एक चेहरे पे कई चेहरे (त्रिकालवेध)

आपण कसे आहोत, यापेक्षा आपण कसे दिसतो याचीच चिंता बहुतेकांना असते. म्हणजेच आपण कसे असावे यापेक्षा आपण कसे दिसावे याचा विचार अधिक केला जातो. हे ‘दिसणे’ म्हणजे केवळ चेहरा नव्हे, किंवा नुसते शारीरिक दिसणे नव्हे. त्यासाठी सौंदर्यप्रसाधने आहेत, ब्युटी पार्लर्स आहेत, जिम आहेत, फॅशन डिझायनर्स, फॅशन्स आणि कॉश्च्युम डिझायनर्स आहेत. ज्यांना हे ‘हायटेक’ परवडत नाही त्यांना सहज उपलब्ध असलेली क्रीम्स, लोशन्स, टाल्क वगैरे आहेत.
आपल्या समाजातील किमान ३०-३५ टक्के स्त्री- पुरुषांना/ मुला- मुलींना ते ‘दिसणे’ही परवडत नाही। तरीही समाजाच्या कोणत्याही वर्गात आपण कसे आहोत, त्यापेक्षा आपण कसे दिसावे याबद्दलच जास्त विचार होत असल्यामुळे कॉस्मेटिक्स, परफ्यूम्स, फॅशन्स या उद्योगावर आर्थिक मंदीचा फारसा परिणाम झालेला नाही. ग्राहकांच्या संख्येत- विशेषत: दाग-दागिने (खरे वा खोटे) खरेदी करणाऱ्यांची संख्याही तितकी कमी झालेली नाही. सोन्या-चांदीचे भाव मंदीच्या काळातही वाढतच होते. फक्त श्रीमंत लोकच सोने खरेदी करतात असे नाही. मध्यमवर्गीय आणि गरिबांमध्येही सोने-चांदी खरेदी करण्याची ओढ आणि आस असतेच. सोने जसा आर्थिक आधाराचा भास देते, तसेच दागिन्यांमुळे ‘दिसण्या’चाही भास देते. मार्शल मॅक्युहान या मीडिया पंडिताने म्हटले होते की आरसा नसता तर सौंदर्यप्रसाधने निर्माणच झाली नसती! आरशात पाहून आपण कसे दिसतो हे लक्षात आल्यावर आपण कसे दिसावे हे वाटू लागले आणि ‘कॉस्मेटिक्स’ जन्माला आली. परंतु येथे आरसा हे रूपक आहे. आपाल खरा स्वभाव आणि ‘पर्सनॅलिटी’ स्वत:पाशी ठेवून लोकांमध्ये आपली प्रतिमा व व्यक्तिमत्त्व कसे दिसावे याचा प्रयत्न म्हणजे ‘पर्सनॅलिटी मेकओव्हर’!बाह्य़ सौंदर्याला जसजसे महत्त्व प्राप्त होत गेले, तसतसे भांडवलशाहीतील ‘अनावश्यक’ वस्तूंचे ‘फॅड’ही वाढत गेले. आपल्या वेशभूषेवरून, चेहऱ्यावरून, वागण्यावरून म्हणजेच आपण कसे दिसतो यावरून लोकांनी आपल्याबद्दलचे मत ठरवावे असे जेव्हा लोकांना वाटू लागले तेव्हा भांडवलशाहीचा विस्तार झपाटय़ाने होऊ लागला.अगदी निखळ जीवनावश्यक गोष्टीच आपण वापरल्या/ खरेदी केल्या असत्या तर बाजारपेठेचा विस्तार झाला नसता आणि त्याबरोबर आलेली नवी ‘दिसण्या’ची मूल्येही निर्माण झाली नसती. जगातली सुमारे ४० टक्के माणसे अर्धपोटी, निकृष्ट, दरिद्री जीवन जगत असताना या ‘अनावश्यक’ गोष्टींचे म्हणजे ‘दिसण्या’चे इतके स्तोम कशाला, असा प्रश्न विचारता येईल. परंतु त्याला भांडवली अर्थव्यवस्था चालविणाऱ्यांचे उत्तर असे आहे की, कंदमुळे, वल्कले, पर्णकुटी अशी जीवनशैली सर्वानीच अंगीकारली तर सर्व अर्थचक्रच कोसळून पडेल. जसजसे ‘सिव्हिलायझेशन’ प्रगत आणि प्रगल्भ होत जाते, तसतसे आवश्यक काय आणि अनावश्यक काय, साधी राहणी म्हणजे काय आणि चांगले व चैनीत राहणे म्हणजे काय यांच्या व्याख्या बदलतात. संदर्भ बदलतात. सुख-समाधानाच्या अपेक्षा बदलतात. माणसांचे नातेसंबंध आणि त्या अनुषंगाने स्वभाव बदलतात. म्हणजेच संस्कृतीच्या उत्क्रांतीचे निकष व टप्पेही बदलतात.टोळीजीवन जगणाऱ्यांपैकी प्रत्येकाला स्वत:चे वेगळेपण जपण्याची तितकी गरज वाटत नाही. एका मर्यादेपलीकडे ‘खासगी’ जीवन असे त्याला नसतेच. आपण जसे आहोत त्यापेक्षा आपण कसे दिसलो पाहिजे याची चिंता त्याला नसते. टोळीतही विविध स्वभाव- प्रकृती असतात पण त्यांचे आविष्कारही तसे मर्यादितच असतात. गरजा कमी, त्यामुळे (सक्तीची) साधी राहणी. (परंतु राहणी साधी असली की आपोआप विचारसरणी उच्च होते असे नाही. काही प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांची राहणी साधी असते पण त्यांची विचारसरणीही साधीच असते! परंतु प्रचलित भांडवली- बाजारपेठीय व्यवस्थेतही आपली राहणी साधी आहे याचाच एक नैतिक अहंकार ते धारण करतात. चंगळवाद्यांची बेदरकारी जशी घातक असते, तशीच ही साधेपणाची आत्मनिष्ठ नैतिकताही घातक होऊ शकते. असो.)टोळीजीवनातून शेती व्यवस्थेकडे, त्यातून प्राथमिक उद्योजकतेकडे, त्यानंतर औद्योगिक क्रांतीकडे असा ‘सिव्हिलायझेशन’चा प्रवास सुरू झाला आणि त्यातूनच भांडवलशाही विस्तारत गेली आणि नवीन समाजव्यवस्थाही निर्माण होत गेली. विकास आणि विषमता, साहित्य- कला आणि सांस्कृतिक स्थितिशीलता, श्रीमंती आणि गरिबी, प्रस्थापित आणि सामान्य, ‘स्टेटस’ असलेले आणि ‘स्टेटस’ नसलेले असे विविध प्रकारचे भेदभाव आणि नवे ‘वर्ग’ निर्माण झाले.‘स्टेटस’ म्हणजे प्रतिष्ठा असणाऱ्यांमध्येही एक वेगळा ‘एलाइट’ स्तर तयार झाला. सर्व प्रतिष्ठित ‘एलाइट’ असतीलच असे नाही. कारण ‘स्टेटस’चे जे निकष होते वा आहेत त्यापेक्षा ‘एलाइट’ असण्याचे निकष वेगळे आहेत. समाजातील हे स्तर वर्गव्यवस्थेच्या (आणि जातिव्यवस्थेच्या) अंतर्गत असले तरी प्रतिष्ठित प्रस्थापित वर्गातच एक स्टेटस व एलाइटची नवीन उतरंड तयार झाली. विशेष म्हणजे ही प्रक्रिया जगातील सर्व समाजांमध्ये झाली. प्रत्येक समाजातील प्रक्रियेचे आणि त्यातून प्रकटणाऱ्या प्रतिष्ठेचे स्वरूप मात्र भिन्न होते.टोळी अवस्थेत ‘स्टेटस’ वा ‘एलाइट’ स्तर असण्याचा प्रश्नच नव्हता. टोळीप्रमुखाकडे अधिकार व सत्ता असली तरी तो राज्यकर्ता वा सत्ताधारी नव्हता. टोळीव्यवस्थेतील अर्थकारण बऱ्याच अंशी भटक्या व विमुक्त जीवनपद्धतीवर आधारलेले होते. टोळ्यांमध्ये नेतृत्व असे, पण प्रतिष्ठेच्या संकल्पना नव्हत्या. त्या जीवनपद्धतीतून शेतीव्यवस्थेकडे समाज आल्यावर जगण्याला स्थिरता प्राप्त होऊ लागली. कुटुंबव्यवस्था निर्माण होऊ लागली. कुटुंबसंस्था आणि शासनसंस्था तयार झाल्या आणि एका अर्थाने तेव्हापासून सरंजामशाही-भांडवलशाही व सिव्हिलायझेशनचा प्रवास सुरू झाला. टोळी अवस्थेतील ‘समानता’ संपली आणि समाजात उच्च-नीचतेची उतरंड निर्माण होऊ लागली. साहजिकच त्याबरोबर आले प्रतिष्ठा-अप्रतिष्ठेचे निकष. एकदा ती समानता संपल्यावर बऱ्याच जणांना समाजातल्या वरच्या, प्रतिष्ठेच्या स्तरावर जावेसे वाटू लागले. परंतु तसे वरच्या स्तरावर जाणे सोपे नव्हते. भारतात तर अधिकच कठीण होते. जन्माने दलित असलेल्यांना ब्राह्मण होणे अशक्य होते. राजघराण्यात जन्माला न आलेल्यांना राजेशाहीच्या आसपास फिरणेही शक्य नव्हते. पूर्वी तर गरिबीची सीमारेषा ओलांडून मध्यमवर्गात वा मध्यमवर्गाची मर्यादा ओलांडून श्रीमंत वर्गात जाणेही शक्य नव्हते. शिवाय श्रीमंतीमुळे राजघराण्यात सन्मान मिळू शकेल, पण सत्तेची सूत्रे नाहीत. जसे विद्वत्तेच्या वा व्यासंगाच्या जोरावर राजदरबारी प्रतिष्ठा मिळू शकेल, पण प्रत्यक्ष सत्ता नाही. भारतीय समाजातील उतरंडीला जात, अर्थस्थिती, शिक्षण, परिसर असे अनेक अडथळे होते. प्रत्येक टप्प्यावर पुढे राहायचे व जायचे असेल तर आपण कसे आहोत त्यापेक्षा आपण कसे दिसलो पाहिजे याला महत्त्व प्राप्त होऊ लागले. पुढच्या पायरीवर मान्यता मिळवायची तर त्या पायरीवरची जीवनशैली हवी. म्हणजे तसे ‘नेटवर्क’ हवे, तसे पैसे हवेत, तसे संदर्भ हवेत. साहजिकच तशा महत्त्वाकांक्षी माणसांना आपले तसे ‘स्टेटस’ असावे असे वाटू लागले. सरंजामशाही समाजव्यवस्थेत आपली ‘जन्मजात’ मर्यादा उल्लंघून जाणे जवळजवळ अशक्य होते. परंतु भांडवलशाही व्यवस्थेत त्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. प्रत्येकाने आपली ‘पायरी ओळखून वागायला हवे’ हा स्थितिवादी विचार बाजारपेठीय भांडवली अर्थव्यवस्थेने दूर केला. एखादी व्यक्ती ‘रॅग्ज टू रिचेस’ म्हणजे दारिद्रय़ातून श्रीमंतीपर्यंत पोहोचू शकते हे भांडवलशाहीत शक्य होते; सरंजामशाहीत वा राजेशाहीत नाही. म्हणूनच सामान्य लोकांनी समाजाच्या आर्थिक उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात भांडवलशाहीचे स्वागत केले. खुद्द कार्ल मार्क्‍स यांनीच म्हटले आहे की, केवळ अर्थव्यवस्थाच नव्हे तर सरंजामशाहीत माणसाचे कुचंबलेले जीवनही भांडवलशाहीमुळे मुक्त व्हायला मदत केली. भांडवलशाहीत ‘स्टेटस’ आणि ‘एलाइट’ यांचे नवे संदर्भ तयार झाले.वस्तुत: ‘स्टेट्स’ वा ‘एलाइट’ हा स्तर तसा काल्पनिक आहे. कारण तो पैशाने, पदाने, सौंदर्याने, शरीरयष्टीने प्राप्त करता येत नाही. तो आपल्या मनात असतो आणि आपल्या मनातील तो दर्जा इतरांनीही मान्य करावा व आपल्याला तो मान द्यावा असे अशा ‘स्टेटस सीकर्स’ना वाटत असते. व्हॅन्स पॅकार्ड या अमेरिकेतील मार्केटिंग व अ‍ॅडव्हर्टायझिंग गुरूने या सुप्त आकांक्षांच्या आधारे एक जाहिरातशास्त्रच तयार केले. त्याच्या संबंधित ग्रंथाचे नावच ‘द स्टेटस सीकर्स’ असे आहे.त्याचा सिद्धांत थोडक्यात असा : प्रत्येक व्यक्तीची स्वत:बद्दलची एक प्रतिमा असते-सेल्फ इमेज! परंतु त्याला समाजात स्वत:बद्दलची वेगळी व वरच्या स्तरावरची प्रतिमा हवी असते. जर समाजाने त्याची ती ‘प्रोजेक्टेड इमेज’ मान्य केली तर ती व्यक्ती पुढच्या पायरीवर जाते. परंतु मुळात ‘सेल्फ इमेज’ ऊर्फ स्वत:ची प्रतिमा आपल्याच मनाशी अवास्तव असेल तर, त्याच्यापुढे ‘प्रोजेक्टेड इमेज’ जाते. त्यामुळे आपले वास्तवातले व्यक्तिमत्त्व आणि आपण धारण केलेले, म्हणजे ‘प्रोजेक्टेड’ व्यक्तिमत्त्व यात एक पोकळी तयार होते. या पोकळीत ‘स्किझोफ्रेनिया’ची सुरुवात होते.आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला अशी माणसे पाहतो की, जी मोठमोठय़ा माणसांची- मंत्र्यांची, उद्योगपतींची, नोकरशहांची, लेखक-संपादकांची इत्यादी नावे ‘सहजपणे’ संवादात आणतात. त्यामुळे ऐकणाऱ्यांना त्या व्यक्तीविषयी आदर (वा भीती) वाटू लागते. हा माणूस इतका ‘नेटवर्क’ असलेला आहे तर त्याचा आपल्याला उपयोग तरी होईल किंवा त्याच्यापासून ‘सांभाळून’ राहिले पाहिजे असे तेथे हजर असणाऱ्यांना वाटते. नेमका हाच परिणाम त्या व्यक्तीला साधायचा असतो आणि त्यात तो यशस्वी होतो. परंतु ही चलाखी फार काळ चालत नाही. (कारण हल्ली समाजातली बरीच माणसे इतकी चाणाक्ष झाली आहेत की दुसऱ्याची चलाखी ती लगेच ओळखतात. मग ती स्वयंभू चलाख माणसे चेष्टेचा विषय बनतात.) जेव्हा आपली ‘प्रोजेक्टेड इमेज’ हीच आपली खरी प्रतिमा आहे असे त्या व्यक्तीला वाटू लागते तेव्हा त्याला आपण मनोरुग्ण म्हणू लागतो. मग त्याला ‘फॅन्टसीज्’ने झपाटले आहे असे आपण म्हणतो. मग ती व्यक्ती चेष्टेचा नव्हे तर करुणेचा विषय ठरते. म्हणजेच आपल्याला स्वत:च्या क्षमतांचे आणि मर्यादांचे नेमके भान नसेल तर या दोन प्रतिमांमध्ये निर्माण होणाऱ्या दरीत आपण कोसळण्याची शक्यता असते. कित्येकदा स्वत:बद्दलची प्रतिमा (वा मापन) हे कमीही असू शकते. म्हणजे क्षमता जास्त पण आत्मप्रतिमा लहान. त्यामुळे आत्मविश्वास कमी. त्यातून कधी ‘इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स’ निर्माण होतो तर कधी इतर ‘यशस्वी’ माणसांबद्दल असूया. आपल्यापेक्षा कमी क्षमतेची माणसे इतक्या वर गेली म्हणून त्यांच्याबद्दल मत्सर किंवा आत्मकरुणा- सेल्फपिटी!अनेक माणसे स्वत:बद्दलच्या चुकीच्या प्रतिमांमुळे ‘मूडी’, ‘नव्‍‌र्हस’, ‘डिप्रेस्ड’ असतात. त्यांच्या उदासीनतेचा आणि मानसिक अशांततेचा अर्थ त्यांना लागत नाही आणि त्यांच्या मित्रपरिवारातील वा कुटुंबातील कुणालाही लागत नाही. मग कधीही ती एकदम आजारी पडतात आणि डॉक्टरलाही नक्की निदान करता येत नाही. क्वचित, अपवादात्मक प्रसंगात ते आत्महत्याही करतात.अ‍ॅलन बॉटन या प्रसिद्ध लेखकाने ‘द स्टेटस अँक्झायटी’ नावाचे एक पुस्तक लिहिले ते याच दृष्टिकोनातून. लोकांनी जर प्रामाणिक आत्मशोध घेतला आणि खरोखरच दिलखुलासपणे ते समाजात वावरले तर अध्र्याहून अधिक मनोविकार दूर होतील असे त्याचे म्हणणे आहे. परंतु तोच तर प्रश्न आहे- आत्मशोध करणारा मी आणि ज्याचा शोध घ्यायचा तोही मीच! म्हणजे मीच माझा शोध घेणार! शिवाय ‘मी’ हा एक आहे की माझ्यात ‘अनेक मी’ दडले आहेत? आज जगात सुरू असलेले ‘पर्सनॅलिटी एक्स्पेरिमेन्ट्स’, व्यक्तिमत्त्व विश्लेषणांचे प्रयोग, या प्रश्नाचा शोध घेत आहेत.
कुमार केतकर

भन्नाट भोवऱ्यात भारत (लोकरंग)

भव या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस, भाजपा तसेच तिसऱ्या आघाडीतील छोटे-मोठे पक्ष यांच्या आघाडय़ांची सतत मोडतोड होत आहे. निवडणुकीनंतर तर या प्रक्रियेला आणखीनच वेग प्राप्त होणार आहे. देश एका भन्नाट भोवऱ्यात सापडणार आहे. संख्याबळाची उलटसुलट गणितं जुळवूनही कुठल्याही पक्षाला सरकार स्थापन करणे अशक्य आहे. जरी स्वार्थी जुळवाजुळवीतून एखादं कडबोळं सरकार बनलं तरी ते फार काळ टिकणार नाही। तेव्हा अशा प्रकारच्या संपूर्ण मोडतोडीतूनच कदाचित पुढच्या काळात स्थिर सरकार येऊ शकेल अशी शक्यता दिसते। अाणखी महिन्याभरानंतर भारताचे राजकारण एका भन्नाट भोवऱ्यात सापडणार आहे। हे भाकित करण्यासाठी आकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीकडे पाहण्याची गरज नाही. कारण आपल्या देशाच्या राजकारणात वाहणाऱ्या अंत:प्रवाहांनी आता चक्रीवादळी रूप धारण केले आहे. निवडणूक काळात भासणारी वरवरची शांतता ही त्या वादळापूर्वीची आहे.सर्वसाधारणपणे वादळाची॥ झंझावाताची सूचना हवामान खात्याकडून जेव्हा मिळते, तेव्हा त्या सूचनेचा उद्देश लोकांनी त्याकरता आपली मानसिक तयारी करून, शक्यतो ज्या गोष्टींच्या सुरक्षेची काळजी घेता येईल, त्याची घ्यावी, असा इशारा देण्यासाठी ती केलेली असते. या लेखाचा उद्देशही तोच आहे.याच स्तंभातून आम्ही ‘अराजकाचे पर्व’ आणि ‘काऊंटडाऊन’, तसेच ‘स्फोटक स्थितीतील भारतीय उपखंड’ या विषयांवरचे लोकांना ‘सावध’ करणारे लेख गेल्या वर्षभरात प्रसिद्ध केले आहेत. दुर्दैवाने त्यातील बहुतेक ‘भाकिते’ खरी ठरली. वस्तुत: ती ‘भाकिते’ नव्हती, तर धोकादायक शक्यता वर्तविलेल्या होत्या! चिनी भाषेत एक म्हण आहे- ‘जे जे विपरित घडू शकते, ते प्रत्यक्षातही घडतेच!’ तसे पाहिले तर ही म्हण नियतीवादी आणि निराशावादीही आहे. परंतु या म्हणीच्या अनुषंगानेच आणखीही एक सुविचारसदृश चिनी संकल्पना आहे. ती अशी- ‘जे मोडकळीला आले आहे, ते पूर्णपणे मोडल्याशिवाय नवी उभारणी करता येत नाही.’ (विनाशातच नवनिर्मितीची बीजे असतात- ही विश्वमान्य संकल्पना त्यातूनच आली असावी.) अर्थातच या ठिकाणी आपण ‘विनाशा’चा विचार करीत नसून, मोडकळीला आलेली इमारत पाडून त्याच जागी अधिक ‘एफएसआय’ वापरून नवीन बिल्डिंग बांधण्याचा विचार करीत आहोत. हे राजकीय बांधकाम आहे. ते बांधकाम करण्याची संधी या भन्नाट राजकीय भोवऱ्यामुळे आपल्याला मिळणार आहे.लोकसभा निवडणुकीचे निकाल १६ मे रोजी जाहीर होतील. त्या रात्रीच सर्व राजकीय पक्षांची नेते मंडळी, बडे उद्योगपती, घटनातज्ज्ञ, स्वयंसिद्ध शहाणे भाष्यकार, पत्रकार आणि वाचाळ चॅनलवाले निकालांचे आकडे घेऊन बसतील आणि त्या आकडय़ांमधून एक सरकार तयार करण्याचा प्रयत्न सुरू करतील. परंतु ही प्रक्रिया वाटते तेवढी सोपी नाही.मात्र, सरकार तर तयार करावे लागेलच. उशिरात उशिरा एक जूनपर्यंत पंतप्रधान, तसेच इतर मंत्रिमंडळ निश्चित करावेच लागेल. म्हणजे त्याअगोदर कोणकोणत्या पक्षांची आघाडी होऊ शकेल, हे निश्चित करावे लागेल. या आघाडय़ा ठरविताना काही पुढाऱ्यांचे ‘महा-इगो’ ऊर्फ अवास्तव ‘अहं’ जसे आड येतील, तसेच काहींचे पूर्वग्रहही अडचणी निर्माण करतील. विचारसरणी हा निकष आता केवळ शहाजोगपणापुरता शिल्लक राहिलेला आहे. जाहीरनामे फक्त देखाव्यासाठी आणि धोरण वा कार्यक्रम फक्त चॅनल्सवरच्या चर्चेपुरतेच उरले आहेत.उदाहरणार्थ- डाव्या आघाडीने, म्हणजे दोन्ही कम्युनिस्ट पक्षांनी सूचित केले आहे की, शरद पवारांना ते पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देऊ शकतील. कदाचित प्रणव मुखर्जीचाही विचार करू शकतील. परंतु डॉ. मनमोहन सिंग मात्र पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांना चालणार नाहीत! कारण? भारत-अमेरिका अणुकरार हा डॉ. मनमोहन सिंग यांचा एककलमी कार्यक्रम होता!कम्युनिस्टांचे हे निरुपण तद्दन खोटारडे आहे. कारण त्या कराराचे सर्व पूजापाठ प्रणव मुखर्जी यांनीच लोकसभेत केले होते. त्याच मंत्रिमंडळात शरद पवारही होते. पवारही कराराचे (आणि अमेरिकेबरोबरच्या ‘स्ट्रॅटेजिक अलायन्स’चे) कट्टर समर्थक आहेत. शीतयुद्ध टोकाला गेले असताना (१९७३-१९८६) शरद पवार हे काँग्रेसअंतर्गत राजकारणात पक्के अमेरिकावादी म्हणून ओळखले जात. त्यापैकी आठ वर्षे (१९७८-८६) पवार हे काँग्रेसविरोधी आघाडीत असले तरी त्यांची ‘पुलोद’ ही ‘अ‍ॅन्टी-सोव्हिएत’ आणि ‘प्रो-अमेरिकन’ म्हणूनच ओळखली जात असे. ‘पुलोद’वर समाजवाद्यांची पकड होती आणि हे समाजवादी कट्टर अ‍ॅन्टी-कम्युनिस्ट होते. अशा अ‍ॅन्टी-कम्युनिस्ट आघाडीचे हे नेते आज कम्युनिस्टांना मात्र एकदम ‘भाई’ वाटू लागले आहेत.तीच गोष्ट मायावतींची. सुमारे चार महिन्यांपूर्वी कॉम्रेड वर्धन यांनी टीव्ही चॅनल्सवर तावातावाने सांगितले की, त्यांच्या आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार या मायावती असतील! ‘मायावतींनी पूर्वी भाजपबरोबर राजकीय संसार थाटला होता व त्या नरेंद्र मोदींच्या प्रचारासाठी गुजरातमध्ये अहमहमिकेने उतरल्या होत्या,’ याचे स्मरण करून दिल्यावर वर्धन हडबडले आणि चिडचिडले. ‘हा तुमचा प्रश्न ब्राह्मणी औद्धत्यातून आलेला आहे. तुम्हाला दलित स्त्री पंतप्रधान चालत नाही, कारण सवर्णाची अरेरावी तुम्हाला हवी आहे,’ असा आक्रमक आरोप कॉम्रेड वर्धन यांनी प्रश्नकर्त्यांवर केला. मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षानेही वर्धन यांना अनुमोदन दिल्याने मायावतींना लाल प्रतिष्ठा प्राप्त झाली. परंतु प्रत्यक्ष जागावाटपाच्या वेळेस मायावतींनी सांगितले की, ‘आपण देशभर पाचशेहून अधिक जागा लढवू आणि आपणच पंतप्रधान होऊ, असे रीतसर घोषित केल्याशिवाय कोणतीही चर्चा होणार नाही.’ केवळ कम्युनिस्टांच्या पाठिंब्यावर तिसरी आघाडी उभी राहत नाही. त्यामुळे त्यांनी मायावतींना तसे घोषित करून काही साध्य होणार नाही, हे दिसल्यावर ती चर्चा फिस्कटली. परंतु मुद्दा हा, की कम्युनिस्टांना अणुकराराचे कट्टर समर्थक प्रणव मुखर्जी व शरद पवार चालतात, पण डॉ. मनमोहन सिंग मात्र चालत नाहीत. हा ‘अहं’ की धोरणात्मक मतभेद?त्याचप्रमाणे ‘हिंदू फॅसिझम’ला रोखू पाहणाऱ्या कम्युनिस्टांना मोदींचे समर्थन करणाऱ्या मायावती चालतात; हे कसे?परंतु अडथळ्यांच्या या शर्यतीत फक्त कम्युनिस्टांची ‘इगो’ आणि मायावतींची मिजास इतकेच घटक नाहीत. मायावतींइतकीच जिद्दी आणि विशाल ‘अहं’ असलेली दुसरी महामहिला म्हणजे जयललिता!जयललितांनी एकाच वेळेस तिसऱ्या आघाडीचे समर्थन करता करता कॉंग्रेसबरोबर जायची तयारी असल्याचेही सूचित केले होते. परंतु जयललितांचा ‘इगो क्लॅश’ आहे तो सोनिया गांधींशी! त्यामुळे कॉंग्रेस-अण्णाद्रमुक एका आघाडीत (तेही कॉंग्रेस नेतृत्वाखाली!) असणे जवळजवळ अशक्यच आहे. जयललिता पंतप्रधानपदाच्या स्पध्रेत नाहीत. पण मायावतींचे पंतप्रधानपदही त्यांना ‘मानवणार’ नाही, असे संकेत त्यांनी दिले आहेत. जयललितांचे आद्य शत्रू म्हणजे करुणानिधी आणि द्रमुक. त्यामुळे हे ‘द्राविडीयन जुळे’ एकाच आघाडीत येणे अशक्य आहे. ज्याप्रमाणे मायावती आणि मुलायमसिंह एका सरकारमध्ये सामील होणे अशक्य आहे, तितकेच. तीच गोष्ट अगदी छोटय़ा स्तरावर : राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकाच बाजूला कसे असतील?नव्या लोकसभेत कोण कुणाच्या बाजूला आहे, यापेक्षा कोण कुणाच्या विरुद्ध आहे, यावर सरकार बनविले जाणार आहे. काही तथाकथित वेगळा ऊर्फ ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार मांडणाऱ्यांनी सुचविले होते की, कॉंग्रेस व भाजपा एकत्र आले तर ‘नंबर गेम’ सुटतो आणि त्यांनी सामोपचाराने व्यवहार केला तर त्यामुळे स्थिर सरकारही मिळेल. लॉर्ड मेघनाद देसाई या जान्यामान्या इंग्लंडस्थित विचारवंताने ही सामोपचारी कॉंग्रेस-भाजपा आघाडी वारंवार सुचविली आहे. अशा प्रकारचे ‘ऐतिहासिक हस्तांदोलन’ युरोपात झाल्याची उदाहरणे आहेत. परंतु भारतात ते केवळ अशक्य आहे. कॉंग्रेस आणि भाजपा यांनी एकत्र येणे म्हणजे दोघांनी आपापली ‘आयडेन्टिटी’ ऊर्फ अस्तित्वच विसर्जित करण्यासारखे आहे.लॉर्ड मेघनाद देसाई यांचा हा मुद्दा केवळ आकडय़ांच्या दृष्टिकोनातून सिद्ध होतो. परंतु राजकारण म्हणजे आकडय़ांचा खेळ नव्हे. या आकडेवारीचे जे अंदाज (वा जनमत कौल) प्रसिद्ध होत आहेत, ते ‘अंकगणितीय अराजक’ कसे असणार आहे, याचेच निदर्शक आहेत.एकूण जागा ५४३. अगदी एका मताचे जरी बहुमत निश्चित करायचे असेल तरी किमान २७२ जागा त्या पक्षाकडे/ आघाडीकडे हव्यात. खुद्द कॉंग्रेसला वा भाजपालाही आपला पक्ष १६० जागांच्या वर जाईल असे वाटत नाही. लाट वगैरे तर कुणाच्याच बाजूला नाही. म्हणजेच या दोन्ही पक्षांना मिळून ३०० च्या आसपास जागा जिंकता येणार. (म्हणूनच गणिती पद्धतीने हे दोन पक्ष एकत्र आल्यास बहुमताचे सरकार या दोघांच्याच आघाडीतून बनते.) या ३०० पैकी कॉंग्रेस १६० आणि भाजप १४० किंवा बरोबर त्याउलट- असे अंदाज आहेत. या दोघांची आघाडी असंभवनीय असल्याने या दोघांपैकी ज्याला जास्त जागा मिळतील त्याला किमान ११२ जागा इतर पक्षांकडून ‘गोळा’ कराव्या लागतील. इतर कोणत्याही पक्षाला ५० च्या वर जागा मिळणे अशक्यप्राय मानले जाते. (कम्युनिस्ट पक्षांची आघाडी ५० च्या आसपास असू शकेल. पण त्या आघाडीतही चार पक्ष आहेत.) परंतु कम्युनिस्टांनी कॉंग्रेस व भाजप या दोघांबरोबर आघाडीत जाणार नाही, अशी प्रतिज्ञा (आज तरी) केली आहे. म्हणजेच कॉंग्रेस, भाजप व कम्युनिस्ट फंट्र मिळून ३५० जागा दूर केल्या की उरतात १९३ जागा. या १९३ जागांमध्ये मायावतींना ४० च्या आसपास (काहींच्या मते ६०, तर काहींच्या मते ३०) जागा असतील, असा अंदाज आहे. म्हणजेच बसपच्या मायावतींसहच्या १९३ जागांमध्ये कम्युनिस्ट सामील झाले आणि त्यांची संख्या (१९३ + ५०) २४३ इतकीच होते. म्हणजे त्यांचे सरकार बनणे शक्य नाही. शिवाय या १९३ मध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत-मायावती, मुलायमसिंह यादव, लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, शरद पवार, देवेगौडा आणि अगदी नवीन पटनाईक, नितीशकुमारसुद्धा! यापैकी कुणाचाही ‘इगो’ दुसऱ्या कुणाशीही जुळत नसल्याने ही तथाकथित चौथी आघाडीही सरकार बनवू शकत नाही.म्हणजेच कुणालाही भाजप वा काँग्रेस यांच्या प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठिंब्याशिवाय सरकार बनविणे अशक्य आहे. परंतु कोणत्याही चौथ्या वा पाचव्या वा सहाव्या संकल्पित आघाडीला काँग्रेस वा भाजप व डाव्यांनी बाहेरून पाठिंबा दिल्यास ते सरकार वर्ष- सहा महिन्यांच्या वर टिकणार नाही. जर किमान दोन- तीन वर्षे सरकार टिकायचे असेल तर त्या सरकारचे नेतृत्व काँग्रेस वा भाजपकडे असावे लागेल. किंवा या दोन्हीपैकी एका पक्षाला दुय्यम स्थान पत्करून त्या सरकारमध्ये सामील व्हावे लागेल. हा प्रकार अस्थिरता पुढे ढकलण्यापुरताच असणार.उदाहरणार्थ- अडवाणी पंतप्रधान व मायावती उपपंतप्रधान हे अशक्य किंवा मायावती पंतप्रधान आणि अडवाणी वा शरद पवार उपपंतप्रधान हेही अशक्य. केवळ डाव्यांचा पाठिंबा घेऊन काँग्रेस सरकार बनवू शकणार नाही. म्हणजेच लालूंचा राजद, मुलायमसिंहांचा सपा, करुणानिधींचा द्रमुक किंवा जयललितांचा अण्णा द्रमुक, नवीन पटनाईकांचा बीजेडी, चंद्राबाबूंचा तेलुगू देसम्, देवेगौडांचा जद आणि शरद यादवांचा जद (यू), तेलंगण समिती, शरद पवारांचा राष्ट्रवादी अशी अफलातून मोट बांधावी लागेल. शिवाय यापैकी बरेच लहान पक्ष सत्तेत येण्यासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करायच्या तयारीत असल्यामुळे ज्या पक्षाचे वा आघाडीचे गुरुत्वाकर्षण जास्त- त्याच्याकडे ते आकर्षित होणार. स्वाभाविकच एखादा दहा- बारा जागा असलेला पक्षही सरकारच्या सिंहासनाला धक्के देऊ शकेल.अशा स्थितीत निश्चित असे प्रशासकीय व्यवस्थापन, आर्थिक धोरण, परराष्ट्रनीती, देशातील राज्या-राज्यांमधील वादांवर तोडगे इत्यादी बाबी सुसूत्रपणे ठरविणे अशक्य होत जाणार.तशात देशापुढील प्रश्न अधिकाधिक विक्राळ रूप धारण करू लागले आहेत. पाकिस्तानचे तालिबानीकरण होत आहे आणि अस्थिरतेच्या भोवऱ्यात तो देश सापडला आहे. श्रीलंकेतील यादवी शेवटच्या टप्प्यात आली आहे. अमेरिका अफगाणिस्तानमध्ये हतबल होताना दिसते आहे. दहशतवाद अधिकाधिक उग्र रूप धारण करतो आहे. या पाश्र्वभूमीवर ही देशाबाहेरची चक्रीवादळे भारतातही घोंघावू लागलेली आहेत.याच स्थितीत जागतिक आर्थिक परिस्थितीही अधिकच गर्तेत लोटली जात आहे. अर्थकारण, राजकारण आणि सत्तासंतुलन/ नियोजन हा त्रिकोण उधळला जात असल्यामुळे भारत एका भन्नाट भोवऱ्यात सापडत आहे. ही स्थिती बदलायची असेल तर बरेच काही जुने पूर्णपणे मोडावे लागणार आहे. चिन्हेही तशीच आहेत. ते मोडले तर बरे; कारण मगच नवे काही बांधता येईल.

कुमार केतकर

स्वभावशैलीत भांडवलशाहीचा आत्मा

आपण जसे वागतो, तसेच का वागतो? आपल्या वागण्यात बदल होऊ शकतो का? योग्य आणि अयोग्य वागणे म्हणजे काय? आपला स्वभाव प्रगट होतो तो आपल्या वागण्यातून। परंतु स्वभाव आणि वागणे या बाबी एक नव्हेत. वागण्यात, निदान बाह्यत:, बदल करता येतो. परंतु तसा बदल झाला तरी तो स्वभावातील बदल असेलच असे नाही.हल्ली सर्रास एक शब्दप्रयोग केला जातो. ‘पी. आर.!’ एखादा माणूस आपल्याशी चांगला वागला म्हणजे तो ‘चांगला’ असेलच असे नाही. त्याचा काहीतरी ‘मतलब’ असणार, त्याला / तिला आपल्याकडून काही ‘साधायचे’ असणार आणि म्हणून हा ‘पी. आर.’ केला गेला असावा, अशा प्रकारची चर्चा आपल्या नेहमी कानावर पडत असते. ‘पी. आर.’ म्हणजे अर्थातच ‘पब्लिक रिलेशन्स’. परंतु ‘पी. आर.’ हा त्याचा शॉर्टफॉर्म मात्र पब्लिकसाठीच नव्हे, तर कुणाशीही वागताना, मदतशील पद्धतीने वागले, आदरातिथ्याने वागले, चांगुलपणाने वागले, की त्याची ‘नेपथ्यरचना’ बदलते. हल्ली एखाद्याभोवती वा एखादीभोवती ‘फील्डिंग’ लावतानाही हे ‘पी. आर.’चे तंत्रच अवलंबलेले असते. ‘पब्लिक रिलेशन्स’ या विषयात डिप्लोमा, डिग्री मिळविताना या ‘पी. आर.’चे अनेक पैलू अभ्यासक्रमात येतात. औद्योगिक भांडवलशाही जेव्हा बाजारपेठीय विस्ताराचे रूप घेऊ लागली तेव्हा ‘पब्लिक रिलेशन्स’चे तंत्र जन्माला आले. डेल कार्नेजी (१८८८-१९५५) यांनी `How to win Friends And Influence People’ हे पुस्तक सुमारे ७५ वर्षांपूर्वी लिहिले तेव्हा ‘पी. आर.’ तंत्राचा रीतसर जन्म झाला, असे म्हणता येईल. डेल कार्नेजी यांच्या या पुस्तकाच्या अक्षरश: कोटय़वधी प्रती विकल्या गेल्या आहेत आणि जगातील सर्व भाषांमध्ये त्याची भाषांतरे झाली आहेत. कार्नेजी यांनी या पुस्तकात भर दिला आहे तो ‘वागावे कसे’ याच मुद्दय़ावर. साहजिकच स्वभावाचे पृथ:करण करणे ओघाने आलेच. त्यातूनच ‘स्वभाव’ आणि ‘वागणूक’ यात फरक करण्याचे तंत्रही विकसित होऊ लागले.भले तुमचा स्वभाव मितभाषी, अंतर्मुख, शांत असेना का, तुम्हाला जर ‘सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह’ वा ‘रिसेप्शनिस्ट’ वा ‘एअर होस्टेस’ वा पब्लिकशी संबंधित असणारी नोकरी किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुमच्या वागण्यात मोकळेपणा, चेहऱ्यावर प्रसन्नता आणि मदतशीलता यायलाच हवी. जर तशी वागणूक तुम्ही कर्मचाऱ्यांमध्ये (सेल्स, मार्केटिंग आणि अ‍ॅडव्हर्टायझिंग खात्यांमध्ये विशेषत:) रुजविली नाही तर तुमचा व्यवसाय विकसित होणार नाही, माल विकला जाणार नाही, कंपनीचे नाव होणार नाही, ब्रॅण्डला प्रतिष्ठा मिळणार नाही. जर स्पर्धेत टिकून राहायचे असेल तर या गोष्टी व्हायलाच हव्यात. म्हणजेच तुमचा स्वभाव कसाही असो, तुम्हाला ‘कसे वागावे’ याबद्दलचे प्रशिक्षण घ्यायलाच हवे, ही प्रथा रूढ होऊ लागली.युरोपियन भांडवलशाही आणि अमेरिकन भांडवलशाही यातील स्थूल अर्थाने तो मुख्य फरक आहे. युरोपियन भांडवलशाहीने वसाहती काबीज करून आपल्या बाजरपेठा प्रस्थापित केल्या होत्या. त्यात जितका मुत्सद्दीपणा (डिप्लोमसी) होता, तितकीच दादागिरी- दहशतही होती. काही प्रमाणात त्यातही ‘पी. आर.’ असे, पण जास्त भर होता तो बळावर, सत्ताबाजीवर. अमेरिकन भांडवलशाही जेव्हा विसाव्या शतकात आली, तेव्हा वसाहती पादाक्रांत करून, त्यांच्यावर कब्जा बसविण्यासारखी स्थिती नव्हती. बहुतेकशा वसाहती अगोदरच युरोपियन साम्राज्यवाद्यांनी काबीज केलेल्या होत्या. अमेरिकन कंपन्यांना आपला जम बसवायचा होता तो अधिक प्रगत तंत्रज्ञानाच्या आणि बाजारपेठेतील ग्राहकांची मने जिंकण्याच्या माध्यमातून.पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात, युरोपियन साम्राज्यवादी राष्ट्रांनी एकमेकांच्या वसाहती काबीज करण्याचा उद्योग करून आत्मनाश ओढवून घेतला होता. भांडवल, तंत्रज्ञान आणि बाजारपेठेत ग्राहकांना वश करण्याचे प्रयत्न या तिन्ही गोष्टींत इंग्लंड, जर्मनी, फ्रान्स, हॉलंड मागे पडले होते. शिवाय मोठय़ा प्रमाणात विध्वंसही झाला होता. युरोपियन भांडवलशाहीच्या या पोकळीत अमेरिकेने प्रवेश केला आणि ‘पी. आर.’चे तंत्र, स्वभावनियंत्रण व वागण्याची आचारसंहिता या नवीन संकल्पना रुजवायला सुरुवात केली. डेल कार्नेजी यांनी तर मोठमोठाल्या प्रशिक्षण संस्थाच काढल्या. ‘डेल कार्नेजी इन्स्टिटय़ूट’ या त्यांच्या संस्थेतून व त्यांनी सुचविलेल्या अभ्यासक्रमातून सुमारे एक कोटी लोक मित्र मिळवून जग जिंकायला सिद्ध झाले आहेत. विविध क्षेत्रातल्या लोकांनी कसे वागावे, कसे बोलावे, कसे दिसावे, काय बोलावे याचे एक ‘शास्त्र’ तयार केले. डॉक्टरांनी त्यांचे एकूण आचरण कसे करावे, शिक्षकांनी कसे वागावे, वकिलांनी अशिलांशी व्यवहार करताना कसे वागावे॥ ते अगदी थेट राजकारण्यांनी, नोकरशहांनी, खुद्द भांडवलदारांनी कसे वागावे याचे वेगवेगळे अभ्यासक्रम तयार केले गेले. आधुनिक ‘मॅनर्स’ आणि ‘एटिकेट्स्’ त्यातूनच तयार झाल्या. याउलट ब्रिटिश किंवा एकूणच युरोपियन ‘मॅनर्स’ वा ‘एटिकेट्स्’ या त्यांच्या ‘अ‍ॅरिस्टोक्रसी’तून, सरंजामशाहीतून आणि राजेशाहीतून तयार झाल्या होत्या. एखाद्याचे वागणे ‘नोबल’ आहे हे ‘नोबिलिटी’ ऊर्फ सरंजामी प्रस्थापितांच्या ‘मॅनर्स’वरून आले होते. त्यामुळे युरोपियन ‘मॅनर्स’ वा ‘एटिकेट्स्’ आणि अमेरिकन ‘मॅनर्स’ यात खूप फरक आहे. युरोपियन संदर्भ असतो तो राजघराणी, राजवाडे आणि राजेशाहीशी. अमेरिकेचा ‘मॅनर्स-एटिकेट्स्’चा संदर्भ आधुनिक भांडवलशाहीशी आहे.म्हणूनच आधुनिक भांडवलशाहीने ‘आधुनिक मानसशास्त्र’ बाजारपेठीय विकासासाठी वापरायचे ठरविले. तो काही एखादा ‘कट’ वा भांडवली ‘कारस्थान’ नव्हते. माणसाचा स्वभाव कसा घडतो, तो जसा वागतो- तसाच का वागतो, वागणूक आणि स्वभाव बदलता येतात का, माणसाचे मन कसे काम करते- अशा अनेक प्रश्नांवर वैज्ञानिक धर्तीवरचे संशोधन एकोणिसाव्या शतकातच सुरू झाले होते; परंतु त्या संशोधनाचा आशय होता मुख्यत: ‘अ‍ॅबनॉर्मलिटी’ची कारणे तपासण्याचा. ‘अ‍ॅबनॉर्मल बिहेवियर’ हा पूर्वी मुख्यत: चिंतनाचा विषय होता. मानसशास्त्रीय संशोधनाचा नव्हता. ‘मन’ या गोष्टीवर संशोधन करायचे म्हणजे ‘मेंदू’वर करायचे, ही कल्पना तर बऱ्याच वर्षांनंतर मांडली जाऊ लागली. ‘नॉर्मल’ आणि ‘अ‍ॅबनॉर्मल’ माणूस कसा ठरवायचा याचे संशोधन करता करता, थोडय़ाफार प्रमाणात सर्वच जण ‘अ‍ॅबनॉर्मल’ असल्याचे संशोधकांना वाटू लागले! ज्याप्रमाणे रामदासांनी वर्णन केलेली कुठची ना कुठची तरी मूर्खाची लक्षणे आपल्यासकट सर्वाना लागू पडतात, असे ती वाचताना वाटते, त्याचप्रमाणे आपणही जरा तरी ‘अ‍ॅबनॉर्मल’ आहोतच असे प्रत्येकाला ‘अ‍ॅबनॉर्मलिटी’ची लक्षणे वाचताना वाटू लागते. असो. मुद्दा हा, की मानसशास्त्राचा तेव्हाचा अभ्यास हा वेड लागलेल्या, वेडसदृश वागणाऱ्या, न्यूरॉटिक, वैफल्यग्रस्त, उदास, निराशेने पछाडलेल्या, हिंसक इत्यादी ‘अ‍ॅबनॉर्मल’ लक्षणे असणाऱ्या माणसांचा होता.सिग्मंड फ्रॉइड यांनी एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मानसशास्त्रीय संशोधनात एक क्रांतीच घडवून आणली होती. मनोविश्लेषणाचे तंत्र वापरून मनोरुग्णांवर उपचार करण्याची पद्धती त्यांनी रूढ करायला सुरुवात केली. ‘बाह्य मन’ आणि ‘अंतर्मन’ याही पलीकडे असलेल्या मनाच्या गाभाऱ्यात ज्या स्मृती असतात, ज्या आकांक्षा असतात, ज्या अतृप्त आणि अव्यक्त इच्छा असतात, जी भीती दडलेली असते त्या सर्वाचा परिणाम मानसिकतेवर होत असतो. एखादी व्यक्ती मनोरुग्ण होते ती या अंतर्मनात व मनाच्या गाभाऱ्यात होत असलेल्या खळबळीमुळे. अस्वस्थ चित्त हेच मनोविकाराला कारणीभूत असते, इतकेच नव्हे तर मनोविकाराचा परिणाम शरीरावरही होतो आणि बरेच शारीरिक आजार हे खरे तर मानसिकच असतात, असे प्रतिपादन तेव्हापासून अनेक मानसशास्त्रज्ञ मानू लागले. या तज्ज्ञांच्या मते प्रत्येक माणसाच्या मनाच्या सर्व स्तरांवर ज्या उलथापालथी होत असतात त्यातून त्याची वागणूक ठरत जाते, स्वभाव बनत जातो. अनेकदा जेव्हा आपण म्हणतो, ‘‘अरे त्याचा स्वभाव असा असेल असे त्याच्या वागण्यावरून कधी वाटले नव्हते,’’ तेव्हा आपण वागणूक व स्वभाव वेगळे असल्याचेच मान्य करीत असतो. ‘स्वभावशास्त्र’ विकसित होण्यातली ही मुख्य अडचण होती. कारण एखाद्या व्यक्तीचे स्वभाववर्णन त्याच्या वागणुकीवरूनच ठरविले जात असते. परंतु त्या दोन बाबींमध्ये फरक करता येतो हे लक्षात आल्यावर ‘बिहेव्हियर सायन्स’ने वेगळे वळण घेतले.आधुनिक (अमेरिकन) भांडवलशाहीने हा फरक जोखला. डेल कार्नेजी यांनी जेव्हा त्यांचे ‘हाऊ टू विन फ्रेण्ड्स्’चे तंत्र प्रचलित केले तेव्हा त्यांचा भर आपल्या वागण्यावर होता. वागणे बदलता येते (स्वभाव न बदलता!) हा विश्वास त्यामागे होता. प्रशिक्षण, व्यावहारिक गरज, वागणे बदलून प्राप्त होऊ शकणारा लाभ, त्यातून मिळणारी प्रतिष्ठा इत्यादी गोष्टी ‘पब्लिक रिलेशन्स’च्या अभ्यासक्रमात आणल्या गेल्या.अर्न्‍स्ट डिक्टर (१९०७-१९९१) या मानसशास्त्रज्ञाने स्वभावशास्त्र आणखी एका मार्गाने विकसित करायला सुरुवात केली. डिक्टर जरी ऑस्ट्रियन असला तरी त्याने त्याची ‘इन्स्टिटय़ूट ऑफ मोटिव्हेशनल रिसर्च’ ही संस्था अमेरिकेत आल्यानंतर स्थापन केली. डिक्टर यांनी प्रतिपादन केले, की भांडवलशाहीचा ‘आत्मा’ ग्राहकांच्या मानसिकतेत असतो. कोणतीही व्यक्ती एखादी विशिष्ट वस्तू खरेदी करते, मुख्यत: एखाद्या ब्रॅण्डची, तेव्हा त्या निर्णयामागे काहीतरी मानसिक तर्कशास्त्र असते. ते तर्कशास्त्र समजून घेणे जितके महत्त्वाचे तितकेच त्यानुसार त्या ‘कन्झ्युमर बिहेव्हियर’चे निकष ठरविणे महत्त्वाचे. ग्राहकाची मानसिकता समजली, की त्यानुसार जाहिरात करणे, पॅकेजिंग करणे, वस्तूची गुणवत्ता निश्चित करणे, ती वस्तू इतरांपेक्षा कशी श्रेष्ठ हे ‘सिद्ध’ करणे, तो विशिष्ट ब्रॅण्ड वापरल्याने समाजात आपली प्रतिष्ठा कशी वाढते हे दाखवून देणे या व अशा गोष्टी करता येतील हा डिक्टर यांचा सिद्धांत. हा ‘वैज्ञानिक’ सिद्धांत प्रस्थापित करण्यासाठी डिक्टर यांनी बरेच ग्रंथ लिहिले. त्यातील दोन प्रमुख ग्रंथ म्हणजे ‘स्ट्रॅटेजी ऑफ डिझायर’ आणि ‘मोटिव्हेटिंग ह्युमन बिहेव्हियर!’ माणसाच्या सुप्त इच्छा समजून घेऊन त्यानुसार जाहिरात करणे व वस्तूची गुणवत्ता / वैशिष्टय़े ठरविणे शक्य व्हावे म्हणून फ्रॉइडच्या मनोविश्लेषणाचे तंत्र डिक्टर यांनी अंमलात आणले. प्रत्येक ग्राहकाच्या अंतर्मनाचा शोध घेण्यासाठी त्यांनी ‘डेप्थ इंटरव्ह्यू टेक्निक’ नावाचे तंत्र विकसित केले. या तंत्रानुसार कोणत्याही व्यक्तीची सविस्तर व सखोल मुलाखत घेऊन त्याचे अंतर्मन ओळखायचे व त्या अनुषंगाने आपल्या ब्रॅण्डचा प्रसार करायचा ही ती ‘स्ट्रॅटेजी ऑफ डिझायर!’ डिक्टर यांचे मनोविश्लेषण तंत्र पुढे व्हॅन्स पॅकार्ड या बाजारपेठ व जाहिराततज्ज्ञाने आणखी प्रसृत केले. ‘द हिडन पस्र्वेडर्स’, ‘स्टेटस सीकर्स’ इत्यादी ग्रंथांमधून पॅकार्ड यांनी प्रत्येक व्यक्ती जाहिरातींना आणि प्रचाराला, कशी वश होते हे दाखवून दिले.जगातील आजच्या भांडवलशाहीचे व्यवच्छेदक लक्षण ‘ब्रॅण्ड’ हे आहे. प्रत्येक उद्योगसमूह ‘ब्रॅण्ड’ डिपार्टमेण्टमार्फत आपल्या उत्पादनाची व कंपनीची प्रतिष्ठा व विस्तार वाढवीत असतो.म्हणजेच ‘स्वभावशास्त्र’ हे आज निदान काही प्रमाणात भांडवलशाहीचे एक साधन बनले आहे. परंतु या उपयुक्ततावादी स्वभावशास्त्राच्या पलीकडे स्वभाव नावाचे अथांग गूढ तसेच राहिले आहे.
कुमार केतकर

‘मनुष्य’ नावाचा प्राणी

‘मनुष्य’ नावाचा प्राणी


माणसाचा स्वभाव जन्मत:च ‘कंडिशण्ड’ किंवा ‘प्रोग्रॅम’ झालेला असतो की तो परिस्थितीनुसार घडतो म्हणजे ‘कंडिशन’ होतो, याबद्दलचा वाद वैज्ञानिक स्तरावर सुरू झाला इव्हान पावलॉव या रशियन शास्त्रज्ञाच्या प्रयोगांमुळे। सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पावलॉव यांनी एक अगदी साधा प्रयोग केला। तो त्याने पाळलेल्या कुत्र्यांना विशिष्ट वेळेला खायला देत असे. परंतु कुत्र्याच्या बशीत खायचा पदार्थ टाकण्यापूर्वी घंटी वाजवीत असे. अशा प्रकारे घंटी वाजल्याबरोबर बशीत काही तरी चविष्ट येऊन पडते हे कुत्र्यांच्या संवेदनयंत्रणेत ‘प्रोग्रॅम’ झाले आहे, हे निश्चित झाल्यावर पावलॉव नंतर फक्त घंटी वाजवीत असे; परंतु बशीत काहीच देत नसे. त्या वेळेस कुत्र्याचे अस्वस्थ होणे आणि त्याच्या तोंडात वाढलेले लाळेचे प्रमाण हे तो मोजत असे. खरे तर या प्रयोगात ‘प्रयोग’ म्हणण्यासारखे काही नव्हते. कुत्रा पाळणाऱ्यांच्या दैनंदिन अनुभवाचा तो भाग आहे; परंतु असे इतरही काही प्रयोग करून पावलॉवने ‘क्लासिकल कंडिशनिंग’चा सिद्धांत मांडला. वरवर साध्या वाटणाऱ्या या ‘प्रयोगा’च्या आधारे पुढे प्राणीजीवनाचा अभ्यास करणाऱ्यांनी इतरही बरेच ‘कंडिशनिंग’संबंधातले निष्कर्ष काढले. ‘बॉर्न फ्री’, ‘लिव्हिंग फ्री’ आणि ‘फॉरएव्हर फ्री’ या तीन खंडांच्या ग्रंथात सिंहाच्या, सिंहिणीच्या व त्यांच्या छाव्यांच्या जीवनाविषयी जॉय व जॉर्ज अ‍ॅडॅम्सन या पती-पत्नींनी जे निष्कर्ष काढले ते सिंह- कुटुंबाच्या स्वभावशैलीसंबंधातील होते. प्राणीजीवनाचे निरीक्षण करून त्या आधारे ‘स्टिम्युलस-रिस्पॉन्स’ ऊर्फ ैर-फह्ण अशी एक सैद्धांतिक मांडणीच केली जाऊ लागली. माणूस हासुद्धा प्राणीच आहे त्यामुळे तोसुद्धा या ‘एस-आर’ म्हणजे ‘प्रेरणा- प्रतिसादा’च्या प्रक्रियेतच वागतो, असे मानणारे आज अनेक मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ आहेत. तीव्र मतभेद आहेत ते हे ‘प्रेरणा-प्रतिसादा’चे कंडिशनिंग जन्मत:च म्हणजे ‘जेनेटिकली’ ठरते की ‘सोशल’ कंडिशनिंगनुसार, याविषयी.बट्र्राड रसेल या जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ- गणिती- विचारवंताच्या म्हणण्यानुसार माणूस हा ‘प्राणी’ आहे हे जरी खरे असले तरी माणसाला निसर्गाने जो मेंदू, जी प्रज्ञा आणि कॉन्शिअसनेस ऊर्फ र्सवकष जाणीवसंपन्नता दिली आहे, त्यामुळे त्याची तुलना एका मर्यादेपलीकडे प्राणीविश्वाशी करणे हे अशास्त्रीय आहे. ‘एस-आर’ ऊर्फ ‘प्रेरणा-प्रतिसाद’ प्रक्रियेनुसार काही ढोबळ गोष्टींचा उलगडा होत असला तरी त्यातून ‘स्वभावशास्त्र’ निर्माण करता येणार नाही. माणूस स्वयंप्रज्ञेने स्वत:चा स्वभाव, वृत्ती, संवेदनशीलता घडवू शकतो. माणूस जसे व जे शिकू शकतो, तसे कोणताही प्राणी करू शकत नाही; त्यामुळे कुत्रे असोत वा सिंह, मुंग्या असोत वा डॉल्फिन्स, कबुतरे असोत वा गरुड, त्यांचा कितीही सखोल अभ्यास केला तरी त्या आधारे निश्चित स्वरूपाचे स्वभावशास्त्र तयार करता येणार नाही.मुंग्या आणि त्यांची ‘सामूहिक जीवनशैली’ हा संशोधनाचा एक मोठा विषय मानला जातो. मुंगी माणसाला (किंवा कुणालाही!) का चावते येथपासून ते सामूहिकपणे ती वारूळ कसे बांधते, साखर कशी जमा करते आणि तिच्या स्वत:च्या वजनापेक्षा (व क्षमतेपेक्षा) कित्येकपटींनी जास्त वजनाचा असलेला साखरेचा कण कसा उचलते व बरेच अंतर तो कण अंगावर कसा वाहून नेऊ शकते यावर बरेच वैज्ञानिक संशोधन करीत आहेत. अत्यंत सूक्ष्म मेंदू असलेला हा कीटक साखरेचा डबा, गोड पदार्थ, मेलेले झुरळ इत्यादी गोष्टी कशा शोधून काढतो? इतर मुंग्यांना ती ‘बातमी’ कशी पोचवली जाते, मुंग्यांचे पुनरुत्पादन कसे होते, त्या एवढय़ा ‘शिस्तीत’ कशा राहतात (संघाच्या शाखेवर न जाता), त्या मुंग्यांमध्ये संघर्ष-मारामाऱ्या होतात की नाही, त्यांची Survival instinct’ ऊर्फ जिवंत राहण्याची-जगण्याची इच्छा आणि त्यांचे ‘आयुष्यमान’ हाही त्या संशोधनाचा भाग आहे.सर्व कीटक, सरपटणारे प्राणी, चतुष्पाद प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी, मासे, कासवे इतकेच काय वनस्पती, बुरशी, शेवाळे अशा सर्व जीवसृष्टीसंबंधात संशोधन चालू आहे. या सृष्टीला लाभलेला परिसर, त्यातील घटकांना असणारे ‘मन’, त्यांच्या ‘प्रेरणा-प्रतिसादा’चे रहस्य हासुद्धा एकूण व्यापक अशा स्वभावशास्त्राचा भाग झाल्यामुळे हा विषय आता केवळ मानसशास्त्रज्ञांच्या कक्षेपुरता उरलेला नाही.‘नॅशनल जिऑग्राफिक’, ‘डिस्कव्हरी’ आणि ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’ यांसारख्या चॅनल्सवरून जे प्राणीदर्शन आणि निसर्गदर्शन होते तेही अखेरीस स्वभावशास्त्राच्या दिशेनेच जाणारे असते. म्हणूनच आता प्राण्यांसाठी फक्त व्हेटरनरी डॉक्टर्स नाहीत तर त्यांचे स्वतंत्र ‘व्हेटरनरी सायकिअ‍ॅट्रिस्टस्’ म्हणजे प्राण्यांचे मानसशास्त्रज्ञही निर्माण झाले आहेत. परंतु या पशुमानसशास्त्रज्ञांना माणसाच्या स्वयंप्रज्ञेचा, नैसर्गिक प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन व्यवहार करण्याच्या ‘स्वभावाचा’, नवीन शिकण्याचा, कला-संगीत निर्मिती करणाऱ्या सृजनशीलतेचा आणि भाषासमृद्धी व त्या आधारे निर्माण झालेल्या सिव्हिलायझेशनचा अर्थ लावता येत नाही.काही जण तर स्वभाव आणि ‘सिव्हिलायझेशन’ यांचा बादरायणसंबंध कशाला लावायचा, असाही प्रश्न उपस्थित करतात; परंतु त्याला उत्तर देताना काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, ‘सिव्हिलायझेशन’ हे ‘वेगळेपण’ असणाऱ्या, अनेकदा ‘तऱ्हेवाईक’ वाटणाऱ्या, पण सृजनशील माणसांमुळे निर्माण झाले आहे. बहुतेक थोर शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संगीतकार, लेखक, नाटककार, चित्रकार वा जगाचा शोध घेणारे साहसी दर्यावर्दी वा प्रवासी हे सर्वसाधारण माणसांसारखे नव्हते (वा नसतात). त्यांचे वेगळेपण केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेपुरते, अचाट परिश्रमापुरते वा जिद्दीपुरते मर्यादित नव्हते. ते वेगळेपण असते ते त्यांच्या स्वभावात.प्राणीसृष्टीशी तुलना करून मानवी स्वभावाची चिकित्सा केली तर कदाचित ती थोडय़ाफार प्रमाणात तरी समान प्रकारची असल्याचे दाखविता येईल; परंतु त्या तथाकथित सर्वसाधारण माणसांच्या समानतेतही इतके वैविध्य आहे की, त्याचा शोध घेणे अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागले आहे. विशेषत: त्या असंख्य लोकांच्या स्वभावाचा लघुत्तम साधारण विभाज्य (लसावि) काढताना.कॉन्रॅड लॉरेन्झ (१९०३-१९८९) या प्रख्यात ऑस्ट्रियन प्राणीशास्त्रज्ञाने प्राण्यांच्या प्रेरणास्रोताचा प्रदीर्घ अभ्यास केला होता. माणसाचे स्वभाव कसे घडतात हे समजून घ्यायचे असेल तर प्राण्यांच्या इन्स्टिंक्टस्, इंटय़ूशन्स आणि इंटेलिजन्स, म्हणजे स्वाभाविक व प्रतिक्षिप्त क्रिया, उत्स्फूर्तता आणि बौद्धिकता यांचा अभ्यास करायला हवा, असे त्यांचे मत होते. वैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर लॉरेन्स यांनी शरीरशास्त्राचा अभ्यास केला. शरीरशास्त्राचा अभ्यास करताना त्यांनी इतर सस्तन प्राण्यांच्या शरीरांतर्गत रचनेचा अभ्यास केला. माणसाच्या मेंदूची महती गृहीत धरली तरी माणसाचे ‘कंडिशनिंग’ प्राण्यासारखेच होते, असे मानणाऱ्या लॉरेन्झने बट्र्राड रसेलपेक्षा इव्हान पावलॉव यांच्याच प्रणालीचा विस्तार करायचे ठरविले होते. म्हणून त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला. जर्मनीतील कोनिग्जबर्ग विद्यापीठात ते मानसशास्त्र शिकवीत असत. परंतु १९२५-१९४५ हा २० वर्षांचा काळ नाझीवादाने व्यापलेला होता. आर्य वंशाची श्रेष्ठता प्रस्थापित करू पाहणाऱ्या नाझींनी त्याच काळात स्वभाव नियंत्रणाचे तंत्रही विकसित करायचा प्रयत्न सुरू केला होता. लॉरेन्झ यांना नाझीवादाचे आकर्षण वाटू लागले ते त्यामुळेच. त्यांनी नाझी पक्षाचे सदस्यत्व तर घेतलेच, पण त्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने संशोधनही सुरू केले. परंतु पुढे १९७३ साली त्यांना जेव्हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी आपल्या नाझी भूतकाळाविषयी खेद प्रकट केला. आपण संशोधन वृत्तीने प्रेरित झालो होतो- नाझी विचारांनी नव्हे. नाझीवादातील हिंस्रता लक्षात आल्यावरच आपण त्या विचारापासून फारकत घ्यायला सुरुवात केली होती, असे त्यांनी म्हटले.परंतु माणूस विशिष्ट परिस्थितीत काही विशिष्ट पद्धतीनेच वागतो आणि सामूहिक अवस्थेत तर तो समूहवादाच्या प्रवृत्तींना बळी पडतो असे त्यांच्या निदर्शनास आले होते. धार्मिक वा जातीय दंगलींमध्ये बेभानपणे सामील होणारी व खून-जाळपोळ करणारी माणसे गुन्हेगारी प्रवृत्तीचीच असतात असे नाही, पण ती गुन्हा करतातच. त्यांच्यातील आक्रमकता, हिंसा आणि बुद्धी व संवेदना त्या समूहाकडे ‘गहाण’ ठेवल्या जातात. (अलीकडेच उदाहरण म्हणजे बाबरी मशीद उद्ध्वस्त करणाऱ्यांचा वा गुजरात दंगलींमधील सहभागी झालेल्यांचा उन्माद किंवा तालिबान्यांनी संघटितपणे केलेले हिंसाकांड). लॉरेन्स यांनी ‘सायकोहैड्रॉलिक मॉडेल ऑफ मोटिव्हेशन’ नावाचा प्रबंध त्या दृष्टिकोनातून मांडला होता.त्यांचा गाजलेला ग्रंथ म्हणजे ‘ऑन अ‍ॅग्रेशन.’ या ग्रंथामुळे ‘माणूस मुळातच हिंसक प्रवृत्तीचा असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे’, असा दावा सर्वदूर केला जाऊ लागला. (विजय तेंडुलकरांनी या विचाराला नाटय़रूप तर दिलेच, पण सांस्कृतिक प्रतिष्ठाही प्राप्त करून दिली.) परंतु लॉरेन्झ यांचा तितका गाजावाजा न झालेला ग्रंथ म्हणजे : ‘kBehind the Mirror : A Search for a Natural History of Human Knowledge.’ या ग्रंथात त्यांनी आपल्याला आजूबाजूच्या जगाचे भान कसे येते, त्या आकलनात वास्तव किती, अवास्तव किती, सत्य किती, कल्पनाविलास किती यासंबंधी चर्चा केली आहे. आपण आपल्या पंचेंद्रियांवर व बुद्धीवर विसंबूनच निसर्गाशी सामना करू शकतो, पण त्यामुळेच आपल्याला त्याहीपलीकडेही जाता आले पाहिजे, असा विचार ते मांडू लागले होते. परंतु या सर्व स्वभाव-संशोधनाचा उपयोग काय? स्वभावशैलीच्या फटक्यामुळे काय घडते- वा घडू शकते? शिवाय ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे सूत्र गृहीत धरल्यावर बाकी संशोधनाची काय गरज? दोन जुळ्या भावांपैकी एक खूप आनंदी स्वभावाचा आणि दुसरा अंतर्मुख किंवा एकाच कुटुंबातील चार-पाच बहीण-भाऊ अगदी परस्परविरोधी स्वभावांचे, त्याचप्रमाणे एकाच परिसरात, शाळेत, कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या समवयस्कांच्या वेगळ्या आवडीनिवडी- अशा अनेक बाबींचे आपल्याला जसे कुतूहल वाटते तसेच ते स्वभावशास्त्रज्ञांनाही वाटते, पण त्यांचा प्रयत्न असतो तो त्या स्वभावातील मूळ घटकांचा, कार्यकारणभावाचा आणि संस्कारांचा व कण्डिशनिंगचा.भांडवलदारांच्या ‘अधिकृत’ विचारवंतांनी तर स्वभावशास्त्राच्या आधारे बाजारपेठेचा विस्तार करता येईल, कंपनीची प्रतिष्ठा (व त्यायोगे कंपनीच्या शेअरचा भाव!) वाढवता येईल आणि मग आपला सामाजिक-सांस्कृतिक प्रभावही वाढवता येईल, असे गृहीतच धरलेले आहे. भांडवली- बाजारपेठीय विचाराला ज्या कम्युनिस्ट विचारसरणीने आव्हान दिले, त्या विचारसरणीतही पुढे स्वभावनियंत्रणाचा घातक विचार घुसला. धर्मप्रसार करणाऱ्यांनी, भांडवलशाहीच्या प्रवक्त्यांनी आणि कम्युनिस्टांनी आपापल्या पद्धतीने स्वभावशैलीच्या माध्यमातून जग बदलायचा कसा प्रयत्न केला त्याचा ऊहापोह पुढील लेखात.
कुमार केतकर

स्वभावाला औषध

प्रत्येक माणसाचा विशिष्ट स्वभाव असतो. प्रसन्न वा दुर्मुखलेला. रागीट वा शांत. तुसडा किंवा मनमिळाऊ. शिष्ट किंवा दिलखुलास. मदतशील किंवा मतलबी. कंजूष वा सढळ. अतिशय अभिमानी, ताठा असलेला वा शक्यतो सर्वाशी जुळवून घेणारा. जिद्दी, चंचल, आशावादी, निराशावादी अशी बरीच स्वभावलक्षणे असतात. आपण सर्वजण नेहमी दुसऱ्याच्या स्वभावाबद्दल बोलत असतो. बहुतेक वेळा प्रतिकूल म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून कुठचा तरी एक ‘योग्य’ वा ‘आदर्श’ स्वभाव असतो. तो मनातला मापदंड घेऊन आपण इतरांच्या स्वभावाबद्दलची चर्चा करीत असतो. बहुतेक मुला-मुलींच्या गप्पांमध्ये किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांमध्ये, मित्रवर्तुळात वा नातेवाईकांमध्ये-एकत्र जमल्यावर अनेकदा विषय असतो तो कुणाच्या तरी स्वभावाबद्दलचा. त्या व्यक्तीच्या त्या विशिष्ट स्वभावाबद्दल कधी एकमत असते तरी कधी मतभेद. त्याचा वा तिचा संबंधितांना आलेल्या अनुभवाच्या आधारे ते स्वभाववर्णन केले जात असते.एखादा माणूस ‘चांगला’ आहे की ‘वाईट’, ‘विश्वासार्ह’ आहे की ‘बेभरवशाचा’ याबद्दलचे निष्कर्ष काढताना ज्याला त्याला आलेला अनुभव आणि आपल्या मनातले (स्वत:च ठरविलेले) मापदंड यांच्या आधारे ते निष्कर्ष काढलेले असतात. लग्न ठरवताना (मग तो प्रेमविवाह असो वा ‘अ‍ॅरेन्ज्ड मॅरेज’ ओळखीपाळखीतून लग्न ठरलेले
असो वा ‘डेटिंग’च्या आधुनिक परस्पर भेटीतून) दोघेही जण परस्परांची पारख करीत असतात, ती मुख्यत: स्वभाववैशिष्टय़ांची। बाकी शिक्षण, आर्थिक स्थिती, ‘स्टेटस’, नोकरीचे वा व्यवसायाचे स्वरूप, राहायची जागा म्हणजे कुठे आणि किती इत्यादी गोष्टींची माहिती मिळविलेली असते वा उपलब्ध होऊ शकते. परंतु तेवढय़ाच गोष्टीवरून लग्न ठरत नाहीत. अगोदर वा नंतर माहिती काढताना केलेल्या चौकशीत वा प्रत्यक्ष भेटल्यावर पारख करताना मुख्य अंदाज केला जात असतो तो स्वभावाचा. त्याचप्रमाणे आपले स्वत:च्या स्वभावाबद्दलही समज (वा गैरसमज) असतात आणि त्या अनुषंगाने त्या मुलाच्या वा मुलीच्या स्वभावाचे आडाखे दोघेही जण बांधत असतात.एवढा सगळा आटापिटा करून आणि ‘डेटाबेस’ जमा करूनही कधी तो प्रेमविवाह वा ठरवून केलेले लग्न ‘फसते.’ जी लग्न तशी ‘फसत’ नाहीत त्यांना ‘यशस्वी’ म्हणण्याची पद्धत आहे. कित्येक जोडपी त्यांच्या विवाहाचा २५ वा, ५० वा वाढदिवसही साजरा करतात. हल्लीच्या ‘समारंभोत्सुक’ काळात ते यशस्वी जोडपे आपल्या वैवाहिक-सांसारिक जीवनातले अनुभवही सांगतात. काहीसे गमतीने (पण मनातून गांभीर्याने!). त्या संभाषणात असेही सांगतात की, ‘आम्ही इतकी वर्षे एकमेकांबरोबर कशी काढली हेच कळत नाही!’ सर्वचजण त्या कबुलीजबाबाला हसून दाद देतात. परंतु बहुतेक वेळा खरोखरच त्या दोघांना कळलेले नसते की, इतकी वर्षे त्यांनी संसार कसा केला!परंतु ‘स्वभाव’ हा विलक्षण गुंतागुंतीचा विषय फक्त लग्न-घटस्फोट किंवा प्रेम-विरह यापुरताच मर्यादित नाही. युरोप-अमेरिकेत काही वर्षांपूर्वी ‘एचआरडी’ ऊर्फ ह्य़ूमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये ‘स्वभावतज्ज्ञ’ (बिहेविअर स्पेशालिस्ट) नेमले जात असत. पुढे या ‘ह्य़ूमन रिसोर्स’ खात्याचे इतके अवमूल्यन होत गेले की, ते तमाम कर्मचाऱ्यांमध्ये बदनाम वा टिंगल टवाळीचे खाते बनले. भारतातही ‘एचआरडी’चे फॅड सुमारे २५ वर्षांपूर्वी आले. राजीव गांधींच्या काळात प्रथमच ‘एचआरडी’ हे स्वतंत्र खाते झाले आणि त्या खात्याच्या मंत्र्याला नंबर दोन वा तीन दर्जा दिला गेला. पण या ‘ह्य़ूमन रिसोर्स’ खात्याने नक्की आणि नवीन काय करायचे हे जसे राजीव गांधींना ठरविता आले नाही, त्याचप्रमाणे या फॅशनेबल खात्याला काय काम द्यायचे हे कॉर्पोरेट सेक्टरलाही उमगले नाही. त्यामुळे ट्रान्स्फर्स, र्रिटेचमेंट, जॉब अ‍ॅलोकेशन चेंज, लॅटरल रिलोकेशन्स या कटू गोष्टी करण्याचे काम त्यांच्याकडे आले. या बदल्या आणि बडतर्फी करणारे ‘ह्य़ूमन रिसोर्स’ अधिकारी हे मालकांचे व डायरेक्टर बोर्डाचे हस्तक किंवा हेर किंवा ‘हँगमेन’ झाले. कारखाना वा कचेऱ्यांमध्ये सामंजस्य व संवाद ठेवण्याचे काम करण्याऐवजी वातावरण कलुषित करणारे ते एजंट झाले. ‘अ‍ॅप्रेजल्स’ची संकल्पना बऱ्याच वर्षांपूर्वी बिहेविअर स्पेशालिस्टांनी म्हणजे स्वभावतज्ज्ञांनी मांडली होती. आज ‘स्टाफ अ‍ॅप्रेजल्स’ची प्रथा किती अर्थशून्य (आणि दुष्टसुद्धा) याबद्दलची चर्चा खुद्द ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकेतील कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या मुखंड मानल्या जाणाऱ्या दैनिकातूनच होऊ लागली आहे. १० महिन्यांत अमेरिकेतील सुमारे ४५ ते ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बहुतेक वेळा हे अप्रिय काम या अधिकृत ‘ह्य़ूमन रिसोर्स’वाल्यांनीच केले आहे. त्यांचाही इलाज नव्हताच. कारण ‘टॉप मॅनेजमेंट’चे निर्णय स्वभावविश्लेषणावर ठरत नाहीत तर बॅलन्सशीटच्या ‘प्रॉफिट-लॉस’च्या आकडय़ांवर आणि स्टॉक मार्केटमधील चढउतारांवरती ठरतात. असे असले तरी प्रत्यक्षात कारखाना-कचेऱ्यांमधील कामगार-कर्मचाऱ्यांचे परस्परसंबंध हे कामाच्या स्वरूपाइतकेच स्वभावाच्या स्वरूपांवरही अवलंबून असतात. फक्त कामाच्या म्हणजे नोकरी-व्यवसायांच्या जागीच नव्हे तर चळवळींमध्ये काम करणाऱ्या, विविध समित्यांवर सदस्य असणाऱ्या आणि इतर क्षेत्रात लोकसंपर्क असलेल्या, अगदी राजकारणातही ‘स्वभाव’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.स्वभाव हा इतका महत्त्वाचा घटक असूनही त्यावर वैज्ञानिक-मनोवैज्ञानिक संशोधन तुलनेने बरेच कमी झाले आहे. चिंतन मात्र उदंड झाले आहे. रामायण-महाभारत या इतिहाससदृश महाकाव्यांमध्ये असो वा सॉक्रेटिस-प्लेटो यांच्या काळात झालेल्या तत्त्वचर्चेत असो, कन्फ्युशियसच्या व्यावहारिक तत्त्वज्ञानात असो वा गौतम बुद्धाच्या शिकवणीत, सगळीकडे स्वभावचर्चा ही असतेच. किंबहुना त्या काव्य-महापुराणांमध्ये असो, कालिदास किंवा शेक्सपिअरच्या वा अगदी अलीकडच्या विजय तेंडुलकर वा टॉम स्टोपॅर्डच्या नाटकांमध्ये असो, स्वभावरेखा आणि परस्परसंबंधातील तणाव व आकर्षण दूर केले की, सर्व साहित्यसृष्टीच बरखास्त होईल.कित्येक संस्थांनी इतिहास घडविला, काही संस्था लयाला गेल्या, काही संस्था अजूनही विकसित होत आहेत व विस्तारतही आहेत. त्या सर्वाचा मुख्य स्रोत होता तो, त्या संस्थांच्या वा चळवळीच्या प्रणेत्यांचा व नेत्यांचा स्वभाव. म्हणूनच शिवाजी महाराज वा नेपोलियन इतकेच नव्हे तर महात्मा गांधी वा माओ त्से तुंग यांच्या राजकारणावरच नव्हे तर स्वभाववैशिष्टय़ांवरही अजून ग्रंथ लिहिले जातात. हिटलरचे मनोविश्लेषण व स्वभावचित्रण करणे हा तर इतिहासकारांचा, मानसशास्त्रज्ञांचा आणि समाजशास्त्रज्ञ व साहित्यिकांचा छंदच झाला आहे.याचा अर्थ हा की, ‘स्वभाव’ या विषयावर सर्वात जास्त चर्चा आहे. हे स्वभावविशेष नक्की कसे घडत (वा बिघडत) जातात, त्या स्वभावांवर आई-वडील यांचा किती प्रभाव असतो आणि कुटुंबाबाहेरील परिसराचा संस्कार किती असतो, यावरही बराच खल झाला आहे. एकाच घरात वाढलेल्या भाऊबहिणींचा स्वभाव इतका भिन्न, अगदी परस्परविरोधी कसा बनतो याविषयीही बरेच लिहिले गेले आहे. अगदी दोन जुळ्या भावांमध्ये वा बहिणींमध्येही किती स्वभाववैविध्य असते यावरही लेखन झाले आहे. स्वभाव ‘जेनेटिकली डिटरमिन्ड’ आहे की, ‘सोशली कन्डिशन्ड’ आहे, म्हणजेच एक प्रकारे जन्मापासूनच त्याची वैशिष्टय़े ठरलेली आहेत की ती बदलत जातात यावरही मनोशास्त्रज्ञांचा खल चालू आहे. अर्थातच सर्वाना मान्य होतील, असे प्रयोगसिद्ध निष्कर्ष काढण्याइतकी स्पष्टता आलेली नाही.सुमारे १०० वर्षांपूर्वी ‘बिहेवियॉरिझम’ नावाचे ‘शास्त्र’ जे. बी. वॉटसन या विचारवंताने निर्माण करायचा प्रयत्न केला होता. त्या शास्त्राच्या काही अनुयायांनी असे मांडायला सुरुवात केली होती की, स्वभाव हा संस्कारांनीच ठरतो. त्यामुळे संस्कार सुनिश्चित व अगदी लहानपणापासून केले तर स्वभाव व एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा असेल हे सांगता येणे सहज शक्य आहे. कोणत्याही द्रव्याचे जसे निश्चित घटक असतात, तसेच स्वभावाचेही असतात असे त्यांच्यापैकी काहींचे म्हणणे होते. एकाच वेळी जन्माला आलेली दोन विभिन्न समाजांतली, वर्गातली, धर्मातली वा देशांतली मुले पूर्णपणे वेगवेगळ्या पण नियोजित वातावरणात व संस्कारात वाढवली तर ती त्यानुसारच वागतील, असे त्यांचे ठाम मत होते.त्यांच्यासमोर मुद्दा अर्थातच फक्त स्वभावाचा नव्हता तर बौद्धिकतेचा, क्षमतेचा आणि सामाजिक व्यवहाराचाही होता. एकाच मुशीतून (कॅच देम यंग!) माणसे तयार झाली की, त्यांच्या स्वभावाचे स्वरूपही निश्चित होईल असे मानणाऱ्यांमध्ये जे होते त्यात जसे नाझी वा फॅसिस्ट होते, तसेच कम्युनिस्टही होते आणि काही अति कट्टर विज्ञानवादीही होते. त्यांच्यातील मतभेदाचा मुद्दा हा होता की, ज्या मुशीतून ही ‘कर्तबगार’ आणि ‘अतिसक्षम’ माणसे तयार करायची ती मूस नेमकी कोण ठरविणार आणि त्या मुशीत फेरफार (भेसळ!) होणार नाहीत याची काळजी कशी घेणार?आपल्याकडेही थोडय़ा फार प्रमाणात मुस्लिम समाजात मदरसांमधून आणि संघपरिवारात शाखा सदृश संस्थांमधून माणसे घडवायचा-बिघडवायचा प्रयत्न झाला. अर्थातच त्यातून काही विशिष्ट राजकीय संस्कार व धर्माभिमान ठसले. पण तरीही ‘स्वभावशैली’ निश्चित झाल्या नाहीत. संघाच्या शाखेवर लहानपणापासून गेलेले कित्येक स्वयंसेवक किती भिन्न स्वभावांचे असतात आणि एकाच मदरशात वाढलेले दोन वा अधिक मुस्लिम तरुण किती वेगवेगळे वागतात, हे जसे सध्या त्यांच्या अनुभवाला येत आहे, तसेच ते रशिया-चीन या कम्युनिस्ट देशांमध्ये आणि नाझींच्या जर्मनीतही पूर्वी दिसून आले होते. स्वभाव घडविणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, ती स्वभावशैली व चाकोरी तो वा ती सोडत वा मोडत नाही ना, हे पाहणे जेव्हा आटोक्याबाहेर जाऊ लागले तेव्हा बंदुकीच्या, हुकूमशाहीच्या, दहशतीच्या जोरावर समाज-नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते, आजही होत आहेत. स्त्रियांवरती बहुतेक सामाजिक- सांस्कृतिक बंधने ही या ‘स्वभाव-नियंत्रणवादी’ हुकूमशहांकडून व दहशतवाद्यांकडून आली आहेत. मुद्दा फक्त मुलींच्या शिक्षणाचा, त्यांनी बुरखा घालावा की नाही याचा वा जीन्स-टीशर्ट घालण्याचा तसेच बॉबकट करावा की वेण्या घालाव्या इतपत नसतो. विधवांनी वपन करावे आणि कुंकू लावू नये, इतपतच ती बंधने नसतात. स्वभाव-नियंत्रणाची ती माध्यमे असतात. तालिबान्यांनी अफगाणिस्तानात आणि शीख अतिरेक्यांनी पंजाबमध्ये किंवा ब्राह्मण समाजात (अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या पुण्याच्या ब्राह्मण संमेलनातही) कुणी कसे राहावे, काय नेसावे, जानवे घालावे की नाही अशा चर्चा झाल्या त्या सर्व या जाचक स्वभाव-नियंत्रणाच्या प्रयत्नातून आलेल्या र्निबधाचा भाग आहेत. परंतु आजवर स्वभाव-नियोजन-नियंत्रण-नियमनाचे जे जे प्रयोग वा अघोरी प्रयत्न झाले ते सर्व फसले आहेत. तरीही ‘स्वभाव’ याबद्दलचे चिंतन, संशोधन चालूच आहे! त्याचा संदर्भ आहे माणसाच्या स्वातंत्र्याशी!
कुमार केतकर