एखादी व्यक्ती एकदम खुषीत दिसली, की असं विचारायची पद्धत आहे, ‘काय, एकदम काय झाले. अगदी मजेत?’ किंवा कुणी घुश्शात वा ‘मूड ऑफ’ स्थितीत दिसले, की पहिला प्रश्न मनात येतो, ‘आज, काहीतरी बिनसलेलं दिसतंय!’ प्रत्येक गोष्टीला ‘कारण’ असलेच पाहिजे, कोणता तरी ‘कार्य-कारण भाव’ असलेला घटनाक्रम असलाच पाहिजे, असे आता आपण सर्वजण गृहीत धरतो.
त्यामुळे आपण तर्कशास्त्राने, कारण-मीमांसेने आणि त्या अनुषंगाने झालेल्या घटनाक्रमाच्या संगतीने बांधलेले आहोत. एखाद्या व्यक्तीने खून ‘का’ केला असावा, एखाद्या जोडप्याने घटस्फोट घेण्याचा निर्णय ‘का’ घेतला असेल, कुणीतरी आत्महत्या ‘का’ केली असेल येथपासून ते अमूक एखाद्या राजकीय पक्षाचा पराभव ‘का’ झाला असेल, एखादा संप वा लॉकआऊट, एखादे आंदोलन वा एखादी दंगल ‘का’ झाली असेल अशा प्रश्नांबद्दल सर्वजण सातत्याने विचार करीत असतात. ही कारणमीमांसा करण्याची विचारपद्धती आता इतकी रुजली आहे की एखाद्या कादंबरीतील वा नाटकातील पात्र एका विशिष्ट पद्धतीने का वागले याबद्दलही लेखक-दिग्दर्शक आणि समीक्षक-प्रेक्षक यांचे तीव्र मतभेद असतात. वास्तवात असलेल्या लोकांनाच नव्हे तर कल्पनेने निर्माण केलेल्या पात्रांनाही तर्कशास्त्राच्या बेडय़ा घातलेल्या असाव्यात असे ‘सिव्हिलाईज्ड’ जगात गृहित धरले गेले आहे. (‘उंबरठा’ चित्रपटात शेवटी स्मिता पाटील घर सोडून जाते. विजय तेंडुलकरांच्या मूळ संहितेत तसे नव्हते. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी तो बदल सुचवून, चर्चा व वाद करून, तसा शेवट केला. नंतर तेंडुलकरांनाही तो आवडला.)
धूर दिसला तर आग, विस्तव वा जाळ असायलाच हवा- या साध्या सूत्रावर ‘कारण-मीमांसा-शास्त्र’ उभे आहे. गुन्हा-अन्वेषण खात्याचे संशोधन तर मुख्यत: याच निकषांवर होत असते. परंतु कित्येक वेळेला (खरे म्हणजे बहुतेक वेळेस) अनेक गोष्टींचे कारण सापडतच नाही, मीमांसा दूरच राहो. हा प्रश्न विशेषकरून जटील होतो तो माणसाच्या वागण्यालाही ‘शुद्ध’ कार्यकारणभाव असला पाहिजे असे आपण मानल्यामुळे.
तो कार्यकारणभाव सापडत नाही, तर्काच्या कात्रीत एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, एखादी घटना, एखादा प्रसंग पकडता येत नाही, एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण देता येत नाही वा कोणताही आगापिछा- वा घटनाक्रम सांगता येत नाही, तेव्हा मती कुंठीत झालेले आपण सर्वजण, आश्चर्य व्यक्त करून म्हणतो, ‘काही कळत नाही हेच खरं, अगम्य आहे त्याचं/तिचं वागणं, स्वभावाला औषध नाही, हे सारं आपल्या बुद्धिपलिकडले आहे. वा अर्थशून्य आहे सगळं!’
म्हणजेच जे आपल्या तर्कसंगतीत बसत नाही ते अगम्य वा अर्थशून्य आहे असा निष्कर्ष काढला जातो. गंमत म्हणजे अक्षरश: दररोज आपण इतक्या प्रसंगांमधून जातो आणि बहुतेक वेळा तर नेहमी भेटणाऱ्या माणसांनाच भेटतो. (नवरा-बायको, आई-वडील, भाऊ-बहीण, मित्र-मैत्रिण, ऑफिसातील रोज भेटणारे सहकारी वगैरे) आणि तरीही त्या परिचित माणसांच्या वागण्याची ‘शुद्ध’ तर्कसंगती आपल्याला लागत नाही.
वैज्ञानिक विचारपद्धती प्रामुख्याने तर्कशास्त्रावर, कारणमीमांसेवर, सुसंगत घटनाक्रमावर आधारलेली आहे. गणित तर तर्कशास्त्रावरच आधारलेले आहे आणि अमूर्त गणिती संकल्पना या तितक्याच ‘अॅब्स्ट्रॅक्ट लॉजिक’वर अवलंबून असतात, असे सर्व गणिती सांगतात. प्रयोग करणे, त्याची सिद्धता करणे, निष्कर्ष काढणे, तो पुन्हा तपासून पाहणे इत्यादी ‘शास्त्रशुद्ध’ गोष्टी ‘कार्यकारणभाव-शास्त्रा’वरच आधारलेल्या आहेत.
जर मनाचे व्यवहार जाणण्याचे शास्त्र, म्हणजे ‘मानसशास्त्र’, असेल तर तेही अशाच निकषांवर बेतलेले असायला हवे. मग माणसांचे स्वभाव अगम्य, अर्थशून्य, गूढ, बुद्धिपलिकडचे का वाटतात?
या प्रश्नाची दोनच उत्तरे संभवतात. एक : मानसशास्त्र हे शास्त्रच नाही आणि दोन : सर्व घटनांना, व्यक्तींना, व्यवहारांना तर्कसंगतीच्या कठोर निकषात बसविणे हे मुळातच चूक आहे! त्याच्या पुढे जाऊन कुणी म्हणेल की, ज्ञान, आकलन, प्रश्नाची उकल हे सर्व तर्कशास्त्राने व ‘कार्यकारणभाव’ संगतीनेहोते, ही मांडणीच सदोष आहे.
एकाच गोष्टीचे किती परस्परविरुद्ध आणि तरीही तर्कशुद्ध विवेचन करता येते, हे आपण मागील लेखात ‘राशोमान’ चित्रपटाच्या उदाहरणाने पाहिले होते. फ्योदोर दोस्तवस्कीच्या ‘क्राइम अॅण्ड पनिशमेंट’ या कादंबरीत तर्कशास्त्राच्या मर्यादाच वेशीवर टांगल्या आहेत. वाचकाला गुन्हेगाराबद्दल सहानुभूती वाटू लागते आणि न्यायसंस्थेबद्दल नफरत!
त्यामुळे असा विचार पुढे आला की, पदार्थविज्ञानशास्त्र, रसायनशास्त्र या शाखांना तर्कसंगती व कार्यकारणभाव लागू पडतो. पण समाजशास्त्र वा मानसशास्त्र या ज्ञानशाखांना नाही. अलिकडच्या काळात तर एकूण विज्ञानातही तर्कशास्त्राच्या अधिष्ठानाला आव्हान दिले जाऊ लागले आहे. ‘बिग बँग’ ऊर्फ ‘महास्फोट’ का झाला? त्या लहान बिंदूएवढय़ा अणु-रेणूमध्ये ती स्फोटक ऊर्जा का व कशी निर्माण झाली? (त्यामागची प्रेरणा काय?) जीवसृष्टी का व कशी जन्माला आली, या मूलभूत प्रश्नांकडे वळल्यावर कारणमीमांसेच्या आधारेच ‘तर्कशास्त्र’ तोकडे पडू लागल्याचे दाखवून दिले जाऊ लागले. ‘कॉन्शियसनेस स्टडीज्’मध्ये तर तर्कशास्त्र फारच अपुरे पडते, असे आता मानले जाऊ लागले आहे. त्याचप्रमाणे सौंदर्यशास्त्रात. (एखादी गोष्ट सुंदर आहे, एखादे चित्र अप्रतिम आहे, एखादे चित्र भिकार आहे हे तर्काने सिद्ध करता येत नाही. एखाद्याला विशिष्ट चित्र, शैली, गायक वा गायनशैली आवडेल तर दुसऱ्याला अजिबात आवडणार नाही.) नीतीशास्त्रातही तर्कशास्त्र उपयोगी पडत नाही. एकेकाळी घटस्फोट ही बाब एक प्रकारे ‘अनैतिक’ मानली जात असे. आता न्यायालयांनी आणि कौटुंबिक समुपदेशकांनी (फॅमिली कौन्सेलर्स) असे म्हणायला सुरुवात केली आहे की, इच्छेविरुद्ध आणि प्रेम नसताना, केवळ सामाजिक संकेत वा नियम म्हणून पती-पत्नींनी एकत्र राहणे हेही ‘अनैतिक’च आहे. म्हणून घटस्फोट हा नैतिक आहे!
हिंसा अनैतिक आहे; पण शत्रूचे निर्दालन करणे मात्र नैतिक आहे! साक्षात भगवान कृष्णच अर्जुनाला नातेवाईक, गुरू, ज्येष्ठ-वरिष्ठ या गोष्टींकडे न पाहता त्यांच्यावर शरसंधान करण्याचे आदेश देतात. म्हणजेच मूळच्या अर्जुनाच्या नैतिक भूमिकेपेक्षा श्रीकृष्णाची ‘अनैतिक’ शिकवण ही नैतिक ठरते. म्हणजेच युद्धात वा राजकारणात आणि सौंदर्यशास्त्रात व नीतीशास्त्रात त्याचप्रमाणे अर्थातच मानसशास्त्रात ‘तर्क’ हे सत्याचे, योग्य-अयोग्यतेचे आकलनाचे साधन ठरत नाही.
परंतु ही सर्व तत्त्वचर्चा बाजूला ठेवू या.
प्रत्येकाने स्वत:च्या मनाशी, रोज रात्री झोपण्यापूर्वी विचार करावा आणि दिवसभरात आपण केलेली कामे, विचार, व्यवहार हे किती तर्कशुद्ध होते म्हणजे ‘रॅशनल’ होते, हे स्वत:लाच सिद्ध करून दाखवावे! बहुतेकांच्या हे लक्षात येईल की, तर्कापलिकडे (रॅशनॅलिटीपलिकडे) काहीतरी ‘शक्ती’ आहे की, जी आपल्याकडून अनेक ‘अतक्र्य’ किंवा तर्काने ‘अशुद्ध’ अशा गोष्टी करून घेत असते. राजकारणातील उदाहरण द्यायचे तर असे म्हणता येईल की, सगळ्या माणसांचे एकच तर्कशास्त्र असते तर इतके राजकीय पक्ष लागलेच नसते; किंवा जरी ते असते तरी सर्वानी (उर्वरित सर्वानी) एकाच पक्षाला वा व्यक्तीला निवडून दिले असते. (परंतु प्रत्येक व्यक्तीचे तर्कशास्त्र हे त्या त्या व्यक्तीच्या मूळ विधानावर वा गृहितकावर उभे राहात असल्यामुळे परस्परविरोधी सत्यही त्याच तर्कपद्धतीतून पुढे येते. त्यामुळे मूळ विधानच जर चुकीचे, अपूर्ण, अप्रमाणित वा अर्थशून्य असेल तर त्या अनुषंगाने लढविला जाणारा तर्क तसाच असणार. एकाच गृहितकावरही अनेक तर्कटे बांधता येऊ शकतात.
आजही अमेरिकेत एक संस्था आहे, जिचे नावच मुळी ‘फ्लॅट अर्थ सोसायटी’ असे आहे. या संस्थेच्या सदस्यांचे मत आहे की, पृथ्वी गोल नाही- ती सपाट आहे. शिवाय पृथ्वी सूर्याभोवती आणि स्वत:भोवतीही फिरते. ही वैज्ञानिकांनी पसरवलेली अफवा आहे! गंमत म्हणजे १५ व्या शतकापर्यंत युरोपातही बहुतेकांचे हेच मत होते. किंबहुना पृथ्वी गोल आहे, ती इतर ग्रहांप्रमाणे स्वत:भोवती व सूर्याभोवती फिरते हे गणित, दुर्बिणीद्वारे निरीक्षण आणि गतीनियमांच्या आधारे सिद्ध केल्यानंतरही चर्चच्या धर्ममरतडांना मान्य झाले नव्हते.
त्याचप्रमाणे आजही एका गटाचे म्हणणे आहे की, माणूस चंद्रावर उतरला ही एक ‘नासा’ संस्थेने ठोकलेली लोणकढी थाप आहे. अशा लोकांसमोर तर्कशास्त्र, वैज्ञानिक विचारपद्धती, प्रयोगशीलता वगैरे गोष्टी सांगणे व्यर्थ असतो. विशेष म्हणजे ही मंडळीसुद्धा त्यांचा मुद्दा ‘तर्काच्या’ आधारेच सांगत असतात. (म्हणजे त्यांचा दावा व त्यांची मांडणी तशी असते.)
तर्कशास्त्राच्या आधारे सत्य समजण्यासाठी मूळ विधान/मूळ गृहीतक ‘शुद्ध’ असायला पाहिजे. विज्ञान-विचार पद्धतीची महतीच ही आहे की तिच्याच फक्त निष्कर्षच नव्हे, तर प्रयोगसिद्धता आणि मूळ विधानही पुन्हा पुन्हा तपासले जाते. म्हणूनच काही वैज्ञानिक निष्कर्ष त्याच विज्ञान-तर्काने बादही ठरविले जाऊ शकतात. परंतु अशी विज्ञान-तर्कसंगती ही मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, नीतीशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, कायदा, न्यायशास्त्र अशा क्षेत्रांमध्ये अजून तरी निर्विवाद ठरलेली नाही आणि नजीकच्या काळात तर्कशास्त्राने या गोष्टींचे पूर्ण आकलन होण्याची शक्यताही नाही.
आडाखे म्हणजे निष्कर्ष नव्हेत. जरी ते आडाखे ‘डिडक्टिव वा इंडक्टिव लॉजिक’च्या कक्षेत बसत असले तरीही! स्टॉक मार्केटमधील सेन्सेक्सचे चढउतार का होतात, याबाबत बरेच तार्किक संबंध जोडले जातात. परंतु चार-दोन वेळा ते आडाखे बरोबर आले तरी त्यांना ‘निष्कर्षां’चे तर्कशुद्ध स्थान देता येत नाही.
कम्युनिस्ट पक्षांमध्ये तार्किकतेचे असेच अ-तार्कीक निष्कर्ष काढण्याची प्रथा आहे. ‘ऑब्जेक्टिव्ह रिअॅलिटी’ म्हणजे ‘साक्षेपी स्थिती’ नावाची संकल्पना आहे. समाजातील राजकीय-आर्थिक परिस्थितीचे ‘अचूक’ निदान करून त्यानुसार क्रांतीची वेळ-तारीख नेमकेपणाने ठरविता येते, असा ‘शास्त्रोक्त’ भ्रम अनेक वेळा कम्युनिस्टांना होत असतो. या ‘ऑब्जेक्टिव्ह रिअॅलिटी’चे वर्णन व निदान केवळ तर्कशास्त्राच्या आधारेच नव्हे तर ‘डायालेक्टिक’ तर्कपद्धतीनुसार करता येते असे त्यांना वाटते. या शास्त्रानुसार भारतात आजपर्यंत किमान ५० ‘क्रांतीसमय’ येऊन गेले असावेत. पण भारतात क्रांती मात्र झालेली नाही. सध्या देशात सुमारे २०० ठिकाणी माओवादी क्रांतीकारक कार्यरत आणि शस्त्रसज्ज आहेत. त्यांच्याही दृष्टिकोनातून अनेक ऑब्जेक्टिव्ह ‘क्रांतीक्षण’ येऊन गेले आहेत. पण क्रांती अजून दूरच आहे!
शिवाय परिस्थितीचे वस्तुनिष्ठ व अचूक मापन जर त्या ‘ऑब्जेक्टिव्ह रिअॅलिटी’च्या संकल्पनेत अभिप्रेत असेल तर इतके कम्युनिस्ट पक्ष कशाला? ‘ऑब्जेक्टिव्ह रिअॅलिटी’ तर एकच असायला हवी! म्हणजेच त्या परिस्थितीचे मापन हे ‘सब्जेक्टिव्ह’ म्हणजे व्यक्तीसापेक्ष केले जाते आणि प्रत्येक कम्युनिस्ट गटाचे / पक्षाचे / व्यक्तीचे ‘सब्जेक्टिव्ह’ मापन वेगळे झाल्याने ‘ऑब्जेक्टिव्ह रिअॅलिटी’चे निदान चुकते! परंतु कम्युनिस्ट विचाराचे लोक त्यांच्या तर्कपद्धतीला ‘डायलेक्टिकल’ म्हणजे द्वंद्वात्मक किंवा विरोध-विकासात्मक परिमाणही जोडतात आणि कोणत्याही परिस्थितीत, कॉम्रेड लेनिनच्या सूत्रानुसार हस्तक्षेप करून ती स्थिती बदलतात वा बदलू पाहतात. खरे म्हणजे त्यांच्या सिद्धांतानुसार जगात कुठेही क्रांती झालेली नाही! परवा (१ ऑक्टोबर रोजी) चिनी क्रांतीला ६० वर्षे पूर्ण झाली, परंतु तीसुद्धा लेनिनप्रणीत सिद्धांतानुसार झाली नाही, असे इतर बऱ्याच कम्युनिस्ट विचारवंतांना व पक्षांना वाटते.
मुद्दा हा, की ज्यांना ‘ह्युमन सायन्सेस्’ म्हणून ओळखले जाते त्या समाजशास्त्र-अर्थशास्त्र- मानसशास्त्र इ. शाखांमध्ये तर्कशास्त्र फारसे उपयोगी पडत नाही; परंतु विचारपद्धतीला ‘शुद्ध’ ठेवण्यासाठी अजून तरी तर्कशास्त्राइतकी दुसरी अधिक पद्धत उपलब्ध नाही.
न्यायालयात दोन वकील एकमेकांविरुद्ध अटीतटीने बाजू मांडतात, आरोपी हा गुन्हेगार आहे वा पूर्ण निर्दोष आहे, हे अहमहमिकेने सांगतात तेव्हा ते दोघेही शास्त्रोक्त निकषांनुसार पुरावे व तर्क यांचाच आधार घेतात. न्यायाधीशही तर्कशास्त्राच्या आधारेच निर्णय देतात, असे असूनही खालच्या न्यायालयातील निर्णयाच्या विरोधात वरचे न्यायालय निकाल देते आणि विशेष म्हणजे त्याला ‘न्याय’ म्हणते. एखादी व्यक्ती गुन्हेगार म्हणून सिद्ध झाल्यानंतर वरच्या कोर्टात निर्दोष सिद्ध व्हावी याचा अर्थच तर्कशास्त्र अपुरे आहे किंवा न्यायाधीश पक्षपाती आहेत, असे म्हणावे लागेल.
तर्कशास्त्र एक विचारपद्धती म्हणून मानवी व्यवहारात रुजू होईपर्यंत आधुनिक अर्थाने ‘सिव्हिलायझेशन’ला सुरुवात झाली नाही. तर्कशास्त्राची, घटनाक्रमांची संगती लावण्याची आणि कार्यकारणभाव शोधण्याची गरज इतर कोणत्याही प्राणिमात्राला भासत नाही. (परंतु त्यांच्या शिकार करण्याच्या पद्धतीत, जगण्याच्या खटपटीत आणि अन्न-पाणी शोधण्याच्या प्रयत्नात एक ‘जेनेटिक’ आणि ‘इन्स्टिक्टिव’ तर्कशास्त्र असते, हा भाग वेगळा.) माणसाने त्या तर्कशास्त्राचे एक भव्य असे विचारांचे दालनच निर्माण केले आहे. हा तार्किकतेचा प्रवास सुमारे पाच हजार (वा कमी) वर्षांचा असावा, असे मानले जाते. (बुद्धिबळ हा खेळ तर पूर्णत: तर्कशास्त्र आणि मानसशास्त्रावर आधारलेला आहे. त्याचा प्रसार मुख्यत: पाचशे वर्षांत झाला आहे.)
भाषाशास्त्रज्ञ असेही मानतात, की तर्कशास्त्र आणि भाषा व नंतर लिपी यांचा घनिष्ठ संबंध आहे. भाषेत व विचारात एक तर्कसंगती असते. ती नसेल तर माणसाचे अस्तित्व, व्यवहार आणि विकास असे सर्वच धोक्यात येईल. परंतु केवळ तर्क आणि कार्य-कारणशास्त्र यावरच जर ‘सिव्हिलायझेशन’ अवलंबून राहिले तर त्या आधारेच ती मानवी संस्कृती नष्टही होईल.
जॉन रॅल्स्टन सॉल या ब्रिटिश तत्त्वज्ञाच्या म्हणण्यानुसार ‘सिव्हिलायझेशन’च्या विकासातच त्या सदोष तर्कपद्धतीमुळे विनाशाची मुळे आहेत. ‘ग्लोबल वॉर्मिग’ असो वा अण्वस्त्रनिर्मिती, शस्त्रास्त्रस्पर्धा असो वा युद्ध- हे सर्व त्याच ‘रिझन’ ऊर्फ कार्यकारणपद्धतीतून जन्मले आहे. त्याच्याच शब्दांत सांगायचे तर-
``Reason is a narrow system
swollen into ideology.
with time and power it has
become a dogma, devoid of
direction and disguised as
disinterested inquiry.
Like most religions, reason
presents itself as the solution
to the problems it has created’’
कुमार केतकर
शनिवार, ३ ऑक्टोबर २००९
No comments:
Post a Comment