मानसापरी मानूस। राहतो वेड जाना ।अरे व्हतो छापीसनी। कोरा कागद शहाना ।।
स्मृती हरपल्यानंतर लहानपणी आत्मसात केलेली भाषाही तिच्याबरोबर जायला हवी, पण तसे होत नाही. शब्दांचे अर्थ कधी कधी लुप्त होतात, पण शब्दोच्चार आणि स्थूल स्वरूपात त्यातील भावना मात्र गडप होत नाहीत. सध्या वैज्ञानिकांमध्ये, विशेषत: मेंदूवर संशोधन करणाऱ्या न्यूरोसायन्टिस्ट कम्युनिटीत हा विषय अगदी आघाडीवर आहे. भाषातज्ज्ञ आणि मनोवैज्ञानिकही हे रहस्य भेदू पाहात आहेत. स्मृती आणि भाषा यांचा काय संबंध आहे? आणि भाषा व जीवन एकमेकांशी कसे निगडित झाले आहेत? या प्रश्नांचा थेट संबंध ‘सिव्हिलाझेशन’शी आहे. म्हणजेच माणसांच्या उत्क्रांती, प्रगती आणि संस्कृतीशी आहे.
तसे पाहिले तर सर्व प्राण्यांची, पक्ष्यांची, माशांची अगदी मुंगी-कीटकांचीही ‘भाषा’ असतेच. ध्वनी हे भाषेचे वाहन मानले जात असले तरी ध्वनिविरहित भाषा असतेच. बहिऱ्या-मुक्यांची भाषा हावभाव व देहबोलीतून व्यक्त होते. मुंगी-कीटक, साप व इतर सरपटणारे प्राणी यांच्या भाषेचे वहन गंध, नजर, स्पर्श, कंपसंवेदना, रंग इ. स्वरूपात असते. वनस्पतीशास्त्रज्ञ तर असे मानतात, की वृक्षवल्लींचीही भाषा असते. सर्व प्राणी व वनस्पतीसृष्टी संगीताला, सूर-तालांना प्रतिसाद देतात हे तर आता सिद्धच झाले आहे. वृक्षवल्ली-झाडे-फुले त्यांची प्रेमाने निगा करणाऱ्यांना प्रतिसाद देतात हाही अनुभव आहेच. म्हणजेच भाषेची अनेकविध रूपे आहेत.माणसाच्या भाषेचा जसा विकास झाला आहे, त्या भाषांना लिपीरूप प्राप्त झाले आहे, त्या भाषांचे संगणकीकरण झाले आहे आणि भाषा या माध्यमाद्वारे तत्त्वज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा र्सवकष विकास झाला आहे, तसा विकास जीवसृष्टीतील अन्य कुणी केलेला नाही. पक्ष्यांचे आवाज, त्यांच्या घरटय़ांच्या पद्धती, अंडी घालणे-उबविणे आणि पिलांची काळजी घेणे असे सर्व काही जेनेटिकली ‘कोडेड’ असते. म्हणजे तीही भाषाच. तशी ‘जेनेटिक भाषा’ सर्वच जीवसृष्टीत निसर्गाने रुजविलेली आहे. म्हणजे त्यांच्या ‘जेनेटिक मेमरी’त ती भाषा व ते ज्ञान ‘प्रोग्रॅम’ केलेले आहे. त्यामुळेच काही संगणकतज्ज्ञ, सॉफ्टवेअर डिझायनर्स आणि न्यूरोसायंटिस्ट आणि अर्थातच फ्युचरॉलॉजिस्ट असे मानतात, की माणूसही काही प्रमाणात ‘प्रोग्रॅम’ केलेला प्राणी आहे. त्या प्रोग्रॅमचा म्हणजे जेनेटिक विधिलिखिताचा तो सचेतन आविष्कार आहे. याचा दुसरा अर्थ हा, की प्रयोगशाळेत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तयार करता येईल. माणसाप्रमाणे वा माणसाहून अधिक बुद्धिमान व सक्षम असा कॉम्प्युटर बनविता येईल. आयझ्ॉक अॅसिमोव, ऑर्थर सी क्लार्क आणि इतर बऱ्याच विज्ञान लेखकांनी असा ‘भाषाप्रभु’, ‘दीर्घायुषी’ (कदाचित ‘अमर’सुद्धा!) आणि इंटेलिजण्ट कॉम्प्युटर ‘एमआयटी’ या मॅसेच्युसेट्स्मधील प्रयोगशाळांमध्ये बनवायलाही घेतला आहे. या आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरीत्या बनविलेल्या संगणक मानवाला भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळाचेही भान असेल आणि मुख्य म्हणजे तो माणसाशी चर्चा-संवाद करू शकेल-अगदी गप्पाही मारू शकेल, असा विश्वास या तंत्रज्ञांना आहे. हा आर्टिफिशियल प्राणी त्याला जी भाषा ‘शिकविली’ जाईल त्या भाषेत बोलेल, असे त्यांचे मत आहे म्हणजेच भाषा ही गोष्ट स्वतंत्रपणे शिकता-शिकविता येते. ‘प्रोग्रॅम’ही करता येते. विशेष म्हणजे अगदी १०० टक्के निरक्षर व्यक्तीही भाषा आत्मसात करतेच. त्यासाठी साक्षरता वा शिक्षणाचीही गरज लागत नाही. शिक्षणामुळे भाषासमृद्धी, शब्दसंख्या, विविध विषयातील आशय समजणे शक्य होते हे खरे पण मूलत: भाषा शिकण्यासाठी साक्षरता व शिक्षण गरजेचे नसते.आपण भाषा शिकतो ती घरात, शेजारी-पाजारी, समाजात वावरत असताना. जगातल्या सर्व भाषा या कुणाच्या ना कुणाच्या मातृभाषाच (म्हणजे मातृबोली) असतात. जन्माला आलेल्या मुलाचा सर्वात जास्त सहवास आईबरोबर असतो व तिच्याकडून तो शब्द शिकत जातो (जे शब्द सुरुवातीस फक्त ध्वनी म्हणून त्याच्या कानावर पडलेले असतात.) त्या शब्दांचे अर्थ (आणि स्वार्थ!) हावभाव, स्पर्श, अनुभव यातून प्रकट होत जातात. लहान मुलांची शिकण्याची गती प्रचंड असते. इतकी की आई-वडील हे वेगळ्या भाषांमधून आलेले असले तर त्या दोघांच्या भाषा, त्याचप्रमाणे शेजार आणखी तिसऱ्या भाषेचा असेल तर ती भाषा, शाळेत गेल्यावर तेथील माध्यम इंग्रजी वा अन्य कुठचे असल्यास ती भाषा आणि बहुसंख्य विद्यार्थी आणखी चौथ्याच भाषेचे असतील तर ती भाषाही वय, वर्षे एक ते नऊ या वयोगटात झपाटय़ाने आत्मसात होते.जन्माला आलेले मूल कोणत्या ‘भाषेत’ रडते? मराठी मूल मराठीत, तामीळ मूल तामीळ भाषेत, हिंदी भाषिक मुले हिंदीत रडत नाहीत; वा चिनी मुले चिनी भाषेत आणि जर्मन मुले जर्मन भाषेत रडत नाहीत. म्हणजेच त्या वेळेस भाषा आत्मसात व्हायची असते. (आता शास्त्रज्ञ असे मानतात, की लहान मुलाच्या कानावर तेव्हाच सूर-ताल पडले तर त्याचा कान सूरसिद्ध होऊ लागतो. अर्थातच पुढे त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले व रियाज केला तरच तो वा ती संगीत क्षेत्रात जाऊ शकेल. केवळ बालपणीच्या सूर-तालाच्या भांडवलावर नव्हे.) साधारणपणे पहिली दीड-दोन वर्षे लहान मुलांचे भाषा शिक्षण असे ‘अनौपचारिक’पणे होत असते. पण तेव्हाच त्या भाषेची घडी मनात पक्की बसू लागते. सर्वसाधारणपणे ती भाषा स्मृतीतून पूर्णपणे पुसली जात नाही. विशेषत: वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत जर मातृभाषेतच शिक्षण झाले आणि परिसर, शेजार व शाळा मातृभाषेतच असेल तर त्या शब्दकळेला पक्क्या व स्थिर स्मृतीत मेंदू ठेवून देतो. एक प्रकारची ‘हार्ड डिस्क.’ (गेल्या शनिवारच्या ११ जानेवारी- लेखातील ‘एचएम’ने पूर्णपणे स्मृती गमाविल्यानंतरही तो जुजबी संवाद करू शकायचा, याचे कारण त्याची वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंतची स्मृती शाबूत होती.)जगात अशा किती भाषा व बोली आणि लिपी वा चित्रलिपी, चिन्हभाषा आहेत? मानववंशशास्त्रज्ञ, भाषातज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ या विषयावर प्रचंड खल करीत आहेत. सर्वच भाषांना लिपीबद्ध केले गेलेले नाही. व्हिएतनामी भाषा रोमन लिपीत व फ्रेंच वळणाने लिहिली जाते. व्हिएतनामवर फ्रान्सची दीर्घकाळ अधिसत्ता होती, त्यामुळेच तीच लिपी तेथे प्रचलित झाली. म्हणजे फ्रेंचांना व्हिएतनामी भाषेतील (पण रोमन लिपीतील) वृत्तपत्र वाचता येईल, असे नव्हे किंवा व्हिएतनामी जनतेला आपसुक फ्रेंच येईल असेही नव्हे. (जगातील सर्व भाषांचे असे रोमन लिपीकरण केले जावे, अशी मोहीमही आहे. मधुकर गोगटे तर मराठी भाषेचे रोमनीकरण करायची चळवळ ‘अकेला चलो रे’च्या तडफेने करीत आहेत. मोबाईल फोन आल्यावर लाखो मराठी, माणसे या गोगटेप्रणीत रोमन मराठीतच ‘एसएमएस’ करू लागली आहेत.) जगातील सुमारे १०,००० अधिकृत भाषा (ज्यांची मानववंशशास्त्रज्ञांनी नोंद करायला घेतली आहे आणि ज्यांना लिपी आहे अशा भाषा) आणि सुमारे दोन लाख बोली (ज्यात संमिश्र भाषा आविष्कार आहे, अशा धरून) आहेत.अगदी सुरुवातीचा मानव, म्हणजे उत्क्रांतीच्या शिडीवरील एप्सनंतरचा असे मानले तर त्याची भाषा म्हणजे विविध प्रकारचे ध्वनी. इतर जंगली प्राणी आणि हा पहिला-वहिला मानव यांच्यात तेव्हा फारसा फरक नव्हता. या मानवाचा मेंदू विकसित होता, तो दोन पायांवर चालू लागला होता आणि हाताची पाच बोटे, विशेषत: अंगठा अतिशय कौशल्याने वापरू शकत होता. टारझनच्या कथेत जो परिसर असतो तसाच माणसाचा परिसर (आणि परिवारही) होता. परंतु माणसाची ‘मानसिक’ आणि ‘सामाजिक’ अवस्था त्याच्या विशिष्ट शारीरिक स्थितीमुळे बदलू लागली. तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असल्याचे त्याला जाणवू लागले. त्याच्या मुखातून येणारे ध्वनी आणि त्याची देहबोली यात वैविध्यता येऊ लागली. त्यातूनच समान अर्थाच्या ध्वनीचे संकलित रूप आकार घेऊ लागले. त्या संयुक्त ध्वनी-समुचयातून शब्द निर्माण होऊ लागले. परंतु त्या विशिष्ट टोळीसदृश माणसांमध्ये एका ध्वनी-समुचयाचा एकच अर्थ तयार झाला नाही तोपर्यंत समानअर्थी भाषा तयार झाली नाही.भाषेचे मुख्य वैशिष्टय़ हेच आहे, की कोणताही शब्द उच्चारणाऱ्याला त्या शब्दोच्चाराचा तोच अर्थ ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचला जातो आहे, अशी खात्री वाटावयास हवी. जोपर्यंत तशा प्रकारचा ध्वनी-शब्दरूप संवाद सुरू होत नाही तोपर्यंत भाषा विकसित होत नाही.जगाच्या निरनिराळ्या भागात (सुरुवातीला मुख्यत: इथिओपिया व टांझानिया या आफ्रिका खंडातील भागात) ज्या टोळ्या वावरत होत्या त्यांच्यात असे ध्वनी-शब्द-सादृश्य होत गेले आणि बोलीभाषेचा विकास होत गेला. साहजिकच जितक्या टोळ्या तितक्या बोलीभाषा. नागालँडमध्ये तर एका टोळीची बोली दुसऱ्या टोळीला समजेलच अशी स्थिती नसे. तीच गोष्ट आफ्रिकेत. गुहांमध्ये विशिष्ट चिन्ह व चित्र काढून ध्वनी व शब्दांना आकार दिले जाऊ लागले आणि चित्रलिपी तयार होऊ लागली. परंतु कुणीही माणूस लिपी वाचता आली तरी शब्दोच्चार करू शकेलच असे नाही. त्यासाठी सामाजिक व्यवहार आवश्यक आहे, प्रत्यक्ष संवाद व देवाणघेवाण आवश्यक असते. त्याशिवाय भाषेचा विकास होऊच शकत नाही.भाषा निर्मितीला सुमारे १५ लाख वर्षांपूर्वी सुरुवात झाली असे मानले तर प्राथमिक चित्र लिपीला साधारणपणे पाच लाख वर्षांपूर्वी. परंतु हावभाव व ध्वनीपासून शब्द, शब्दापासून समानअर्थी ध्वनीसमुचय, त्यातून ‘वाक्य’, नंतर शब्दांची अर्थपूर्ण साखळी, नंतर लिपी. संपूर्णत: ‘सिद्ध’ स्वरूपात लिपीचा जन्म तर २२ हजार वर्षांपूर्वी ‘मेसापोटेमियात, टीग्रीस आणि यूफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यात म्हणजे अरबस्तानात झाला असे आता मानवशास्त्रज्ञ मानतात. गेल्या २२ हजार वर्षांत सुमारे १० हजार लिपी जन्माला आल्या. त्यापैकी काही लयाला गेल्या. कित्येक बोलीभाषाही नाहीशा झाल्या. लिपी सिद्ध झाल्यावर ‘हस्तलिखिते’ तयार झाली. त्यानंतर कित्येक हजार वर्षांनी लाकडी ‘छापे’. छपाईचा शोध लागून सहाशे वर्षेच होत आली आहेत. छपाईद्वारे पुस्तके, मग वृत्तपत्रे आणि आता संगणक. हे सर्व अगदीच अलीकडचे. ज्या भाषेचा व लिपीचा जन्म, विस्तार व विकास आणि मुख्यत: संवादासाठी झाला तीच भाषा विसंवादाचेही मूळ ठरावी हा दैवदुर्विलास नाही तर आपला सार्वत्रिक अविवेक आहे. बहिणाबाईंनी या स्थितीचे नेमके वर्णन केले आहे.किती शिश्याच्या चमटय़ा। ठसे काढले त्यावर।कसे निघती कागद। छापीसनी भराभर।।मानसापरी मानूस। राहतो वेड जाना।अरे व्हतो छापीसनी। कोरा कागद शहाना।।
No comments:
Post a Comment