अमेरिकेतील एका विद्यापीठात एक ‘ब्रेन स्टॉर्मिग सेशन’ आयोजित केलेले होते. ‘डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडीज्’ या विभागाने ते खुले चर्चासत्र हॉलिवूडच्या मदतीने ठरविले होते. चर्चेत सहभागी झाले होते हॉलिवूडच्या चित्रपटांचे कथा-पटकथा लेखक, दिग्दर्शक, त्यांच्या मार्केटिंग खात्याचे ज्येष्ठ अधिकारी, ‘मीडिया स्टडीज्’ विभागातील विद्यार्थी, मानसशास्त्रज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ आणि पुराण वाङ्मय, मिथके व महाकाव्यांचे अभ्यासक. सर्व मिळून २५-३० जण असतील.
विषय होता ‘द रोल ऑफ इमॅजिनेशन अॅण्ड फॅन्टसी इन लिटरेचर अॅण्ड सिनेमा’, म्हणजे कल्पनाशक्ती आणि अवास्तव कल्पनाविलास यांचा साहित्य-चित्रपटातील उपयोग. कोणते चित्रपट चालतात, कोणते पडतात, कोणते साहित्य प्रदीर्घ काळ लोकमानसावर कब्जा करून राहते, कोणती मिथके लोकांना भावतात आणि का, ही व अशी सूत्रे त्या दोन दिवसीय चर्चासत्रात गुंफलेली होती.
कोणीही निबंध-प्रबंध वाचायचे नाहीत, पॉवर-पॉइंट प्रेझेन्टेशन करायचे नाही, लांबलचक भाषण करायचे नाही असे दंडक त्या चर्चासत्राला होते. खऱ्या अर्थाने ‘ब्रेन स्टॉर्मिग’! आपला जो काही अभ्यास वा अनुभव असेल त्याचा संदर्भ द्यायचा, पण तोसुद्धा त्या चर्चेची संगती आणि गती सांभाळून. म्हणजे चर्चेत उपस्थित झालेला मुद्दा विशिष्ट टप्प्यावर यायच्या आतच कुणी विषयांतर केले वा वेगळाच मुद्दा मांडला, तर सूत्रसंचालक त्याला थांबवत असे आणि चर्चा पुन्हा रुळावर आणत असे.
अशा प्रकारच्या चर्चासत्रात अधिक शिस्त लागते, संबंधित मुद्दय़ांवर एकाग्रता ठेवावी लागते, दुसरी व्यक्ती काय म्हणते आहे, याबद्दल पूर्ण आदर बाळगावा लागतो, आपलेच म्हणणे दामटण्याची प्रबळ इच्छा दूर करावी लागते, अहमहमिका, आवाज चढवून बोलणे आणि ‘अहं’ हे बाजूला ठेवल्याशिवाय अशी चर्चासत्रे फलदायी होत नाहीत. सूत्रसंचालकाने सुरुवातीलाच स्पष्ट केलेले असते की, येथे कुणीही सर्वज्ञ नाही आणि आपण एकत्र मिळून त्या ‘फिनॉमिनन’चा शोध घेत आहोत- ‘फिनॉमिनन ऑफ इमॅजिनेशन अॅण्ड फॅन्टसी’!कल्पनाशक्ती आणि अवास्तव कल्पनाविलास या एकमेकांशी निगडित असणाऱ्या संकल्पना वाटल्या, तरी त्यात महदंतर आहे. कल्पनाशक्ती तरल आणि तीव्र असेल तर वास्तवतेच्याच चौकटीत कथा-कादंबरी उभी राहते, पण त्याच कल्पनाशक्तीला अवास्तव कल्पनाविलासाचे घोडे जुंपले की ते अक्षरश: चौखुर उधळते. मिथके आणि फॅन्टसी निर्माण होतात ती त्या अवास्तवातून, परंतु त्या फॅन्टसीचे इमले वास्तवाच्या पायावरच उभे असतात, म्हणूनच लोक आपल्या दैनंदिन जीवनात संदर्भ देतात ते त्या फॅन्टसीज् आणि मिथकांचा- जणू ती मिथकेच वास्तव आहेत.
राम, सीता, लक्ष्मण, भरत- अगदी दशरथ, कौसल्या, कैकयी ही अस्सल वास्तव पात्रे रंगवताना एकदम दहा तोंडांचा रावण कुठून येतो? तो विविध (अमानवी) रूपेही धारण करतो! हनुमान इकडून तिकडे संपूर्ण पर्वत नेतो, अवघी लंका पेटवून देतो- इतिहास (खरा वा काल्पनिक) सांगता सांगता अवास्तव मिथके आकार घेतात. रामायण हे केवळ महाकाव्य आहे की इतिहास, हा वादच आहे.
येशूला सुळावर चढविले जाणे दोन हजार वर्षांपूर्वी वास्तव होते. याहीपेक्षा अघोरी शिक्षा सर्व समाजांमध्ये दिल्या जात असत, परंतु येशूच पुन्हा अवतरतो आणि त्या चमत्काराने त्यानंतरचा वास्तव इतिहास घडतो. ( ‘द जीझस पझल : डिड ख्रिश्चॅनिटी बिगिन विथ अ मिथिकल ख्राइस्ट?’ असा एक वाद उपस्थित करून येशू हे मिथक आहे, असे प्रतिपादन काहींनी केले होते. अपेक्षेप्रमाणे याला व्हॅटिकनने आक्षेप घेतला होता.)
कुरुक्षेत्रावर युद्ध होणे वास्तव आहे, परंतु त्या युद्धाचा ‘आँखो देखा हाल’ संजयने अंध धृतराष्ट्राला राजमहालात बसून सांगणे (टीव्ही चॅनेल नसतानाच्या काळात) हे अवास्तव कल्पनाविलासाचे नाटय़मय चित्रण. (अर्थातच पुष्पक विमान, वज्रास्त्रे अशा अनेक ‘हाय-टेक’ गोष्टी रामायण- महाभारत काळात खरोखरच होत्या असे प्रामाणिकपणे मानणाऱ्यांचाही वर्ग आहे. त्यांना ऐतिहासिक पुराव्याची गरज भासत नाही. त्यांच्या दृष्टिकोनातून फॅन्टसी हेही तत्कालीन वास्तवच!)
जगात जितके समाज आहेत त्या सर्व समाजांमध्ये स्वर्ग, नरक, सर्वशक्तिमान देव, राक्षस-महाराक्षस, भूत-पिशाच्च अशा संकल्पना रूढ आहेत. त्यांना वास्तवाचा आधार द्यायची त्यावेळच्या माणसांना (आणि आजही बऱ्याच जणांना) गरज वाटली नाही. किंबहुना मिथके व फॅन्टसी ही त्यांच्या वास्तव जीवनाचा भाग झाली होती. मायथॉलॉजीस्- म्हणजे मिथक-पुराणकथा ही माणसाची मानसिक गरज आहे, असे त्या चर्चासत्रात एका प्राध्यापकाने सुचविले. किंबहुना अशी अनंत मिथके नसती तर माणसाची संस्कृतीच निर्माण झाली नसती, असे त्याचे प्रतिपादन होते. प्राणीसृष्टीतील इतर कुणीही अशी मिथके निर्माण करीत नाही, पण अगदी प्राचीन आदिवासीही त्यांच्या सामाजिक जीवनाला मात्र मिथकांचा आधार देतात.
प्राण्यांचा बळी देणे, कुठच्या तरी उग्र भासणाऱ्या दगडी पुतळ्यावर त्या प्राण्याचे रक्त शिंपडणे, त्या पुतळ्याभोवती फेर धरून नाचणे, तो ‘देव’ प्रसन्न करून घेणे वा एखाद्या राक्षसाला वा पिशाच्चाला चित्र-विचित्र कर्मकांड करून शांत करणे, मृताला ‘पुढच्या प्रवासासाठी’ मार्ग सुकर करून देणे, ती मृत व्यक्ती ‘भूत’ म्हणून पुन्हा आपल्यात येऊ नये म्हणून विविध प्रकारचे (अघोरीसुद्धा!) मंत्र-तंत्र करणे- अशी शेकडो उदाहरणे देता येतील. (श्राद्ध, सर्वपित्री अमावस्या, दृष्ट काढणे, विशिष्ट खडय़ांच्या अंगठय़ा घालणे, गंडे बांधणे, ‘शांत’ करणे असे असंख्य प्रकार आजही जगभर चालू आहेत.) या सर्व बाबींमध्ये अंधश्रद्धा आहेच, पण त्या चर्चासत्रात भाग घेणाऱ्यांना प्रश्न पडला होता तो हा की, मिथके आणि फॅन्टसी यांची माणसाला गरज का भासली व आजही का भासते? श्रद्धा-अंधश्रद्धांचे मूळ त्या मिथकांमध्येच तर आहे आणि तरीही मिथके म्हणजे अंधश्रद्धा नव्हेत.
या मुद्दय़ावर निरूपण करताना एका हॉलिवूडच्या पटकथा लेखकाने म्हटले की, जेव्हा त्या मिथकांमधील श्रद्धा-अंधश्रद्धा गळून पडू लागल्या (वा आपल्याला तसे वाटले!) तेव्हा स्टार ट्रेक, स्टार वॉर्स, स्पायडरमॅन, बॅटमॅन असे चित्रपट निर्माण झाले. विश्वसंचार करणारी अवकाशयाने निर्माण झाली. प्रकाशाच्या वेगाने जाऊ शकणारे यान आणि त्यामुळे लक्षावधी वर्षांचे आयुष्य लाभलेला माणूस चित्रपटात आला. ‘मॅट्रिक्स’सारख्या ‘ट्रायॉलॉजी’त एकाच वेळी अनेक ठिकाणी अवतरणारी, अदृश्य होऊ शकणारी, माणसाच्या मूळ प्रेरणांचा शोध घेत घेत त्या अमोघ शक्तीचे अस्तित्व प्रकट करणारी ‘वास्तवातली’ माणसे हॉलिवूडने जन्माला घातली.
शेक्सपियरच्या नाटकातील भूत-पिशाच्चसुद्धा वास्तवच असतात (म्हणजे होतात!) परंतु सर्व मानसशास्त्रज्ञ, इतिहासकार, राजकारणी, विचारवंत आजच्या ‘ह्युमन प्रेडिकामेंट’चे वर्णन करतानाही शेक्सपियरचेच दाखले देतात, त्यातलेच संवाद उद्धृत करतात. भूत-पिशाच्च दुय्यम होतात आणि नाटकातली पात्रे ही आपल्या आजूबाजूची, ओळखीची माणसं वाटू लागतात. आज ४०० वर्षे होऊन गेली तरी शेक्सपियर आणि चार हजार वर्षे होऊन गेली तरी रामायण-महाभारत हे आपल्याला आजचे संदर्भ वाटतात, याचे एक कारण मानवी स्वभावातील काही भाव रूप बदलून पण मुळात तसेच राहिले आहेत, असे बहुतेकांना वाटत असते, हे आहे. वास्तवाचे चित्रण प्रभावी असेल तर ते काहीही अवास्तव पेलू शकते, असे त्या हॉलिवूडच्या लेखकाचे म्हणणे होते. (ते त्यांच्या आणि आपल्याही चित्रपटात दिसतेच!)
जोसेफे कॅम्पबेल (१९०४-१९८७) हा एक मोठा मिथक-संशोधक होता. जगातील अनेक समाजांमध्ये प्रचलित असलेल्या दंतकथा, पुराण वाङ्मय, धर्मग्रंथ, चित्रकला, शिल्पकला, कुलदैवते, अगदी चमत्कार आणि अंधश्रद्धा या सर्वाचे अफाट संकलन करून त्याने एक निष्कर्ष काढला होता तो असा की, त्या सर्व मिथक आणि फॅन्टसीज्मध्ये समान सूत्र आहे. त्या सूत्राच्या आधारे माणूस आणि त्याच्या जीवन प्रेरणा समजून घेता येतील. त्या प्रेरणांमध्ये सर्वात प्रभावशाली आहे ती ‘द पॉवर ऑफ मिथ’. माणूस केवळ ऐहिकतेवर जगत नाही. अन्न, वस्त्र, निवारा, पाणी, आरोग्य या गोष्टी लागतातच, पण माणसाच्या जीवनाला अर्थ प्राप्त होऊ लागतो तो त्याच्या कल्पनाविलासामुळे, फॅन्टसीज्मुळे, साहित्य-महाकाव्य आणि चित्र-शिल्पकलांमुळे.
नाहीतर माणसाला पिरॅमिड्स बांधायची काहीही ‘गरज’ नव्हती. चंद्रावर जायचीही निकड नव्हती. विश्वजन्म व विश्वरचनेचा शोध घ्यायची गरज नव्हती. माणूस झपाटला जातो तो मिथकांमुळे आणि ते झपाटलेपण एखाद्या व्यक्तीपुरते मर्यादित नसते. समाजाला एक ‘कलेक्टिव अनकॉन्शियस’ किंवा सामूहिक अंतर्मन असते, या कार्ल गुस्ताव युंग या मानसशास्त्रज्ञाच्या सिद्धांतावर कॅम्पबेल यांनी अधिक चिंतन- संशोधन केले होते. त्याच्या म्हणण्याप्रमाणे माणसाच्या ऐहिक गरजा अगदीच कमी असतात. (दुर्दैवाने त्याही पुऱ्या होत नाहीत), पण त्याची मानसिक झेप अथांगतेकडे झेपावत असते. त्यातूनच मिथके तयार होतात. कॅम्पबेल यांचा ‘द हीरो विथ अ थाऊजंड फेसेस’ हा मूलभूत ग्रंथ आणि ‘द पॉवर ऑफ मिथ’चा सिद्धांत यांनी अवघे विचारविश्व व कलाविश्व ढवळून निघाले होते.
‘स्टार वॉर्स’ या १९७७ साली प्रसिद्ध झालेल्या चित्रपटाचा प्रेरणास्रोत कॅम्पबेल यांच्या त्या दोन ग्रंथांत होता, असे जेव्हा जॉर्ज ल्युकास या हॉलिवूडच्या चित्रपट दिग्दर्शकाने सांगितले, तेव्हा काहीशी खळबळ माजली होती, परंतु त्यानंतर अनेक निर्माते- दिग्दर्शकांनी त्यांच्यावर कॅम्पबेल यांच्या ग्रंथांचा व सिद्धांतांचा कसा प्रभाव पडत होता, हे सांगायला सुरुवात केली.
काही तर्ककठोर विज्ञानवाद्यांनी कॅम्पबेल यांची ‘फॅन्टसीवादी’ आणि मिथकांचे अवास्तव स्तोम माजविणारा लेखक/विचारवंत म्हणून संभावना केली होती, परंतु त्या टीकेने कॅम्पबेल कधीही अस्वस्थ झाले नाहीत. त्यांच्या मते सर्व कला, साहित्य मनात जन्माला येते. आणि ती कला कितीही वास्तव जीवनातून निर्माण झाली असली तरी तिचा आविष्कार कल्पनाविलासातूनच होत असतो. कल्पनाशक्तीला मुक्त वाव मिळाला की अवास्तव वाटणारी मिथके आणि फॅन्टसीज जन्माला येतात. ते अपरिहार्य आहे इतकेच नव्हे तर त्यामुळेच जीवनात आनंद निर्माण होतो. कॅम्पबेल यांच्या जीवनाचे एक सूत्र होते- ‘फॉलो द ब्लिस’! प्रत्येक माणसाने मनात निर्माण होणाऱ्या त्या कल्पनास्रोताच्या, आनंद देणाऱ्या प्रेरणांच्या आधारेच जीवन जगायला पाहिजे. ऐहिकता, संपत्तीसंग्रह, लोभ यातून तो आनंद मिळणे शक्य नाही, असे त्यांचे मत होते. कॅम्पबेल संन्यास घ्यायला सांगत नव्हते, नि:संग व्हायला सांगत नव्हते की ऐहिकतेचा त्याग करायला सांगत नव्हते. त्यांच्या दृष्टिकोनातून ऐहिकतेत अडकून पडले की सर्जनशीलता आणि आनंद या दोन्ही गोष्टींना माणूस मुकतो. कॅम्पबेल यांची १९२४ साली जे. कृष्णमूर्ती यांच्याशी भेट झाली होती. अर्थातच कृष्णमूर्ती तेव्हा थिऑसॉफी चळवळीतील ‘ऑर्डर ऑफ द स्टार’चे सर्वोच्च ‘गुरू’ होते. पुढे पाच वर्षांनी कृष्णमूर्तीनी ती संस्था विसर्जित केली. परंतु कॅम्पबेल तेव्हाच, म्हणजे १९२४ सालीच कृष्णमूर्तीच्या ज्ञानाने व व्यक्तिमत्त्वाने प्रभावित झाले होते. त्यानंतरच कॅम्पबेल यांनी भारतीय पुराणकथा, मिथके, महाकाव्ये आणि उपनिषद-वेदांचा अभ्यास कुरू केला होता. त्यांना जर्मन, फ्रेंच, लॅटिन भाषा येत होत्याच; त्यांनी नंतर संस्कृतचाही अभ्यास केला.
कॅम्पबेल यांनी हाही प्रश्न उपस्थित केला की, माणूस सामूहिकरीत्या मिथके कधी तयार करू लागला? त्याच्या मनाला मुक्त विहार करून देऊन तो फॅन्टसी का व केव्हा करू लागला?
गेल्या ‘त्रिकालवेध’ स्तंभात (७ नोव्हेंबर २००९) क्लॉड लेव्ही स्ट्रॉस या फ्रेंच ‘स्ट्रक्चरॅलिस्ट’ ऊर्फ संरचनावादी विचारवंताच्या सिद्धांतांविषयी थोडक्यात मांडणी केली होती. मानवी समूह हे जन्म व मृत्यू या दोन टोकांच्या दरम्यान जे जीवन जगतात त्याला अनेक रूढी, कर्मकांडे, परंपरा, व्यवहार यांनी गुंफलेले असते व त्या अनुषंगाने येणारे संकेत, नियम यांनी जोडलेले असते. त्यातून एक सामूहिक सामाजिक-सांस्कृतिक संरचना तयार होते. त्या संरचनेशिवाय माणसाचे सामाजिक जीवन उभे राहात नाही, असे त्याचे म्हणणे होते. याचा अर्थ लेव्ही स्ट्रॉस रूढी वा कर्मकांडांचे समर्थन करीत नव्हता. मानववंशशास्त्रज्ञ या नात्याने तो, सुमारे १० हजार वर्षांत विविध समाज कसे उभे राहिले, याचे विश्लेषण करीत होता. त्याचप्रमाणे कॅम्पबेल यांनी माणसाच्या जीवनात मिथक व फॅन्टसी आणि एकूणच कल्पनाविलासाला काय स्थान आहे याबद्दल चिंतन-संशोधन केले. त्यांच्या दृष्टिकोनातून रामायण, महाभारत, बायबल, पुराण, कुराण हा सर्व प्रभावी कल्पनाविलास आहे आणि पिरॅमिडस्पासून ते विश्वशोध घेणारी अवकाशयाने हा सर्व सर्जनशील फॅन्टसीचा प्रभाव आहे.
एका दृष्टिकोनातून असेही म्हणता येईल की, सर्व कला व विज्ञानही त्या मिथक व फॅन्टसीज्चा विलक्षण चैतन्यशील आविष्कार आहे-ऐहिकतेच्या पलीकडे जाणारा आणि तरीही याच भौतिक वास्तवात जन्माला येणारा सर्जनशील व आनंददायी आविष्कार!
कुमार केतकर ,
शनिवार, १४ नोव्हेंबर २००९
No comments:
Post a Comment