संहार आणि सौहार्द (लोकरंग)

‘सार्क’ची सदस्य-राष्ट्रे असलेले भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश दहशतवाद, धर्मवाद, भाषावाद, यादवी आणि युद्ध आदी समस्यांनी ग्रस्त आहेत. तरीही विस्तीर्ण दक्षिण आशियातील सुमारे १४५ कोटी लोक सौहार्दभावनेने जोडलेले आहेत. त्यांना जोडणारा समान धागा आहे- बॉलीवूड! या सर्वच देशांच्या मनोरंजन क्षेत्रावर हिंदी चित्रपटांचा अंमल आहे. बॉलीवूडचे निर्माते- दिग्दर्शक आणि नट-नटय़ांना याची पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच दक्षिण आशियाई देशांतील लोकांच्या भावभावनांचा विचार करून बॉलीवूडचे चित्रपट हल्ली बनविले जातात. या देशांतील संघर्षग्रस्ततेचा बाऊ न करता परस्परस्नेहाचे बंध तयार होण्यात बॉलीवूडचा मोलाचा वाटा आहे..


अ फगाणिस्तानच्या अथांग आणि वैराण वाळवंटांपासून ते भूतान-नेपाळच्या हिमालयन शीतल परिसरापर्यंत आणि मालदीवच्या अथांग सामुद्री प्रदेशातील बेटांपासून ते पाकिस्तानसारख्या ‘जिहाद’ग्रस्त देशापर्यंत पसरलेल्या विस्तीर्ण दक्षिण आशियातील सुमारे १४५ कोटी लोकांना जोडणारी एकच गोष्ट आहे- ती म्हणजे बॉलीवूड! हिंदी चित्रपट आणि त्यातील नाच-गाणी, अफलातून झगमगाट यांची मोहिनी फक्त भारतीय उपखंडातच नाही, तर अगदी इजिप्त-इस्राएल आणि उझबेकिस्तान- रशिया अशी सर्वदूर पसरली आहे.

बॉलीवूडच्या या विलक्षण सामर्थ्यांचा अंदाज जगभर फिरताना तर येतोच, पण ‘सार्क’ किंवा तत्सम आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये विशेषत्वाने येतो. ‘सार्क’मधील आठ देश, म्हणजे भारत, अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, नेपाळ, मालदीव, पाकिस्तान आणि श्रीलंका हे यादवी, दहशतवाद, धर्मवाद, भाषावाद आणि युद्ध अशा समस्यांनी ग्रस्त आहेत आणि तरीही या सर्व देशांमधील घराघरांत हिंदी चित्रपटातील गाणी लोकांना परिचित असतात. अमिताभ वा शाहरुख यांच्यासारखी नावे तर त्यांच्या-त्यांच्या देशातील पंतप्रधान वा अध्यक्षांपेक्षाही लोकप्रिय असतात.

गेल्या आठवडय़ात भूतान येथे झालेल्या ‘सार्क’ परिषदेत जरी ‘क्लायमेट चेंज’ पासून ते भारत-पाकिस्तान या दोन देशांतील तीव्र तणाव यापर्यंत विविध विषयांवर मुख्य चर्चा झाली, तरी उर्वरित वेळात तेथे जमलेले आठही देशांतले पत्रकार वा अधिकारी आपापसात गप्पा मारताना बोलत होते ते बॉलीवूडबद्दल. बॉलीवूडच्या पाठोपाठ विषय असे क्रिकेटचा. नुकताच ‘आयपीएल’चा सनसनाटी धिंगाणा संपला होता आणि ‘टी-२०’चे सामने सुरू झाले होते. अफगाणिस्तान प्रथमच मशीनगनऐवजी क्रिकेट बॅट आणि बॉम्बऐवजी बॉल हातात घेऊन वेस्ट इंडिजमध्ये खेळताना दिसत होता. गेली २५ वर्षे (‘सार्क’लाही तितकीच वर्षे यंदा झाली.) ‘अफगाणिस्तान’ हा शब्द जरी उच्चारला तरी डोळ्यासमोर चित्र उभे राहते, ते खांद्यावर मशीनगन घेऊन फिरणाऱ्या मुजाहिद्दीन आणि नंतर तालिबानी टोळ्यांचे. तसेच ‘पाकिस्तान’ म्हटले, की भारतात बहुतेकांच्या डोळ्यासमोर येतो तो दहशतवादीच. पण अशा परिषदांच्या निमित्ताने एकत्र जमलेले राजकारणी, नोकरशहा वा पत्रकार यांच्या दिलखुलास गप्पांचा विषय असतो ‘माय नेम इज खान’ किंवा अमिताभ वा सलमान, कत्रीना, ऐश्वर्या इत्यादी. रात्रीच्या जेवणाच्या अगोदर आयोजित केलेल्या आणि मध्यरात्रीपलीकडे चालणाऱ्या कॉकटेल- डान्स- डिनर पाटर्य़ामध्ये वा ‘कॅम्प फायर’च्या वेळेस सर्व देशांतील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी गातात-नाचतात ते ‘कजरा रे’ वा इतर अनेक हिंदी गाण्यांच्या भन्नाट तालावर. पाकिस्तानातील मुस्लीम स्त्री असो वा भूतानी वेशातील बौद्ध स्त्री, सूटाबूटाचा पेहेराव असलेला ज्येष्ठ पाकिस्तानी अधिकारी असो, वा त्या देशातील प्रसिद्ध चॅनलचा अँकर पर्सन- सर्वजण बिनधास्तपणे त्या हिंदी गाण्यांच्या धुंद रिदमवर दिलखुलास नाचत असतात.

पाकिस्तानमधील जवळजवळ सर्व नागरिकांनी बहुतेक सगळे हिंदी चित्रपट पाहिलेले असतात. त्यांना कथा-पटकथा, नट-नटय़ा, त्यांची अफेअर्स, नाच-गाणी सगळे काही मुखोद्गत असते. ते फक्त ‘रेकॉर्ड डान्स’ करीत नाहीत, तर ती गाणी म्हणतातही!

त्यांच्याशी बोलताना काही गोष्टी नव्याने कळल्या. मुंबईवर झालेल्या २६-११-२००८ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अनेक पाकिस्तान्यांना भीती वाटली, की पाकिस्तानमध्ये आता बहुतेक बॉलीवूड चित्रपटांवर बंदी येणार. पाकिस्तानातील चित्रपटरसिक भारतीय हिंदी चित्रपटांसाठी तुडुंब गर्दी करतात. त्यामुळे थिएटर्सच्या मालकांचे उत्पन्न (उदरनिर्वाहसुध्दा) हिंदी चित्रपटांवर अवलंबून असते. पाकिस्तानचे चित्रपट पाहायला लोक जात नाहीत. त्यामुळे हिंदी चित्रपट नसतील तर थिएटर्स ओस पडतात. सीडी, डीव्हीडी, व्हिडीओचा प्रचंड धंदा हिंदी चित्रपटांवर अवलंबून असतो. जरी पाकिस्तानची लोकसंख्या १७ कोटी असली तरी हिंदी-चित्रपटांचे मार्केट प्रचंड आहे. बॉलीवूडचे निर्माते-दिग्दर्शक-नटनटय़ा यांना या मार्केटचा पूर्ण अंदाज आहे. त्या मार्केटचा विचार करून आता बॉलीवूडवाले चित्रपट बनवतात. त्यामुळे पाकिस्तानी प्रेक्षकांच्या भावना शक्यतो न दुखावता चित्रपट काढले जातात. कारगिलनंतर बॉलीवूडमध्ये पाकिस्तानविरोधी चित्रपटांची एकच लाट आली होती. त्या वेळेस पाकिस्तानमध्ये हिंदी चित्रपटांवर बंदी घातली गेली. साहजिकच थिएटरवाले, डिस्ट्रिब्युटर्स यांचे खूप नुकसान झाले. पुढे काही वर्षांनी ती बंदी उठली. परंतु कारगिल (१९९९), त्यानंतर संसदेवरचा हल्ला (२००१), युद्धसदृश स्थिती (२००२) या काळात बंदी असल्यामुळे आणि त्याच काळात भारतातील टी. व्ही. चॅनल्सवरही बंदी घातली गेल्यामुळे पाकिस्तानी प्रेक्षकवर्गाची अक्षरश: सांस्कृतिक ‘उपासमार’ झाली होती. शिवाय १९९९ च्या पूर्वी सीडी-डीव्हीडी इतक्या प्रमाणात व इतक्या स्वस्तात (ओरिजिनल वा पायरेटेड) उपलब्ध नव्हत्या. पुढे २००३ नंतर भाजपच्या वाजपेयी सरकारने चर्चा, बसयात्रा, क्रिकेट सामने पुन्हा सुरू केले आणि हिंदी चित्रपट व चॅनेल्स पाकिस्तानात दिसू लागले. पाकिस्तानमध्ये वाजपेयी, अडवाणी, जसवंतसिंग यांना बरीच लोकप्रियता आहे. त्यापैकी अडवाणी, जसवंतसिंग यांना जीनांवरील वक्तव्यांमुळे आणि वाजपेयींना त्यांनी घेतलेल्या मैत्रीसंबंधाच्या पुढाकारामुळे. डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दलही आदराची भावना आहे. त्यांनी बलुचिस्तानबाबत जो खुलेपणा दाखविला, त्यामुळे तो आदर दुणावला आहे.

राजीव गांधी पंतप्रधान असताना ‘सार्क’ची परिषद लाहोरला झाली होती. बेनझीर भुत्तो पंतप्रधान होत्या. तेव्हा सोनिया गांधीसुद्धा राजीवबरोबर पाकिस्तानात गेल्या होत्या. राजीव-बेनझीर संवादाला कौटुंबिक ट्रॅजेडीची झालर होती. राजीवच्या आईची- इंदिरा गांधींची हत्या झाली होती. बेनझीरच्या वडिलांना- झुल्फिकार अली भुत्तोंना पाकिस्तानच्या लष्करी राजवटीने फाशी दिले होते. त्यावेळचे लष्करशहा झिया उल हक यांच्याबद्दल पाकिस्तानात जराही आत्मीयता नाही. जनरल मुशर्रफ यांच्याबद्दलही नाही. पण त्यांच्या कारकीर्दीत लष्करी राजवट असूनही शेवटच्या काही वर्षांत वृत्तपत्रस्वातंत्र्य होते आणि वर म्हटल्याप्रमाणे हिंदी चित्रपट व चॅनेल्स उपलब्ध झाले. त्यामुळेच पाकिस्तानी जनतेला वाटले, की ‘२६/११’ नंतर संबंध इतके बिघडतील, की बॉलीवूडवर पुन्हा बंदी येईल! सुदैवाने बंदी तर आली नाहीच, शिवाय कोणत्याही चित्रपटात पाकिस्तानविरोध वा मुस्लीमद्वेष दिसला नाही. भारतातले समीक्षक ज्या बॉलीवूड चित्रपटांना अतिशय कडक टीका करून झोडून काढतात, तेही तिकडे लोकप्रिय असतात. मग चित्रपट कोणताही असो- ‘लगान’, ‘स्वदेश’, ‘जोधा-अकबर’, ‘फना’, ‘बंटी-बबली’, ‘तारें जमीं पर’ वा ‘थ्री इडियट्स्’. फक्त शाहरुख, अमीर वा सलमान हे मुस्लीम नटच नव्हेत, तर अमिताभ, प्रियांका, ऐश्वर्या, अजय देवगण हे हिंदू नटही प्रचंड लोकप्रिय आहेत. लता-आशाच्या आवाजाचा करिश्मा अजूनही तितकाच आहे. आणि चित्रपटांमधील सर्व सामूहिक नृत्येही त्यांना आवडतात. पाटर्य़ामध्ये तेच डान्स केले जातात.

हे बॉलीवूडप्रेम फक्त पाकिस्तानपुरते मर्यादित नाही, तर भूतानमध्येही तितकेच आहे. भूतानची लोकसंख्या सात लाखांहूनही कमी. म्हणजे मुंबईच्या एखाद्या गजबजलेल्या उपनगरातही भूतानपेक्षा अधिक लोक राहतात. बहुतांश वस्ती हिमालयाच्या परिसरातील पर्वतरांगात आहे. भूतानला सुमारे ७५ टक्के ‘फॉरेस्ट कव्हर’ म्हणजे जंगलाच्छादित प्रदेश आहे. कारखाने जवळजवळ नाहीतच. शेती (भातशेती) हा मुख्य व्यवसाय. त्या शेतीतही वैविध्य नाही. त्यामुळे भाजीपाला भारतातून येतो, तर कांदे महाराष्ट्रातून! राजधानी थिंपू सोडली तर ‘शहरे’ नाहीतच. त्या थिंपूला विमानतळ नाही. विमानतळ आहे पॅरो नावाच्या एका निमशहरी भागात. पॅरो ते थिंपू रस्ता घाटातून वळणे घेत जातो. भूतानला विमानाने येणाऱ्यांना पॅरो विमानतळावर उतरावे लागते.

देश आकाराने लहान असला तरी पर्वतरांगा, जंगलखेडी आणि दूर दूर ठिकाणी असलेल्या वस्त्या, त्यांना जोडणारे रस्ते फारच कमी. त्यामुळे थिंपू या राजधानीत नोकरीला व राहायला असलेल्या माणसाला त्याच्या ‘गावी’ जायचे असेल, तर दोन ते पाच दिवस लागतात. गावात तशी गरिबीच; पण जीवन शांत-निवांत. बऱ्याच अंशी समाधानी. मात्र हे समाधान तसे रिकामटेकडेपणाचे. कारण नोकऱ्या फार नाहीतच. जवळजवळ सर्व वस्तू भारतातून, चीनमधून वा बांगलादेशातून येतात.. प्लास्टिकच्या बादल्यांपासून ते मोबाईल फोन्सपर्यंत. देशात सात लाख लोक आहेत; पण जवळजवळ एक लाख मोबाइल फोन्स या वर्षअखेरीपर्यंत असतील. म्हणजे दर सात माणसांमागे एक मोबाइल. सगळी जंगले व खेडी मोबाइलने जोडली गेलेली नाहीत, कारण सर्वत्र ‘रेंज’ पुरविण्याइतके ‘टॉवर्स’ नाहीत. वीजपुरवठय़ाची स्थिती मात्र महाराष्ट्रापेक्षा खूपच चांगली आहे. वीज खंडित व्हायचा प्रश्न नाही. अगदी दूर जंगलात वा उंच पर्वतांवर राहणाऱ्यांनाा वीज मिळत नाही, पण तिकडे फारशी गरजही त्यांना भासत नसावी. बहुतेकसे लोक चालतच प्रवास करतात, कारण डोंगराळलेल्या भागात रस्ते काढणेही अशक्य. जवळच्या ‘शहरी’ भागातून आपल्या ‘गावी’ जायला चार-सहा तास लागणे हे स्वाभाविक मानले जाते- पूर्वीच्या कोकणसारखे. (आजही आपल्या कोकणात तशी गावे आहेतच म्हणा!) भूतानमध्ये शाळांची संख्या तुलनेने चांगली आहे. त्यामुळे शेती आणि शिक्षण हे दोन व्यवसाय. याव्यतिरिक्त हस्तकला, हातमाग, छोटे विजेवर चालणारे माग आणि छोटे-मोठे फर्निचर हे छोटे व्यवसाय चालतात.

भूतानमध्ये विजेचा तुटवडा नसला, तरी जंगलखेडी व पर्वतरांगांमध्ये सिनेमागृहे असण्याचा फारसा प्रश्न नाही. थिंपू या राजधानीत तीन-चार, पॅरोमध्ये एक-दोन व आणखी चार-पाच ठिकाणी अशी एकूण भूतानमध्ये १२-१५ थिएटर्स आहेत. गावातील लोक दूर सिनेमा बघायला जाऊ शकत नाहीत, पण जवळजवळ प्रत्येक गावात डीव्हीडी बघण्याची सोय असावी. कारण भूतानमधल्या प्रत्येक तरुण-तरुणी वा वयस्क व्यक्तीला हिंदी चित्रपटांची इत्थंभूत माहिती होती. आम्हा सर्व प्रतिनिधींच्या पाटर्य़ाचे ‘डीजे’ भूतानचेच होते आणि ते नेमकी गाणी लावत असत.

तसे पाहिले तर भूतानचे जीवन इतके शांत-निवांत आणि सुशेगात शैलीचे आहे, की तेथे अशा पाटर्य़ा, गेट-टुगेदर वगैरे फारसे काही होत नसते. अधूनमधून ‘सार्क’ किंवा तत्सम कुठच्या तरी (पण फारच कमी) परिषदा झाल्या, तरच नाच-गाण्यांचे प्रसंग येतात. खुद्द भूतानमध्ये त्यांची पारंपरिक नाच-गाणी म्हणजे भारतातील मिझोराम, नागालॅण्ड, मेघालय या भागांत जी लोककला प्रचलित आहे, तशाच प्रकारची. बहुतेक लोकांना व्यवहारात बोलता येण्याइतके इंग्रजी व हिंदी येते. लोकांना हिंदी येण्याचे मुख्य कारण अर्थातच बॉलीवूड. त्यांच्या लोकनृत्यावर व समूहगाण्यांवर मात्र बॉलीवूडचा तसा संस्कार नाही, वेशभूषा वा जीवनशैलीवरही नाही; परंतु एकूण भूतानवर भारताचा प्रभाव मात्र सर्वत्र जाणवतो.

भूतानचे चीनशी असलेले संबंध जरासे तणावाचे आहेत. एकेकाळी भूतान-तिबेट-सिक्कीम-लडाख हा सर्व प्रदेश ‘हिमालयन किंगडम’ म्हणूनच ओळखला जात असे. आता तिबेट हा चीनचा प्रदेश म्हणून जगाने मान्यता दिली आहे. सिक्कीम हे भारताच्या संघराज्याचा भाग आहे. भूतान स्वतंत्र देश (राजेशाही असूनही अलीकडे लोकशाही पद्धत स्वीकारलेला) आणि लडाख हा भारताचा भाग असूनही जम्मू-काश्मीर या वादग्रस्त भागाशी जोडलेला आहे. जगातले हजारो ‘ट्रेकर्स’ या ‘हिमालयन किंगडम’मधील पर्वतांमध्ये, जंगलांमध्ये, बर्फाळलेल्या प्रदेशांमध्ये येत असतात. ट्रेकर्स हेच मुख्य टुरिस्ट्स्! नाहीतर भूतानला पर्यटक संस्कृती फारशी पसंत नाही. युरोप-अमेरिका-जपानमधील श्रीमंत लोक पर्यटक म्हणून येतात, पण जरा श्रीमंत थरातील. भारतीयांना भूतानला जाणे सोपे असले, तरी चांगल्या हॉटेलमध्ये राहणे तसे महागच. इतके विलक्षण निसर्गसौंदर्य, शांत प्रदेश, ‘मोनास्ट्रीज्’ असूनही भूतान देश ‘टुरिस्ट फ्रेण्डली’ नाही.

भूतानच्या राजाने त्यांच्या देशाला एक दृष्टिकोन आणि दिशा दिली आहे. त्यांच्या पंतप्रधानांनी, म्हणजे जिग्मी थिनले यांनी भूतानचे ‘व्हिजन स्टेटमेण्ट’ अतिशय ओजस्वीपण सांगितले आहे. त्यानुसार राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय ठोकळ उत्पन्न, राष्ट्रीय संपत्ती, लोकांची ऐहिक श्रीमंती यापेक्षा ‘राष्ट्रीय समाधान’ अधिक महत्त्वाचे आहे. ‘सुख’ आणि ‘समाधान’ त्याचप्रमाणे ‘भोग’ आणि ‘आनंद’ या वेगवेगळ्या बाबी आहेत. प्रचंड संपत्ती असलेली व्यक्ती समाधानी असेलच असे नाही. याचा अर्थ गरिबी वा दारिद्रय़ाचे उदात्तीकरण करायला हवे असेही नाही. विकास हवाच, पण भोगाची वखवख म्हणजे सुख नव्हे. म्हणूनच ‘ग्रॉस नॅशनल प्रॉडक्ट’ ऊर्फ ‘जीएनपी’पेक्षा ‘ग्रॉस नॅशनल हॅपीनेस’ ऊर्फ ‘जीएनएच’ अधिक महत्त्वाचे मानले जाते. (याच अंकातील ‘लोकमुद्रा’ पानावर पंतप्रधान थिनले यांचे भाषण वाचण्यासारखे आहे.) मुद्दा हा की, भूतानचे उद्दिष्ट ‘समृद्ध’ होणे, हे नसून जनतेने ‘समाधानी’ जीवन जगणे- हे आहे. हे उद्दिष्ट आध्यात्मिक वाटेल असे आहे, पण लोकांना मात्र आता समाधानाबरोबर ऐहिक सुख हवे असल्याची लक्षणे दिसू लाागली आहेत. भूतानच्या पंतप्रधानांनी ‘सार्क’मधील देशांनाही ऐहिकतेपेक्षा समाधानी समाज निर्माण करण्याचे ध्येय ठेवण्याचे आवाहन केले आहे. ‘बॉलीवूड’चा संदेश वेगळा आहे हे खरे, पण कुणी सांगावे, भूतानी समाज ऐहिक सुख व समाधान यांचा वेगळाच समन्वय साधू शकेलही!
 
कुमार केतकर ,
रविवार, ९ मे २०१०