भविष्याच्या मानगुटीवर इतिहासाचे भूत!

भविष्याच्या मानगुटीवर इतिहासाचे भूत!

इतिहास म्हणजे अर्थातच भूतकाळ! स्मृतीशिवाय भूतकाळ आठवणे अशक्य। म्हणजेच स्मृती नसेल तर इतिहास उरणार नाही. इतिहासाचे भान नसेल तर भविष्यकाळाचेही भान येणार नाही. इतिहासाचा अभ्यास म्हणजे भूतकाळात रममाण होणे नव्हे; परंतु हेही खरे की इतिहासातील काळाशी आणि व्यक्तींशी एकरूप झाल्याशिवाय घटनांचा अर्थ आणि अन्वयार्थ लागणार नाही. कधी कधी भूत मानगुटीवर बसते, तसा कधी कधी इतिहासही समाजाच्या मानगुटीवर बसतो. फरक इतकाच, की ‘भूत’ ही कल्पना आहे. भुताचे अस्तित्व सिद्ध करता आलेले नाही. इतिहासाचे मात्र सज्जड पुरावे असतात. तरीही इतिहासाचा अर्थ लावतानाच त्यातून अनर्थ तयार होतात आणि त्या अनर्थाचेच रूपकात्मक भूत समाजाला झपाटून टाकते.सध्या जगातील बऱ्याच समाजांना अशा ऐतिहासिक अनर्थाच्या भुतांनी झपाटलेले आहे. इतके, की त्या भुतांनी भविष्यालाही आपल्या तावडीतून सोडलेले नाही. श्रीलंकेत काही दिवसांपूर्वी तामिळ वाघांचा सर्वेसर्वा प्रभाकरन ठार मारला गेला. प्रभाकरनने श्रीलंकेतील तामिळ लोकांना संघटित करताना फक्त त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात उभे केले नव्हते. त्याला हवा होता स्वतंत्र तामिळ इलम- स्वतंत्र तामिळ राज्य! तेही श्रीलंकेची फाळणी करून! त्यासाठी त्याला आधार होता तामिळ भाषा, तामिळ संस्कृती, तामिळ जीवनशैली आणि तामिळ इतिहास यांचा! तो गौरवशाली तामिळ इतिहास त्याला पुन्हा साकारायचा होता. प्रभाकरनने पुकारलेल्या यादवीत एक लाखांहून अधिक लोक मारले गेले. माणसांना ठार मारण्यासाठी त्याने वापरलेली साधने कमालीची निर्घृण होती. आपली दहशत पसरविण्यासाठी ‘मानवी बॉम्ब’ करण्याची हिंस्र कल्पना त्याचीच! तामिळ इतिहास व भाषा-संस्कृतीने प्रेरित झालेली तरुण व तरुणींची एक फौजच त्याने बांधली होती. ते सर्वजण कमरेभोवती स्फोटके बांधून स्वत:सकट कुणालाही ठार मारायला तयार होते. त्यांची समर्पणाची आणि प्रभाकरनवरील निष्ठेची परिसीमा इतकी, की आता कोण मानवी बॉम्ब होऊन आत्मसमर्पण करणार, याबद्दल त्यांच्यात चुरस असे. अखेर चिठ्ठय़ा टाकून मानवी बॉम्ब निवडला जाई. राजीव गांधींची हत्या करायला तयार झालेल्या तरुण-तरुणींमध्ये अशी चुरस लागली होती.इस्रायल-पॅलेस्टाइन संघर्षांतही मुख्यत: तेथील समाजांच्या मानगुटीवर बसला आहे तो इतिहासच! किंबहुना इस्रायल या राष्ट्राची स्थापनाच काही हजार वर्षांपूर्वीचे दाखले देऊन केली गेली. मात्र ती स्थापना झाली ती हिटलरशाहीच्या विध्वंसक पाश्र्वभूमीवर! खुद्द अ‍ॅडॉल्फ हिटलरलाही इतिहासानेच झपाटलेले होते. आर्य वंश- जर्मन समाज हेच जगातील सर्वश्रेष्ठ असून त्यांच्या त्या अबाधित स्थानाला ज्यू आव्हान देतात आणि ज्यू समाज, त्यांचा धर्म, त्यांची जीवनशैली, त्यांचा वंश समूळ नष्ट केल्याशिवाय जगाचे शुद्धीकरण होणार नाही, या नाझी विचारावर लक्षावधी जर्मनांचे सैन्य उभे केले गेले. त्या ‘ऐतिहासिक’ अभिमानाच्या व अस्मितेच्या पुनस्र्थापनेसाठी जे युद्ध झाले, त्यात सुमारे सहा कोटी लोक ठार झाले. रशिया, जर्मनी बेचिराख झाले आणि अवघे जग विनाशाच्या छायेत आले. हिटलरला अण्वस्त्रे बनवायची होती. नाझी शास्त्रज्ञांचे एक पथक त्यावर काम करीत होते. जर अमेरिकेच्या अगोदर हिटलरच्या हातात अणुबॉम्ब आला असता तर बहुतांश जग अणुसंहारात नष्ट झाले असते.हिटलरने ६० लाख ज्यू मारले- जाळून, गॅस चेंबरमध्ये गुदमरवून, उपासमार घडवून, थेट कत्तल करून आणि अनन्वित छळ करून! या हत्याकांडासाठी त्याने जी माणसे तयार केली, म्हणजे प्रथम ज्या माणसांची मनेच त्याने बधिर केली, त्याचा आधार ‘इतिहास’ हाच होता. जर्मनी त्याला पुन्हा ‘सन्माना’ने उभा करायचा होता आणि तो सन्मान प्राप्त करण्याचा मार्ग तशा संहारातून येतो असे त्याचे मत होते.खरे तर ज्या ज्यूंनी- म्हणजे ज्यू समाजाने- तो छळ सहन केला त्यांनी तशा अमानुषतेच्या विरोधात एक विश्वव्यापी मानवतावादी चळवळ उभी करायला हवी होती. प्रत्यक्षात ‘झायोनिस्ट’ ज्यूंनी त्या नाझी सूत्रालाच अनुसरून पॅलेस्टिनी लोकांच्या विरोधात, त्यांच्याच भूमीतून त्यांना हुसकावून लावून, पुन्हा जग विध्वंसाच्या उंबरठय़ावर आणले. आता त्या इस्रायलला नष्ट करण्यासाठी बिन लादेन, अल काईदा, तालिबान, इराण हे सिद्ध झाले आहेत. इस्रायलकडे अण्वस्त्रे आहेत. इराककडे नाहीत. परंतु इराणचा अणुऊर्जा प्रकल्प हा बॉम्ब बनविण्यासाठीच आहे, हे गृहीत धरून इराणवर हल्ला करायची तयारी इस्रायल करतो आहे. पुन्हा इराण आवाहन करीत आहे ते इतिहासालाच! तालिबानी टोळय़ाही त्यांच्या ‘धर्मा’ला म्हणजे इतिहासालाच जुंपत आहेत. जगातील बहुसंख्य मुस्लिम तालिबानांच्या विरोधात आहेत, पण आता तेच त्यांच्या दहशतीखाली आहेत.तालिबानांच्या नसानसांत आता तोच ‘हिटलर’ आहे, जो प्रभाकरनच्या संघटनेत होता आणि ‘झायोनिस्ट’ सैन्यात आहे. बुरुंडी आणि रवांडा येथे झालेल्या दोन जमातींच्या यादवीत सुमारे १२ लाख लोक ठार मारले गेले- लहान मुले, स्त्रिया, वृद्ध यांच्यासहित! ही कत्तल कुऱ्हाडी-तलवारी-भाल्यांनी झाली. जेव्हा जेव्हा या कत्तलकांडाचा ‘स्मृति’दिन येतो, तेव्हा तेव्हा त्या देशात वातावरण तंग होते! त्या स्मृती पुन्हा जाग्या होऊन आणखी एकदा तशा यादवीला सुरुवात होईल अशी धास्ती तेथे असते. म्हणूनच एका इतिहासकाराने काही वर्षांपूर्वी असे सुचविले की, ‘असे सर्व स्मृतिदिन कायमचे बंदच का करू नयेत? काय साधतो आपण त्या स्मृतिदिनांच्या सोहळय़ातून? विस्मृतीत जात असलेली सुडाची भावना आपण त्यातून चेतवत तर नाही? जिवंत राहण्यातला, सहजीवनातला आनंद उपभोगण्याऐवजी आपण अस्मितेच्या नावाखाली सामूहिक मृत्यूला का कवटाळतो? ज्याला आपण राष्ट्राची, संस्कृतीची, धर्माची अस्मिता म्हणतो आणि अभिमानाने तिचे ‘रक्षण’ करायला जातो, त्या अभिमानातच असते अवास्तव श्रेष्ठत्वाची भावना. इतर सर्व संस्कृतींबद्दल तुच्छता. इतर सर्व माणसांबद्दल शत्रुत्व. म्हणजेच आपल्याला ‘संस्कृती’ या संकल्पनेचाच अर्थ कळत नाही. अवघ्या मानवी जीवनाचाच नव्हे तर अवघ्या सृष्टीचा, प्रज्ञेच्या माध्यमातून झालेला आविष्कार म्हणजे संस्कृती- मग त्यात श्रेष्ठ-कनिष्ठत्वाची भावना असेलच कशी?’ हे विचार प्रसृत झाल्यानंतर त्या इतिहासकारावरच टीका सुरू झाली. ‘इतिहासच पुसून टाकायला निघाला इतिहासकार’ अशा शब्दांनी त्यांची संभावना केली गेली.जोपर्यंत इतिहासाची ही प्रचलित संकल्पना आणि ‘अस्मिता’ नव्हती, तोपर्यंत ‘इतिहास’ होता, पण त्याचा हा हिंस्र आविष्कार नव्हता. मग ही इतिहासपद्धती कधी रूढ झाली? आपल्या परंपरांबद्दलचा अनाठायी गर्व आणि इतर सर्व परंपरांबद्दल तुच्छता व विद्वेष कशातून आला? आणि कधीपासून? रामायण-महाभारत असो वा ख्रिस्तपूर्व काळातील रोमन साम्राज्य असो, सत्यातला असो वा महाकाव्यातला असो- पण अभिमानाचा मुद्दा वा अस्मितेचा संस्कार हा हिंसेतूनच व्यक्त होताना दिसतो. म्हणूनच गांधीजी म्हणत असत, की आपण जर त्या इतिहासातून खरंच काही शिकत असू तर तो अहिंसेचाच मुद्दा शिकायला हवा. नाही तर आपल्यात मानसिक प्रगती काहीच झालेली नाही, असे म्हणावे लागेल. उत्क्रांती प्रक्रियेत ‘माणूस’ हा (जवळजवळ) शेवटचा टप्पा मानला तर यापुढची प्रगल्भावस्था ही मानसिकच असणार आणि ती मानसिक उत्क्रांती निसर्गक्रमात होणार नाही; तर आपल्याला जाणीवपूर्वक साध्य करावी लागणार, अशा अर्थाचे निरूपण श्री अरविंदो यांनी दिले.जर पृथ्वी हा आपल्या परिचयातला एकमेव ग्रह असा असेल, की जेथे जीवसृष्टी आणि प्रज्ञासंपन्न माणूस आहे, तर आपल्याला वेगवेगळे देश असूच शकत नाहीत. पृथ्वी हाच ‘देश’ आणि सर्व मानवी संस्कृती, त्यातील असंख्य वैविध्यांसहित, हा एकच धर्म या अर्थाचे प्रतिपादन बकमिन्स्टर फुलर यांनी दिले. विनोबांची ‘जय जगत’ ही घोषणाही त्याच विचाराची! आता विज्ञान अशा निष्कर्षांला येत आहे, की माणसाची स्मृती ही साधारणपणे ५० हजार वर्षांची आहे. गर्भाशयात असतानाच तो जीव आपल्याबरोबर त्यापूर्वीच्या इतक्या वर्षांचा ‘इतिहास’ बरोबर घेऊन येत असतो. पण त्याच्या ‘कॉन्शियसनेस’मध्ये येणारा हा इतिहास आणि तो जीव माणूसरूपाने जन्माला आल्यावर कुटुंब, समाज, परिसर, भाषा इ.मार्फत प्राप्त करणारा इतिहास यात फरक आहे. त्या मानवी जिवाच्या ‘कॉन्शियसनेस’मध्ये म्हणजे, र्सवकष जाणिवा- संवेदनांमध्ये, राष्ट्रप्रेम, धर्मप्रेम, भाषाप्रेम, अभिमान, अस्मिता, विद्वेष, विखार या गोष्टी असत नाहीत, कारण त्या ‘अ‍ॅक्वायर्ड मेमरी’चा म्हणजे जन्मोत्तर संपादन केलेल्या स्मृतींचा भाग आहेत. म्हणून जे. कृष्णमूर्तीनी आणखीनच मूलभूत प्रश्न उपस्थित केला. जाणिवा व संवेदना तरल आणि तत्पर ठेवूनही आपल्याला ‘अ‍ॅक्वायर्ड मेमरी’तून मुक्त होता येईल का? त्या मुक्तीचा प्रयत्न करताना ५० हजार वर्षांचा ‘कॉन्शियसनेस’ तितक्याच जाणिवेने जपता येईल का? म्हणजेच त्याच ‘कॉन्शियसनेस स्ट्रीम्स’मधून पोहत पोहत, मागे जात जात, तो सर्व स्मृतिपट, त्यात गुंतून न पडता, आपल्यासमोर साकार करता येईल का? थोडक्यात, इतिहास तसाच ठेवून त्याने निर्माण केलेल्या अस्मिता- अभिमानापासून स्वत:ला मुक्त कसे करायचे? नेमक्या या टप्प्यापर्यंत आता मानवी सिव्हिलायझेशन आले आहे. म्हणूनच १९८९ साली फ्रॅन्सिस फुकुयामाने ‘द एन्ड ऑफ हिस्टरी’ हा प्रबंध सादर केला. त्याच्यावर प्रचंड वादळ उठले. ‘इतिहास संपेल कसा?’ असा प्रश्न इतर इतिहासकारांनी विचारला. फुकुयामा यांच्या मते आता यापुढचा इतिहास हा फक्त विचारांचा राहील. देश-राष्ट्रवाद, धर्मवाद, विचारसरणी, भौगोलिकता, संस्कृती हे मुद्दे कालबाहय़ ठरतील. म्हणजेच ज्याला आपण ‘हिस्टरी’ म्हणून संबोधत होतो तो इतिहास संपेल. फुकुयामा यांनी तो सिद्धान्त मांडला तेव्हा इस्रायल-पॅलेस्टिनपासून काश्मीपर्यंत आणि क्यूबापासून चीन-जपानपर्यंत सगळीकडे उदारमतवादी लोकशाही प्रस्थापित होत होती. बर्लिनची भिंत पडून समाजवादाचे चिरेबंदी राजवाडे बाजारपेठांमुळे पोखरले जात होते. व्यक्तिस्वातंत्र्याच्या विचाराने व आदर्शाने भारलेले समाज हे समूहवादाच्या, हुकूमशाहीच्या, एकाधिकारशाहीच्या विरोधात उभे राहिले होते. हिटलरचे नाझीपर्व १९४५ साली संपले. चीनचे माओपर्व १९८९च्या मे मध्ये तिआनमेन चौकात अस्तंगत झाले. पूर्व युरोपातील रशियाप्रणीत राजवटी कोसळू लागल्या. दोन वर्षांनी, १९९१ साली सोव्हिएत युनियनच विलयाला गेला. आता निर्माण होणार ती उदारमतवादी, व्यक्तिस्वातंत्र्यवादी, मुक्त अर्थव्यवस्था मानणारी जागतिक समाजव्यवस्था!फुकुयामा यांचा तो ‘युटोपिया’ ऊर्फ स्वप्नवत समाज होता. परंतु १९८९-९१ ते २००९ या सुमारे २० वर्षांच्या काळातील ‘इतिहासा’नेच फुकुयामा यांना उत्तर दिले. या काळातच अल काईदा व तालिबानने जगभर थैमान घातले. एका पाठोपाठ एक देश अण्वस्त्रे संपादन करण्याची स्वप्ने पाहू लागला. अण्वस्त्र हे अस्मितेचे प्रतीक बनले. आता तर तालिबानांना पाकिस्तानमधील अण्वस्त्रांवर कब्जा हवा आहे. तसा तो होऊ नये म्हणून अमेरिका त्या अण्वस्त्रांना नामशेष करण्यासाठी सिद्ध होत आहे. प्रत्येक देश आपल्या संस्कृतीचे व इतिहासाचे रक्षण करण्यासाठी आता अण्वस्त्रे निर्माण करू पाहात आहे. म्हणजेच इतिहासाला जपण्यासाठी आता भविष्याचा विध्वंस करण्याची तयारी सुरू आहे!

No comments:

Post a Comment