मुझको भी तो लिफ्ट करा दे!

बहुतेकांना वाटत असते की, आपल्याला वरचे ‘पद’, वरचा ‘दर्जा’, अधिकाराचे ‘स्थान’, ‘स्टेटस्’ मिळायला हवे. काहींना वाटते ते की ते ‘स्टेटस्’ पैशाने प्राप्त होते. श्रीमंती असेल तर दर्जा आपसूकच प्राप्त होतो असा एक (काहींचा) समज आहे. कित्येक असे ‘दर्जाकांक्षी’ लोक पैशाच्या मागे लागतात. कारण त्यांना वाटते ते पद विकत घेता येईल. (मुख्यमंत्रीपद, पंतप्रधानपदापासून ते अगदी महापौरपद, मुख्याध्यापकपद वा पद्मश्री- पद्मभूषण असे किताब) परंतु बहुतेकवेळा पैशाने पद, दर्जा वा किताब ‘विकत’ घ्यायचे प्रयत्न यशस्वी होत नाहीत.


जे काही प्रयत्न यशस्वी होतात, त्याचे दाखले देऊन अनेक महत्त्वाकांक्षी लोक पैशाने प्रतिष्ठा विकत घेण्याचा उद्योग चालूच ठेवतात. गेल्या काही वर्षांत, विशेषत: बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचे अवास्तव स्तोम माजवले गेल्यानंतर ‘पैशाने काहीही विकत घेता येऊ शकते’ या पूर्वीच्याच ‘सिद्धांता’ला नव्याने प्रतिष्ठा प्राप्त झाली. कुठेही कारण नसताना ‘अर्थस्य पुरुषो दास:’ सारखी महाभारतकालीन वचने उद्धृत करण्याची तर काही धनदांडग्यांनी प्रथाच निर्माण केली आहे.

परंतु मुद्दा हा की, पद, दर्जा, प्रतिष्ठा, किताब, पुरस्कार, स्टेटस यांची इतकी आस काहींना का असते? कारकुनाला हेडक्लार्क, ज्युनिअर अधिकाऱ्याला हेड ऑफ द डिपार्टमेंट, उपसंपादकाला वृत्तसंपादक, नंतर संपादक, प्राध्यापकाला प्रिन्सिपॉल, ब्रँच मॅनेजरला रिजनल मॅनेजर, एमडीला चेअरमन, आमदाराला मंत्री, मंत्र्याला मुख्यमंत्री वा पंतप्रधान अशी पदांची चढण असते. ‘अंतिम’ असे पद असे नसतेच, कारण महत्त्वाकांक्षेला मर्यादा नसते.

कित्येक श्रीमंत वा धनाढय़ माणसांना केवळ संपत्तीने त्या ‘दर्जा’चे समाधान मिळत नाही. अगदी धीरुभाई अंबानींची इच्छाही त्यांना ‘भारतरत्न’ हे पद मिळावे ही होती. इतकी संपत्ती असूनही सन्मान नाही, अशी भावना कितीतरी धनवान मंडळींना असते. अनेक प्रसिद्ध नटनटय़ांची इच्छा त्यांना स्क्रीन, फिल्मफेअर वा तत्सम अ‍ॅवॉर्ड मिळावे अशी असते. तरच त्यांच्या करिअरला खरा ‘न्याय’ मिळेल असे त्यांना वाटत असते. असे कितीतरी अमेरिकन नट, दिग्दर्शक आहेत की ज्यांच्या जीवनातील खंत ‘ऑस्कर’ मिळाले नाही अशी असते. त्याना पैसा, प्रसिद्धी, कीर्ती सर्व काही मिळालेले असते, पण ऑस्कर हुकलेले असते. शिवाय ‘ऑस्कर’ विकत घेता येत नाही, म्हणजे मानसन्मानापुढे पैसा फिकाच पडतो. ‘नोबेल’ पारितोषिकाबद्दल बरेच वाद-प्रवाद आहेत. पण तो सन्मानही पैसे मोजून मिळत नाहीच.

मुद्दा हा की पद, दर्जा, मानसन्मान, स्टेटस, (सेलिब्रिटी स्टेटस) किंवा ‘एलिट’ म्हणून समाजातील स्थान या गोष्टी नक्की कशा प्राप्त होतात आणि त्या मिळविण्यासाठी अनेकांचा जीव इतका कासावीस का होतो हा एक समाजशास्त्रीय/मानसशास्त्रीय प्रश्न म्हणून मानला जातो. वरवर पाहता तो फारसा गंभीर प्रश्न वाटत नाही, पण कित्येक ‘यशस्वी’, ‘प्रसिद्ध’, ‘श्रीमंत’ माणसे यांना अशा ‘मानापमान’ सदृश व्याधींनी ग्रासलेले असते. बहुतेकवेळा त्यात सुप्त वा उघड कुणाबद्दल तरी असूया असते, स्वत:चे कर्तृत्व सर्वमान्य आहे हे सिद्ध करण्याची धडपड असते, ‘चढणी’च्या रस्त्यावर अधिक ‘वर’ जाण्याची महत्त्वाकांक्षा असते आणि अनेकदा सरळसाधा ‘इगो’ गुंतलेला असतो.

अदनान सामींच्या लोकप्रिय, आधुनिक ‘लोकगीतां’तील प्रसिद्ध ओळींमध्ये ही भावना नेमकेपणाने व्यक्त झाली आहे. ‘‘ऐसे-वैसोंको दिया है- मुझको भी तो लिफ्ट करा दे।’’

काहींना ते स्थान जन्माने मिळते, म्हणजे घराण्यामुळे मिळते, कुणाला कर्तबगारीने (पण त्या कर्तबगारीचे चीज होण्यासाठी ‘योग्य’ ठिकाणी ‘कनेक्शन्स’ असावी लागतात) तर कुणाला खरोखरच त्यांच्या गुणवत्तेमुळे. सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर, अमिताभ बच्चन, लता, आशा अशी कितीतरी नावे आहेत की ज्यांना त्यांच्या मानसन्मान, पैसे वा स्टेटस् यांसाठी ‘सेल्फ मार्केटिंग’ करावे लागले नाही. म्हणजेच खरे-खुरे हिरे त्यांचे तेज प्रकट करतातच. शिवाय ‘मिडिया स्पेस’ विकत घेऊन प्रसिद्धी मिळविता येत असली आणि ‘सेलिब्रिटी’ होणेही आजच्या युगात शक्य असले तरी सामाजिक मान्यता मिळतेच असे नाही. कित्येकांचा असा समज असतो की ‘सेलिब्रिटी’ झाल्यावर सामाजिक स्थान सहज मिळेल. काही प्रमाणात ते अलिकडे शक्य झाले असले तरी गुणवत्तेमुळे मिळणारे स्थान आणि ‘सेलिब्रिटी’ वा ‘पेज थ्री’ मार्फत मिळणारा मानसन्मान यात दर्जात्मक फरक खूपच असतो.

परंतु या सर्व बाबी व्यक्तिगत स्वरूपाच्या असतात. क्लार्क पदावरच्या माणसाला हेडक्लार्क, प्राध्यापकाला प्रिन्सिपॉल वा ब्रँच मॅनेजरला रिजनल मॅनेजर होण्यासाठी पैशाचा, सेलिब्रिटी दर्जाचा वा तत्सम गोष्टींचा फारसा उपयोग नसतो.

वरचे पद मिळविण्याचा हेतू हा मानसन्मानापेक्षाही अधिकाराचा असतो. ‘पॉवर’ या शब्दाचा अर्थ अधिकार, सत्ता, सरकार वा शासन अशा अनेक प्रकारे केला वा लावला जातो. अनेकदा लोकांना वरचे पद किंवा सन्मान-प्रतिष्ठा, सेलिब्रिटी स्टेटस् वा ‘एलिट’ ऊर्फ प्रतिष्ठित-उच्चभ्रू स्थान हवे असते, तेसुद्धा त्यांची अधिकारव्याप्ती ऊर्फ पॉवर वाढविण्यासाठी. अर्थातच ‘पॉवर’ची क्षमता प्रत्येक स्तरावर बदलत जाते. शिवाय प्रत्येक ‘पॉवरप्राप्त’ माणूस त्याच्याहूनही अधिक पॉवर असलेल्या माणसापुढे लाचार वा लीन होतो. खरे म्हणजे, ती लाचारीसुद्धा त्या पॉवरबाज माणसाची कृपा प्राप्त करून आपले अधिकारक्षेत्र वाढविणे याच हेतूने केलेली असते. म्हणजेच वरवर लाचारी, अगदी लाळघोटेपणा आणि लोटांगणवृत्ती धारण करणारी माणसे गरीब, बिचारी असतात असे अजिबात नाही. ‘हाँजी, हाँजी’ करीतच दगाबाजीचे राजकारण करणाऱ्यांची इतिहासात अनेक उदाहरणे आहेत. त्यांनी त्यांची ‘पॉवर’ अशीच शरणाधीनतेचा अविर्भाव आणून मिळविलेली असते आणि एकदा अधिकार हातात आल्यानंतर ही माणसे कशी वागतात हे अगदी मंत्रालयापासून मल्टिनॅशनल कंपनीपर्यंत सर्वत्र आपल्या अनुभवाला येत असते. थोडक्यात ‘पॉवर’ किंवा अधिकार ही अनेकांचंी मानसिक, सामाजिक, कौटुंबिक, सांस्कृतिक आणि अर्थातच राजकीय गरज असते. तेव्हा ‘पदोन्नती’ वा प्रतिष्ठाप्राप्ती या नेहमीच वाटतात तितक्या निष्पाप, न्याय्य वा नैतिक भावनेतून येत नाहीत. कधी कधी त्या फक्त ‘शो’ पुरत्या वा ‘चमको’गिरीतून प्रतिष्ठेचे समाधान प्राप्त करण्यापुरत्या असतात हे खरे. पण त्या ‘चमको’गिरीच्या मुळाशीसुद्धा अनकॉन्शियसली पॉवर हीच मानसिक गरज असते. आपल्या प्रतिमेतून पॉवर मिळते असे त्यांना वाटत असते. ‘पॉवर’ची ही मानसिक-सामाजिक गरज आहे.

ही सामाजिक व मानसिक गरज प्राणिसृष्टीतही आहे. ज्यांनी कुत्रा-मांजर वा घोडा वा तत्सम माणसाळलेला प्राणी पाळलेला आहे, त्यांना सहज कल्पना येऊ शकेल, की तो प्राणी किती सहजपणे आपले अधिकारक्षेत्र त्या कुटुंबात प्रस्थापित करीत असतो. भल्याभल्या आणि करारी कुटुंबप्रमुखांना त्यांचा कुत्रा अगदी सहजपणे नमवीत असतो. अगदी क्रूर म्हणून ओळखले गेलेले हुकूमशहासुद्धा त्या गरीब बिचाऱ्या पाळीव प्राण्याला शरण जातात. परंतु त्या पाळलेल्या कुत्र्याची मिजास, मालकाच्या पाठिंब्यावर व जोरावर अवलंबून असते. कारमधून दिमाखाने जाणारा कुत्रा भटक्या कुत्र्यांकडे किती तुच्छतेने पाहतो हे सर्वानीच पाहिले आहे. पूर्वी अमेरिकेतील गोऱ्या जमीनदारांनी पाळलेले कुत्रे वा घोडे, त्यांच्या कृष्णवर्णीय ‘गुलामांशी’ किती तुसडेपणाने व क्रूरपणे वागत याची अनेक उदाहरणे अमेरिकन साहित्यात आहेत. माणसांनी निर्माण केलेला हिंस्र वंश-वर्णवाद त्या प्राण्यांमध्येही उतरलेला असे. आपल्या ‘अधिकारा’ची म्हणजेच ‘पॉवर’ची ही जाणीव जर प्राण्यांमध्ये रुजू शकते तर माणसांमध्ये का नाही? कुठेही आलिशान इमारत उभी करण्याचे काम चालू असेल, तर तेथे बिल्डिंग कामगारांच्या रस्त्यावर खेळणाऱ्या बिनधास्त मुलांकडे पाहा. ज्या क्षणी त्या इमारतीचा मालक वा कॉन्ट्रॅक्टर त्याच्या पॉश कारमधून त्या ठिकाणी पोहोचतो, तेव्हा त्या रस्त्यावरल्या लहान मुलालाही कळते, की आपल्यात आणि या माणसात काय फरक आहे. ‘सव्‍‌र्हण्ट्स क्वार्टर्स’मध्ये राहणाऱ्या नोकरांची मुले आणि आयएएस वा एखाद्या अन्य अधिकाऱ्याची मुले एकमेकांपासून काही यार्ड जवळ राहत असली तरी साधारणपणे खेळायला एकत्र नसतात. परिसरातच असलेली ही विषमता शाळेत, नोकरी-व्यवसायात आणि राजकारणातही शिरलेली असते.

ही विषमता आर्थिक असते आणि ‘जातीय’ही असते. परंतु मुख्यत: ही विषमता अधिकाराच्या असमतोलावर आधारित असते. म्हणूनच अधिकारात, ‘पॉवर’मध्ये समतोल व समानता आणायच्या प्रयत्नांना सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले. हल्ली ‘एम्पॉवरमेण्ट’ हा शब्द व संकल्पना खूपच प्रचलित (आणि फॅशनेबलही!) झाली आहे.

स्त्रियांचे, दलितांचे, आदिवासींचे, ओबीसींचे ‘एम्पॉवरमेण्ट’ करण्याचा विचार मुख्यत: रशियातील कम्युनिस्ट क्रांतीनंतर पुढे आला; परंतु खुद्द रशियन कम्युनिस्ट समाजात अधिकारांचा समतोल नव्हता. कम्युनिस्ट पक्षांमध्ये अगदी सुस्पष्टपणे दिसून येतो तो अंतर्गत अधिकार- अंमलबजावणीचा असलेला असमतोल! ही अधिकार व्याप्तीतील असमानता खुद्द कम्युनिस्ट रशियातही दूर करणे शक्य झाले नव्हते. समाजवादी नोकरशाहीतील उतरंड / चढण इतकी काटेकोर व कठोर होती, की त्यातून एक वेगळ्या प्रकारची वर्ग / जातव्यवस्थाच निर्माण झाली.

मिलोवान जिलास या युगोस्लाव कम्युनिस्ट विचारवंताने ‘द न्यू क्लास’ या त्याच काळात लिहिलेल्या ग्रंथात या समाजवादी व्यवस्थेतील विषमतेवर प्रखर प्रकाशझोत टाकला होता. पक्षाच्या व प्रशासनाच्या नोकरशाहीतील पद, दर्जा, प्रतिष्ठा व अर्थातच अधिकार याबद्दल असलेला भेदाभेद, मानापमानाच्या अपेक्षा आणि विषमता हे सर्व कम्युनिस्ट विचारसरणीत बसत नाही, असे जिलास यांचे म्हणणे होते. खासगी संपत्तीवर आधारलेली भांडवली व्यवस्था घालवून टाकल्यानंतरही ही विषमता असणे हीच नवी विकृती असल्याचे जिलास यांनी म्हटले होते. चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीनंतर माओंनाही हाच अनुभव आला. कम्युनिस्ट पक्षातील नोकरशहा, क्रांतिकाळातील पुढारी आणि प्रशासनातील अधिकारी यांनी सत्तेची सर्व सूत्रे ताब्यात घेतली आहेत आणि जनतेला त्यांच्यापासून मुक्ती मिळविण्यासाठी पुन्हा एकदा क्रांतीसिद्ध व्हावे लागेल, असे माओंनी आवाहन केले. ‘बॉम्बार्ड द हेडक्वार्टर्स’ ही घोषणा देऊन माओंनी सांस्कृतिक क्रांतीचे शिंग फुंकले. परंतु त्या सांस्कृतिक क्रांतीने विषमता निर्मूलनाऐवजी अराजकच माजविले. अधिकार क्षेत्र इतके विस्कटले गेले, की कुणाचेच नियंत्रण कुणावर राहिले नाही. पक्षाचा अधिकार आणि सरकारचे शासन पुन्हा प्रस्थापित करण्याचा प्रसंग चीनच्या कम्युनिस्ट लष्करावर आला.

लष्कराची रचना सर्वसाधारणपणे सगळीकडे एकाच पद्धतीची आहे. वरपासून खालपर्यंत अधिकारांची इतकी सूत्रबद्ध उतरंड लष्करात असते, की तशी समाजाच्या इतर कोणत्याच संस्थांमध्ये नसते. लष्करातील प्रत्येक व्यक्तीच्या खांद्यावर, छातीवर आणि कॉलरवर विविध प्रकारची चिन्हे असतात आणि त्यानुसार त्या व्यक्तीचा दर्जा पद व अधिकार निश्चित केलेला असतो. कुणी कुणाला कसा सॅल्युट करायचा येथपासून ते कुणी कुणाला ऑर्डर द्यायची याची सविस्तर नियमावलीच असते. ती न पाळल्यास कठोर कारवाई, अगदी कोर्टमार्शलही होऊ शकते.

अधिकारांचे हे वाटप आणि अधिकारशाहीची ही उतरंड बाकी समाजात लष्कराप्रमाणे नसते. तेथे वरकरणी ‘समता’ असते. म्हणजे एखादा माणूस केवळ आपल्या श्रीमंतीच्या जोरावर, आपल्या सामाजिक प्रतिष्ठेच्या नावाखाली आणि आपले सेलिब्रिटी स्टेटस् वापरून ‘ऑर्डर’ सोडू शकत नाही. याचा अर्थ लष्कर वा नोकरशाहीच्या बाहेर समाजात समता असते असे नाही तर तेथील पद, दर्जा, प्रतिष्ठा यावर आधारलेली उतरंड वेगळ्या प्रकारची असते. म्हणजे बऱ्याच प्रमाणात व्यक्तीला अधिक ‘स्वातंत्र्य’ आणि ‘ऑपरेशनल स्पेस’ असते. खासगी (विशेषत: कॉर्पोरेट) क्षेत्रातील उतरंड सरकारी नोकरशाही व लष्करासारखीच असली तरी तितकी जाचक नसते.

खासगी क्षेत्रातील अधिकाराची उतरंड ‘मॅनेजमेण्ट प्रिन्सिपल’वर आधारलेली असते. (म्हणजे असे निदान मानले जाते.) मॅनेजमेण्ट हे शास्त्र आहे, की कला म्हणजे ‘सायन्स’ आहे, की ‘आर्ट’ यावर गेल्या ५० वर्षांत खूप चर्वितचर्वण झाले आहे. व्यवस्थापन जर अनुरूप नसेल तर ती कंपनी, संस्था, पक्ष वा सरकार सगळेच कोसळते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सोविएत युनियन. महासत्ता असलेल्या सोविएत युनियनकडे सुसंघटित असे लष्कर आणि प्रशासकीय नोकरशाही व त्याचबरोबर अधिकारांची स्पष्ट मांडणी केलेली पक्षसंघटना होती; पण व्यवस्थापन नव्हते. त्यामुळे मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘ग्लासनोस्त’ व ‘पेरेस्त्रॉयका’ ऊर्फ लोकशाहीकरण व आर्थिक पुनर्रचनेला सुरुवात केली तेव्हा, घट्ट पीळ देऊन जाचकपणे बांधलेल्या सोविएत युनियनला, ते नवीन प्रयोग झेपले नाहीत. कम्युनिस्ट रशियात कुणीही अतिश्रीमंत वा धनदांडगा नव्हता आणि कुणीही पूर्ण गरीब वा अतिदरिद्री नव्हता. आर्थिक स्तरावरची उतरंड सुमारे नऊ पायऱ्यांची होती. समाजात सेलिब्रिटी संस्कृती, पेज थ्री, ग्लॅमर वर्ल्ड वगैरे प्रकार नव्हते. (ग्लॅमर असलेले नट-नटय़ा, लेखक, कलाकार असूनही!) बहुसंख्य लोकांना वैयक्तिक महत्त्वाकांक्षा नव्हत्या. व्यक्तिगत पातळीवर कुणी लक्षाधीश होणे शक्य नव्हते वा कुणी अफाट प्रसिद्धी मिळविणे शक्य नव्हते. (कारण सर्व मीडिया हा पक्ष व शासन नियंत्रित असे.) इतकी ‘सुनियंत्रित’ भासणारी सोविएत युनियन ही महासत्ता फक्त कोसळलीच नाही तर तिचे विघटन होताच, रशियासकट बहुतेक सोविएत प्रजासत्ताक राष्ट्रे एकदम तिसऱ्या जगातील अविकसित / विकसनशील देशांच्या पंक्तित येऊन बसली. अजून तरी कोणत्याही कम्युनिस्ट पक्षाने अधिकृतपणे सोविएत युनियनसारखे महाबलाढय़ राष्ट्र का लयाला गेले याबद्दल सुसूत्र असे स्पष्टीकरण दिलेले नाही. भांडवलशाहीच्या प्रत्येक बाजारपेठीय अरिष्टावर (मग ते १९२९ असो वा २००८) ओजस्वी भाष्य करणाऱ्या या पक्षांची प्रामाणिक आत्मपरीक्षण करताना मात्र वाचा बसते.

भारत (फाळणी होऊन) स्वतंत्र झाला तेव्हा बहुतेक पाश्चिमात्य विचारवंतांनी हा देश एकत्र राहू शकणार नाही, असे निश्चित स्वरूपाचे भाकित केले होते. काहींनी म्हटले, की पंडित नेहरू जिवंत असेपर्यंत देश तग धरेल आणि मग ‘बाल्कनाइज’ होईल म्हणजे विघटन होईल. आता पुढील महिन्यात भारत प्रजासत्ताकाची ५० वर्षे पूर्ण करील. भारताचे विघटन झालेले नाही, येथील लोकशाही टिकून आहे आणि सेक्युलर संरचनेला धक्के बसूनही भारताचे बहुसांस्कृतिकत्व, बहुधार्मिकत्व आणि बहुभाषिक स्वरूप टिकून आहे.

काहींच्या मते याचे श्रेय राज्यघटनेला आहे, तर काहींच्या मते भारताची जातीव्यवस्था (जात नाही ती जात!) ही देशाचे अधिकार उतरंडीचे तोल सांभाळते. इतर (पाश्चिमात्य) देशातील विषमतेचे स्वरूप मुख्यत: वर्गीय आहे. म्हणजे मुख्य निकष आर्थिक आहे. पण भारतातील विषमता जन्मत:च जातीपासून सुरू होते.

जाती-जातीतील उतरंड इतकी सविस्तर आहे आणि तथाकथित उच्चनीचतेचा भाव इतका सखोल आहे, की त्यांच्या भिंती अजून तरी कोसळलेल्या नाहीत. किंबहुना मंडल आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी सुरू झाल्यावर तर समता / समानता प्रस्थापित होण्याऐवजी जातीव्यवस्थाच अधिक घट्ट व कठोर झाली आहे.

पद, दर्जा, प्रतिष्ठा, मानापमान आणि कोण कुणाचा मान करणार वा कोण कुणाला मान देणार याचे निकष अजूनही पाळले जात आहेत. मोठय़ा शहरांमध्ये ते तितक्या उघडपणे दिसत नाहीत; पण उर्वरित भारतीय समाज मात्र ती (मनूनिर्मित!) उतरंड बऱ्यापैकी काटेकोरपणे पाळतो. मात्र गेल्या २० वर्षांत वाढलेली एक तरुण पिढी बहुतेक वेळा या सामाजिक उतरंडीबाहेर व्यवहार करते. पैसे वा जात हे दोन निकष वगळून अधिकार (कोणत्याही क्षेत्रात) प्रस्थापित करण्यासाठी इतर मार्ग चोखाळणे लोकांना अपरिहार्य बनते. त्यातूनच प्रतिष्ठेचे नवे ‘अ‍ॅव्हेन्यूज’ वा मार्ग तयार व्हायला लागतात.

या नव्या ‘अ‍ॅव्हेन्यूज’बरोबर येतात प्रतिष्ठेच्या व अधिकाराच्या पर्यायी संकल्पना. जे केवळ गुणवत्तेच्या वा कर्तबगारीच्या जोरावर आपली प्रतिमा व स्टेटस् प्रस्थापित करू शकत नाहीत वा पैशाने / जातीने मान-सन्मान व खरा आदर प्राप्त करू शकत नाहीत, त्यांना ‘सेलिब्रिटी मॅनेजमेण्ट’ पासून ते सांस्कृतिक सत्ता प्रस्थापित करण्याच्या मार्गाने जावे लागते.

आपल्या समाजात राजकीय वर्गाला आणि नोकरशाही व्यवस्थेला समांतर जाणारी अशी ही सांस्कृतिक सत्ता आहे. या सत्तेकडे अधिकार नाहीत; पण प्रतिष्ठा आहे आणि राजकीय वर्ग व नोकरशाहीकडे अधिकार आहेत; पण त्यांना सामाजिक / सांस्कृतिक मान्यता समाजात नाही. ही दरी दूर करण्याचे जुजबी प्रयत्न शासनाकडून होत असतात- सभा, संमेलन, पुरस्कार, सत्कार यांच्या आधारे सांस्कृतिक सत्तेला ‘अ‍ॅकोमोडेट’ वा ‘को-ऑप्ट’ करण्याचे हे प्रयत्न असतात. प्रत्यक्षात ती दरी वाढत चालली आहे. राजकीय वर्गाभोवती असलेले वलय फिकट होऊ लागले आहे आणि सांस्कृतिक वर्ग सवंगपणाकडे (मीडियामुळे!) झुकू लागल्यामुळे एका नव्या अराजकाच्या पर्वाला सुरुवात झाली आहे. प्रत्येकाला असे वाटते आहे, की या अराजकात टिकून राहायचे तर अधिक यशस्वी होत, चढणीवर वर-वर जात राहिले पाहिजे, नाहीतर आपण दुर्लक्षित / उपेक्षित राहू! म्हणूनच अदनान सामी कळवळून म्हणतो

‘‘ऐसे-वैसोंको दिया है- मुझको भी तो लिफ्ट करा दे।’’



‘पॉवर ड्राइव्ह’

भूक, तहान, सेक्स याहीपेक्षा इतरांवर व परिसरावर अधिकार प्रस्थापित करण्याची माणसाची इच्छा जबरदस्त असते. जरी हा ‘पॉवर ड्राइव्ह’ राजकारण्यांमध्ये प्रकर्षांने दिसत असला तरी प्रत्यक्षात तो अनेक उद्योगपती, कॉपरेरेट एक्झिक्युटिव्हज उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी किंवा सेलिब्रिटीज यांच्यामध्येही तसाच आढळतो. हा ‘पॉवर ड्राइव्ह’ माणसाच्या मनात कसा निर्माण होतो हा एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकेल. येथे फक्त एक संदर्भ देता येईल मायकेल फुको या प्रसिद्ध फ्रेंच विचारवंताने ‘पॉवर’ ही कशी एक महत्त्वाची प्रेरणा आहे, यावर सखोल चिंतन केले आहे. अर्थातच या लेखात मायकेल फुको यांच्या एका पुस्तकाचा उल्लेख मी करीत असलो तरी हे त्यावरचे भाष्य व निरूपण नव्हे. उदाहरणार्थ त्यांचा ‘पॉवर- नॉलेज’ हा शोधनिबंध संग्रह या संदर्भात विशेष अभ्यासनीय आहे.

कुमार केतकर
शनिवार, ५ डिसेंबर २००९

No comments:

Post a Comment