जगण्याचीही सक्ती आहे..

पुन्हा एकदा जीवन जगायची संधी मिळाली, तर बहुतेकजण वेगळे काहीतरी मागतील. मुद्दा अर्थातच पुनर्जन्माचा नाही, तर जगण्याला पर्याय होता का, हा आहे. जवळजवळ सर्वाच्याच जीवनप्रवासात काहीतरी अनपेक्षित घडलेले असते. मनात ठरविलेला मार्ग बदलावा लागतो. इच्छेला मुरड घालावी लागलेली असते. महत्त्वाकांक्षा मोडून पडलेली असते. इच्छेविरुद्ध लग्न करावे लागलेले असते, वा इच्छेप्रमाणे लग्न झालेले असले तरी दोघांना एकत्रपणे वा स्वतंत्रपणे वेगळेच जीवन ‘नशिबी’ आलेले असते. मुलांनी अपेक्षाभंग केलेला असतो वा मुले त्यांच्या जीवनात वेगळ्याच मार्गाने गेलेली असतात. सगळ्याच गोष्टी निराशाजनक असतात, असे अजिबात नाही. गरिबीत जीवन कंठलेली माणसे त्यांच्या मध्यमवयीन काळात श्रीमंत झालेली असतात. सामान्य कुवतीचा म्हणून मानला गेलेला मुलगा वा मुलगी असामान्य कर्तृत्व दाखवू शकते. अनेक प्रकाशकांनी वा वृत्तपत्रांनीही उपेक्षा केलेला लेखक वा कवी प्रचंड कीर्ती संपादन करू शकलेला असतो. (जॉर्ज बर्नार्ड शॉने लिहिलेली सुमारे एक डझन हस्तलिखिते बऱ्याच प्रकाशकांनी आभारही न मानता परत केली होती. पुढे कधीतरी ‘ब्रेक’ मिळाल्यानंतर आणि प्रसिद्धी प्राप्त केल्यानंतर ते अप्रकाशित साहित्य प्रसिद्ध करण्यासाठी प्रकाशकांमध्ये अहमहमिका लागली होती!) प्रत्येकाच्या जीवनाला कलाटणी देणारा एखादा क्षण असतो, एखादी घटना असते वा एखादी व्यक्ती असते-ज्यामुळे जीवनाचा मार्गच बदलून जातो.


बहुतेक आत्मचरित्रांमध्ये अशी कलाटणी देणारी घटना वा व्यक्ती, एखादा ‘कट ऑफ पॉइंट’ असतो. कुणी अगदी ‘गोल्ड मेडलिस्ट’ डॉक्टर वा इंजिनीअर होतो, पण ते करिअर सोडून तो संगीत, चित्रकला, नाटक वा चित्रपटाकडे वळतो आणि त्यातच रमतो. कुणी आकस्मिक आलेल्या संधीमुळे देश सोडून अमेरिका वा अन्यत्र कुठेतरी जातो आणि तेथे पैसा, कीर्ती, सुखी जीवन संपादन करतो. काही थोडय़ांना खरोखरच लॉटरी लागते, इस्टेट मिळते, अनपेक्षितपणे त्यांच्या जागेची/जमिनीची किंमत प्रचंड प्रमाणात वाढते वा श्रीमंत नवरा वा बायको मिळते. असे सुखद अपघात ऐहिक जीवनाची सोय लावतात आणि जीवनातील बरेच संघर्ष कमी करतात, परंतु एकूण सर्वाचेच आयुष्य अनपेक्षित वळणे घेऊन आकारत जाते. अगदी अपवादात्मक व्यक्तींना ‘प्लॅन’ करून त्यानुसार अवघे जीवन जगणे शक्य होते, परंतु अशा व्यक्तींना आपल्या आयुष्यात काही नाटय़मय घडलेच नाही, असेही वाटत राहते. अर्थातच नाटय़ाच्या शोधात राहून नाटय़मय काही होत नसतेच. अशा अनपेक्षितता, कलाटणीचे प्रसंग सांगून येत नसल्यामुळे ज्योतिषांना ‘काम’ मिळते. अगदी ‘अचूक’ भविष्य सांगणारे ज्योतिषीसुद्धा अंदाजच सांगत असतात. कधी ते बरोबरही येतात, पण तेही अनपेक्षितपणे. प्रत्येक भविष्य १०० टक्के अचूक सांगणारा ज्योतिषी असेल, तर अनपेक्षितताच संपून जाईल, मग नाटय़मयही काही असणार नाही आणि ‘नाटय़’ अगोदरच कळले तर कलाटणीही मिळणार नाही. सगळ्यात अनपेक्षित बाब असते ती म्हणजे मृत्यू. तो कसा, केव्हा व कुठे कुणाला गाठेल हे सांगणे जवळजवळ अशक्य असते. अनेकांच्या जीवनाला कलाटणी मिळालेली असते ती वडिलांच्या वा आईच्या, भावाच्या वा बहिणीच्या वा अन्य कुणाच्या तरी मृत्यूमुळे. आपण सर्वच जण मर्त्य आहोत, या आकलनामुळेही मृत्यूचे गूढ दूर होत नाही.

या लेखाच्या सुरुवातीला उपस्थित केलेला प्रश्न : पुन्हा एकदा जीवन जगायची संधी मिळाली तर काही वेगळे मागाल की हेच जीवन पुन्हा जगावेसे वाटेल? या प्रश्नात तो मृत्यू गृहीत धरलेला नसतो. प्रत्यक्षात त्या जीवनप्रवासातील तो शेवटचा टप्पा असतो आणि बहुतेक वेळा जे जीवन आपल्या ‘वाटय़ाला’ आलेले असते, त्यानुसारच त्याची अखेरही ठरत जाते. उदाहरणार्थ, सैन्यात दाखल होणारे सगळेच युद्धात मरण पावत नाहीत. पण सरासरीच्या हिशेबात ती शक्यता जास्त गृहीत धरली जाते. एका फायर ब्रिगेड अधिकाऱ्याने या संबंधात केलेले निरूपण उद्बोधक आहे. तो म्हणतो की, फायर ब्रिगेडमधल्या जवानावर जीव वाचवायची जबाबदारी असते. मग तो जीव हिंदूचा असो वा मुसलमानाचा, स्त्रीचा वा पुरुषाचा, तरुणाचा वा वृद्धाचा, इतकेच काय, कुत्र्याचा वा गायीचा. फायर ब्रिगेडचा जवान रोजच स्वत:चा जीव धोक्यात घालून कुणाचा तरी प्राण वाचवत असतो. त्यासाठीच त्याला पुरस्कार देऊन त्याचा सन्मान केला जातो. याउलट सीमेवरच्या सैनिकाला वा युद्धातील जवानाला शत्रूचा प्राण घेण्यासाठी सन्मानचक्र प्राप्त होते. तुलनेने सैनिकापेक्षा फायर ब्रिगेडचा जवान जास्त वेळा जीव धोक्यात घालतो. असे असूनही अधिक सन्मानपूर्वक मरण सैनिकाचे मानले जाते.

जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी जगातील युद्ध कायमचे मिटविण्याचा एक सोपा मार्ग सुचविला होता. कोणत्याही देशाने संहारक शस्त्रास्त्रांचे उत्पादन करायचेच नाही आणि कुणीही सैन्यात दाखल व्हायचे नाही! मग समाजात उरतील त्या तात्कालिक मारामाऱ्या, खून वा दरोडे इत्यादी. परंतु युद्ध मात्र कायमची संपतील. किमान पाच-सात हजार वर्षे हा पर्याय माणसाने पत्करलेला नाही. रामायण- महाभारत असो, वा ख्रिस्तपूर्व समाजातील संग्राम, शांततेचा संदेश देणारे धर्म असोत वा सद्बुद्धी देणारे देव- अजून तरी कुणी युद्ध वा संहार थांबवू शकलेले नाहीत.

किंबहुना जसजसे सिव्हिलायझेशन प्रगत होत गेले आहे, तसतशी युद्धेही वाढत गेली आहेत आणि त्याबरोबर संहारही. आता तर युद्ध आणि शिवाय दहशतवाद असे दुहेरी आव्हान अक्राळविक्राळपणे सर्वाच्या समोर ठाकले आहे. म्हणजेच अनपेक्षितता, आकस्मिकता आणि असुरक्षितता वाढली आहे.

सर्वसाधारणपणे असे मानले जात होते की, समाजवाद प्रस्थापित झाला की जीवन स्थिर, सुरक्षित आणि नियोजनबद्ध होऊ शकेल. बाजारपेठीय भांडवली व्यवस्थेमुळे अनिश्चितता व अस्थैर्य येते आणि ती व्यवस्था दूर करून त्या ठिकाणी जर हितसंबंधरहित असे साम्यवादी व्यवस्थापन आले तर लोक त्यांच्या इच्छेप्रमाणे सर्जनशीलपणे जगू शकतील. ‘जगण्याचीही सक्ती आहे आणि मरणाचीही सक्ती आहे,’ या चालीवरचे नियतीनिष्ठित व इच्छेविरुद्धचे जीवन जगावे लागणार नाही.

जगाच्या ६५० कोटी लोकांपैकी प्रत्येक व्यक्तीला जगण्याच्या जाचातून मुक्त होता आले, म्हणजे त्यांच्या सर्व जीवनावश्यक गरजा व्यवस्थितपणे पूर्ण झाल्या, तर ती व्यक्ती संगीतसाधना वा वैज्ञानिक संशोधन, चित्रकला वा तत्त्वज्ञान, कविता वा गिर्यारोहण-ज्यात तिला रस वा गती आहे ते करू शकेल. साधारणपणे सुखी, समाधानी समाजाचे आणि व्यक्तीचे ते (शक्य कोटीतले) चित्र होते. हितसंबंधांचा पाया मुख्यत: खासगी संपत्ती म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टीत होता. खासगी संपत्तीवर आधारित असलेली समाजरचना, कुटुंबपद्धती आणि अर्थातच शासन/राजकारण असल्यामुळे सर्व प्रश्न निर्माण झाले आहेत असे गृहितक आहे व होते. तशा प्रकारची खासगी संपत्तीरहित समाजरचना व जीवनरचना निर्माण करण्याचा पहिला प्रयत्न तरी फसला आहे. त्या प्रयोगातही रशियन समाजवाद, चिनी समाजवाद वा पूर्व युरोपियन समाजवाद अशा विविधता होत्या. पण विसाव्या शतकातला तो प्रयोग फसल्यामुळे असे मानले जाऊ लागले की, आता बाजारपेठीय भांडवली व्यवस्थेला पर्याय नाही. मुद्दा अर्थातच केवळ भांडवलशाही वा समाजवाद हा नाही, तर लेखाच्या सुरुवातीला उपस्थित केलेल्या प्रश्नाशी निगडित आहे. आपल्याला पुन्हा जीवन जगायची संधी मिळाली तर आपण काय मागू हा तो प्रश्न. या प्रश्नातच असे गृहीत आहे की, बहुतेक लोकांना वाटत असते की आपल्याला ‘चॉइस’ विचारला असता तर आपण कोणता तरी अन्य पर्यायी जीवनमार्ग स्वीकारला असता. म्हणजे कौटुंबिक-सामाजिक-आर्थिक परिसर जर जाचक नसेल, परिस्थिती अनुकूल असेल तर आपल्या इच्छेप्रमाणे सर्जनशील वा किमान समाधानी जीवन जगणे शक्य आहे. समाजवादाचा ‘यूटोपिया’ किंवा आदर्शवादी संकल्पना त्यातून जन्माला आली होती.

मग एकूण तो ‘यूटोपिया’ प्रत्यक्षात (अजून तरी) का आलेला नाही? कधीतरी भविष्यात त्या आदर्शसदृश समाजाची निर्मिती होईलही, परंतु आज तरी कोणाकडेही निश्चित ‘रोडमॅप’ नाही. तसा ‘रोडमॅप’ नसण्याचे मुख्य कारण ‘माणूस’ हे प्रकरण नक्की काय आहे, हे अजून कुणाला निश्चित कळलेले नाही. अर्थातच म्हणून काहीतरी चांगले, उपकारक, समाजोपयोगी असे प्रयत्न थांबलेले नाहीत, थांबवावेत असेही नाही आणि थांबणारही नाहीत. प्रश्न इतकाच की, सर्वसमावेशक असे उत्तर (वा थिअरी) असू शकेल का? सुमारे तीन हजार वर्षांपूर्वी म्हणजे ग्रीसमध्ये वा रामायण- महाभारतात असे प्रतिपादन केले गेले की व्यक्तीचे चारित्र्य, नीतीमत्ता हे मूळ आहे आणि प्रशासकीय चौकट (म्हणजेच राजकारण- सत्ताकारण) ही सामाजिक गरज आहे. प्लेटोचे ‘रिपब्लिक’ आणि सॉक्रेटिसचे संवाद असोत, वा रामायणातील भाष्य आणि भगवद्गीतेतील उपदेश असोत. प्रश्न एकच- व्यक्तीचे जीवन आणि समाजाचे नियोजन कशा प्रकारे सिद्ध करता येईल. (अजूनही ती ‘गीता’ हाच आदर्शवत ग्रंथ असेल तर तीन-चार हजार वर्षांंत आपण काहीच शिकलो नाही, असे मानावे लागेल. म्हणजे संपूर्ण ‘सिव्हिलायझेनल प्रोजेक्ट’ व्यर्थ ठरेल किंवा असे मानावे लागेल की इतका अनुभव घेऊनही अजून मूळ सूत्रे तशीच अबाधित आहेत आणि ‘यूटोपिया’ अस्तित्वात यायला बराच अवधी आहे, पण बराच म्हणजे किती अवधी?)

नीतिमत्ता व चारित्र्य आणि राजकीय-सामाजिक प्रशासन/व्यवस्थापन हे निकष व गरजा आजही तितक्याच चर्चेत असतात. पुढे पुढे नीतिमत्ता म्हणजे काय, तिचे नियम कुणी ठरवायचे आणि ती नीतिमूल्ये कशामुळे निर्माण झाली, हे प्रश्न उपस्थित झाले. खरे बोलावे-खोटे बोलू नये, प्रामाणिक असावे-फसवू नये, चारित्र्य (विशेषत: स्त्री-पुरुष संबंधातले) ‘शुद्ध’ असावे, हे नैतिकतेचे निकष, तर समाजात शिस्त असावी, कायद्याचे पालन केले जावे, न्यायव्यवस्था असावी आणि न्यायालयीन आदेश पाळले जावेत हे प्रशासकीय नियम. अर्थातच कोणत्याही व्यवहारात फसवाफसवी होऊ नये, ही जबाबदारी व्यक्तीची आणि प्रशासनाचीही. म्हणूनच कायदेकानू, पोलीस यंत्रणा, न्यायव्यवस्था, प्रशासन.

जगातील बहुतेक कलह वा थेट संघर्ष कुठून ना कुठून जोडले जातात आणि ते खासगी संपत्तीसंबंधातच असतात. (कोकणातील प्रत्येक सामान्य/गरीब कुटुंबाचा एक तरी तगादा न्यायालयात असतोच. प्रत्येक ‘कॉपोरेट हाऊस’चे कुठचे ना कुठचे प्रकरण कायम न्यायालयात असते. दोन भाऊ, नवरा-बायको, मित्र व व्यावसायिक सहकारी यांचेही संवाद वा विसंवाद बरेच वेळा खासगी संपत्तीसंबंधातील खडकावर येऊनच आदळतात.) समाजवादी व्यवस्थापनात खासगी संपत्तीच नसेल आणि त्यामुळे कलहाचे मूळच नष्ट होईल, हा समज (तर्कशुद्ध असूनही) सोविएत युनियन व कम्युनिस्ट चीनमध्ये बऱ्याच अंशी खोटा ठरला.

तेथे असाही प्रश्न उपस्थित झाला होता की खासगी संपत्ती म्हणजे नक्की काय? कारखाना, व्यापार, शेती, जमीनजुमला, बंगला, मोटार, दागिने इत्यादी खासगी संपत्ती आहे हे सांगायला फारशा अर्थशास्त्रीय ज्ञानाची गरज नाही. परंतु पुढे-पुढे एखादे अधिकारपद, त्या पदाबरोबर येणारी भलीमोठी केबिन, त्या पदाबरोबर येणाऱ्या कार-बंगला व इतर सुविधा व त्याहीपेक्षा विशेष म्हणजे इतरांवर अधिकार गाजवायची अधिकृत परवानगी याबद्दल काय?

मागील लेखात म्हटल्याप्रमाणे काही माणसांना पैशापेक्षा वा मालकी हक्कापेक्षाही अधिकारपद, प्रतिष्ठा आणि ‘स्टेटस्’ अधिक महत्त्वाचे वाटते. म्हणूनच चीनमधील सांस्कृतिक क्रांतीमध्ये असा अधिकार हाही खासगी संपत्तीइतकाच घातक मानला गेला होता. लष्करप्रमुख असणे, कॉर्पोरेट सीएमडी असणे, अध्यक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री असणे, एखाद्या पक्षाचा वा संस्थेचा चेअरमन असणे, याला प्रचंड खासगी संपत्ती असण्यापेक्षाही जास्त महत्त्व असते. म्हणूनच सर्व प्रकारची खासगी मालमत्ता आणि मालकी हक्क पूर्णपणे नष्ट केल्यानंतरही रशिया व चीनमध्ये अतिशय हिंस्र सत्तासंघर्ष झालाच. पूर्वीही गौतमबुद्धाच्या अहिंसेच्या, नि:संगतेच्या, नि:स्वार्थाच्या शिकवणीचा प्रभाव कमी होताच, त्यात पंथ निर्माण होऊन कलह, संघर्ष, युद्ध झालेच. ते संघर्ष ‘प्रॉपर्टी’ वा ‘ओनरशिप’ राइटस्पेक्षा अधिकाराच्या, सत्तेच्या, पदाच्या लोभापायी झाले होते. अगदी श्री अरविंद यांच्या पाँडिचरी आश्रमात असो, वा सवरेदयी सर्व सेवा संघात, चर्च संस्थांमध्ये असो वा मंदिरांच्या ट्रस्टीज्मध्ये, पक्षांच्या अधिकृत नेतेपदाचा मुद्दा असो वा निवडणुकीचे तिकीट मिळण्याचा-सर्व ठिकाणी मुद्दा येतो तो अधिकारपदाचा. अगदी नि:स्वार्थी, नि:स्पृह आणि निष्ठावान अधिकारी आपापल्या खात्यात वा कंपनीत वा संस्थेत किती बेपर्वाईने, असंवेदनशील पद्धतीने आणि क्रूरपणेही वागतात हे सर्वाना माहीत आहे वा अनुभवले आहे. म्हणजेच केवळ खासगी संपत्ती व मालकी हक्क यावर नियंत्रण ठेवून वा ते नष्ट करून सामाजिक अन्यायाचे, विषमतेचे मूळ कारण नष्ट होत नाही. भांडवलशाहीचे अर्थशास्त्र हेच मूळ कारण नाही (ते बव्हंशी असले तरीही) तर त्याही पलीकडे विचार व्हायला हवा, असे मानले जाऊ लागले.

त्यातून नैतिकता, सांस्कृतिकता आणि माणसाचा ‘स्वभाव’ या मुद्यांकडे लक्ष वेधले गेले, परंतु नैतिक- अनैतिक ठरवितानाच गोची होऊ लागली. स्त्री-पुरुष संबंधातली नैतिकता तर इतकी गुंतागुंतीची झाली की ती सर्व धर्मशास्त्रे, अर्थशास्त्र, प्रशासन, कायदा यांना झुगारून पलीकडे जाऊ लागली.

तीच गोष्ट सांस्कृतिकतेच्या मुद्यावर निर्माण झाली. ‘संस्कृती’ हे सर्व मानवजातीला एकवटण्याचे साधन होण्याऐवजी, साहित्य-कलांची वैश्विकता आवाक्यात घेण्याऐवजी आणि वैज्ञानिक चिंतनातील कलात्मक आनंद सर्वत्र पोचविण्याऐवजी त्यात ‘तू तू-मै मै’च्या दर्जाचे वाद उत्पन्न झाले. ‘द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’चा सिद्धांन्त त्यातूनच पुढे आला. शिवाय संस्कृतीचा ढाचा व कळस म्हणजे ‘सुपरस्ट्रक्चर’ आणि अर्थकारण/राजकारण हा सिव्हिलायझेशनचा पाया-म्हणजे ‘इन्फ्रास्ट्रक्चर’ असा विचार पुढे आला. त्यामुळे पुन्हा नीतिमत्ता, चारित्र्य, संस्कृती, सर्जनशीलता, कला यांना राजकारणाने व अर्थकारणाने वेढले. अजूनही त्या चक्रव्यूहातून बाहेर पडायचा मार्ग कुणालाही सापडलेला नाही!
कुमार केतकर
शनिवार, १२ डिसेंबर २००९

No comments:

Post a Comment