गिलोटिनच्या पात्यावर..(त्रिकालवेध)

गिलोटिनच्या पात्यावर..
गिलोटिनच्या पात्यावर..बरोबर २२० वर्षांपूर्वी, म्हणजे १४ जुलै १७८९ रोजी, फ्रेंच राज्यक्रांती झाली आणि त्यामुळे फ्रान्सचाच नव्हे तर बऱ्याच प्रमाणात जगाच्या ‘सिव्हिलायझेशन’चा चेहरा-मोहराच बदलला. त्या क्रांतीच्या या वर्षीच्या वर्धापनदिनी भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग मुख्य पाहुणे म्हणून हजर होते. स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या घोषणा घेऊन क्रांती झाली. राजेशाहीचा शिरच्छेद झाला. अवघी फ्रेंच जनता त्या क्रांतीत सामील झाली होती, असे सांगितले जाते. त्या क्रांतीचे एक प्रतीक होते गिलोटिन. धारदार पाते असलेल्या एका ‘यंत्रा’च्या चाकांवरून दोरखंड खेचला की ते पाते क्षणार्धात सुमारे ३० ते ४० फुटांवरून विलक्षण वेगाने खाली येत असे. ज्याचा शिरच्छेद करायचा त्याचे डोके यंत्राच्या खालच्या ‘उंबरठय़ावर’ ठेवलेले असे. यंत्राजवळ उभे असलेल्या शिपायाने निर्देश केल्याबरोबर तो दोर खेचला जाई. वेग आणि पात्याची धार यामुळे निमिषार्धात डोके धडापासून वेगळे होते असे. जो कुणी क्रांतीच्या विरोधात असेल त्याला असा ‘गिलोटिन’ करण्यात येत असे. (या शिरच्छेदयंत्राला गिलोटिन हे नाव ते यंत्र बनविणाऱ्या डॉक्टर गिलोटिन याच्या नावावरूनच पडले होते! आजही हाच शब्द विधिमंडळातील मागण्यांवरची चर्चा नियंत्रित करण्यासाठी वापरला जातो!)हजारों ‘प्रतिक्रांतिकारकां’चा असा शिरच्छेद करण्यात आला. ती शिक्षा देणारे स्वत:ला स्वातंत्र्य-समतेची सर्वत्र प्रतिष्ठापना करणारे क्रांतिकारक समजत असत. परंतु त्या क्रांतिकारकांमध्ये अनेक गट होते. त्यातील काही गट एकमेकांच्या विरोधात होते. राजेशाही उलथून टाकल्यानंतर सत्तेची सूत्रे कुणी ताब्यात घ्यायची याबद्दल त्यांच्यात तीव्र संघर्ष होता. जो गट वरचढ ठरत असे तो प्रतिस्पर्धी गटाला ‘गिलोटिन’ करीत असे. अक्षरश: रक्ताचे पाट वाहिले आणि देशभर अराजक, हिंसाचार याचे थैमान सुरू झाले. ‘क्रांती’ १४ जुलै रोजी झाली खरी. पण त्यातून उद्भवलेला बेभान हैदोस पुढे १० वर्षे (१७९९ पर्यंत) चालू राहिला. फ्रान्सला काही प्रमाणात ‘स्थैर्य’ प्राप्त झाले ते नेपोलियन बोनापार्ट नावाच्या ज्येष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सत्तेवर कब्जा केला तेव्हा. पण ते ‘स्थैर्य’ही एक आभासच होता. नेपोलियनने त्या क्रांतीतील ऊर्जेचा उपयोग फ्रान्सचे साम्राज्य प्रस्थापित करण्यासाठी सुरू केला. सुमारे १५ वर्षे, म्हणजे १७९९ ते १८१५ नेपोलियनने युरोपात स्वाऱ्या करून आजुबाजूचे देश पादाक्रांत करण्याचा आणि जिंकलेल्या प्रदेशात त्याच्या अंकित राहतील अशा राजवटी प्रस्थापित करण्याचा सपाटा सुरू केला. अखेरीस ब्रिटिश, डच, बेल्जियम, प्रशियन-जर्मन (त्या काळी जर्मनी हा देश नव्हता. प्रशियात बहुसंख्य जर्मनवंशीय लोक होते.) अशा विविध प्रदेशातील फौजा व राजवटी एकत्र आल्या आणि त्यांनी नेपोलियनचा वॉटर्लू येथे दारुण पराभव केला. (वॉटर्लू हे बेल्जियमच्या दक्षिणेला १३ किलोमीटर आहे. अनेकांना वाटते की, ते इंग्लंडमध्ये आहे. विस्तारित लंडन महानगरात वॉटर्लू हे एक रेल्वे स्टेशन/परगणे आहे इतकेच.) त्यानंतर म्हणजे १८१५ नंतर नेपोलियनचे युरोपियन साम्राज्य लयाला गेले. विशेष म्हणजे सम्राटाच्या या पराभवानंतर आणि त्याला हेलेना नावाच्या बेटावर हद्दपार करून त्याला नजरकैदेत ठेवल्यानंतरही नेपोलियन नावाच्या दंतकथेचा दरारा युरोपभर होता. त्या नजरकैदेतच १८२१ साली हा महत्त्वाकांक्षी (पण अंतिमत: अयशस्वी) चक्रवर्ती मरण पावला. परंतु त्या घोषणेनंतर खुद्द फ्रान्समध्येही खऱ्या अर्थाने आजही स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या संकल्पना प्रस्थापित झालेल्या नाहीत- युरोपातही बहुतेक ठिकाणी नाहीत. संकल्पनांचा प्रभाव मात्र टिकला. युरोपात (मुख्यत: इंग्लंडमध्ये) कामगारवर्गाच्या चळवळींमागची प्रेरणा त्या संकल्पनांमध्ये होती. युरोपातील या कामगार चळवळींच्या आणि नवनवीन तंत्रज्ञानाच्या आधारे वाढणाऱ्या भांडवलशाहीच्या पाश्र्वभूमीवर कार्ल मार्क्‍सचे तत्त्वज्ञान आकार घेऊ लागले. फ्रेंच राज्यक्रांतीचा २२० वा वर्धापन दिन आणि ‘स्वातंत्र्य- समता- बंधुत्वा’च्या वैचारिक पर्वाची तेव्हा झालेली पहाट, हा सर्व इतिहास येथे सांगण्याचे कारण मात्र वेगळे आहे. गेल्या आठवडय़ात लेझेक कोलाकोवस्की या विचारवंताचे वयाच्या ८१ व्या वर्षी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या ज्ञान-परिसरात निधन झाले. कोलाकोवस्कींनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, आदर्श प्रशासन अशा संकल्पनांवर भाष्य करताना म्हटले की, कम्युनिस्ट विचारसरणी कितीही आदर्श व आकर्षक वाटली तरी तिच्यातील अंतर्विरोध इतका तीव्र आहे की तो सुटणे शक्य नाही.‘सिव्हिलायझेशन’च्या आधुनिक पर्वाला त्या संकल्पनांनी २२० वर्षांपूर्वी जन्म दिलेला असला आणि अक्षरश: लाखो लेखक, कवी, विचारवंत, वैज्ञानिक, राजकारणी मार्क्‍सवादाने भारून गेलेले असले तरी जोपर्यंत त्या (किंवा कोणत्याही) र्सवकष भासणाऱ्या तत्त्वज्ञानात अंतर्विरोध आहेत तोपर्यंत त्या विचारसरणीला अभिप्रेत असलेला ‘नवा समाज’ आणि ‘नवा माणूस’ घडणे शक्य नाही. कोलाकोवस्कींना आव्हान देणे सोपे नव्हते. ते स्वत: वयाच्या २० व्या वर्षी कम्युनिस्ट झाले. रशियात १९१७ साली झालेल्या क्रांतीनंतर लेनिन हे विश्वव्यापी ‘आयकॉन’ झाले. तोपर्यंतचे सर्व धर्म, विचारसरणी, परंपरा यांना मुळापासून आव्हान मिळाले आणि ‘प्रश्न केवळ या जगाचा अर्थ लावायचा नाही तर जग बदलण्याचा आहे’ हे मार्क्‍सवादी वचन सर्व राजकारण-समाजकारणात वारंवार उद्धृत केले जाऊ लागले. पोलंडमध्ये १९२७ साली जन्माला आलेल्या कोलाकोवस्कींवरही त्या विचाराचा प्रभाव पडला होता.कोलाकोवस्की हे अभिजात विद्वेषी कम्युनिस्ट नव्हते. परंतु ज्या कम्युनिस्ट पक्षांनी त्या तत्त्वज्ञानाला धर्मपीठ बनवायचा प्रयत्न केला आणि कार्यकर्ते म्हणजे धर्मप्रसारक करून टाकले, त्याच्या विरोधात कोलाकोवस्कींनी प्रथम वैचारिक बंड केले. स्वत: कार्ल मार्क्‍स आणि एंगल्स यांनीच वैचारिक स्वातंत्र्यासाठी संघर्ष केलेला असल्यामुळे, त्यांच्या नावाने चालणाऱ्या पक्षांमध्ये स्वातंत्र्याचा संकोच झालेला पाहून कोलाकोवस्की यांनी एक प्रबंध १९५६ साली लिहिला. त्याच वर्षी खुद्द रशियातच क्रुश्चेव यांनी स्टॅलिनवादाच्या विरोधात आघाडी उघडली होती. त्यामुळे जगभरच्या कम्युनिस्टांमध्ये एक मोकळे वातावरण तयार होऊ लागले होते. मार्क्‍सवादाचे तत्त्वज्ञान, कम्युनिस्ट पक्षाची रचना आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते- नेत्यांचा व्यवहार या तीन गोष्टी एकमेकांशी निगडित असूनही वेगवेगळ्या आहेत. कोलाकोवस्कींनी मार्क्‍सवादात अंतर्भूत असलेले विचारस्वातंत्र्य आणि मानवतावाद प्रत्यक्ष व्यवहारात आणण्याचे प्रयत्न सुरू करताच पोलीश ‘कम्युनिस्ट धर्मपीठाने’ त्यांची पक्षातून हकालपट्टी केली.कोलाकोवस्कींनी अनेक तात्विक व वैचारिक प्रश्न उपस्थित केले होते. त्यातील एक महत्त्वाचा प्रश्न होता भूतकाळ-वर्तमानकाळ व भविष्यकाळ यांच्यातील चिरंतन धाग्याचा. मार्क्‍सवादी-लेनिनवादी, म्हणजेच पर्यायाने कर्मठ कम्युनिस्ट असे मानतात, की इतिहासाचे काही निश्चित नियम आहेत. त्यानुसारच इतिहास घडतो. (हिस्टोरिकल डिटरमिनिझम्) कोलाकोवस्कींना हे ऐतिहासिकतेचे प्रमेय मान्य नव्हते. त्याचप्रमाणे कोलाकोवस्की यांच्या मते स्वातंत्र्य आणि समता एकत्रितपणे ‘अंमलात’ आणणे अशक्य आहे. समता हे सामाजिक-सांस्कृतिक मूल्य आपसूक रुजविता येणार नाही. म्हणजेच समता प्रस्थापित करण्यासाठी समाजातील अनेक वर्गाचा व थरांचा स्वातंत्र्य-संकोच करावा लागेल. कम्युनिस्टांना अभिप्रेत असलेली कामगारवर्गीय हुकूमशाही म्हणजे तशी समता रुजविण्यासाठी अंमलात आणलेली प्रशासनव्यवस्था. ही व्यवस्था नोकरशाही, पोलीस / लष्कर आणि सर्व स्तरांवर असलेली पक्षयंत्रणा. मिलोवान जिलास या अशाच स्वतंत्र विचाराच्या मार्क्‍सवादी पण उदारमतप्रणालीच्या भाष्यकाराने या वर्गाला ‘द न्यू क्लास’ असे संबोधले होते. सत्तेची सूत्रे या वर्गाच्या हातात गेल्यावर कार्ल मार्क्‍सला अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था निर्माण होणे शक्य नाही. कारण या वर्गाचे स्वत:चे हितसंबंध आणि सत्तेतील लाभार्थ तयार होतात. (हितसंबंध मोडणे किती कठीण असते हे गेल्या ४० वर्षांत आपण दोनदा पाहिले. माओंनी चीनमध्ये या ‘न्यूक्लास’च्या विरोधातच सांस्कृतिक क्रांतीचे आवाहन केले होते. त्या तथाकथित सांस्कृतिक बंडाचे काही महिन्यातच देशव्यापी अराजकात रुपांतर झाले. ती क्रांती मागे घेतली गेली. माओ १९७६ साली मरण पावल्यानंतर सांस्कृतिक क्रांतीने खलनायक ठरविलेले डेंग यांच्याकडे सत्तेची सूत्रे आली. (तीसुद्धा १९७६ ते १९७८ ही दोन वर्षे तीव्र सत्तासंघर्ष झाल्यावर) त्यांनी सुरू केलेला ‘लाल भांडवलशाही’चा प्रयोग सध्या शासकीय-पक्षीय हुकूमशाहीच्या माध्यमातून चीनमध्ये चालू आहे.सोव्हिएत युनियनमध्ये गोर्बाचेव्ह यांनी ‘ग्लासनोस्त’ म्हणजे लोकशाही आणि ‘पेरेस्ट्रॉयका’ म्हणजे पुनर्रचना १९८६-८७ साली रुजवायचा प्रयत्न केला. परिणामी १९९१ साली सोव्हिएत युनियनचे विघटन होऊन त्यातून १५ देश निर्माण झाले आणि कम्युनिस्ट राजवट संपली.स्वातंत्र्य म्हणजे फक्त निवडणुका नव्हेत हे जितके खरे तितकेच हेही खरे, की समता प्रस्थापित करण्यासाठी जर दमनयंत्रणा वापरावी लागली तर सर्वच स्वातंत्र्याचा संकोच होतो.कोलाकोवस्कींच्या मांडणीनुसार कम्युनिस्ट प्रशासकीय यंत्रणेत स्वातंत्र्य व लोकशाही संभवतच नाही. मार्क्‍स व लेनिन यांनी अनेक वेळा, फ्रेंच राज्यक्रांतीने दिलेल्या ‘स्वातंत्र्य-समता-बंधुत्व’ या संकल्पना व मूल्यांना तात्विक स्थान दिले आहे; पण व्यवहारात आला तो स्टॅलिनवाद आणि बलदंड कम्युनिस्ट नोकरशाही. शिवाय फ्रेंच राज्यक्रांतीने ती मूल्य रुजविली नाहीतच. त्या क्रांतीने जन्माला घातला ‘गिलोटिन’वाद. त्याची परिणती झाली नेपोलियनच्या हुकूमशाहीत आणि फ्रान्सच्या साम्राज्यवादात.रशियात भांडवलशाहीची मुळे रुजण्याअगोदरच साम्यवादी क्रांती झाली आणि चीनमधली क्रांती तर मुख्यत: शेतकरी क्रांतीच होती. म्हणजेच मार्क्‍स-लेनिनप्रणीत इतिहासाचे प्रमेय चूक ठरले. सोव्हिएत युनियनमधील व्यवस्था लयाला गेल्यावर अधिक प्रगल्भ समाज व प्रशासन निर्माण होण्याऐवजी तेथेही ‘लुटारू भांडवलशाही’ आली. कोलाकोवस्कींच्या म्हणण्याप्रमाणे इतिहासाला नियम असूच शकत नाहीत- ते आपण केलेले इतिहासावरचे कलम आहे. आपण भविष्य पूर्णपणे ठरवू शकत नाही. कारण भविष्याला अस्तित्वच नाही. त्यामुळे ‘फ्युचरॉलॉजी’ हे एक अमूर्ततेचे ‘त्रिकालवेधी’ निरुपण आहे!कोलाकोवस्की यांच्याच शब्दात..“Futurology, on my definition, is a very serious science whose subject is not only nonexistent but necessarily non-existent: for the future does not exist and never will. We would not find this worrying if it did not immediately bring to our attention an analogous but more terrifting insight: namely, that the past does not exist either. The past by definition is an ocean of events that once happened; and those events are either retained in our memory, that is to say they exist only as part of our psychological reality, or reconstructed by us on the basis of our present experience- and it is only this present experience, our present reconstruction of the past, that is real, not the past as such. In other words, the entire realm of the past exists only as a portion of our (or strictly speaking, my) consciousness; the past in itself is nothing.”कुमार केतकर

चंद्र होता साक्षीला (लोकरंग)


अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग व आल्ड्रिन यांनी ४० वर्षांपूर्वी, २० जुलैला चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, तेव्हा वैज्ञानिक सिव्हिलायझेशनचे एक नवे पर्व सुरू झाले, हे खरे. परंतु, अमेरिकेने घेतलेल्या या वैज्ञानिक झेपेला संदर्भ होता रशियाशी असलेल्या स्पर्धेचा आणि शीतयुद्धाचा. किंबहुना, त्या वैज्ञानिक प्रगतीला कायमच शीतयुद्धाचे अस्तर होते. मानवाने प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवण्यापूर्वीच्या वैज्ञानिक घडामोडींचे राजकीय संदर्भ समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे आहे, म्हणजे पुढील वाटचालीचा अर्थ लागू शकतो. चंद्राच्या शीतलतेला शीतयुद्धाची प्रखरता लाभली त्यामुळे त्या सर्व घडामोडींना ‘चंद्र होता साक्षीला’ असं म्हणता येईल. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्यामागील राजकीय नाटय़ आणि त्यानंतरच्या चार दशकात त्या दिशेने झालेली वैज्ञानिक प्रगती यातून आता चंद्र मानवाच्या साथीलाच आलेला आहे. या सगळ्याचा वेध घेणारे हे दोन लेख!
माणूस चंद्रावर गेला आणि त्यानंतर अवघ्या विश्वाला प्रत्यक्ष गवसणी घालण्याची स्वप्ने पाहू लागला- परंतु याची मूळ प्रेरणा केवळ कुतुहल आणि ज्ञान ही नव्हती, तर १९४९ साली सुरू झालेल्या अण्वस्त्रसिद्ध शीतयुद्धात होती. किंबहुना आजही बहुतेक अवकाशयान प्रकल्प आणि विश्वसंशोधन तशाच प्रेरणांनी प्रवृत्त झालेले आहे.

कित्येकांना, त्यांच्या मानसिक मांद्यामुळे आणि इतिहासाबद्दलच्या बेपर्वाईमुळे, शीतयुद्धाचे असे सर्वंकष संदर्भ अर्थशून्य वा हास्यास्पद वाटतात. काही सत्प्रवृत्त विज्ञानप्रेमींना चंद्रावरची स्वारी हे साहस आणि ज्ञानसाधनेची जिद्द वाटते. ते साहस आणि ती साधना आहेच, पण जर त्यांना शीतयुद्धाचे परिमाण नसते, तर माणूस ४० वर्षांपूर्वी या आठवडय़ात, तो चांद्र-पराक्रम करू शकला नसता.
शीतयुद्धाची तुतारी फुंकल्यानंतर फक्त २० वर्षांंनी माणसाने चंद्रावर पाऊस ठेवावे, यावरून युद्ध आणि विज्ञान या गोष्टी किती घट्टपणे एकत्र विणल्या गेल्या आहेत, हे लक्षात येऊ शकेल.
युद्धाचा आणि विज्ञानाचा (म्हणजे वैज्ञानिक प्रगतीचा, तसेच विनाशकारी संशोधनाचा) घनिष्ठ संबंध अगदी ‘सिव्हिलायझेशन’च्या सुरुवातीपासूनच असला, तरी दुसऱ्या महायुद्धानंतर तो कितीतरी पटींनी अधिक विस्तारत राहिला. राईट बंधूंनी १९०३ साली बनविलेले विमान फक्त १२ सेकंद हवेत राहिले होते आणि ते सुद्धा फक्त काही फूट उंचीवर. त्यांची जिज्ञासा आणि जिद्द पूर्णपणे विज्ञान-तंत्रज्ञानाची होती. परंतु त्यांना अर्थातच तेव्हा कल्पना नव्हती, की काही वर्षांतच त्यांचे वैज्ञानिक यश युद्धासाठी जुंपले जाणार होते. पहिल्या महायुद्धातच (१९१४-१९) ‘वायुदला’चा वापर करून हवेतून शत्रू सैन्यावर गोळीबार करण्यात आला आणि हॅन्ड ग्रेनेड्स व छोटे बॉक्स् फेकण्यात आले, ते विमानाचा शोध लागल्यानंतर १२ वर्षांंनीच.
दुसऱ्या महायुद्धात रीतसर वायुदलेच संघटित केली गेली होती. म्हणजे राईट बंधूंच्या यशस्वी प्रयोगानंतर ३६ वर्षांंनी (१९३९-४५). हवाई प्रवासाच्या संशोधनात जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिकेने चांगलीच आघाडी मारली होती आणि आता त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती, ती अणुशक्ती निर्माण करण्याची आणि रॉकेट निर्मितीची.
दुसरे महायुद्ध अधिकृतपणे संपले ते हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून ती शहरे बेचिराख केल्यानंतर (६ आणि ९ ऑगस्ट १९४५)! अमेरिकेने त्या अगोदर चार वर्षे अणुसंशोधन आणि अणुविभाजनाच्या प्रयोगांना गुप्तपणे सुरुवात केली होती. प्रकांड प्रज्ञेचे वैज्ञानिक आणि तरबेज तंत्रज्ञ त्या महाप्रकल्पात गुंतलेले होते. जर हिटलरच्या म्हणजे नाझींच्या हातात अणुबॉम्ब आला असता तर त्याच्या जोरावर, संपूर्ण जगावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तेव्हाच्या जर्मनीने केला असता.
परंतु दुसऱ्या महायुद्धात नाझींचे पूर्ण निर्दालन झाले आणि हिटलरला, युद्धाच्या अखेरीस, ३० एप्रिल १९४५ रोजी स्वत:च्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करावी लागली. जर्मनीचा पूर्ण पाडाव झाल्यानंतरही जपान शरण न आल्यामुळे अमेरिकेला निर्वाणीचे अस्त्र म्हणजे अणुबॉम्ब वापरावा लागला. तेव्हा फक्त अमेरिकेकडे अणुबॉम्ब होता. परंतु नाझी जर्मनीचा पराभव करण्यासाठी स्टॅलिन, चर्चिल आणि रुझवेल्ट (म्हणजे रशिया, ब्रिटन आणि अमेरिका) एकत्र आले होते आणि त्यामुळे त्यांच्यातील शत्रुत्वाला शीतयुद्धाचे रूप अजून आलेले नव्हते. जरी ‘मित्र’शक्ती म्हणून ते एकत्र आलेले असले तरी त्यांच्या विचारसरणी, त्यांचे राष्ट्रवाद आणि परस्परांबद्दलचे संशय त्या सर्वांच्याच मनात ठसठसत होतेच, म्हणूनच कम्युनिस्ट रशियाने स्वत:चे स्वतंत्र अणुसंशोधन सुरू केले होते. एकटय़ा अमेरिकेकडे अणुबॉम्ब असणे हा रशियाला धोका होता.
त्यानंतर चारच वर्षांंनी, म्हणजे १९४९ साली, रशियाने स्वत:ची अणुस्फोट चाचणी केली आणि लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शीतयुद्धाला सुरुवात झाली. त्यातूनच निर्माण झाली अमेरिका आणि रशिया यांच्यातील ‘महासत्ता-स्पर्धा’. त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी- आणि ती जिंकण्यासाठी युद्ध-तंत्र आणि विज्ञानात आघाडी असणे जितके आवश्यक होते, तितकीच आवश्यकता होती ती अधिकाधिक देश आपल्या बाजूने असण्याची. म्हणजेच केवळ रॉकेट्स् वा अणुबॉम्ब जवळ असून आपली अधिसत्ता प्रस्थापित होणार नाही, तर आपल्या गटात कीती लहान-मोठे देश सामील होतात त्यावर त्या शीतयुद्धातील सामथ्र्य ठरणार होते. त्याच वर्षी चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती यशस्वी झाली आणि शीतयुद्धाचे भौगोलिक संदर्भ निश्चित झाले.
आजच्या सर्व जागतिक राजकारणाचे, विज्ञानाचे आणि अगदी साहित्य-संस्कृतीचे संदर्भही १९४९ साली सुरू झालेल्या त्या महासत्ता-संघर्षांशी निगडीत आहेत. चीनमधील क्रांतीच्या पाठोपाठ कम्युनिस्ट उत्तर कोरियाने दक्षिण कोरियात सैन्य पाठविले- अर्थातच रशिया व चीनच्या मदतीने! उत्तर कोरियाची ती लष्करी कारवाई म्हणजे थेट अमेरिकेला आव्हान होते.
आज त्या कोरियन युद्धाची आठवणही पुसट झालेली आहे. परंतु १९५०-१९५३ या तीन वर्षांच्या काळात जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठय़ावर आले होते. म्हणजे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आठच वर्षांंनी. उत्तर कोरियाला नामोहरम करण्यासाठी अमेरिका पुन्हा अणुबॉम्ब वापरायच्या विचारात होती. (मधल्या काळात अमेरिकेने हायड्रोजन बॉम्ब बनविण्यातही यश प्राप्त केले होते.. आज उत्तर कोरियाच अण्वस्त्र सज्ज झाला आहे, आणि त्याने अमेरिकेलाच आव्हान दिले आहे. या आव्हानाची मुळे ६० वर्षांंपूर्वीच्या त्या युद्धात आहेत. असो.)
प्रश्न फक्त बॉम्ब बनविण्याच्या क्षमतेचा नसतो. तर तो बॉम्ब क्षेपणास्त्रांवर आरूढ करून अचूक दिशेने सोडण्याच्या तंत्राचा असतो. म्हणजेच रॉकेट तंत्राचा. विमानातून बॉम्ब टाकणे वेगळे आणि सुसज्जक्षेपणास्त्रांनी अवकाश-हल्ला करणे वेगळे. ‘रॉकेट सायन्स’चा विकास मुख्यत: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला होता. जर्मनीच्या पराभवानंतर तेथील रॉकेट-तज्ज्ञ/वैज्ञानिक हे अमेरिका वा रशियात गेले होते. (म्हणून काही पत्रपंडित कुचेष्टेने तेव्हा म्हणत की दोन्ही देशातील क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान मुख्यत: जर्मनच आहे. या विधानात पूर्ण तथ्य नसले तरी काही प्रमाणात ते सत्य होते!)
जर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर पूर्ण कब्जा प्रस्थापित केला असता तर अमेरिकेने कोरियावरच नव्हे तर चीननरही अणुबॉम्ब टाकला असता. कदाचित रशियावरही. कारण अमेरिकेला धास्ती होती ती कम्युनिझमच्या तेव्हाच्या वाढत्या प्रभावाची. हो चि मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट व्हिएतनामने वसाहतवादी फ्रान्सचा दारूण पराभव केल्यामुळे अमेरिकेची ती धास्ती वाढली होती. फक्त अमेरिकेची नव्हे तर संपूर्ण युरोपची ती धास्ती होती. त्यामुळेच त्या शीतयुद्धाला ‘पूर्व विरुद्ध पश्चिम’ असेही रूप प्राप्त झाले होते. सोविएत युनियनने आशिया-आफ्रिका व लॅटिन अमेरिका येथील स्वातंत्र्य लढय़ांना पाठिंबा दिल्यामुळे ‘पूर्व’ अधिक समर्थ झाला होता. पाश्चिमात्यांचा गर्व असा होता की ते ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान-साहित्य-संस्कृती म्हणजे ‘सिव्हिलायझेशन’च्या दृष्टीकोनातून आशियन-आफ्रिकनांच्या खूप पुढे आहेत. कम्युनिझम हे मागासलेल्या व अप्रगत देशांचे तत्त्वज्ञान आहे असेही या पाश्चिमात्यांना वाटत असे.
१९४९ साली रशियाने केलेल्या अणुस्फोट चाचण्यांमुळे आणि उत्तर कोरियाच्या चढाईमुळे पाश्चिमात्यांच्या त्या गर्वाला तडा गेला होता. जगाची अशी नवी नेपथ्यरचना होत असतानाच रशियाने एक जबरदस्त दणका त्या जागतिक रंगमंचाला दिला. चार ऑक्टोबर १९५७ रोजी कम्युनिस्ट रशियाने १८४ पौंड वजनाचे एक स्पुटनिक-अवकाशयान-अंतराळात पाठविले. तोपर्यंत पृथ्वीच्या कक्षा भेदल्या गेल्या नव्हत्या. विमानाच्या शोधाने हवाई प्रवास शक्य झाला होता. ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे ‘जेट’ विमान अस्तित्वात आले होते. रॉकेटचे तंत्रज्ञान विकसित झाले होते, परंतु पृथ्वीची कक्षा भेदून अंतराळात सोडलेला तो पहिला स्पुटनिक होता. जेव्हा ती बातमी अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाली तेव्हा तेथील राजकारण्यांचे आणि वैज्ञानिकांचे धाबेच दणाणले. (‘न्यूयॉर्क टाइम्स’ने संपूर्ण पानभर फक्त त्याच बातमीची तीन-ओळींची ठसठशीत हेडलाइन दिली- ‘सोविएत युनियनने अंतराळात उपग्रह सोडला.. तो दरताशी १८,००० मैल या वेगाने पृथ्वीप्रदक्षिणा करतो आहे.. अमेरिकेचा सर्व भूप्रदेश आता सोविएतांच्या नजरेत आला आहे..’)
अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष आयझेनहॉवर यांनी या रशियन आव्हानाला कसे तोंड द्यायचे यावर विचार करण्यासाठी तातडीने कॅबिनेट बैठक बोलावली. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांचीही लगेच खलबते सुरू झाली. या दणक्यातून युरोप-अमेरिका सावरायच्या आतच रशियाने आणखी एक स्पुटनिक अंतराळात सोडला- तीन नोव्हेंबर १९५७. म्हणजे अक्षरश: महिन्याभराच्या आत. विशेष म्हणजे हा दुसरा स्पुटनिक पहिल्यापेक्षा वजनाने सातपट मोठा होता आणि त्याहूनही सनसनाटी गोष्ट म्हणजे या अवकाशयानात लायका नावाची एक शिकविलेली कुत्रीही होती. त्यानंतर सुमारे २० महिन्यांनी रशियाने तिसरा स्पुटनिक अंतराळात सोडला. त्यात दोन कुत्रे आणि एक ससाही पाठविला होता. दीर्घकाळ पृथ्वीच्या कक्षेबाहेर, गुरुत्त्वाकर्षणहीन स्थितीत राहिल्यावर जीवसृष्टीवर काय काय परिणाम होऊ शकतील याचा अभ्यास करणे त्यामुळे शक्य होणार होते.
अमेरिकेचा सगळा आत्मविश्वास ढासळला तो त्यानंतर म्हणजे १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने मानवरहित अवकाशयान अचूकपणे चंद्रावर उतरविले तेव्हा. या स्पुटनिक-अंतराळ क्रांतीने अवघे जग स्तिमित झाले होते. ‘मागासलेल्या’ कम्युनिस्ट रशियाची वैज्ञानिक प्रतिष्ठा प्रचंड प्रमाणात वाढली होती. स्वत:च्या वैज्ञानिक प्रगतीच्या व ‘सिव्हिलायझेशन’च्या घमेंडीत असलेल्या अमेरिकेला अंतराळस्पर्धेत रशियाने मागे टाकले होते.
खरे म्हणजे अमेरिकेने रीतसर स्पर्धा सुरू करण्यापूर्वीच रशियाने ‘नॉक आऊट’ विजय संपादन केला होता. वरवर पाहता हे स्पुटनिक म्हणजे एक प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग होते, परंतु प्रत्यक्षात रॉकेट सायन्स, क्षेपणास्त्रांची झेप व क्षमता, संपूर्ण पृथ्वीवर नजर ठेवू शकेल, अशी उपग्रह-रचित-हेरयंत्रणा अशा अनेक बाबी त्यात अनुस्यूत होत्या.
रशियाने १९४९ साली अणुस्फोट चाचणी केल्यानंतर फक्त १० वर्षांंनी, १९५९ साली, चंद्रावर मानवरहित यान उतरविले होते. अमेरिकेचा ‘स्पेस प्रोग्रॅम’ तर तेव्हा अगदीच प्राथमिक अवस्थेत होते. त्यांनी बनविलेले बहुतेक उपग्रह अंतराळात जायच्या आतच पडत होते, तुटत होते, फसत होते. अध्यक्ष आयझेनहॉवर यांना तर अंतराळस्पर्धाच व्यर्थ वाटू लागली होती. विजीगिषू वृत्तीच्या अमेरिकन माणसाला रशियन आघाडीमुळे न्यूनगंड वाटू लागला होता. पहिला अणुबॉम्ब बनविणाऱ्या आणि विज्ञानाची ध्वजा तोपर्यंत आपल्याच हातात ठेवणाऱ्या अमेरिकेला हा धक्का प्रचंड होता. या दणक्यांमुळे शीतयुद्धातील सत्ता समतोलाचे गणित पूर्ण बदलून गेले. इंग्लंड-अमेरिकेतील (मुख्यत: अर्थातच अमेरिकेतील) युद्धतज्ज्ञ व मुत्सद्यांच्या एकापाठोपाठ एक बैठका सुरू झाल्या. तिसरे महायुद्ध सुरू झालेच तर त्यात रशिया पूर्णपणे वरचढ असू शकेल, असे सर्व अमेरिकनांना वाटू लागले. आपल्याकडे अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्ब असूनही, उपग्रह व क्षेपणास्त्रे- एकूणच रॉकेट सायन्स यात आपण निष्प्रभ ठरलो आहोत, असे अमेरिकनांचे मत झाले. रशिया अर्थातच अमेरिकेवर हल्ला करील या भीतीने मोक्याच्या व महत्त्वाच्या ठिकाणी भूमीगत संरक्षणसिद्ध अशा आधुनिक ‘गुहा’ बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला गेला. आकस्मिक क्षेपणास्त्र हल्ला वा बॉम्ब हल्ला झाल्यास जनतेने काय काय करावे, याचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाऊ लागले. भुयारी रेल्वेचे प्लॅटफॉम्र्स तशा आणीबाणीत कसे वापरायचे यावर रेडिओ-वृत्तपत्रात चर्चा होऊ लागल्या. (टीव्ही तेव्हा तितका सर्वव्यापी नव्हता.) ही सर्व बचावात्मक पावले उचलली जात असतानाच रशियाचे आव्हान शिंगावर घ्यायचा विचारही आकार घेऊ लागला. या पाश्र्वभूमीवर १९६० साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका झाल्या. आयझेनहॉवर हे त्यांची आठ वर्षांंची कारकीर्द संपवून निवृत्त होणार होते. त्यांचे उपाध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जॉन केनेडी यांच्यात अटीतटीची निवडणूक झाली. केनेडी निवडून आले ते याच आश्वासनावर, की अमेरिका आता रशियाच्या आव्हानाला यशस्वीपणे तोंड देईल.
सूत्रे हाती घेतल्याबरोबर १९६१ साली जॉन केनेडी यांनी सविस्तर योजना व वेळापत्रकच जाहीर केले- दशक संपायच्या आत म्हणजे १९७० च्या आत अमेरिकेचा माणूस चंद्रावर उतरील. याच काळात अमेरिकेची अण्वस्त्र व क्षेपणास्त्र सज्जताही वाढविली जाईल. एकूणच शिक्षणपद्धतीत आवश्यक ते बदल करून विज्ञान-तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात येईल. युद्धासाठी लागणारी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने, कम्युनिकेशन सिस्टिम्स, नौदल, अण्वस्त्रधारी पाणबुडय़ा, कॉम्प्युटर्स, रोबोज्, स्वयंसिद्ध क्षेपणास्त्रे आदी गोष्टींवर संशोधन व त्यांची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती सुरू झाली.
चंद्रावर उतरून तेथे राहायची मानसिक, शारिरीक, वैज्ञानिक तयारी असलेले चांद्रवीर तयार करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला. हा व्यापक अंतराळ प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयोगशाळा आणि कम्युनिकेशन सिस्टिम्स् सिद्ध केल्या गेल्या. या अजस्त्र आणि आक्राळविकाळ यंत्रणेसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होणार होते. ते नववसाहतवादी धोरणातून, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गडगंज नफ्यांमधून, शस्त्रास्त्रांच्या विक्रीतून मिळवायचे ठरले. त्यातूनच अमेरिकेचा नव-साम्राज्यवाद आणि नवी युद्धनीती निर्माण झाली. या सर्व जगड््व्याळ ‘मिलीटरी-इंडस्ट्रीयल कॉम्लेक्स’साठी खनिज तेलाची प्रचंड गरज निर्माण झाली. त्यातूनच अरब देशातील लष्करी व राजकीय हस्तक्षेपाला सुरुवात झाली. जगातील बहुतेक देशांमधील ऊर्जास्त्रोत आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर कब्जा करायला अमेरिकेने सुरुवात केली.
आज जगातील अशांततेला, युद्धाला, विनाशकारी शस्त्रास्त्रनिर्मितीला नव्याने सुरुवात झाली ती तेव्हापासून. परंतु त्या युद्धनीतीच्या परिणामी खुद्द अमेरिकेत अस्वस्थता वाटू लागली. अजस्त्र युद्धयंत्रणा अजूनही व्हिएतनाम-कंबोडिया ते अफगाणिस्तान-इराक कुठेच विजय संपादन करता न आल्याने त्या भस्मासुरी अर्थव्यवस्थेचा हात अमेरिकेच्याच डोक्यावर आला.
आज बराक हुसेन ओबामांच्या खांद्यावर त्या शीतयुद्धाचे ओझे आहे. ४० वर्षांपूर्वी २० जुलै १९६९ रोजी मानव चंद्रावर उतरून एक नवे वैज्ञानिक-सिव्हिलायझेशनचे पर्व सुरू झाले खरे, पण गेल्या ४० वर्षांतील शीतयुद्धाने आपले सर्वांचे जीवन पूर्ण वेढले गेले!
कुमार केतकर

अर्थपूर्ण भासे मजला प्रश्न जीवनाचा..

अर्थपूर्ण भासे मजला प्रश्न जीवनाचा..

आपल्याला सर्वानाच सतत कसले ना कसले प्रश्न पडत असतात. इतके प्रश्न आणि इतक्या प्रकारचे. आपण सारखे ते प्रश्न सोडविण्याच्याच मागे असतो. काही तात्कालिक तर काही तात्त्विक! काही नैतिक तर काही भौतिक! काही आपणच निर्माण केलेले प्रश्न तर काही परिस्थितीने लादलेले! नळाला दोन दिवस पाणी येणार नाही. काय करायचे? टी. व्ही. बंद पडलाय, केबलवाल्यांचा संप आहे, वीज जाऊन तीन तास झाले आहेत, घरात मेणबत्ती आहे पण सापडत नाही.. गाडय़ा बंद आहेत, अपॉइण्टमेण्ट १० वाजताची आहे, पोहोचणे शक्य नाही; येथपासून पुढच्या आठवडय़ात परदेशी जायचे आहे, पण अजून पासपोर्ट नाही, किंवा पासपोर्ट आहे पण व्हिसा नाही, दोन्ही आहे पण एअरलाइन्स ‘फुल’ आहेत.. असे विविध प्रकारचे तात्कालिक प्रश्न. ते सोडवावेच लागतात- नाहीतर सोडून द्यावे लागतात!
कधी कधी तात्कालिक प्रश्न इतका कल्लोळ करतात, की त्यातून एकदम तात्विक प्रश्न तयार होतात. काय करायचे आहे परदेशी जाऊन? आगरकरांना अभ्यास करायला कुठे विजेचे दिवे होते? नाही बघितला टी. व्ही. चार दिवस तर काय बिघडले? आपल्या लहानपणी कुठे होता टी. व्ही.? आई-वडिलांच्या लहानपणी तर त्यांच्याकडे रेडिओ पण नव्हता. उगीच आपण आपल्या ‘नस्त्या’ गरजा वाढवून ठेवल्या आहेत.. जीवन अगदी साधे, कमीत कमी गरजांचे, विरक्त असले पाहिजे. नाहीतरी या जीवनाला अर्थ काय? हेतू काय?
सर्व माणसे अशी तात्कालीक आणि तात्त्विक प्रश्नांच्या झोक्यांवर सतत फिरत असतात. या कल्लोळात असतानाच मधूनच कुठच्या तरी प्रश्नांच्या संज्ञाप्रवाहात माणसे घुसतात आणि एकदम मूलभूत नैतिकतेच्या प्रश्नांमध्ये अडकतात. आपण ‘तसे’ वागायला नको होते, आपण पैसे घ्यायला (वा द्यायला) नको होते, आपण मित्रांशी / मैत्रिणींशी, घरातल्यांशी, शेजाऱ्यांशी असे फटकून राहणे योग्य नाही, ‘परस्त्री’ वा ‘परपुरुषा’विषयी आपल्या मनात ‘तसले’ विचार का आले. आपण चांगले वागले पाहिजे, आपले चारित्र्य शुद्ध असले पाहिजे, कुणीही आपल्याबद्दल ‘ब्र’ ही काढता नये.. वगैरे वगैरे.

बहुतेक नैतिकतेच्या प्रश्नांना भौतिकतेचे प्रश्न असा छेद देतात, की निमिषार्धात नैतिकता कोसळते, भौतिकता जिंकते! ‘अमुक माणसाला दोनशे रुपये दे आणि दिवसभरात पासपोर्ट घरी येईल. उगीच जीवाला ताप करून घेऊ नकोस!’ किंवा ‘तमुक व्यक्तीला भेट- नोकरी / प्रमोशन / ट्रान्स्फर नक्की. आता तुझी ती गरज आहे- उगीच फालतू नैतिकतेचा आव आणून ‘मी कुणाला भेटणार नाही- वशिला लावणार नाही,’ असे म्हणत बसशील तर नोकरी / प्रमोशन इ. हातातून जाईल! किंवा ‘वेटिंग लिस्ट नंबर ११४ आहे- डोण्ट वरी. सरळ स्लिपर कोचमध्ये जा. टीसीला पटव. होऊन जाईल.’
प्रत्येक माणसाला अशा भौतिक-नैतिक प्रश्नांतून जावेच लागते. काही मंडळी त्याला ‘प्रारब्ध’ म्हणतात. काही मंडळी या वा इतर प्रश्नांकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहतात. जीवशास्त्राचा आणि मानववंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते यातील काही भौतिक प्रश्न प्राण्यांना वा कीडा-मुंग्यांनाही पडतात पण त्यांना ‘नैतिकते’चे प्रश्न भेडसावत नाहीत. हरिणाची शिकार केल्यानंतर वाघाला ‘गिल्टी’ वाटत नाही. भूक लागल्यानंतर शिकार करणे आणि तहान लागल्यानंतर पाण्याच्या शोधात फिरणे हे निसर्गदत्त शारीरिक तर्कशास्त्रानुसार घडते. म्हणजेच सर्व प्राणिमात्र तर्काचा वापर करतातच. मुंगी असो वा मांजर, ससा असो वा कासव, मासा असो वा हत्ती- सर्व प्राणिमात्रांना ‘उदरनिर्वाहा’साठी जिवंत राहण्यासाठी व पुनरुत्पादनासाठी तर्कशास्त्राचा, अनुभवाने आलेल्या ‘शहाणपणाचा’ आणि त्यानुसार संभाव्य धोक्यांचा विचार करावाच लागतो; पण त्यात जसे काही ‘तात्त्विक’ वगैरे नसते, तसेच ‘नैतिक’ही नसते. त्यांच्या कृतीला (एका मर्यादेबाहेर) भूतकाळ व भविष्यकाळाचे परिमाण नसल्यामुळे, प्राण्यांचे प्रश्नविश्व मर्यादित असते. त्यांचे बहुतेक प्रश्न त्या दृष्टीने तात्कालीक स्वरूपाचेच असतात; परंतु त्यांचे संवेदना-विश्व, अनुभवपट त्यांचा ‘लर्निग पॅटर्न’ (उदा. त्या त्या जातीचे पक्षी त्यांच्याच पद्धतीचे घरटे बांधायला कसे शिकतात वा मुंग्यांना वारुळ बांधण्याचे तंत्रज्ञान कोण शिकविते?) जीवशास्त्रातील या सर्व ‘कॉम्प्लेक्स सिस्टिम्स’ आहेत. म्हणजे प्रत्येक किडा-मुंगी-प्राणी-पक्षी-मासे यांचे स्वत:चे असे एक ‘कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर’ आहे- गुंतागुंतीची पण व्यवस्थित चालणारी शरीरयंत्रणा आहे.
शिवाय ज्या पृथ्वीवर विविध वनस्पती आणि ही सर्व जीवसृष्टी आहे त्या पृथ्वीचे, तसेच जीवसृष्टीला जन्म देणारे जे वातावरण आहे त्या वातावरणाचे आणि या सर्व प्राणिमात्रांच्या/ निसर्गाच्या परस्परावलंबित्वाचे एक अजस्त्र असे ‘कॉम्प्लेक्स युनिव्हर्स’ आहे. त्यातील सर्व जीवमात्रांना सतत प्रश्न पडत असतात आणि ते सर्व जीव जन्माला आल्यापासून ते प्रश्न सारखे सोडवित असतात. म्हणजेच गुंतागुंतीच्या त्यांच्या शरीररचनेचे व्यवहार काही निश्चित सूत्रांनुसार चालतात. गुंतागुंतीच्या त्या गणिताला ‘मॅथेमॅटिक्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी’ असे म्हणतात. जगप्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ डेस्मॉन्ड मॉरिस (द ह्यूमन झू, द नेकेड एप, पीपल वॉचिंग अशा अनेक ग्रंथांचे संशोधन, लेखन करणारा लेखक) याने आपल्या ‘बेबी वॉचिंग’ या निरीक्षण शोधग्रंथात म्हटले आहे, की लहान मूल जन्माला आल्यापासून सतत विविध प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करीत असते. समोरचे खेळणे कसे उचलायचे यापासून ते भूक लागल्यावर आईचे (वा आजूबाजूच्यांचे) रडून-ओरडून लक्ष कसे वेधून घ्यायचे अशा प्रश्नांना काही दिवसांच्या मुलाला तोंड द्यावे लागते.
लहान मुलांच्या मनाच्या, संवेदनांच्या, मेंदूच्या ‘कॉम्प्लेक्स सिस्टिम्स’वर संशोधन चालू असतानाच आता याबद्दलही चिंतन चालू आहे, की ‘नैतिकते’चे प्रश्न (जे फक्त माणूस प्राण्यालाच पडतात) ते माणसाच्या संवेदनयंत्रणेत कधी व कसे शिरतात? बरोबर काय आणि चूक काय, योग्य काय- अयोग्य काय, उचित काय- अनुचित काय याचे भान माणसाला कधी येऊ लागते? व कसे? इतर प्राणिमात्रातही त्यांची एक नैसर्गिक नियमावली असते. ते प्राणी ती नियमावली मोडत नाहीत. उदाहरणार्थ, हत्ती वा घोडा वा गाय वा असेच बरेच प्राणी हे शाकाहारी आहेत. वाघ, सिंह वगैरे मांसाहारी; पण त्यातही धर्म-जात-नियम-संकेत वा नैतिकतेचा मुद्दा नाही. ते त्यांचे शरीररचनेचे निसर्गदत्त ‘नियम’ आहेत. ते नियम समजून घेण्यासाठी ‘कॉम्प्लेक्स’ रचनांचा अभ्यास करावा लागतो. इतर प्राणिमात्रांना ‘सामाजिक’ वा ‘राजकीय’ प्रश्न नसतात. त्यांना जग बदलायचे नसते! सुधारायचे नसते. नुसते (मजेत!) जगायचे असते. खरे म्हणजे त्या जगण्याला ते प्राणी मजा असे संबोधतच नाहीत. ते तसे कशालाच काहीही संबोधत नाहीत. त्यांना जसे नैतिक-अनैतिकतेचे प्रश्न पडत नाहीत, तसेच एखादी गोष्ट सुंदर आहे वा विद्रुप आहे, हेही माणसाप्रमाणे कळत नाही. त्यामुळे ते सूर्योदयाने मोहरून जात नाहीत, सूर्यास्ताने खिन्न होत नाहीत. (पण त्यांच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या शरीरसंवेदनांमध्ये फरक मात्र पडतो. सकाळचा उत्साह आणि संध्याकाळचा थकवा जाणवतो परंतु ज्या अर्थाने ‘मानसिक’दृष्टय़ा माणूस खिन्न होतो, उदास, अस्वस्थ, विषण्ण होतो त्या अर्थाने नव्हे.) पण ‘मनाच्या’ कोणत्याच स्थितीत त्यांना कविता कराविशी वाटत नाही वा चित्र काढावेसे वाटत नाही. कोणकोणत्या प्राण्यांना कोणकोणते रंग दिसतात आणि कोणते रंग त्यांच्या डोळ्यात भरतच नाहीत यावर संशोधन चालू आहेच.
ते कळपात वा थव्यांमध्ये वावरत असले तरी त्याला आपण ‘समाज’ म्हणून संबोधू शकत नाही- जरी सामाजिक नियमावली ते पाळतात. मुंग्या रांग सोडत नाहीत, हत्ती कळप सोडत नाही, वाघीण बछडय़ांना सोडून जात नाही, पक्षीण अंडय़ांना पूर्ण संरक्षण देते वगैरे वगैरे. त्यांचा ‘समाज’च नसल्यामुळे समाजकार्याचाही प्रश्न नाही! न्यायाची संकल्पना नसल्यामुळे अन्यायाचा प्रश्न नाही. ‘सृष्टी-समष्टी’ हेच त्यांचे विश्व- जे समजून घ्यायचे असेल तर र्सवकष ‘कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर’ समजायला हवे. माणसाला मात्र स्वत:च्या पलीकडचेही प्रश्न असतात. तेही तितकेच महत्त्वाचे आणि तातडीचेही असतात. ते दैनंदिन जीवनात व्यग्र असणाऱ्या सर्वानाच पडतात असे नाही; पण ते प्रश्नही सर्वाच्या अंगावर येऊन कोसळत असतात.. या वाढत्या झोपडपट्टय़ांचे काय करायचे? या गर्दीचे / लोंढय़ांचे काय उत्तर आहे? याउलट त्या झोपडपट्टीत वा फुटपाथवर राहणाऱ्याला प्रश्न असतो.. इतका पाऊस पडतो आहे, आज कुठे झोपायचे? उद्या कुठे / कसे जेवायचे? त्यातूनच मग मोठे राजकीय प्रश्न निर्माण होतात- ही गरिबी, ही विषमता कशी दूर करायची? अन्याय, भ्रष्टाचार कसा संपवायचा? मग त्यातून अधिक सखोल असे राजकीय प्रश्न उभे राहतात- हे राजकारण, दादागिरी- सत्ताबाजीतून कसे सोडवायचे? राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि सत्ता-संपत्तीचा दर्प कसा दूर करायचा? वगैरे.
विचारवंतांना व वैज्ञानिकांना किंवा सामाजिक-सांस्कृतिक भाष्यकारांना तर त्याही पलीकडचे प्रश्न पडतात. राष्ट्रीय एकात्मता कशी साधायची? जागतिकीकरणाला कसे तोंड द्यायचे? ‘ग्लोबल वॉर्मिग’चा धोका कसा टाळायचा? युद्ध व दहशतवादाच्या छायेत असलेले जग शांततेकडे कसे आणायचे? किंवा तात्विक पातळीवर या विश्वाचा जन्म कसा झाला? जीवसृष्टीचे रहस्य काय? भविष्यातले जग कसे असेल? या कूट प्रश्नांपलीकडे समाजकारण व संस्कृतीकारण करणाऱ्यांना चिंता असते ती सांस्कृतिक ऱ्हासाची, सार्वत्रिक निर्बुद्धतेची आणि सामाजिक / मानसिक मागासलेपणाची. त्यांना स्वत:ला व समाजाला प्रगल्भ करायचे असते. अबब! आणि विशेष म्हणजे सर्व सुजाण माणसांना हे सगळे प्रश्न ‘एकाच वेळेस’ पडत असतात. म्हणजे विश्वजन्माच्या गूढाचे अप्रूप असलेल्याला घरातल्या नळाचे पाणी गेले आहे याची चिडचिड असतेच आणि त्याचेही पोट वा डोके दुखून तो तत्त्वज्ञ / वैज्ञानिकही वैतागतोच! युद्ध वा दहशतवादाच्या विरोधातील ‘स्ट्रॅटेजी’ ठरविणाऱ्या परराष्ट्र सचिवाला वा लष्करी अधिकाऱ्यालाही प्रमोशन हवे असते, कौटुंबिक कटकटी (लग्न, घटस्फोट, प्रेम प्रकरणे इ.) आणि अगदी रस्त्यावरचे ‘ट्रॅफिक जॅम्स’ यांना तोंड द्यायचेच असते.
म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात असंख्य प्रश्नांचे एक अजस्त्र चक्र सतत फिरत असते. जीवन आधुनिक झाल्यावर प्रश्न वाढले, की ते आधुनिक नसताना अधिक अडचणी होत्या हे सांगता येणार नाही. ज्यांना नळाचे पाणी मिळत नाही त्यांना विहिरीतून पाणी आणावे लागते. ज्यांना शिक्षणाची सोयही नाही त्यांना अंधारलेल्या अशिक्षिततेत जीवन कंठावे लागते. दीड-दोनशे वर्षांपूर्वी आपले खापर-ढापर- पणजोबा वा पणजी कसे दिवस काढत असतील याची कल्पना जरी केली (अर्थात आजही जगात दीड-दोनशे कोटी लोक त्याच स्थितीत आहेत!) तरी आपण त्या समस्यांपेक्षा आधुनिक समस्या बऱ्या असे म्हणू! म्हणजे टी.व्ही.च नसण्यापेक्षा केबलवाल्यांचा संप परवडला. (परंतु धारावीतील व अन्यत्र असलेले ‘स्लमडॉग्ज’ त्याहीपेक्षा वेगळा विचार करतील!)
प्रश्नांचा हा अथांग कल्लोळ, जितकी माणसे तितक्या प्रमाणात वाढत असतो. कारण जितकी माणसे तितकी मने. तितक्या शारीरिक गरजा. प्रत्येक शरीर स्वतंत्र आणि मन तर त्याहून स्वतंत्र व अचपळ.
काही प्रश्न ‘शॉर्टलिस्ट’ करता येतात. ट्रॅफिकचे नियम करता येतात. ते मोडणाऱ्यांना दंड करता येतो. रस्ते, पूल व इमारती बांधण्याचे शास्त्र निर्माण करता येते. नागरिकांसाठी नियमावली करता येते. अगदी मुंग्यांइतके नाही तरी बऱ्यापैकी शिस्तीने वागता येते. ऊन-पावसापासून रक्षण करण्याची व्यवस्था करता येते. (वादळ, पूर, भूकंप, ज्वालामुखी इ. नैसर्गिक अपघात वगळून- पण त्यासाठीही आपत्कालीन योजना आखता येतात.) म्हणजेच प्रचंड गोंधळ-गुंतागुंत-कल्लोळ आणि त्यामुळे अर्थशून्य भासणाऱ्या परिस्थितीला आटोक्यात ठेवता येते. (There Can be order into chaos and there can be Simplicity in comprehending complexity)
तर सृष्टी-समष्टी आणि मानसिक-बौद्धिक गुंतागुंतीचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे ‘सायन्स अ‍ॅण्ड मॅथेमॅटिक्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी!’ साधारणपणे ३०-३५ वर्षांपूर्वी या शाखेचा शास्त्रशुद्ध विकास होऊ लागला. त्या अगोदर अशा अनेक थिअरीज् किंवा हायपोथिसिस मांडण्याचे प्रयत्न झाले होते. केऑस थिअरी, कॅटॅस्ट्रोफी थिअरी, फझिलॅजिक वगैरे गणित-पदार्थविज्ञान शाखेच्या आधारे सृष्टी-समष्टीचा अर्थ लावण्याचे प्रयत्न झाले होते. या प्रयत्नांना ‘पोस्ट मॉडर्न सायन्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले असले तरी या नव्या सिद्धांताद्वारे विश्वरचनेचे/ जीवसृष्टीचे/ मनोरचनेचे/ कॉन्शियसनेसचे गूढ उलगडता येईल असेच गणितींना व वैज्ञानिकांना वाटू लागले.
बहुतेक गणितींची अशी पक्की धारणा आहे, की विश्वचक्र चालविणारे प्रमेय/ सूत्र सापडले, की सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. पूर्वी पदार्थवैज्ञानिकांना अशी खात्री असे. त्याहीपूर्वी तर्कशास्त्रज्ञ असे मानत, की ‘लॉजिक’ हेच गूढ उकलण्याचे मुख्य माध्यम आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून एखाद्या गुन्ह्याचा छडा लावणे आणि विश्वाच्या गुढाचा शोध लावणे- हे दोन्ही एकाच पद्धतीत बसते. निदान शेरलॉक होम्सची तशी धारणा होती. भारतात काहींना वाटते श्रद्धा, नामस्मरण, एकाग्र चिंतन ही विश्वरहस्य उकलण्याची माध्यमे आहेत. गेल्या काही वर्षांत ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ची ज्ञान-लाट (फॅड!) आली आहे.
‘थिअरी अ‍ॅण्ड मॅथ्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी’ ही अशीच एक आभासपूर्ण ज्ञान-लाट आहे, की सृष्टी-समष्टी-मन-कॉन्शियसनेस समजून घेण्यासाठी सापडलेले नवे साधन? पुन्हा प्रश्न आहेच!
कुमार केतकर

विस्मरणात खरोखर जग जगते!

सगळे लोक काही ना काही विसरत असतात. चष्मा, किल्ल्या, पैसे, पास, पाकीट, मोबाईल. शिवाय गॅस बंद करायला, नळ बंद करायला, दिवे विझवायला, पंखा बंद करायला विसरणे हेही तसे बऱ्यापैकी सार्वत्रिक आहे. त्याचप्रमाणे फोन नंबर्स, एखाद्याचे नाव वा चेहरा, पत्ता, रस्ता आणि तारीख, अपॉइंटमेंटची वेळ वा जागा हे कधी ना कधी आपण विसरतोच. एखाद्या लेखकाचे वा कवीचे नाव, पुस्तकाचे, चित्रपटाचे, नाटकाचे नाव अगदी ओठावर असते; पण आठवत नाही. काही अगदी हुशार मुलांनासुद्धा परीक्षेचा पेपर सोडविताना डोळ्यासमोर उत्तर येते, पण ते आठवत नाही. एखाद्या गाण्याची ओळ, चाल मनात येते, पण ओठात-जिभेवर येण्याइतकी आठवत नाही. कधी अगदी तरबेज नटसुद्धा एकदम स्टेजवरच नाटकातला संवाद विसरतो. विसरण्याचे प्रकार इतके आहेत, की त्यांची नोंदही करता येणे अशक्य आहे. या विसरण्याच्या प्रकारामुळे काही माणसे भ्रमिष्टही होतात. म्हणजे व्यवस्थित कुलूप लावून बाहेर पडल्यानंतरही त्यांना आपण कुलूप लावल्याची, आत नळ, दिवे, गॅस बंद केल्याची खात्री नसते. काहीजण परत जाऊन सर्व गोष्टी नीट बंद केल्याची खात्री करून घेतात. दरवाजे-खिडक्या पुन: पुन्हा खेचून घेतात. आपण विसरणार, याची जणू खात्रीच त्यांना असते!

आपण असे का विसरतो? आणि मग एकदम, अचानक एखादी विसरलेली गोष्ट आपल्याला का व कशी आठवते? काही अगदी लहानपणच्या गोष्टी सविस्तर आठवतात; आणि काल-परवा भेटलेल्या माणसाचे नाव आठवत नाही. स्मरण आणि विस्मरण हे आज सर्व न्यूरॉलॉजिस्ट आणि मानसशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून गूढ आहे. ते जितके उलगडू लागले आहे, तितकेच अधिक गहिरे आणि अधिकच अगम्य होऊ लागले आहे.
परंतु एका गोष्टीबाबत सर्व वैज्ञानिकांचे एकमत आहे. ‘विस्मरण’ ही निसर्गाने माणसाला दिलेली एक विलक्षण देणगी आहे- अगदी तितकीच, जितक्या प्रमाणात ‘स्मरण’ ही देणगी आहे! नुसती कल्पना करा, की जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला अगदी स्वच्छपणे आठवतो आहे! अक्षरश: वेड लागायची पाळी येईल.
जिल प्राईस ही कॅलिफोर्नियातील एक तरुण मुलगी आहे. तिला हा ‘पूर्णस्मरण रोग’ झाला होता. तिला लहानपणापासूनचा प्रत्येक दिवस आठवत असे. अगदी सर्व काही. घरातल्या वस्तू, आई, वडील, नातेवाईक, शेजारीपाजारी, बरोबरची मुले-मुली, त्यांचे नाव-पत्ते, फोन नंबर, त्यांचे वाढदिवस. हे ठीक आहे; पण तिला शाळेतला प्रत्येक पेपर, त्यातील प्रश्न, तिने दिलेली उत्तरे, टी. व्ही.च्या सर्व बातम्या, वाचलेले प्रत्येक पुस्तक, तिच्या समोरून गेलेल्या मोटारी, त्यांचे नंबर, सगळे रंग, सगळे गंध, सर्व गाणी, कविता, इतकेच काय-सर्व धडेसुद्धा! ती काही विसरूच शकत नसे. सुरुवातीला या विलक्षण स्मरणकुशलतेचे कौतुक घरात व शाळेत होत असे. वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांनाच काय, शिक्षकांनासुद्धा अचंबा आणि कौतुक व कुतूहल वाटत असे. परंतु जसजशी ती मुलगी मोठी होऊ लागली, तसतसे तिचे डोके या स्मरणशक्तीमुळे भणभणू लागले. तिची भूक हरपली. झोप लागेना. ती १४ वर्षांची झाली तेव्हा आई-वडिलांना, तिच्या ढासळत्या प्रकृतीकडे पाहून चिंता वाटू लागली. त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांना एका बडय़ा मेंदूतज्ज्ञाकडे नेले. तेव्हा या रोगाचे नाव दिले गेले ‘हायपरथेस्मिया सिन्ड्रोम’. तिच्या मेंदूतील ‘मेमरी बॉक्स’ म्हणजे ‘स्मृती-कप्पा’ तपासला गेला. परंतु न्यूरोसायंटिस्ट आणि सर्जन यांना कळेना, की नक्की कशावर शस्त्रक्रिया करायची? भीती ही होती, की त्या स्मृती-कप्प्यातील चुकीच्या ठिकाणी शस्त्रक्रिया झाली तर पूर्ण ‘मेमरी क्रॅश’ होऊन जाईल! कॉम्प्युटरमधील ‘हार्ड डिस्क’ क्रॅश होऊन सर्व डेटा नाहीसा होतो त्याप्रमाणे ती मुलगी पूर्णत: स्मृती गमावून बसेल.
डॉक्टरांनी सुरुवातीला एक मार्ग शोधून काढला. तो हा, की तिच्या स्मृतींमध्ये भर घालणाऱ्या कोणत्याही गोष्टी तिच्यासमोर आणायच्या नाहीत. तिने टी. व्ही. पाहायचा नाही, विरंगुळा म्हणून पुस्तके वाचायची नाहीत. एक-दोन डॉक्टर्स, एक-दोन नर्सेस आणि आई-वडील यांच्याव्यतिरिक्त कुणाला भेटून आपल्या स्मृती-कप्प्यात नवीन भर घालायची नाही. हे सर्व ठीक झाले; पण जुन्या, लहानपणापासूनच्या गोष्टी तिला आठवत असल्यामुळे, तिचे डोके भणभणत होतेच.
मग ती मुलगी हीच एक संशोधनाची प्रयोगशाळा झाली. तिला त्या ‘पूर्णस्मरण रोगा’पासून मुक्त करण्यासाठी जे प्रयोग सुरू झाले त्यांच्या आधारे त्या संशोधक-न्यूरॉलॉजिस्टांनी एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव आहे-‘द वुमन हू काण्ट फर्गेट’-विस्मरणच हरवलेली स्त्री! त्या न्यूरो-सायकिअ‍ॅट्रिस्टस् संशोधकांनी मग चौकशी सुरू केली, की असे रुग्ण किती असतील? मग अफाट स्मरणशक्ती असलेली सुमारे दोनशे माणसे त्यांनी आपल्या ‘प्रयोगा’त सामील करून घेतली. पण त्यांना लक्षात आले, की अशी पूर्ण-स्मरण व्याधी झालेली व्यक्ती पाच-दहा लाखांत एकच असावी. कारण ज्या अफाट स्मरणशक्तीवाल्या व्यक्तींना त्यांनी प्रयोगशाळेत आणले होते, त्यांची ‘विस्मरण शक्ती’ही अफाट होती. याचा अर्थ हा, की त्यांचा मेंदू काय आठवायचे आणि काय विसरायचे, याचे प्रोसेसिंग उत्तम करू शकत असे. निर्थक, निरुपयोगी, अनावश्यक गोष्टी विसरण्याची शक्ती त्यांच्याकडे होती. त्यांच्या विस्मरण-सापेक्षतेमुळेच त्यांच्या स्मरणशक्तीचे महत्त्व प्रचंड वाढले होते. त्यापैकी काही गणिती होते, काही वकील होते, काही प्राध्यापक होते आणि त्यांची ख्याती अतिशय बुद्धिमान व कर्तबगार अशी होती. म्हणजेच बौद्धिकता व अशी कर्तबगारी ही स्मरण-सामर्थ्यांवर नाही, तर विस्मरण-झपाटय़ावरही अवलंबून होती, हे सिद्ध होत होते.
पण हे ‘मेमरी’ प्रकरण मानसशास्त्रज्ञांना अधिकच सतावू लागले आहे. कॉम्प्युटर्स आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यासंबंधात सुरू असलेले संशोधन नवीन-नवीन प्रश्न उपस्थित करू लागले आहे. अनेक मानसिक रोग किंवा मानसिक अस्वस्थता, मनातील प्रक्षोभ, विक्षिप्त व अतार्किक वागणे, लोन्लीनेस किंवा एकटेपणा वाटणे, अनामिक भीती वाटणे, बुजरेपणा, न्यूनगंड, एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या उपस्थितीमुळेही ‘मूड ऑफ’ होणे, एखादा माणूस पहिल्या ओळखीतच अजिबात न आवडणे, ‘डेटिंग’ला भेटलेल्या मुलाबद्दल वा मुलीबद्दल काही अवधीतच ‘निगेटिव्ह’ प्रतिमा निर्माण होणे- या व इतर अनेक गोष्टी ‘मेमरी बॉक्स डिफेक्टस्’ किंवा ‘न्यूरल सर्किट डिसऑर्डर’मुळे होतात, असे संशोधकांना वाटू लागले.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या प्रतिष्ठित आणि अमेरिकन अर्थ-साम्राज्याच्या मुखंड मानल्या जाणाऱ्या दैनिकात मेलिंडा बेक नावाची स्तंभलेखिका आहे. ती वाचकांना विविध प्रकारच्या मनो-शारीरिक अस्वस्थतेविषयी सल्ला देते, मार्गदर्शन करते आणि अगदी अलीकडे चालू असलेले संशोधनही सांगते. तिने तर एक सिद्धांतच मांडला आहे : ‘लक्षात ठेवा- की बऱ्याच गोष्टी लक्षात न ठेवणेच हिताचे आहे!’ हे वरवर विरोधाभास असलेले विधान समजावून सांगताना ती म्हणते, की सध्याच्या वेगवान, स्पर्धेच्या आणि यशाच्या मागे लागलेल्या जगात स्मरणशक्तीला अवास्तव महत्त्व दिले गेले आहे आणि विसरभोळ्या, विसराळू माणसांची टिंगलही केली जाते आहे. परंतु विस्मरणाचे सामथ्र्य ओळखले तरच ‘आत्मिक’ बळ प्राप्त होईल. शरीर व मन सुदृढ राहायचे असेल तर ‘विसरायला शिकले पाहिजे!’
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ हे वृत्तपत्र मुख्यत: ‘मार्केट-फ्रेंडली’ अशा कॉर्पोरेट जगात वाचले जाते. याच वर्गात सध्या ‘स्ट्रेस’ या व्याधीबद्दल सर्वात जास्त चर्चा असते. हा ‘स्ट्रेस’ ऊर्फ तणाव मुख्यत: अनाठायी (वा न झेपणारी) महत्त्वाकांक्षा, जिद्द, हेवा, सूड आणि अलीकडे फॅशनेबल झालेली ‘किलर इन्स्टिंक्ट’ आणि कॉम्पिटिशन यामुळे तयार होतो. संघर्ष आणि स्पर्धा यात फरक आहे. संघर्ष फक्त स्पर्धेतच असतो असे नाही. एखादी कूट समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे, न सुटणारे गणित सोडविणे, प्रतिकूल निसर्गाशी सामना देणे, आजारपणाला सामोरे जाणे, कुटुंबातील वा समाजातील प्रश्न व तणाव दूर करण्याचा प्रयत्न करणे. इतकेच काय-चित्रकला, संगीत, साहित्यसाधना हाही एक सर्जनशील संघर्षच असतो. तो कुणाविरुद्ध नसतो वा कुणाबरोबरच्या स्पर्धेमुळेही नसतो. तो संघर्ष आपल्याला आत्मिक बळ देतो. अशा संघर्षांसाठी अचाट स्मरणशक्तीची नव्हे तर ‘नेमक्या’ स्मरणशक्तीची गरज असते. परंतु नेमकी उपयुक्त, आवश्यक स्मरणशक्ती म्हणजे काय? काही माणसांना शेकडो फोन नंबर्स, (अगदी मोठमोठे मोबाईल वा इंटरनॅशनल नंबर्ससुद्धा), अनेकांचे वाढदिवस, कित्येक घटना- तारखांनिशी, शेकडो वा हजारो गाणी, त्यांच्या चाली, नाटकांमधले संवाद, लंबीचवडी स्वगते अगदी व्यवस्थित आठवतात. काहींना क्रिकेटचे बहुतेक सामने, त्यातील विक्रम, कोणी किती धावा काढल्या, किती विकेट घेतल्या, कोण कुणाविरुद्ध, कुठे, केव्हा खेळले, हे सर्व आठवते; तर काहींना अर्थसंकल्पीय आकडेवारी, बँकांचे व्यवहार, जमाखर्च, विविध वस्तूंच्या उत्पादनाचे आकडे, चलनवाढीचे बदलते दर, सोन्या-चांदीचे भाव अगदी हा हा म्हणता आठवतात. बहुतेक ड्रायव्हर्सना एखाद्या ठिकाणी एकदा गेले तरी पत्ता कायमचा लक्षात राहतो. काहींना इतिहासातल्या, राजकारणातल्या गोष्टी नेमक्या लक्षात असतात, तर काहीजणांना गणितातील सूत्रे, पद्धती वा अगदी किमानपक्षी पाढे (औटकी-दीडकीपर्यंतचेही) मुखोद्गत असत. कॅलक्युलेटर आल्यावर पाढे वा व्यावहारिक अंकगणित कालबाह्य होऊ लागले. मोबाईल फोनमधली नंबर्सची डिरेक्टरी आल्यावर फोन नंबर पाठ असणे वा वेगळ्या वहीत लिहिणेही अनावश्यक झाले. सेक्रेटरी असलेल्यांना बऱ्याचदा अ‍ॅपॉइण्टमेंट लक्षात ठेवणे कमी गरजेचे झाले. कॉम्प्युटर व इंटरनेट आल्यावर संदर्भ डोक्यात ठेवण्याऐवजी संगणकाच्या ‘हार्ड-डिस्क’वर आणि विषयवार उपलब्ध असलेल्या ‘गुगल’वर ते मिळू लागले.
कॉम्प्युटर, मोबाईल (विशेषत: ब्लॅकबेरी) म्हणजे मेंदूच्या ‘मेमरी बॉक्स’मधील काही भाग बाहेर ‘काढून’ ठेवणे आणि गरज लागेल तेव्हा वापरणे! त्यामुळे ‘अनावश्यक’ व ‘निरुपयोगी’ (म्हणजे ज्या गोष्टी सारख्या-सारख्या आठवायची गरज नाही अशा) बाबी वेगळ्या स्टोअर करून ठेवल्या, की अधिक उपयुक्त व सर्जनशील गोष्टींसाठी ‘मेमरी बॉक्स’ मोकळा राहू शकेल, असे मानले जाते. परंतु वस्तुस्थिती वेगळीच दिसते. अधिक मोकळा झालेला ‘मेमरी बॉक्स’ उपयुक्त वा चांगल्या गोष्टींसाठीच वापरला जातो असे नाही. शिवाय सर्व माणसांच्या स्मृतींचा ‘पॅटर्न’ किंवा त्यांच्या आठवणींचे स्वरूप एकाच प्रकारचे नसते.
बहुतेक मेंदू-तज्ज्ञांना वाटते, की ज्या आठवणी तीव्र वेदना देणाऱ्या असतात त्या विस्मृतीत टाकण्याची संज्ञाप्रणाली किंवा ‘प्रोग्राम’ मेंदूत असतो. बहुतेक (नॉर्मल!) माणसे त्यांचे कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक व्यवहार व्यवस्थित करू शकतात, कारण वेदनामय गोष्टी क्षीण होत जातात वा ‘जंक’ केल्या जातात. त्या ‘जंक’ म्हणजेच रद्दीत अनावश्यक गोष्टीही टाकल्या जात असतात. ही प्रक्रिया सतत चालू असते. अगदी झोपेतसुद्धा. काहींच्या मते विचित्र, अर्थशून्य, संदर्भहीन स्वप्ने म्हणजे ‘डिलिट’ करून जंक करण्याची प्रक्रियाच असते.
काही मनोविश्लेषणतज्ज्ञांना अर्थातच हे ‘हायपोथिसिस’ मान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही गोष्ट पूर्ण विस्मृतीत जात नाही. ती त्याच ‘मेमरी बॉक्स’मधल्या वेगवेगळ्या (अडगळीच्या!) कोपऱ्यांमध्ये जाऊन बसते. आपण घर आवरायला घेतले, किंवा बराच काळ न आवरलेले कपाट पुन्हा लावायला घेतले, की जशा दीर्घकाळ अडगळीत गेलेल्या वस्तू सापडतात, वा ज्या ‘कायम’च्या हरवल्या गेल्या होत्या, त्या मिळतात, तसेच स्मृतींचे आहे. प्रत्येक माणसाला कुठच्या ना कुठच्या निमित्ताने ही विस्मृतीचित्रे आठवतातच. कधी रेडिओवर ऐकू येणाऱ्या गाण्याच्या स्वरांवर वा शब्दांवर आरूढ होऊन माणूस कित्येक वर्षे मागे जातो. अगदी लहानपणी पाहिलेला चित्रपट, मैत्रिणीबरोबर (वा मित्राबरोबर) व्यतीत केलेली संध्याकाळ, कॉलेजमधले दिवस, त्या वेळच्या भावना, प्रसंग, त्यावेळची माणसे, विरह, प्रेमभंग- अगदी तीव्र वेदनाही पुन्हा ठसठसू लागतात. आकस्मिकपणे डोळ्यात अश्रू येणे वा कधी कधी भीती वाटणे, छातीत धडधडणे असे काहीही त्या स्वरांमधून निर्माण झालेल्या संज्ञाप्रवाहामुळे होऊ शकते.
या मनोविश्लेषणवाद्यांच्या मते अंतर्मनाच्या कोपऱ्यात ठसलेल्या, दडलेल्या वा दडपलेल्या आठवणींना जर मोकळेपणाने वाट करून दिली नाही तर विविध प्रकारचे मनोविकार होऊ शकतात. त्यामुळे ‘विस्मरण’ होण्याची देणगी माणसाला लाभलेली असली तरी कोणती स्मृतीचित्रे जपायची आणि कोणती अडगळीत टाकायची याचे स्वातंत्र्य माणसाला नसते.
स्मृती-कप्प्यांमध्ये झालेली साठवण वेगवेगळ्या माध्यमांतून झालेली असते. वर म्हटल्याप्रमाणे एखाद्या स्वररचनेवर वा गाण्यावर स्वार होऊन माणूस भूतकाळात जातो, त्याचप्रमाणे एखादा सुगंध वा एखाद्या पदार्थाची चव, एखादा स्पर्श वा एखादे दृश्यही माणसाला स्मृतीसंग्रह पूर्णपणे हलवून टाकू शकतो. इंद्रियांच्या माध्यमातून जमा केलेला असा प्रचंड स्मृतीसंग्रह आणि विचारांच्या/चिंतनाच्या आधारे केलेला स्मृतीसंग्रह हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एखाद्या माणसाचा चेहरा पाहून, तशाच दिसणाऱ्या माणसाच्या आपल्या आयुष्यातील आठवणी कल्लोळ करू शकतात आणि एखादा गणिती वा वैज्ञानिक एखाद्या सिद्धांताचे सूत पकडून भूत आणि भविष्यकाळाचा द्रष्टेपणाने वेध घेऊ शकतात. एखादा ‘नॉट-टॅलजिया’त म्हणजे स्मरणरंजनात स्वत:ला विसरून जातो तर एखादी व्यक्ती भूतकाळच हरवून बसते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी याच स्तंभात ‘एचएम’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माणसाचा भूतकाळच कसा हरवला आणि त्या ‘विस्मृती चित्रां’नी त्याचे जीवन आणि मन कसे अधांतरी झाले. हे लिहिले होते. विस्मरण-स्मरणाच्या हिंदोळ्यावर आपण सर्वचजण तसे अधांतरी आहोत.
कुमार केतकर

सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।


ज्याप्रमाणे वेदनेचे मोजमाप वा कोष्टक नाही, त्याचप्रमाणे ‘बरे वाटण्याचे’ही मोजमाप नाही. अतिशय तीव्र शारिरीक वा मानसिक वेदनांमधून वा दु:खातून बाहेर आलेली व्यक्ती डॉक्टरला वा निकटवर्तीयांना सांगते की ‘आता बरे वाटते आहे’, तेव्हा नक्की किती बरे आहे हे कुणीच सांगू शकत नाही. मागे म्हटल्याप्रमाणे बी.पी., शुगर वा कोलेस्ट्रॉल यांचे अंकगणित व कोष्टक पक्के आहे, तसे वेदनेचे वा बरे वाटण्याचे नाही.
कित्येकांना त्यांच्या विश्वासाचा (श्रध्देचा!) डॉक्टर नुसता जवळ आला, तरी लगेच बरे वाटू लागते. डॉक्टरांनी वा (आई, वडील, पत्नी, प्रेयसी- कुणीही प्रिय व्यक्ती) अशा कुणी डोक्यावर हात ठेवला, जवळ घेतले तरी वेदना कमी होते, दु:खाचा आवेग आटोक्यात येतो, मन ‘हलके’ होते! अर्थातच या कशाचेच वैद्यकीय मोजमाप नाही. विशेष म्हणजे शारीरिक वा मानसिक दु:ख, वेदना वा अस्वस्थता असलेल्या व्यक्तीला पैसे, ऐश्वर्य, सत्ता अशा गोष्टी त्या स्थितीतून मुक्त करू शकत नाही. कितीही श्रीमंती, प्रचंड सत्ता वा अधिकार असलेली व्यक्ती असो, ती व्याधिग्रस्त झाली की सर्व सुखे हरपतात. म्हणूनच सर्व संतमंडळी आणि स्वयंसिध्द अध्यात्मवादी त्या सुखाच्या ‘भ्रमा’तून, म्हणजे ‘मायाजालातून’ मुक्त व्हायचे आवाहन करीत असतात! परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून ‘इहलोक’ म्हणजे माया!

एका प्रसिध्द चिनी लेखकाने म्हटले आहे की, ज्या देशाला (सुखाचे) अर्थशास्त्र साध्य होत नाही तो (दु:खाचे वा दारिद्रय़ाचे) अध्यात्मशास्त्र सांगू लागतो ! (Those who do not have successful economy, often advocate spiritual philosophy!) या निरूपणातील वास्तववादी छद्मीपणा बाजूला केला की अनेक (अध्यात्मसदृश) प्रश्न निर्माण होतात. पण ते प्रश्न खरे तर आध्यात्मिक नव्हेत. इहलोक ही माया आहे असे म्हटले तर जन्म, मृत्यू, सुख वा दु:ख हे सर्व मायावत् होईल, मग सगळेच प्रश्न कायमचे सुटतील. म्हणून या ठिकाणी इहलोक हेच वास्तव आणि आधिभौतिक सत्य म्हणून गृहीत धरले आहे.
‘बरे वाटणे’ म्हणजे काय? ‘सुख’ म्हणजे काय? आनंद, उत्साह, हर्ष, भोग, विलास, समाधान अशा अनेक संज्ञा आहेत. त्या अर्थातच समानार्थी नाहीत. प्लेझर, जॉय, डिलाइट, वेलनेस, हॅपीनेस या इंग्रजीतील संज्ञाही समानार्थी नाहीत. ‘हेडॉनिझम’ या नावाने तर भोगाचे तत्वज्ञान व अर्थशास्त्रच सांगितले जाते. परंतु ‘प्लेझर’ आणि ‘हॅपीनेस’ या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ‘सुख’ आणि ‘समाधान’ या अर्थ-अन्वयार्थाने भिन्न आहेत, हे तर अगदी बटरड्र रसेलही सांगतात. रसेल हे अध्यात्म, मेटाफिजिक्स, पॅरा-सायकॉलॉजी, तंत्र-मंत्र यासारख्या मंबो-जंबो गोष्टींच्या पूर्णपणे विरोधात आहेत. इहवाद, विज्ञान आणि गणित यांचे प्रगल्भ, उत्क्रांतिवादी आणि समाजकल्याणवादी तत्वज्ञान सांगणाऱ्या रसेल यांनीही ‘सुख’ व ‘समाधान’ यात प्रचंड मोठा फरक असल्याचे म्हटले आहे.
वस्तुत: ही तर आपल्या दैनंदिन अनुभवाची / गप्पा चर्चाची गोष्ट आहे. ‘तो / ती अगदी सुखात वा ऐश्वर्यात लोळत आहे, पण ‘समाधानी’ नाही!’ किंवा ‘इतकी सत्ता आहे, नोकरचाकर आहेत, गाडय़ा-बंगले आहेत, देखणा पती वा सुंदर पत्नी आहे - पण ही व्यक्ती कायम असमाधानी का असत?’ असे संवाद आपल्या कानावर पडत असतात. परंतु ते ‘श्रीमंतां’बद्दलचे उद्गार झाले. स्वत:ला ‘मध्यमवर्गीय-मध्यममार्गी’ मानणारे, दोन वा तीन ‘बी.एच.के’, चांगली नोकरी आणि सुखी- चौकोनी कुटुंब असणारेही नाखूष असल्याचे आपण पाहतो आणि आश्चर्य व्यक्त करतो. त्या अनुभवातूनच नव्या संकल्पना व व्याख्या प्रचलित होऊ लागल्या. ‘सुख’ हे मुख्यत: इंद्रियांचे आणि ‘समाधान’ हे मनाचे. `Wealth, estate, gold-diamond, power, sex, food and drink, fame etc. give pleasure but not necessarily happinessl - अशा अर्थाची मांडणी होऊ लागली. (एखादा हातगाडीवाला, दिवसभराच्या श्रमानंतर, त्याच गाडीवर निवांतपणे झोपू शकतो. पण तसे समाधान आलिशान गादीवर झोपणाऱ्या श्रीमंत माणसालाही प्राप्त होत नाही.) परंतु या ‘तत्वज्ञाना’चे उदात्तीकरण होत होत पुढे गरिबीचेच गौरवशास्त्र बनू लागले आणि ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे ! चित्ती असू द्यावे समाधान!’ असे अध्यात्मदर्शन दिले जाऊ लागले. त्यामुळे संदर्भातील मानसशास्त्र व तत्वचिंतन, त्याचप्रमाणे न्युरॉलॉजिकल संशोधन नजरेआड होऊ लागले.
ज्याप्रमाणे शरीर व मन या द्वैताचा (Body-Mind Duality) किंवा त्यात अनुस्यूत असलेल्या अद्वैताचा शास्त्रीय शोध सुरू आहे त्याचप्रमाणे ‘सुख’ व ‘वेदना’ (Pleasure-Pain Principle) या दुहेरी तत्त्वातील एकत्वाचाही शोध न्युरॉलॉजिस्टस् घेत आहेत.
डेव्हिड बॉरसूक हे हार्वर्ड मेडिकल स्कूल या ख्यातनाम अमेरिकन संस्थेत रेडिऑलॉजी आणि न्युरॉलॉजीचे प्राध्यापक संशोधक आहेत. ते बरीच वर्षे ‘वेदने’चा अभ्यास करीत आहेत. ‘पेनकिलर’ गोळ्या वा इंजेक्शन्स, क्लोरोफॉर्म, अ‍ॅनॅस्थेशिया आदी गोष्टींमुळे वेदनांचा संदेश मेंदू व अन्यत्र पोहचविला जात नाही आणि म्हणून त्या जाणवत नाहीत. परंतु म्हणून ‘पेन’ म्हणजे वेदना नाहीशा होत नाहीत, तर थोपविल्या जातात. शस्त्रक्रिया वा तत्सम उपचार करताना शरीर वा काही भाग बधिर करणे वेगळे आणि शरीर पूर्णपणे वेदनारहित करणे वेगळे. तसे वेदनारहित शरीर म्हणजे संवेदनारहित शरीर. मग अचेतन आणि सचेतन यात तरी काय फरक राहिला? मृत शरीराला संवेदना नाहीत म्हणून वेदनाही नाहीत. (सतीश आळेकर यांच्या ‘महानिर्वाण’ या अफलातून नाटकात मृत देहालाही ताटीवर करकचून बांधल्याच्या वेदना होतात, आपल्याला चितेवर (किंवा विजेवर चालणाऱ्या दहनयंत्रात) जाळून टाकणार, या कल्पनेने तो मृतदेह भयभीत होतो. आपण जळल्यावर आपल्या चाळीतील लोक तसेच ‘मजा’ करीत राहणार या जाणिवेने त्या जिवंत माणसांचा त्याला हेवा वाटतो, एकूणच आपण मेलो आहोत हे त्याला अजिबात आवडत नाही कारण त्यामुळे सर्व शारीर सुखांपासून आपण आता कायमचे वंचित झालो आहोत, असे त्याच्या लक्षात येते.)
तर डेव्हिड बॉरसूक या अमेरिकन रेडिऑलॉजिस्ट-न्युरॉलॉजिस्टच्या संशोधनानुसार सुख व वेदना या दोन्ही परस्परविरोधी संवेदना मेंदूच्या एकाच केंद्रात नोंदविल्या व प्रोसेस केल्या जातात. त्यांच्या मते शारिरीक सुख-संवेदना आणि वेदना या एकाच ‘मेंटल सर्किट’ मधून जातात. सुख-संवेदना काहीशी अधिक वेगाने ते सर्किट ‘पार’ करते इतकेच. सुख-संवेदना आणि वेदना या मेंदूच्या एकाच केंद्रात ‘रजिस्टर’ होत असल्याचा आणखी काही पुरावा काही मानसशास्त्रज्ञही देतात. काही माणसे जीवनातील दु:खद घटना, एखाद्याने केलेला अपमान, प्रतारणा, प्रेमभंग, जवळच्या माणसाच्या मृत्यूमुळे झालेला शोक, ‘जखमा उरातल्या’ इतक्या जपतात व वारंवार आठवून गोंजारतात की त्यातच त्यांना (विचित्र प्रकारचे) सुख लाभते. आत्मक्लेशातही (मॅझॉकिझम) दु:ख असते- मग ते दीर्घ उपोषणातले असो वा कडकलक्ष्मीने स्वत:च्याच शरीरावर केलेल्या फटक्यांच्या आघातांचे असो.
आपण आपल्या तत्त्वासाठी, देशासाठी, धर्मासाठी, प्रेमासाठी, परंपरेसाठी, खानदानासाठी, स्वाभिमानासाठी.. आपले प्राणही द्यायला तयार आहोत, असे आवेगाने सांगणाऱ्या एका अनुयायाला त्याचा चिनी गुरू सांगतो, ‘जीवन कवडीमोल व अर्थशून्य आहे हे खरे, पण तू जिवंतच नसशील तर तुझ्या ‘नसण्या’ला तरी काय किंमत आहे? कारण मृत्यूही तितकाच अर्थशून्य आणि कवडीमोलापेक्षाही कमी किंमतीचा आहे. शिवाय हे जीवन तुला एकदाच मिळाले आहे, तेच संपवून, तुला जे साध्य करायचे आहे ते तू कसे करणार?’ त्यावर तो अनुयायी गुरूला विचारतो, ‘पण गुरूजी, असे मरणाला बिचकणे, आपल्या ध्येयासाठी तो अंतिम त्याग करण्यापासून पळून जाणे हे भेकडपणाचे, स्वार्थाचे आणि संधीसाधूपणाचे नव्हे काय?’ तेव्हा गुरूजी म्हणतात, ‘मी ‘पळून जा’ असे म्हटलेले नाही, ‘शरण जा’ असेही म्हटलेले नाही, ‘लढू नकोस’ असेही मी सांगत नाही. कारण आपण सर्वचजण मरणार आहोत.. मी फक्त इतकेच सांगतोय की तुझे जगणे, हे जीवन कितीही कवडीमोल, अर्थशून्य असले तरी त्या मृत्यूचा अवास्तव सन्मान करू नकोस. जर सन्मानाने जगलास तर सन्मानानेच मरशील!’- हा संवाद कितीही गोल गोल चालू शकतो. कारण मरणाबद्दलचे प्रश्न फक्त जिवंत माणसालाच पडतात. (‘महानिर्वाण’ नाटकामधील अवस्था म्हणजे जिवंत माणसाचे एक रूपकच!)
खरे म्हणजे, मरायला साधारणपणे कुणी तयार नसते. ‘यशस्वी’ आत्महत्या करणाऱ्याला त्याच्या मृत्यूनंतर कुणी विचारले की ‘आता कसं वाटतंय?’ तर बहुधा तो/ती असेच म्हणेल की, ‘मरून मूर्खपणाच केला!’ जगातील बहुतेक‘सुइसाइड प्रिव्हेन्शन सेंटर्स’ किंवा आत्महत्येपासून परावृत्त करू पाहणाऱ्या केंद्रांमध्ये साधारणपणे जीवनाबद्दल उमेद, आशा, उत्साह निर्माण करण्याचे प्रयत्न होतात.
विन्स्टन चर्चिल ७५ वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या एका व्यक्तीने त्यांना छद्मीपणाने म्हटले, की ‘असा वृद्धापकाळ आल्यावर कुणाला वयाची नव्वदी ओलांडावीशी वाटेल?’ त्यावर चर्चिल म्हणाले, की ‘ज्यांना ८९ वर्षे पूर्ण झाली आहेत त्या सर्वाना ९० च्या पुढेही जगायला आवडेल.’
जीवन-मृत्यूविषयक मानसशास्त्रीय संशोधन करणाऱ्या जवळजवळ सर्व संस्थांनी आता मुख्यत: एकच निष्कर्ष काढला आहे. तो हा की, काही अत्यल्प अपवाद वगळता सर्वाना जितके जगता येईल तितके जगायचे आहे.
त्यांना भीती आहे, पण ती मरणाची नाही, तर वेदनेची, वार्धक्याची, दु:खाची, परावलंबित्वाची, अपंगत्वाची, असहाय्यतेची. म्हणूनच ऑस्कर वाइल्डच्या ‘द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’ या कादंबरीतील तरुणाला, म्हणजेच डोरियन ग्रे याला चिरंतन देखणे, आकर्षक तारुण्य हवे आहे आणि महाभारतातील ययातीने तर आपले वृध्दत्व टाळण्यासाठी आपल्या मुलाचेच तारुण्य मागितले आहे. डोरियन ग्रे आणि ययाती दोघेही सुखाच्या मागे धावता धावता समाधान मात्र गमावून बसत आहेत!
कुमार केतकर

कळा या लागल्या जीवा...


हाताची नाडी ‘मोजता’ येते. छातीचे ठोकेही. धाप लागणे, दम लागणे म्हणजेच श्वासोच्छवासाचा वेगही मोजता येतो. सुदृढ माणूस किती वेळ, किती धावू शकतो, पन्नाशी वा साठीतली व्यक्ती किती मजले चढू शकते, कुणी किती व्यायाम करावा आणि किती दमछाक करू नये याचेही कोष्टक आहे. आता फोफावलेल्या ‘जिम कल्चर’मध्ये तर त्याचे शास्त्रशुद्ध मापन होते- अगदी मिनिट टू मिनिट आणि नंबर्सच्या परिभाषेत.
ब्लडप्रेशर किती आहे, ब्लडशुगर किती आहे, किती असायला हवे, त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल-एचडीएल/ एलडीएलचा ‘काऊंट’ किती आहे, युरिन वा स्टुलमध्ये कोणते घटक किती आहेत, असे अनेक संदर्भ असलेले, बऱ्यापैकी निश्चित स्वरूपाचे रिपोर्टस् उपलब्ध असतात. डॉक्टर बदलला, हॉस्पिटल बदलले तरी हा ‘डेटा’ जवळ असेल तर उपचार अधिक नेमकेपणाने सुचविता येतो.
या गोष्टी जेव्हा मोजता येत नव्हत्या, योग्य-अयोग्य मापन ठरविता येत नव्हते, ‘धोक्या’च्या सीमारेषा कळत नव्हत्या, हृदयात किती ‘ब्लॉक्स’ आहेत आणि ते केव्हा व कसा दगा देऊ शकतील हे सांगता येत नव्हते, तेव्हा उपचारपद्धती खूपच अंदाजपंचे चालत असे. डॉक्टरचा अनुभव आणि त्याचा/तिचा रुग्णाशी असलेला परिचय व त्यामुळे माहीत असलेली पेशंटची (व कुटुंबाचीही) ‘हिस्टरी’ म्हणजेच पारंपरिक/आनुवंशिक माहिती हाच तेव्हा ‘डेटाबेस’ असे. ‘फॅमिली डॉक्टर’ ही पद्धती मुख्यत: त्या काळातली. पूर्वीची ग्रामीण व शेतीआधारित समाजरचना जाऊन शहरे वसू लागली, तसतसे सामाजिक संबंध बदलू लागले. पूर्वीची शहरे (म्हणजे उद्योग-संस्कृतीपूर्व) आजच्यासारखी मोठी व अफाट नसली

तरी त्यांचाही व्याप खेडय़ांपेक्षा मोठाच असे. मात्र तेव्हा शहरांमध्येही ‘फॅमिली डॉक्टर’ ही संख्या होतीच. ग्रामीण भागातला वैद्य वा वैदू वा अगदी मांत्रिक-तांत्रिकही कुटुंबाला ओळखत असे. पुढे पुढे हे ‘डॉक्टर-पेशंट’ नाते एक प्रकारे व्यक्ती/कुटुंबनिरपेक्ष म्हणजे ‘इम्पर्सनल’ होत गेले. ते संबंध ज्या वेगाने व्यक्तीनिरपेक्ष होत गेले, तसतसे प्रकृतीच्या मोजमापनाचे तंत्र झपाटय़ाने विकसित होत गेले. माझ्याकडे जर माझ्या प्रकृतीचा-बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल इ.- यथास्थित रिपोर्ट असेल आणि त्यात नेमकी आकडेवारी असेल तर डॉक्टर वा हॉस्पिटल कुठचेही असले तरी निदान व उपचार अधिक शास्त्रशुद्धपणे करणे शक्य होऊ लागले. आता तर या सर्व शारीरिक-प्राकृतिक ‘डेटाबेस’चे महत्त्व इतके वाढले आहे की, अनेकदा फोनवरतीच ती आकडेवारी ऐकून डॉक्टर संबंधित रुग्णाला काय करायचे ते सांगू शकतात. म्हणजेच माणसाच्या प्राकृतिक स्वास्थ्यासाठी मोजता येईल अशा घटकांची नोंद व नेमके मोजमाप असायला हवे. परंतु शारीरिक स्वास्थ्य मोजण्याचे जसे कोष्टक आहे तसे मानसिक स्वास्थ्य मोजण्याचे कोष्टक तितके विकसित झालेले नाही.

ब्रेन मॅपिंग, एमआरआय, छातीचे ठोके, नाडी अशा अनेक बाबी तपासून मानसिक अस्वास्थ्याबद्दल आडाखे बांधता येत असले तरी तितकी स्पष्ट कोष्टके मनोरुग्णांबद्दलची उपलब्ध होत नाहीत. अर्थातच संशोधन चालू आहे आणि तेसुद्धा याच गृहितकावर की- मनोविकारांचे बहुतेकसे निकष शरीरातच- मुख्यत: मेंदूतच सापडतील. दिवसेंदिवस शारीरिक आणि मानसिक आजार यातील ‘सिम्बियॉटिक रिलेशनशिप’ किंवा गुंतागुंतीचे नाते भेदणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. शारीरिक आजारांचे ठोकताळे जितके स्पष्ट आहेत तितके मानसिक आजारांचे नाहीत. इंजेक्शन, गोळ्या, औषधांचे डोस, व्यायाम, आहार, विश्रांती इ. गोष्टींची मदत घेऊन शारीरिक आजार आटोक्यात आणता येतो- बराही करता येतो, पण तुलनेने मनोरुग्णांना उपचार देणे (वा रोगाचे निदान करणे) अधिक कठीण व जिकीरीचेही असते.
खरे म्हणजे शारीरिक स्तरावरचे निकषही नक्की किती पक्केपणाने सांगता येतात, याबद्दलही संशोधक आणि खुद्द डॉक्टरांमध्ये मतभेद आहेत. या मतभेदांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो वेदना मोजण्याचा. रक्ताचा दाब, रक्तातील साखर, छातीचे ठोके इत्यादी गोष्टी मोजून वेदनेची तीव्रता आकडय़ात मांडता येत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की, ‘माझे डोक दुखते आहे’ तेव्हा प्रश्न विचारला जातो, ‘किती दुखतंय?’ मग ती/तो सांगतो की, ‘अगदी असह्य होतंय’ किंवा ‘सारखं ठणकतंय’ किंवा ‘मधून मधून कमी दुखतं आणि पुन्हा जोरात ठणकू लागतं’ किंवा ‘रात्रभर दुखत होतं आणि झोपच लागली नाही आणि सकाळी केव्हा डुलकी लागली ते कळलंच नाही, पण जाग आल्यावर पुन्हा ठणका सुरू झाला.’ वगैरे वगैरे.
तीच गोष्ट पोट दुखण्याची, पाय दुखण्याची, पाठ दुखण्याची, अवघे शरीर ठणकण्याची. परंतु किती दुखते आहे याचे, सर्वाना लागू पडेल असे मोजमाप नाही. एखाद्याला इंजेक्शनची सुई दिसली की घाबरायला होते तर दुसरा एखादा अगदी दीर्घ इंजेक्शन दंडात वा मांडीत अगदी निर्विकारपणे घेतो. अगदी लहान मुलांमध्येही काही बालके इंजेक्शनचे नाव काढले वा सुई दिसली तरी भोकांड पसरतात तर काही लहान मुले बिनबोभाट, न रडता-ओरडता इंजेक्शन टोचून घेतात. वेदना ही व्यक्तिसापेक्ष असेल तर ती मोजणे अधिकच कठीण होणार. बाकी डेटाबेस मिळेल पण वेदनेचा डेटाबेस मिळणार नाही.
परंतु ‘वेदने’ची इतकी विविध रूपे, इतके प्रकार, इतकी कारणे आहेत की त्या सर्वावर एकच उपाय वा उपचार देणे शक्य झालेले नाही. कारण वेदना फक्त शारीरिकच नसते तर मानसिकही असते. किंबहुना मानसिक वेदनेचा शरीरावरही प्रतिकूल परिणाम होतो. फक्त शरीरावरच नव्हे तर स्वभावावरही.
प्रेमभंग, प्रतारणा, अपेक्षाभंग, विश्वासघात, वियोग आत्मविश्वास-न्यूनता, पराभव, एकटेपण, असहायता, अनिश्चितता अशा कितीतरी मानसिक स्थितींमधून अनेकांना जावे लागते. त्या वेदना शारीरिक नसतात. परंतु त्यामुळे बीपी, शुगर वाढू शकते, निद्रानाशाचा विकार होऊ शकतो. डोकेदुखी, पोटदुखी इतकेच काय हृदयविकारही होऊ शकतो. ‘स्ट्रेस’ हा तर सध्या सर्व मनो-शारिरीक विकारांसाठी परवलीचा शब्द झाला आहे. योगापासून विपश्यनेपर्यंत आणि नामस्मरण-भक्तीपासून ते टी-एम् (ट्रान्सेन्डेटल मेडिटेशन) अशा अनेक गोष्टी उपाय-उपचार म्हणून सुचविल्या जातात. कारण या प्रकारच्या मानसिक वेदनांवर बहुतेकसे शारीरिक उपचार परिणामकारक ठरत नाहीत.
या वेदनांनी ग्रस्त झालेली व्यक्ती विचित्र प्रकारे वागू शकते, दारू वा अन्य एखाद्या व्यसनाच्या अधीन होऊ शकते, घर सोडून जाऊ शकते, हिंसक होऊ शकते, आत्महत्येचा प्रयत्न करू शकते. ज्या वेदनांमुळे हे स्वभावबदल होतात आणि हाताबाहेर जातात, त्या वेदनांचे मोजमाप घेण्याचे तंत्रज्ञान सध्या उपलब्ध नाही.
‘ट्रायल अ‍ॅण्ड एरर’ पद्धतीने झोपेच्या गोळ्या, ट्रन्क्विलायझर्स, शरीर निपचित करणारे डोस, इलेक्ट्रिक शॉक्स असे अनेक उपचारसदृश प्रकार अंमलात आणले जातात. परंतु अजून तरी ‘वेदना’ म्हणजे नक्की काय, तिची तीव्रता कशी मोजायची आणि तिचा सापेक्ष व सर्वसाधारण ‘डेटाबेस’ कसा तयार करायचा याबद्दलचे संशोधन या घडीला तरी अगदीच प्राथमिक आहे.
शारीरिक वेदना असो मानसिक, ती सहन करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीची समान नसते. त्यामुळेच काही अमूर्त किंवा व्याख्या नसलेल्या व सिद्ध करता न येण्यासारख्या संकल्पना व संज्ञा रूढ झाल्या आहेत. त्यापैकी सर्वात रूढ झालेली संकल्पना आहे ‘विल पॉवर’ची. ‘विल पॉवर’चे भाषांतर इच्छाशक्ती किंवा इच्छा सामथ्र्य असे केले जात असले तरी मूळ इंग्रजी शब्दातील अर्थाची व्याप्ती काहीशी जास्त आहे. प्रत्येक व्यक्तीची ‘विल’ ही वेगळीच नव्हे तर पूर्णपणे स्वतंत्र आहे असे या थिअरीत मानले जाते. म्हणूनच एका मर्यादेपलिकडे हुकूमशाही, गुलामगिरी, दहशत सर्वावर, सर्वकाळ बसवता येत नाही. परंतु ती ‘विल’ एक शक्तिशाली साधन म्हणून प्रत्येकजण व नेहमीच वापरतो वा वापरू शकतो असे नाही.
आपल्या अगदी लहान मुलाला वाचविण्यासाठी जीवाचा आकांत करणारी आई (एका खेडय़ातील, अशक्त वाटणाऱ्या एका अशा आईने अक्षरश: बैलगाडी उचलून चाकाखाली येणाऱ्या मुलाला वाचविले, ही बातमी बरीच गाजली होती), रणांगणावर एकटय़ा पडलेल्या एखाद्या सैनिकाने शत्रूच्या तुकडीला नामोहरम केल्याच्या बातम्या, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत धीर न गमावता एखाद्याने केलेला संघर्ष- यांपेक्षाही कित्येक गोष्टी आपण आपल्या आजुबाजूला पाहात वा ऐकत असतो. आपल्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असलेले सामथ्र्य कुठून येते हे अजून वैज्ञानिकांना उमजलेले नाही. विल पॉवर ऊर्फ इच्छासामथ्र्य मोजण्याचे अंकशास्त्र नसल्यामुळे एखादी मरणासन्न व्यक्ती (डॉक्टरांनी पूर्णपणे आशा सोडल्यानंतरही) कशी तगून राहते आणि उत्साहाने जीवन जगते, याबद्दल तर बडे बडे सर्जनही आश्चर्य व्यक्त करीत असतात.
बहुतेक वेळा वेदनेवर विजय मिळविणाऱ्या या माणसांच्या कौटुंबिक आख्यायिका बनतात, पण अजून त्या वेदनांचा वेध घेता आलेला नाही. कारण अनेक मानसशास्त्रज्ञ असेही मानतात की बऱ्याच जणांना ‘आत्मक्लेश’ करून घेण्याची, स्वत:लाच जखम करून घेण्याची एक विक्षिप्त प्रवृत्ती असते. व्ॉलरी हार्डकॅसल या संशोधकाने The Myth of Pain या पुस्तकात SIB ऊर्फ Self-Injurious Behaviour बद्दल अनेक उदाहणांसहित सविस्तर लिहिलेले आहे.
त्याचसंबंधात हा लेखक म्हणतो की, बहुतेक लोकांना प्रत्यक्ष मोठा अपघात होतो, तेव्हा प्रत्यक्ष वेदना जाणवत नाहीत. त्या एक-दोन दिवसांनंतर जाणवू लागतात. या संबंधात त्याने केलेले भाष्य इंग्रजीतच देतो, ‘‘It is clear that our pain inhibitory system releases endogenous morphine like chemicals (known as ‘endorphins’) or other similar hormones that mask or eliminate our pain and suffering. Most likely, it releases an opiate that affects our serotonin levels, but with 14 different identified serotonin receptors, at least four different opioid analgesics uncovered and fire different PIS pathways charted in the human.’’
या परिच्छेदातील मेडिकल संज्ञांना पर्यायी मराठी शब्द नाहीत. परंतु थोडक्यात मुद्दा हा की ज्या क्षणी शरीरावर असा अतिशय तीव्र आघात होतो, तेव्हा शरीरातील ग्रंथींमधून विशिष्ट प्रकारचा स्राव होतो आणि त्या स्रावामुळे वेदनांची (मेंदूकडे) संवेदना पोचविली जात नाही. हे एक प्रकारचे कवच निसर्गानेच दिले आहे. वेदना व तिची तीव्रता एखाद्याच्या सहनशक्तीवर अवलंबून असते की अनेक वेळा वेदनेपेक्षा तिचा बाऊच अधिक असतो? मेडिकल सायन्स विकसित होईपर्यंत म्हणजे क्लोरोफॉर्म, अ‍ॅनेस्थेशिया, पेनकिलरच्या गोळ्या व डोस या गोष्टी येईपर्यंत दात काढण्यापासून हात व पाय तोडण्यापर्यंत सर्व शस्त्रक्रिया थेट चालत असत. आजही जगातील अनेक तुरुंगांमध्ये व पोलीस ठाण्यांवरही शारीरिक छळ ही ‘सत्य’ शोधून काढण्याची एक पद्धत मानली जाते. म्हणजेच वेदना देणे हे प्रस्थापित यंत्रणेचे एक माध्यम आहे. गुन्हेगारीला व पोलिसांचा मार खाण्याला सरावलेली मुलेही अतोनात वेदना सहन करू शकतात. वेदनेची व सर्वसाधारण सहनशीलतेची कसोटी ही मोजमापनापेक्षा त्या त्या व्यक्तीच्या विशिष्ट परिस्थितीतील अनुभवावरतीच ठरवावी लागते. ‘ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस’ने कालच प्रसिद्ध केलेल्या ‘द फरगॉटन आर्ट ऑफ हिलींग’ या डॉ. फारुख इराक उदवादिया यांच्या ग्रंथातही याच वेदनेचा, करुणेचा आणि सेवेचा हुंकार सापडतो. परंतु सिव्हिलायझेशन उभे आहे ते इतरांच्या वेदनेची संवेदना, मनाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीत घेतली गेल्यानंतर. अगदी प्राथमिक अवस्थेत आघात-अपघात-वेदना होती पण सहानुभूती -दया-करुणा नव्हती.
स्वत:ला वेदना झाल्यावर कुणीही कळवळतो- दुसऱ्याच्या वेदनांनी जो हळहळतो आणि ते दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करतो तो खऱ्या अर्थाने उत्क्रांत ठरतो.
कुमार केतकर

या जन्मावर, या जगण्यावर.

या जन्मावर, या जगण्यावर..

प्रत्येक माणसाला माहीत असते की आपण कधीतरी मरणार आहोत. परंतु ‘कधीतरी’ म्हणजे नक्की कधी, कुठे, केव्हा, कसे याचा अंदाज फक्त असाध्य रोग होऊन अंथरुणाला खिळलेल्यांना असतो. अगदी (मोजक्या) आत्महत्या करणाऱ्यांनाही असतो. (परंतु त्यांचाही प्रयत्न कधी फसतो आणि आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल होतो!) बाकी सर्वजण मरेपर्यंत जगतात. मनातल्या मनात सगळ्यांना जाणीव असते, की पुनर्जन्म वगैरे सगळे झूठ आहे. पुनर्जन्मावर ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्यांनाही अंतर्मनात जाणवत असतेच, की एकदा गेलो- की गेलो! आणि अगदी पुनर्जन्म झालाच तरी त्या जन्मात याच जन्माची ‘कंटिन्यूइटी’ असेल असे कशावरून? त्यामुळे बहुसंख्य माणसांना जगावेसे वाटते. कारण हे आयुष्य एकदाच मिळालेले असते. त्यामुळे जीवनाविषयीचा लोभ निर्माण होतो. तो लोभ समजण्यासारखा आहे.
पण जर प्रत्येकाला हेही माहीत आहे की, तो/ती मरणार आहे आणि एकदा मेल्यावर या जगाशी त्याचा काहीही संबंध असणार नाही; मग संपत्तीचा, स्थावर आणि जंगम मालमत्तेचा, जमिनीचा, सोन्या-चांदीचा, बंगला-गाडीचा मोह वा लोभ शेवटपर्यंत का सुटत नाही? हे प्रश्न ऐहिकतेच्या संबंधातले झाले. कित्येकांना प्रसिद्धीचा, कीर्तीचा, स्मृतींचा, नात्यांचा मोहही सुटत नाही. तीसुद्धा एक प्रकारची ऐहिकताच. एका प्रसिद्ध मराठी लेखकाने पूर्वी, त्यावेळच्या एका संपादकांना कळविले होते की, आपण मेल्यावर, एक प्रदीर्घ अग्रलेख लिहावा. ‘मला नुसत्या बातमीत उडवून टाकू नका!’ अशी विनंती त्या पत्रात होती. एकदा मार्क ट्वेन मेल्याची बातमी प्रसिद्ध झाली. मार्क ट्वेन जिवंतच होते. त्यांनी संपादकाला कळविले की, ‘बातमीतील अतिशयोक्ती वगळता बाकी खरे आहे. शिवाय मी मेल्यावर माझी ‘जागा’ काय आहे, हेही मला बातमीवरून उमजले.’
शकुंतला परांजपेंनी तर आपण मेल्यावरची स्थिती अगदी सविस्तरपणे लिहून ठेवली होती. त्यात जवळच्या कुटुंबियांची मन:स्थिती, त्यांचा शोक, शेवटची आवराआवरी, शेजारी-पाजारी असे सर्व काही होते. त्यानंतर कित्येक वर्षांनी प्रत्यक्षात शकुंतलाबाई मरण पावल्या. जीवनावर ‘शतदा प्रेम’ करणाऱ्या त्या होत्या आणि त्यांचा जीव शेवटी तुटला असेल तर तो त्यांनी पाळलेल्या मांजरांसाठी! ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या स्वरूपाची उक्ती सर्व संस्कृतींमध्ये आहे. म्हणजेच जिवंत असताना मरणोत्तर कीर्तीचा लोभ मनात असतो. जसा तो कीर्तीचा असतो, तसाच जमा केलेल्या संपत्तीचा, घराण्याच्या नावाचा आणि आपल्या जिंवतपणाच्या स्मृतींचा व नात्यांचा. मरणाची खात्री असूनही आणि सर्व संत-महंतांनी ‘या मातीतून जन्माला आलास- त्या मातीतच विलिन होणार’ किंवा, ‘एकटाच आलास- एकटाच जाणार’ असे इशारेवजा सांगूनही लोभ का सुटत नाही? तमाम बाबा-बापू-बुवा प्रवचनांमध्ये आणि टीव्हीच्या सर्व वाहिन्यांवरील भक्तिभावाच्या निरुपणांमध्ये, ‘संपत्तीचा, नात्या-गोत्यांचा, इहलोकाचा- जीवनाचाच लोभ/मोह टाळा’ असे सांगत असतात. परंतु खुद्द तेही त्या टीव्ही प्रतिमेच्या, प्रसिद्धीच्या आणि त्यातून येणाऱ्या ऐहिकतेच्या ‘सापळ्यात’ तेवढेच सापडलेले असतात. सध्या अतिशय ख्यातनाम असलेल्या एका ‘महान’ साधुपुरुषाला नोबेल पुरस्काराचा ध्यास लागला आहे. हा पवित्र साधुपुरुष अक्षरश: जगभर ‘मोहातून मुक्ती कशी साधावी’, ‘मन:शांती कशी प्राप्त करावी’, ‘मनातल्या षड्रिपूंशी कसा सामना करून चित्तशुद्धी करावी’ या विषयावर टीव्हीवरून आणि प्रत्यक्षातही प्रवचने देत असतो. भलेभले डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील- अगदी न्यायाधीशसुद्धा त्यांच्या प्रवचनांना हजेरी लावतात. परंतु हे साधू मात्र नोबेल पुरस्कारप्राप्तीच्या इच्छेने झपाटलेले आहेत.

एका बाजूला हा सर्वव्यापी लोभ आपल्या आजुबाजूला दिसत असतानाच शेकडो नव्हे तर हजारो असे तरुण-तरुणी आहेत की जे मरायलाही तयार होत आहेत-कुठल्या तरी ध्येयासाठी वा धर्मासाठी, तत्त्वासाठी वा देशासाठी, विचारांसाठी वा परंपरांसाठी. ‘मानवी बॉम्ब’ नावाची अंतिम त्यागाची कल्पना जरी अलिकडे प्रभाकरनने प्रचलित केली असली तरी तालिबानी आणि ‘अल कायदाचे’चे अनुयायी ते तंत्र सर्रास वापरत आहेत.
धर्मयुद्धात, स्वातंत्र्ययुद्धात, स्वाभिमान जपण्यासाठी, परंपरा आणि संस्कृतीच्या रक्षणार्थ मरणाला सामोरे जाणाऱ्यांची संख्या, मानवी सिव्हिलायझेशनच्या काळात काही कोटींमध्ये जाईल. ‘बुक ऑफ द डेड’ नावाच्या एका ग्रंथात म्हटले आहे की, पूर्वी मरणे तसे सोपेही नव्हते. येशू ख्रिस्ताला सुळावर चढविले, तसेच कित्येकांच्या हाता-पायांना खिळे ठोकून क्रॉसवर जिवंत ठेवले जात असत- काही दिवसांनंतर अन्नपाण्याशिवाय, अपार वेदना सहन करत ते त्याच स्थितीत मरण पावले. परंतु तेव्हाही हजारो लोकांनी तसे मरणे पसंत केले- शरण जाण्यापेक्षा ते अधिक उदात्त मानले. म्हणजेच जीवनावर नितांत प्रेम करणारेही मरायलाही तितक्याच नितांततेने तयार होतात. ही ‘जीवनेच्छा’ आणि मरणेच्छा’ कशी निर्माण होते आणि माणूस सुखाचे जीवन त्याग करायला कसा तयार होतो हाही एक अभ्यासाचा विषय झाला आहे.
काही वर्षांपूर्वी एकूण ३९ श्रीमंत, बुद्धिमान, गोऱ्या अमेरिकनांनी सामूहिक आत्महत्या केली. परंतु त्यांनी लिहून ठेवलेल्या निवेदनाप्रमाणे ती आत्महत्या नव्हतीच. ते एकत्रितपणे, मृत्यूनंतरच्या परलोक प्रवासाला गेले होते. त्या ‘परलोका’चा शोध घेण्यासाठी. तो ‘प्रवास’ सुरू करण्यापूर्वी ते एका आलिशान बंगल्यात एकत्र राहिले. त्यांनी जीवन-मरणाच्या सविस्तर चर्चा केल्या. त्यांच्यापैकी अनेकजण कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स होते. काही जण एखाद्या विज्ञानशाखेत संशोधन करीत होते. या ‘प्रवाशांचे’ प्रमुख होते एक साठी ओलांडलेले दाम्पत्य. या ‘प्रवाशांना’ जी माणसे ओळखत होती, त्या सर्वानी नंतर सांगितले की, त्यांच्यापैकी कुणीही ‘वेडे’ वा ‘स्किझोफ्रेनिक’ नव्हते, असाध्य रोगाने पछाडलेले नव्हते, जीवनात अयशस्वी वा दु:खीही नव्हते.
या मंडळींच्या परलोक प्रवासावर त्या वेळच्या (१९९७) ‘टाईम’ ‘न्यूजविक’मध्ये कव्हर स्टोरीज् प्रसिद्ध झाल्या. बडेबडे मानसशास्त्रज्ञ या ‘फिनॉमिनन’चा अभ्यास करू लागले. त्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी जे निवेदन लिहून ठेवले होते त्यात म्हटले होते, की एका अतिशय प्रगत, प्रगल्भ आणि आनंदी परलोकाचा (‘सिव्हिलायझेशन’चा) शोध लागला आहे. त्या परलोकात अधिक चांगले जीवन जगण्यासाठी ते जात असल्यामुळे मरणाला सामोरे जाण्याचा वगैरे प्रश्नच नाही. कारण याहूनही अधिक आनंदी जीवन जगण्यासाठी ते जात आहेत. ‘हेल बॉप’ नावाचा धूमकेतू आपले येथील अस्तित्व संपताच आपल्याला परलोकात घेऊन जाणार, हे त्यांनी ‘विज्ञाना’ने जाणले होते. त्या ‘हेल बॉप’विषयी एका ‘मसिहा’ने त्यांना सांगितले होते, असे पुढे शोधपत्रकारांनी लिहिले; परंतु तो ‘मसिहा’ कुठच्या पंथाचा वगैरे नव्हता. या ‘प्रवाशांना’ ज्या परलोक फँटसीने मोहात टाकले ती आजही ‘हेवन्स गेट’ या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्या वेळच्या बऱ्याच अमेरिकन वृत्तपत्रांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी या सामूहिक परलोक प्रवासाबद्दल बरेच काही लिहिले; पण अजूनही त्याचा पूर्ण उलगडा झालेला नाहीच. पण एक नक्की ते अंतिम त्याग करीत नव्हते तर अधिक सुखाच्या लोभाने त्या प्रवासावर निघाले होते. या लोभाचे एक अर्थशास्त्रीय तत्त्वज्ञानही बनविले गेले आहे. ‘इकॉनॉमिक्स ऑफ ग्रीड’ आणि ‘कल्चर ऑफ अ‍ॅक्विझिटिवनेस’ या प्रबंधावर चंगळवादाची नवभांडवलशाही संस्कृती उभी आहे. अमेरिकेतील नव-उदारमतवादी अर्थतज्ज्ञ तर असे मानतात, की जर लोभ आणि ‘मालकी हक्क’ जीवनातून काढून घेतला तर अवघे ‘सिव्हिलायझेशन’च कोसळून पडेल. म्हणूनच ‘चंगळवाद’ ही संज्ञाही त्यांना मान्य नाही. नाही तरी माणसाला राहायला जागा किती लागते? एक खोली, एक वा दोन बीएचके, बाराशे चौरस फुटांचा फ्लॅट, अडीच हजार चौरस फुटांचा बंगला, की प्रचंड मोठे आवार, बाग, अंगण, स्विमिंग पूल असलेला बंगला? भारतात असताना चाळीत (कॉमन बाल्कनी- कॉमन टॉयलेट) राहणारे मध्यमवर्गीय अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी तेथे असे प्रशस्त बंगले घेतले. ‘साध्या राहणी’चे तत्त्वज्ञान गरिबीतून नव्हे तर मनाच्या दारिद्रय़ातून येते, असे ते सांगू लागले. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची जीवनराहणी ही चंगळवादी नाही. चंगळवाद हा लोभातून जन्माला येतो, असे मनापासून मानणाऱ्यांनीही त्यांच्या व्याख्या आता बदलल्या आहेत. एक दशकापूर्वी मोबाइल फोन असणे चंगळवाद होता. दोन दशकांपूर्वी कलर टी. व्ही. आणि व्ही. सी. आर. असणे हा चंगळवाद होता. त्यापूर्वी फ्रीज असणे हीसुद्धा चैन होती. या सर्व बाबी आता गरजेच्या मानल्या जात आहेत. परंतु आता जे नवे पर्यावरण-विज्ञान खुद्द अमेरिकेतच प्रतिष्ठा पावते आहे, त्यानुसार लोभ आणि नव-चंगळवाद यामुळे या पृथ्वी ग्रहालाच धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या मते अमेरिकेचे आजचे आर्थिक अरिष्टही मुख्यत: लोभाच्या अर्थशास्त्रामुळेच आले आहे. आता अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि बरेच विचारवंत सांगू लागले आहेत, की बेफाम चंगळवादी शैलीला आवर घातलाच पाहिजे. तो घातला नाही तर अनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि त्यामुळे निसर्गसंपत्तीची बेबंद लूट होऊन ‘ग्लोबल वॉर्मिग’ची शक्यता अधिक जवळ येणार आहे. जितक्या मोटारी तितके प्रदूषण, जितका अधिक विमानप्रवास तितके अधिक कार्बन एमिशन, जितके अधिक अन्नसेवन तितकी अधिक ‘ओबिसिटी’ आणि तितके अधिक व्यर्थ उत्पादन- वगैरे म्हणजेच ज्या लोभ-तत्त्वावर भांडवलशाही तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र उभे होते, त्याच तत्त्वाला आता ग्लोबल वॉर्मिगच्या धोक्यामुळे भांडवलशाहीतच आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत.
अमेरिकेतील सध्याच्या ‘कॉर्पोरेट कॅपिटॅलिझम’मध्ये एखादे कुटुंब वा व्यक्ती केवळ भांडवलदार नसते. प्रचंड प्रमाणावर असलेले ‘शेअर होल्डर्स’ त्या कंपनीवरचा मालकी हक्क बजावत असतात. या ‘शेअर होल्डर्स’चा अनाठायी लोभ मात्र आर्थिक अरिष्टाला कारणीभूत ठरला. म्हणजेच खासगी संपत्ती (अभिजात अर्थाने) आणि शेअर्सची मालकी यात फरक आहे. शेअर होल्डर हा त्या ‘अपौरुषेय’ अर्थशक्तीचा व अर्थव्यवहाराचा वाहक व समभागी असतो.
भांडवलदाराला तसेच त्या कॉर्पोरेट कंपनीला पैसे नव्हे तर सत्ता हवी असते. सत्ता म्हणजे केवळ राजकीय नव्हे! ‘पॉवर’ म्हणजे केवळ राजकीय सिंहासन नव्हे तर एकूण समाजकारण- अर्थकारण- राजकारण यावरची अप्रत्यक्ष हुकमत. त्या सत्तेचा लोभ हा सर्वात प्रभावी ठरतो आहे.
त्यातूनच प्रश्न पुन्हा मूळ ध्रुपदाकडे जातो. जर मृत्यू अटळ आहे, तर तो स्वाभाविक व अपरिहार्य मानून माणूस निर्लोभी जीवन का जगत नाही?
एका विचारवंताने तर म्हटले आहे, की ‘मृत्युपत्र’ ही संकल्पनाच मरणोत्तर लोभ जपण्याची आहे. किंबहुना म्हणूनच सर्व धनाढय़ मंडळींची मृत्युपत्रे नेहमीच वादग्रस्त ठरली आहेत. कारण त्या लोभाचे वाटेकरी बरेच जण असतात.
म्हणूनच खासगी संपत्ती किंवा ‘राइट टू प्रायव्हेट प्रॉपर्टी’ जोपर्यंत आहे, तोपर्यंत लोभाला कायद्याची आणि सांस्कृतिकतेची प्रतिष्ठा मिळणारच. स्वत:ची कार असणे वेगळे आणि स्वत:ची जमीन असणे वेगळे. त्यामुळेच ‘प्रायव्हेट’ ऊर्फ ‘खासगी’ काय आणि ‘सार्वजनिक’ म्हणजेच ‘पब्लिक’ काय यावर समाजाचे नियोजन बेतायला हवे.
जीवन-मृत्यू रहस्य चक्राचा सरळ अर्थ `Tuesdays with Morrie’ या जगप्रसिद्ध पुस्तकात येतो. अमेरिकेतील प्रोफेसर मॉरिश्वार्टझ् हे एक आदरणीय शिक्षक होते. मिच अ‍ॅल्बॉम हा त्यांचा विद्यार्थी आणि पुढे पत्रकार. अ‍ॅल्बॉमला समजते, की आपले प्रिय शिक्षक गंभीररीत्या आजारी आहेत आणि खरे म्हणजे मृत्युपंथालाच लागले आहेत.
मरणासन्न स्थितीत असलेला माणूस जीवनाकडे आणि मृत्यूकडे कसा पाहतो, कसा व काय विचार करतो हे समजून घ्यावे म्हणून अ‍ॅल्बॉम आपल्या शिक्षकाकडे जातो. त्यांचे शेवटचे काही महिनेच उरले आहेत, हे कळल्यानंतर अ‍ॅल्बॉम दर मंगळवारी आपल्या शिक्षकाची भेट घेतो आणि मोकळेपणाने मारलेल्या त्या गप्पांचे रेकॉर्डिग करून घेतो. या पुस्तकातील संवादांवर आधारित पुढे टी. व्ही. मालिकाही झाली (आणि त्या पुस्तकाची अनेक भाषांमध्ये भाषांतरे होऊन) जगभर लक्षावधी प्रतीही संपल्या. त्या संवादांमधून जीवन-मृत्यू चक्रावर भाष्य करताना एक सूत्र अ‍ॅल्बॉमला उमगते. मृत्यूकडे कसे पाहायचे आणि एकूणच आपल्या गतआयुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे हे कळले तरच कसे जगायचे हे समजते, कारण जन्म आणि मृत्यू दोन्ही अटळ आहेत.
कुमार केतकर