आपण कसे आहोत, यापेक्षा आपण कसे दिसतो याचीच चिंता बहुतेकांना असते. म्हणजेच आपण कसे असावे यापेक्षा आपण कसे दिसावे याचा विचार अधिक केला जातो. हे ‘दिसणे’ म्हणजे केवळ चेहरा नव्हे, किंवा नुसते शारीरिक दिसणे नव्हे. त्यासाठी सौंदर्यप्रसाधने आहेत, ब्युटी पार्लर्स आहेत, जिम आहेत, फॅशन डिझायनर्स, फॅशन्स आणि कॉश्च्युम डिझायनर्स आहेत. ज्यांना हे ‘हायटेक’ परवडत नाही त्यांना सहज उपलब्ध असलेली क्रीम्स, लोशन्स, टाल्क वगैरे आहेत.
आपल्या समाजातील किमान ३०-३५ टक्के स्त्री- पुरुषांना/ मुला- मुलींना ते ‘दिसणे’ही परवडत नाही। तरीही समाजाच्या कोणत्याही वर्गात आपण कसे आहोत, त्यापेक्षा आपण कसे दिसावे याबद्दलच जास्त विचार होत असल्यामुळे कॉस्मेटिक्स, परफ्यूम्स, फॅशन्स या उद्योगावर आर्थिक मंदीचा फारसा परिणाम झालेला नाही. ग्राहकांच्या संख्येत- विशेषत: दाग-दागिने (खरे वा खोटे) खरेदी करणाऱ्यांची संख्याही तितकी कमी झालेली नाही. सोन्या-चांदीचे भाव मंदीच्या काळातही वाढतच होते. फक्त श्रीमंत लोकच सोने खरेदी करतात असे नाही. मध्यमवर्गीय आणि गरिबांमध्येही सोने-चांदी खरेदी करण्याची ओढ आणि आस असतेच. सोने जसा आर्थिक आधाराचा भास देते, तसेच दागिन्यांमुळे ‘दिसण्या’चाही भास देते. मार्शल मॅक्युहान या मीडिया पंडिताने म्हटले होते की आरसा नसता तर सौंदर्यप्रसाधने निर्माणच झाली नसती! आरशात पाहून आपण कसे दिसतो हे लक्षात आल्यावर आपण कसे दिसावे हे वाटू लागले आणि ‘कॉस्मेटिक्स’ जन्माला आली. परंतु येथे आरसा हे रूपक आहे. आपाल खरा स्वभाव आणि ‘पर्सनॅलिटी’ स्वत:पाशी ठेवून लोकांमध्ये आपली प्रतिमा व व्यक्तिमत्त्व कसे दिसावे याचा प्रयत्न म्हणजे ‘पर्सनॅलिटी मेकओव्हर’!बाह्य़ सौंदर्याला जसजसे महत्त्व प्राप्त होत गेले, तसतसे भांडवलशाहीतील ‘अनावश्यक’ वस्तूंचे ‘फॅड’ही वाढत गेले. आपल्या वेशभूषेवरून, चेहऱ्यावरून, वागण्यावरून म्हणजेच आपण कसे दिसतो यावरून लोकांनी आपल्याबद्दलचे मत ठरवावे असे जेव्हा लोकांना वाटू लागले तेव्हा भांडवलशाहीचा विस्तार झपाटय़ाने होऊ लागला.अगदी निखळ जीवनावश्यक गोष्टीच आपण वापरल्या/ खरेदी केल्या असत्या तर बाजारपेठेचा विस्तार झाला नसता आणि त्याबरोबर आलेली नवी ‘दिसण्या’ची मूल्येही निर्माण झाली नसती. जगातली सुमारे ४० टक्के माणसे अर्धपोटी, निकृष्ट, दरिद्री जीवन जगत असताना या ‘अनावश्यक’ गोष्टींचे म्हणजे ‘दिसण्या’चे इतके स्तोम कशाला, असा प्रश्न विचारता येईल. परंतु त्याला भांडवली अर्थव्यवस्था चालविणाऱ्यांचे उत्तर असे आहे की, कंदमुळे, वल्कले, पर्णकुटी अशी जीवनशैली सर्वानीच अंगीकारली तर सर्व अर्थचक्रच कोसळून पडेल. जसजसे ‘सिव्हिलायझेशन’ प्रगत आणि प्रगल्भ होत जाते, तसतसे आवश्यक काय आणि अनावश्यक काय, साधी राहणी म्हणजे काय आणि चांगले व चैनीत राहणे म्हणजे काय यांच्या व्याख्या बदलतात. संदर्भ बदलतात. सुख-समाधानाच्या अपेक्षा बदलतात. माणसांचे नातेसंबंध आणि त्या अनुषंगाने स्वभाव बदलतात. म्हणजेच संस्कृतीच्या उत्क्रांतीचे निकष व टप्पेही बदलतात.टोळीजीवन जगणाऱ्यांपैकी प्रत्येकाला स्वत:चे वेगळेपण जपण्याची तितकी गरज वाटत नाही. एका मर्यादेपलीकडे ‘खासगी’ जीवन असे त्याला नसतेच. आपण जसे आहोत त्यापेक्षा आपण कसे दिसलो पाहिजे याची चिंता त्याला नसते. टोळीतही विविध स्वभाव- प्रकृती असतात पण त्यांचे आविष्कारही तसे मर्यादितच असतात. गरजा कमी, त्यामुळे (सक्तीची) साधी राहणी. (परंतु राहणी साधी असली की आपोआप विचारसरणी उच्च होते असे नाही. काही प्रामाणिक सामाजिक कार्यकर्त्यांची राहणी साधी असते पण त्यांची विचारसरणीही साधीच असते! परंतु प्रचलित भांडवली- बाजारपेठीय व्यवस्थेतही आपली राहणी साधी आहे याचाच एक नैतिक अहंकार ते धारण करतात. चंगळवाद्यांची बेदरकारी जशी घातक असते, तशीच ही साधेपणाची आत्मनिष्ठ नैतिकताही घातक होऊ शकते. असो.)टोळीजीवनातून शेती व्यवस्थेकडे, त्यातून प्राथमिक उद्योजकतेकडे, त्यानंतर औद्योगिक क्रांतीकडे असा ‘सिव्हिलायझेशन’चा प्रवास सुरू झाला आणि त्यातूनच भांडवलशाही विस्तारत गेली आणि नवीन समाजव्यवस्थाही निर्माण होत गेली. विकास आणि विषमता, साहित्य- कला आणि सांस्कृतिक स्थितिशीलता, श्रीमंती आणि गरिबी, प्रस्थापित आणि सामान्य, ‘स्टेटस’ असलेले आणि ‘स्टेटस’ नसलेले असे विविध प्रकारचे भेदभाव आणि नवे ‘वर्ग’ निर्माण झाले.‘स्टेटस’ म्हणजे प्रतिष्ठा असणाऱ्यांमध्येही एक वेगळा ‘एलाइट’ स्तर तयार झाला. सर्व प्रतिष्ठित ‘एलाइट’ असतीलच असे नाही. कारण ‘स्टेटस’चे जे निकष होते वा आहेत त्यापेक्षा ‘एलाइट’ असण्याचे निकष वेगळे आहेत. समाजातील हे स्तर वर्गव्यवस्थेच्या (आणि जातिव्यवस्थेच्या) अंतर्गत असले तरी प्रतिष्ठित प्रस्थापित वर्गातच एक स्टेटस व एलाइटची नवीन उतरंड तयार झाली. विशेष म्हणजे ही प्रक्रिया जगातील सर्व समाजांमध्ये झाली. प्रत्येक समाजातील प्रक्रियेचे आणि त्यातून प्रकटणाऱ्या प्रतिष्ठेचे स्वरूप मात्र भिन्न होते.टोळी अवस्थेत ‘स्टेटस’ वा ‘एलाइट’ स्तर असण्याचा प्रश्नच नव्हता. टोळीप्रमुखाकडे अधिकार व सत्ता असली तरी तो राज्यकर्ता वा सत्ताधारी नव्हता. टोळीव्यवस्थेतील अर्थकारण बऱ्याच अंशी भटक्या व विमुक्त जीवनपद्धतीवर आधारलेले होते. टोळ्यांमध्ये नेतृत्व असे, पण प्रतिष्ठेच्या संकल्पना नव्हत्या. त्या जीवनपद्धतीतून शेतीव्यवस्थेकडे समाज आल्यावर जगण्याला स्थिरता प्राप्त होऊ लागली. कुटुंबव्यवस्था निर्माण होऊ लागली. कुटुंबसंस्था आणि शासनसंस्था तयार झाल्या आणि एका अर्थाने तेव्हापासून सरंजामशाही-भांडवलशाही व सिव्हिलायझेशनचा प्रवास सुरू झाला. टोळी अवस्थेतील ‘समानता’ संपली आणि समाजात उच्च-नीचतेची उतरंड निर्माण होऊ लागली. साहजिकच त्याबरोबर आले प्रतिष्ठा-अप्रतिष्ठेचे निकष. एकदा ती समानता संपल्यावर बऱ्याच जणांना समाजातल्या वरच्या, प्रतिष्ठेच्या स्तरावर जावेसे वाटू लागले. परंतु तसे वरच्या स्तरावर जाणे सोपे नव्हते. भारतात तर अधिकच कठीण होते. जन्माने दलित असलेल्यांना ब्राह्मण होणे अशक्य होते. राजघराण्यात जन्माला न आलेल्यांना राजेशाहीच्या आसपास फिरणेही शक्य नव्हते. पूर्वी तर गरिबीची सीमारेषा ओलांडून मध्यमवर्गात वा मध्यमवर्गाची मर्यादा ओलांडून श्रीमंत वर्गात जाणेही शक्य नव्हते. शिवाय श्रीमंतीमुळे राजघराण्यात सन्मान मिळू शकेल, पण सत्तेची सूत्रे नाहीत. जसे विद्वत्तेच्या वा व्यासंगाच्या जोरावर राजदरबारी प्रतिष्ठा मिळू शकेल, पण प्रत्यक्ष सत्ता नाही. भारतीय समाजातील उतरंडीला जात, अर्थस्थिती, शिक्षण, परिसर असे अनेक अडथळे होते. प्रत्येक टप्प्यावर पुढे राहायचे व जायचे असेल तर आपण कसे आहोत त्यापेक्षा आपण कसे दिसलो पाहिजे याला महत्त्व प्राप्त होऊ लागले. पुढच्या पायरीवर मान्यता मिळवायची तर त्या पायरीवरची जीवनशैली हवी. म्हणजे तसे ‘नेटवर्क’ हवे, तसे पैसे हवेत, तसे संदर्भ हवेत. साहजिकच तशा महत्त्वाकांक्षी माणसांना आपले तसे ‘स्टेटस’ असावे असे वाटू लागले. सरंजामशाही समाजव्यवस्थेत आपली ‘जन्मजात’ मर्यादा उल्लंघून जाणे जवळजवळ अशक्य होते. परंतु भांडवलशाही व्यवस्थेत त्या संधी उपलब्ध होऊ लागल्या. प्रत्येकाने आपली ‘पायरी ओळखून वागायला हवे’ हा स्थितिवादी विचार बाजारपेठीय भांडवली अर्थव्यवस्थेने दूर केला. एखादी व्यक्ती ‘रॅग्ज टू रिचेस’ म्हणजे दारिद्रय़ातून श्रीमंतीपर्यंत पोहोचू शकते हे भांडवलशाहीत शक्य होते; सरंजामशाहीत वा राजेशाहीत नाही. म्हणूनच सामान्य लोकांनी समाजाच्या आर्थिक उत्क्रांतीच्या पहिल्या टप्प्यात भांडवलशाहीचे स्वागत केले. खुद्द कार्ल मार्क्स यांनीच म्हटले आहे की, केवळ अर्थव्यवस्थाच नव्हे तर सरंजामशाहीत माणसाचे कुचंबलेले जीवनही भांडवलशाहीमुळे मुक्त व्हायला मदत केली. भांडवलशाहीत ‘स्टेटस’ आणि ‘एलाइट’ यांचे नवे संदर्भ तयार झाले.वस्तुत: ‘स्टेट्स’ वा ‘एलाइट’ हा स्तर तसा काल्पनिक आहे. कारण तो पैशाने, पदाने, सौंदर्याने, शरीरयष्टीने प्राप्त करता येत नाही. तो आपल्या मनात असतो आणि आपल्या मनातील तो दर्जा इतरांनीही मान्य करावा व आपल्याला तो मान द्यावा असे अशा ‘स्टेटस सीकर्स’ना वाटत असते. व्हॅन्स पॅकार्ड या अमेरिकेतील मार्केटिंग व अॅडव्हर्टायझिंग गुरूने या सुप्त आकांक्षांच्या आधारे एक जाहिरातशास्त्रच तयार केले. त्याच्या संबंधित ग्रंथाचे नावच ‘द स्टेटस सीकर्स’ असे आहे.त्याचा सिद्धांत थोडक्यात असा : प्रत्येक व्यक्तीची स्वत:बद्दलची एक प्रतिमा असते-सेल्फ इमेज! परंतु त्याला समाजात स्वत:बद्दलची वेगळी व वरच्या स्तरावरची प्रतिमा हवी असते. जर समाजाने त्याची ती ‘प्रोजेक्टेड इमेज’ मान्य केली तर ती व्यक्ती पुढच्या पायरीवर जाते. परंतु मुळात ‘सेल्फ इमेज’ ऊर्फ स्वत:ची प्रतिमा आपल्याच मनाशी अवास्तव असेल तर, त्याच्यापुढे ‘प्रोजेक्टेड इमेज’ जाते. त्यामुळे आपले वास्तवातले व्यक्तिमत्त्व आणि आपण धारण केलेले, म्हणजे ‘प्रोजेक्टेड’ व्यक्तिमत्त्व यात एक पोकळी तयार होते. या पोकळीत ‘स्किझोफ्रेनिया’ची सुरुवात होते.आपण अनेकदा आपल्या आजूबाजूला अशी माणसे पाहतो की, जी मोठमोठय़ा माणसांची- मंत्र्यांची, उद्योगपतींची, नोकरशहांची, लेखक-संपादकांची इत्यादी नावे ‘सहजपणे’ संवादात आणतात. त्यामुळे ऐकणाऱ्यांना त्या व्यक्तीविषयी आदर (वा भीती) वाटू लागते. हा माणूस इतका ‘नेटवर्क’ असलेला आहे तर त्याचा आपल्याला उपयोग तरी होईल किंवा त्याच्यापासून ‘सांभाळून’ राहिले पाहिजे असे तेथे हजर असणाऱ्यांना वाटते. नेमका हाच परिणाम त्या व्यक्तीला साधायचा असतो आणि त्यात तो यशस्वी होतो. परंतु ही चलाखी फार काळ चालत नाही. (कारण हल्ली समाजातली बरीच माणसे इतकी चाणाक्ष झाली आहेत की दुसऱ्याची चलाखी ती लगेच ओळखतात. मग ती स्वयंभू चलाख माणसे चेष्टेचा विषय बनतात.) जेव्हा आपली ‘प्रोजेक्टेड इमेज’ हीच आपली खरी प्रतिमा आहे असे त्या व्यक्तीला वाटू लागते तेव्हा त्याला आपण मनोरुग्ण म्हणू लागतो. मग त्याला ‘फॅन्टसीज्’ने झपाटले आहे असे आपण म्हणतो. मग ती व्यक्ती चेष्टेचा नव्हे तर करुणेचा विषय ठरते. म्हणजेच आपल्याला स्वत:च्या क्षमतांचे आणि मर्यादांचे नेमके भान नसेल तर या दोन प्रतिमांमध्ये निर्माण होणाऱ्या दरीत आपण कोसळण्याची शक्यता असते. कित्येकदा स्वत:बद्दलची प्रतिमा (वा मापन) हे कमीही असू शकते. म्हणजे क्षमता जास्त पण आत्मप्रतिमा लहान. त्यामुळे आत्मविश्वास कमी. त्यातून कधी ‘इन्फिरिऑरिटी कॉम्प्लेक्स’ निर्माण होतो तर कधी इतर ‘यशस्वी’ माणसांबद्दल असूया. आपल्यापेक्षा कमी क्षमतेची माणसे इतक्या वर गेली म्हणून त्यांच्याबद्दल मत्सर किंवा आत्मकरुणा- सेल्फपिटी!अनेक माणसे स्वत:बद्दलच्या चुकीच्या प्रतिमांमुळे ‘मूडी’, ‘नव्र्हस’, ‘डिप्रेस्ड’ असतात. त्यांच्या उदासीनतेचा आणि मानसिक अशांततेचा अर्थ त्यांना लागत नाही आणि त्यांच्या मित्रपरिवारातील वा कुटुंबातील कुणालाही लागत नाही. मग कधीही ती एकदम आजारी पडतात आणि डॉक्टरलाही नक्की निदान करता येत नाही. क्वचित, अपवादात्मक प्रसंगात ते आत्महत्याही करतात.अॅलन बॉटन या प्रसिद्ध लेखकाने ‘द स्टेटस अँक्झायटी’ नावाचे एक पुस्तक लिहिले ते याच दृष्टिकोनातून. लोकांनी जर प्रामाणिक आत्मशोध घेतला आणि खरोखरच दिलखुलासपणे ते समाजात वावरले तर अध्र्याहून अधिक मनोविकार दूर होतील असे त्याचे म्हणणे आहे. परंतु तोच तर प्रश्न आहे- आत्मशोध करणारा मी आणि ज्याचा शोध घ्यायचा तोही मीच! म्हणजे मीच माझा शोध घेणार! शिवाय ‘मी’ हा एक आहे की माझ्यात ‘अनेक मी’ दडले आहेत? आज जगात सुरू असलेले ‘पर्सनॅलिटी एक्स्पेरिमेन्ट्स’, व्यक्तिमत्त्व विश्लेषणांचे प्रयोग, या प्रश्नाचा शोध घेत आहेत.
कुमार केतकर
No comments:
Post a Comment