खंत विवेकशून्य विचारवंतांची!











गेल्या महिन्यात न्यूयॉर्कमध्ये एक चर्चासत्र आयोजित केलेले होते. विषय होता ‘विज्ञान, श्रद्धा आणि धर्म’. बहुतेक चर्चासत्रांप्रमाणे अर्थातच त्या चर्चेतून सर्वमान्य निष्कर्ष निघाले नाहीत. गेल्या महिन्याच्या ‘सायंटिफिक अमेरिकन’ अंकात लॉरेन्स क्रॉस या पदार्थविज्ञानशास्त्रज्ञाने त्या चर्चेसंबंधात जे निवेदन केले आहे ते पाहता अजूनही मतभेदांची कोंडी फुटलेली नाही. मतभेदांचा मुद्दा अर्थातच ‘परमेश्वर’ हा आहे. ‘देव आहे, की नाही’ या विषयावर गेली सुमारे तीन-चारशे वर्षे खडाजंगी चालू आहे. हा प्रश्न अर्थातच लोकशाही पद्धतीने, जनमताचा कौल घेऊन सोडविण्यात अर्थ नाही. प्रचंड बहुमताने ‘परमेश्वरवादी’ पार्टीचा विजय होईल आणि देवाचे अस्तित्व ‘लोकशाही’ने ‘सिद्ध’ झाले असे मानले जाईल. जगातील जवळजवळ सर्व राजकारणी व्यक्ती देवाचे अस्तित्व मानतात. भारतातले बहुतेक उमेदवार निवडणुकीपूर्वी शिर्डीच्या साईबाबांपासून सिद्धीविनायकापर्यंत आणि तिरुपतीच्या बालाजीपासून ते माऊंट मेरीपर्यंत सर्वाचे आशीर्वाद घेत फिरत असतात. त्यांची श्रद्धा इतकी दुर्दम्य असते, की निवडणुकीत पराभव झाल्यानंतरही त्यांच्या श्रद्धेत तसूभरही फरक पडत नाही. त्यांच्या श्रद्धेला देवाच्या अस्तित्वाचा पुरावा लागत नाही.
खरे म्हणजे, ज्यांचा देवावर विश्वास नाही त्यांनी अशा श्रद्धावानांबरोबर वाद घालण्यात अर्थ नसतो; परंतु अनेक कट्टर नास्तिक, ठाम विज्ञानवादी आणि स्केप्टिक्स ऊर्फ शंका / संशयवादी ‘देव नाहीच’ हे सिद्ध करू पाहात असतात. फारच थोडे आस्तिक हे विचाराने नास्तिक झालेले आहेत. पंडित नेहरू हे विचाराने नास्तिक होते, वृत्तीने व व्यवहाराने १०० टक्के विज्ञानवादी होते; पण स्वभावाने सहिष्णू व उदारमतवादी असल्याने त्यांनी ‘परमेश्वरवाद्यां’ची टिंगल-टवाळी केली नाही वा त्यांच्या तोंडी ते लागले नाहीत. श्रद्धा व धर्म राजकारणात शक्यतो येऊ नयेत हा त्यांचा प्रयत्न होता.
‘नास्तिकांची नास्तिकवादावरची श्रद्धा आस्तिकांच्या देवावरच्या श्रद्धेपेक्षाही अधिक कडवी असते,’ असे नेहरूंनी एके ठिकाणी म्हटले आहे. बटर्रण्ड रसेल शंकावादी म्हणजे स्केप्टिक होते आणि देवाच्या मुद्दय़ावर ते ‘अ‍ॅग्नॉस्टिक’ ऊर्फ अज्ञेयवादी होते, ‘एथीइस्ट’ म्हणजे निरीश्वरवादी नव्हते. त्यांनी तर ‘मी ख्रिश्चन का नाही’ (हँ८ क ंे ल्ल३ ं उँ१्र२३्रल्ल) या विषयावर प्रबंधरूपी पुस्तिका लिहून इंग्लंडमध्ये खळबळच माजविली होती; पण रसेल यांनीच ‘मी कम्युनिस्ट का नाही’ (हँ८ क ंे ल्ल३ ं उे४ल्ल्र२३) अशीही पुस्तिका लिहून डाव्या मंडळींमध्ये एक सुरुंग पेरला होता. त्यामुळे रसेल असोत वा नेहरू, या दोघांबद्दल बोलताना कम्युनिस्ट मंडळी कधी बुद्धिवादी अहंतेने तर कधी तुच्छतेने बोलतात. पण गंमत म्हणजे जेव्हा ईश्वरवाद्यांशी वाद घालायचा प्रसंग येतो तेव्हा रसेलच्या तर्कवादी मांडणीचाच आधार घेतात.

कार्ल मार्क्‍स अर्थातच निरीश्वरवादी; परंतु स्वयंभू कम्युनिस्टांच्या अरेरावीला व दुराग्रहीपणाला कंटाळून त्यांनी ‘थँक गॉड, आय अ‍ॅम नॉट अ मार्क्‍सिस्ट!’ असे उद्गार काढले होते. मुद्दा हा, की नास्तिक-आस्तिक- शंकावादी यांच्यातील वाद पूर्णपणे मिटणे अशक्य आहे. शिवाय आयझ्ॉक न्यूटनपासून अनेक वैज्ञानिकच देववादी (आणि दैववादीही) असल्यामुळे नास्तिकवाद्यांची थोडीशी पंचाईत होते. परंतु न्यूटनचा तथाकथित आस्तिकवाद हा श्रद्धा वा रूढिवादी नव्हता. समुद्राच्या किनाऱ्यावर बसून अथांग पसरलेल्या पाण्याकडे आणि वर आकाशाकडे पाहून, तो म्हणत असे, की येथील वाळूच्या एका कणाइतकीही आपली अस्तित्व-खूण नाही; पण त्या अथांगतेचा गणिती थांग लावण्याचा त्याने अखेपर्यंत प्रयत्न केला. ‘परमेश्वरनिर्मित’ सृष्टीचे रहस्य शोधून काढणे हेच आपल्याला त्याने दिलेले काम (ध्येय) आहे, अशा स्वरूपाची त्याची विचारसरणी होती. म्हणूनच झाडावरून खाली पडणाऱ्या सफरचंदात त्याला गुरुत्वाकर्षणाचे भौतिकशास्त्रीय नियम सापडले. नाहीतर लाखो वर्षे सफरचंदे व अन्य फळे वरून खाली पडत होतीच- फक्त इंग्लंडमध्येच नव्हे तर भारतातही! न्यूटन जर विज्ञानमार्गाऐवजी भक्तिमार्गाने गेला असता तर या विश्वाच्या अथांगाचा थांग लागायला तेव्हा सुरुवात झाली नसती. एका अर्थाने न्यूटन-गॅलिलिओंनीच देव वा धर्मविरोधी काहीही थेट भाष्य न करता त्यांच्या अस्तित्वाला व श्रद्धावादाला मूलभूत आव्हान दिले. किंबहुना विज्ञानवाद्यांमध्ये आणि वैज्ञानिकांमध्ये देव ‘अवतरला’ तो तेव्हापासूनच. (नास्तिक विज्ञानवाद्यांनी तेव्हापासून परमेश्वराविरुद्ध एक आघाडी उभी केली आहे. जे परमेश्वरवादी त्या वादात उतरतात, त्यांची पंचाईत होते, कारण त्यांना सिद्ध काहीच करता येत नाही; पण अशा सिद्ध न करता येण्यासारख्या, न दिसणाऱ्या, प्रयोगात न बसणाऱ्या अनेक गोष्टी जर आपण मानतो तर देवाचे अस्तित्व मानायला काय हरकत आहे, अशा प्रकारचे अतक्र्य तर्कशास्त्र ते सांगतात. याउलट विज्ञानवादी जवळजवळ प्रत्येक गोष्ट तर्काने, गणिताने, प्रयोगशीलतेने सिद्ध करण्याच्या मागे असल्यामुळे त्या दोघांमध्ये संवाद असंभवनीयच असतो. त्यामुळे सहिष्णुता आणि परस्परांबद्दलचा सांस्कृतिक आदरभाव इतकेच संदर्भ त्यांच्या चर्चेला असतात वा उरतात. धर्मवादी / देववादी आस्तिक आणि विज्ञानवादी नास्तिक यांच्यातील विसंवाद वा असंवाद समजण्यासारखा आहे, परंतु कला-संस्कृतिवादी आणि विज्ञानवादी यांच्यात अक्षरश: उभा दावा असावा हे मात्र न मानवण्यासारखे वाटते. परंतु अशी स्थिती युरोपात दुसऱ्या महायुद्धानंतर उद्भवली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात व नंतर विज्ञानाचाच नव्हे तर विज्ञानवादाचा प्रभाव खूपच वाढला होता. विद्यापीठांमध्ये, अगदी शाळांमध्येसुद्धा, तसेच सामाजिक जीवनात ‘आर्ट्स’ शाखांकडे जाणारे बुद्धीने दुय्यम दर्जाचे आणि विज्ञान शाखा निवडणारे ‘हुशार’, ‘हाय आयक्यू’ असणारे असतात असे मानण्याचा कल वाढला होता. (आपल्याकडेसुद्धा ९० टक्क्यांच्यावर मार्क मिळविणाऱ्यांनी सायन्सला जायचे- इंजिनीअरिंग, मेडिकल, सॉफ्टवेअर वगैरे- आणि ५० टक्क्यांच्या आसपास मार्क्‍स मिळविणाऱ्यांनी ‘आर्ट्स’ला जायचे ही प्रथा गेली ३० वर्षे आहेच.)
युरोपमध्ये तर १९३० ते १९६० या काळात लेखक, कवी, अर्थतज्ज्ञ, समाजशास्त्रज्ञ इत्यादी ‘ह्युमॅनिटीज्’ किंवा ‘आर्ट्स’ शाखांमधले ‘विचारवंत’ एका बाजूला आणि वैज्ञानिक, गणिती, तंत्रज्ञ दुसऱ्या बाजूला असे उभे दोन तटच पडले होते. इतके, की जगद्विख्यात फिजिसिस्ट रुदरफोर्ड आणि ख्यातनाम गणिती जी.एच. हार्डी काहीसे छद्मीपणे उद्गारले, की ‘आम्ही विज्ञान-गणित क्षेत्रात काम करतो त्यामुळे आम्हाला ‘इंटेलेक्च्युअल’ म्हणून संबोधण्याची प्रथा नाही. आम्ही ‘सायन्टिस्ट!’- इण्टेलेक्च्युअल नाही.. विचारवंत फक्त सॉक्रेटिस आणि शेक्सपियर, वा शेली आणि शॉपेनहॉवर यांचा अभ्यास करणारे प्राध्यापक वा तत्सम कुणी.. आम्ही अणुसंशोधन, जीवसृष्टीतील कूट प्रश्न, गणितातील जटिल समस्यांचा अभ्यास करणारे लोक.. आम्हाला इंटेलेक्च्युअल कसे म्हणणार?’ म्हटले तर ही खंत होती, म्हटले तर तथाकथित ‘विचारवंतां’वरचे स्पष्ट भाष्य! समाजातला वा राजकारणातला वा अर्थकारणातला कोणताही प्रश्न असो- मग तो युद्धविषयक असो, औद्योगीकरणाचा असो वा नव्या उत्पादन तंत्राचा- त्यासाठी हे कवी, लेखक, विचारवंत कामाचे नसतात, तेव्हा त्यांना आमची गरज भासते, असे त्यांना म्हणायचे होते.
‘कलावादी’ आणि ‘विज्ञानवादी’ यांच्यातील परस्परविरोधी भावना इतक्या पराकोटीला गेल्या होत्या, की त्या वेळेस इंग्लंडमध्ये ‘विचारवंत’ म्हणून प्रसिद्ध असलेले सी. पी. स्नो यांनी ‘द टू कल्चर्स’ नावाचे एक छोटेसे पुस्तकच लिहिले. या विषयावरील त्यांच्याच एका भाषणाचा आधार घेऊन. त्यांचे ते भाषण सर्वार्थाने ऐतिहासिक ठरले. त्याचे एक कारण स्नो हे स्वत: ज्येष्ठ वैज्ञानिक होते आणि सर्जनशील लेखकही होते. दोन्ही ‘गटां’मध्ये त्यांना प्रतिष्ठा होती, पण त्या दोन गटांमधील मंडळींमध्ये संवाद घडवून आणण्यात ते अयशस्वी ठरले होते. आपण या प्रयत्नात का अयशस्वी ठरलो हे सांगण्याचे निमित्त करून ‘आर्ट्स’ आणि ‘सायन्स’ या दोन्ही शाखा सर्जनशील आहेत. माणसाला, समाजाला त्यापैकी केवळ एकाच्याच आधारे जीवन जगणे आनंददायी होणार नाही, असे साधे पण विलक्षण वेधक व भेदकपणे मांडलेले ते मुक्त चिंतन होते. ‘सायंटिफिक अमेरिकन’च्या ज्या अंकाचा वर संदर्भ दिला त्या अंकाने, त्या भाषणाला बरोबर ५० वर्षे झाली म्हणून पुन्हा या वैचारिक यादवीचा आढावा घेतला आहे.
सी. पी. स्नो यांनी जे दोन तट / गट संवादी करायचा प्रयत्न केला, त्यात देव वा धर्म हा मुद्दा अजिबात नव्हता. कारण कित्येक ‘विचारवंत’ (‘आर्ट्स’ वा ‘ह्युमॅनिटीज्’वाले) हे नास्तिक होते आणि कित्येक वैज्ञानिक हे धर्माला वा देवाला मानणारे होते. त्यामुळे वैज्ञानिक हा आपसूकच निरीश्वरवादी असतो, असे मानण्याला थारा नव्हता. परंतु कोणत्याही गणितसूत्रापेक्षा (गणितज्ज्ञापेक्षा) शेक्सपियर वा शेली व त्यांची नाटके व कविता सांस्कृतिकतेच्या अधिक ‘उच्च स्तरावर’ आहेत, असे बहुसंख्यांचे मत होते आणि वैज्ञानिक हे मुख्यत: माणसांच्या ऐहिक गरजा भागवू पाहणारे लोक आहेत, असा ग्रह होता. (साधारणपणे ‘भाकरी की फूल’ वा ‘भावना की ज्ञान’ या चालीवर!)
परंतु वस्तुस्थिती अशी नव्हतीच. अनेक वैज्ञानिक असे होते की, जे शेक्सपियरचे, संगीताचे, बॅले व ऑपेराचे, उत्कृष्ट चित्रांचे, शिल्पकलांचे चाहते होते, रसिक होते आणि संग्राहकही होते. त्यांच्या मनात सर्जनशील कलेविषयी ग्रहपूर्वग्रह नव्हते, पण लेखक-कवींना मात्र विज्ञानाविषयी काहीही माहिती नसताना ते बिनदिक्कत नवीन संशोधनांविषयी, शास्त्रज्ञांविषयी बोलत असत. त्यामुळे प्रश्न तथाकथित ‘इंटेलेक्च्युअल’ भासणारा आणि अलंकारिकपणे व्यक्त होणारा ‘भाकरी का फूल’ असा नव्हताच.
त्यानंतरच्या काळात, ‘सायंटिफिक अमेरिकन’ने म्हटल्याप्रमाणे ‘टू कल्चर्स’ची जागा ‘थ्री कल्चर्स’ने घेतली. अनेक वैज्ञानिक थेट कथा-कविता-कादंबऱ्याच लिहू लागले. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक विषयांवर अतिशय उत्तम दर्जाचे लेखन करू लागले. फक्त ‘विज्ञान साहित्य’ नव्हे. बट्र्राण्ड रसेल यांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. ‘मॅरेज अ‍ॅण्ड मॉरल्स’ हा सामाजिक विषयावरचा वादग्रस्त प्रबंध प्रकाशित झाला. रसेल हे विलक्षण प्रतिभेचे गणिती होते; पण त्यांची ख्याती दिगंतात पसरली ती सामाजिक विचारवंत म्हणून. बिगर-विज्ञान क्षेत्रातल्या लोकांसाठी त्यांनी अल्बर्ट आइनस्टाईन यांच्या सापेक्षतावादाचा सिद्धांत सुलभपणे समजावून सांगणारा ‘एबीसी ऑफ रिलेटिव्हिटी’ हा छोटेखानी ग्रंथ लिहिला. (रसेल तर गंमतीने म्हणत, की तो सिद्धांत फक्त आइनस्टाईनला व त्यांनाच समजला होता. जगाला समजला तो रसेल यांच्या त्या पुस्तिकेमुळेच!) स्वत: स्नो तर लेखक होतेच. ५० वर्षांत हे ‘थर्ड कल्चर’ प्रचंड प्रमाणावर विस्तारले आहे. आयझ्ॉक अ‍ॅसिमोवसारख्या लेखकांनी (त्यांनी एकूण ५०० पुस्तके लिहिली) केवळ विलक्षण ‘विज्ञान कादंबऱ्या’च लिहिल्या नाहीत तर शेक्सपियर, बायबल आणि समाजशास्त्रविषयक लेखन केले. त्यांच्या कादंबऱ्यांवर चित्रपटही निघाले. ऑर्थर सी क्लार्क, कार्ल सगान ते अगदी होमी भाभा व जयंत नारळीकर व यशपाल अशा सर्वानीच आपली सर्जनशीलता दाखवून दिली. भाभा स्वत: उत्कृष्ट चित्रकार होते आणि त्याची कलादृष्टी ही तर भल्या भल्या समीक्षकांपेक्षा कितीतरी पटींनी प्रगल्भ होती.
काही वर्षांत या तटबंदी बऱ्याच प्रमाणात कोसळून पडल्या आहेत. आता शेक्सपियरच्या नाटकांवर (म्हणजे त्यातील अनेक नैसर्गिक व मानसशास्त्रीय संदर्भावर) वैज्ञानिक मंडळी संशोधन करीत आहेत आणि कित्येक विज्ञानविषय हे सहजगत्या साहित्यविषय झाले आहेत. जॉन ल कार यांच्या गुप्त हेरकथा / (ी२स्र््रंल्लंॠी ल्ल५ी’२) किंवा टॉम क्लान्सी यांच्या युद्ध व शस्त्रास्त्र संशोधन कादंबऱ्यांमध्ये इतके विज्ञान असते आणि तरीही त्या कथा-कादंबऱ्यांना आपण विज्ञान-साहित्य म्हणू शकत नाही.
स्नो यांनी देव / धर्म / श्रद्धा यांच्या विरोधात व खिल्ली उडविणारे काहीही लिहिले नाही. त्यांच्या मते सर्जनशील साहित्यात आणि विज्ञानात, देवाला तसे फारसे स्थान नाही. त्याबद्दल वारही घालायची गरज नाही. माणसाला या भूतलावर पडणारे प्रश्न (किंवा माणसानेच निर्माण केलेले प्रश्न) येथेच सोडवायचे आहेत. ते सोडवायला देव प्रत्यक्ष अवतरणार नाही हे अगदी कट्टर परमेश्वरवाद्यांनाही माहीत असते; पण त्यांच्या श्रद्धेला तडा जाईल या भीतीने ते स्वत:शीसुद्धा तसे बोलत नाहीत. ‘संभवामि युगे युगे’ ही फक्त बोलण्यापुरते असते.
बट्र्राण्ड रसेल यांनी एका निबंधात म्हटले होते, की देवाचे अस्तित्व कुठच्याही अनुभवातून (साक्षात्कारींचा स्वयंभू अनुभव वगळता) वा तर्कशास्त्रात बसत नाही; पण असे असूनही हजारो वर्षे लोक देव आणि दानव, भूत-पिशाच्च आणि देवदूत अशा संकल्पनांवर विश्वास ठेवत आले आहेत. प्रश्न हा आहे, की त्यांची अशी तर्कशून्य श्रद्धा कशातून निर्माण होते? रसेल यांनी पुढे म्हटले, की याचे एक मुख्य कारण माणूस हा पूर्णपणे ‘इरॅशनल अ‍ॅनिमल’ म्हणजे विवेक / तर्कशून्य प्राणी आहे आणि तरीही तितक्याच अतार्किकपणे त्याने स्वत:लाच ‘रॅशनल अ‍ॅनिमल’ ऊर्फ सुज्ञ-विवेकी प्राणी असे म्हणवून घेतले आहे.


कुमार केतकर
शनिवार, १७ ऑक्टोबर २००९

1 comment:

  1. लेखाच्या उजवीकडील सुमारे अर्धा इंच मजकूर दिसत नाही. त्यामुळे लेख नीट वाचता येत नाही. असं कां होतं?

    ReplyDelete