काही दिवसांपूर्वी ‘न्यूयॉर्क टाइम्स’मध्ये एक बातमी प्रसिद्ध झाली. क्लिओपात्रा या सौंदर्यवती व सम्राज्ञीचे इजिप्तमधील अलेक्झांड्रियाजवळील असलेले थडगे आता इतिहाससंशोधक अक्षरश: उपसून काढणार आहेत. हे संशोधक, उत्खननतज्ज्ञ आणि प्राच्यविद्या अभ्यासक आपल्या सर्व आयुधांनिशी सिद्ध झाले आहेत. त्यासाठी लागणारे सर्व परवाने त्यांनी मिळविले आहेत. क्लिओपात्राभोवती असलेल्या सर्व गूढांपासून तिचे चरित्र व चारित्र्य ‘मुक्त’ करण्याचा हा प्रयत्न तसा नवा नाही; पण आजपर्यंतचे प्रयत्न हे ऐतिहासिक दस्तऐवज, इतर संदर्भ आणि तत्कालीन वस्तू वा वर्णने यावर आधारित होते. आता प्रथमच पुरातत्व अभ्यास करणारे संशोधक या उत्खनन प्रकल्पाकडे अतिशय उत्कंठेने पाहात आहेत.
क्लिओपात्रा ही मूळची इजिप्शियन, की ग्रीक, गोरी, की कृष्णवर्णीय, आफ्रिकन वंशाची, की युरोपियन, असे अनेक प्रश्न आजवर उपस्थित केले गेले आहेत. ज्युलियस सीझर आणि नंतर मार्क अॅन्टनी या रोमन सम्राटांना आपल्या सौंदर्याने घायाळ करणारी क्लिओपात्रा ही इजिप्शियन / ग्रीक मदनिका होती, की दिसायला सामान्य पण कर्तृत्वाने तेजस्वी होती?
क्लिओपात्राच्या व्यक्तिमत्वावर व सौंदर्य-कथांवर अनेक लेखक, कवी, नाटककारांनी कल्पनाविलास केला आहे. तिचे नाक जर धारदार, आकर्षक, तिरकस पण तेजस्वी नसते तर जगाचा, निदान त्या वेळचा इतिहासच बदलला असता, असे म्हणण्याची एक पद्धत आहे. महत्त्वाकांक्षी आणि कपटी, जिद्दी आणि स्वैराचारी पण कर्तबगार आणि लोकप्रिय अशी ती सम्राज्ञी होती आणि म्हणूनच एकूण २१ वर्षे तिने आपले साम्राज्य सांभाळले असेही मानले जाते.
ख्रिस्तपूर्व ६९ वर्षांपूर्वी, इजिप्तच्या टॉलेमी या राजघराण्यात जन्माला आलेली क्लिओपात्रा, हिंदुस्थानवर स्वारी करणाऱ्या अलेक्झांडर ऊर्फ सिकंदरच्या वंशजांपैकी. इजिप्तचा राजा, पहिला टॉलेमी हा अलेक्झांडरचा सेनापती. अलेक्झांड्रियामधील जगातील प्रसिद्ध व त्या दर्जाची पहिलीच लायब्ररी या टॉलेमीनेच उभी केली होती. (ही लायब्ररी पुढे एका युद्धात जाळून नष्ट केली गेली.) टॉलेमीचा मूळ वंश मॅलेडोनियन (म्हणूनच इजिप्शियन, की ग्रीक हा वाद) पण इजिप्तच्या ‘सिव्हिलायझेशन’चे एक प्रवर्तक. रोमन सत्तेने केलेल्या आक्रमणांमुळे इजिप्तला (टॉलेमी घराण्याला) रोमन साम्राज्यावर अवलंबून राहावे लागत असे.
क्लिओपात्रा २०३८ वर्षांपूर्वी मरण पावली, वयाच्या फक्त ३९ व्या वर्षी. पण ती कशामुळे आणि कशी मरणाधीन झाली? तिचा मृत्यू नैसर्गिक होता, की तिचा खून झाला? की तिने आत्महत्या केली? तिने आत्महत्या केली, असे म्हणणारे काही इतिहासकार लिहितात, की तिने एका अतिशय जहरी नागाला स्वत:च्या शरीरावर घेतले आणि त्याच्या दंशामुळे तिचा मृत्यू झाला किंवा तिने ओढवून घेतला! (विषयवासनेने झपाटलेल्या स्त्री-शरीरावर तसा सर्प वेढलेला दाखविण्याची ‘कलात्मकता’ क्लिओपात्रासंबंधातील या कथेवरून पुढे रूढ झाली असावी. आजही अनेक जाहिरातींमधून मादकता दाखविण्यासाठी याच प्रतिमेचा जगभर वापर केला जातो. असो.)
क्लिओपात्राला अशा दंतकथांच्या वेढय़ातून आता कायमचे ‘मुक्त’ केले जाणार आहे!
समजा या आर्किऑलॉजिस्ट टीमला, म्हणजे पुरातत्व संशोधकांना क्लिओपात्राचे थडगे अलेक्झांड्रियाजवळच्या टेकडीवर सापडले आणि ते तिचेच थडगे आहे, हेही सिद्ध झाले तरी पुढे काय? त्या थडग्यात हाडांचा जीर्ण सापळा मिळाला आणि तो कार्बन टेस्टिंग व अन्य प्रयोगांनी २०३८ वर्षांपूर्वीचा होता हेही सिद्ध झाले, तरी ती गोरी होती की कृष्णवर्णीय, ग्रीक की इजिप्शियन, सुंदर की ‘सामान्य’, आफ्रिकन वंशाची, की युरोपियन हे कसे ठरविणार? शिवाय तिचे ते जगप्रसिद्ध नाक- ते कसे होते हे त्या कवटीवरून कसे सिद्ध करणार? आणि तिचा मृत्यू सर्पदंशाने झाला हे तरी कसे निश्चित करणार?
आणखीही काही मुद्दे आहेत. हा सर्व अव्यापारेषु व्यापार, तोही काही लाख डॉलर्स खर्च करून, कशासाठी करायचा? त्याचा ‘उपयोग’ किंवा ‘फायदा’ काय? शिवाय त्या निर्जीव सापळ्यावरून क्लिओपात्रा ही खरोखरच तेजस्वी, तडफदार आणि कर्तबगार होती हेही कसे सिद्ध करणार? याहीपलीकडे एक प्रश्न आहे. गेली दोन हजार वर्षे, जगभर क्लिओपात्राबद्दलचे इतके आकर्षण का व कसे टिकून राहिले आहे? तिच्याबद्दलच्या दंतकथा, नाटके आणि आख्यायिकांद्वारे तिचा स्वभाव कसा होता याबद्दलच्या ज्ञानात कशी भर पडू शकेल?
क्लिओपात्राची ‘लेजंड’ पुनरुज्जीवित केली शेक्सपियरने. विशेषत: त्याच्या ‘अॅन्टनी अॅण्ड क्लिओपात्रा’ या नाटकामुळे. हे नाटक सुमारे ४०० वर्षांपूर्वीचे. शेक्सपियरने लिहिलेल्या ‘ज्युलियस सिझर’ आणि ‘अॅन्टनी अॅण्ड क्लिओपात्रा’ या नाटकांसाठी त्याने काय ऐतिहासिक संशोधन केले होते? हल्लीच्या भाषेत शेक्सिपियरकडे ‘डेटाबेस’ काय होता?
शेक्सपियरने केलेले स्वभावचित्रण इतके प्रभावी होते, की ती नाटके हाच ‘खरा इतिहास’ असे मानले जाऊ लागले. पुढे त्या नाटकाची भाषांतरे झाली आणि युरोपियन साम्राज्याबरोबर क्लिओपात्राची ‘लेजंड’ही पसरली. असेही म्हणता येईल, की तिच्याबद्दलच्या दंतकथेपासून स्फूर्ती घेऊनच अनेक इतिहासकार सत्याच्या शोधात निघाले. जसजसा खरा इतिहास प्रकट होऊ लागला, तसतसा कलाकृतींमध्येही बदल होऊ लागला. क्लिओपात्राचे साम्राज्य आणि सौंदर्य हे पुढे हॉलीवूड चित्रपटांचे आवडते विषय झाले. एलिझाबेथ टेलरसारख्या विलक्षण देखण्या आणि कोणत्याही पुरुषाला आपल्या नजरेने व फॉर्मने ‘जायबंदी’ करणाऱ्या अभिनेत्रीने क्लिओपात्राची भूमिका केल्यापासून (१९६३) लिझ म्हणजेच क्लिओपात्रा ही प्रतिमा लोकमानसात ठसली. (‘मुगल-ए-आझम’ चित्रपटातील मधुबालामुळे अनारकलीची प्रतिमा आणि ‘लेजंड’ रुजली त्याचप्रमाणे!)
परंतु त्यापूर्वी आणि त्यानंतरही बरेच चित्रपट प्रकाशित झाले. व्हिव्हियन लीनेही (‘गॉन विथ द विंड’ची नायिका) १९४५ साली क्लिओपात्राची भूमिका केली होती. ती भूमिका करण्यासाठी हॉलीवूडमध्ये अहमहमिका असे आणि आजही आहे. लवकरच आता कोटय़वधी डॉलर्स खर्च करून ‘अॅन्टनी अॅण्ड क्लिओपात्रा’ नव्याने प्रदर्शित होणार आहे आणि त्याबद्दलचे कुतूहल पूर्वीपेक्षाही अधिक आहे.
नेमके याच सुमाराला अलेक्झांड्रियाजवळचे थडगे खणून क्लिओपात्राचा सापळा, तिच्या डोक्याची कवटी इतिहासकारांना सापडलेली असेल. त्यामुळे उत्सुकता अधिकच शिगेला पोहोचलेली असेल. या संशोधकांना तिच्या कवटीबद्दल विशेष कुतूहल आहे.
इंग्लंडमध्ये एक संशोधक-अस्थितज्ज्ञ आहे. त्याची ख्यातीच अशासाठी आहे, की तो त्याला दिल्या गेलेल्या (वा मिळालेल्या) कवटीच्या रचनेचा अभ्यास करून तो त्यावर असलेल्या चेहऱ्याचे (बऱ्यापैकी) हुबेहूब चित्र काढू शकतो. त्याच्या या कौशल्याचा उपयोग इंग्लंडमधील स्कॉटलण्ड यार्ड, तेथील फोरेन्सिक लॅबोरेटरीज् आणि इतर संशोधकही करून घेतात.
काही वर्षांपूर्वी इंग्लंडमध्ये एक विशिष्ट प्रकारच्या गुन्ह्याची ‘लाट’ आली होती. काही व्यक्ती (मुख्यत: तरुण मुली) एकदम गायब व्हायच्या. त्यांचे काय झाले, त्यांनी आत्महत्या केली, की त्यांचा खून झाला, की त्या देश सोडून कुठे निघून गेल्या हे पोलीस खात्याला कळत नसे. या ‘मिसिंग’ मुलींच्या शोधात असताना त्यांना कधीतरी, कुठेतरी एखादी ‘डेड बॉडी’ सापडत असे. बऱ्याच वेळा त्यांचा मृतदेह विस्कटलेला असे, डोक्यावर दगड मारल्यामुळे चेहरा समजत नसे आणि मृतदेह जुना झाल्यामुळे नीट ओळखणेही शक्य नसे.
गुन्हा अन्वेषण खात्याने त्या देहाचे शरीरविच्छेदन करताना, ती कवटी वेगळी करून या अस्थितज्ज्ञाकडे सुपुर्द करायला सुरुवात केली. त्याने त्या कवटीच्या आधारे त्या चेहऱ्याचे चित्र काढल्यानंतर, ते चित्र व हरवलेल्या मुलीचे / व्यक्तीचे चित्र किती मिळते जुळते आहे हे पाहून त्या मृत्यूबद्दल वा खुनाबद्दल खात्री केली जात असे. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संबंधितांशी संपर्क साधून हत्या झालेली व्यक्ती कुठच्या गावची, कोणाच्या परिचयातली, काय करीत असे इत्यादी माहिती मिळाल्यावर त्यानुसार संशयितांची एक यादी बनविली जात असे. त्यापैकी काही संशयित ताब्यात घेतल्यानंतर, त्यांच्यापैकी कुणीतरी कबुली देत असे. परंतु या अस्थितज्ज्ञाचे संशोधन नसते तर ही कबुली मिळू शकली नसती. साहजिकच आता या संशोधनाला बरीच शास्त्रशुद्धता आणि प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे.
मुद्दा हा, की क्लिओपात्राची कवटी सापडल्यानंतर तिचा चेहरा चितारणे आता या विज्ञान-कलेला शक्य होणार आहे. ती कर्तबगार होती, की नव्हती, हे त्या सापळ्यावरून अर्थातच समजणार नाही. त्यासाठी इतिहासाची अन्य साधने वापरली गेली आहेत व जातील.
परंतु त्या ऐतिहासिक व्यक्तीची स्वभावशैली कशी होती हे कसे ठरवायचे? जवळजवळ सर्व इतिहासकार, उपलब्ध दस्तऐवजांच्या आधारे वा कल्पनाशक्तीच्या जोरावर इतिहासातील व्यक्तींचे स्वभाववर्णनही करतात. (म्हणूनच इतिहासकारांना ‘सर्जनशील’ असे संबोधले जात असावे.)
एखादी व्यक्ती एखाद्या प्रसंगी कशी वागते वा वागेल याचे ठोकताळे बांधून त्या ऐतिहासिक व्यक्तीच्या कृतींचा व स्वभावाचा वेध घेण्याची प्रथा आहे. किंबहुना त्याशिवाय निष्कर्षच काढता येत नाहीत. ‘महाभारत’ व ‘रामायण’ हे इतिहास आहेत, की महाकाव्य हा वाद दीर्घकाळ चालू आहे. अयोध्येला वा कुरुक्षेत्रावर थेट पुरावे मिळाले नसले तरी वाङ्मयीन ‘पुराव्यां’च्या आधारे त्या महाकाव्यांना इतिहासाचे स्थान प्राप्त झाले आहे. म्हणूनच रामायणातील व महाभारतातील सर्व जणांचे स्वभाववर्णन, मनोविश्लेषण, वृत्ती-प्रवृत्ती आजही अभ्यासल्या जात असतात.
इतिहास आणि मानसशास्त्र एकमेकांमध्ये इतके घट्टपणे गुंफलेले आहेत, की ते वेगळे करायचा प्रयत्न केला, की दोन्ही अर्थशून्य होतात. ती गुंफण, ती वीण, ते धागे जर नीट समजून घेतले तर आपले ‘सिव्हिलायझेशन’ हे एक ऐतिहासिक, रोमांचकारी नाटय़ होते. थरारनाटय़सुद्धा. त्याचप्रमाणे त्यातील वीण हलकेच सुईस्पर्श करून समजून घेण्याऐवजी, दाभण भोसकल्याप्रमाणे घुसवली तर ती गुंफण विस्कटू लागते. मग वर्तमानात नव्हे तर इतिहासातच अराजक माजते. इतिहासातले अराजक आपल्यावर वर्तमानात येऊन कसे हाहाकार माजवू शकते याची शेकडो उदाहरणे आहेत.
वर्तमानाला इतिहासाने अशा अजगरी विळख्यात अडकवून टाकावे हा ‘सिव्हिलायझेशनल मार्च’ला मिळालेला शाप असावा; पण शाप-उ:शाप जरा दूर ठेवू या.
इतिहासात असलेली मानसशास्त्रीय गुंफण समजून घेताना अभ्यासकाच्या ‘अहं’ची होणारी लुडबुड यामुळे अभिनिवेश आणि गोंधळ होतात. तो ‘अहं’ दूर केला आणि त्या ‘अहं’मधून येणारा गैरसमज काढून टाकला, की इतिहास हे चित्तथरारक काव्य होते. ते काव्य अशा थडग्यांचे उत्खनन करून कदाचित हाती लागणार नाही, पण तरीही क्लिओपात्राचा हा शोध हा मात्र चित्तथरारकच असेल.
कुमार केतकर
No comments:
Post a Comment