्यामुळे मधूनच त्या चर्चेला ‘धर्म आणि विज्ञान’ यांच्यातील परस्पर स्पर्धेचा/ विरोधाचाही रंग येत असे आणि मनोविश्लेषणाचाही!एखादा माणूस दुसऱ्या माणसाला किंवा एखादा समूह दुसऱ्या समूहाला ठार मारायला का व कसा प्रवृत्त होतो? आणि त्यासाठी स्वत:ही ‘फिदायीन’ वा ‘मानवी बॉम्ब’ व्हायला तयार कसा होतो. धर्माचा असा काय पगडा आहे की, ज्यामुळे एखादा तरुण (!) आपले सर्व तारुण्य आणि आयुष्य त्यासाठी उधळून द्यायला तयार होतो? सर्व धर्माची ‘मूळ’ शिकवण करुणा, प्रेम, त्याग आहे, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र आपलाच धर्म श्रेष्ठ, अधिक उदात्त, प्रगल्भ आणि प्राचीन आहे हे सिद्ध करण्यासाठी, नेमक्या त्याच प्रेम व करुणेच्या मूल्यांना झुगारून अपार हिंसेला तयार होतो? फक्त तात्कालिक हिंसेलाच नव्हे तर जगाच्या विध्वंसालाही तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वत:ला सिद्ध करतो.त्या विध्वंसाचे मूळ त्या विज्ञान-तंत्रज्ञानात नाही तर मनात आणि त्या तथाकथित धर्मसंस्कारात आहे. सर्व धर्माची शिकवण काहीही असो, त्यांचा व्यवहार हिंसेचा आणि अमानुषतेचाच राहिला आहे. धर्मसंस्थेचा उगम सामाजिक नियमनासाठी आणि तत्त्वचिंतनाला शिस्त आणण्यासाठी झाला असला तरी उदात्ततेच्या स्पर्धेत, आजच्या बाजारपेठीय स्पर्धानाही लाजवेल इतकी, क्रूर स्पर्धा सर्व धर्मामध्ये सुरू झाली आणि एका बाजूला विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास होत असताना, धर्मसंस्थेला आणि दीर्घकाळ टिकून राहिलेल्या धर्मसंस्कारांना आव्हान मिळू लागले. (धर्म आणि विज्ञानात समन्वय आणण्याचे प्रयत्न सुरू झाले ते त्यातून निर्माण झालेल्या अस्थिरतेला व अस्वस्थतेला दूर करण्यासाठी. परंतु कित्येक वैज्ञानिकांचीच मानसिक धारणा धर्म चौकटीतलीच होती आणि आजही असते.) शिवाय ‘धर्म’ या संस्थेप्रमाणे विज्ञान ही काही संस्था नाही. (वैज्ञानिक संस्था आणि विज्ञान नावाचे धर्मसदृश पीठ या वेगळ्या गोष्टी आहेत.) धर्माचा जसा एक ग्रंथ वा एक पीठ वा गुरू वा प्रार्थना वा नीती असते तसे विज्ञानाचे नसते. प्रकांड अभ्यास, प्रयोग व साहस करणारे वैज्ञानिक होते पण त्यांचे निष्कर्ष खोडून काढणारे, समांतर प्रयोग करणारे आणि अधिक संशोधन करून त्या निष्कर्षांच्या आधारे पण वेगळे निष्कर्ष काढणारे वैज्ञानिकही होते. वैज्ञानिकांच्या ‘गुरु-शिष्य’ परंपरेत गुरुला आव्हान देणे बसत होते. धर्मात तसे चालत नाही. प्राचीन परंपरांचे दडपण वा दादागिरी वैज्ञानिकतेत नसते. श्रद्धेपेक्षा चिकित्सेला, आदेश पालनापेक्षा कुतुहलाला आणि उत्तरे स्वीकारण्यापेक्षा प्रश्न विचारण्याला विज्ञानात प्रतिष्ठा असते. धर्मसंस्थेत अर्थातच ते स्वातंत्र्य नसते. मुंबई, ढाका व ब्रुसेल्स येथे भरलेल्या तीनही परिषदांमध्ये धर्मांधतेचे मानसशास्त्र, धर्मवादाचे हिंस्र राजकारण आणि धर्मवेडय़ांनी आत्मसात केलेले नरसंहाराचे ‘हायटेक’ ज्ञान याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले गेले. चर्चा खूप झाली पण उत्तरे कुणाकडेच नव्हती. अखेरीस ‘सिव्हिलायझेशन’चा अंतही हे धर्मच करणार का?
कुमार केतकर
.. शब्दांच्या पलीकडले
कुमार केतकर
रुद्राक्षी’ पत्रसंग्रह- एक पत्र
रुद्राक्षी’ पत्रसंग्रह तसा व्यक्तिगत असला तरी त्यातील मुद्दे व मांडणी त्या कक्षेपलीकडे जाते।‘रुद्राक्षी’चे लौकिक अर्थाने ‘परीक्षण’ करणे अशक्य आहे. हे पुस्तक म्हणजे ‘फिक्शन’ नाही आणि प्रचलित अर्थाने ‘नॉनफिक्शन’ही नाही. त्यातून आत्मकथन प्रकटते, पण ते आत्मकथनही नाही. कित्येक पत्रांमध्ये कथा-कादंबऱ्यांचे ‘जम्र्स’ आहेत. काही पत्रे म्हणजे मनस्वी समीक्षा आहे जी प्राध्यापकी चौकटीबाहेरची आणि मुक्तचिंतनात्मक आहे.
प्रिय श्री। मनोहर सप्रे,
खरं म्हणजे वरील मायना लिहितानाच मला प्रश्न पडला होता की तुम्हाला (की तुला?) हे पत्र लिहिताना एकारात शैलीत नुसते ‘मनोहर’ म्हणून संबोधावे की बहुवचनी ‘श्री मनोहर सप्रे’ अशी सुरुवात करावी. कारण माझ्यापेक्षा तुम्ही सुमारे १२ वर्षांनी मोठे आहात. शिवाय आपले तसे दीर्घकाळचे संबंध नाहीत. जरी आपल्याबद्दल मी ऐकून होतो, आपला प्रत्यक्ष परिचय तसा अलीकडलाच. मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रपूरला आलो होतो. (त्या वेळी मला मिळालेल्या पुरस्काराचे ‘ग्रंथशिल्प’ तुम्हीच तयार केल्याचे कळले.) कार्यक्रमानंतर तुमच्या घरी आलो आणि तुमच्या चित्रकलेने, उत्कट काष्ठशिल्पांनी, सर्जनशील कलामांडणीने एकदम प्रभावित झालो. तितकाच थक्क झालो आपल्या गप्पांनी, त्यातील उपमा-उत्प्रेक्षांनी, पुस्तकांच्या संदर्भानी आणि अर्थातच चिंतनाने. आणि बहुवचनी ‘श्री. मनोहर सप्रे’ असाच मायना करायचे ठरवले.गप्पांनंतर तुमचा ग्रंथसंग्रह पाहिला. पुस्तके पाहणे, ती चाळणे, त्यातील मुख्य आशय-विषयाचा शोध घेणे, लेखनशैलीची ओळख करून घेणे, लेखकाचा दृष्टिकोन आणि त्याची माहिती समजून घेणे हा माझा छंद आहे. त्यामुळे पुस्तकाच्या दुकानात असो वा ग्रंथालयात, कुणाच्या घरातील पुस्तक संग्रहात असो वा अगदी रद्दी पुस्तकाच्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवर माझी नजर तसा शोध घेत असते। ग्रंथप्रेमी (मराठी आणि विशेषत: इंग्रजी) मुंबईकरांना एक सुप्त गर्व असतो। विशेषत: ज्यांना युरोप-अमेरिका वा चीन, पाकिस्तान इत्यादी भागांत (जगभर!) फिरण्याची संधी असते (म्हणजे माझ्यासारख्याला!) की एकूण ‘जागतिक’ ग्रंथविश्वाची आपल्यालाच चांगली ओळख आहे. तुमचा ग्रंथसंग्रह पाहणाऱ्याचे नक्कीच गर्वहरण होईल. प्रश्न किती पुस्तकांचा संग्रह आहे हा नाही तर कोणती, कुणी लिहिलेली, कोणत्या विषयांवरची ‘मूलगामी’ वा सर्जनशील वा शैलीदार पुस्तके त्या संग्रहात आहेत. गप्पा मारता मारता मार्टिन रीज् या जगप्रसिद्ध वैज्ञानिकाच्या 'ड४१ो्रल्लं’ ऌ४१' या पुस्तकाचा संदर्भ तुम्ही दिला. अक्षरश: पाच मिनिटांत आपल्या दोघांचे त्या पुस्तकातील भूमिकेविषयी एकमत झाले. अनेकांना निराशावाद, नियतीवाद, प्रलयवाद, वैज्ञानिक वास्तववाद, शास्त्रशुद्ध भविष्यवेधी अरिष्ट‘वाद’ यातील फरक कळत नाही. त्यामुळे (बिचाऱ्या!) मार्टिन रीज्वरही नकारात्मक व निराशावादी दृष्टिकोनाचा आरोप झाला. ग्लोबल वॉर्मिग खरोखरच हाहाकारी ठरू शकतो हे तर जेम्स लव्हलॉक (‘गाथा’ संकल्पनेचा प्रवर्तक) या विख्यात वैज्ञानिक विचारवंताचेही मत आहे. रीज् यांना ग्लोबल वॉर्मिग, टेररिझम आणि विवेकशून्य वैज्ञानिक प्रयोग यामुळे पृथ्वीला धोका आहे आणि याच शतकात तो धोका आहे असे वाटते. ती शक्यता नि:संदिग्ध शब्दात ते मांडतात ती ‘भाकीत’ म्हणून नव्हे, तर इशारा म्हणून. तसा इशाराच नसेल तर तो धोका परतवता येणार नाही; परंतु मुद्दा मार्टिन रीज् यांच्या पुस्तकाचा नाही. चंद्रपूरसारख्या दूरच्या (मागासलेल्या मानल्या जाणाऱ्या!) ठिकाणी तुम्ही जसा ‘वैश्विक’ विचार करीत होता, तसा करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचे ग्रंथसंग्रह कमी आहेत. स्वत:ला पुरोगामी आणि ‘इंटेलेक्च्युअल’ मानणारा महाराष्ट्र किती झपाटय़ाने गर्तेत कोसळत आहे आणि हा ऱ्हास गेल्या २५-३० वर्षांत किती वेगाने झाला आहे, याविषयी आपले एकमत झाले आणि गप्पांना ‘बौद्धिक’ परिमाण प्राप्त झाले.तुमच्या विलक्षण आर्ट कलेक्शन आणि आर्ट क्रिएशन्स यांना त्या पुस्तकांचे आणि चर्चेचे परिमाण लाभल्याने माझी चंद्रपूर भेट एकदमच अर्थपूर्ण झाली. तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही विलक्षण इंटरेस्टिंग अशी ई-मेल्स मला पाठवीत आहात. बहुतेक वेळा त्यांची पोचही मी देऊ शकलेलो नाही, पण त्या मेल्समधून तुम्ही जी चित्रे, व्यंगचित्रे, विनोद, संदर्भ वा विचार पाठवता, त्यामुळे मला तरी त्या गप्पा अखंड चालूच असल्यासारखे वाटते. अगदी निघता निघता तुम्ही तुमचा ‘रुद्राक्षी’ नावाचा पत्रसंग्रह भेट दिला. तो नुकताच प्रसिद्ध झाला होता. त्या पुस्तकावर मी लिहावे असे मला तुम्ही सुचवले. मीसुद्धा (कसलेल्या) पत्रकाराप्रमाणे आश्वासनही दिले. पण तुम्हीही चांगलेच कसलेले असणार. एका टेलिफोनिक गप्पांमध्ये तुम्ही त्या आश्वासनाचे अगदी अस्पष्ट स्मरण दिले, पण कधीही तो विषय पुन्हा काढला नाही. व्यावसायिक पत्रकार किती निर्ढावलेले असतात याचा अंदाज तुम्हाला असणारच. तितपत भान (आणि चलाखी) तुम्हाला आहे. तुमच्या गप्पांमधूनही व्यावहारिक जगाबद्दलचा रास्त सीनिसिझम् आणि ती चलाखी, ती वितंडवादी क्षमता आणि ती भेदक बौद्धिक चमक लक्षात येते. म्हणूनच तुमच्याबरोबरचा तो वेळ कसा गेला हे लक्षात येत नाही आणि प्रत्यक्ष परिचय कमी काळाचा असूनही ते (ई-मेल्समुळेही) जाणवतही नाही.तुमचा ‘रुद्राक्षी’ पत्रसंग्रह तसा व्यक्तिगत असला तरी त्यातील मुद्दे व मांडणी त्या कक्षेपलीकडे जाते. तुम्ही ज्यांना पत्रे लिहिली आहेत त्यांना- सर्वाना- मी थेट ओळखत नसलो तरी काहींचा परिचय आहे, काहींबद्दल माहिती आहे आणि बाकीच्यांची ओळख या पत्रांतून झाली.‘रुद्राक्षी’चे लौकिक अर्थाने ‘परीक्षण’ करणे अशक्य आहे. हे पुस्तक म्हणजे ‘फिक्शन’ नाही आणि प्रचलित अर्थाने ‘नॉनफिक्शन’ही नाही. त्यातून आत्मकथन प्रकटते, पण ते आत्मकथनही नाही. (‘सांजी’ व ‘रुद्राक्षी’ ही दोन्ही पुस्तके मिळून तुमची ‘सायको-बायॉग्राफी’ लिहिणे मात्र शक्य आहे!) कित्येक पत्रांमध्ये कथा-कादंबऱ्यांचे ‘जम्र्स’ आहेत. काही पत्रे म्हणजे मनस्वी समीक्षा आहे (जी प्राध्यापकी चौकटीबाहेरची आणि मुक्तचिंतनात्मक आहे). मला कौतुक आणि आश्चर्य वाटले ते इतकी आणि अशी पत्रे लिहिण्याच्या तुमच्या मानसिक क्षमतेचे! तुमचे कलाप्रेम आणि ‘जीए प्रेम’ तर मला विशेषच जाणवले. (तितकेच अनुरूप विवेक रानडेंचे मुखपृष्ठही!)मला धड सरळ रेषाही काढता येत नाही. माझे रंगज्ञानही अगाध आहे. चित्र मला समजतातच असा दावा मी करू शकणार नाही. (पण जर समजली नाहीत तर न्यूनगंड वाटतो.) मला कविता करता येत नाहीत. मी कथा-कादंबरी लिहिलेली नाही. सर्व प्रकारची शिल्पकला व तत्सदृश कलाविष्कार माझ्याकडे नाहीत. माझे निसर्गज्ञानही तसेच अगाध आहे. बरीचशी झाडं, फुलं, फळं तर मी ओळखूही शकत नाही.अशा गद्य पत्रकाराला ‘रुद्राक्षी’चे परीक्षण वा तथाकथित ‘मूल्यमापन’ करायला सुचविणे म्हणजे तुमचे धाडसच होते. पण तुमची प्रकाशित पत्रे वाचून त्याबद्दल काही लिहिणे हे मला कर्तव्य वाटत होते. सुमारे वर्षभरानंतर मी तुम्हाला दिलेले आश्वासन परीक्षण न लिहिताच पूर्ण करण्याचा आविर्भाव आणतो आहे. म्हणूनच हा ‘पत्रा’चाच फॉर्म वापरणे मला उचित वाटले. तुमचे ई-मेलवर उत्तर येईलच.
आपला,
कुमार केतकर