सुख पाहता जवापाडे। दु:ख पर्वताएवढे।।


ज्याप्रमाणे वेदनेचे मोजमाप वा कोष्टक नाही, त्याचप्रमाणे ‘बरे वाटण्याचे’ही मोजमाप नाही. अतिशय तीव्र शारिरीक वा मानसिक वेदनांमधून वा दु:खातून बाहेर आलेली व्यक्ती डॉक्टरला वा निकटवर्तीयांना सांगते की ‘आता बरे वाटते आहे’, तेव्हा नक्की किती बरे आहे हे कुणीच सांगू शकत नाही. मागे म्हटल्याप्रमाणे बी.पी., शुगर वा कोलेस्ट्रॉल यांचे अंकगणित व कोष्टक पक्के आहे, तसे वेदनेचे वा बरे वाटण्याचे नाही.
कित्येकांना त्यांच्या विश्वासाचा (श्रध्देचा!) डॉक्टर नुसता जवळ आला, तरी लगेच बरे वाटू लागते. डॉक्टरांनी वा (आई, वडील, पत्नी, प्रेयसी- कुणीही प्रिय व्यक्ती) अशा कुणी डोक्यावर हात ठेवला, जवळ घेतले तरी वेदना कमी होते, दु:खाचा आवेग आटोक्यात येतो, मन ‘हलके’ होते! अर्थातच या कशाचेच वैद्यकीय मोजमाप नाही. विशेष म्हणजे शारीरिक वा मानसिक दु:ख, वेदना वा अस्वस्थता असलेल्या व्यक्तीला पैसे, ऐश्वर्य, सत्ता अशा गोष्टी त्या स्थितीतून मुक्त करू शकत नाही. कितीही श्रीमंती, प्रचंड सत्ता वा अधिकार असलेली व्यक्ती असो, ती व्याधिग्रस्त झाली की सर्व सुखे हरपतात. म्हणूनच सर्व संतमंडळी आणि स्वयंसिध्द अध्यात्मवादी त्या सुखाच्या ‘भ्रमा’तून, म्हणजे ‘मायाजालातून’ मुक्त व्हायचे आवाहन करीत असतात! परंतु त्यांच्या दृष्टिकोनातून ‘इहलोक’ म्हणजे माया!

एका प्रसिध्द चिनी लेखकाने म्हटले आहे की, ज्या देशाला (सुखाचे) अर्थशास्त्र साध्य होत नाही तो (दु:खाचे वा दारिद्रय़ाचे) अध्यात्मशास्त्र सांगू लागतो ! (Those who do not have successful economy, often advocate spiritual philosophy!) या निरूपणातील वास्तववादी छद्मीपणा बाजूला केला की अनेक (अध्यात्मसदृश) प्रश्न निर्माण होतात. पण ते प्रश्न खरे तर आध्यात्मिक नव्हेत. इहलोक ही माया आहे असे म्हटले तर जन्म, मृत्यू, सुख वा दु:ख हे सर्व मायावत् होईल, मग सगळेच प्रश्न कायमचे सुटतील. म्हणून या ठिकाणी इहलोक हेच वास्तव आणि आधिभौतिक सत्य म्हणून गृहीत धरले आहे.
‘बरे वाटणे’ म्हणजे काय? ‘सुख’ म्हणजे काय? आनंद, उत्साह, हर्ष, भोग, विलास, समाधान अशा अनेक संज्ञा आहेत. त्या अर्थातच समानार्थी नाहीत. प्लेझर, जॉय, डिलाइट, वेलनेस, हॅपीनेस या इंग्रजीतील संज्ञाही समानार्थी नाहीत. ‘हेडॉनिझम’ या नावाने तर भोगाचे तत्वज्ञान व अर्थशास्त्रच सांगितले जाते. परंतु ‘प्लेझर’ आणि ‘हॅपीनेस’ या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे ‘सुख’ आणि ‘समाधान’ या अर्थ-अन्वयार्थाने भिन्न आहेत, हे तर अगदी बटरड्र रसेलही सांगतात. रसेल हे अध्यात्म, मेटाफिजिक्स, पॅरा-सायकॉलॉजी, तंत्र-मंत्र यासारख्या मंबो-जंबो गोष्टींच्या पूर्णपणे विरोधात आहेत. इहवाद, विज्ञान आणि गणित यांचे प्रगल्भ, उत्क्रांतिवादी आणि समाजकल्याणवादी तत्वज्ञान सांगणाऱ्या रसेल यांनीही ‘सुख’ व ‘समाधान’ यात प्रचंड मोठा फरक असल्याचे म्हटले आहे.
वस्तुत: ही तर आपल्या दैनंदिन अनुभवाची / गप्पा चर्चाची गोष्ट आहे. ‘तो / ती अगदी सुखात वा ऐश्वर्यात लोळत आहे, पण ‘समाधानी’ नाही!’ किंवा ‘इतकी सत्ता आहे, नोकरचाकर आहेत, गाडय़ा-बंगले आहेत, देखणा पती वा सुंदर पत्नी आहे - पण ही व्यक्ती कायम असमाधानी का असत?’ असे संवाद आपल्या कानावर पडत असतात. परंतु ते ‘श्रीमंतां’बद्दलचे उद्गार झाले. स्वत:ला ‘मध्यमवर्गीय-मध्यममार्गी’ मानणारे, दोन वा तीन ‘बी.एच.के’, चांगली नोकरी आणि सुखी- चौकोनी कुटुंब असणारेही नाखूष असल्याचे आपण पाहतो आणि आश्चर्य व्यक्त करतो. त्या अनुभवातूनच नव्या संकल्पना व व्याख्या प्रचलित होऊ लागल्या. ‘सुख’ हे मुख्यत: इंद्रियांचे आणि ‘समाधान’ हे मनाचे. `Wealth, estate, gold-diamond, power, sex, food and drink, fame etc. give pleasure but not necessarily happinessl - अशा अर्थाची मांडणी होऊ लागली. (एखादा हातगाडीवाला, दिवसभराच्या श्रमानंतर, त्याच गाडीवर निवांतपणे झोपू शकतो. पण तसे समाधान आलिशान गादीवर झोपणाऱ्या श्रीमंत माणसालाही प्राप्त होत नाही.) परंतु या ‘तत्वज्ञाना’चे उदात्तीकरण होत होत पुढे गरिबीचेच गौरवशास्त्र बनू लागले आणि ‘ठेविले अनंते तैसेचि रहावे ! चित्ती असू द्यावे समाधान!’ असे अध्यात्मदर्शन दिले जाऊ लागले. त्यामुळे संदर्भातील मानसशास्त्र व तत्वचिंतन, त्याचप्रमाणे न्युरॉलॉजिकल संशोधन नजरेआड होऊ लागले.
ज्याप्रमाणे शरीर व मन या द्वैताचा (Body-Mind Duality) किंवा त्यात अनुस्यूत असलेल्या अद्वैताचा शास्त्रीय शोध सुरू आहे त्याचप्रमाणे ‘सुख’ व ‘वेदना’ (Pleasure-Pain Principle) या दुहेरी तत्त्वातील एकत्वाचाही शोध न्युरॉलॉजिस्टस् घेत आहेत.
डेव्हिड बॉरसूक हे हार्वर्ड मेडिकल स्कूल या ख्यातनाम अमेरिकन संस्थेत रेडिऑलॉजी आणि न्युरॉलॉजीचे प्राध्यापक संशोधक आहेत. ते बरीच वर्षे ‘वेदने’चा अभ्यास करीत आहेत. ‘पेनकिलर’ गोळ्या वा इंजेक्शन्स, क्लोरोफॉर्म, अ‍ॅनॅस्थेशिया आदी गोष्टींमुळे वेदनांचा संदेश मेंदू व अन्यत्र पोहचविला जात नाही आणि म्हणून त्या जाणवत नाहीत. परंतु म्हणून ‘पेन’ म्हणजे वेदना नाहीशा होत नाहीत, तर थोपविल्या जातात. शस्त्रक्रिया वा तत्सम उपचार करताना शरीर वा काही भाग बधिर करणे वेगळे आणि शरीर पूर्णपणे वेदनारहित करणे वेगळे. तसे वेदनारहित शरीर म्हणजे संवेदनारहित शरीर. मग अचेतन आणि सचेतन यात तरी काय फरक राहिला? मृत शरीराला संवेदना नाहीत म्हणून वेदनाही नाहीत. (सतीश आळेकर यांच्या ‘महानिर्वाण’ या अफलातून नाटकात मृत देहालाही ताटीवर करकचून बांधल्याच्या वेदना होतात, आपल्याला चितेवर (किंवा विजेवर चालणाऱ्या दहनयंत्रात) जाळून टाकणार, या कल्पनेने तो मृतदेह भयभीत होतो. आपण जळल्यावर आपल्या चाळीतील लोक तसेच ‘मजा’ करीत राहणार या जाणिवेने त्या जिवंत माणसांचा त्याला हेवा वाटतो, एकूणच आपण मेलो आहोत हे त्याला अजिबात आवडत नाही कारण त्यामुळे सर्व शारीर सुखांपासून आपण आता कायमचे वंचित झालो आहोत, असे त्याच्या लक्षात येते.)
तर डेव्हिड बॉरसूक या अमेरिकन रेडिऑलॉजिस्ट-न्युरॉलॉजिस्टच्या संशोधनानुसार सुख व वेदना या दोन्ही परस्परविरोधी संवेदना मेंदूच्या एकाच केंद्रात नोंदविल्या व प्रोसेस केल्या जातात. त्यांच्या मते शारिरीक सुख-संवेदना आणि वेदना या एकाच ‘मेंटल सर्किट’ मधून जातात. सुख-संवेदना काहीशी अधिक वेगाने ते सर्किट ‘पार’ करते इतकेच. सुख-संवेदना आणि वेदना या मेंदूच्या एकाच केंद्रात ‘रजिस्टर’ होत असल्याचा आणखी काही पुरावा काही मानसशास्त्रज्ञही देतात. काही माणसे जीवनातील दु:खद घटना, एखाद्याने केलेला अपमान, प्रतारणा, प्रेमभंग, जवळच्या माणसाच्या मृत्यूमुळे झालेला शोक, ‘जखमा उरातल्या’ इतक्या जपतात व वारंवार आठवून गोंजारतात की त्यातच त्यांना (विचित्र प्रकारचे) सुख लाभते. आत्मक्लेशातही (मॅझॉकिझम) दु:ख असते- मग ते दीर्घ उपोषणातले असो वा कडकलक्ष्मीने स्वत:च्याच शरीरावर केलेल्या फटक्यांच्या आघातांचे असो.
आपण आपल्या तत्त्वासाठी, देशासाठी, धर्मासाठी, प्रेमासाठी, परंपरेसाठी, खानदानासाठी, स्वाभिमानासाठी.. आपले प्राणही द्यायला तयार आहोत, असे आवेगाने सांगणाऱ्या एका अनुयायाला त्याचा चिनी गुरू सांगतो, ‘जीवन कवडीमोल व अर्थशून्य आहे हे खरे, पण तू जिवंतच नसशील तर तुझ्या ‘नसण्या’ला तरी काय किंमत आहे? कारण मृत्यूही तितकाच अर्थशून्य आणि कवडीमोलापेक्षाही कमी किंमतीचा आहे. शिवाय हे जीवन तुला एकदाच मिळाले आहे, तेच संपवून, तुला जे साध्य करायचे आहे ते तू कसे करणार?’ त्यावर तो अनुयायी गुरूला विचारतो, ‘पण गुरूजी, असे मरणाला बिचकणे, आपल्या ध्येयासाठी तो अंतिम त्याग करण्यापासून पळून जाणे हे भेकडपणाचे, स्वार्थाचे आणि संधीसाधूपणाचे नव्हे काय?’ तेव्हा गुरूजी म्हणतात, ‘मी ‘पळून जा’ असे म्हटलेले नाही, ‘शरण जा’ असेही म्हटलेले नाही, ‘लढू नकोस’ असेही मी सांगत नाही. कारण आपण सर्वचजण मरणार आहोत.. मी फक्त इतकेच सांगतोय की तुझे जगणे, हे जीवन कितीही कवडीमोल, अर्थशून्य असले तरी त्या मृत्यूचा अवास्तव सन्मान करू नकोस. जर सन्मानाने जगलास तर सन्मानानेच मरशील!’- हा संवाद कितीही गोल गोल चालू शकतो. कारण मरणाबद्दलचे प्रश्न फक्त जिवंत माणसालाच पडतात. (‘महानिर्वाण’ नाटकामधील अवस्था म्हणजे जिवंत माणसाचे एक रूपकच!)
खरे म्हणजे, मरायला साधारणपणे कुणी तयार नसते. ‘यशस्वी’ आत्महत्या करणाऱ्याला त्याच्या मृत्यूनंतर कुणी विचारले की ‘आता कसं वाटतंय?’ तर बहुधा तो/ती असेच म्हणेल की, ‘मरून मूर्खपणाच केला!’ जगातील बहुतेक‘सुइसाइड प्रिव्हेन्शन सेंटर्स’ किंवा आत्महत्येपासून परावृत्त करू पाहणाऱ्या केंद्रांमध्ये साधारणपणे जीवनाबद्दल उमेद, आशा, उत्साह निर्माण करण्याचे प्रयत्न होतात.
विन्स्टन चर्चिल ७५ वर्षांचे झाले तेव्हा त्यांच्यापेक्षा वयाने ज्येष्ठ असलेल्या एका व्यक्तीने त्यांना छद्मीपणाने म्हटले, की ‘असा वृद्धापकाळ आल्यावर कुणाला वयाची नव्वदी ओलांडावीशी वाटेल?’ त्यावर चर्चिल म्हणाले, की ‘ज्यांना ८९ वर्षे पूर्ण झाली आहेत त्या सर्वाना ९० च्या पुढेही जगायला आवडेल.’
जीवन-मृत्यूविषयक मानसशास्त्रीय संशोधन करणाऱ्या जवळजवळ सर्व संस्थांनी आता मुख्यत: एकच निष्कर्ष काढला आहे. तो हा की, काही अत्यल्प अपवाद वगळता सर्वाना जितके जगता येईल तितके जगायचे आहे.
त्यांना भीती आहे, पण ती मरणाची नाही, तर वेदनेची, वार्धक्याची, दु:खाची, परावलंबित्वाची, अपंगत्वाची, असहाय्यतेची. म्हणूनच ऑस्कर वाइल्डच्या ‘द पिक्चर ऑफ डोरियन ग्रे’ या कादंबरीतील तरुणाला, म्हणजेच डोरियन ग्रे याला चिरंतन देखणे, आकर्षक तारुण्य हवे आहे आणि महाभारतातील ययातीने तर आपले वृध्दत्व टाळण्यासाठी आपल्या मुलाचेच तारुण्य मागितले आहे. डोरियन ग्रे आणि ययाती दोघेही सुखाच्या मागे धावता धावता समाधान मात्र गमावून बसत आहेत!
कुमार केतकर

1 comment:

  1. सर,किती छान विश्लेषन केले आहे.आज माझा दिवस चांगला आहे म्हणून हे वाचायला मिळालं.धन्यवाद !

    ReplyDelete