कोलंबस ते ओबामा

कोलंबस ते ओबामा
बराक हुसेन ओबामांच्या शपथविधी समारंभाच्या वाद्यवृंदात एक ज्यू होता, एक चिनी-अमेरिकन आणि एक कृष्णवर्णीय। जिने कविता म्हटली तीही कृष्णवर्णीय होती. ओबामांच्या मंत्रिमंडळात आणि सल्लागारांमध्ये भारतवंशीय आहेत, जपानी- अमेरिकन आणि ‘हिस्पॅनिक’ आहेत. कृष्णवर्णीयांमध्ये मुख्यत: दोन प्रकार आहेत. ज्यांना आफ्रिकेतून अक्षरश: पायांना शृंखला बांधून गुलाम म्हणून आणले आणि ४०० वर्षे अर्थातच जे तेथेच राहिले, त्यांचे आजचे वंशज आणि विस्तारलेली कुटुंबे असे कृष्णवर्णीय आणि जे सुमारे ४० वर्षांंत आपणहून आफ्रिकेतून अमेरिकेत स्वेच्छेने नोकरी-व्यवसाय-शिक्षणासाठी आले व स्थायिक झाले असे ‘ब्लॅक्स’, हे वेगवेगळ्या वारशाचे व संस्कृतीचे आहेत. त्यांच्यातला समान घटक अर्थातच हा की, त्या सर्वाचा ‘मूळ’ खंड आणि वंश आफ्रिकन आहे. तीच गोष्ट हिस्पॅनिक्सबद्दल, पण वेगळ्या संदर्भात म्हणता येईल. कोलंबस हा मूळचा स्पॅनिश, ज्याने १२ ऑक्टोबर १४९२ रोजी अमेरिका खंडात (आताच्या बहामात) अतिशय साहसी- सामुद्री प्रवासानंतर पाऊल ठेवले. त्यानंतरची काही वर्षे स्थानिक अमेरिकन लोकांना (जे ‘रेड इंडियन्स’ म्हणून ओळखले जात) हद्दपार करून हळूहळू युरोपियन वसाहती तेथे वसू लागल्या. मूळच्या ‘नेटिव अमेरिकन्स’वर अनन्वित अत्याचार केले गेले. मोठय़ा प्रमाणावर त्यांचे हत्याकांड केले गेले आणि बळाच्या जोरावर अमेरिका नावाचा देश निर्माण होऊ लागला. पूर्वीपासून अमेरिकेत आलेले व स्थायिक झालेले स्पॅनिश आणि शे-दीडशे वर्षांत मेक्सिको, क्युबा व दक्षिण अमेरिकेतील इतर देशातून आलेले स्पॅनिश या सर्वाना स्थूलपणे ‘हिस्पॅनिक’ म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांंत क्युबा व मेक्सिकोतून बेकायदेशीरपणे घुसलेले आणि पुढे रीतसर नागरिकत्व मिळविलेले लाखो स्पॅनिश भाषिक हेही त्याच समूहाचे. परंतु हिस्पॅनिक किंवा एकूण सर्व मूळचे स्पॅनिश भाषिक हे ‘उपरे’ नाहीत. कारण फ्लॉरिडा ही पहिली ‘अधिकृत’ युरोपियन वसाहत १५६५ सालीच स्थापन झाली. पाठोपाठ इंग्लिश, फ्रेंच, डच, जर्मन, स्वीडिश हे सर्वजण अमेरिकेत आले. अस्ताव्यस्त पसरलेली, बऱ्याच भागात सुपीक आणि निसर्गसमृद्ध जमीन पाहून हे युरोपियन्स हरखून गेले होते. त्या काळात खुद्द युरोपियन देश हे दुष्काळ, यादवी आणि आपापसातली युद्धे यामुळे ग्रस्त होते. साधारणपणे याच काळात म्हणजे १४९० ते १८९० या काळात युरोपियन वसाहती जगभर वसवल्या गेल्या होत्या. वास्को द गामा भारतात १४९८ साली आला. ईस्ट इंडिया कंपनी १६०० च्या आसपास आणि अधिकृतपणे राणीचे भारतावर राज्य प्रस्थापित झाले, ते १८५८-१८७४ या काळात (म्हणजे राणीचा जाहीरनामा ते राज्याभिषेक). अमेरिकेत जसे आफ्रिकेतून गुलाम आणले गेले तसे भारतात आणले गेले नाहीत. अमेरिकेत प्रथम शेती व नंतर रेल्वे रुळ आणि त्यानंतर उद्योग यात काम करायला मजूर नव्हते. नेटिव अमेरिकन मजूर व्हायला तयार नव्हते आणि त्यांनी तर या आक्रमक युरोपियनांविरुद्ध युद्धच पुकारले होते. (ज्यात त्यांचा विदारक पाडाव झाला.) भारतात मजूर मिळायचा प्रश्न नव्हता. म्हणजे भारतात बाजारपेठ, हक्काची वसाहत आणि पुढे सत्ता हे सर्व ब्रिटिशांनी काबीज केले. भारतात होती सुमारे साडेसहाशे संस्थाने. जी प्रथम लॉर्ड डलहौसीने खालसा केली आणि ‘ब्रिटिश इंडिया’चा नकाशा तयार होऊ लागला. आजचा अमेरिका आणि ४०० वर्षांपूर्वीचा यांच्या भूगोलातही फरक आहे. ज्याप्रमाणे फ्लॉरिडात पहिली स्पॅनिश वसाहत आली, तशी व्हर्जिनियात पहिली ब्रिटिश वसाहत उभी राहिली. डचांनी ‘न्यू नेदरलँड’ आणि स्वीडिशांनी ‘न्यू स्वीडन’ अशा वसाहती वसवल्या. परंतु ब्रिटिशांनी बहुतेक प्रांत आपल्या कब्जाखाली आणला होता. ज्याला आपण अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध म्हणून संबोधतो, ते युद्ध नेटिव अमेरिकनांच्या स्वातंत्र्यासाठी नव्हते तर युरोपातील अनेक ठिकाणांवरून अमेरिकेत आलेल्या व स्थायिक झालेल्या अमेरिकनांचे ब्रिटिश राजवटीविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. ते ब्रिटिश सत्तेच्या विरोधात असल्यामुळे फ्रान्स, स्पेनने ‘अमेरिकनांना’ पाठिंबा दिला. अमेरिकन वसाहतींनी १७७६ मध्ये स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. त्यानतंर ११ वर्षांंनी अमेरिकेची नवी घटना तयार केली गेली. या घटनेच्या शिल्पकारांनी स्वातंत्र्य संकल्पनेची आणि प्रत्येकाला सुखी, स्वतंत्र जीवन साकारायचा अधिकार असल्याची घोषणा केली. ज्याचा उल्लेख ओबामांनी शपथविधीनंतरच्या भाषणात केला. जॉर्ज वॉशिंग्टन या पहिल्या अध्यक्षांनी १७८९ साली, म्हणजे बरोबर २२० वर्षांंपूर्वी शपथ घेतली. त्यावेळचा अमेरिकेचा भूगोल म्हणजे फक्त १३ राज्यांचा (वसाहतींचा) होता. पुढे या स्वतंत्र अमेरिकेने फ्रान्सकडून लुईसियाना, स्पेनकडून फ्लॉरिडा ही राज्ये विकत घेतली. वसाहती विकत घेणे, भेट वा आंदण देणे, सौद्यात आणणे या त्यावेळच्या विस्तारवादी-वसाहतवादी काळात मान्यताप्राप्त गोष्टी होत्या, जसे मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना एका विवाहसमारंभात आंदण म्हणून देऊन टाकले! ‘स्वतंत्र’ अमेरिकेने हळूहळू विस्तार सुरू केला आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेतील राज्यांची संख्या १३ वरून ४५ पर्यंत गेली आणि १८९० पर्यंत ती ५० झाली. काही राज्य ‘िजकून’, काही ‘विकत घेऊन’, काही ‘भेटीत’ तर काही ‘सौदा करून’ घेतलेली असल्यामुळे प्रत्येक राज्यातील स्वायत्त सामाजिक परंपरा, कायदे, नियम तसेच ठेवले गेले. त्यामुळेच ‘युनायटेड’ स्टेटस् ऑफ अमेरिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रत्येक राज्यात अनेक परस्परविरोधी कायदे आहेत. १८५० नंतर वाद निर्माण झाला होता, तो कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीसंबंधात. दक्षिणेतील ११ राज्यांनी जाहीर केले की ते गुलामगिरी नष्ट करणार नाहीत. उत्तरेकडील राज्यांनी गुलामगिरी नष्ट करायचा आग्रह चालू ठेवला तर त्यांना यादवी युद्धाला तोंड द्यावे लागेल. १८६० साली अब्राहम लिंकन अध्यक्ष म्हणून निवडमून आल्यानंतर त्या यादवीला तोंड फुटले. ‘कॉन्फेडरेट स्टेटस् ऑफ अमेरिका’ असे म्हणविणाऱ्या दक्षिणेतील राज्यांच्या आघाडीचा त्यात पराभव झाला आणि अधिकृतपणे गुलामगिरी नष्ट झाल्याचे घोषित केले गेले. परंतु काळ्यांच्या म्हणजेच निग्रोंच्या, म्हणजेच ज्यांना ‘आफ्रिकन-अमेरिकन’ म्हणून ओळखले जाते, त्यांच्या नागरिकत्वाला अधिष्ठान दिले गेले. तरीही अल्बामा, मिसिसीपी, व्हर्जिनिया अशी काही राज्ये होती की ज्यांनी अगदी ५० वर्षांंपूर्वीपर्यंत ‘ब्लॅक्सना’ नागरी समानता बहाल केली नव्हती. ‘मिसिसीपी बर्निंग’, ‘इन द हीट ऑफ द नाईट’ असे अनेक हॉलीवूडनिर्मित चित्रपट आहेत की ज्यामध्ये ब्लॅक्सवरील अत्याचार, त्यातून निर्माण झालेले दंगे, जाळपोळ, लुटालूट यांचे चित्रण आहे. जॉन केनेडी १९६१ साली अध्यक्ष झाले आणि त्यांनी अब्राहम लिंकनना अभिप्रेत असलेली समानता प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला. परंतु १८६५ मध्ये यशस्वी यादवीनंतर, अब्राहम लिंकन यांची हत्या केली गेली, त्याचप्रमाणे १९६३ साली जॉन केनेडी यांचा खून झाला. त्यानंतर त्यांचे बंधू रॉबर्ट (बॉबी) केनेडी आणि अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी हा समानतेचा मुद्दा नेटाने पुढे नेण्याचे ठरविले. त्याला उग्र वंशवाद्यांचा तीव्र विरोध होता. तरीही ३ ऑक्टोबर १९६५ रोजी लिंडन जॉन्सन यांनी जगप्रसिद्ध लिबर्टी पुतळ्याच्या पायाशी ऐतिहासिक कायदा जाहीर केला-जो कायदा तेव्हा केला नसता तर आज ओबामा अध्यक्ष होऊच शकले नसते. त्या कायद्याचे नाव आहे ‘इमिग्रेशन अ‍ॅन्ड नॅशनॅलिटी अ‍ॅक्ट’. या देशव्यापी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कृष्णवर्णीय, समाजाच्या आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले. पण त्या समानतेच्या विरोधात असलेल्या वंशवादी गोऱ्यांनी अहिंसावादी मर्टिन ल्यूथर किंग यांची १९६८ साली हत्या केली. बरोबर ४० वर्षांंपूर्वी. सनदशीर मार्गाने ‘ब्लॅक्स’ना अमेरिकेत न्याय मिळू शकणार नाही, असे वाटून काही लढाऊ तरुणांनी ‘ब्लॅक पॅन्थर्स’ ही संघर्षवादी संघटना बांधली. (आपल्याकडील ‘दलित पॅन्थर’ त्यांच्याच अनुकरणातून पुढे आले.) ४० वर्षांंत अमेरिकेचा समाज आमूलाग्र बदलला आहे. विविध वंशांच्या लोकसंख्येने, वृत्तीने आणि विचारानेही बदलला आहे. केवळ १३ टक्के ब्लॅक्स असूनही एकूण मतदानाच्या ६६ टक्के मते ओबामांना मिळाली. आजच्या घडीला अमेरिकेत १४ टक्के ‘हिस्पॅनिक’ आहेत आणि पाच टक्के एशियन (म्हणजे भारतीय, चिनी, जपानी, इंडोनेशियन इ. धरून) नजीकच्या भविष्यकाळात (२०५० साली) गोऱ्यांची आजची संख्या ६७ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांपर्यंत जाईल, असे लोकसंख्याशास्त्र सांगते. परंतु ब्लॅक्सच्या संख्येत मात्र फारशी वाढ होणार नाही. वाढणार आहे ती हिस्पॅनिक्सची संख्या- १४ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत. असेही मानले जाते की अमेरिकेची अधिकृत दुसरी राष्ट्रभाषा स्पॅनिश असेल! फ्लॉरिडा, कॅलिफोर्निया, टेक्सास अशा अनेक राज्यातील फलक, सूचना व घोषणा स्पॅनिश असतात. काहीजण अमेरिकेला ‘मेल्टिंग पॉट’ (अनेक धातू ढवळणारे पात्र) असे म्हणतात. भूतकाळातील अनेक वर्षे वंशवादाने भडकलेल्या अमेरिकेतील भविष्यकाळ मात्र ‘सर्व-वंश-धर्म-समभाव’ या विचाराने घडणार. ‘द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’ या विघटनवादी आणि विघातक अमेरिकन प्रबंधाला बुश यांच्या कारकीर्दीत प्रतिष्ठा मिळाली होती. ओबामा यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्याच भाषणात ‘ख्रिश्चन आणि मुस्लिम, ज्यू आणि हिंदू आणि सर्व नास्तिक’ असे सर्वसमावेशक आवाहन केले होते. विनोबांनी सांगितलेला ‘जय जगत’चा विचार त्यात समाविष्ट होता. महात्मा फुलेंनी अब्राहम लिंकन यांना त्यांचे वाङ्मय अर्पण करायचा विचार केला, तेव्हा रेडिओ, टीव्ही, मोबाइल, इंटरनेट असे काहीही नव्हते, तरी लिंकन यांचा विचार फुलेंपर्यंत पोहोचला व भावला होता. आता ओबामांनी लिंकन यांची बायबलची प्रत हातात घेऊन गांधीजी व विनोबा यांच्या विचाराचा पुनरुच्चार केला आहे!

कुमार केतकर

No comments:

Post a Comment