हाताची नाडी ‘मोजता’ येते. छातीचे ठोकेही. धाप लागणे, दम लागणे म्हणजेच श्वासोच्छवासाचा वेगही मोजता येतो. सुदृढ माणूस किती वेळ, किती धावू शकतो, पन्नाशी वा साठीतली व्यक्ती किती मजले चढू शकते, कुणी किती व्यायाम करावा आणि किती दमछाक करू नये याचेही कोष्टक आहे. आता फोफावलेल्या ‘जिम कल्चर’मध्ये तर त्याचे शास्त्रशुद्ध मापन होते- अगदी मिनिट टू मिनिट आणि नंबर्सच्या परिभाषेत.
ब्लडप्रेशर किती आहे, ब्लडशुगर किती आहे, किती असायला हवे, त्याचप्रमाणे कोलेस्ट्रॉल-एचडीएल/ एलडीएलचा ‘काऊंट’ किती आहे, युरिन वा स्टुलमध्ये कोणते घटक किती आहेत, असे अनेक संदर्भ असलेले, बऱ्यापैकी निश्चित स्वरूपाचे रिपोर्टस् उपलब्ध असतात. डॉक्टर बदलला, हॉस्पिटल बदलले तरी हा ‘डेटा’ जवळ असेल तर उपचार अधिक नेमकेपणाने सुचविता येतो.
या गोष्टी जेव्हा मोजता येत नव्हत्या, योग्य-अयोग्य मापन ठरविता येत नव्हते, ‘धोक्या’च्या सीमारेषा कळत नव्हत्या, हृदयात किती ‘ब्लॉक्स’ आहेत आणि ते केव्हा व कसा दगा देऊ शकतील हे सांगता येत नव्हते, तेव्हा उपचारपद्धती खूपच अंदाजपंचे चालत असे. डॉक्टरचा अनुभव आणि त्याचा/तिचा रुग्णाशी असलेला परिचय व त्यामुळे माहीत असलेली पेशंटची (व कुटुंबाचीही) ‘हिस्टरी’ म्हणजेच पारंपरिक/आनुवंशिक माहिती हाच तेव्हा ‘डेटाबेस’ असे. ‘फॅमिली डॉक्टर’ ही पद्धती मुख्यत: त्या काळातली. पूर्वीची ग्रामीण व शेतीआधारित समाजरचना जाऊन शहरे वसू लागली, तसतसे सामाजिक संबंध बदलू लागले. पूर्वीची शहरे (म्हणजे उद्योग-संस्कृतीपूर्व) आजच्यासारखी मोठी व अफाट नसली
तरी त्यांचाही व्याप खेडय़ांपेक्षा मोठाच असे. मात्र तेव्हा शहरांमध्येही ‘फॅमिली डॉक्टर’ ही संख्या होतीच. ग्रामीण भागातला वैद्य वा वैदू वा अगदी मांत्रिक-तांत्रिकही कुटुंबाला ओळखत असे. पुढे पुढे हे ‘डॉक्टर-पेशंट’ नाते एक प्रकारे व्यक्ती/कुटुंबनिरपेक्ष म्हणजे ‘इम्पर्सनल’ होत गेले. ते संबंध ज्या वेगाने व्यक्तीनिरपेक्ष होत गेले, तसतसे प्रकृतीच्या मोजमापनाचे तंत्र झपाटय़ाने विकसित होत गेले. माझ्याकडे जर माझ्या प्रकृतीचा-बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल इ.- यथास्थित रिपोर्ट असेल आणि त्यात नेमकी आकडेवारी असेल तर डॉक्टर वा हॉस्पिटल कुठचेही असले तरी निदान व उपचार अधिक शास्त्रशुद्धपणे करणे शक्य होऊ लागले. आता तर या सर्व शारीरिक-प्राकृतिक ‘डेटाबेस’चे महत्त्व इतके वाढले आहे की, अनेकदा फोनवरतीच ती आकडेवारी ऐकून डॉक्टर संबंधित रुग्णाला काय करायचे ते सांगू शकतात. म्हणजेच माणसाच्या प्राकृतिक स्वास्थ्यासाठी मोजता येईल अशा घटकांची नोंद व नेमके मोजमाप असायला हवे. परंतु शारीरिक स्वास्थ्य मोजण्याचे जसे कोष्टक आहे तसे मानसिक स्वास्थ्य मोजण्याचे कोष्टक तितके विकसित झालेले नाही.
ब्रेन मॅपिंग, एमआरआय, छातीचे ठोके, नाडी अशा अनेक बाबी तपासून मानसिक अस्वास्थ्याबद्दल आडाखे बांधता येत असले तरी तितकी स्पष्ट कोष्टके मनोरुग्णांबद्दलची उपलब्ध होत नाहीत. अर्थातच संशोधन चालू आहे आणि तेसुद्धा याच गृहितकावर की- मनोविकारांचे बहुतेकसे निकष शरीरातच- मुख्यत: मेंदूतच सापडतील. दिवसेंदिवस शारीरिक आणि मानसिक आजार यातील ‘सिम्बियॉटिक रिलेशनशिप’ किंवा गुंतागुंतीचे नाते भेदणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे. शारीरिक आजारांचे ठोकताळे जितके स्पष्ट आहेत तितके मानसिक आजारांचे नाहीत. इंजेक्शन, गोळ्या, औषधांचे डोस, व्यायाम, आहार, विश्रांती इ. गोष्टींची मदत घेऊन शारीरिक आजार आटोक्यात आणता येतो- बराही करता येतो, पण तुलनेने मनोरुग्णांना उपचार देणे (वा रोगाचे निदान करणे) अधिक कठीण व जिकीरीचेही असते.
खरे म्हणजे शारीरिक स्तरावरचे निकषही नक्की किती पक्केपणाने सांगता येतात, याबद्दलही संशोधक आणि खुद्द डॉक्टरांमध्ये मतभेद आहेत. या मतभेदांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे तो वेदना मोजण्याचा. रक्ताचा दाब, रक्तातील साखर, छातीचे ठोके इत्यादी गोष्टी मोजून वेदनेची तीव्रता आकडय़ात मांडता येत नाही. एखादी व्यक्ती जेव्हा म्हणते की, ‘माझे डोक दुखते आहे’ तेव्हा प्रश्न विचारला जातो, ‘किती दुखतंय?’ मग ती/तो सांगतो की, ‘अगदी असह्य होतंय’ किंवा ‘सारखं ठणकतंय’ किंवा ‘मधून मधून कमी दुखतं आणि पुन्हा जोरात ठणकू लागतं’ किंवा ‘रात्रभर दुखत होतं आणि झोपच लागली नाही आणि सकाळी केव्हा डुलकी लागली ते कळलंच नाही, पण जाग आल्यावर पुन्हा ठणका सुरू झाला.’ वगैरे वगैरे.
तीच गोष्ट पोट दुखण्याची, पाय दुखण्याची, पाठ दुखण्याची, अवघे शरीर ठणकण्याची. परंतु किती दुखते आहे याचे, सर्वाना लागू पडेल असे मोजमाप नाही. एखाद्याला इंजेक्शनची सुई दिसली की घाबरायला होते तर दुसरा एखादा अगदी दीर्घ इंजेक्शन दंडात वा मांडीत अगदी निर्विकारपणे घेतो. अगदी लहान मुलांमध्येही काही बालके इंजेक्शनचे नाव काढले वा सुई दिसली तरी भोकांड पसरतात तर काही लहान मुले बिनबोभाट, न रडता-ओरडता इंजेक्शन टोचून घेतात. वेदना ही व्यक्तिसापेक्ष असेल तर ती मोजणे अधिकच कठीण होणार. बाकी डेटाबेस मिळेल पण वेदनेचा डेटाबेस मिळणार नाही.
परंतु ‘वेदने’ची इतकी विविध रूपे, इतके प्रकार, इतकी कारणे आहेत की त्या सर्वावर एकच उपाय वा उपचार देणे शक्य झालेले नाही. कारण वेदना फक्त शारीरिकच नसते तर मानसिकही असते. किंबहुना मानसिक वेदनेचा शरीरावरही प्रतिकूल परिणाम होतो. फक्त शरीरावरच नव्हे तर स्वभावावरही.
प्रेमभंग, प्रतारणा, अपेक्षाभंग, विश्वासघात, वियोग आत्मविश्वास-न्यूनता, पराभव, एकटेपण, असहायता, अनिश्चितता अशा कितीतरी मानसिक स्थितींमधून अनेकांना जावे लागते. त्या वेदना शारीरिक नसतात. परंतु त्यामुळे बीपी, शुगर वाढू शकते, निद्रानाशाचा विकार होऊ शकतो. डोकेदुखी, पोटदुखी इतकेच काय हृदयविकारही होऊ शकतो. ‘स्ट्रेस’ हा तर सध्या सर्व मनो-शारिरीक विकारांसाठी परवलीचा शब्द झाला आहे. योगापासून विपश्यनेपर्यंत आणि नामस्मरण-भक्तीपासून ते टी-एम् (ट्रान्सेन्डेटल मेडिटेशन) अशा अनेक गोष्टी उपाय-उपचार म्हणून सुचविल्या जातात. कारण या प्रकारच्या मानसिक वेदनांवर बहुतेकसे शारीरिक उपचार परिणामकारक ठरत नाहीत.
या वेदनांनी ग्रस्त झालेली व्यक्ती विचित्र प्रकारे वागू शकते, दारू वा अन्य एखाद्या व्यसनाच्या अधीन होऊ शकते, घर सोडून जाऊ शकते, हिंसक होऊ शकते, आत्महत्येचा प्रयत्न करू शकते. ज्या वेदनांमुळे हे स्वभावबदल होतात आणि हाताबाहेर जातात, त्या वेदनांचे मोजमाप घेण्याचे तंत्रज्ञान सध्या उपलब्ध नाही.
‘ट्रायल अॅण्ड एरर’ पद्धतीने झोपेच्या गोळ्या, ट्रन्क्विलायझर्स, शरीर निपचित करणारे डोस, इलेक्ट्रिक शॉक्स असे अनेक उपचारसदृश प्रकार अंमलात आणले जातात. परंतु अजून तरी ‘वेदना’ म्हणजे नक्की काय, तिची तीव्रता कशी मोजायची आणि तिचा सापेक्ष व सर्वसाधारण ‘डेटाबेस’ कसा तयार करायचा याबद्दलचे संशोधन या घडीला तरी अगदीच प्राथमिक आहे.
शारीरिक वेदना असो मानसिक, ती सहन करण्याची क्षमता प्रत्येक व्यक्तीची समान नसते. त्यामुळेच काही अमूर्त किंवा व्याख्या नसलेल्या व सिद्ध करता न येण्यासारख्या संकल्पना व संज्ञा रूढ झाल्या आहेत. त्यापैकी सर्वात रूढ झालेली संकल्पना आहे ‘विल पॉवर’ची. ‘विल पॉवर’चे भाषांतर इच्छाशक्ती किंवा इच्छा सामथ्र्य असे केले जात असले तरी मूळ इंग्रजी शब्दातील अर्थाची व्याप्ती काहीशी जास्त आहे. प्रत्येक व्यक्तीची ‘विल’ ही वेगळीच नव्हे तर पूर्णपणे स्वतंत्र आहे असे या थिअरीत मानले जाते. म्हणूनच एका मर्यादेपलिकडे हुकूमशाही, गुलामगिरी, दहशत सर्वावर, सर्वकाळ बसवता येत नाही. परंतु ती ‘विल’ एक शक्तिशाली साधन म्हणून प्रत्येकजण व नेहमीच वापरतो वा वापरू शकतो असे नाही.
आपल्या अगदी लहान मुलाला वाचविण्यासाठी जीवाचा आकांत करणारी आई (एका खेडय़ातील, अशक्त वाटणाऱ्या एका अशा आईने अक्षरश: बैलगाडी उचलून चाकाखाली येणाऱ्या मुलाला वाचविले, ही बातमी बरीच गाजली होती), रणांगणावर एकटय़ा पडलेल्या एखाद्या सैनिकाने शत्रूच्या तुकडीला नामोहरम केल्याच्या बातम्या, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत धीर न गमावता एखाद्याने केलेला संघर्ष- यांपेक्षाही कित्येक गोष्टी आपण आपल्या आजुबाजूला पाहात वा ऐकत असतो. आपल्या क्षमतेपेक्षा कितीतरी पटींनी अधिक असलेले सामथ्र्य कुठून येते हे अजून वैज्ञानिकांना उमजलेले नाही. विल पॉवर ऊर्फ इच्छासामथ्र्य मोजण्याचे अंकशास्त्र नसल्यामुळे एखादी मरणासन्न व्यक्ती (डॉक्टरांनी पूर्णपणे आशा सोडल्यानंतरही) कशी तगून राहते आणि उत्साहाने जीवन जगते, याबद्दल तर बडे बडे सर्जनही आश्चर्य व्यक्त करीत असतात.
बहुतेक वेळा वेदनेवर विजय मिळविणाऱ्या या माणसांच्या कौटुंबिक आख्यायिका बनतात, पण अजून त्या वेदनांचा वेध घेता आलेला नाही. कारण अनेक मानसशास्त्रज्ञ असेही मानतात की बऱ्याच जणांना ‘आत्मक्लेश’ करून घेण्याची, स्वत:लाच जखम करून घेण्याची एक विक्षिप्त प्रवृत्ती असते. व्ॉलरी हार्डकॅसल या संशोधकाने The Myth of Pain या पुस्तकात SIB ऊर्फ Self-Injurious Behaviour बद्दल अनेक उदाहणांसहित सविस्तर लिहिलेले आहे.
त्याचसंबंधात हा लेखक म्हणतो की, बहुतेक लोकांना प्रत्यक्ष मोठा अपघात होतो, तेव्हा प्रत्यक्ष वेदना जाणवत नाहीत. त्या एक-दोन दिवसांनंतर जाणवू लागतात. या संबंधात त्याने केलेले भाष्य इंग्रजीतच देतो, ‘‘It is clear that our pain inhibitory system releases endogenous morphine like chemicals (known as ‘endorphins’) or other similar hormones that mask or eliminate our pain and suffering. Most likely, it releases an opiate that affects our serotonin levels, but with 14 different identified serotonin receptors, at least four different opioid analgesics uncovered and fire different PIS pathways charted in the human.’’
या परिच्छेदातील मेडिकल संज्ञांना पर्यायी मराठी शब्द नाहीत. परंतु थोडक्यात मुद्दा हा की ज्या क्षणी शरीरावर असा अतिशय तीव्र आघात होतो, तेव्हा शरीरातील ग्रंथींमधून विशिष्ट प्रकारचा स्राव होतो आणि त्या स्रावामुळे वेदनांची (मेंदूकडे) संवेदना पोचविली जात नाही. हे एक प्रकारचे कवच निसर्गानेच दिले आहे. वेदना व तिची तीव्रता एखाद्याच्या सहनशक्तीवर अवलंबून असते की अनेक वेळा वेदनेपेक्षा तिचा बाऊच अधिक असतो? मेडिकल सायन्स विकसित होईपर्यंत म्हणजे क्लोरोफॉर्म, अॅनेस्थेशिया, पेनकिलरच्या गोळ्या व डोस या गोष्टी येईपर्यंत दात काढण्यापासून हात व पाय तोडण्यापर्यंत सर्व शस्त्रक्रिया थेट चालत असत. आजही जगातील अनेक तुरुंगांमध्ये व पोलीस ठाण्यांवरही शारीरिक छळ ही ‘सत्य’ शोधून काढण्याची एक पद्धत मानली जाते. म्हणजेच वेदना देणे हे प्रस्थापित यंत्रणेचे एक माध्यम आहे. गुन्हेगारीला व पोलिसांचा मार खाण्याला सरावलेली मुलेही अतोनात वेदना सहन करू शकतात. वेदनेची व सर्वसाधारण सहनशीलतेची कसोटी ही मोजमापनापेक्षा त्या त्या व्यक्तीच्या विशिष्ट परिस्थितीतील अनुभवावरतीच ठरवावी लागते. ‘ऑक्सफर्ड युनिवर्सिटी प्रेस’ने कालच प्रसिद्ध केलेल्या ‘द फरगॉटन आर्ट ऑफ हिलींग’ या डॉ. फारुख इराक उदवादिया यांच्या ग्रंथातही याच वेदनेचा, करुणेचा आणि सेवेचा हुंकार सापडतो. परंतु सिव्हिलायझेशन उभे आहे ते इतरांच्या वेदनेची संवेदना, मनाच्या सांस्कृतिक उत्क्रांतीत घेतली गेल्यानंतर. अगदी प्राथमिक अवस्थेत आघात-अपघात-वेदना होती पण सहानुभूती -दया-करुणा नव्हती.
स्वत:ला वेदना झाल्यावर कुणीही कळवळतो- दुसऱ्याच्या वेदनांनी जो हळहळतो आणि ते दु:ख दूर करण्याचा प्रयत्न करतो तो खऱ्या अर्थाने उत्क्रांत ठरतो.
कुमार केतकर
No comments:
Post a Comment