विस्मरणात खरोखर जग जगते!

सगळे लोक काही ना काही विसरत असतात. चष्मा, किल्ल्या, पैसे, पास, पाकीट, मोबाईल. शिवाय गॅस बंद करायला, नळ बंद करायला, दिवे विझवायला, पंखा बंद करायला विसरणे हेही तसे बऱ्यापैकी सार्वत्रिक आहे. त्याचप्रमाणे फोन नंबर्स, एखाद्याचे नाव वा चेहरा, पत्ता, रस्ता आणि तारीख, अपॉइंटमेंटची वेळ वा जागा हे कधी ना कधी आपण विसरतोच. एखाद्या लेखकाचे वा कवीचे नाव, पुस्तकाचे, चित्रपटाचे, नाटकाचे नाव अगदी ओठावर असते; पण आठवत नाही. काही अगदी हुशार मुलांनासुद्धा परीक्षेचा पेपर सोडविताना डोळ्यासमोर उत्तर येते, पण ते आठवत नाही. एखाद्या गाण्याची ओळ, चाल मनात येते, पण ओठात-जिभेवर येण्याइतकी आठवत नाही. कधी अगदी तरबेज नटसुद्धा एकदम स्टेजवरच नाटकातला संवाद विसरतो. विसरण्याचे प्रकार इतके आहेत, की त्यांची नोंदही करता येणे अशक्य आहे. या विसरण्याच्या प्रकारामुळे काही माणसे भ्रमिष्टही होतात. म्हणजे व्यवस्थित कुलूप लावून बाहेर पडल्यानंतरही त्यांना आपण कुलूप लावल्याची, आत नळ, दिवे, गॅस बंद केल्याची खात्री नसते. काहीजण परत जाऊन सर्व गोष्टी नीट बंद केल्याची खात्री करून घेतात. दरवाजे-खिडक्या पुन: पुन्हा खेचून घेतात. आपण विसरणार, याची जणू खात्रीच त्यांना असते!

आपण असे का विसरतो? आणि मग एकदम, अचानक एखादी विसरलेली गोष्ट आपल्याला का व कशी आठवते? काही अगदी लहानपणच्या गोष्टी सविस्तर आठवतात; आणि काल-परवा भेटलेल्या माणसाचे नाव आठवत नाही. स्मरण आणि विस्मरण हे आज सर्व न्यूरॉलॉजिस्ट आणि मानसशास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून गूढ आहे. ते जितके उलगडू लागले आहे, तितकेच अधिक गहिरे आणि अधिकच अगम्य होऊ लागले आहे.
परंतु एका गोष्टीबाबत सर्व वैज्ञानिकांचे एकमत आहे. ‘विस्मरण’ ही निसर्गाने माणसाला दिलेली एक विलक्षण देणगी आहे- अगदी तितकीच, जितक्या प्रमाणात ‘स्मरण’ ही देणगी आहे! नुसती कल्पना करा, की जीवनातला प्रत्येक क्षण आपल्याला अगदी स्वच्छपणे आठवतो आहे! अक्षरश: वेड लागायची पाळी येईल.
जिल प्राईस ही कॅलिफोर्नियातील एक तरुण मुलगी आहे. तिला हा ‘पूर्णस्मरण रोग’ झाला होता. तिला लहानपणापासूनचा प्रत्येक दिवस आठवत असे. अगदी सर्व काही. घरातल्या वस्तू, आई, वडील, नातेवाईक, शेजारीपाजारी, बरोबरची मुले-मुली, त्यांचे नाव-पत्ते, फोन नंबर, त्यांचे वाढदिवस. हे ठीक आहे; पण तिला शाळेतला प्रत्येक पेपर, त्यातील प्रश्न, तिने दिलेली उत्तरे, टी. व्ही.च्या सर्व बातम्या, वाचलेले प्रत्येक पुस्तक, तिच्या समोरून गेलेल्या मोटारी, त्यांचे नंबर, सगळे रंग, सगळे गंध, सर्व गाणी, कविता, इतकेच काय-सर्व धडेसुद्धा! ती काही विसरूच शकत नसे. सुरुवातीला या विलक्षण स्मरणकुशलतेचे कौतुक घरात व शाळेत होत असे. वर्गातल्या इतर विद्यार्थ्यांनाच काय, शिक्षकांनासुद्धा अचंबा आणि कौतुक व कुतूहल वाटत असे. परंतु जसजशी ती मुलगी मोठी होऊ लागली, तसतसे तिचे डोके या स्मरणशक्तीमुळे भणभणू लागले. तिची भूक हरपली. झोप लागेना. ती १४ वर्षांची झाली तेव्हा आई-वडिलांना, तिच्या ढासळत्या प्रकृतीकडे पाहून चिंता वाटू लागली. त्यांच्या फॅमिली डॉक्टरने त्यांना एका बडय़ा मेंदूतज्ज्ञाकडे नेले. तेव्हा या रोगाचे नाव दिले गेले ‘हायपरथेस्मिया सिन्ड्रोम’. तिच्या मेंदूतील ‘मेमरी बॉक्स’ म्हणजे ‘स्मृती-कप्पा’ तपासला गेला. परंतु न्यूरोसायंटिस्ट आणि सर्जन यांना कळेना, की नक्की कशावर शस्त्रक्रिया करायची? भीती ही होती, की त्या स्मृती-कप्प्यातील चुकीच्या ठिकाणी शस्त्रक्रिया झाली तर पूर्ण ‘मेमरी क्रॅश’ होऊन जाईल! कॉम्प्युटरमधील ‘हार्ड डिस्क’ क्रॅश होऊन सर्व डेटा नाहीसा होतो त्याप्रमाणे ती मुलगी पूर्णत: स्मृती गमावून बसेल.
डॉक्टरांनी सुरुवातीला एक मार्ग शोधून काढला. तो हा, की तिच्या स्मृतींमध्ये भर घालणाऱ्या कोणत्याही गोष्टी तिच्यासमोर आणायच्या नाहीत. तिने टी. व्ही. पाहायचा नाही, विरंगुळा म्हणून पुस्तके वाचायची नाहीत. एक-दोन डॉक्टर्स, एक-दोन नर्सेस आणि आई-वडील यांच्याव्यतिरिक्त कुणाला भेटून आपल्या स्मृती-कप्प्यात नवीन भर घालायची नाही. हे सर्व ठीक झाले; पण जुन्या, लहानपणापासूनच्या गोष्टी तिला आठवत असल्यामुळे, तिचे डोके भणभणत होतेच.
मग ती मुलगी हीच एक संशोधनाची प्रयोगशाळा झाली. तिला त्या ‘पूर्णस्मरण रोगा’पासून मुक्त करण्यासाठी जे प्रयोग सुरू झाले त्यांच्या आधारे त्या संशोधक-न्यूरॉलॉजिस्टांनी एक पुस्तक लिहिले. त्या पुस्तकाचे नाव आहे-‘द वुमन हू काण्ट फर्गेट’-विस्मरणच हरवलेली स्त्री! त्या न्यूरो-सायकिअ‍ॅट्रिस्टस् संशोधकांनी मग चौकशी सुरू केली, की असे रुग्ण किती असतील? मग अफाट स्मरणशक्ती असलेली सुमारे दोनशे माणसे त्यांनी आपल्या ‘प्रयोगा’त सामील करून घेतली. पण त्यांना लक्षात आले, की अशी पूर्ण-स्मरण व्याधी झालेली व्यक्ती पाच-दहा लाखांत एकच असावी. कारण ज्या अफाट स्मरणशक्तीवाल्या व्यक्तींना त्यांनी प्रयोगशाळेत आणले होते, त्यांची ‘विस्मरण शक्ती’ही अफाट होती. याचा अर्थ हा, की त्यांचा मेंदू काय आठवायचे आणि काय विसरायचे, याचे प्रोसेसिंग उत्तम करू शकत असे. निर्थक, निरुपयोगी, अनावश्यक गोष्टी विसरण्याची शक्ती त्यांच्याकडे होती. त्यांच्या विस्मरण-सापेक्षतेमुळेच त्यांच्या स्मरणशक्तीचे महत्त्व प्रचंड वाढले होते. त्यापैकी काही गणिती होते, काही वकील होते, काही प्राध्यापक होते आणि त्यांची ख्याती अतिशय बुद्धिमान व कर्तबगार अशी होती. म्हणजेच बौद्धिकता व अशी कर्तबगारी ही स्मरण-सामर्थ्यांवर नाही, तर विस्मरण-झपाटय़ावरही अवलंबून होती, हे सिद्ध होत होते.
पण हे ‘मेमरी’ प्रकरण मानसशास्त्रज्ञांना अधिकच सतावू लागले आहे. कॉम्प्युटर्स आणि ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ यासंबंधात सुरू असलेले संशोधन नवीन-नवीन प्रश्न उपस्थित करू लागले आहे. अनेक मानसिक रोग किंवा मानसिक अस्वस्थता, मनातील प्रक्षोभ, विक्षिप्त व अतार्किक वागणे, लोन्लीनेस किंवा एकटेपणा वाटणे, अनामिक भीती वाटणे, बुजरेपणा, न्यूनगंड, एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या उपस्थितीमुळेही ‘मूड ऑफ’ होणे, एखादा माणूस पहिल्या ओळखीतच अजिबात न आवडणे, ‘डेटिंग’ला भेटलेल्या मुलाबद्दल वा मुलीबद्दल काही अवधीतच ‘निगेटिव्ह’ प्रतिमा निर्माण होणे- या व इतर अनेक गोष्टी ‘मेमरी बॉक्स डिफेक्टस्’ किंवा ‘न्यूरल सर्किट डिसऑर्डर’मुळे होतात, असे संशोधकांना वाटू लागले.
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या प्रतिष्ठित आणि अमेरिकन अर्थ-साम्राज्याच्या मुखंड मानल्या जाणाऱ्या दैनिकात मेलिंडा बेक नावाची स्तंभलेखिका आहे. ती वाचकांना विविध प्रकारच्या मनो-शारीरिक अस्वस्थतेविषयी सल्ला देते, मार्गदर्शन करते आणि अगदी अलीकडे चालू असलेले संशोधनही सांगते. तिने तर एक सिद्धांतच मांडला आहे : ‘लक्षात ठेवा- की बऱ्याच गोष्टी लक्षात न ठेवणेच हिताचे आहे!’ हे वरवर विरोधाभास असलेले विधान समजावून सांगताना ती म्हणते, की सध्याच्या वेगवान, स्पर्धेच्या आणि यशाच्या मागे लागलेल्या जगात स्मरणशक्तीला अवास्तव महत्त्व दिले गेले आहे आणि विसरभोळ्या, विसराळू माणसांची टिंगलही केली जाते आहे. परंतु विस्मरणाचे सामथ्र्य ओळखले तरच ‘आत्मिक’ बळ प्राप्त होईल. शरीर व मन सुदृढ राहायचे असेल तर ‘विसरायला शिकले पाहिजे!’
‘वॉल स्ट्रीट जर्नल’ हे वृत्तपत्र मुख्यत: ‘मार्केट-फ्रेंडली’ अशा कॉर्पोरेट जगात वाचले जाते. याच वर्गात सध्या ‘स्ट्रेस’ या व्याधीबद्दल सर्वात जास्त चर्चा असते. हा ‘स्ट्रेस’ ऊर्फ तणाव मुख्यत: अनाठायी (वा न झेपणारी) महत्त्वाकांक्षा, जिद्द, हेवा, सूड आणि अलीकडे फॅशनेबल झालेली ‘किलर इन्स्टिंक्ट’ आणि कॉम्पिटिशन यामुळे तयार होतो. संघर्ष आणि स्पर्धा यात फरक आहे. संघर्ष फक्त स्पर्धेतच असतो असे नाही. एखादी कूट समस्या सोडविण्याचा प्रयत्न करणे, न सुटणारे गणित सोडविणे, प्रतिकूल निसर्गाशी सामना देणे, आजारपणाला सामोरे जाणे, कुटुंबातील वा समाजातील प्रश्न व तणाव दूर करण्याचा प्रयत्न करणे. इतकेच काय-चित्रकला, संगीत, साहित्यसाधना हाही एक सर्जनशील संघर्षच असतो. तो कुणाविरुद्ध नसतो वा कुणाबरोबरच्या स्पर्धेमुळेही नसतो. तो संघर्ष आपल्याला आत्मिक बळ देतो. अशा संघर्षांसाठी अचाट स्मरणशक्तीची नव्हे तर ‘नेमक्या’ स्मरणशक्तीची गरज असते. परंतु नेमकी उपयुक्त, आवश्यक स्मरणशक्ती म्हणजे काय? काही माणसांना शेकडो फोन नंबर्स, (अगदी मोठमोठे मोबाईल वा इंटरनॅशनल नंबर्ससुद्धा), अनेकांचे वाढदिवस, कित्येक घटना- तारखांनिशी, शेकडो वा हजारो गाणी, त्यांच्या चाली, नाटकांमधले संवाद, लंबीचवडी स्वगते अगदी व्यवस्थित आठवतात. काहींना क्रिकेटचे बहुतेक सामने, त्यातील विक्रम, कोणी किती धावा काढल्या, किती विकेट घेतल्या, कोण कुणाविरुद्ध, कुठे, केव्हा खेळले, हे सर्व आठवते; तर काहींना अर्थसंकल्पीय आकडेवारी, बँकांचे व्यवहार, जमाखर्च, विविध वस्तूंच्या उत्पादनाचे आकडे, चलनवाढीचे बदलते दर, सोन्या-चांदीचे भाव अगदी हा हा म्हणता आठवतात. बहुतेक ड्रायव्हर्सना एखाद्या ठिकाणी एकदा गेले तरी पत्ता कायमचा लक्षात राहतो. काहींना इतिहासातल्या, राजकारणातल्या गोष्टी नेमक्या लक्षात असतात, तर काहीजणांना गणितातील सूत्रे, पद्धती वा अगदी किमानपक्षी पाढे (औटकी-दीडकीपर्यंतचेही) मुखोद्गत असत. कॅलक्युलेटर आल्यावर पाढे वा व्यावहारिक अंकगणित कालबाह्य होऊ लागले. मोबाईल फोनमधली नंबर्सची डिरेक्टरी आल्यावर फोन नंबर पाठ असणे वा वेगळ्या वहीत लिहिणेही अनावश्यक झाले. सेक्रेटरी असलेल्यांना बऱ्याचदा अ‍ॅपॉइण्टमेंट लक्षात ठेवणे कमी गरजेचे झाले. कॉम्प्युटर व इंटरनेट आल्यावर संदर्भ डोक्यात ठेवण्याऐवजी संगणकाच्या ‘हार्ड-डिस्क’वर आणि विषयवार उपलब्ध असलेल्या ‘गुगल’वर ते मिळू लागले.
कॉम्प्युटर, मोबाईल (विशेषत: ब्लॅकबेरी) म्हणजे मेंदूच्या ‘मेमरी बॉक्स’मधील काही भाग बाहेर ‘काढून’ ठेवणे आणि गरज लागेल तेव्हा वापरणे! त्यामुळे ‘अनावश्यक’ व ‘निरुपयोगी’ (म्हणजे ज्या गोष्टी सारख्या-सारख्या आठवायची गरज नाही अशा) बाबी वेगळ्या स्टोअर करून ठेवल्या, की अधिक उपयुक्त व सर्जनशील गोष्टींसाठी ‘मेमरी बॉक्स’ मोकळा राहू शकेल, असे मानले जाते. परंतु वस्तुस्थिती वेगळीच दिसते. अधिक मोकळा झालेला ‘मेमरी बॉक्स’ उपयुक्त वा चांगल्या गोष्टींसाठीच वापरला जातो असे नाही. शिवाय सर्व माणसांच्या स्मृतींचा ‘पॅटर्न’ किंवा त्यांच्या आठवणींचे स्वरूप एकाच प्रकारचे नसते.
बहुतेक मेंदू-तज्ज्ञांना वाटते, की ज्या आठवणी तीव्र वेदना देणाऱ्या असतात त्या विस्मृतीत टाकण्याची संज्ञाप्रणाली किंवा ‘प्रोग्राम’ मेंदूत असतो. बहुतेक (नॉर्मल!) माणसे त्यांचे कौटुंबिक, सामाजिक, व्यावसायिक व्यवहार व्यवस्थित करू शकतात, कारण वेदनामय गोष्टी क्षीण होत जातात वा ‘जंक’ केल्या जातात. त्या ‘जंक’ म्हणजेच रद्दीत अनावश्यक गोष्टीही टाकल्या जात असतात. ही प्रक्रिया सतत चालू असते. अगदी झोपेतसुद्धा. काहींच्या मते विचित्र, अर्थशून्य, संदर्भहीन स्वप्ने म्हणजे ‘डिलिट’ करून जंक करण्याची प्रक्रियाच असते.
काही मनोविश्लेषणतज्ज्ञांना अर्थातच हे ‘हायपोथिसिस’ मान्य नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही गोष्ट पूर्ण विस्मृतीत जात नाही. ती त्याच ‘मेमरी बॉक्स’मधल्या वेगवेगळ्या (अडगळीच्या!) कोपऱ्यांमध्ये जाऊन बसते. आपण घर आवरायला घेतले, किंवा बराच काळ न आवरलेले कपाट पुन्हा लावायला घेतले, की जशा दीर्घकाळ अडगळीत गेलेल्या वस्तू सापडतात, वा ज्या ‘कायम’च्या हरवल्या गेल्या होत्या, त्या मिळतात, तसेच स्मृतींचे आहे. प्रत्येक माणसाला कुठच्या ना कुठच्या निमित्ताने ही विस्मृतीचित्रे आठवतातच. कधी रेडिओवर ऐकू येणाऱ्या गाण्याच्या स्वरांवर वा शब्दांवर आरूढ होऊन माणूस कित्येक वर्षे मागे जातो. अगदी लहानपणी पाहिलेला चित्रपट, मैत्रिणीबरोबर (वा मित्राबरोबर) व्यतीत केलेली संध्याकाळ, कॉलेजमधले दिवस, त्या वेळच्या भावना, प्रसंग, त्यावेळची माणसे, विरह, प्रेमभंग- अगदी तीव्र वेदनाही पुन्हा ठसठसू लागतात. आकस्मिकपणे डोळ्यात अश्रू येणे वा कधी कधी भीती वाटणे, छातीत धडधडणे असे काहीही त्या स्वरांमधून निर्माण झालेल्या संज्ञाप्रवाहामुळे होऊ शकते.
या मनोविश्लेषणवाद्यांच्या मते अंतर्मनाच्या कोपऱ्यात ठसलेल्या, दडलेल्या वा दडपलेल्या आठवणींना जर मोकळेपणाने वाट करून दिली नाही तर विविध प्रकारचे मनोविकार होऊ शकतात. त्यामुळे ‘विस्मरण’ होण्याची देणगी माणसाला लाभलेली असली तरी कोणती स्मृतीचित्रे जपायची आणि कोणती अडगळीत टाकायची याचे स्वातंत्र्य माणसाला नसते.
स्मृती-कप्प्यांमध्ये झालेली साठवण वेगवेगळ्या माध्यमांतून झालेली असते. वर म्हटल्याप्रमाणे एखाद्या स्वररचनेवर वा गाण्यावर स्वार होऊन माणूस भूतकाळात जातो, त्याचप्रमाणे एखादा सुगंध वा एखाद्या पदार्थाची चव, एखादा स्पर्श वा एखादे दृश्यही माणसाला स्मृतीसंग्रह पूर्णपणे हलवून टाकू शकतो. इंद्रियांच्या माध्यमातून जमा केलेला असा प्रचंड स्मृतीसंग्रह आणि विचारांच्या/चिंतनाच्या आधारे केलेला स्मृतीसंग्रह हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. एखाद्या माणसाचा चेहरा पाहून, तशाच दिसणाऱ्या माणसाच्या आपल्या आयुष्यातील आठवणी कल्लोळ करू शकतात आणि एखादा गणिती वा वैज्ञानिक एखाद्या सिद्धांताचे सूत पकडून भूत आणि भविष्यकाळाचा द्रष्टेपणाने वेध घेऊ शकतात. एखादा ‘नॉट-टॅलजिया’त म्हणजे स्मरणरंजनात स्वत:ला विसरून जातो तर एखादी व्यक्ती भूतकाळच हरवून बसते. सुमारे सहा महिन्यांपूर्वी याच स्तंभात ‘एचएम’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या माणसाचा भूतकाळच कसा हरवला आणि त्या ‘विस्मृती चित्रां’नी त्याचे जीवन आणि मन कसे अधांतरी झाले. हे लिहिले होते. विस्मरण-स्मरणाच्या हिंदोळ्यावर आपण सर्वचजण तसे अधांतरी आहोत.
कुमार केतकर

No comments:

Post a Comment