फिडलर ऑन द रूफ..!

शनिवार, १२ सप्टेंबर २००९

आपण जेव्हा मनातल्या मनात विचार करीत असतो, तेव्हा अतिशय सूक्ष्म पद्धतीने आपल्या स्वरयंत्राच्या शिरांची हालचाल होत असते. म्हणजेच आपण मनातल्या मनात बोलत असतो. कुणाशी? आपल्या नात्या-गोत्यातल्या, परिसरातल्या, ऑफिसातल्या, शेजारपाजारच्या लोकांशी, पण अर्थातच मनातल्या मनात! ती व्यक्ती हजर असण्याची गरज नसते. इतकेच काय, जिवंत असण्याचीही गरज नसते. त्याही पलीकडे जाऊन, म्हणजे ती व्यक्ती पूर्णपणे कल्पनेतीलही असू शकते! मनातल्या मनात ‘बोलताना’ ती काल्पनिक (वा खरी) व्यक्ती काय म्हणेल हेसुद्धा आपणच ठरवतो, आणि त्यानुसार संवाद (वा विसंवाद) चालू राहतो. मनातल्या मनात लोक भांडण करतात, शिवीगाळही करतात, इतकेच काय भांडण मिटवूनही टाकतात! काही वेळा अगदी समजूतदारपणानेही (पण मनातल्या मनात) वागतात. म्हटले तर हे सर्व मनाचे खेळ असतात- पण ते ‘खेळ’ नसतातही. कारण त्यातूनच खरे संघर्ष, खरे संवाद वा खरे सामंजस्य निर्माण होत असते. एक प्रकारे मनातल्या मनात बोलणे- विचार करणे- ही प्रत्यक्षातील संवाद-विसंवादाची रंगीत तालीम असते. स्वत:चे स्वत:शी बोलणे हेसुद्धा भाषेच्या माध्यमातूनच होते. विचाराचे माध्यमही भाषाच. अगदी पूर्ण अशिक्षित माणूसही समाजात जसा बोलतो, भांडतो तसाच तो मनातही बोलतो. आंधळे बोलतातच, पण मुके-बहिरे समाजात बोलू शकत नसले तरी मनातल्या मनात बोलतात. शब्दोच्चार करायला ‘वाणी’ लागते. विचार करायला वा स्वत: स्वत:शी बोलायला वाणी लागत नाही. पण भाषा लागते.
नाटकांमध्ये ‘स्वगत’ असते. त्या पात्रावर प्रकाशझोत टाकला जातो आणि मग ते पात्र अगदी दीर्घ संवादही करते- प्रेक्षकांना त्याच्या वा तिच्या मनात काय चालू आहे हे ‘स्वगता’द्वारे पूर्ण ऐकू येते. पण त्या पात्राच्या शेजारी असलेल्या कुणालाही ते ऐकू आलेले नाही असे गृहित धरायचे असते. ‘मानापमान’ असो वा ‘माय फेअर लेडी’- ‘स्वगता’शिवाय नाटक वा चित्रपट पुढे सरकू शकत नाही. चित्रपटातील पात्र कधी आरशासमोर उभे राहून स्वत:च्याच मनातील द्वंद्व वा द्विधा स्थिती आपल्याला सांगतात. ‘अमर अकबर अँथनी’मधला अँथनी (अमिताभ बच्चन)आरशातल्या स्वत:लाच दारू प्यायल्याबद्दल फटकारतो. जे नाटक-सिनेमात, तेच प्रत्यक्ष जीवनात. आपल्या जीवनाचे ‘कथानक’ही लक्षावधी ‘स्वगतां’शिवाय पुढे जाऊ शकत नाही.
माणसं मनातल्या मनात बोलतात/विचार करतात तेव्हा त्यांच्या स्वरयंत्रात होणाऱ्या सूक्ष्म-अतिसूक्ष्म कंपनांची ‘नोंद’ घेण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करीत आहेत. मेंदूमध्ये होणारे ‘सिग्नल ट्रॅन्स्फर्स’ किंवा संदेशवहन आणि स्वरयंत्रातील कंपने यांच्यातील संबंध समजले तर भाषेचा, चिन्हांचा, कल्पनाचित्रांचा, इतकेच काय थोडय़ाफार प्रमाणात स्वप्नांचा उगम, संदर्भ व अन्वयार्थ लावता येतील असे भाषातज्ज्ञांनाही वाटते. अर्थातच हे संशोधन अगदी प्राथमिक अवस्थेत आहे.
कित्येक लोकांना रस्त्यातून जाताना, घरातल्या घरात, खुर्चीत वा गादीवर पडल्या-पडल्या स्वत:शी जोरात बोलायची सवय असते. ही माणसे त्यांचे असे ‘स्वगत’ अगदी हातवारे करत आणि हावभावांसहित, त्याचप्रमाणे आवाजाच्या चढउतारांसहित बोलत असतात. आजुबाजूला कोण आहे वा आपण कुठे आहोत याचेही त्यांचे भान सुटलेले असते. ते स्वत:च्याच आत्मसंवादी तंद्रीत असतात. सर्वसाधारणपणे अशी माणसे तऱ्हेवाईक, किंचितशी वेडी, मूडी वा ‘झटका’ येणारी म्हणून ओळखली जातात. नर्म अशा चेष्टेचाही ती माणसे एक विषय बनतात. (इयरफोन लावून होतवारे करत आणि आजूबाजूच्या लोकांची पर्वा न करत लोकल ट्रेनमधून वा रस्त्याने जाणारे लोक मात्र या कॅटेगरीत बसत नाहीत! ‘मॅनर्स नसणं’ आणि ‘स्वत:च्या तंद्रीत असणं’ या दोन सर्वथा वेगवेगळ्या गोष्टी आहेत!) परंतु वस्तुस्थिती ही आहे की, प्रत्येक जण मनातल्या मनात बोलतो- विचार करतो- ‘अरग्युमेन्ट’ करतो तेव्हा त्याच्या स्वरयंत्रातील कंपने तशीच असतात. तो संवाद प्रकट व जोरात शब्दोच्चारित झाला की, तो माणूस ‘तऱ्हेवाईक’ ठरतो. ही माणसे काहीशी ‘हायपर’ असतात असे म्हणायची प्रथा आहे. परंतु तशी अतिसंवेदनशीलता (आणि ‘प्रकट स्वगत’) जवळजवळ सर्वानाच असते. काही नाटककार त्यांच्या नाटकांची संहिता लिहिताना तर चक्क ते संवाद बोलतच लिहितात. (अर्थातच त्यांचे लेखन व संवाद बंद खोलीत चालू असते.) अनेक लेखक त्यांच्या मनात तितकेच ‘हायपर’ होऊन त्यांच्या कथा-कादंबऱ्या लिहीत (वा विचार करीत) असतात. म्हणजेच त्यांच्या स्वरयंत्रातील कंपने आणि मेंदूतील ‘सिग्नल ट्रॅन्स्फर्स’ तसेच होतात. आता हे सिद्धही झाले आहे.
शिवाय इतर प्राणी जेव्हा त्यांच्या मनातल्या मनात ‘विचार’ करतात तेव्हा त्यांच्या ‘भाषाहीन’ मानसिक अवस्थेत ते कोणत्या ‘सिम्बॉल्स’ वा कोणत्या ‘साऊंड्स्’ आणि कोणत्या ‘सेन्सेशन्स’मार्फत तो विचार करतात यावरही संशोधन चालू आहे. ज्यांनी कुत्रा, मांजर, गाय, घोडा आदी प्राणी पाळले आहेत, त्यांना हे अनुभवाने माहीत आहे की, ते सर्व प्राणी ‘विचार’ करतात. म्हणजे त्यांना ‘काल्पनिक’ भीती वाटते, पिलांची, वासरांची वा बछडय़ांची ‘काळजी’ वाटते, त्या संभाव्य ‘भीती’पासून संरक्षण म्हणून सर्व पक्षी अंडी सुरक्षित ठेवतात, पिलांना लपवून ठेवतात आणि पिलं ‘वयात’ आली की त्यांना ‘शिकवतात’. हे सर्व ‘विचारपूर्वक’च करतात.
माणसात आणि त्यांच्यात फरक हा की सिम्बॉल्स, साऊंड्स् आणि सेन्सेशन्स (म्हणजे प्रतीकचित्रे, ध्वनी आणि संवेदना) यांच्यातूनच माणसाने शब्द तयार केले आहेत, त्या शब्दांची नेमकी गुंफण करून भाषा बनवली आहे, त्या भाषांना लिपी दिली आहे आणि लिपीद्वारे एक स्वतंत्र भाषाविश्व तयार केले आहे. हे भाषाविश्व म्हणजेच माणसाच्या ‘सिव्हिलायझेशन’चा, उत्क्रांतीचा, सांस्कृतिक प्रगल्भतेचा अक्षरश: अगाध वाटावा असा ठेवा!
परंतु भाषेचा, मेंदूचा, कॉन्शियसनेसचा, आजुबाजूच्या वातावरणाचा, माणसांचा एकमेकांशी नक्की कसा संबंध आहे आणि कोणत्या संस्कारातून भाषा निर्माण होते याबद्दल संयुक्तपणे संशोधन होत नव्हते. शब्दांमध्ये भावनिक वा वैचारिक सामथ्र्य कशामुळे येते, की माणसे मरायला वा मारायला तयार होतात, कविता वाचताना वा ऐकताना भावनाविवश होऊन रडू लागतात, अगतिक होतात, कथा-कादंबरीत येणाऱ्या शब्दरचनांमधून समांतर वास्तव तयार करतात. बरे, जो परिसर वा काळ पाहिलेलाही नाही, जी माणसे कधी दिसलेली नाहीत वा अस्तित्त्वातही नाहीत वा नव्हती ती माणसे, परिस्थिती, निसर्ग, त्यांचे संघर्ष हे सर्व आपण भाषेच्या माध्यमातून शब्दसामर्थ्यांवरच तयार करीत असतो.
या शब्दाला किती प्रतिष्ठा आहे याची अनेक उदाहरणे आहेत. वॉल स्ट्रीटवर जे लॅटिन घोषवाक्य आहे त्यातही शब्द पाळणे किती महत्त्वाचे आहे हे सांगितले आहे. लेखी करार-कंत्राट होण्यापूर्वी सर्व व्यवहार शब्दावर- बोलीवरच चालत. आजही मंडईत वा स्टॉक मार्केटमध्ये दिलेल्या शब्दाला अमाप मान व किंमत आहे.
दिलेला ‘शब्द न पाळणे’, म्हणजेच प्रतारणा करणे, ‘शब्द फिरवणे’, शब्दच्छल करणे, समानअर्थी शब्द वापरून वेगळा अर्थ देणे आणि गोंधळ निर्माण करणे, भाषांतर करताना मूळ शब्द-संकल्पना जाणता-अजाणता बदलणे, एखादी सोपी-साधी गोष्ट शब्दबंबाळ करणे - अशा अनेक विसंवादी बाबी या शब्दांच्या बाजारात येतात.
तसे पाहिले तर कोणत्याही डिक्शनरीत, प्रत्यक्ष वापरातील किमान ८० टक्के शब्द असतातच. परंतु म्हणून डिक्शनरीच्या आधारे कथा-कादंबरी-कविता वा नाटक लिहिता येणार नाही. डिक्शनरीतील किती शब्द एखाद्याला येतात यावरून फार तर त्याची शब्दसंपत्ती किती आहे हे कळेल. पण म्हणून तो एखादा प्रबंध लिहू शकेलच असे नाही.
डिक्शनरी ऊर्फ शब्दकोश किंवा एनसायक्लोपीडिया म्हणजे ज्ञानकोश हे संदर्भ आहेत. ते बनविणे - विशेषत: दुसऱ्या भाषेत अर्थ सांगणारे तसे शब्दकोश बनविणे अतिशय कष्टाचे व जिकिरीचेही आहे. परंतु त्याला आपण सर्जनशील साहित्य म्हणू शकत नाही. एका माणसाला शब्दांचे एवढे वेड लागले की, त्याने ऑक्सफर्ड डिक्शनरीच पाठ करायला घेतली. ए, बी, सी, डी असे करीत तो एल, एम वगैरे आद्याक्षरांपर्यत आला; त्याला जवळजवळ वेड लागायची पाळी आली आणि त्याने तो नाद सोडून दिला.
जॉर्ज बर्नार्ड शॉ या लेजंडरी इंग्लिश नाटककाराचा ध्यासच शब्द, भाषा, संवाद, विसंवाद हा होता. जगातील बहुतेक युद्ध व सर्व संघर्ष हे भाषेच्या (शब्दांच्या व संकल्पनांच्या) चुकीच्या वापरामुळे होतात असे त्यांचे म्हणणे होते. एकच आणि तीही राष्ट्रभाषा असलेल्या इंग्लंडमध्ये इंग्रजी इतक्या विविध प्रकारे (आणि अशुद्धपणे!) उच्चारली जाते याबद्दल त्यांचा तीव्र आक्षेप होता. जोपर्यंत भाषिक सामायिकता होत नाही तोपर्यंत इंग्लिश (पर्यायाने, पुढे ब्रिटिश) समाज सुधारणे शक्य नाही असे ते मानत. त्यांनी तर त्यांच्या साहित्याच्या रॉयल्टीमधून आलेली बहुतेक रक्कम भाषा सुधारण्याचे संशोधन व काम करण्यासाठीच ठेवली होती.
त्यांचे ‘पिग्मॅलियन’ हे नाटक - ज्याच्यावर पुढे ‘माय फेअर लेडी’ हे नाटक व चित्रपट अ‍ॅलन जे. लर्नर आणि फ्रेडरिक लोएवे यांनी बनविले (चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते जॉर्ज कुकरने) - मुख्यत: भाषा, शब्द आणि सामाजिक स्तर व विषमता यासंबंधातीलच आहे. पु. ल. देशपांडे यांनाही नेमका तोच मुद्दा भावला आणि त्यांनी ‘ती फुलराणी’ हे त्या नाटकाचे मराठी रूपांतर केले.
जर समाजातील सर्व लोकांना त्यांची भाषा नीट बोलता आली, शब्द नेमके आणि अचूक वापरता आले तरच उत्तम दर्जाचे साहित्य-नाटय़-चित्रपट-तत्त्वज्ञान-विज्ञान निर्माण होऊ शकेल - नाहीतर ज्या शब्दांनी आणि भाषेने माणसाच्या सांस्कृतिक प्रगल्भतेचा हा विकास केला आहे, ते शब्द आणि भाषाच सर्व मानवी संस्कृतीचा विध्वंस करू शकेल. अर्थातच नुसती भाषा आणि शब्द असून चालणार नाही तर अनुभवाची उत्कटता, नितळपणा आणि जाण नसेल तर केवळ शब्द आणि भाषेलाही काही अर्थ उरणार नाही.
‘माय फेअर लेडी’मध्ये इलायझा, तिच्यावर प्रेम करणाऱ्या फ्रेडीला उद्देशून म्हणते की, ‘तुझे प्रेमाचे, उमाळ्यांचे, विरहाचे शब्द ऐकून-ऐकून मी पूर्ण विटलेली आहे. तुझे ते चंद्र आणि तारे, झाडं आणि फुलं, हवा आणि पाऊस यांच्या शब्दप्रतिमांमधून व्यक्त होणाऱ्या प्रेमापेक्षा त्या शब्दांना झुगारून देऊन तू मला कडकडून आलिंगन दिलेस, जवळ घेतलेस तर त्या निर्थक शब्दांपेक्षा तो स्पर्श, ती मिठी कितीतरी अधिक उत्कट असेल.’ ती म्हणते,
Words! Words! Words!
I am so sick of words!
I get words all day through,
First from Him, now from, now from you!
Is that all you blighters can do?
Don't talk of stars burning above,
If you are in love, show me!
Tell me no dreams, filled with desire,
If you are on fire, show me!...
Haven't your lips, longed for my touch
Don't say how much,
show me, show me!...
Sing me no song, read me no rhyme
Don't waste my time, show me!
Don't talk of June, don't talk of fall,
Don't talk at all... don't talk at all,
show me!
ही कविता बरीच उद्धृत करण्याचे कारण हे की बर्नार्ड शॉ हा भाषाप्रभू स्वत:च शब्दांपेक्षा - आणि शब्दांपलीकडल्या अनुभूतीचे महत्त्व आवर्जून सांगतो आहे. ज्या प्रोफेसर हिगिन्सकडे इलायझा भाषा शिकते, त्या प्रोफेसरलाच, त्याच भाषेत ती फटकारते आणि आपल्या प्रियकरालाही सांगते की, ‘‘तो प्रोफेसर काय, आणि तू काय, नुसते कृत्रिम शब्द पिंजणारे कारागीर आहात आणि त्या शब्दांमधले जीवनच हरवून बसलेले आहात.. तुमच्यापेक्षा ते भाषा न शिकलेले अडाणी लोक बरे.. ते त्यांची नाती शब्दबंबाळ जंजाळात हरवून बसलेले नाहीत!’’
म्हणजेच शब्द व भाषा कितीही विकसित झाली तरी व्यक्तिगत वा सामूहिक अनुभवाला अक्षरांमध्ये गुंफायला ती कमीच पडणार. ‘फिडलर ऑन द रूफ’ या नाटक/चित्रपटातला टोपोल या अभिनेत्याने साकारलेला टेव्ही हा गवळीदेखील सातत्याने स्वगते म्हणतो आणि या स्वगतांतूनच कथानक आकाराला येत राहते.kOur lives would be as shaky as a fiddler on the roof’ असे टेव्ही म्हणतो आणि त्याच्याच घराच्या त्या तिरक्या छपरावर अवेळी फिडल वाजवणारा तो फिडलर नजरेच्या टप्प्यात येतो! ‘ट्रॅडिशन, ट्रॅडिशन’चा घोष करत हळू हळू नव्या विचाराचे स्वागत करणाऱ्या टेव्हीला पडणाऱ्या प्रश्नांचे जणू उत्तर म्हणजेच ही अवेळी अडनिडय़ा ठिकाणी छेडली जाणारी सुरावट! मग टेव्हीच्या या स्वगतप्रधान अशा अवघ्या कथेच्या मूडला ही बिनशब्दांची सुरावट कवेत घेते. फिडलरने अवेळी छेडलेली सुरावट म्हणजे जणू निखळ अनुभूती- टेव्हीच्या स्वगतांमधला, त्याच्या शब्दांमधला प्राण.
परंतु त्याचबरोबर हेही खरेच की (हेसुद्धा स्वत: बनार्ड शॉच म्हणतात -) जर भाषा समृद्ध नसेल तर सिव्हिलायझेशनच अर्थशून्य ठरेल. कारण बायबल असो वा भगवद्गीता, कुराण असो वा कोणतेही पुराण, शेक्सपियर असो वा आईनस्टाईन, ज्ञानेश्वर असो वा शेली, केशवसुत, मर्ढेकर असोत वा नारायण सुर्वे त्या सर्वाची अनुभूती आपल्यापर्यंत पोचविण्याचे माध्यम भाषा हेच आहे. भाषाच विकसित झाली नसती तर आपण आजही आपल्या पूर्वज वानराच्या स्थितीत राहिलो असतो. टारझन कितीही आकर्षक वाटला तरी त्या टारझनची ती आकर्षकता, ते निष्पाप-प्राणीमय मन, ते शब्दहीन पण ध्वनिसंपन्न जीवन आपल्यापर्यंत आज परिणामकारकरीत्या पोचते, ते भाषेतूनच!
कुमार केतकर

2 comments:

  1. हे लेख वाचलेल्या लोकांनी किमान "वाचले" अशी तरी प्रतिक्रिया द्यावी. -Abhijit

    ReplyDelete
  2. खूप छान !
    फिडलर आॅन द रूफ चं मराठी रुपांतर म्हणतां येईल अशी कादंबरी (बहुदा व्यंकटेश माडगुळकर) फार वर्षांपूर्वी वाचनात आली होती. कोणी नाव सांगू शकेल का ?

    ReplyDelete