भटकत फिरलो भणंग आणिक..

भटकत फिरलो भणंग आणिक..
काही दिवसांपूर्वी कुमार गंधर्वाचे चिरंजीव, मुकुल शिवपुत्र भोपाळच्या एका देवळात अतिशय विपन्नावस्थेत आढळले. डोळे खोल गेलेले, दाढी कशीही वाढलेली, केस पिंजारलेले, कपडे फाटलेले, पोट खपाटीला गेलेले आणि चेहरा भकास, शून्याच्याही पलीकडे अथांगात गेलेली नजर! कुणीतरी पाहिले, ओळखले, मुकुलनेही उदास-हताश अवस्थेत आपण कोण आहोत ते सांगितले. हा हा म्हणता बातमी मीडियामुळे देशभर पसरली. मध्य प्रदेश सरकारने मुकुलला स्वत:च्या अखत्यारात घ्यायचे ठरविले. पोलीस आणि सरकारी अधिकारी त्या देवळापाशी पोहोचले. तेथे त्या वर्णनानुसार कुणीच नव्हते. दोन दिवसांनी मुकुल हा तशाच विषण्ण अवस्थेत होशंगाबाद रेल्वे स्टेशनवर आढळला. मुकुलला हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले; परंतु मध्यरात्री मुकुल हॉस्पिटलमधून पुन्हा निघून गेला. (आता तो परत सापडला आहे..)मुकुलच्या या वागण्याचे विविध अर्थ लावले गेले आहेत. काही म्हणतात तो असाच भणंग आहे, त्याचे चित्त भरकटलेले आहे, तो वेडा आहे, त्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झाला आहे, एखादे वेळेस ‘न्यूरॉलॉजिकल प्रॉब्लेम’ असेल, त्याचे मन कुटुंबात, समाजात लागत नाही, त्याला पैसे, लोकप्रियता, त्याच्या गाण्याचे कौतुक यापैकी कशाचेच आणि काहीच वाटत नाही.मुकुलचे गाणे किती विलक्षण आहे, गंगूबाई हंगल म्हणतात त्याप्रमाणे त्याच्या आवाजात दैवी अंश कसा आहे, त्याच्या गाण्यात असलेली सर्जनशीलता कशी अपूर्व आहे, हे ज्यांनी मुकुलचे गाणे ऐकले आहे त्यांनी अनुभवलेच आहे. मग अशी ‘क्रिएटिव्हिटी’ असलेला हा माणूस असे का वागतो? तो इतका ‘जीनियस’ आहे तर त्याला इतकेही कळू नये?हा प्रश्न मुकुलच्या निमित्ताने पुन्हा उपस्थित झाला असला तरी मानसशास्त्रज्ञ आणि न्यूरॉलॉजिस्ट्स् त्याच्यावर गेली बरीच वर्षे आणि संशोधन करीत आहेत. कित्येक लेखक, कवी, गणितज्ज्ञ, विचारवंत, अभिनेते, अभिनेत्री इतकेच काय काही वैज्ञानिकही मुकुलइतकेच वा अधिकही विक्षिप्त असल्याचे आढळून आले होते.
म्हणूनच मनोविश्लेषण, ब्रेन-वेव्ह टेक्नॉलॉजी, मेंदूच्या आत असलेले संदेशवहनाचे स्वरूप, एकूणच शरीर आणि मन यांचे द्वैत आणि अद्वैत यावर आता बरेच काही मुद्दे नव्याने प्रकाशात येत आहेत। अशा सर्जनशील व्यक्ती कधी वेडय़ा होतात, कधी ती क्रिएटिव्हिटी गमावून बसतात, कधी भरकटतात आणि काही वेळा आत्महत्या करतात. व्हॅन गॉग या युगप्रवर्तक चित्रकाराला अशाच अस्वस्थतेने घेरलेले होते; तशा बहकलेल्या अवस्थेत त्याने स्वत:चा कानही कापून घेतला होता. (याबद्दल वाद आहेत) आणि वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने स्वत:वर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली. अर्नेस्ट हेमिंग्वेनेही आत्महत्या केली. इंग्लिश लेखक जॉर्ज ऑर्वेल, संगीतकार बिथोवेन, कादंबरीकार हर्मन मेलविल अशी तऱ्हेवाईक, भणंग, वेडसर पण ‘जीनियस’ माणसे कितीतरी आहेत. कौटुंबिक, सामाजिक परिसरात विक्षिप्तपणे वागणारी, अनेकदा आपल्याला ‘ऑक्वर्ड’ परिस्थितीत टाकणारी, काही वेळा आपल्यालाच अडचणीत आणणारी ही माणसे कधी मनोरुग्ण म्हणून तर कधी (‘असतो एकेकाचा विचित्र स्वभाव, सोडून द्या!’) ठार वेडी म्हणून ओळखली जातात. (‘अ ब्युटिफुल माइंड’ या जॉन नॅश या नोबेलविजेत्या गणितीच्या भासविश्वाविषयीचा आणि स्किझोफ्रेनियाविषयीचा चित्रपट हे उत्तम उदाहरण मानता येईल.)अशा माणसांचे मनोविश्लेषण करून आणि त्यांच्या मेंदूचा अभ्यास करून, असा तर्कसिद्धांत मांडला जाऊ लागला, की सर्जनशीलता आणि तऱ्हेवाईकपणा, प्रज्ञा आणि वेडेपणा म्हणजेच ‘क्रिएटिव्हिटी’ आणि ‘जीनियस’ या ‘इनसॅनिटी’शी म्हणजे भणंग- वेडसरपणाशी निगडित आहेत. (परंतु याचा अर्थ असा नाही, की सर्व विक्षिप्त वागणारी, वेडसर, भणंग माणसे ‘क्रिएटिव्ह’ किंवा ‘जीनियस’ असतात. त्याचप्रमाणे असाही अर्थ नाही, की तसा प्रज्ञावान वा सर्जनशील माणूस हा थोडाफार ‘क्रॅक’ असायलाच हवा. काही माणसे आपल्या तऱ्हेवाईक वागण्याला आपण इतरांपेक्षा वेगळे, अफाट प्रज्ञावंत आणि सर्जनशील असल्यामुळे तसे वागतो, असे स्वत:च समर्थन देतात. काही स्वत:च्या बेबंद व बेजबाबदार वागण्याचे तसे समर्थन देतात. तेव्हा हेही लक्षात ठेवायला हवे, की अनेक जीनियस आणि क्रिएटिव्ह व्यक्ती या अगदी नॉर्मलही असतात.)मुद्दा इतकाच, की कुणालाही ‘वेडा’ ठरविताना आपल्याला त्या व्यक्तीच्या मनस्थितीचे, त्याच्या परिस्थितीचे, समाजाचे भान असायला हवे. त्या त्या माणसाच्या ‘सेल्फ इमेज’ आणि ‘प्रोजेक्टेड इमेज’च्या आधारे जाऊन चालणार नाही.वेडय़ांचे हॉस्पिटल हा कधी विनोदाचा तर कधी करुणेचा विषय असतो; परंतु ज्यांच्या घरात असे वेडे, अर्धवट, भरकटलेले, भणंग, उदास, एकारलेले, एकलकोंडे, विक्षिप्त, विचित्र, तोल गेलेले कुणी असते तेव्हा त्या कुटुंबातील विषण्णता विलक्षण असते. असे फारच कमी ‘वेडे’ आहेत की जे उपचारानंतर पूर्ण व्यवस्थित झाले. वेडय़ांच्या हॉस्पिटलमध्ये अशा रुग्णांना फार काळ ठेवले जात नाही. पूर्वी वेडय़ांना गुन्हेगारांप्रमाणे तुरुंगातच टाकले जात असे. परंतु इतर कैद्यांना वेडय़ांपासून उपसर्ग होतो हे लक्षात आल्यावर वेडय़ांसाठी वेगळे दालन केले जाऊ लागले. हे तथाकथित ‘अधिकृत’ वेडे झाले. मतिमंदांना, गतिमंदांना फिट्स येणाऱ्यांना, ऑटिझमग्रस्त असलेल्यांना, औदासीन्याच्या गर्तेत सापडलेल्यांना आपण त्या अर्थाने ‘वेडे’ म्हणत नाही. भरकटलेल्यांना, घरातून पळून जाणाऱ्यांना, हिमालयात वा अन्य कुठे एकांतात आकस्मिकपणे निघून जाणाऱ्यांना, भरलेले घर आणि सुस्थित कुटुंब एकदम सोडून कुठच्या गुरूच्या, अध्यात्माच्या, साक्षात्काराच्या वा ‘सत्या’च्या शोधात जाणारीही माणसे असतात. त्यांनाही कुणी ‘अधिकृत’ वेडा म्हणून ठरवीत नाही.मग वेडा कोण? भरकटलेला- भणंग कोण? तो ‘शहाणा’ नाही हे कोण वा केव्हा ठरविते? काही क्रिमिनॉलॉजिस्ट्स, म्हणजेच गुन्हाशास्त्रज्ञ तर असे मानतात, की सर्वच गुन्हेगार गुन्हा करण्याच्या प्रवृत्तीचे नसतात. त्यांच्या मते ‘गुन्हा’ हासुद्धा मानसिक समतोल बिघडल्याचाच आविष्कार आहे. म्हणून ते तज्ज्ञ गुन्हेगारांनाही मनोरुग्ण मानतात. आल्फ्रेड हिचकॉकच्या ‘द सायको’ चित्रपटातील खुनी हा स्किझोफ्रेनिया, म्हणजे दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाने पछाडलेल्या मनोरुग्ण आहे. अशा काही मनोरुग्णांमध्ये दोनच नव्हे तर अनेक व्यक्ती एकाच शरीरात वास्तव्य करून असतात आणि त्या एकमेकांना ‘ओळखत’ही नाहीत.‘हे सर्व साहित्यिक कल्पनाविश्व आहे आणि अशा गुन्हेगारांचे जास्त लाड करता कामा नयेत; सामाजिक स्वास्थ्यासाठी त्यांना तुरुंगवास वा वेळ पडल्यास, खुनासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीच द्यायला हवे,’ असे अगदी विसाव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत मानले जात असे. सिग्मंड फ्रॉईडच्या सिद्धांतांवर टीका करणाऱ्यांनी तेव्हाच अशा सर्व मानसशास्त्रीय थिअरीज् मोडीत काढल्या होत्या. त्या सुमाराला (१८८०-१९२० या काळात) दोन मुख्य थिअरीज प्रचलित होत्या. न्यूरॉजिस, सायकोसिस, मॅनिअ‍ॅक डिप्रेशन, कॅरॅक्टर आणि पर्सनॅलिटी डिसऑर्डर्स या व अशा मानसिक स्थितींमुळे माणूस गुन्हा करायला प्रवृत्त होतो, असे मानणाऱ्यांचा एक प्रवाह. दुसरा प्रवाह होता सामाजिकतेचा संबंध जोडणाऱ्यांचा. त्यांच्या मते ‘मानसिकता’ वगैरे सब झूट आहे. मन, अंतर्मन, मनाचा गाभा या सर्व थिएरीज् म्हणजे एक उच्चवर्गीय- सत्ताधाऱ्यांची वैचारिक फसवेगिरी आहे. समाजात जोपर्यंत अन्याय, विषमता, दारिद्रय़, मागासलेपण आहे तोपर्यंत असे तथाकथित मनोरुग्ण व गुन्हेगारही तयार होणारच. या प्रवृत्तींवर मात करायचा एकच मार्ग आहे तो म्हणजे सरंजामशाही-भांडवलशाही, सांस्कृतिक उच्च-नीचता समूळ नष्ट करणे. म्हणजे त्यातून निर्माण होणारा अन्याय, गरिबी व त्यामुळे येणारी गुन्हेगारी तसेच तथाकथित मानसिक आजार कायमचे दूर होतील! म्हणजेच सर्व मानसिक रोग व विकृतींना मुख्यत: समाज / समाजव्यवस्थाच जबाबदार आहे. ती बदलल्याशिवाय प्रश्न सुटणार नाही, असे मानणारा प्रवाह आजही प्रचलित आहे.या ‘सामाजिक’ प्रबंधाचा प्रभाव समाजवादी विचारसरणीमुळे जगभर पडला. युरोप-अमेरिकेतील अनेक नाटके-चित्रपट या थिअरीजवर आधारित होते. भारतातही राज कपूर-के. ए. अब्बास स्कूल याच विचाराचे होते- अगदी ‘दीवार’ चित्रपटातसुद्धा या थिअरीचे पडसाद आहेत. गुन्हेगारांना वा मनोरुग्णांना माणुसकीने वागविले जावे ही मागणी मात्र दोन्ही थिअरीज्चे अनुयायी करीत असत. मानसशास्त्रज्ञवादी म्हणत, की मनोरुग्ण हा शारिरीक रुग्णाप्रमाणेच व्याधिग्रस्त आहे. त्यामुळे त्याला ‘शिक्षा’ देण्याऐवजी त्याच्यावर उपचार करायला हवेत. सामाजिकतावादी म्हणत, की त्याला सामाजिक परिस्थितीने गुन्हेगार / मनोरुग्ण बनवला. नाही तर तो मुळात चांगला होता. काही धर्मवाद्यांनीही गुन्हेगारांबद्दल / मनोरुग्णांबद्दल सहानुभूती ठेवली जावी, त्यांच्याबद्दल करुणा वाटली पाहिजे अशी भूमिका घेतली. अशा रीतीने धर्मवादी आणि ‘समाज’वादी, मानसशास्त्रवादी आणि विज्ञानवादी यांच्यात काही प्रमाणात एकवाक्यता येऊ लागली. युरोपात आज कोणत्याही देशात फाशीची शिक्षा दिली जात नाही. युरोपियन युनियनची तर सदस्य होण्यासाठी ती सांस्कृतिक व कायदेशीर अट आहे. अमेरिकेतील काही राज्यांनीही फाशीची शिक्षा पूर्णपणे रद्दबातल केली आहे.गेल्या शंभर वर्षांत माणसाच्या स्वभावावर, गुन्हेगारीवर, एकूण शरीरशास्त्रावर, विशेषत: न्यूरोसायन्सच्या शाखेत आणि सोशियो-बायॉलॉजी, न्यूरोपॅथॉलॉजी, तसेच सकायेट्री आणि ‘क्रिएटिव्हिटी अ‍ॅण्ड कॉन्शियसनेस स्टडीज्’मध्ये झालेल्या संशोधनामुळे एक प्रकारची ज्ञान-विज्ञान क्रांतीची सुरुवात झाली आहे.आणखी काही काळानंतर प्रशासनाचा, पोलीस खात्याचा, हॉस्पिटल्स आणि डॉक्टर्सचा, कायद्याचा एकूण दृष्टिकोनच बदलू शकेल. नव्हे बदलू लागला आहेच.मायकेल फुको या ख्यातनाम इतिहासकार व तत्त्वज्ञाने तर म्हटले आहे, की जी अचाट सर्जनशीलतेची, कमालीच्या प्रगल्भतेची, विलक्षण द्रष्टेपण असलेली माणसे आहेत त्यांना ‘दूर’ ठेवण्यासाठी आणि समाजाचे तथाकथित स्वास्थ्य व संतुलन टिकविण्यासाठी अशा लोकांना वेडे ठरविण्यात येते. प्रस्थापितांना आपले प्रभुत्व व स्थितिशीलता आणि सामाजिक निर्बुद्धता टिकविण्यासाठी अशी मेण्टल हॉस्पिटल्स, तुरुंग, रिमांड होम्स आवश्यक वाटतात, असे फुको यांचे प्रतिपादन आहे.स्वत: फुको हे एके काळी फ्रेंच कम्युनिस्ट पार्टीचे क्रियाशील सदस्य (लुई अस्थ्युसर या मार्क्‍सवादी विचारवंतांचे अनुयायी) होते. त्यांच्या तरुण वयात ‘डिप्रेशन’ आणि मानसिक असमतोल या दोन आजारांसाठी खुद्द फुको यांच्यावरच उपचार सुरू झाले होते. त्यामुळे कम्युनिस्ट झाल्यानंतरही त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास चालूच ठेवला. त्या वेळच्या सनातनी पठडीतील कम्युनिस्ट पक्षाला ‘मानसशास्त्र’ ही ज्ञानशाखा असल्याचेच मान्य नव्हते. ‘समाज’वादी विचारसरणीचे असल्याने कम्युनिस्ट सर्व तथाकथित मानसिक असमतोलांना व आजारांना समाजच जबाबदार असल्याचे मानत असत. तरीही फुको यांच्या ‘मॅडनेस अ‍ॅण्ड सिव्हिलायझेशन’ (आणि मूळच्या ‘हिस्टरी ऑफ मॅडनेस’) या प्रबंधावर कम्युनिस्टांचे आक्षेप होते. एकूणच मायकेल फुको यांची मांडणी व निष्कर्ष कम्युनिस्टांना पटणे शक्य नव्हते. (कम्युनिस्ट रशिया व चीनमध्ये तर एकेकाळी मतभेद झालेल्या कॉम्रेडलाही मनोरुग्ण, वेडा वा गुन्हेगार ठरविण्याची पद्धत होती. त्या पठडीत वाढलेल्या कम्युनिस्ट पक्षाला फुको यांचे तुरुंगविषयक, मानसिकतेविषयक, गुन्हेगारीविषयक विचार मान्य होणे शक्यच नव्हते.)पण गेल्या काही वर्षांत तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, मेंदूबद्दलचे संशोधन आणि ‘कॉन्शियसनेस स्टडीज’ तसेच ऑटिझम, लर्निग प्रोसेस म्हणजे आपण कोणतीही गोष्ट कशी शिकतो येथपासून ते भाषाशिक्षण आणि भाषाविचार यासंबंधी झालेले प्रयोग व चिंतन यामुळे ‘वेडेपणा’, ‘सर्जनशीलता’, ‘प्रज्ञा’ याकडे बघायचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे. मानवी हक्कांसंबंधात झालेल्या चळवळी व कायदे यामुळे बराच फरक पडला आहे.शरीर आणि मन या द्वैत-अद्वैताप्रमाणेच समाज आणि व्यक्ती या द्वैत-अद्वैताबद्दल आता नव्याने विचार होत आहे. माणूस हा एकटा असूच शकत नाही. तो कुटुंबाचा, समाजाचा, परिसराचा एक घटक असतो; परंतु तरीही तो एक स्वतंत्र माणूस असतो. अनेक माणसांचा समूह, गर्दी, वस्ती म्हणजे ‘समाज’ नव्हे, तसेच व्यक्ती ही नगण्य आणि समाज हेच र्सवकष सत्य, हेही अतिरेकी तत्त्वज्ञान आहे, असे आता मानले जाते. किंबहुना समाज एकच असला तरी व्यक्ती तितक्या प्रकृती आणि जितक्या प्रकृती तितक्या प्रवृत्ती आणि तितके स्वभाव या विचाराला आता मान्यता मिळू लागली आहे.

कुमार केतकर

No comments:

Post a Comment