, आनंद व दु:खाच्या चक्रात फिरवते, त्याला आपण जीवन म्हणतो. जीवन म्हणजे जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये जाणता-अजाणता केलेला प्रवास. काही अत्यल्प अपवाद वगळता हा प्रवास १०० वर्षांच्या आतच असतो. प्रत्येक देशातील आयुष्यमान (आयुष्यरेषा!) वेगवेगळे. अफगाणिस्तानमध्ये तेथील यादवीमुळे ते आयुष्यमान ५० च्या आत आले आहे आणि सुस्थित अमेरिकेत ९०-१०० पर्यंत.
समाज कुठचाही असो, कोणत्याही धर्माचा असो, भाषा- बोली कोणतीही असो, भौगोलिक परिसर कसाही असो- या जीवनप्रवासातील काही टप्प्यांना अनन्यसाधारण महत्त्व असते. मग तो मानवी समूह बर्फाळ उत्तर ध्रुवावरील आíक्टक प्रदेशात असो, वा अॅमेझॉन जंगलात खूप आत, बाकी ‘सिव्हिलायझेशन’पासून सर्वार्थाने दूर. अंदमान परिसरात आजही अतिप्राचीन जीवनपद्धतीत राहणारा आदिवासी असो वा आफ्रिका खंडातील निबिड जंगलात गुजराण करणारी टोळी.
जगातील भाषिक समूहांची संख्या अडीच हजार की सहा हजार या वादात जायचे कारण नाही. भाषा एकच असली तरी अनेक समूह असून ते विशिष्ट जीवनपद्धती आणि संस्कारशैलींनी अंतर्गतरीत्या विणलेले असतात. त्यापैकी बहुतेक समूहांचा प्रयत्न ती वीण शक्यतो उसवू नये असा असतो. उदाहरणार्थ, आपण ज्यांना ‘एस्किमो’ म्हणून ओळखतो, ते कॅनडाच्या उत्तर भागातील बर्फाळ आíक्टक प्रदेशात असोत वा ग्रीनलँडमधील बिनबर्फाच्या प्रदेशात असोत वा रशियन सायबेरियात. अफाट पसरलेल्या पण वैराण (मात्र खनिजसमृद्ध) आणि शेती अशक्य असलेल्या या भागांमध्ये एकूण दीड-दोन लाख लोकच राहतात. त्यांच्यातही तीन भाषा-बोली आहेत. युपीक (मुख्यत: सायबेरियात), अॅल्यूत (अलास्कात) इन्यूपिअॅक (ग्रीनलँडमध्ये). पण विरळ वस्ती आणि कमी लोकसंख्या असूनही त्यांची एक सामूहिक जीवनशैली, संस्कार, मूल्ये, नैतिक नियमावली अशी वीण असतेच. ‘एस्किमो’ शब्दाचा स्थूल अर्थ : शिकार करून कच्चे मांस खाणारी माणसे. परंतु मानवी हक्क संघटनांनी ही त्या समाजाची अपमानकारक ओळख आहे, अशा प्रचाराला सुरुवात केल्यावर युनोने त्यांना ‘इन्यूयीट’ (Inuit) असे नाव त्यांच्याच सांस्कृतिकतेच्या आधारे दिले.
मुद्दा हा की भाषा, धर्म, देश, वंश या व्यापक संज्ञांच्याही पलीकडे, त्यांच्या अंतर्गत अनेक समूहजीवन पद्धती असतात. त्या पद्धती कशा निर्माण होतात, रूढ होतात, त्यांच्यातील नैतिक नियमावली कशी ठरते (कुणी ठरवलेली असते आणि कोण ती ‘अमलात’ आणत असतो) हे व असे अनेक प्रश्न म्हणजे मानववंशशास्त्राला अजूनही पूर्ण न उकललेली ‘सिव्हिलायझेशनल पझल्स’!
जन्म आणि मृत्यू या दोनच अटळ गोष्टी. त्या सर्वानाच लागू. पण त्या दोन टोकांमध्ये असलेले काही टप्पे सर्व मानवी समूहांना- टोळ्यांना, आदिवासींना, खेडय़ांना- शहरांना व महानगरांनाही लागू पडतात. उदाहरणार्थ, मूल जन्माला आल्यावर केले जाणारे समारंभ, विवाह (वा घटस्फोट), व्यवसाय/काम: शिकार, शेती, नोकरी इ., वृद्धत्व, मृत्यू व त्यानंतरचे अंत्यसंस्कार. याशिवाय काही उत्सव असतात, सण असतात, कुलदैवत-स्मरण समारंभ असतात. पूजा-अर्चा, सामूहिक प्रार्थना, श्रद्धा-अंधश्रद्धा व त्या अनुषंगाने येणाऱ्या चालीरीती, संकेत व नियम इत्यादी.
प्रत्येक मानवी समूहाची म्हणजे भाषिक- धार्मिक- भौगोलिक- वांशिक उपसमूहांची, वस्त्यांची, टोळ्यांची, आदिवासींची एक स्वयंनिर्मित आचारसंहिता असते. ती पाळली जाते की नाही हे पाहणारी एक अंतर्गत यंत्रणा असते. न पाळल्यास शिक्षा असते आणि जन्म-विवाहापासून ते अंत्यसंस्कारापर्यंत (भूत-पिशाच्चांनाही शांत करण्यापर्यंत!) एक सविस्तर नियमावली असते. यापैकी काहीच ‘वैज्ञानिकते’च्य वा तर्काच्या कसोटीवर बसविता येत नाही वा सिद्ध करता येत नाही. मानवी समूह ही जी ‘सांकेतिक संरचना’ करतो त्यातूनच प्रत्येक माणूस त्यांचा सामाजिक व्यवहार करीत असतो. ती ‘सांकेतिक संरचना’ ही तर्क वा विज्ञानावर आधारलेली नसली तरी तिचा अभ्यास मात्र वैज्ञानिक पद्धतीने करता येतो!
हे हजारो, खरे म्हणजे लाखो, मानवी समूह म्हणजे ‘सिव्हिलायझेशनल ब्लॉक्स’. या ब्लॉक्स ऊर्फ विटांची प्रचंड वैश्विक इमारत म्हणजे ‘ह्यूमन सिव्हिलायझेशन’. परंतु प्रत्येक ब्लॉक म्हणजे एक बऱ्याच अंशी स्वायत्त असलेले ‘स्ट्रक्चर’. अशी हजारो/लाखो स्ट्रक्चर्स. त्यांच्यात काही समान गुणधर्म असतात/दिसतात, पण अनेक असमान गुणधर्मही अगदी विरोधी वा शत्रूवत वाटावे, असेही असतात.
माणूस नावाच्या प्राण्याचे हे गुणधर्म मुळातूनच तपासल्याशिवाय, त्यांचा शोध घेतल्याशिवाय, भाषा कशी विकसित होत गेली, श्रद्धा-अंधश्रद्धा- रूढी कशा निर्माण झाल्या, परंपरा व संकेत कसे रुजत गेले, माणसा-माणसातील परस्परसंबंध व त्यातील उतरंड कशी ठरत गेली, स्त्री-पुरुष संबंधातील नैतिकतेचे निकष कसे निर्माण झाले व त्यातूनच विवाह- नियमावली कशी बदलत गेली, या व अशा बऱ्याच गोष्टींचा उलगडा होणार नाही, हे ओळखून काही विज्ञाननिष्ठ मंडळींनी शोध सुरू केला. त्यातूनच अॅन्थ्रॉपॉलॉजी ऊर्फ मानववंशशास्त्र, सोशियॉलॉजी म्हणजे समाजशास्त्र, एथिक्स म्हणजे नीती- संकल्पनाशास्त्र अशा ज्ञानशाखा निर्माण झाल्या. या ज्ञानशाखा जेमतेम दीड- दोनशे वर्षांच्या आहेत.
अशा ज्ञानशाखांना पदार्थविज्ञानशास्त्राचे वा रसायनशास्त्राचे निकष लावणे शक्य नसते. कारण मानवसमूह प्रयोगशाळेत टाकून व त्यांच्यावर प्रक्रिया करून वा त्यांच्या जीवनशैलीचे सुप्त समीकरण तयार करून समजून घेता येत नाहीत. अस्तित्वात असलेल्या समूहांचाच अभ्यास म्हणजे समाज (विशेषत: प्राचीन) हीच प्रयोगशाळा. परंतु जे समूह (टोळ्या, दूर जंगलात राहणारे आदिवासी समूह इत्यादी) ‘आधुनिकतेने भ्रष्ट’ झालेले नाहीत, ते अगदी शुद्ध म्हणजे ‘प्युअर’ स्थितीत अभ्यासण्यासाठी अशा बऱ्याच संशोधक मंडळींनी गेल्या शतकात पुढाकार घेतला.
चार्ल्स डार्विनच्या उत्क्रांतीविषयक संशोधनाने, कार्ल मार्क्सच्या सामाजिक-आर्थिक परिवर्तन संबंधातील सिद्धांत मांडणीने आणि सिग्मंड फ्रॉईडच्या मनोविश्लेषणाच्या प्रयोगांमुळे मानववंशशास्त्राला एक (वा अनेक) दिशा उपलब्ध होऊ लागल्या होत्या. त्या संशोधनांमध्ये इतके विविध, सुरस व चमत्कारिक विषय होते की अनेकजण त्याकडे आकृष्ट झाले. शिवाय त्यात साहसही होते. कारण नरभक्षक टोळ्यांच्या सामाजिक जीवनापासून ते भटक्या-विमुक्त पद्धतीने राहणाऱ्या समूहांपर्यंत आणि शेतीस्थित समाजापासून ते भारतीय उपखंडातील जाती समूहांपर्यंत सर्व समाज या संशोधकांच्या ‘प्रयोगशाळे’त समाविष्ट झाले.
या संशोधकांची एक मोठी फळीच तयार झाली. फ्रॅन्झ बोआज, आल्फ्रेड क्रोबर, पॉल रॅडिन, ब्रोनिस्लॉ मॅलीनोव्हस्की, रुथ बेनेडिक्टस, मार्गारेट मीड, एमिल डर्कहाईम, लेस्ली व्हाईट असे बरेचजण. त्यांच्यात आणखीही एक प्रकांड विद्वान- संशोधक होता. त्याचे नाव क्लॉड लेव्ही स्ट्रॉस. चारच दिवसांपूर्वी लेव्ही स्ट्रॉस मरण पावले- वयाची १०० वर्षे पूर्ण केल्यानंतर. (त्यांचा जन्म २८ नोव्हेंबर १९०८ मध्ये बेल्जियममध्ये झाला होता. मृत्यू ३ नोव्हेंबर २००९) त्यांनी या मूलभूत ‘स्ट्रक्चर्स’चा अभ्यास करून त्यातून एक सिद्धांत मांडला. म्हणून त्यांना ‘स्ट्रक्चरॅलिस्ट’ म्हणून ओळखले जाऊ लागले. विशेषत: १९६० ते १९७० च्या दशकात लेव्ही स्ट्रॉसवाद्यांचा एक ‘इंटेलेक्च्युअल’ पंथच निर्माण झाला होता. मुंबईच्या एशियाटिक लायब्ररीत बसून दुर्गा भागवतही त्याच्या सिद्धांतावर त्यांचे भाष्ययुक्त प्रवचन करीत असत. आपल्या देशातही मानववंशशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ मंडळींनी भरीव कार्य केले आहे. (जी. एस. घुर्ये, एम.एन.श्रीनिवास, इरावती कर्वे, दुर्गा भागवत आणि ‘सब-ऑल्टर्न स्टडीज’ या ज्ञानशाखेत काम करणारे बरेच जण.) या ज्ञानशाखेत अभ्यास करणारा निरीक्षक संशोधक हाच एक महत्त्वाचा घटक असल्याने त्याचे निष्कर्ष व्यापक वा सर्वसमावेशक नसतात, सब्जेक्टिव असतात, अशी टीका असते. ती टीका व तत्संबंधी वाद बाजूला ठेवूया. कारण टीकाकारांनाही हे मान्य करावेच लागते की, या मंडळींनी केलेली माणसाच्या सामूहिक जीवनशैलीबद्दलची निरीक्षणे हा एक ‘सिव्हिलायझेशनल स्टडीज्’मधील मोठा आधार आहे. स्वभावशास्त्र आणि माणसाच्या सांस्कृतिकतेचे, प्रेरणांचे आणि श्रद्धांचे स्रोत समजून घेण्यासाठीही या सर्व संशोधनाचा प्रचंड उपयोग झाला आहे.
जगातील सर्व समाजांमध्ये विवाह आणि स्त्री-पुरुष संबंध यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. भारतीय विवाहसंस्थेविषयी इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी लिहिलेल्या मूलभूत ग्रंथाला तितकीच महत्त्वाची कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांची प्रस्तावना आहे.
लग्न, संसार, कुटुंब, तडजोडी, मुलांचे संगोपन, त्यांच्यावरचे संस्कार, त्यांच्या जीवनाची घडी आणि पुन्हा त्यांची मुले, त्यांची वाढ, त्यांची लग्ने, त्यांचे संसार.. अशी साखळी वर्षांनुवर्षे चालू आहे. त्यातच स्त्री-पुरुषांमधील विषमता, स्त्रियांचे दुय्यम स्थान, वारसा हक्कांबद्दलचे वाद, विवाहबाह्य वा विवाहपूर्व स्त्री-पुरुष संबंध (हल्लीच्या काळात प्रकर्षांने आलेले समलिंगी संबंध) येथपासून ते अगदी साध्या वाटणाऱ्या (पण अनेकदा गंभीर बनणाऱ्या) विवाह समारंभातील होम-सप्तपदीपासून ते मानपान असा तो एक महाप्रकल्पच असतो. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील तो एक महत्त्वाचा ‘टर्निग पॉइंट’ मानला जातो.
ही विवाहसंस्था व संकल्पना इतकी महत्त्वाची कशी झाली, मार्क्स-एंजल्स म्हणतात त्याप्रमाणे ‘प्रॉपर्टी’ हा त्यातील एकमेव कळीचा मुद्दा आहे की, इतर अनेक सामाजिक-सांस्कृतिक घटक आहेत, याबद्दल गेली बरीच वर्षे वाद चालू आहेत. विवाहसंस्था व संस्कार याबद्दलचे लेखन, नियम संकेत तर सुमारे पाच हजार वर्षे वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या पद्धतीने प्रचलित आहेत. मोनोगामी (एक पत्नी-एक पती पद्धती) पॉलीगामी (बहुपत्नी विवाह पद्धती) पॉलीअॅन्ड्री (बहुपती विवाह पद्धती) या ढोबळपणे माहीत असलेल्या स्त्री-पुरुष संबंधांपलीकडेही यात इतके वैविध्य आहे आणि संकेत, नियम, कायदे, रीतीभाती असूनही ते सर्व तोडून, झुगारून ‘स्वतंत्र’ संबंध ठेवणे प्रचलित आहे की, एकूणच ‘स्ट्रक्चर्स’ किती अभेद्य असतात याबद्दल प्रश्न पडावा.
ही ‘स्ट्रक्चर्स’ आणि ही नियमावली कोणी ‘मुखिया’ वा कोणी ‘मनू’ निर्माण करत नसतो, परंतु जगभरच्या सर्व मानव-समूहांमध्ये सामाजिक उतरंड आणि प्रत्येकाची ‘पायरी’ मात्र तयार होत राहते. या अपौरुषेय संरचनांचा अभ्यास म्हणजेच मानववंशशास्त्राचा अभ्यास!
गर्भपात हा तर अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये गंभीर गुन्हा आहे. आपल्या देशात अलीकडेच वाद पेटला होता तो किती दिवसांचा गर्भ असताना गर्भपात कायदेशीर मानावा या मुद्दय़ावर. बहुतेक धर्मशास्त्रांनी गर्भपात पापसदृश म्हणजे निषिद्ध ठरविला आहे. ‘अनैतिक’ संबंधातून जन्माला आलेल्या मुलांना ‘अनाथ’ वा ‘अनैतिक’- इल्लेजिटिमेट चिल्ड्रेन असे संबोधू नये असे बालहक्क परिषदांचे म्हणणे आहे. मुले किती असावीत हा प्रश्नही सरकारच्या, कायद्याच्या कक्षेत असता कामा नये, असे काही स्वातंत्र्यवादी संघटनांचे म्हणणे आहे. चीनने ‘एक दांपत्य-एकच मूल’ असा दंडक घातल्यानंतर अनेक ‘बेकायदेशीर मुले’ जन्माला आली! काही स्त्रीमुक्तीवादी संघटनांनी असे कोणतेही बंधन घालणे हे स्त्री-स्वातंत्र्याच्या विरोधात आहे असे म्हटले तर कित्येक चिनी स्त्रियांनी स्टिरॉईड्स व तत्सम औषधे घेऊन आपल्याला पहिल्याच खेपेस जुळे व्हावे म्हणून ‘यशस्वी प्रयत्न’ केले. ‘एकच मूल’ हा कायदा असला तरी जुळे झाल्यास काय, याबद्दल चिनी कायद्यात तरतूद नव्हती.
म्हणजेच जगातील सर्व प्रदेशात आणि सर्व मानवी समूहांमध्ये विवाह- संसार- मले- वारस हे प्रश्न सर्वात महत्त्वाचे मानले गेले आहेत. (जगात असंख्य स्त्रिया त्यांना मूल झाले नाही म्हणून ठार मारल्या जातात, घरातून बाहेर काढल्या जातात वा त्या आत्महत्या करतात.) आता विज्ञानाच्या मदतीने ‘स्पर्म बँक’च्या माध्यमातून, टेस्ट टय़ूब प्रयोगातून, गर्भाशय ‘भाडय़ाने’ देऊन मूल होण्याची ‘सोय’ झाली असली किंवा ‘७२ अवर्स’सदृश गोळ्या घेऊन मूल न होऊ देण्याची सुविधा आली असली तरी त्यातून नवीन प्रश्न निर्माण झाले आहेत. जी गोष्ट स्वाभाविक, नैसर्गिक व सहज मानली गेली होती, त्या स्त्री-पुरुष संबंधांभोवती प्रत्येक समाजाने अगदी सविस्तर ‘नैतिक-सांकेतिक संरचना’ म्हणजे ‘स्ट्रक्चर्स’ तयार केली आहेत.
मानववंशशास्त्रज्ञांच्या पुढे हे नैतिक- मानसशास्त्रीय- प्रशासकीय मुद्दे नसतात. त्यांचे संशोधन असते ते अशा प्रकारची ‘स्ट्रक्चर्स’ मुळात तयारच कशी झाली हे शोधणे. ते नीट समजले तरच एकूण मानवी व्यवहारावर प्रकाश पडेल असे त्यांना वाटते. कारण माणसाने तयार केलेली मिथके, रूपककथा, कर्मकांडे, कुलदैवते व त्या अनुषंगाने येणारे पूजापाठ, प्रार्थना इतकेच काय, विविध कलाविष्कार, विचार हे सर्व त्या ‘स्ट्रक्चर्स’मधून जन्माला आले आहे. लेव्ही स्ट्रॉस तर म्हणत असत की, ‘प्राचीन- रानटी- असंस्कृत’ माणूस वा समाज हे वर्णनच चुकीचे आहे. कारण तथाकथित ‘आधुनिक- शहरी- सुसंस्कृत’ माणूस व समाज हा त्याच ‘स्ट्रक्चर्स’चा भाग असल्याने मुळातून बदलत नाही. लेव्ही स्ट्रॉस यांनी त्यांच्या ‘मायथॉलॉजिक्स’, ‘ट्रीस्ट ट्रॉपिक्स’ आणि ‘टॉटेमिझम’ या ग्रंथातून त्यांचे सिद्धांत मांडल्यानंतर जगभरच्या विचारवंतांमध्ये एकच खळबळ माजली होती. त्यांच्या सिद्धांतांना आधार होता तो त्यांनी ब्राझिल आणि नॉर्थ अमेरिकेतील, अजूनही अस्तित्वात असलेल्या ‘प्राचीन’ मानवी समूहांच्या केलेल्या अभ्यासाचा.
लेव्ही स्ट्रॉस यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी अनेक फ्रेंच विचारवंत पुढे आले. एकूणच ही सर्व चळवळ म्हणजे स्ट्रक्चरॅलिस्ट, डिस्ट्रक्चरॅलिस्ट्स, मॉडर्निस्ट्स, पोस्ट-मॉडर्निस्ट्स, पोस्ट- स्ट्रक्चरॅलिस्ट्स मुख्यत: फ्रान्समधील विद्यापीठांमध्ये हिरीरीने व अटीतटीने चालू होती. त्यात सहभागी झालेल्या मायकेल फुको, रोलॅन्ड बार्थ, जॅक्विस डेरिडा यांनी पुढे स्वतंत्र संशोधन- चिंतन करून समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि अर्थातच मानववंशशास्त्र यात मोलाची भर घातली.
युरोपातील व अमेरिकेतील अशा वैचारिक चळवळींनी, ज्ञानप्रसाराने आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून जे संचित जमा झाले आहे ते मानवी संस्कृतीचे एक विलक्षण वैभव आहे. त्यांना केवळ बरोबर-चूक, योग्य-अयोग्य, नैतिक-अनैतिक असे निकष लावून चालत नाही. कारण ते संशोधनाच्या आणि सापेक्षतेच्या चौकटीत बसविलेले असते. कोणत्याही समाजाची प्रगल्भता लक्षात येते ती अशा संशोधनातून, चिंतनातून, प्रबंधांमधून. त्यातूनच नाटके, चित्रपट, साहित्य, चित्र व शिल्पकला नवनवीन आकार घेते आणि आशयाला अधिक अर्थ प्राप्त करून देत राहते.
महाराष्ट्रापुरता (किंवा देशापुरताही) विचार करताना यात आपण नक्की कुठे आहोत? सेन्सेक्स आणि ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सबरोबर आपल्या ‘वैचारिकतेच्या इंडेक्स’चेही भान, भाषेचा अतिरेकी व उग्र अभिमान बाळगताना असायला हवे!
कुमार केतकर,
शनिवार, ७ नोव्हेंबर २००९
अतिरेकी व उग्र अभिमान उपजत नसून दमनाच्या प्रतिकारास्तव उफाळून येतो. आपली सांस्कृतिक वीण जोपासणे ही आपसूक होणारी कृती आहे.
ReplyDeleteThis comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete