आणखी एक हजार वर्षांनी किंवा पाच हजार वर्षांनी हे जग कसे असेल? (किंवा हे जग असेल की त्यापूर्वीच प्रलयात नष्ट झालेले असेल वा कधीतरी अणुयुद्धात बेचिराख झालेले असेल? असे प्रश्न सहसा आपल्याला त्रस्त करीत नाहीत. आपली नजर आपल्या संभाव्य आयुष्यमानापुरती वा फार तर तीन-चार पिढय़ा पुढे इतकीच जाऊ शकते. म्हणजे आणखी तीन-चारशे वर्षांनी काय असेल येथपर्यंत जाते. अमेरिकेत मात्र अशा प्रकारची भविष्यवेधी चर्चासत्रे नित्यनियमाने चालू असतात.
पण इतिहासाचा, अतिप्राचीन इतिहासाचा, प्राचीन वाङ्मयाचा अभ्यास करणारी संशोधक मंडळी शेकडो वर्षे मागे जातात. जीवशास्त्राचा आणि मानववंशशास्त्राचा ऐतिहासिक अभ्यास करणारे संशोधक, तर लक्षावधी-कोटय़वधी वर्षे मागे जातात. ‘ज्युरासिक पार्क’ हा चित्रपट फक्त करमणुकीसाठी काढला गेला नव्हता. लक्षावधी वर्षांपूर्वीचे जग ‘डीएनए’ प्रक्रिया करून, डायनॅसोरसहित, आज उभे करता येईल का, या अगदी वास्तव वैज्ञानिक प्रश्नामधून निर्माण झालेले ते कथानक होते. जगभरच्या कोटय़वधी लहान मुलांना आणि (मोठय़ांनाही), डायनॉसोरबद्दल कुतूहल व अभ्यासही करण्याचे वेड त्या चित्रपटामुळे लागले. (चित्रपट, टीव्ही नसताना, सुमारे १५० वर्षांपूर्वी, टारझनच्या कादंबऱ्यांनी जंगल जीवन, प्राचीन आफ्रिका आणि आधुनिक जीवन याबद्दल असेच वाचकांना झपाटून टाकले होते.) जर इतक्या प्राचीन भूतकाळात शिरून, हाडांचे सापळे वा अन्य अवशेष जमा करून, माणूस त्यावेळचे आपले जग विज्ञान आणि कल्पनाशक्तीने उभे करू शकतो, तर भविष्यातले का नाही? काही फिजिसिस्ट्स् म्हणजे पदार्थविज्ञानशास्त्रज्ञांनी तर पृथ्वीची, सूर्यमालिकेची आणि विश्वाचीच अखेर कशी होईल (म्हणजे प्रलय-अणुयुद्धांनी नव्हे, तर अगदी रीतसर, जन्म-वाढ-मृत्यू या चक्रानुसार) यावर ग्रंथ-निबंध-प्रबंध लिहिले आहेत. त्यावर चर्चासत्रेही झाली आहेत. त्या सर्व चर्चाना मुख्य आधार असतो, तो गणिताचा आणि आजवर झालेल्या सर्व शाखांतील वैज्ञानिक संशोधनाचा. पण मुख्य जिज्ञासा असते ती अशक्य, अगम्य, अथांग असलेल्या विश्वाची, जीवसृष्टीची आणि आपल्याला या गोष्टींचे आकलनच कसे होते (वा खरोखरच होते का?) या प्रश्नाची. पण माणसाने अगदी सुरुवातीपासून अशक्यतेचे आव्हान स्वीकारले आहे. आपण नेहमी एक सुविचार वाचत आलो आहोत- ‘जगात अशक्य असे काहीही नाही’, तरीही दैनंदिन जीवनात आपण अनेक गोष्टी ‘अशक्य’ असल्याचे म्हणत असतो. माणसाने गेली सुमारे (किमान) दहा हजार वर्षे शक्य-अशक्यतेच्या सीमा पुढे ढकलत, ढकलत नेल्या आहेत. हे माणसाला शक्य झाले ते त्याच्या प्रज्ञेच्या, कल्पनाशक्तीच्या आणि सामूहिक जीवनाच्या जोरावर. इतर कोणत्याही प्राण्याला शक्याशक्यतेच्या सीमा ओलांडता आलेल्या नाहीत.
काही हजार वर्षांपूर्वीचे वाघ, हत्ती वा हरीण जसे जीवन जगत होते, तसेच आजही जगतात. (याचा अर्थ त्यांना स्वत:चे ‘व्यक्तिमत्त्व’ नसते असे नाही. त्यांचा अभ्यास करणारे सर्वजण वाघ वा हत्ती वा अन्य प्राण्यांच्या स्वभाववैशिष्टय़ांविषयीही सांगतात. मुद्दा हा की त्यांना ‘काळा’चे परिमाण नसल्याने आणि प्रज्ञा/कल्पनाविस्ताराची क्षमता नसल्याने ते ‘अशक्यतेचे आव्हान’ स्वीकारू शकत नाहीत.) माणसाच्या अचाट कुतूहलामुळे आणि प्रयोगशीलतेमुळे, निरीक्षण आणि अनुभवाचा ‘डेटाबेस’ तयार केल्यामुळे त्या प्राण्यांच्या अस्तित्वाचा व जीवनशैलीचा अभ्यास करून माणसाने स्वत:च्या क्षमतेच्या पलीकडचे विश्व निर्माण केले आहे.
पक्ष्यांना उडताना पाहून, आपल्यालाही का उडता येऊ नये हा प्रश्न माणसाला पडला नसता, तर ‘थर्मोडायनॅमिक्स’चा अभ्यास करून, गुरुत्वाकर्षणाच्या मर्यादा ओलांडून, महाकाय आकाराचे विमान बनवून, एकाच वेळेस पाच-सातशे प्रवाशांना (त्यांच्या सामानसहित) उडणे शक्य झाले नसते. अगदी प्राचीन गुहांमध्ये काढलेल्या चित्रांतून आणि पुराणकथांमध्येसुद्धा माणसाने स्वत:च्या अनेक मर्यादांवर मात करणे शक्य होईल अशी चित्रे/कहाण्या रंगविल्या आहेत.
माणूस जन्माला आल्यापासून इतर प्राण्यांपेक्षा तसा असहाय आहे. जितक्या झपाटय़ाने मांजरांची पिल्ले, गायींची वासरे, वाघांचे बछडे इत्यादी प्राणी जन्माला आल्यानंतर ‘स्वतंत्र’ होतात, तसे माणसाचे नाही. पहिली १२-१५ वर्षे लहान मुले आई-वडील, कुटुंब, समाज (पूर्वी टोळ्या) यांच्यावर अवलंबून असतात. शिवाय माणसाला चित्त्यासारखे वा हरणासारखे वेगाने पळता येत नाही, वाघासारखे पंजे वा दात त्याला नाहीत, वानराप्रमाणे या झाडावरून त्या झाडावर झेपावता येत नाही, माशांप्रमाणे जन्मभर पाण्यात राहता येत नाही, पक्ष्यांप्रमाणे उडता येत नाही.. वगैरे वगैरे. या सर्व असहायतेतून मार्ग काढण्यासाठी माणसाने अशक्यतेवर मात करायचे ठरविले- म्हणजे अगदी विचारपूर्वक वा योजनाबद्धरीत्या नव्हे, तर निसर्गाने दिलेल्या क्षमता-अक्षमता ओलांडल्याखेरीज जगणेच शक्य होणार नाही म्हणून.
खरे म्हणजे आता तो प्राचीन माणसाला पडलेला प्रश्न उरलेला नाही. बहुतेक शारीरिक-नैसर्गिक मर्यादांवर माणसाने मात केली आहे असे म्हणता येईल. ‘जिनोम’ प्रकल्प सिद्ध झाल्यावर मधुमेहापासून कॅन्सपर्यंत आणि अगदी किडनी-लिव्हरपासून ते डोळ्यांच्या वा कानांच्या आजारावरही ‘विजय’ मिळविता येईल, असा आत्मविश्वास शास्त्रज्ञांना आहे. खरे म्हणजे, आता तर वैज्ञानिकांची झेप अमरत्व प्राप्त करता येईल, असे म्हणण्यापर्यंत गेली आहे.
ज्याप्रमाणे ‘ज्युरासिक पार्क’च्या माध्यमातून माणूस लक्षावधी वर्षे, माणसाच्या जन्माच्याही अगोदर कित्येक लक्ष वर्षे मागे गेला, त्याप्रमाणे ‘स्टार ट्रेक’ या चित्रमालिकेतून तो हजारो/लाखो वर्षे पुढे गेला. प्रकाशाच्या वेगालाही मागे टाकून, सूर्यमालिकेच्या सीमाच नव्हे, तर विश्वातील तारासमूहांनाही ओलांडून, ‘स्टार ट्रेक’चे प्रवासी विश्वसंचार करतात. असा विश्वसंचार जर माणसाचे आयुष्यमान कित्येक हजार वर्षांचे नसेल, ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तयार करता आला नसेल आणि अवकाशयानातील संगणक-संदेश यंत्रणा अक्षरश: पूर्णपणे स्वयंचलित नसेल, तर करताच येणार नाही. ‘स्टार ट्रेक’च्या कथेने, त्यातील प्रत्येक भविष्यकालीन पात्राने आणि वैज्ञानिकदृष्टय़ा त्यात असलेल्या शास्त्रशुद्धतेने अवघ्या जगाला इतकी मोहिनी घातली होती की, ‘ज्युरासिक पार्क’ प्रमाणे तीही एक ‘ग्लोबल इंडस्ट्री’ झाली. लहान मुले तर ‘स्टार ट्रेक’मधील प्रत्येक पात्राचे चरित्र, स्वभाव, बोलण्याची शैली यांची हुबेहूब नक्कल करू लागली होती. सर्व कार्टून चॅनल्सवरील ‘स्टार ट्रेक’सदृश कथा दाखविल्या जाऊ लागल्या. ज्या गोष्टी आपल्या आयुष्यक्रमात अनुभवण्याची शक्यता अजिबात नाही (अमरत्व वा विश्वसंचार) त्याबद्दल इतके वास्तव वाटावे असे आकर्षण आबालवृद्धांना का वाटते? त्या आकर्षणात जितका दुर्दम्य आत्मविश्वास आहे, तितकाच विज्ञान-तंत्रज्ञानावरील (अवास्तव!) विश्वासातही आहे.
नेमके हेच रहस्य उलगडण्यासाठी किंवा त्या ‘अशक्यते’चा शोध घेण्यासाठी अमेरिकेत एक हजार, पाच हजार वा दहा हजार वर्षांनंतरचे जग वा त्यावेळचे मानवी जीवन कसे असेल यावर चिंतन करण्यासाठी चर्चासत्रे आयोजली जातात. गंमत म्हणजे त्यात भाग घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला आपण केलेले अंदाज वा भाकीत किती खरे ठरेल, हे खात्रीलायकरीत्या समजण्याची अजिबात शक्यता नाही. मग हा नसता उपद्व्याप कशाला असे कुणीही विचारू शकेल.
आयझ्ॉक अॅलिमोव या जगद्विख्यात वैज्ञानिक-लेखकाने जेव्हा ‘फाऊंडेशन ट्रायॉलॉजी’ नावाची तीन खंडांची विश्वसंचाराची कादंबरी ३०-३५ वर्षांंपूर्वी लिहिली, तेव्हा तिचा प्रचंड बोलबाला झाला. त्याचप्रमाणे त्याने ‘फॅन्टास्टिक व्हॉयेज’ नावाची वैद्यकीय-विज्ञानाची कादंबरी लिहिली, तेव्हाही त्यातील शस्त्रक्रियांच्या शक्यतांवर बरीच उलटसुलट चर्चा झाली. पण या दोन्ही कादंबऱ्यांमधील संकल्पना व विज्ञान आज प्रत्यक्ष उपयोगात आणले जात आहे. विज्ञानाच्याच आधारे विज्ञान-साहित्य लिहिले जात होते, पण विज्ञान-साहित्याची झेप विज्ञानाच्याही मर्यादा ओलांडून जाऊ लागली होती.
असे असूनही ‘विज्ञान-साहित्या’ला ‘अभिजात साहित्या’चा दर्जा वा प्रतिष्ठा दिली जात नव्हती. काहीतरी सुरस, चमत्कारिक, अचाट, विकृत आणि अशक्यप्राय लिहून लोकांचे रंजन करणारे वा त्यांना भीती दाखविणारे साहित्य म्हणून विज्ञान-वाङ्मयाकडे पाहिले जात असे. अधिकृत मानले गेलेले विज्ञान-साहित्य नक्की केव्हा जन्माला आले, याबद्दलही मतभेद होऊ शकतात. ‘फ्रॅन्केस्टीन’ ही मेरी शेली हिची कादंबरी एक आद्य व अभिजात विज्ञान-साहित्यकृती मानली जाते. मेरी शेली ही जगप्रसिद्ध कविराज शेली यांची प्रेयसी व नंतर पत्नी. तिने वयाच्या १९ व्या वर्षी, १८१६ साली ही कादंबरी लिहिली.
खरे म्हणजे तेव्हा विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास फारसा झाला नव्हता. माणसाच्या जन्म-मृत्यूचे, थडग्यात पुरलेल्या शवाचे, त्या थडग्यातून ती व्यक्ती परत जन्माला येऊ शकेल का, याबद्दलचे चिंतन-संशोधनही तेव्हा झाले नव्हते. स्मशानाबद्दलची भीती, थडग्यातून कुणीतरी बाहेर येईल ही धास्ती, भूत-पिशाच्चाचे भय हे जगभर होतेच. पण वैज्ञानिकतेच्या आणि कल्पनाशक्तीच्या कसोटीवर ‘शास्त्रशुद्ध’पणे बेतली गेलेली ती पहिली कादंबरी आहे, असे विज्ञान-साहित्याचे अभ्यासक व इतिहासकार सांगतात.
गेल्या २०० वर्षांत शेकडो विज्ञान-कथा-कादंबऱ्या, चित्रपट-टीव्ही मालिका निर्माण झाल्या आहेत. पण अगदी आणि अलीकडच्या १९७० च्या दशकापर्यंत या वाङ्मय प्रकाराला रसिकांनी व समीक्षकांनी ‘मान्यता’ दिली नव्हती. विज्ञान-साहित्यात आघाडीवर होते अमेरिका, रशिया आणि इंग्लंड.
अमेरिका हा देश अगदी सुरुवातीपासून प्रयोगशीलतेबद्दल प्रसिद्ध आहे. काही जण तर छद्मीपणे म्हणतात की, युरोपातील रेनेसाँचा काळ संपत आला आणि जे युरोपियन अमेरिकेत स्थायिक झाले त्यांनी तेथे रुजवला. युरोपप्रमाणे अमेरिकेला दीर्घ इतिहासाच्या वा सांस्कृतिकतेच्या शृंखलांनी अडकवून ठेवलेले नव्हते. कोलंबस अमेरिकन भूमीवर उतरल्यापासून (१४९२) अमेरिकेचा इतिहास सुरू होतो, असे विधान सध्या प्रतिष्ठितपणाचे मानले जात नाही. कारण कोलंबसपूर्वी ज्या ‘नेटिव अमेरिकनां’च्या वस्त्या तेथे होत्या, त्यांना इतिहासातून बाहेर फेकण्याची वृत्ती त्यात दिसते, असे सध्या मानले जाते. परंतु आधुनिक इतिहासाची, विज्ञानाची सुरुवात साधारणपणे त्या सुमारास होती हे मान्य करायला हवे. विज्ञानपद्धती त्या शतकात रूढ झाली. किंबहुना सीमेपलीकडे जाऊन व्यापार करण्याची, त्यासाठी जहाजे बांधण्याची, दुर्बिणी शोधण्याची, दीर्घ प्रवासात बदलत्या हवामानाची शास्त्रशुद्ध नोंद घेण्याची, दिशांची, ऋतूंची, भूगोलाची कुतूहलवृत्ती तेव्हा झपाटय़ाने वाढू लागली.
अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढय़ानंतर (१७७६) तेव्हा नवीनच जन्माला आलेल्या त्या देशाला काही युरोपियन परंपरांच्या बेडय़ांमधून बाहेर पडायचे होते. पण धर्मश्रद्धा आणि अंधश्रद्धाही होत्याच, त्याचप्रमाणे वंशवाद आणि गुलामगिरीही. साधारणपणे अमेरिकन यादवीनंतर (अब्राहम लिंकन आणि १८६०-६५) तेथील विज्ञानाने-तंत्रज्ञानाने झेप घ्यायला सुरुवात केली. आजही सर्वार्थाने व सर्व विज्ञान शाखांमध्ये अमेरिकाच आघाडीवर आहे- आणि विज्ञान-साहित्यातही.
रशियात लेनिनप्रणीत कम्युनिस्ट क्रांतीनंतर विज्ञान-तंत्रज्ञानाला जे प्रचंड महत्त्व दिले गेले, त्यामुळे त्याही देशात विज्ञान-साहित्य, विज्ञान-चित्रपटांची एकच लाट आली. आपल्याला सहज लक्षातही येत नाही, पण हे सत्य आहे की शीतयुद्धाच्या काळात, रशिया-अमेरिकेतील स्पर्धेमुळे विज्ञान-तंत्रज्ञानात आणि समांतरपणे विज्ञान-साहित्यात जेवढी प्रगती झाली, तेवढी ‘शांतते’च्या काळात झालेली नाही. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व नंतर गेल्या ६० वर्षांत आलेले बरेच साहित्य त्या पाश्र्वभूमीवर तयार झाले आहे.
‘ज्युरासिक पार्क’चा संदर्भ ‘बायॉलॉजिक वॉरफेअर’शी म्हणजे जैविक शस्त्रास्त्रांशी जोडता येऊ शकेल. ‘स्टार ट्रेक’चा संदर्भ ‘स्टार वॉर्स’शी जोडता येईल. दीर्घ पल्ल्यांच्या अग्निबाणांचा आणि त्या अनुषंगाने प्रसिद्ध झालेल्या युद्ध-विज्ञान कादंबऱ्यांचा संदर्भ अवकाशातील स्पर्धा म्हणजे ‘स्पेस कॉम्पिटिशन’शी जोडता येईल.
‘द डे आफ्टर’- कार्ल सागान या विज्ञान लेखकाच्या अणुयुद्धाच्या शक्यतेतून लिहिली गेलेली कादंबरी व चित्रपट आणि चार वर्षांपूर्वी आलेला ‘द डे आफ्टर टुमॉरो’ हा चित्रपट (ग्लोबल वॉर्मिंग व क्लायमेट चेंज) हेही इशारे देणारे आहेत. म्हणजेच शक्याशक्यतेचे आव्हान पेलण्यासाठी विज्ञान-लेखकांनी सादर केले आहेत.
अशक्यतेचे आव्हान पेलण्यासाठी जसे आशावादी लागतात, तसेच निराशावादीही. निराशावादी इशारे देतात, भीती दाखवतात आणि आशावादी त्यावर मात करण्याचे मार्ग स्पष्ट करीत जातात.
कुमार केतकर
शनिवार, ३१ ऑक्टोबर २००९
This comment has been removed by a blog administrator.
ReplyDelete