ही प्रेरणा येते कुठून?



सुमारे ३० वर्षांपूर्वी, बीबीसी टेलिव्हिजन चॅनलवर एक वैज्ञानिक-वैद्यकीय मुलाखत मालिका झाली होती. त्या मालिकेचे नाव होते- ‘द बॉडी इन क्वेश्चन.’ म्हणजे आपले शरीर आणि त्यातील सुप्त-गुप्त हालचाली. त्या मुलाखती घेतल्या होत्या, डॉ. जोनाथन मिलर या ब्रिटिश डॉक्टरने. हा ब्रिटिश डॉक्टर निष्णात वैद्य आणि शल्यविशारद होताच, पण वैज्ञानिकही होता.
शरीरशास्त्राचा अभ्यास पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि अर्थातच वनस्पती आणि जीवशास्त्र यातील संशोधनाशिवाय पूर्ण होणे शक्य नाही, असे त्यांना वाटत होते. त्यांनी ज्यांच्या मुलाखती घेतल्या, ते सर्वजण जगद्विख्यात वैज्ञानिक/शरीरशास्त्रज्ञ होते.
त्या मुलाखतीपूर्वी जे प्रास्ताविक निवेदन त्यांनी केले होते, त्यात एक वेगळाच प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. गर्भधारणेनंतर त्या जीवाला गर्भातून बाहेर यायची आणि जगण्याची प्रेरणा कुठून येते. जर त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी असे दिले असते की ती सर्व देवाची किमया आहे, तोच गर्भधारणा घडवून आणतो, गर्भातून बाहेर यायची प्रेरणा देतो आणि जगण्याचीही; तर या उत्तरानंतर सर्व वैज्ञानिक चौकशा व प्रयोग पूर्णपणे थांबले असते. कारण अवघ्या विश्वाचा प्रेरणास्रोत तो परमेश्वरच आहे असे म्हटल्यानंतर त्या रहस्याचा अधिक खोल शोध घेण्याची काय गरज? पण गंमत म्हणजे पूर्वीचे अनेक वैज्ञानिक (आयझ्ॉक न्यूटनसकट) देवावर विश्वास ठेवत असत (आजही तसे अनेक शास्त्रज्ञ आहेत) आणि तरीही त्या परमेश्वराने निर्माण केलेल्या विश्वाचा आणि जीवसृष्टीचा शोध, त्या देवाची परवानगी न घेता ते करीत असत. देव, धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा आणि विज्ञान या गोष्टी एकमेकांपासून दूर व अलिप्त ठेवणे त्यांना शक्य झाले, कारण अचाट कुतूहल, अफाट जिज्ञासा आणि वैज्ञानिक विचारपद्धतीवर असलेला त्यांचा ठाम विश्वास. (याच ‘वैज्ञानिक श्रद्धे’मुळे भारतीय वैज्ञानिकांना चंद्रावर असलेल्या पाण्याच्या शक्यतेचा अपूर्व शोध लागला आहे. बरोबर चाळीस वर्षांपूर्वी माणूस प्रथम चंद्रावर उतरला, तेव्हाही नील आर्मस्ट्राँगला याच पाण्याच्या शोधाची तहान लागली होती, असो.)
तर आपण चर्चा करीत होतो ती डॉ. जोनाथन मिलर यांच्या वैज्ञानिक मुलाखत मालिकेची. त्या चर्चेमधून तेव्हा एक असा प्रश्न उपस्थित झाला होता, की इतर कोणत्याही प्राण्याला माणसाप्रमाणे विश्वाविषयीचे, जीवसृष्टीबद्दलचे कुतूहल का वाटले नाही. जगणे, खाणे-पिणे आणि पुनरुत्पादन करणे या प्राथमिक क्रिया करताना जे कुतूहल, साहस आणि ‘प्रयोग’ही त्या प्राण्यांना करावे लागतात, त्या पलीकडे बाकी प्राणीमात्राची मजल गेली नाही. प्राण सर्वच प्राण्यांना प्रिय आहे, पण माणूस मात्र अक्षरश: जिवावर उदार होऊन या सृष्टीचे रहस्य शोधायला त्या जगण्या-पुनरुत्पादनाच्या सापळ्यातून बाहेर पडला. म्हणजेच प्राणापेक्षाही सत्यशोध त्यांना अधिक प्रेरणादायी वाटला. पण पुन्हा तो प्रश्न उरलाच! त्या प्रेरणेचा उगम कुठे आहे?
शरीरावर शस्त्रक्रिया करणाऱ्यांना, अगदी मेंदूवर उपचार करणाऱ्यांना किंवा इतर प्राण्यांचे शरीरविच्छेदन करताना या संशोधकांना ‘मन’ नावाचा अवयव सापडलेला नव्हता. ज्या रुग्ण व्यक्तीवर काही महिने उपचार चालू होते आणि जो आजारी माणूस त्या डॉक्टरबरोबर हसत-खेळत गप्पा मारत असे, त्याच्या आठवणी, त्याची स्वप्ने, त्याच्या आकांक्षा, त्याने केलेल्या कविता वा मनात योजलेल्या नाटक-कादंबऱ्यांचे ‘प्लॉट्स’ कथन करीत असे, कधी त्या डॉक्टरबरोबर चर्चाही करीत असे, असा तो माणूस एकदम एखाद्या पहाटे प्राण गमावतो, सचेतनचा अचेतन होतो म्हणजे नक्की काय होते याचे उत्तर त्यांच्याकडे नव्हते. प्राण, कॉन्शियसनेस, जाणिवा-नेणिवा, संवेदन, चेतना, प्रेरणा हे काहीही त्या शरीरविच्छेदनात वा उपचाराच्या माध्यमातून उमजलेले नव्हते. म्हणून डॉ. जोनाथन मिलर यांनी बीबीसी चॅनलवर आणखी एक मुलाखत-मालिका घेण्याचे ठरविले.
त्याचे नाव ‘बॉडी इन क्वेश्चन’च्या चालीवरच ‘माइंड इन क्वेश्चन’ असे द्यायचा पहिला विचार होता, पण शेवटी बीबीसीच्या निर्मात्यांनी त्या मालिकेचे नाव ‘स्टेट्स ऑफ माइंड’ म्हणजे ‘मनाच्या (विविध) अवस्था’ असे ठरविले. ही मालिका सादर होऊनही आता सुमारे २८ वर्षे होत आली आहेत. (असे किती कार्यक्रम आपल्या चॅनल्सवर होतात? असो.)
त्या मुलाखती सादर झाल्या, तेव्हा ग्लोबल टीव्ही नेटवर्क नव्हते, इंटरनेट प्रचलित नव्हते, इतकेच काय फॅक्ससुद्धा नव्हता, मोबाइल फोन नव्हते, ‘इन्फॉर्मेशन हायवे’ नव्हते, त्यामुळे ‘नॉलेज एक्स्चेंज’ म्हणजे आजच्यासारखी हायटेक वैचारिक देवाणघेवाणही नव्हती. त्यावेळेस या सर्व वैज्ञानिक-संशोधक-विचारवंतांची वैचारिक देवघेव मुख्यत: आंतरराष्ट्रीय परिषदांमध्येच होत असे. हा ‘इन्फॉर्मेशन एक्स्चेंज’चा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आज एखाद्या व्यक्तीने एखादे संशोधन केले, कल्पना मांडली, हायपोथिसिस ऊर्फ अंदाज सिद्धांत मांडला, इतकेच काय, कादंबरीचा वा नाटकाचा प्लॉटसुद्धा त्या व्यक्तीला सुचला, तर त्याचे ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राइट’च्या कायद्यानुसार रजिस्ट्रेशन केले जाऊ शकते, पेटंट घेतले जाऊ शकते. ‘आयडियाज आर प्रायव्हेट प्रॉपर्टी’ म्हणजे कल्पना वा संशोधन हे स्थावर-जंगम प्रॉपर्टीप्रमाणे आहे. ही पद्धत तेव्हाही होती, पण तेव्हा संशोधनातील मुद्दे अधिक खुलेपणाने चर्चिले जात.
डॉ. जोनाथन मिलर यांनी ‘स्टेट्स ऑफ माइंड’ मालिकेत घेतलेल्या महा-दिग्गजांच्या मुलाखती म्हणजे भविष्यातील मूलभूत संशोधनाच्या रूपरेषा आहेत. आज मन, मेंदू, कॉन्शियसनेस, स्मृती, संवेदना इ. संबंधातील सुरू असलेले चिंतन व संशोधन सुमारे ३० वर्षांपूर्वीही किती प्रगत अवस्थेत होते, याचा अंदाज त्या मुलाखतींमधून येतो. (डॉ. मिलर यांच्या ‘बॉडी इन क्वेश्चन’ आणि ‘स्टेट्स ऑफ माइंड’ या दोन्ही मुलाखत-मालिका आता पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाल्या आहेत.)
शरीरशास्त्र आणि पदार्थ विज्ञानशास्त्र (म्हणजे फिजिऑलॉजी आणि फिजिक्स) या दोन्ही ज्ञानशाखांचा विकास रेनेसाँच्या काळात, १५ व्या शतकात विशेषत: झपाटय़ाने होऊ लागला. पण ‘मानसशास्त्र’ उदयाला आले, ते १८ व्या शतकाच्या अखेरीस आणि त्याचा विकास होऊ लागला एकोणिसाव्या शतकापासून.
अगदी सुरुवातीला ‘मेन्टल फिलॉसॉफी’ म्हणून या शाखेला संबोधले जात असे. केवळ चिंतन व तत्त्वज्ञान या निकषांवर ‘मानसशास्त्रा’चा विचार केला तर ते मात्र आपल्याकडे अगदी रामायण-महाभारतात किंवा नंतर बुद्धाच्या तत्त्वज्ञानात वा ज्ञानेश्वरी-दासबोधातही आढळते. पण ‘मेन्टल फिलॉसॉफी’ किंवा ‘मनाचे तत्त्वज्ञान’ आधुनिक-वैज्ञानिक पद्धतीने संशोधन क्षेत्रात आले ते शरीरशास्त्र आणि पदार्थविज्ञानशास्त्र रुजल्यानंतर. म्हणजेच मनाचा शोध किंवा प्रेरणेचा, चैतन्याचा शोध शरीरात, भौतिक विश्वात सुरू झाला तेव्हापासून. परंतु, इतर विज्ञानशाखांमध्ये ती वस्तू किंवा ते शरीर प्रयोगशाळेत असू शकते. एखाद्या व्यक्तीच्या आरोग्याचे निदान त्याच्या शरीराचे तापमान, रक्तदाब, साखरेचे रक्तातील प्रमाण, नाडी, छातीचे ठोके इत्यादी बाबींचे मोजमाप करून ठरविता येते.
परंतु, मन ही चीज प्रयोगशाळेत आणणे कठीण होते. म्हणूनच ज्यांना मानसिक रुग्ण म्हणून ओळखले जात असे, त्यांची यथासांग पाहणी करणे म्हणजेच मनाची प्रायोगिक छाननी करणे असे मानले जाऊ लागले. परंतु, एखादी व्यक्ती मानसिक रुग्ण आहे हे कुणी ठरवायचे?
डॉ. जोनाथन मिलर यांनी त्या मुलाखतींमध्ये डॉ. थॉमस झाझ या हंगेरियन-अमेरिकन मानसशास्त्रज्ञाची घेतलेली मुलाखत म्हणजे सायकॉलॉजिस्ट्स्, सायकिअ‍ॅट्रिस्ट्स् कौन्सेलर्स, बिहेवियर कन्सल्टंट्स् यांना दिलेले आव्हान होते.
शारीरिक आजार असलेल्या व्यक्तींना ज्या प्रकारे उपचार दिले जातात, गोळ्या, इंजेक्शन्स इ. दिले जाते, त्याप्रमाणे तथाकथित मानसिक रुग्णांना उपचार देणे हे अतिशय घातक आहे, असे त्यांचे मत होते. त्यांनी म्हटले की, कुठच्या ना कुठच्या प्रकारची ‘अ‍ॅबनॉर्मेलिटी’ सर्वामध्येच असते -कमी-अधिक प्रमाणात, म्हणून प्रत्येकजण मनोरुग्ण ठरत नाही. तसे असते तर जवळ जवळ सर्वच माणसे मनोरुग्ण ठरू शकतील. (‘दासबोधा’तील मूर्खाची लक्षणे लावून मूर्खाचा शोध घ्यायचे ठरविले तर जगात एकही सुज्ञ वा शहाणा नाही असे वाटू लागते त्याचप्रमाणे! परंतु, ‘अ‍ॅबनॉर्मल सायकॉलॉजी’चा उदय आणि विकासही तशाच गृहितकावर आधारलेला आहे. विल्यम मॅक्डुगल या मानसशास्त्रज्ञाच्या या विषयावरील महाग्रंथाचा अभ्यास करणाऱ्यांनाही प्रत्येक माणूस- अर्थातच आपण स्वत: वगळून- हा अ‍ॅबनॉर्मलच वाटतो!)
थॉमस झाझ यांनी तर अशी मांडणी केली की, सायकिअ‍ॅट्रिस्ट्स् (किंवा सकायट्रिस्ट्स्!) हे उपचाराच्या नावाखाली त्या तथाकथित मनोरुग्णाच्या सर्जनशीलतेला दडपून टाकतात, त्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्या व्यक्तीला उपचाराच्या वा प्रयोगांच्या निमित्ताने स्वत:च्या कह्यात घेतात, त्याला मानसिक गुलाम करतात. त्याचे अस्तित्व, त्याची अस्मिता आणि आत्मप्रतिष्ठाच नष्ट करतात.
स्वत: मानसशास्त्रज्ञ असूनही सायकिअ‍ॅट्रिस्ट्स्वर असा प्रखर हल्ला चढविल्यामुळे डॉ. झाझ यांनी शेकडो तज्ज्ञांचे शत्रुत्व ओढवून घेतले. परंतु, त्यांच्या त्या वैज्ञानिक बंडखोरीमुळे ‘क्रिएटिव्हिटी’ ऊर्फ सर्जनशीलता, ‘ओरिजिनॅलिटी’ म्हणजे उपक्रमशीलता आणि वेगळेपण म्हणजे ‘आयडेंटिटी’ या संकल्पनांवर पुन्हा संशोधन होऊ लागले. (क्रिएटिव्हिटी, ओरिजिनॅलिटी, आयडेंटिटी.) हे संशोधन तत्कालीन मानसशास्त्राच्या सीमारेषा ओलांडून पुढे गेल्यावर, पुन्हा एकदा मानसशास्त्रीय संशोधन न्यूरॉलॉजी, न्यूरोबायॉलॉजी, न्यूरोलिंग्विस्टिक्स्च्या क्षेत्रात आले. साहजिकच भाषा कशी निर्माण होते, लहान मूल बोलायला कसे शिकते, विचार कुठून येतात, गणित कसे सुचते, संगीतरचना मनात कशा तयार होतात, स्वर-सूर-ताल-लय यातील सांगीतिक सौंदर्य कसे निर्माण होते, रंगसंगती, गंधसंगती व एकूणच सौंदर्यशास्त्र मनात आकार कसे घेते, येथपासून माणसांचे स्वभाव कसे बनतात या विषयांकडे वैज्ञानिकांचे पुन्हा लक्ष वेधले आहे. त्यातूनच आधुनिक समाजशास्त्र आणि अर्थशास्त्रही आता अभ्यासले जात आहे. ‘बिहेविअरल इकॉनॉमिक्स’ (ज्याचा संदर्भ यापूर्वीच्या लेखात सूचित केला होता) ही अर्थशास्त्रातील शाखा आता रूढ झाली आहे.
पूर्वी समाजशास्त्राचा अभ्यास करताना जात, धर्म, भाषा, प्रांत, वर्ग, वंश इत्यादींचे निकष घेऊन केला जात असे. आजही ते निकष आहेतच. परंतु, आता इंडिव्हिज्युअल ऊर्फ व्यक्ती हाही समाजशास्त्राचा घटक झाला आहे. समाज हा अनेक- असंख्य- व्यक्ती एकत्र आल्यामुळे तयार होतो की व्यक्ती हे वास्तव आहे आणि समाज ही एक अभिरूप संकल्पना आहे, हा एक वाद आहेच. ‘रंगुनी रंगात साऱ्या, रंग माझा वेगळा’ असा व्यक्तिवादाचा- कधी कधी व्यक्तिवादी अभिनिवेशाचा आविष्कार उग्रपणे प्रकट होतो, तर कधी कधी एखादी व्यक्ती स्वत:ला समाजात, कुटुंबात, पक्षात, संघटनेत इतक्या सहजपणे विलीन करून टाकते, विरघळवून टाकते की, तिची ओळखही पुसून जाते.
समाजातील बहुसंख्य माणसे तसे ‘ओळखहीन’ आयुष्यच जगत असतात. मुंबईच्या लोकलगाडीत गच्चपणे भरलेल्या त्या गर्दीत, माणूस जशी स्वत:ची ओळख असूनही त्या कोंबलेल्या दाटीत विलीन झालेला असतो, त्याप्रमाणे.
परंतु, तीच व्यक्ती घरी, ऑफिसात वा आपल्या वस्तीत गेली की, तिला ‘आयडेंटिटी’ म्हणजे स्वत:ची ओळख व अस्मिता प्राप्त होऊ लागते. ती अस्मिता हीच त्याच्या जीवनाचा मानसिक आधारही बनते. ती अस्मिता कधी मराठी वा तामिळ वा बंगाली म्हणून प्रकट होते, कधी हिंदू वा मुस्लिम वा ख्रिश्चन वा शीख म्हणून व्यक्त होते, तर कधी भारतीय, पाकिस्तानी, अमेरिकन, चिनी अशी अभिव्यक्त होते.
म्हणूनच काही आधुनिक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की, राजकारण, युद्ध, जागतिक व्यापार-उद्योग या सर्व गोष्टी मुख्यत: ‘मानसिक’ आहेत. परंतु, तरीही मूळ प्रश्न उरतोच- ही सर्व प्रेरणा येथे कुठून?
कुमार केतकर
शनिवार, २६ सप्टेंबर २००९

No comments:

Post a Comment