‘यू टू स्कॉलर्स!

त्या बिचाऱ्या क्लिओपात्राचे थडगे उपसायला सुरुवात व्हायच्या आतच आता काही इतिहास संशोधकांची नजर शेक्सपियरच्या समकालिनांच्या ‘समाधीं’कडे लागली आहे. क्लिओपात्राचा मृत्यू २०३८ वर्षांपूर्वीचा. तिच्या मृत्यूबद्दलचे गूढ आहे, ते ती कशामुळे मरण पावली याबद्दलचे. खून की आत्महत्या? तिने स्वत:ला नागदंश करून घेतला, की विष प्राशन केले? आणि अर्थातच ती एक मदनिका होती, की सर्वसामान्य रूपाची राणी- याचा शोध ते इतिहासकार घेणार आहेत. शेक्सपियरबद्दलची इतिहासकारांची ‘डिटेक्टिवगिरी’ वेगळ्या स्वरूपाची आहे. गेली शे-दोनशे वर्षे काही साहित्य-इतिहास संशोधक असे मानत आले आहेत, की अवघ्या जगावर इतका दीर्घकाळ प्रभाव टाकणारी ती नाटके विल्यम शेक्सपियरची नाहीतच! ती आहेत सर फ्रॅन्सिस बेकनची. सर फ्रॅन्सिस हे तत्कालीन उच्चकुळातले आणि समाजातील लब्धप्रतिष्ठित; परंतु बऱ्याच संशोधनानंतर हा दावा खोटा ठरला. तरीही संशयात्मे होतेच. त्यांच्यापैकी काही मंडळींनी असे शोधप्रबंध मांडले, की शेक्सपियरच्या नाटक व कवितांमध्ये जी वृक्षांची व फुलांची नावे येतात, ती त्याच्या वास्तव्याच्या परिसरात नव्हतीच. मग त्यावर बराच खल झाला आणि शेक्सपियरच्या घराचा पत्ता ‘चुकीचा’ नोंदविला गेल्यामुळे हा घोळ झाला, असे सिद्ध करण्यात आले; पण नाटके शेक्सपियरचीच असल्याचा निर्वाळा देण्यात आला. आजही स्ट्रॅटफोर्ड या शेक्सपियरच्या गावी संशोधन चालूच असते. ते गाव म्हणजे आता जागतिक पर्यटकांचे एक सर्वात महत्त्वाचे ठिकाण आणि साहित्यिकांची पंढरी म्हणून ओळखले जाते. अवघे गाव हेच ‘शेक्सपियर म्युझियम’ आहे आणि ब्रिटिश सरकारला तेथे येणाऱ्या पर्यटकांकडून लक्षावधी पौण्डांचे उत्पन्न होते. शेक्सपियर ज्या ‘स्ट्रॅटफोर्ड ग्रामर स्कूल’मध्ये गेला ती शाळा, त्याने ज्या नाटय़गृहात त्याचे पहिले नाटक केले ती जागा, त्याने ज्या नाटक कंपनीसाठी काम केले व जेथे सर्वाधिक प्रयोग केले ते थिएटर हे सर्व व इतर बरेच काही अतिशय व्यवस्थितपणे जपून ठेवले आहे. त्या नाटय़गृहात आजही दररोज शेक्सपियरचे एक तरी नाटक चालू असतेच. शेक्सपियरच्या ‘अभिनय परंपरे’त वाढलेले हजारो नट स्ट्रॅटफोर्ड, लंडनने जागतिक रंगभूमीवर आणले आहेत, हॉलीवूडला ‘पुरविले’ आहेत. पीटर ओदूल असो वा लॉरेन्स ऑलिव्हिया- कितीतरी.खरे म्हणजे ती नाटके म्हणजे इतक्या थोर कलाकृती आहेत, की त्यांचेच एक स्वतंत्र स्थान जगाच्या सांस्कृतिक जीवनात आहे. त्या नाटकांमधील पात्रे, त्यांचे स्वभाव, त्यांचे संवाद, नाटकातील प्रसंग आणि पेचप्रसंग, त्यांची वेधक कथानके हे सर्व काही वैश्विक व अजरामर असल्याचे मानले जाते.शेक्सपियरने शंभराच्या आसपास नाटके लिहिली असावीत, पण त्यापैकी ३९ पूर्ण व मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. त्याने शेकडो ‘सॉनेट्स्’ (१४ ओळींच्या ‘सुनीत’ शैलीत) आणि कित्येक कविता लिहिल्या. वयाच्या ५२ व्या वर्षी शेक्सपियर मरण पावला. (१५६४-१६१६), पण या तशा अल्पायुष्यात त्याने केलेली साहित्यनिर्मिती व तिच्याद्वारे माणसाच्या वृत्ती-प्रवृत्ती, स्वभावशैली, मनोव्यापार आणि माणसांच्या परस्पर संबंधांवर टाकलेला प्रकाश इतका विलक्षण आहे, की आजही वैज्ञानिक, न्यूरॉलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ त्याचे संदर्भ देऊनच आपले ‘प्रबंध’ मांडतात. कोणत्याही राजकारण्याने, योद्धय़ाने, सत्ताधीशाने इतका प्रभाव आणि इतका दीर्घकाळ टाकलेला नाही. जगातील भाषेत त्याची नाटके आली आहेत वा रूपांतरे झाली आहेत. त्यांच्यावर संगीतिका, नृत्यनाटिका, चित्रपट, टी. व्ही. शोज् इतकेच काय महासंगीत सभाही झाल्या आहेत.समजा, या ‘हिस्टरी-लिटरेचर डिटेक्टिवज्’च्या संशयात्म्यांनी हे सिद्ध केले, की ती नाटके शेक्सपियरची नव्हतीच मुळी, तर त्यामुळे काय होईल? शेक्सपियर वा त्याचे समकालीन कुणीही जिवंत नाही. कुणाला ‘कॉपीराइट’चे पैसे देण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही. अब्जावधी प्रतींवर, आजपर्यंत सर्व भाषांमध्ये छापलेले, त्याचे नाव काढून टाकता येणार नाही. लोकांच्या संभाषणातून शेक्सपियरचे नाव काढून टाकता येणार नाही. शेक्सपियरचे विश्वकीर्त स्टॅटफोर्ड गाव व तेथील म्युझियम हलविणे शक्य नाही. हे सर्व त्या संशयात्म्यांना माहीत आहे. या संशोधनाने त्या बिचाऱ्या शेक्सपियरवर काहीही परिणाम होणार नाही, जसा क्लिओपात्रावरील संशोधनानेही होणार नाही. पण संशय, ‘सत्या’चा ऐतिहासिक शोध, उत्कंठा, अथांग कुतूहल आणि जिद्द यांनी झपाटलेली माणसे असे (नस्ते!) उद्योग करीत असतातच.या संशयात्म्यांच्या संशोधक गटाला (टोळीला!) नुकतेच नवे जीवदान प्राप्त झाले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एक ज्येष्ठ न्यायाधीश जॉन पॉल स्टिव्हन्स यांनी या प्रश्नाबद्दल दिलेला ‘निवाडा’ संशयात्म्यांच्या बाजूचा आहे. स्टिव्हन्स यांच्या म्हणण्यानुसार, ही नाटके शेक्सपियरने लिहिली नसावीत, असे सिद्ध करण्याइतका परिस्थितीजन्य पुरावा आहे.हा परिस्थितीजन्य पुरावा म्हणजे काय? न्यायमूर्ती स्टिव्हन्स यांच्या म्हणण्यानुसार, शेक्सपियरचे शिक्षण प्राथमिक शाळेच्या पुढे झालेले नव्हते. महाविद्यालयीन व कला-साहित्य क्षेत्रात त्यांना काही विशेष गती असल्याचा पुरावा त्या शाळेच्या रेकॉर्ड्समध्ये नाही. आई-वडील काही साहित्यादी क्षेत्रात असल्याचे आढळलेले नाही. वडील वा नातेवाईकांपैकी कुणीही नाटकप्रेमी नव्हते. विल ऊर्फ विल्यम विशेष हुशार मुलगा असल्याचा दाखला नाही.शेक्सपियरच्या नाटकांमधून गुंतागुंतीचे कौटुंबिक संबंध, प्रेम-विरह-मत्सर-हेवा-द्वेष यांतून निर्माण होणारे त्रिकोन-पंचकोन, सत्तास्पर्धा, संघर्ष, राजकारण, इतिहास याबरोबरच तत्त्वज्ञान, मनोविश्लेषण आणि अगदी व्यापार-अर्थव्यवहार अशा सर्व गोष्टी येतात. कार्ल मार्क्‍सपासून ते निआल फग्र्युसन (सध्या गाजत असलेल्या ‘द अ‍ॅसेंट ऑफ मनी’ या पुस्तकाचे लेखक व इतिहासकार) यांच्यापर्यंत आणि सिगमण्ड फ्रॉइडसारख्या मानसशास्त्रज्ञापासून ते अ‍ॅगाथा ख्रिस्तीसारख्या रहस्य कथालेखिकांपर्यंत आणि ऑस्कर वाइल्ड-जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्यापर्यंत कुणाचेही शेक्सपियरशिवाय ‘पान’ही हलत नाही. अशी साहित्यनिर्मिती करण्याची क्षमता शेक्सपियरकडे येणे शक्य नव्हते, तसा पुरावा नाही. त्यामुळे ती नाटके त्याची नसावीत, असे दर्जेदार, व्यासंगी व प्रगल्भ साहित्य लिहू शकणारे त्या काळात व परिसरात सर फ्रॅन्सिस बेकन यांच्याप्रमाणे ख्रिस्तोफर मार्लो, फुल्क ग्रेव्हिल, एडवर्ड द विर असे काही जण होते. त्यांच्यापैकी कुणीतरी ही नाटके लिहिली असावीत. शिवाय मूळ हस्तलिखिते जवळजवळ नाहीतच. कारण त्या काळात लेखकाने थेट संवाद सांगायचे, ते नट-नटय़ांनी मुखोद्गत करायचे, प्रयोग करताना त्यात थोडेफार बदल करायचे आणि नंतर ते नाटक कुणीतरी लिहून काढायचे. (खुद्द नाटककारानेच असे नाही) आणि पुढे प्रकाशित करायचे अशी पद्धत होती. छपाईचा शोध नुकताच लागून छोटेखानी ‘छापखाने’ उभे राहू लागले होते; परंतु ‘आवृत्त्या’ काढणे वगैरे तेव्हा शक्य नव्हते. छपाईकलेचा, यंत्रांचा विकास व विस्तार मुख्यत: शेक्सपियरच्या मृत्यूनंतर झाला आहे.तर अमेरिकेतील न्यायमूर्ती स्टिव्हन्स यांच्या मते या प्रकरणावर संशोधन करणे आवश्यक असून, सत्याचा शोध घ्यायलाच हवा. नेमके याच वेळेस शेक्सपियरच्या गावातील सेण्ट मेरीज् चर्चने गावातील संबंधित अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे, की फुल्क ग्रोव्हिल या तत्कालीन प्रसिद्ध व प्रतिभावान लेखकाचे थडगे (की समाधी?) उपसण्याची परवानगी साहित्य व इतिहास संशोधकांना दिली जावी, अशी परवानगी मागण्यापूर्वी या ‘हिस्टरी-लिटररी डिटेक्टिव्ज्’च्या गटाने अत्याधुनिक रडार तंत्रज्ञान, लेझर बिम्स, विशेष संगणकीय सॉफ्टवेअर इत्यादींच्या मदतीने, फुल्क ग्रेव्हिल यांच्या थडग्यात हाडांच्या सापळ्याव्यतिरिक्त कोणत्या गोष्टी आहेत, याचा शोध घेतला आहे. त्याचप्रमाणे फुल्क ग्रेव्हिल यांचे मृत्युपत्र वा तत्सम दस्तऐवज, त्या वेळचे इतर काही पुरावे गोळा करून या संशोधकांनी असे सतर्कपणे ‘सिद्ध’ केले आहे, की ग्रेव्हिल यांच्या थडग्यात, त्यांच्याबरोबर ज्या गोष्टी पुरल्या गेल्या आहेत, त्यात ‘अ‍ॅण्टनी अ‍ॅण्ड क्लिओपात्रा’ नाटकाची तत्कालीन प्रकाशित (संहिता) प्रत व इतरही काही साहित्य आहे. ग्रेव्हिल यांनी लिहिलेल्या साहित्याचा ‘शब्दश:’ (म्हणजे खरोखरच ‘अक्षरश:’) अभ्यास करून या संशोधकांनी दाखवून दिले आहे, की या नाटकाची शैली नेमकेपणाने त्या नाटकाच्या शैलीशी जुळते. त्या थडग्यात दोन-तीन लाकडी पेटय़ा आहेत आणि त्यात ते साहित्य ठेवलेले आहे. समजा, खरोखरच, ग्रेव्हिलचे हे थडगे उपसायला तेथील चर्चने आणि तेथील ‘ग्रामपंचायती’ने परवानगी दिली आणि त्यानंतर त्या लाकडी पेटय़ांमधून (शेक्सपियरचे!) ते साहित्य हाती लागले तर तो जवळजवळ अंतिम पुरावा ठरेल आणि बिचाऱ्या शेक्सपियरच्या किर्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल. परंतु अमेरिकन न्यायालयात जो ‘पुरावा’ ठेवण्यात आला आहे त्यानुसार एडवर्ड द विर यांनी ती नाटके लिहिली आहेत. (म्हणजे ग्रेव्हिल यांच्या थडग्यात लाकडी पेटय़ा सापडल्या तरी त्यात ती नाटके मिळणार नाहीत!) हे एडवर्ड ऑक्स्फर्ड विद्यापीठातील ज्येष्ठ प्राध्यापक / विद्वान म्हणून ओळखले जात. त्यांचा राज्यशास्त्र, नीतीशास्त्र, साहित्य याचा दांडगा व्यासंग होता. तो व्यासंग, नाटकांमधील प्रसंगरचना आणि साहित्यशैली यांची अचूक सांगड बसते. त्यामुळे त्यांना चारशे वर्षांनंतर का होईना ‘न्याय’ मिळायलाच हवा आणि शेक्सपियरच्या नावावर ‘खपविली’ गेलेली नाटके एडवर्ड द विर यांच्या नावावर रीतसर सुपूर्द केली जावीत! शेक्सपियरसारख्या ‘सामान्य’ कुवतीच्या, ‘अल्पशिक्षित’ आणि आर्थिकदृष्टय़ा ‘गरीब’ तसेच सांस्कृतिक वातावरण नसलेल्या कुटुंबात अशी विलक्षण सर्जनशीलता असणे नाही. अशा निष्कर्षांला जे इंग्लंड-अमेरिकेतील संशयात्मे आले आहेत, त्यांनी एक वेबसाइट सुरू केली आहे आणि त्यावर यासंबंधात जोरदार चर्चा सुरू आहे. ती वेबसाइट आहे : www.Doubtaboutwill.org याव्यतिरिक्त ‘सायण्टिफिक अमेरिकन’ या विख्यात व प्रतिष्ठित विज्ञान-मासिकात स्तंभलेखन करणाऱ्या मायकेल शर्मर याचीही एक वेबसाइट आहे. www.skeptic.com परंतु शर्मर यांच्या मते ती नाटके शेक्सपियर यांचीच आहेत. जरी ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकेतील सुप्रसिद्ध दैनिकाने सर्वोच्च न्यायाधीशांना अनुकूल लेख प्रसिद्ध केलेले असले तरी शेक्सपियरचे स्थान कायद्याने व इतिहास संशोधनाने / उत्खननानंतरही अढळच राहणार आहे.शेक्सपियर यांच्या थडग्याचे संशोधन पूर्वीच झाले आहे आणि स्ट्रॅटफोर्ड या गावातील संशोधन केंद्राने तर त्यांचे घर, शेत, शाळा, खेळायची जागा, मित्रमंडळींची नावे, सहकारी अभिनेते, निर्माते अशा अनेक संदर्भानिशी शेक्सपियरची ‘बाजू’ भक्कम केली आहे. या विषयावर बरेच लेखन (प्रबंध, शोधनिबंध, पुस्तके) झालेले असले तरी ‘द केस फॉर शेक्सपियर’ या २००८ साली प्रसिद्ध झालेल्या पुस्तकाने सर्व प्रकरणावर शेवटचा पडदा टाकला आहे.पण संशयात्म्यांचे ‘आत्मे’ शांत झालेले नाहीत. शेक्सपियरच्याच भाषेत सांगायचे तर त्याच्या सर्जनशीलतेवर, साहित्यिक कर्तबगारीवर हा ‘अनकाइंडेस्ट कट’ आहे. त्यामुळे शेक्सपियर ऊर्फ बार्ड (राजमान्य-लोकमान्य कवी) ‘यू टू ब्रुटस्’च्या चालीवर म्हणेल, ‘यू टू स्कॉलर्स!’कुमार केतकर

1 comment:

  1. sir, we knew the truth of shekspeare...thanks for that information

    ReplyDelete