विस्मृतीचित्रे

लंडनच्या ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाच्या वर्षअखेरीच्या विशेषांकात एक मृत्युलेख प्रसिद्ध झाला आहे। ‘द इकॉनॉमिस्ट’मधील ‘ओबिच्युअरी’ म्हणजे मृत्युलेख हे विशेष ख्यातीचे असतात। या स्तंभाची चोखंदळ वाचकांमध्ये इतकी लोकप्रियता आहे की, अलिकडेच न्यूयॉर्कमध्ये या ‘ओबिच्युअरी’चे लेखन-संपादन करणाऱ्या संपादकाची जाहीर मुलाखत आयोजित करण्यात आली होती। त्यानिमित्ताने या मृत्युलेखांच्या चाहत्यांचा एक स्नेहमेळावाही भरविला गेला होता. या मेळाव्यात काही निवडक मृत्युलेखांचा एक संग्रह प्रकाशित करण्यात आला. वस्तुत: कोणत्याच लेखकाचे, वार्ताहराचे वा संपादकाचे नाव ‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये प्रसिद्ध होत नाही. तरीही संपूर्ण अंक जणू एकाच लेखक-संपादकाकडून एकहाती (किंवा एक-संगणकी आज्ञाशैलीत) लिहिला जात असावा असे वाटावे, अशी अंकाची आशय-शैली असते. ‘द इकॉनॉमिस्ट’च्या ओबिच्युअरी एडिटर्सची, मुख्यत: अ‍ॅन रो या संपादिकेची, ओळख व भेट तेथे जमलेल्या वाचकांना त्याच दिवशी प्रथम झाली. या मृत्युलेखांचे वैशिष्टय़ हे की, ती ‘श्रद्धांजली’ नसते! त्याचप्रमाणे प्रत्येक प्रसिद्ध वा लोकप्रिय व्यक्तीच्या मृत्युची दखल त्या स्तंभात घेतली जाईलच असेही नाही. तो मृत्युलेख म्हणजे अवघ्या एका पानात त्या व्यक्तीच्या जीवनाची, त्याच्या कर्तृत्वाची (वा अपकर्तृत्त्वाची), त्याच्या आयु:शैलीची, त्याच्या संस्कृतीची ओळख असते. तो मृत्युलेख वाचणाऱ्याला जसे आपल्या मर्त्यत्वाचे भान येते. तसेच आपल्या (लहान) आयुष्यात काही माणसे काय काय (!) करू शकतात वा कसे जगतात याचीही चित्तवेधक व भेदक ओळख होते. तो मृत्युलेख ज्या व्यक्तीबद्दल असतो, ती व्यक्ती आपल्याच जीवनात येऊन गेली असेही वाचकाला वाटू लागते. ‘द इकॉनॉमिस्ट’ (२० डिसेंबर- २ जानेवारी) या वर्षअखेर विशेषांकात हेन्री मोलायसन नावाच्या व्यक्तीवरचा मृत्युलेख प्रसिद्ध झाला आहे. हेन्री मोलायसन कोण? कुणीही नाही, म्हणजे अशा अर्थाने की मोलायसन कुणी लेखक, कवी, शास्त्रज्ञ, पुढारी, चित्रकार, अर्थतज्ज्ञ किंवा ‘सेलेब्रिटी’ नाही. हेन्री मोलायसन हा अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समधील जगप्रसिद्ध एमआयटी संस्थेतील हॉस्पिटलमधला एक रुग्ण किंवा मनोरुग्ण होता. त्याची ओळख फक्त ‘एच.एम्.’ इतकीच करून दिली जात असे. (एम म्हणजे मोलायसन हेसुद्धा त्याच्या मृत्यूनंतरच जाहीर केले गेले.) अशा अनामिक असलेल्या मनोरुग्णावर ‘द इकॉनॉमिस्ट’सारख्या प्रतिष्ठित आणि ‘इंटेलेक्च्युअल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साप्ताहिकाने मृत्युलेख लिहायचे कारण काय? कारण हे की ‘एचएम’ या मनोरुग्णाने तमाम वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञांसमोर (मुख्यत: मेंदू व संवेदन प्रक्रियेवर संशोधन व प्रयोग करणाऱ्या शल्यविशारदांसमोर आणि अर्थातच मनोवैज्ञानिकांसमोर) एक आव्हानच उभे केले आहे. तात्त्विक पातळीवरून विचार करताना हे आव्हान तसे बरेच प्राचीन आहे असेही लक्षात येईल. वेदांमध्ये वा ग्रीक तत्त्वज्ञानात ज्या प्रश्नांची चर्चा केली गेली आहे किंवा बौद्ध चिंतनात आणि भगवद्गीतेत (वा ज्ञानेश्वरीत) ज्या गूढ वाटणाऱ्या गोष्टींची लौकिक चिकित्सा आहे, असे मानले जाते, तेच प्रश्न ‘एचएम’ने पुन्हा उपस्थित केले आहेत. परंतु हे प्रश्न तत्त्वज्ञानातून विज्ञानस्तरावर आले ते गेल्या अर्धशतकात. तेव्हापासून तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांमधील सीमारेषा झपाटय़ाने पुसत चालल्या आहेत. ‘एचएम’ने त्याच्या वयाच्या २७ व्या वर्षी त्याची स्मृती (जवळजवळ) पूर्णपणे गमावली. त्याचे निधन झाले तेव्हा तो ८२ वर्षांचा होता. म्हणजे सुमारे ५५ वर्षे तो विस्मृतीग्रस्त अवस्थेत जगला. विशेष म्हणजे या काळात तशी कोणतीही शारीरिक व्याधी त्याला झाली नाही. शिवाय या ५५ वर्षांच्या काळात त्याचे व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न असे आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांशी (मुख्यत: डॉक्टर्स आणि नर्सेस) तो अतिशय सभ्यतेने व हसतमुखपणे वागत असे. इतका की, हा अतिशय गंभीर स्वरूपाचा मनोरुग्ण आहे, हे कुणाच्या लक्षातही येत नसे. एखादा डॉक्टर वा नर्स फक्त १५-२० मिनिटांनी त्याला परत भेटायला (वा तपासणीला) आले तर त्याला त्यांची पुन्हा ओळख करून द्यावी लागे. (गजिनी या आमीर खानच्या चित्रपटात अशा विस्मृतीग्रस्त व्यक्तीचे काहीसे मनोवैज्ञानिक आणि काहीसे काल्पनिक चित्रण आहे.) ‘एचएम्’ या मनोरुग्ण व्यक्तीला त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी ‘फिट्स’ येऊ लागल्या. कधीही, केव्हाही, कुठेही चक्कर येऊन भान हरपले जाणाऱ्या ‘एचएम’ला वैद्यकीय उपचार सुरू झाले. तेव्हाच त्याच्या मेंदूवर परिणाम व्हायला सुरुवात झाली असणार. कशीबशी शालांत परीक्षा पूर्ण करून तो एका कारखान्यात नोकरी करू लागला. पण तेथे त्याचे चित्त एकाग्र होत नसे आणि ‘फिट्स’ही कमी झाल्या नव्हत्या. एका न्यूरोसर्जननने त्याच्या मेंदूवर ‘सायकोसर्जरी’ केली. त्यामुळे ‘फिट्स’ आटोक्यात आल्या, पण एका फटक्यात स्मृती नष्ट झाली. तेव्हा त्याचे वय २७ होते. त्याचे त्रिकालाचे भान पूर्णत: गेले. आपण कोण, कुठचे, काय करतो, काल- आज- उद्याचे संदर्भ पूर्णत: पुसले गेले. आरशात बघितल्यावर समोरची प्रतिमा आपलीच आहे हेही त्याला कळत नसे. काहीही नवे शिकायचे, इतकेच काय टीव्ही पाहायचे वा रेडिओवर काही ऐकून त्याचे संदर्भ लक्षात घ्यायचे हेही अर्थातच शक्य नव्हते. परंतु तो जेव्हा १६ वर्षांचा होता त्या वेळच्या अगदी नाममात्र आठवणी ढोबळपणे त्याला आठवत. त्याच्या स्मृतीच्या दृष्टिकोनातून विचार करता तो १६ व्या किंवा फार तर २७ व्या वर्षीच स्थळ-काळाच्या पलिकडे गेला होता. त्याचे हे कालातीत अस्तित्व डॉक्टर्स आणि नर्सेस्ना अतिशय लोभस वाटत असे. गायीच्या वासरासारखे किंवा मांजराच्या निरागस पिलासारखे. पण होता तर पूर्ण प्रकृतीचा माणूस. त्यामुळेच मेंदूवर संशोधन करणाऱ्यांना आणि मनोवैज्ञानिकांना त्याचे गूढ वाटत असे. तो मतीमंद नव्हता. त्याला अल्झायमर झालेला नव्हता. जरी त्याची स्मृती हरपली होती तरी त्याला ‘अ‍ॅम्नेशिया’ झालेला नव्हता. तो वेडा नव्हता. स्किझोफ्रेनिक किंवा दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा तो पेशंट नव्हता. त्याच्या वागण्यात- जेवण, खाण, दिनचर्या, झोप, विश्रांती, चालण्या-बोलण्यात कुठेही ‘वेडाचार’ नव्हता. ज्याला त्याच्याविषयी काहीही माहिती नाही, अशांना तर तो पूर्णपणे नॉर्मल वाटत असे. तो व्हायोलेंट होत नसे. कोणत्याच प्रकारची हिंसा वा उग्रता त्याच्या कृतीत वा बोलण्यात नव्हती. तो उदासीन किंवा ‘डिप्रेस’ होत नसे. क्वचित तो ‘शून्यात’ असल्यासारखे डॉक्टरला वाटत असे. मग डॉक्टरने त्याला विचारले की, ‘कसल्या विचारात मग्न आहेस?’ की तो म्हणत असे, ‘मी काही आता लहान मुलगा नाही.’ म्हटले तर हे उत्तर असंबद्ध आहे, म्हटले तर नाही. त्याचे डोळेही तसे इतरांसारखे दिसत. (वेडेपण डोळ्यात चटकन दिसते.) अशा स्थितीत ५५ वर्षे जीवन काढलेल्या या ‘एचएम्’ने अनेक प्रश्न वैज्ञानिकांसमोर ठेवले आहेत. ‘एचएम’चा मेंदू आता संशोधनासाठी प्रयोगशाळेत ठेवला गेला आहे. मेंदूमध्ये ‘हिपोकॅम्पस’ म्हणून जो भाग आहे तेथे स्मृती निर्माण होऊन, नोंद करून साठविल्या जातात, असे मानले जात असे. शस्त्रक्रिया करताना तो ‘हिपोकॅम्पस’ विस्कटला गेला असावा असे सुरुवातीस वाटले होते. पण पुढे पुढे डॉक्टरांना लक्षात येऊ लागले की त्याच्या जीवनविषयक- आत्मचरित्रात्मक- स्मृती कुठेतरी लुप्त झाल्या असल्या तरी त्याची दिनचर्येची स्मृती, त्याचप्रमाणे तेच तेच काम करीत राहिले तर त्यातील सातत्यता, कपडे घालणे, तहान-भूक (ढोबळपणे) त्याच्या ‘स्मरणात’ असत. म्हणजे त्याला ‘प्रोसिजरल मेमरी’ आणि ‘डिक्लरेटिव मेमरी’ होती. याचा अर्थ हा की सांगितलेली गोष्ट करणे आणि ती पुन्हा करण्यासाठी काही काळ लक्षात राहणे शक्य होते. शिवाय प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे रिफ्लेक्सेस्ही ठाकठीक होते. त्यामुळे डॉक्टर व वैज्ञानिकांचा प्रश्न पुढच्या स्तरावर गेला. ‘स्मृती म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? बोलताना शब्द लागतात, ते कुठून येतात? ‘एचएम’लाच नव्हे तर मतीमंदांनाही बोललेले शब्द, आज्ञा, धाक, प्रेम, राग कळतात. ते कसे? पूर्णपणे स्मृतीहिन माणूस सचेतन असला तरी तो प्रत्यक्षात अचेतनसदृशच नव्हे काय? जर मन केवळ मेंदूत व एकूण संवेदन यंत्रणेत नसेल तर ‘मन’ कुठे असते? मेंदू, मन, कॉन्शियसनेस ऊर्फ जाणीवा- संवेदन- भान, कुतुहल, बुद्धी, स्मृती, भूतकाळ- वर्तमान व भविष्यकाळ याचे व्यक्तिगत व सांस्कृतिक संदर्भ, तसेच अनुवांशिकता, आयडेंटीटी ऊर्फ स्वत:ची ओळख, अस्मिता हे सर्व कसे तयार होते? कारण हे सर्व व इतर बरेच म्हणजेच माणूसपण आणि जीवन. साहजिकच पुन्हा प्रश्न जातो तो तत्त्वज्ञांच्या प्रांगणात. केवळ ‘मी कोण आहे’ ऊर्फ ‘कोऽहं’ असा हा प्रश्न नाही तर ‘मी कुणाचा आहे.’ फक्त ‘हू अ‍ॅम आय?’ इतकेच नव्हे तर ‘हूज अ‍ॅम आय?’ ‘एचएम’ला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सांगता आली नसती. त्याच्या डॉक्टरांनाही त्याच्या संबंधातील ती उत्तरे देता आली नसती. पण आपण सर्वजण स्वत:ला सूज्ञ समजतो. आपली स्मृतीही शाबूत आहे. आपल्याला या प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत?
कुमार केतकर

No comments:

Post a Comment