अर्थपूर्ण भासे मजला प्रश्न जीवनाचा..

अर्थपूर्ण भासे मजला प्रश्न जीवनाचा..

आपल्याला सर्वानाच सतत कसले ना कसले प्रश्न पडत असतात. इतके प्रश्न आणि इतक्या प्रकारचे. आपण सारखे ते प्रश्न सोडविण्याच्याच मागे असतो. काही तात्कालिक तर काही तात्त्विक! काही नैतिक तर काही भौतिक! काही आपणच निर्माण केलेले प्रश्न तर काही परिस्थितीने लादलेले! नळाला दोन दिवस पाणी येणार नाही. काय करायचे? टी. व्ही. बंद पडलाय, केबलवाल्यांचा संप आहे, वीज जाऊन तीन तास झाले आहेत, घरात मेणबत्ती आहे पण सापडत नाही.. गाडय़ा बंद आहेत, अपॉइण्टमेण्ट १० वाजताची आहे, पोहोचणे शक्य नाही; येथपासून पुढच्या आठवडय़ात परदेशी जायचे आहे, पण अजून पासपोर्ट नाही, किंवा पासपोर्ट आहे पण व्हिसा नाही, दोन्ही आहे पण एअरलाइन्स ‘फुल’ आहेत.. असे विविध प्रकारचे तात्कालिक प्रश्न. ते सोडवावेच लागतात- नाहीतर सोडून द्यावे लागतात!
कधी कधी तात्कालिक प्रश्न इतका कल्लोळ करतात, की त्यातून एकदम तात्विक प्रश्न तयार होतात. काय करायचे आहे परदेशी जाऊन? आगरकरांना अभ्यास करायला कुठे विजेचे दिवे होते? नाही बघितला टी. व्ही. चार दिवस तर काय बिघडले? आपल्या लहानपणी कुठे होता टी. व्ही.? आई-वडिलांच्या लहानपणी तर त्यांच्याकडे रेडिओ पण नव्हता. उगीच आपण आपल्या ‘नस्त्या’ गरजा वाढवून ठेवल्या आहेत.. जीवन अगदी साधे, कमीत कमी गरजांचे, विरक्त असले पाहिजे. नाहीतरी या जीवनाला अर्थ काय? हेतू काय?
सर्व माणसे अशी तात्कालीक आणि तात्त्विक प्रश्नांच्या झोक्यांवर सतत फिरत असतात. या कल्लोळात असतानाच मधूनच कुठच्या तरी प्रश्नांच्या संज्ञाप्रवाहात माणसे घुसतात आणि एकदम मूलभूत नैतिकतेच्या प्रश्नांमध्ये अडकतात. आपण ‘तसे’ वागायला नको होते, आपण पैसे घ्यायला (वा द्यायला) नको होते, आपण मित्रांशी / मैत्रिणींशी, घरातल्यांशी, शेजाऱ्यांशी असे फटकून राहणे योग्य नाही, ‘परस्त्री’ वा ‘परपुरुषा’विषयी आपल्या मनात ‘तसले’ विचार का आले. आपण चांगले वागले पाहिजे, आपले चारित्र्य शुद्ध असले पाहिजे, कुणीही आपल्याबद्दल ‘ब्र’ ही काढता नये.. वगैरे वगैरे.

बहुतेक नैतिकतेच्या प्रश्नांना भौतिकतेचे प्रश्न असा छेद देतात, की निमिषार्धात नैतिकता कोसळते, भौतिकता जिंकते! ‘अमुक माणसाला दोनशे रुपये दे आणि दिवसभरात पासपोर्ट घरी येईल. उगीच जीवाला ताप करून घेऊ नकोस!’ किंवा ‘तमुक व्यक्तीला भेट- नोकरी / प्रमोशन / ट्रान्स्फर नक्की. आता तुझी ती गरज आहे- उगीच फालतू नैतिकतेचा आव आणून ‘मी कुणाला भेटणार नाही- वशिला लावणार नाही,’ असे म्हणत बसशील तर नोकरी / प्रमोशन इ. हातातून जाईल! किंवा ‘वेटिंग लिस्ट नंबर ११४ आहे- डोण्ट वरी. सरळ स्लिपर कोचमध्ये जा. टीसीला पटव. होऊन जाईल.’
प्रत्येक माणसाला अशा भौतिक-नैतिक प्रश्नांतून जावेच लागते. काही मंडळी त्याला ‘प्रारब्ध’ म्हणतात. काही मंडळी या वा इतर प्रश्नांकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहतात. जीवशास्त्राचा आणि मानववंशशास्त्राचा अभ्यास करणाऱ्यांच्या मते यातील काही भौतिक प्रश्न प्राण्यांना वा कीडा-मुंग्यांनाही पडतात पण त्यांना ‘नैतिकते’चे प्रश्न भेडसावत नाहीत. हरिणाची शिकार केल्यानंतर वाघाला ‘गिल्टी’ वाटत नाही. भूक लागल्यानंतर शिकार करणे आणि तहान लागल्यानंतर पाण्याच्या शोधात फिरणे हे निसर्गदत्त शारीरिक तर्कशास्त्रानुसार घडते. म्हणजेच सर्व प्राणिमात्र तर्काचा वापर करतातच. मुंगी असो वा मांजर, ससा असो वा कासव, मासा असो वा हत्ती- सर्व प्राणिमात्रांना ‘उदरनिर्वाहा’साठी जिवंत राहण्यासाठी व पुनरुत्पादनासाठी तर्कशास्त्राचा, अनुभवाने आलेल्या ‘शहाणपणाचा’ आणि त्यानुसार संभाव्य धोक्यांचा विचार करावाच लागतो; पण त्यात जसे काही ‘तात्त्विक’ वगैरे नसते, तसेच ‘नैतिक’ही नसते. त्यांच्या कृतीला (एका मर्यादेबाहेर) भूतकाळ व भविष्यकाळाचे परिमाण नसल्यामुळे, प्राण्यांचे प्रश्नविश्व मर्यादित असते. त्यांचे बहुतेक प्रश्न त्या दृष्टीने तात्कालीक स्वरूपाचेच असतात; परंतु त्यांचे संवेदना-विश्व, अनुभवपट त्यांचा ‘लर्निग पॅटर्न’ (उदा. त्या त्या जातीचे पक्षी त्यांच्याच पद्धतीचे घरटे बांधायला कसे शिकतात वा मुंग्यांना वारुळ बांधण्याचे तंत्रज्ञान कोण शिकविते?) जीवशास्त्रातील या सर्व ‘कॉम्प्लेक्स सिस्टिम्स’ आहेत. म्हणजे प्रत्येक किडा-मुंगी-प्राणी-पक्षी-मासे यांचे स्वत:चे असे एक ‘कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर’ आहे- गुंतागुंतीची पण व्यवस्थित चालणारी शरीरयंत्रणा आहे.
शिवाय ज्या पृथ्वीवर विविध वनस्पती आणि ही सर्व जीवसृष्टी आहे त्या पृथ्वीचे, तसेच जीवसृष्टीला जन्म देणारे जे वातावरण आहे त्या वातावरणाचे आणि या सर्व प्राणिमात्रांच्या/ निसर्गाच्या परस्परावलंबित्वाचे एक अजस्त्र असे ‘कॉम्प्लेक्स युनिव्हर्स’ आहे. त्यातील सर्व जीवमात्रांना सतत प्रश्न पडत असतात आणि ते सर्व जीव जन्माला आल्यापासून ते प्रश्न सारखे सोडवित असतात. म्हणजेच गुंतागुंतीच्या त्यांच्या शरीररचनेचे व्यवहार काही निश्चित सूत्रांनुसार चालतात. गुंतागुंतीच्या त्या गणिताला ‘मॅथेमॅटिक्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी’ असे म्हणतात. जगप्रसिद्ध मानववंश शास्त्रज्ञ डेस्मॉन्ड मॉरिस (द ह्यूमन झू, द नेकेड एप, पीपल वॉचिंग अशा अनेक ग्रंथांचे संशोधन, लेखन करणारा लेखक) याने आपल्या ‘बेबी वॉचिंग’ या निरीक्षण शोधग्रंथात म्हटले आहे, की लहान मूल जन्माला आल्यापासून सतत विविध प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न करीत असते. समोरचे खेळणे कसे उचलायचे यापासून ते भूक लागल्यावर आईचे (वा आजूबाजूच्यांचे) रडून-ओरडून लक्ष कसे वेधून घ्यायचे अशा प्रश्नांना काही दिवसांच्या मुलाला तोंड द्यावे लागते.
लहान मुलांच्या मनाच्या, संवेदनांच्या, मेंदूच्या ‘कॉम्प्लेक्स सिस्टिम्स’वर संशोधन चालू असतानाच आता याबद्दलही चिंतन चालू आहे, की ‘नैतिकते’चे प्रश्न (जे फक्त माणूस प्राण्यालाच पडतात) ते माणसाच्या संवेदनयंत्रणेत कधी व कसे शिरतात? बरोबर काय आणि चूक काय, योग्य काय- अयोग्य काय, उचित काय- अनुचित काय याचे भान माणसाला कधी येऊ लागते? व कसे? इतर प्राणिमात्रातही त्यांची एक नैसर्गिक नियमावली असते. ते प्राणी ती नियमावली मोडत नाहीत. उदाहरणार्थ, हत्ती वा घोडा वा गाय वा असेच बरेच प्राणी हे शाकाहारी आहेत. वाघ, सिंह वगैरे मांसाहारी; पण त्यातही धर्म-जात-नियम-संकेत वा नैतिकतेचा मुद्दा नाही. ते त्यांचे शरीररचनेचे निसर्गदत्त ‘नियम’ आहेत. ते नियम समजून घेण्यासाठी ‘कॉम्प्लेक्स’ रचनांचा अभ्यास करावा लागतो. इतर प्राणिमात्रांना ‘सामाजिक’ वा ‘राजकीय’ प्रश्न नसतात. त्यांना जग बदलायचे नसते! सुधारायचे नसते. नुसते (मजेत!) जगायचे असते. खरे म्हणजे त्या जगण्याला ते प्राणी मजा असे संबोधतच नाहीत. ते तसे कशालाच काहीही संबोधत नाहीत. त्यांना जसे नैतिक-अनैतिकतेचे प्रश्न पडत नाहीत, तसेच एखादी गोष्ट सुंदर आहे वा विद्रुप आहे, हेही माणसाप्रमाणे कळत नाही. त्यामुळे ते सूर्योदयाने मोहरून जात नाहीत, सूर्यास्ताने खिन्न होत नाहीत. (पण त्यांच्या सकाळच्या आणि संध्याकाळच्या शरीरसंवेदनांमध्ये फरक मात्र पडतो. सकाळचा उत्साह आणि संध्याकाळचा थकवा जाणवतो परंतु ज्या अर्थाने ‘मानसिक’दृष्टय़ा माणूस खिन्न होतो, उदास, अस्वस्थ, विषण्ण होतो त्या अर्थाने नव्हे.) पण ‘मनाच्या’ कोणत्याच स्थितीत त्यांना कविता कराविशी वाटत नाही वा चित्र काढावेसे वाटत नाही. कोणकोणत्या प्राण्यांना कोणकोणते रंग दिसतात आणि कोणते रंग त्यांच्या डोळ्यात भरतच नाहीत यावर संशोधन चालू आहेच.
ते कळपात वा थव्यांमध्ये वावरत असले तरी त्याला आपण ‘समाज’ म्हणून संबोधू शकत नाही- जरी सामाजिक नियमावली ते पाळतात. मुंग्या रांग सोडत नाहीत, हत्ती कळप सोडत नाही, वाघीण बछडय़ांना सोडून जात नाही, पक्षीण अंडय़ांना पूर्ण संरक्षण देते वगैरे वगैरे. त्यांचा ‘समाज’च नसल्यामुळे समाजकार्याचाही प्रश्न नाही! न्यायाची संकल्पना नसल्यामुळे अन्यायाचा प्रश्न नाही. ‘सृष्टी-समष्टी’ हेच त्यांचे विश्व- जे समजून घ्यायचे असेल तर र्सवकष ‘कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर’ समजायला हवे. माणसाला मात्र स्वत:च्या पलीकडचेही प्रश्न असतात. तेही तितकेच महत्त्वाचे आणि तातडीचेही असतात. ते दैनंदिन जीवनात व्यग्र असणाऱ्या सर्वानाच पडतात असे नाही; पण ते प्रश्नही सर्वाच्या अंगावर येऊन कोसळत असतात.. या वाढत्या झोपडपट्टय़ांचे काय करायचे? या गर्दीचे / लोंढय़ांचे काय उत्तर आहे? याउलट त्या झोपडपट्टीत वा फुटपाथवर राहणाऱ्याला प्रश्न असतो.. इतका पाऊस पडतो आहे, आज कुठे झोपायचे? उद्या कुठे / कसे जेवायचे? त्यातूनच मग मोठे राजकीय प्रश्न निर्माण होतात- ही गरिबी, ही विषमता कशी दूर करायची? अन्याय, भ्रष्टाचार कसा संपवायचा? मग त्यातून अधिक सखोल असे राजकीय प्रश्न उभे राहतात- हे राजकारण, दादागिरी- सत्ताबाजीतून कसे सोडवायचे? राजकारणाचे गुन्हेगारीकरण आणि सत्ता-संपत्तीचा दर्प कसा दूर करायचा? वगैरे.
विचारवंतांना व वैज्ञानिकांना किंवा सामाजिक-सांस्कृतिक भाष्यकारांना तर त्याही पलीकडचे प्रश्न पडतात. राष्ट्रीय एकात्मता कशी साधायची? जागतिकीकरणाला कसे तोंड द्यायचे? ‘ग्लोबल वॉर्मिग’चा धोका कसा टाळायचा? युद्ध व दहशतवादाच्या छायेत असलेले जग शांततेकडे कसे आणायचे? किंवा तात्विक पातळीवर या विश्वाचा जन्म कसा झाला? जीवसृष्टीचे रहस्य काय? भविष्यातले जग कसे असेल? या कूट प्रश्नांपलीकडे समाजकारण व संस्कृतीकारण करणाऱ्यांना चिंता असते ती सांस्कृतिक ऱ्हासाची, सार्वत्रिक निर्बुद्धतेची आणि सामाजिक / मानसिक मागासलेपणाची. त्यांना स्वत:ला व समाजाला प्रगल्भ करायचे असते. अबब! आणि विशेष म्हणजे सर्व सुजाण माणसांना हे सगळे प्रश्न ‘एकाच वेळेस’ पडत असतात. म्हणजे विश्वजन्माच्या गूढाचे अप्रूप असलेल्याला घरातल्या नळाचे पाणी गेले आहे याची चिडचिड असतेच आणि त्याचेही पोट वा डोके दुखून तो तत्त्वज्ञ / वैज्ञानिकही वैतागतोच! युद्ध वा दहशतवादाच्या विरोधातील ‘स्ट्रॅटेजी’ ठरविणाऱ्या परराष्ट्र सचिवाला वा लष्करी अधिकाऱ्यालाही प्रमोशन हवे असते, कौटुंबिक कटकटी (लग्न, घटस्फोट, प्रेम प्रकरणे इ.) आणि अगदी रस्त्यावरचे ‘ट्रॅफिक जॅम्स’ यांना तोंड द्यायचेच असते.
म्हणजे प्रत्येक माणसाच्या मनात असंख्य प्रश्नांचे एक अजस्त्र चक्र सतत फिरत असते. जीवन आधुनिक झाल्यावर प्रश्न वाढले, की ते आधुनिक नसताना अधिक अडचणी होत्या हे सांगता येणार नाही. ज्यांना नळाचे पाणी मिळत नाही त्यांना विहिरीतून पाणी आणावे लागते. ज्यांना शिक्षणाची सोयही नाही त्यांना अंधारलेल्या अशिक्षिततेत जीवन कंठावे लागते. दीड-दोनशे वर्षांपूर्वी आपले खापर-ढापर- पणजोबा वा पणजी कसे दिवस काढत असतील याची कल्पना जरी केली (अर्थात आजही जगात दीड-दोनशे कोटी लोक त्याच स्थितीत आहेत!) तरी आपण त्या समस्यांपेक्षा आधुनिक समस्या बऱ्या असे म्हणू! म्हणजे टी.व्ही.च नसण्यापेक्षा केबलवाल्यांचा संप परवडला. (परंतु धारावीतील व अन्यत्र असलेले ‘स्लमडॉग्ज’ त्याहीपेक्षा वेगळा विचार करतील!)
प्रश्नांचा हा अथांग कल्लोळ, जितकी माणसे तितक्या प्रमाणात वाढत असतो. कारण जितकी माणसे तितकी मने. तितक्या शारीरिक गरजा. प्रत्येक शरीर स्वतंत्र आणि मन तर त्याहून स्वतंत्र व अचपळ.
काही प्रश्न ‘शॉर्टलिस्ट’ करता येतात. ट्रॅफिकचे नियम करता येतात. ते मोडणाऱ्यांना दंड करता येतो. रस्ते, पूल व इमारती बांधण्याचे शास्त्र निर्माण करता येते. नागरिकांसाठी नियमावली करता येते. अगदी मुंग्यांइतके नाही तरी बऱ्यापैकी शिस्तीने वागता येते. ऊन-पावसापासून रक्षण करण्याची व्यवस्था करता येते. (वादळ, पूर, भूकंप, ज्वालामुखी इ. नैसर्गिक अपघात वगळून- पण त्यासाठीही आपत्कालीन योजना आखता येतात.) म्हणजेच प्रचंड गोंधळ-गुंतागुंत-कल्लोळ आणि त्यामुळे अर्थशून्य भासणाऱ्या परिस्थितीला आटोक्यात ठेवता येते. (There Can be order into chaos and there can be Simplicity in comprehending complexity)
तर सृष्टी-समष्टी आणि मानसिक-बौद्धिक गुंतागुंतीचा अभ्यास करणारी ज्ञानशाखा म्हणजे ‘सायन्स अ‍ॅण्ड मॅथेमॅटिक्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी!’ साधारणपणे ३०-३५ वर्षांपूर्वी या शाखेचा शास्त्रशुद्ध विकास होऊ लागला. त्या अगोदर अशा अनेक थिअरीज् किंवा हायपोथिसिस मांडण्याचे प्रयत्न झाले होते. केऑस थिअरी, कॅटॅस्ट्रोफी थिअरी, फझिलॅजिक वगैरे गणित-पदार्थविज्ञान शाखेच्या आधारे सृष्टी-समष्टीचा अर्थ लावण्याचे प्रयत्न झाले होते. या प्रयत्नांना ‘पोस्ट मॉडर्न सायन्स’ म्हणून ओळखले जाऊ लागले असले तरी या नव्या सिद्धांताद्वारे विश्वरचनेचे/ जीवसृष्टीचे/ मनोरचनेचे/ कॉन्शियसनेसचे गूढ उलगडता येईल असेच गणितींना व वैज्ञानिकांना वाटू लागले.
बहुतेक गणितींची अशी पक्की धारणा आहे, की विश्वचक्र चालविणारे प्रमेय/ सूत्र सापडले, की सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली. पूर्वी पदार्थवैज्ञानिकांना अशी खात्री असे. त्याहीपूर्वी तर्कशास्त्रज्ञ असे मानत, की ‘लॉजिक’ हेच गूढ उकलण्याचे मुख्य माध्यम आहे. त्यांच्या दृष्टिकोनातून एखाद्या गुन्ह्याचा छडा लावणे आणि विश्वाच्या गुढाचा शोध लावणे- हे दोन्ही एकाच पद्धतीत बसते. निदान शेरलॉक होम्सची तशी धारणा होती. भारतात काहींना वाटते श्रद्धा, नामस्मरण, एकाग्र चिंतन ही विश्वरहस्य उकलण्याची माध्यमे आहेत. गेल्या काही वर्षांत ‘थिअरी ऑफ एव्हरीथिंग’ची ज्ञान-लाट (फॅड!) आली आहे.
‘थिअरी अ‍ॅण्ड मॅथ्स ऑफ कॉम्प्लेक्सिटी’ ही अशीच एक आभासपूर्ण ज्ञान-लाट आहे, की सृष्टी-समष्टी-मन-कॉन्शियसनेस समजून घेण्यासाठी सापडलेले नवे साधन? पुन्हा प्रश्न आहेच!
कुमार केतकर

No comments:

Post a Comment