जगात कुठेही जन्माला आलेले लहान मूल ‘एकाच भाषेत’ रडते. पहिले जवळजवळ सहा महिने कोणतेही लहान मूल जरी ‘बोलले’ तरी ‘बा-बा-बा’ किंवा ‘मा-मा-मा’ वा तत्सम एकाक्षरी ध्वनीद्वारे बोलते. मग ते मूल आफ्रिकेत जन्माला आलेले असो वा अमेरिकेत, आदिवासी असो वा मुंबईतील मध्यमवर्गात जन्माला आलेले, हिंदू असो वा मुस्लिम, मुलगा व मुलगी, गोरे वा काळे- जन्माला आल्यानंतर पहिले सहा-सात महिने ‘बा-बा-बा’ वा ‘मा-मा-मा’ वा ‘डा-डा-डा’ या पलिकडे त्यांची ‘भाषा’ जात नाही. म्हणजे निदान तेवढा काळ आणि त्या वयाच्या मुलांची जागतिक भाषा एकच असते!लहान मुलं आपल्या आई-वडिलांशी किंवा जो/जी कुणी त्यांच्याभोवती असतात, त्यांच्याशी संवाद मात्र करत असतातच. हसून, रडून, किंचाळून, विविध प्रकारचे आवाज काढून ते काही ना काहीतरी सांगत असतात, मागत असतात, तक्रार करीत असतात, रागावत असतात वा आनंद व्यक्त करीत असतात. डेस्मॉन्ड मॉरिस यांनी त्यांच्या ‘बेबीवॉचिंग’ या संशोधन-निरीक्षण ग्रंथात म्हटल्याप्रमाणे लहान मुलांच्या रडण्याचे ‘सूर’ व ‘ताल’ तसेच तीव्रता व क्षीणता यावरूनही त्यांना काय पाहिजे, नको हे कळते. किंबहुना कोणतेही शिक्षण नसताना जगातल्या प्रत्येक आईला आपल्या त्या मुलाच्या सर्व ध्वनींचे व हावभावांचे अर्थ कळतात. शब्दांपलिकडल्या त्या संवादाला भाषा असतेच. (परंतु ती वा तशी भाषा एकूणच प्राणीविश्वात आहे. ‘नॅशनल जीओग्राफिक’, ‘अॅनिमल प्लॅनेट’ वा ‘डिस्कव्हरी’ हे चॅनल्स पाहणाऱ्यांना हे माहीत आहे की, वाघ-सिंह, ससा-कासव किंवा अगदी चिमणी, कावळे वा घार, गरुड असे सर्व प्राणी-पक्षी आपापल्या पिलांना व बछडय़ांना आवश्यक ते सर्व ‘शिक्षण’ देतात. अगदी घरटे कसे बांधायचे, येथपासून ते शिकार कशी करायची, येथपर्यंत! म्हणजेच त्यांच्यातही ‘संवाद’ असतो! पण ज्याला आपण शब्दरुप, भाषा म्हणतो, ती फक्त माणूस नावाच्या प्राण्यालाच अवगत आहे.या ‘भाषे’चा म्हणजे विशिष्ट भाषेचा नव्हे, शोध कुणा वैज्ञानिकाने वा तत्त्वचिंतकाने लावलेला नाही. जगात नक्की किती भाषा व बोली आहेत, २७०० की तीन हजार की सहा हजार याबद्दल असलेले मतभेद हे भाषा, लिपी, बोली, व्याकरण, शुद्धलेखन यासंबंधातील आहेत. बी.बी.सी.च्या अभ्यासानुसार, २७०० आणि इतर बऱ्याच भाषातज्ज्ञांच्या संशोधनानुसार- सहा हजार! पण कुणीही भाषांची संख्या सहा हजारांवर असल्याचे म्हटलेले नाही. जगाची लोकसंख्या सुमारे ६२० कोटी. परंतु म्हणून त्याची सरासरी काढता येणार नाही. कारण चिनी भाषा बोलणाऱ्यांची (सर्व फरक व बोली विचारात घेऊन) संख्या जगात सुमारे १३० कोटी आहे. म्हणजे एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ एक-चतुर्थाश. इंग्रजी भाषा बोलणाऱ्यांची संख्या ४० कोटींच्या आसपास, स्पॅनिश सुमारे ३० कोटी, हिंदी २५ कोटी, अरेबिक २० कोटी, रशियन १६ कोटी, पोर्तुगीज १४ कोटी, जपानी १२ कोटी, जर्मन ११ कोटी आणि आपली मराठी १० कोटी! (हे आकडे जगातील लोकसंख्या डेटाबेसवरून अपडेट करून घेतलेले आहेत. त्यामुळे त्यात थोडाफार फरक असू शकतो- पण थोडाफारच.)बहुतेक भारतीय भाषकांची संख्या युरोपातील अनेक भाषा बोलणाऱ्यांपेक्षा कितीतरी जास्त आहे. उदाहरणार्थ, इटालियन सहा कोटी, तर तामिळ सात कोटी. फ्रेंच आठ कोटी तर बंगाली (बांगला देश धरून) सुमारे २० कोटी!केवळ भाषा हा निकष मानून आणि लोकसंख्येच्या आधारे आपल्या देशाचा विचार केला तर भारत हा देश खरोखरच अगाध आहे आणि अजूनही एकत्व टिकवून आहे! मुद्दा हा की, जन्माला आलेल्या मुलांची जागतिक भाषा- निदान पहिले सहा-सात महिने एकच असते. काही भाषासंशोधक असे मानतात की, मूल जन्माला येतानाच विशिष्ट भाषेचा ‘प्रोग्राम’ ऊर्फ ‘आज्ञावली’ घेऊन येते. परंतु त्या भाषेचा शब्दरूप उच्चार, अर्थपूर्ण वाक्यरचना आणि संवाद या गोष्टी विकसित आणि उत्क्रांत होत जातात. स्टीव्हन पिंकर हा सध्या जगातला एक प्रकांड भाषातज्ज्ञ, संशोधक आणि मेंदू व कॉन्शियसनेस या विषयावर प्रयोग व चिंतन करणआरा विद्वान म्हणून ओळखला जातो. मॅसेच्युसेट्स विद्यापीठातील या प्राध्यापकाने ‘द लँग्वेज इन्स्टिक्ट- हाऊ द माइंड क्रिएटस लँग्वेज’ हा ग्रंथ लिहून एकच खळबळ माजवून दिली होती.मूल साधारणपणे वर्षांचे झाले की ते एकाक्षरी ध्वनीसंवादाच्या पुढे जाऊ शकते. (जी मुले जन्मत:च मुकी व कर्णबधीर असतात, त्यांचा संवाद मात्र हातवारे, हावभाव, वस्तू वा खेळणी इत्यादीच्या मदतीने होऊ लागतो आणि पुढे मुख्यत: त्यांची संवादभाषा तीच राहते. आता जगात त्या भाषेलाही एक स्वतंत्र ‘हावभावाचे व्याकरण’ वा संदेश पद्धती दिली जात आहे.)मूल वर्षांचे होते तेव्हा त्याला त्या ध्वनींमधून शब्द तयार होतात, ते जाणवू लागते. ‘बेबी, इकडे बघ. मी कोण आहे?- आई! आणि हे कोण? बाबा- बा बा!’ या संवादाला शब्द-भाषारूप देण्यासाठी इतरही बरेच हावभाव करून, टाळ्या वाजवून मुलाचे लक्ष वेधून घ्यावे लागते. त्या मुलाला कळतात ते विशिष्ट रुपातून येणारे ध्वनी. त्याला ‘इकडे बघ’ हे हावभावावरून, ‘हे कोण?-बाबा’ हे अंगुलीनिर्देश केल्यामुळे समजते. त्यापैकी कोणत्याच शब्दाचा अर्थ जरी त्या मुलाला कळला नाही तरी त्यातील ‘भाव’ समजतो. या लोकांच्या सहवासात आपण सुरक्षित आहोत, आपल्याला दूध-पाणी वगैरे मिळते, आपण रडलो, ओरडलो तर हीच माणसे आपल्याकडे पाहतात, जवळ घेतात- या सर्व ध्वनी, स्पर्श, चव, गंध, नजर यांच्या मदतीने शब्द, भाव, अर्थ आणि संदर्भ त्या मुलाला लागतात. खऱ्या अर्थाने शब्दरूप- अर्थपूर्ण भाषेचा जन्म तेव्हा-म्हणजे मूल दीड-दोन वर्षांचे झाल्यानंतर होतो, असे म्हटले तरी चालेल.स्टीव्हन पिंकर तर म्हणतात की, वर्ष-दीड वर्षांच्या आतले मूल आणि घरात पाळलेला कुत्रा यांची संवाद क्षमता साधारणपणे एकाच प्रकारची व गुणवत्तेची असते. आपण जेव्हा कुत्र्याला- ‘टॉमी, उठ तिथून. जा तिकडे. तिकडे जा. जा बघू’, असे म्हणतो तेव्हा त्याला सरावाने व हावभावाने इतकेच कळते की, आपल्याला ‘टॉमी’ म्हणून संबोधतात आणि उरलेल्या शब्दांचा अर्थ टोनवरून व हावभावांवरून तो ओळखतो. शब्द, भाषा न समजताही भाव, भावना हे सर्व हावभावांवरून अतिशय उत्कटतेने कुत्रा, मांजर, गाय, घोडा, हत्ती, इतकेच काय- वाघ, सिंह आणि पक्ष्यांनाही कळते.परंतु त्यांच्याबरोबरच्या संवादातून भाषा जन्माला येत नाही, संवादक्षमता वाढत नाही, विचार तयार होत नाहीत, आजूबाजूच्या परिस्थितीचे र्सवकष भान येत नाही. माणूस (अशिक्षित माणूससुद्धा!) भाषारूप संवादक्षमता प्राप्त झाली की मानसिक उत्क्रांतीच्या एकदम वरच्या टप्प्यावर ‘क्वान्टम जंप’ घेऊन पोचतो.माणसाला शब्द-भाषा क्षमता प्राप्त झाली नसती तर आपल्यात आणि इतर प्राणीसृष्टीत फारसा फरक पडला नसता. आपण सर्व ‘टारझन’ राहिलो असतो! काही जरा ‘हुशार टारझन’ आणि काही ‘ढ टारझन’ इतकाच काय तो फरक!एकूण जीवसृष्टी कशी उत्क्रांत झाली, याचा शोध माणसाने घेतला. अगदी १० लाख वर्षांपूर्वीचे, ५० लाख वा एक कोटी वर्षांपूर्वीचेही अवशेष, हाडे वा प्राचीन ‘फॉसिल्स’ वा बर्फात थिजलेले ठसे सापडले व त्याआधारे जीवसृष्टीचा इतिहास आपण सांगू शकलो. उत्क्रांतीचा सिद्धांत सांगताना डार्विनने विविध प्राणिमात्रांचा अभ्यास केला. ‘माणूस’ हा टप्पा माणसाने केव्हा गाठला, याचेही कालमापन आपण आज बऱ्यापैकी अचूकपणे करू शकलो आहोत.फांद्यांपासून, दगडांपासून, हाडांपासून बनविलेली स्वसंरक्षणाची अणकुचीदार शस्त्रे, अगदी प्राचीन भांडी-कुंडी अशा गोष्टी शोधून, इतकेच काय, जुन्या कवटय़ा, हाडांचे सापळे तपासून माणसाचे ‘वय’ (आयुष्यमान नाही, तर माणूस जन्माला आल्यापासूनचे आपल्या मानववंशाचे वय) आपण ठरवू शकलो आहोत.पण ध्वनीविशेषांची मर्यादा ओलांडून माणूस पहिले-वहिले मोडके-तोडके शब्द कधी वाणीबद्ध करू लागला, त्यातून शब्दसंकुल कसे करू लागला, वाक्यरचना आणि शब्दांची संवादी योजना करू करू लागला, याबद्दलचे संशोधन अजून बरेच प्राथमिक अवस्थेत आहे. जुने हाडांचे सापळे वा कवटय़ा सापडू शकतात, पण जुने शब्द कसे सापडणार? ते तर केव्हाच- म्हणजे बोलता बोलताच हवेत विरून जात होते. (शब्द बापुडे केवळ वारा!) त्यामुळे प्राचीन माणूस बोलायला लागल्यापासून ते त्या भाषेला संकेत संवादाचे रुप प्राप्त होईपर्यंत नक्की किती वर्षे गेली असावीत, हे अजूनतरी निश्चितपणे सांगता आलेले नाही.शिवाय शब्दांची वा भाषेची आणखीही एक भानगड आहे. आपण जे बोलतो आहोत त्या शब्दांचे, ध्वनींचे, उच्चारांचे नेमके तेच अर्थ ऐकणाऱ्याला समजले तर संवादी भाषेचा जन्म होतो.समजा, एक अतिप्राचीन माणूस त्याच्या कळपातील दुसऱ्या माणसाला असे सांगत असेल की, ‘अजून काही काळ चालल्यानंतर तेथे जलाशय आहे. तेथे आपण पाणी प्यायला जाऊ या.’ तर ऐकणाऱ्याला त्या शब्दध्वनींमधून किमान हे कळायला हवे की, ‘पाणी’ ‘जवळच’ ‘एका जलाशयात’ आहे.अगदी सुरुवातीला निर्माण झालेले शब्द असे गरजेतून आलेलेच असणार. खाण्या-पिण्याची, सुरक्षेची, हवा-पाण्याची, अगदी आवश्यक व प्राथमिक संवादी गरज भागविण्यापुरतीची ती शब्दयोजना असणार.बहुतेक शरीरावश्यक अभ्यासक सांगतात की, माणसाचा घसा, जीभ, पडजीभ, दात, ओठ या गोष्टी बोलण्यासाठी नव्हे, तर शरीरावश्यक गरजा भागविण्यासाठी (इतर प्राण्यांप्रमाणे) निसर्गाने दिल्या होत्या. ज्याप्रमाणे वानरावस्थेतला पहिला माणूस चार पायांवर चालायचा आणि आरोळ्या ठोकायचा! पण तो निसर्गनियम तोडून माणूस दोन पायांवर चालायला लागला, अंगठा व चार बोटे एकत्र आणून मूठ वळवू लागला आणि त्याचे भाग्य फळफळले. त्याचप्रमाणे घसा, जीभ, दात इत्यादी मौखिक गोष्टींचा उपयोग करून तो ध्वनीच्या पलिकडे जाऊन शब्द बनवू लागला.वर म्हटल्याप्रमाणे उत्क्रांतीच्या टप्प्यातील ही ‘क्वान्टम जंप’ होती. त्या शब्दातून भाषा निर्माण व्हायला आणखी काही हजार वा लाख वर्षे गेली. त्या भाषेला चित्रलिपी मिळाली फक्त २२ हजार वर्षांपूर्वी! परंतु तेव्हाही संवाद-भाषा तितकी उत्क्रांत झालेली नव्हती.भाषातज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, संवाद-शब्द-भाषा- लिपी आणि त्यांचे अर्थ व संदर्भ हा सगळा खेळ जास्तीत जास्त पाच-सात हजार वर्षांचा आहे. काही कट्टरपंथी ज्यू म्हणतात, त्यांची हिब्रू भाषा सर्वात प्राचीन- सात-आठ वर्षांची! काही आग्रही व अभिमानी भारतीय म्हणतात, संस्कृत त्याहूनही जुनी! तर काही चिनी अस्मितावादी म्हणतात, त्यांची भाषा १५ हजार वर्षे वयाची आहे. हे सर्व ‘भाषिक’ वाद चालूच राहतील. संशोधनाला अस्मितेचे परिमाण लाभले की असे होणे अपरिहार्य आहे.पण अशा सुमारे सहा हजार अस्मिता आज जगात आहेत. या सर्व सहा हजार भाषांमध्ये कवी कविता करीत आहेत. लोक एकमेकांशी बोलत आहेत. भांडत आहेत. आता मोबाइलवरून आणि सात समुद्र ओलांडून ‘टेलि-कॉन्फरन्स’ करीत आहेत, टीव्हीवरून ६२० कोटी लोकांपर्यंत सर्व प्रकारच्या घटना, बातम्या पोचवायचा प्रयत्न करीत आहेत. (अजून सर्वाकडे टीव्ही वा मोबाइल पोचलेला नाही; पण पुढील ३०-४० वर्षांत पोचणार आहे.)भाषेचा आणि भाषांचा हा वैश्विक महाकोलाहल समजून घ्यायचा असेल तर निदान एक साधी गोष्ट ध्यानात हवी- ती ही की, जन्माला आलेली जगातील सर्व मुले पहिले वर्ष- सहा महिने एकाच भाषेत रडतात आणि बोलतात. त्यांच्यात भाषिक, सांस्कृतिक संघर्ष होत नाहीत. ती मुले मोठी झाल्यावरच बिघडतात!
कुमार केतकर
No comments:
Post a Comment