चंद्र होता साक्षीला (लोकरंग)


अमेरिकन अंतराळवीर नील आर्मस्ट्राँग व आल्ड्रिन यांनी ४० वर्षांपूर्वी, २० जुलैला चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, तेव्हा वैज्ञानिक सिव्हिलायझेशनचे एक नवे पर्व सुरू झाले, हे खरे. परंतु, अमेरिकेने घेतलेल्या या वैज्ञानिक झेपेला संदर्भ होता रशियाशी असलेल्या स्पर्धेचा आणि शीतयुद्धाचा. किंबहुना, त्या वैज्ञानिक प्रगतीला कायमच शीतयुद्धाचे अस्तर होते. मानवाने प्रत्यक्ष चंद्रावर पाऊल ठेवण्यापूर्वीच्या वैज्ञानिक घडामोडींचे राजकीय संदर्भ समजून घेणे म्हणूनच महत्त्वाचे आहे, म्हणजे पुढील वाटचालीचा अर्थ लागू शकतो. चंद्राच्या शीतलतेला शीतयुद्धाची प्रखरता लाभली त्यामुळे त्या सर्व घडामोडींना ‘चंद्र होता साक्षीला’ असं म्हणता येईल. मानवाने चंद्रावर पाऊल ठेवण्यामागील राजकीय नाटय़ आणि त्यानंतरच्या चार दशकात त्या दिशेने झालेली वैज्ञानिक प्रगती यातून आता चंद्र मानवाच्या साथीलाच आलेला आहे. या सगळ्याचा वेध घेणारे हे दोन लेख!
माणूस चंद्रावर गेला आणि त्यानंतर अवघ्या विश्वाला प्रत्यक्ष गवसणी घालण्याची स्वप्ने पाहू लागला- परंतु याची मूळ प्रेरणा केवळ कुतुहल आणि ज्ञान ही नव्हती, तर १९४९ साली सुरू झालेल्या अण्वस्त्रसिद्ध शीतयुद्धात होती. किंबहुना आजही बहुतेक अवकाशयान प्रकल्प आणि विश्वसंशोधन तशाच प्रेरणांनी प्रवृत्त झालेले आहे.

कित्येकांना, त्यांच्या मानसिक मांद्यामुळे आणि इतिहासाबद्दलच्या बेपर्वाईमुळे, शीतयुद्धाचे असे सर्वंकष संदर्भ अर्थशून्य वा हास्यास्पद वाटतात. काही सत्प्रवृत्त विज्ञानप्रेमींना चंद्रावरची स्वारी हे साहस आणि ज्ञानसाधनेची जिद्द वाटते. ते साहस आणि ती साधना आहेच, पण जर त्यांना शीतयुद्धाचे परिमाण नसते, तर माणूस ४० वर्षांपूर्वी या आठवडय़ात, तो चांद्र-पराक्रम करू शकला नसता.
शीतयुद्धाची तुतारी फुंकल्यानंतर फक्त २० वर्षांंनी माणसाने चंद्रावर पाऊस ठेवावे, यावरून युद्ध आणि विज्ञान या गोष्टी किती घट्टपणे एकत्र विणल्या गेल्या आहेत, हे लक्षात येऊ शकेल.
युद्धाचा आणि विज्ञानाचा (म्हणजे वैज्ञानिक प्रगतीचा, तसेच विनाशकारी संशोधनाचा) घनिष्ठ संबंध अगदी ‘सिव्हिलायझेशन’च्या सुरुवातीपासूनच असला, तरी दुसऱ्या महायुद्धानंतर तो कितीतरी पटींनी अधिक विस्तारत राहिला. राईट बंधूंनी १९०३ साली बनविलेले विमान फक्त १२ सेकंद हवेत राहिले होते आणि ते सुद्धा फक्त काही फूट उंचीवर. त्यांची जिज्ञासा आणि जिद्द पूर्णपणे विज्ञान-तंत्रज्ञानाची होती. परंतु त्यांना अर्थातच तेव्हा कल्पना नव्हती, की काही वर्षांतच त्यांचे वैज्ञानिक यश युद्धासाठी जुंपले जाणार होते. पहिल्या महायुद्धातच (१९१४-१९) ‘वायुदला’चा वापर करून हवेतून शत्रू सैन्यावर गोळीबार करण्यात आला आणि हॅन्ड ग्रेनेड्स व छोटे बॉक्स् फेकण्यात आले, ते विमानाचा शोध लागल्यानंतर १२ वर्षांंनीच.
दुसऱ्या महायुद्धात रीतसर वायुदलेच संघटित केली गेली होती. म्हणजे राईट बंधूंच्या यशस्वी प्रयोगानंतर ३६ वर्षांंनी (१९३९-४५). हवाई प्रवासाच्या संशोधनात जर्मनी, इंग्लंड आणि अमेरिकेने चांगलीच आघाडी मारली होती आणि आता त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली होती, ती अणुशक्ती निर्माण करण्याची आणि रॉकेट निर्मितीची.
दुसरे महायुद्ध अधिकृतपणे संपले ते हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब टाकून ती शहरे बेचिराख केल्यानंतर (६ आणि ९ ऑगस्ट १९४५)! अमेरिकेने त्या अगोदर चार वर्षे अणुसंशोधन आणि अणुविभाजनाच्या प्रयोगांना गुप्तपणे सुरुवात केली होती. प्रकांड प्रज्ञेचे वैज्ञानिक आणि तरबेज तंत्रज्ञ त्या महाप्रकल्पात गुंतलेले होते. जर हिटलरच्या म्हणजे नाझींच्या हातात अणुबॉम्ब आला असता तर त्याच्या जोरावर, संपूर्ण जगावर आपली सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न तेव्हाच्या जर्मनीने केला असता.
परंतु दुसऱ्या महायुद्धात नाझींचे पूर्ण निर्दालन झाले आणि हिटलरला, युद्धाच्या अखेरीस, ३० एप्रिल १९४५ रोजी स्वत:च्या डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करावी लागली. जर्मनीचा पूर्ण पाडाव झाल्यानंतरही जपान शरण न आल्यामुळे अमेरिकेला निर्वाणीचे अस्त्र म्हणजे अणुबॉम्ब वापरावा लागला. तेव्हा फक्त अमेरिकेकडे अणुबॉम्ब होता. परंतु नाझी जर्मनीचा पराभव करण्यासाठी स्टॅलिन, चर्चिल आणि रुझवेल्ट (म्हणजे रशिया, ब्रिटन आणि अमेरिका) एकत्र आले होते आणि त्यामुळे त्यांच्यातील शत्रुत्वाला शीतयुद्धाचे रूप अजून आलेले नव्हते. जरी ‘मित्र’शक्ती म्हणून ते एकत्र आलेले असले तरी त्यांच्या विचारसरणी, त्यांचे राष्ट्रवाद आणि परस्परांबद्दलचे संशय त्या सर्वांच्याच मनात ठसठसत होतेच, म्हणूनच कम्युनिस्ट रशियाने स्वत:चे स्वतंत्र अणुसंशोधन सुरू केले होते. एकटय़ा अमेरिकेकडे अणुबॉम्ब असणे हा रशियाला धोका होता.
त्यानंतर चारच वर्षांंनी, म्हणजे १९४९ साली, रशियाने स्वत:ची अणुस्फोट चाचणी केली आणि लेखाच्या सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे शीतयुद्धाला सुरुवात झाली. त्यातूनच निर्माण झाली अमेरिका आणि रशिया यांच्यातील ‘महासत्ता-स्पर्धा’. त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी- आणि ती जिंकण्यासाठी युद्ध-तंत्र आणि विज्ञानात आघाडी असणे जितके आवश्यक होते, तितकीच आवश्यकता होती ती अधिकाधिक देश आपल्या बाजूने असण्याची. म्हणजेच केवळ रॉकेट्स् वा अणुबॉम्ब जवळ असून आपली अधिसत्ता प्रस्थापित होणार नाही, तर आपल्या गटात कीती लहान-मोठे देश सामील होतात त्यावर त्या शीतयुद्धातील सामथ्र्य ठरणार होते. त्याच वर्षी चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती यशस्वी झाली आणि शीतयुद्धाचे भौगोलिक संदर्भ निश्चित झाले.
आजच्या सर्व जागतिक राजकारणाचे, विज्ञानाचे आणि अगदी साहित्य-संस्कृतीचे संदर्भही १९४९ साली सुरू झालेल्या त्या महासत्ता-संघर्षांशी निगडीत आहेत. चीनमधील क्रांतीच्या पाठोपाठ कम्युनिस्ट उत्तर कोरियाने दक्षिण कोरियात सैन्य पाठविले- अर्थातच रशिया व चीनच्या मदतीने! उत्तर कोरियाची ती लष्करी कारवाई म्हणजे थेट अमेरिकेला आव्हान होते.
आज त्या कोरियन युद्धाची आठवणही पुसट झालेली आहे. परंतु १९५०-१९५३ या तीन वर्षांच्या काळात जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठय़ावर आले होते. म्हणजे दुसरे महायुद्ध संपल्यानंतर आठच वर्षांंनी. उत्तर कोरियाला नामोहरम करण्यासाठी अमेरिका पुन्हा अणुबॉम्ब वापरायच्या विचारात होती. (मधल्या काळात अमेरिकेने हायड्रोजन बॉम्ब बनविण्यातही यश प्राप्त केले होते.. आज उत्तर कोरियाच अण्वस्त्र सज्ज झाला आहे, आणि त्याने अमेरिकेलाच आव्हान दिले आहे. या आव्हानाची मुळे ६० वर्षांंपूर्वीच्या त्या युद्धात आहेत. असो.)
प्रश्न फक्त बॉम्ब बनविण्याच्या क्षमतेचा नसतो. तर तो बॉम्ब क्षेपणास्त्रांवर आरूढ करून अचूक दिशेने सोडण्याच्या तंत्राचा असतो. म्हणजेच रॉकेट तंत्राचा. विमानातून बॉम्ब टाकणे वेगळे आणि सुसज्जक्षेपणास्त्रांनी अवकाश-हल्ला करणे वेगळे. ‘रॉकेट सायन्स’चा विकास मुख्यत: दुसऱ्या महायुद्धाच्या काळात झाला होता. जर्मनीच्या पराभवानंतर तेथील रॉकेट-तज्ज्ञ/वैज्ञानिक हे अमेरिका वा रशियात गेले होते. (म्हणून काही पत्रपंडित कुचेष्टेने तेव्हा म्हणत की दोन्ही देशातील क्षेपणास्त्राचे तंत्रज्ञान मुख्यत: जर्मनच आहे. या विधानात पूर्ण तथ्य नसले तरी काही प्रमाणात ते सत्य होते!)
जर उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर पूर्ण कब्जा प्रस्थापित केला असता तर अमेरिकेने कोरियावरच नव्हे तर चीननरही अणुबॉम्ब टाकला असता. कदाचित रशियावरही. कारण अमेरिकेला धास्ती होती ती कम्युनिझमच्या तेव्हाच्या वाढत्या प्रभावाची. हो चि मिन्ह यांच्या नेतृत्वाखाली कम्युनिस्ट व्हिएतनामने वसाहतवादी फ्रान्सचा दारूण पराभव केल्यामुळे अमेरिकेची ती धास्ती वाढली होती. फक्त अमेरिकेची नव्हे तर संपूर्ण युरोपची ती धास्ती होती. त्यामुळेच त्या शीतयुद्धाला ‘पूर्व विरुद्ध पश्चिम’ असेही रूप प्राप्त झाले होते. सोविएत युनियनने आशिया-आफ्रिका व लॅटिन अमेरिका येथील स्वातंत्र्य लढय़ांना पाठिंबा दिल्यामुळे ‘पूर्व’ अधिक समर्थ झाला होता. पाश्चिमात्यांचा गर्व असा होता की ते ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञान-साहित्य-संस्कृती म्हणजे ‘सिव्हिलायझेशन’च्या दृष्टीकोनातून आशियन-आफ्रिकनांच्या खूप पुढे आहेत. कम्युनिझम हे मागासलेल्या व अप्रगत देशांचे तत्त्वज्ञान आहे असेही या पाश्चिमात्यांना वाटत असे.
१९४९ साली रशियाने केलेल्या अणुस्फोट चाचण्यांमुळे आणि उत्तर कोरियाच्या चढाईमुळे पाश्चिमात्यांच्या त्या गर्वाला तडा गेला होता. जगाची अशी नवी नेपथ्यरचना होत असतानाच रशियाने एक जबरदस्त दणका त्या जागतिक रंगमंचाला दिला. चार ऑक्टोबर १९५७ रोजी कम्युनिस्ट रशियाने १८४ पौंड वजनाचे एक स्पुटनिक-अवकाशयान-अंतराळात पाठविले. तोपर्यंत पृथ्वीच्या कक्षा भेदल्या गेल्या नव्हत्या. विमानाच्या शोधाने हवाई प्रवास शक्य झाला होता. ध्वनीपेक्षा अधिक वेगाने जाणारे ‘जेट’ विमान अस्तित्वात आले होते. रॉकेटचे तंत्रज्ञान विकसित झाले होते, परंतु पृथ्वीची कक्षा भेदून अंतराळात सोडलेला तो पहिला स्पुटनिक होता. जेव्हा ती बातमी अमेरिकन वृत्तपत्रांमध्ये ठळकपणे प्रसिद्ध झाली तेव्हा तेथील राजकारण्यांचे आणि वैज्ञानिकांचे धाबेच दणाणले. (‘न्यूयॉर्क टाइम्स’ने संपूर्ण पानभर फक्त त्याच बातमीची तीन-ओळींची ठसठशीत हेडलाइन दिली- ‘सोविएत युनियनने अंतराळात उपग्रह सोडला.. तो दरताशी १८,००० मैल या वेगाने पृथ्वीप्रदक्षिणा करतो आहे.. अमेरिकेचा सर्व भूप्रदेश आता सोविएतांच्या नजरेत आला आहे..’)
अमेरिकेचे त्यावेळचे अध्यक्ष आयझेनहॉवर यांनी या रशियन आव्हानाला कसे तोंड द्यायचे यावर विचार करण्यासाठी तातडीने कॅबिनेट बैठक बोलावली. वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांचीही लगेच खलबते सुरू झाली. या दणक्यातून युरोप-अमेरिका सावरायच्या आतच रशियाने आणखी एक स्पुटनिक अंतराळात सोडला- तीन नोव्हेंबर १९५७. म्हणजे अक्षरश: महिन्याभराच्या आत. विशेष म्हणजे हा दुसरा स्पुटनिक पहिल्यापेक्षा वजनाने सातपट मोठा होता आणि त्याहूनही सनसनाटी गोष्ट म्हणजे या अवकाशयानात लायका नावाची एक शिकविलेली कुत्रीही होती. त्यानंतर सुमारे २० महिन्यांनी रशियाने तिसरा स्पुटनिक अंतराळात सोडला. त्यात दोन कुत्रे आणि एक ससाही पाठविला होता. दीर्घकाळ पृथ्वीच्या कक्षेबाहेर, गुरुत्त्वाकर्षणहीन स्थितीत राहिल्यावर जीवसृष्टीवर काय काय परिणाम होऊ शकतील याचा अभ्यास करणे त्यामुळे शक्य होणार होते.
अमेरिकेचा सगळा आत्मविश्वास ढासळला तो त्यानंतर म्हणजे १३ सप्टेंबर १९५९ रोजी रशियाने मानवरहित अवकाशयान अचूकपणे चंद्रावर उतरविले तेव्हा. या स्पुटनिक-अंतराळ क्रांतीने अवघे जग स्तिमित झाले होते. ‘मागासलेल्या’ कम्युनिस्ट रशियाची वैज्ञानिक प्रतिष्ठा प्रचंड प्रमाणात वाढली होती. स्वत:च्या वैज्ञानिक प्रगतीच्या व ‘सिव्हिलायझेशन’च्या घमेंडीत असलेल्या अमेरिकेला अंतराळस्पर्धेत रशियाने मागे टाकले होते.
खरे म्हणजे अमेरिकेने रीतसर स्पर्धा सुरू करण्यापूर्वीच रशियाने ‘नॉक आऊट’ विजय संपादन केला होता. वरवर पाहता हे स्पुटनिक म्हणजे एक प्रकारचे वैज्ञानिक प्रयोग होते, परंतु प्रत्यक्षात रॉकेट सायन्स, क्षेपणास्त्रांची झेप व क्षमता, संपूर्ण पृथ्वीवर नजर ठेवू शकेल, अशी उपग्रह-रचित-हेरयंत्रणा अशा अनेक बाबी त्यात अनुस्यूत होत्या.
रशियाने १९४९ साली अणुस्फोट चाचणी केल्यानंतर फक्त १० वर्षांंनी, १९५९ साली, चंद्रावर मानवरहित यान उतरविले होते. अमेरिकेचा ‘स्पेस प्रोग्रॅम’ तर तेव्हा अगदीच प्राथमिक अवस्थेत होते. त्यांनी बनविलेले बहुतेक उपग्रह अंतराळात जायच्या आतच पडत होते, तुटत होते, फसत होते. अध्यक्ष आयझेनहॉवर यांना तर अंतराळस्पर्धाच व्यर्थ वाटू लागली होती. विजीगिषू वृत्तीच्या अमेरिकन माणसाला रशियन आघाडीमुळे न्यूनगंड वाटू लागला होता. पहिला अणुबॉम्ब बनविणाऱ्या आणि विज्ञानाची ध्वजा तोपर्यंत आपल्याच हातात ठेवणाऱ्या अमेरिकेला हा धक्का प्रचंड होता. या दणक्यांमुळे शीतयुद्धातील सत्ता समतोलाचे गणित पूर्ण बदलून गेले. इंग्लंड-अमेरिकेतील (मुख्यत: अर्थातच अमेरिकेतील) युद्धतज्ज्ञ व मुत्सद्यांच्या एकापाठोपाठ एक बैठका सुरू झाल्या. तिसरे महायुद्ध सुरू झालेच तर त्यात रशिया पूर्णपणे वरचढ असू शकेल, असे सर्व अमेरिकनांना वाटू लागले. आपल्याकडे अणुबॉम्ब व हायड्रोजन बॉम्ब असूनही, उपग्रह व क्षेपणास्त्रे- एकूणच रॉकेट सायन्स यात आपण निष्प्रभ ठरलो आहोत, असे अमेरिकनांचे मत झाले. रशिया अर्थातच अमेरिकेवर हल्ला करील या भीतीने मोक्याच्या व महत्त्वाच्या ठिकाणी भूमीगत संरक्षणसिद्ध अशा आधुनिक ‘गुहा’ बांधण्याचा कार्यक्रम हाती घेतला गेला. आकस्मिक क्षेपणास्त्र हल्ला वा बॉम्ब हल्ला झाल्यास जनतेने काय काय करावे, याचे प्रशिक्षण वर्ग घेतले जाऊ लागले. भुयारी रेल्वेचे प्लॅटफॉम्र्स तशा आणीबाणीत कसे वापरायचे यावर रेडिओ-वृत्तपत्रात चर्चा होऊ लागल्या. (टीव्ही तेव्हा तितका सर्वव्यापी नव्हता.) ही सर्व बचावात्मक पावले उचलली जात असतानाच रशियाचे आव्हान शिंगावर घ्यायचा विचारही आकार घेऊ लागला. या पाश्र्वभूमीवर १९६० साली अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुका झाल्या. आयझेनहॉवर हे त्यांची आठ वर्षांंची कारकीर्द संपवून निवृत्त होणार होते. त्यांचे उपाध्यक्ष रिचर्ड निक्सन आणि डेमोक्रॅटिक पक्षाचे जॉन केनेडी यांच्यात अटीतटीची निवडणूक झाली. केनेडी निवडून आले ते याच आश्वासनावर, की अमेरिका आता रशियाच्या आव्हानाला यशस्वीपणे तोंड देईल.
सूत्रे हाती घेतल्याबरोबर १९६१ साली जॉन केनेडी यांनी सविस्तर योजना व वेळापत्रकच जाहीर केले- दशक संपायच्या आत म्हणजे १९७० च्या आत अमेरिकेचा माणूस चंद्रावर उतरील. याच काळात अमेरिकेची अण्वस्त्र व क्षेपणास्त्र सज्जताही वाढविली जाईल. एकूणच शिक्षणपद्धतीत आवश्यक ते बदल करून विज्ञान-तंत्रज्ञानावर विशेष भर देण्यात येईल. युद्धासाठी लागणारी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, विमाने, कम्युनिकेशन सिस्टिम्स, नौदल, अण्वस्त्रधारी पाणबुडय़ा, कॉम्प्युटर्स, रोबोज्, स्वयंसिद्ध क्षेपणास्त्रे आदी गोष्टींवर संशोधन व त्यांची मोठय़ा प्रमाणावर निर्मिती सुरू झाली.
चंद्रावर उतरून तेथे राहायची मानसिक, शारिरीक, वैज्ञानिक तयारी असलेले चांद्रवीर तयार करण्याचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला. हा व्यापक अंतराळ प्रकल्प यशस्वी करण्यासाठी जागतिक स्तरावर प्रयोगशाळा आणि कम्युनिकेशन सिस्टिम्स् सिद्ध केल्या गेल्या. या अजस्त्र आणि आक्राळविकाळ यंत्रणेसाठी अब्जावधी डॉलर्स खर्च होणार होते. ते नववसाहतवादी धोरणातून, बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गडगंज नफ्यांमधून, शस्त्रास्त्रांच्या विक्रीतून मिळवायचे ठरले. त्यातूनच अमेरिकेचा नव-साम्राज्यवाद आणि नवी युद्धनीती निर्माण झाली. या सर्व जगड््व्याळ ‘मिलीटरी-इंडस्ट्रीयल कॉम्लेक्स’साठी खनिज तेलाची प्रचंड गरज निर्माण झाली. त्यातूनच अरब देशातील लष्करी व राजकीय हस्तक्षेपाला सुरुवात झाली. जगातील बहुतेक देशांमधील ऊर्जास्त्रोत आणि नैसर्गिक साधनसंपत्तीवर कब्जा करायला अमेरिकेने सुरुवात केली.
आज जगातील अशांततेला, युद्धाला, विनाशकारी शस्त्रास्त्रनिर्मितीला नव्याने सुरुवात झाली ती तेव्हापासून. परंतु त्या युद्धनीतीच्या परिणामी खुद्द अमेरिकेत अस्वस्थता वाटू लागली. अजस्त्र युद्धयंत्रणा अजूनही व्हिएतनाम-कंबोडिया ते अफगाणिस्तान-इराक कुठेच विजय संपादन करता न आल्याने त्या भस्मासुरी अर्थव्यवस्थेचा हात अमेरिकेच्याच डोक्यावर आला.
आज बराक हुसेन ओबामांच्या खांद्यावर त्या शीतयुद्धाचे ओझे आहे. ४० वर्षांपूर्वी २० जुलै १९६९ रोजी मानव चंद्रावर उतरून एक नवे वैज्ञानिक-सिव्हिलायझेशनचे पर्व सुरू झाले खरे, पण गेल्या ४० वर्षांतील शीतयुद्धाने आपले सर्वांचे जीवन पूर्ण वेढले गेले!
कुमार केतकर

No comments:

Post a Comment