किती शब्द बनवू गा - अब्द अब्द मनी येते।।

मोबाइल फोन्स आल्यापासून १० वर्षांत लोकांची बडबड किमान १०० पटींनी वाढली आहे। पुढल्या २५-३० वर्षांत जगातील, त्यावेळच्या १० अब्ज लोकांपैकी सुमारे सहा अब्ज लोकांकडे मोबाइल फोन असतील. अर्थातच आणखी काही वर्षांनी त्या मोबाइलमध्येच टेलिव्हिजन, कॉम्प्युटर्स, ऑफिस, वर्तमानपत्र, करमणुकीचे कार्यक्रम, सर्व मालिका, हजारो चित्रपट, बँकिंग सर्व प्रकारचे अर्थव्यवहार असे बरेच काही असेल.मोबाइल फोनमध्ये राहण्याची व्यवस्था करता येणार नाही आणि मोबाइलमधून कार वा विमानाचा प्रवास करता येणार नाही हे खरे, पण निवासाच्या आणि प्रवासाच्या गरजाही बदललेल्या असतील. आजच वर उल्लेखिलेल्या बऱ्याच सोयी मोबाइल फोनमध्ये आहेत. पुढील २५-३० वर्षांत त्या सुमारे सहा अब्ज (६०० कोटी) लोकांना उपलब्ध होऊ शकतील. तरीही एक गोष्ट सिद्ध झालीच आहे- ती म्हणजे लोकांची एकूण बडबड १०० पटींनी वाढली आहे. मोबाइलवरून, कॉम्प्युटर चॅट्समधून वा थेट.प्रत्यक्ष वा फोनवरील संवाद/ गप्पा/ भांडणे असोत वा एसएमएस/ ट्विटर/ चॅट असो; मेल असो वा प्रदीर्घ लेख, ब्लॉग असोत वा मल्टिमीडिया कॉन्फरन्सेस्- त्या सर्वाचे मुख्य माध्यम असते भाषा. शब्द. बोली. स्वरयंत्र- नियंत्रित ध्वनी. (मुके-बहिरे बोलू व ऐकू शकत नाहीत, पण वाचू व लिहू शकतात आणि आंधळे पाहू शकत नाहीत, पण बोलू-ऐकू आणि ब्रेलद्वारे वाचूही वा लिहू शकतात- म्हणजेच त्यांचेही माध्यम शब्द-भाषा हेच असते.)यापैकी स्वरयंत्र-नियंत्रित ध्वनी अनेक प्राणी-पक्षी-सामुद्री जीव यांच्याकडे असतात. पण बोली, शब्द, भाषा आणि त्यांचे एक अर्थपूर्ण संवादी संकुल हे फक्त माणसालाच अवगत आहे. भाषाशास्त्रज्ञांच्या मते जगात एकूण २७०० ते ३५०० नोंदविल्या गेलेल्या ‘भाषा’ आहेत. काही भाषा आहेत की फक्त बोली, याबाबत वाद आहेत. (आपल्याकडे याच चालीवरचा वाद मराठी व कोकणीसंबंधीचा होता.) ज्यांना स्वायत्त असे समाज संवादाचे स्थान आहे, अशा सुमारे २० हजार बोली वापरात असाव्यात. कित्येक भाषा अनेक बोली माध्यमातून व्यक्त होतात, पण त्यांना लिपी नसते. बहुतेक भाषा संशोधक मानतात की, दर २५-३० किलोमीटर्सवर बोली, भाषेचा हेल, उच्चार यात फरक पडतो. अगदी ढोबळ उदाहरण घ्यायचे तर रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी येथील कोकणी बाज वेगवेगळे आहेत, ज्याप्रमाणे सातारा, सांगली, कोल्हापुरी बाज वेगवेगळे आहेत. शिवाय ‘सदाशिवपेठी’ मराठी आणि ‘मालवणी’-कोकणी मराठीच असल्या तरी त्यांच्या अस्मिता सार्वभौम आहेत. तीच गोष्ट विदर्भात, खानदेशात, मराठवाडय़ात. अशी विविधता आणि अस्मिता जगभर सर्वत्र आहे. अर्थातच भारताइतक्या बोली, भाषा, लिप्या आणि अस्मिता जगात कुठेच नाहीत. म्हणूनच भारताचे एकत्व आपल्या वैविध्यातून व्यक्त होते, असे पंडित नेहरू म्हणत असत.तर या सर्व बोली, भाषा व लिप्यांद्वारे जगभरचे सगळे लोक सतत बोलत असतात. ज्यावेळेस ते बोलत नसतात तेव्हा ते टीव्हीचे कार्यक्रम पाहात-ऐकत असतात, एसएमएस वा ट्विटरद्वारे ‘कनेक्टेड’ असतात किंवा वर्तमानपत्रे, नियतकालिके, पुस्तके वाचत असतात. शब्दांचा इतका महास्फोट यापूर्वी कधीही झालेला नव्हता. हे सर्व सुमारे तीन हजारच्या आसपास भाषांमध्ये अखंड चालू आहे.शब्द हे संवादाचे, भावनाविष्काराचे, विचाराचे तसेच इतिहास व भविष्य यांना जोडणारे माध्यम आहे- परंतु तितकेच ते विसंवादाचे, गैरसमजुतीचे, संघर्षांचे व युद्धाचेही माध्यम आहे. गेल्याच महिन्यात पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी पाकिस्तानबरोबर केलेल्या संयुक्त मसुद्यातील एका शब्दामुळे देशभर आणि लोकसभेत केवढा तरी गदारोळ झाला होता. इतिहासकार, पत्रकार, राजकारणी मंडळी तर इतका शब्दच्छल करतात की, अखेरीस त्यांच्या चर्चेतील आशय नष्ट होऊन शब्दच स्वतंत्रपणे आटय़ापाटय़ा खेळत बसतात.बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ या कवितेतील प्रत्येक शब्दावर (त्यातील प्रतिमा-प्रतिकांवर) ६३ वर्षांत इतके मंडन-खंडन, चिंतन-लेखन, वाद-वितंडवाद झाले आहेत की, ते पाहून शब्दांचे अचाट सामथ्र्य जसे लक्षात येते तसेच, एकच शब्द किती प्रकारचा विसंवाद घडवून आणू शकतो, हेही ध्यानात येते. (नुकतेच प्रा. एस.एस. नाडकर्णी यांनी संकलन-संपादन केलेले ‘पिपांत मेले ओल्या उंदिर’ हे उत्कृष्ट, उद्बोधक आणि उपयुक्तही पुस्तक अरुण जाखडे यांच्या ‘पद्मगंधा प्रकाशन’ने प्रसिद्ध केले आहे. शब्द आणि भाषा प्रत्येक व्यक्तीला किती अथांग भाव व विचारविश्वात नेऊ शकते, याचा एक विलक्षण साहित्य-शोधच प्रा. नाडकर्णी यांनी घेतला आहे.) तर मुद्दा आहे शब्दांचा. माणूस प्राणी बोलायला लागला (निरनिराळ्या ठिकाणी- निरनिराळ्या बोलींमधून) त्याला साधारणपणे दीड लाख वर्षे झाली, असे मानववंशशास्त्रज्ञ मानतात. (त्यांना ‘बोली’ म्हणण्यापेक्षा ‘स्वरयंत्र- नियंत्रित ध्वनी’ इतपतच स्थान होते.) त्या ध्वनींमधून संवादी-संदेशवाहक शब्द निर्माण व्हायला आणखीही बरीच वर्षे गेली असावीत. त्या शब्दांना प्राथमिक चित्रलिपीचे रूप २२ हजार वर्षांपूर्वी आले असे मानले जाते, परंतु त्या चित्रलिपीतून रीतसर अक्षरे, शब्द, स्थूल अशी वाक्यरचना हे सर्व जास्तीत जास्त पाच ते सहा हजार वर्षांपूर्वीचेच आहे.त्यावेळच्या जीवनशैलीत शब्दांचा व भाषेचा उपयोग फक्त व्यावहारिक होता. भावना, विचार, तत्त्वचिंतन, वाद, मतभेद, गैरसमज हे सर्व होण्याइतकी भाषा प्रगल्भ झालेली नव्हती. त्यामुळे एकूण शब्दसंख्याही अतिशय कमी होती- मग ते शब्द चिनी असोत वा अन्य कुठच्या तरी सिव्हिलायझेशनमधील. अंदाजानुसार ती एकूण शब्दसंख्या चार-पाचशेच्या वर नसावी.‘द स्टोरी ऑफ इंग्लिश’ या बी.बी.सी.ने प्रसिद्ध केलेल्या पुस्तकात म्हटल्याप्रमाणे, दोन हजार वर्षांपूर्वी ज्युलियस सिझर ब्रिटनमध्ये साम्राज्य विस्तारासाठी अवतरला तेव्हा इंग्रजी ही भाषाच नव्हती, परंतु बहुतेक सुशिक्षित (आणि अशिक्षितही!) मंडळींना वाटते की, ज्युलियस सिझर, क्लिओपात्रा इतकेच काय येशू ख्रिस्तही इंग्रजीतच बोलत असणार. वस्तुत: प्राचीन इटलीची भाषा लॅटिन हीच रोम प्रजासत्ताकाची, रोमन साम्राज्याची आणि रोमन कॅथलिक चर्चची आणि नंतरच्या काळात युरोपची सांस्कृतिक भाषा होती. अगदी १५०० वर्षांपूर्वीही इंग्रजी भाषा फक्त काही पाच-सात हजार माणसांना येत होती. ‘इंग्रजीचा प्रभाव’ वगैरेचा प्रश्नच नव्हता. इतकेच काय, शेक्सपियर (१५६४-१६१६) त्याची नाटके लिहीत होता तेव्हा फार तर ५० ते ७० लाख लोक इंग्रजी भाषा बोलू शकत होते. (साक्षरता कमी असल्याने या ‘इंग्लिशमेन’ पैकी बहुसंख्य लोक लिहू-वाचू शकत नव्हते, परंतु नाटके समजण्याइतकी आकलनशक्ती समाजात होती, त्यामुळेच ती नाटके टिकली. आजही शेक्सपियरची नाटके समजून घेण्यासाठी हजारो- विद्यार्थी त्यावर डॉक्टरेट करीत असतात.)इंग्रजी भाषेचा विस्तार, प्रसार आणि प्रभाव मुख्यत: चारशे वर्षांंतला आहे. म्हणजेच त्यांच्या साम्राज्य विस्ताराबरोबर तो झाला आहे. त्या साम्राज्याचा आणि भाषेचा इतका अचाट प्रभाव होता की, खुद्द ब्रिटनमधील आयरिश, स्कॉटिश आणि वेल्श भाषा इंग्रजीने निष्प्रभ करून टाकल्या. इंग्रजीचा हा प्रभाव पडण्यापूर्वी युरोपात प्रतिष्ठा होती ती फ्रेंच भाषेची. काही प्रमाणात जर्मन भाषेचीसुद्धा. फ्रेंच भाषेला तर दरबारी, उच्चभ्रू, सांस्कृतिकतेचेही स्थान होते. परंतु सतराव्या शतकापासून इंग्रजी भाषेचा प्रभाव पडू लागल्यानंतर इंग्लिश आणि फ्रेंच यांच्यात जो सांस्कृतिक-भाषिक संघर्ष व स्पर्धा सुरू झाली ती आजतागायत चालू आहे. आजही फ्रेंचांना इंग्रजी भाषेविषयी विलक्षण मत्सर व असूया आहे. दोन-तीन दशकांत रडत-खडत का होईना, फ्रेंचांनी इंग्रजी भाषेचा जागतिक दबदबा मानायला सुरुवात केली आहे आणि इंग्रजी भाषेचे वर्गही सुरू केले आहेत. (चीनही असाच स्वत:ला प्राचीन व भाषिक प्रगल्भता मानणारा देश. त्यांची भाषा तर सुमारे साडेतीन हजार वर्षे इतकी प्राचीन, चिनी साहित्यही तीन हजार वर्षांपूर्वीचे. विशेष म्हणजे किमान अडीच हजार वर्षांत त्यांच्या चित्रलिपीत फारसा फरक पडला नाही. हजारो चित्राक्षरे असल्यामुळे बऱ्यापैकी गोंधळही होता. पुढे माओंच्या काळात क्रांतीनंतर सुमारे दोन हजार चित्राक्षरे निश्चित केली गेली आणि त्या सुधारित लिपीमुळे साक्षरता आणि शिक्षण व त्यामुळे साहित्य-कलांचा प्रचंड विस्तार झाला. परंतु अशा स्वाभिमानी चीननेही आता इंग्रजी भाषेची वैश्विकता व अपरिहार्यता मान्य केली आहे. (सांस्कृतिक क्रांतीच्या काळात चिनी कॉम्रेडस्नी शेक्सपियरची नाटके, एकूण इंग्रजी साहित्य वगैरे जाळून टाकले होते. चिनी व कम्युनिस्ट या दोन्ही परंपरांवर पाश्चिमात्य आक्रमण असता कामा नये, अशी अतिरेकी भूमिका त्यामागे होती.)चिनी भाषेप्रमाणेच संस्कृत भाषाही (वेद आणि उपनिषदांची) सुमारे साडेतीन हजार वर्षांंपूर्वीची आहे आणि संस्कृत व्याकरणही सुमारे दोन हजार वर्षे शास्त्रशुद्ध स्थितीत आहे. बहुतेक भारतीय भाषा संस्कृत ही मूळ भाषा मानतात, ज्याप्रमाणे इंग्रजी, फ्रेंच, जर्मन आदी भाषा लॅटिन ही मूळ भाषा मानतात. संस्कृत आणि प्राकृत (साहित्य- तत्त्वचर्चेची संस्कृत आणि सामान्य संवादाची प्राकृत असे ढोबळ वर्णन केले जाते.)सिव्हिलायझेशन आणि भाषिक उत्क्रांती व विकास यांचा जसा जवळचा संबंध आहे, तसाच संबंध मानवी मनाचा अमर्याद वेग आणि त्याचे सतत विस्तारणारे क्षितिज यांचाही आहे. चिनी आणि संस्कृत भाषेचा प्रभाव आणि ‘सिव्हिलायझेशनल इम्पॅक्ट’ हासुद्धा पूर्वी त्यांच्या आजूबाजूच्या सर्व भागात होता, परंतु अनेक कारणांमुळे त्यांचा विस्तार पुढे थांबला. याचा अर्थ असा नव्हे की मूळ भाषिक संस्कार पुसला जातो. भाषेबद्दल तसे होत नाही, परंतु व्यवहार, राजकारण, साहित्य-कलांवरचा भाषिक प्रभाव क्षीण होत जातो. (जे सध्या सर्व भारतीय भाषांना जाणवू लागले आहे.) इंग्रजी भाषेने साम्राज्य विस्ताराबरोबरच जी विलक्षण लवचिकता दाखविली, त्यामुळे अजूनही त्यांचा प्रभाव वाढतो आहे.‘सिव्हिलायझेशन’ला जेव्हा विज्ञान-तंत्रज्ञानाचे परिमाण लाभले आणि अर्धशतकात कॉम्प्युटर, मोबाइलचे सांस्कृतिक दागिने त्याबरोबर आले, तेव्हापासून भाषेने ‘क्वाण्टम जंप’ घेतली आहे. जगातल्या सर्व भाषांचे मूळ तेच राहिले तरी आविष्कार आता झपाटय़ाने बदलत जाणार आहेत. एकाच पिढीत दोन सांस्कृतिक- भाषिक जीवनशैली तयार होणार आहेत. आणखी २५-३० वर्षांनी ज्ञानेश्वरीपासून ते मर्ढेकरांपर्यंत सर्व ‘सेफ वा लॉकर्स’मध्ये जाणार आहे. म्हणजे एका वर्गाला त्याबद्दल आस्था, आदर, श्रद्धा राहील, पण त्याचा विस्तार खुंटणार आहे.विशेष म्हणजे संवादाची भाषा मराठी वा मिंग्लिश (म्हणजे मराठी अधिक इंग्लिश) असेल, पण साहित्य-कला-विज्ञान-तंत्रज्ञान यांची इंग्रजीच होत जाईल. मीडियाला तर तारेवरची कसरतच करावी लागणार आहे. ज्याला ‘इंटेलेक्च्युअल डिसकोर्स’ किंवा वैचारिक चर्चा म्हणतात, त्या निखळ मराठी वा बंगाली वा कन्नड भाषेत अशक्य होत जाणार आहेत. कारण तशा चर्चांसाठी आवश्यक ती ‘लिंग्वा फ्रँका’ म्हणजे परिभाषा आता इंग्रजीतच होत जाणार.साहजिकच जॉर्ज बर्नाड शॉ यांच्या भाषेत सांगायचे तर समाजात प्रचंड भाषिक विषमता आणि पर्यायाने माणसांमध्ये ‘लिंग्विस्टिक स्किझोफ्रेनिया’ म्हणजे ‘भाषिक दुभंगलेपण’ येणार आहे. मीडियाला, विशेषत: टीव्ही चॅनल्सना या दुभंगलेपणावर मात करण्यासाठी प्रेक्षकांच्या आकलनशक्तीचा ल.सा.वि. काढत टीआरपी सांभाळावा लागणार आहे. असा लघुत्तम साधारण विभाज्य एका बाजूला आणि बहुभाषिक सुविधा व आर्थिक स्थिती असलेला महत्तम साधारण विभाज्य (म.सा.वि.) दुसऱ्या बाजूला अशी समाजाची आणि साहित्याची विभागणी होत जाणार आहे. सध्या मराठी वा कोणती भारतीय भाषा विस्तारते आहे?दोन महिन्यांपूर्वी ऑक्स्फर्ड डिक्शनरीने दहा लाखावा शब्द त्यांच्या कोशात समाविष्ट केला- तो होता ‘स्मलडॉग मिलिऑनेर’ने जगभर नेलेला ‘जय हो!’ ४०० वर्षांत इंग्रजी भाषेतील शब्दसंख्या सुमारे ५० हजारांवरून १० लाखांपर्यंत गेली आहे. फ्रेंच भाषेत एक लाख आणि जर्मन भाषेत दोन लाख शब्द आहेत.अर्थात केवळ शब्दसंख्या हेच भाषेचे वैभव नसते. शेक्सपियरच्या संपूर्ण साहित्यात फक्त १५ हजार शब्द येतात, असे शेक्सपियर संशोधक सांगतात. (तेव्हा प्रचलित असलेल्या शब्दसंख्येच्या सुमारे एक तृतीयांश) परंतु त्याने त्या शब्दांमधून उभे केलेले समांतर विश्व आज त्या भाषेत १० लाख शब्द झाले तरी आपला प्रभाव टिकवून आहे. म्हणजेच भाषेचे वैभव, त्यातील सौंदर्य, त्यातील विचार आणि त्याची प्रभाव टाकण्याची क्षमता केवळ शब्दसंख्येवर अवलंबून नाही. त्या त्या समाजाचा सार्वत्रिक अनुभव, त्या समाजातील व्यक्तींची झेप, समाजातील विज्ञान आणि एकूणच वैचारिकता यावर त्या त्या भाषेतील सामथ्र्य व समृद्धी अवलंबून आहे. ज्ञानेश्वरी, तुकारामाची गाथा, दासबोध हे चारशे ते सातशे वर्षे त्याच्या जोरावर टिकून राहिले. मर्ढेकर ६० वर्षे टिकून आहेत आणि डॉ. द.भि. कुळकर्णींना ‘अनन्यता मर्ढेकरांची’सारखा विचारसंपन्न ग्रंथ आज प्रसिद्ध करावासा वाटतो. विजया राजाध्यक्षांना त्यांचे मर्ढेकरांबद्दलचे संशोधन चालूच ठेवावेसे वाटते, यावरून त्यातील वैचारिक ताकद लक्षात येते. परंतु मुद्दा हा आहे की, ५० वर्षांत (मुख्यत: ३० वर्षांत) म्हणजे महाराष्ट्र स्थापन झाल्यानंतर मराठी साहित्य- कलासृष्टीने कोणते कळस मराठी सांस्कृतिकतेवर चढविले? त्यामुळे मोबाइल फोन्सवरती किती बडबड चालू असते आणि कॉम्प्युटर चॅट किती उत्साहाने चालतात यावरून समाजाची वैचारिकता कळणार नाही, त्यासाठी वेगळेच ‘सिव्हिलायझेशनल ट्रेण्डस्’ निर्माण करावे लागतील.

कुमार केतकर

No comments:

Post a Comment