स्वभावाला औषध

प्रत्येक माणसाचा विशिष्ट स्वभाव असतो. प्रसन्न वा दुर्मुखलेला. रागीट वा शांत. तुसडा किंवा मनमिळाऊ. शिष्ट किंवा दिलखुलास. मदतशील किंवा मतलबी. कंजूष वा सढळ. अतिशय अभिमानी, ताठा असलेला वा शक्यतो सर्वाशी जुळवून घेणारा. जिद्दी, चंचल, आशावादी, निराशावादी अशी बरीच स्वभावलक्षणे असतात. आपण सर्वजण नेहमी दुसऱ्याच्या स्वभावाबद्दल बोलत असतो. बहुतेक वेळा प्रतिकूल म्हणजे प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून कुठचा तरी एक ‘योग्य’ वा ‘आदर्श’ स्वभाव असतो. तो मनातला मापदंड घेऊन आपण इतरांच्या स्वभावाबद्दलची चर्चा करीत असतो. बहुतेक मुला-मुलींच्या गप्पांमध्ये किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांमध्ये, मित्रवर्तुळात वा नातेवाईकांमध्ये-एकत्र जमल्यावर अनेकदा विषय असतो तो कुणाच्या तरी स्वभावाबद्दलचा. त्या व्यक्तीच्या त्या विशिष्ट स्वभावाबद्दल कधी एकमत असते तरी कधी मतभेद. त्याचा वा तिचा संबंधितांना आलेल्या अनुभवाच्या आधारे ते स्वभाववर्णन केले जात असते.एखादा माणूस ‘चांगला’ आहे की ‘वाईट’, ‘विश्वासार्ह’ आहे की ‘बेभरवशाचा’ याबद्दलचे निष्कर्ष काढताना ज्याला त्याला आलेला अनुभव आणि आपल्या मनातले (स्वत:च ठरविलेले) मापदंड यांच्या आधारे ते निष्कर्ष काढलेले असतात. लग्न ठरवताना (मग तो प्रेमविवाह असो वा ‘अ‍ॅरेन्ज्ड मॅरेज’ ओळखीपाळखीतून लग्न ठरलेले
असो वा ‘डेटिंग’च्या आधुनिक परस्पर भेटीतून) दोघेही जण परस्परांची पारख करीत असतात, ती मुख्यत: स्वभाववैशिष्टय़ांची। बाकी शिक्षण, आर्थिक स्थिती, ‘स्टेटस’, नोकरीचे वा व्यवसायाचे स्वरूप, राहायची जागा म्हणजे कुठे आणि किती इत्यादी गोष्टींची माहिती मिळविलेली असते वा उपलब्ध होऊ शकते. परंतु तेवढय़ाच गोष्टीवरून लग्न ठरत नाहीत. अगोदर वा नंतर माहिती काढताना केलेल्या चौकशीत वा प्रत्यक्ष भेटल्यावर पारख करताना मुख्य अंदाज केला जात असतो तो स्वभावाचा. त्याचप्रमाणे आपले स्वत:च्या स्वभावाबद्दलही समज (वा गैरसमज) असतात आणि त्या अनुषंगाने त्या मुलाच्या वा मुलीच्या स्वभावाचे आडाखे दोघेही जण बांधत असतात.एवढा सगळा आटापिटा करून आणि ‘डेटाबेस’ जमा करूनही कधी तो प्रेमविवाह वा ठरवून केलेले लग्न ‘फसते.’ जी लग्न तशी ‘फसत’ नाहीत त्यांना ‘यशस्वी’ म्हणण्याची पद्धत आहे. कित्येक जोडपी त्यांच्या विवाहाचा २५ वा, ५० वा वाढदिवसही साजरा करतात. हल्लीच्या ‘समारंभोत्सुक’ काळात ते यशस्वी जोडपे आपल्या वैवाहिक-सांसारिक जीवनातले अनुभवही सांगतात. काहीसे गमतीने (पण मनातून गांभीर्याने!). त्या संभाषणात असेही सांगतात की, ‘आम्ही इतकी वर्षे एकमेकांबरोबर कशी काढली हेच कळत नाही!’ सर्वचजण त्या कबुलीजबाबाला हसून दाद देतात. परंतु बहुतेक वेळा खरोखरच त्या दोघांना कळलेले नसते की, इतकी वर्षे त्यांनी संसार कसा केला!परंतु ‘स्वभाव’ हा विलक्षण गुंतागुंतीचा विषय फक्त लग्न-घटस्फोट किंवा प्रेम-विरह यापुरताच मर्यादित नाही. युरोप-अमेरिकेत काही वर्षांपूर्वी ‘एचआरडी’ ऊर्फ ह्य़ूमन रिसोर्स डिपार्टमेंटमध्ये ‘स्वभावतज्ज्ञ’ (बिहेविअर स्पेशालिस्ट) नेमले जात असत. पुढे या ‘ह्य़ूमन रिसोर्स’ खात्याचे इतके अवमूल्यन होत गेले की, ते तमाम कर्मचाऱ्यांमध्ये बदनाम वा टिंगल टवाळीचे खाते बनले. भारतातही ‘एचआरडी’चे फॅड सुमारे २५ वर्षांपूर्वी आले. राजीव गांधींच्या काळात प्रथमच ‘एचआरडी’ हे स्वतंत्र खाते झाले आणि त्या खात्याच्या मंत्र्याला नंबर दोन वा तीन दर्जा दिला गेला. पण या ‘ह्य़ूमन रिसोर्स’ खात्याने नक्की आणि नवीन काय करायचे हे जसे राजीव गांधींना ठरविता आले नाही, त्याचप्रमाणे या फॅशनेबल खात्याला काय काम द्यायचे हे कॉर्पोरेट सेक्टरलाही उमगले नाही. त्यामुळे ट्रान्स्फर्स, र्रिटेचमेंट, जॉब अ‍ॅलोकेशन चेंज, लॅटरल रिलोकेशन्स या कटू गोष्टी करण्याचे काम त्यांच्याकडे आले. या बदल्या आणि बडतर्फी करणारे ‘ह्य़ूमन रिसोर्स’ अधिकारी हे मालकांचे व डायरेक्टर बोर्डाचे हस्तक किंवा हेर किंवा ‘हँगमेन’ झाले. कारखाना वा कचेऱ्यांमध्ये सामंजस्य व संवाद ठेवण्याचे काम करण्याऐवजी वातावरण कलुषित करणारे ते एजंट झाले. ‘अ‍ॅप्रेजल्स’ची संकल्पना बऱ्याच वर्षांपूर्वी बिहेविअर स्पेशालिस्टांनी म्हणजे स्वभावतज्ज्ञांनी मांडली होती. आज ‘स्टाफ अ‍ॅप्रेजल्स’ची प्रथा किती अर्थशून्य (आणि दुष्टसुद्धा) याबद्दलची चर्चा खुद्द ‘वॉल स्ट्रीट जर्नल’ या अमेरिकेतील कॉर्पोरेट भांडवलशाहीच्या मुखंड मानल्या जाणाऱ्या दैनिकातूनच होऊ लागली आहे. १० महिन्यांत अमेरिकेतील सुमारे ४५ ते ५० लाख लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. बहुतेक वेळा हे अप्रिय काम या अधिकृत ‘ह्य़ूमन रिसोर्स’वाल्यांनीच केले आहे. त्यांचाही इलाज नव्हताच. कारण ‘टॉप मॅनेजमेंट’चे निर्णय स्वभावविश्लेषणावर ठरत नाहीत तर बॅलन्सशीटच्या ‘प्रॉफिट-लॉस’च्या आकडय़ांवर आणि स्टॉक मार्केटमधील चढउतारांवरती ठरतात. असे असले तरी प्रत्यक्षात कारखाना-कचेऱ्यांमधील कामगार-कर्मचाऱ्यांचे परस्परसंबंध हे कामाच्या स्वरूपाइतकेच स्वभावाच्या स्वरूपांवरही अवलंबून असतात. फक्त कामाच्या म्हणजे नोकरी-व्यवसायांच्या जागीच नव्हे तर चळवळींमध्ये काम करणाऱ्या, विविध समित्यांवर सदस्य असणाऱ्या आणि इतर क्षेत्रात लोकसंपर्क असलेल्या, अगदी राजकारणातही ‘स्वभाव’ हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो.स्वभाव हा इतका महत्त्वाचा घटक असूनही त्यावर वैज्ञानिक-मनोवैज्ञानिक संशोधन तुलनेने बरेच कमी झाले आहे. चिंतन मात्र उदंड झाले आहे. रामायण-महाभारत या इतिहाससदृश महाकाव्यांमध्ये असो वा सॉक्रेटिस-प्लेटो यांच्या काळात झालेल्या तत्त्वचर्चेत असो, कन्फ्युशियसच्या व्यावहारिक तत्त्वज्ञानात असो वा गौतम बुद्धाच्या शिकवणीत, सगळीकडे स्वभावचर्चा ही असतेच. किंबहुना त्या काव्य-महापुराणांमध्ये असो, कालिदास किंवा शेक्सपिअरच्या वा अगदी अलीकडच्या विजय तेंडुलकर वा टॉम स्टोपॅर्डच्या नाटकांमध्ये असो, स्वभावरेखा आणि परस्परसंबंधातील तणाव व आकर्षण दूर केले की, सर्व साहित्यसृष्टीच बरखास्त होईल.कित्येक संस्थांनी इतिहास घडविला, काही संस्था लयाला गेल्या, काही संस्था अजूनही विकसित होत आहेत व विस्तारतही आहेत. त्या सर्वाचा मुख्य स्रोत होता तो, त्या संस्थांच्या वा चळवळीच्या प्रणेत्यांचा व नेत्यांचा स्वभाव. म्हणूनच शिवाजी महाराज वा नेपोलियन इतकेच नव्हे तर महात्मा गांधी वा माओ त्से तुंग यांच्या राजकारणावरच नव्हे तर स्वभाववैशिष्टय़ांवरही अजून ग्रंथ लिहिले जातात. हिटलरचे मनोविश्लेषण व स्वभावचित्रण करणे हा तर इतिहासकारांचा, मानसशास्त्रज्ञांचा आणि समाजशास्त्रज्ञ व साहित्यिकांचा छंदच झाला आहे.याचा अर्थ हा की, ‘स्वभाव’ या विषयावर सर्वात जास्त चर्चा आहे. हे स्वभावविशेष नक्की कसे घडत (वा बिघडत) जातात, त्या स्वभावांवर आई-वडील यांचा किती प्रभाव असतो आणि कुटुंबाबाहेरील परिसराचा संस्कार किती असतो, यावरही बराच खल झाला आहे. एकाच घरात वाढलेल्या भाऊबहिणींचा स्वभाव इतका भिन्न, अगदी परस्परविरोधी कसा बनतो याविषयीही बरेच लिहिले गेले आहे. अगदी दोन जुळ्या भावांमध्ये वा बहिणींमध्येही किती स्वभाववैविध्य असते यावरही लेखन झाले आहे. स्वभाव ‘जेनेटिकली डिटरमिन्ड’ आहे की, ‘सोशली कन्डिशन्ड’ आहे, म्हणजेच एक प्रकारे जन्मापासूनच त्याची वैशिष्टय़े ठरलेली आहेत की ती बदलत जातात यावरही मनोशास्त्रज्ञांचा खल चालू आहे. अर्थातच सर्वाना मान्य होतील, असे प्रयोगसिद्ध निष्कर्ष काढण्याइतकी स्पष्टता आलेली नाही.सुमारे १०० वर्षांपूर्वी ‘बिहेवियॉरिझम’ नावाचे ‘शास्त्र’ जे. बी. वॉटसन या विचारवंताने निर्माण करायचा प्रयत्न केला होता. त्या शास्त्राच्या काही अनुयायांनी असे मांडायला सुरुवात केली होती की, स्वभाव हा संस्कारांनीच ठरतो. त्यामुळे संस्कार सुनिश्चित व अगदी लहानपणापासून केले तर स्वभाव व एखाद्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कसा असेल हे सांगता येणे सहज शक्य आहे. कोणत्याही द्रव्याचे जसे निश्चित घटक असतात, तसेच स्वभावाचेही असतात असे त्यांच्यापैकी काहींचे म्हणणे होते. एकाच वेळी जन्माला आलेली दोन विभिन्न समाजांतली, वर्गातली, धर्मातली वा देशांतली मुले पूर्णपणे वेगवेगळ्या पण नियोजित वातावरणात व संस्कारात वाढवली तर ती त्यानुसारच वागतील, असे त्यांचे ठाम मत होते.त्यांच्यासमोर मुद्दा अर्थातच फक्त स्वभावाचा नव्हता तर बौद्धिकतेचा, क्षमतेचा आणि सामाजिक व्यवहाराचाही होता. एकाच मुशीतून (कॅच देम यंग!) माणसे तयार झाली की, त्यांच्या स्वभावाचे स्वरूपही निश्चित होईल असे मानणाऱ्यांमध्ये जे होते त्यात जसे नाझी वा फॅसिस्ट होते, तसेच कम्युनिस्टही होते आणि काही अति कट्टर विज्ञानवादीही होते. त्यांच्यातील मतभेदाचा मुद्दा हा होता की, ज्या मुशीतून ही ‘कर्तबगार’ आणि ‘अतिसक्षम’ माणसे तयार करायची ती मूस नेमकी कोण ठरविणार आणि त्या मुशीत फेरफार (भेसळ!) होणार नाहीत याची काळजी कशी घेणार?आपल्याकडेही थोडय़ा फार प्रमाणात मुस्लिम समाजात मदरसांमधून आणि संघपरिवारात शाखा सदृश संस्थांमधून माणसे घडवायचा-बिघडवायचा प्रयत्न झाला. अर्थातच त्यातून काही विशिष्ट राजकीय संस्कार व धर्माभिमान ठसले. पण तरीही ‘स्वभावशैली’ निश्चित झाल्या नाहीत. संघाच्या शाखेवर लहानपणापासून गेलेले कित्येक स्वयंसेवक किती भिन्न स्वभावांचे असतात आणि एकाच मदरशात वाढलेले दोन वा अधिक मुस्लिम तरुण किती वेगवेगळे वागतात, हे जसे सध्या त्यांच्या अनुभवाला येत आहे, तसेच ते रशिया-चीन या कम्युनिस्ट देशांमध्ये आणि नाझींच्या जर्मनीतही पूर्वी दिसून आले होते. स्वभाव घडविणे, त्यावर नियंत्रण ठेवणे, ती स्वभावशैली व चाकोरी तो वा ती सोडत वा मोडत नाही ना, हे पाहणे जेव्हा आटोक्याबाहेर जाऊ लागले तेव्हा बंदुकीच्या, हुकूमशाहीच्या, दहशतीच्या जोरावर समाज-नियंत्रण करण्याचे प्रयत्न सुरू झाले होते, आजही होत आहेत. स्त्रियांवरती बहुतेक सामाजिक- सांस्कृतिक बंधने ही या ‘स्वभाव-नियंत्रणवादी’ हुकूमशहांकडून व दहशतवाद्यांकडून आली आहेत. मुद्दा फक्त मुलींच्या शिक्षणाचा, त्यांनी बुरखा घालावा की नाही याचा वा जीन्स-टीशर्ट घालण्याचा तसेच बॉबकट करावा की वेण्या घालाव्या इतपत नसतो. विधवांनी वपन करावे आणि कुंकू लावू नये, इतपतच ती बंधने नसतात. स्वभाव-नियंत्रणाची ती माध्यमे असतात. तालिबान्यांनी अफगाणिस्तानात आणि शीख अतिरेक्यांनी पंजाबमध्ये किंवा ब्राह्मण समाजात (अगदी काही दिवसांपूर्वी झालेल्या पुण्याच्या ब्राह्मण संमेलनातही) कुणी कसे राहावे, काय नेसावे, जानवे घालावे की नाही अशा चर्चा झाल्या त्या सर्व या जाचक स्वभाव-नियंत्रणाच्या प्रयत्नातून आलेल्या र्निबधाचा भाग आहेत. परंतु आजवर स्वभाव-नियोजन-नियंत्रण-नियमनाचे जे जे प्रयोग वा अघोरी प्रयत्न झाले ते सर्व फसले आहेत. तरीही ‘स्वभाव’ याबद्दलचे चिंतन, संशोधन चालूच आहे! त्याचा संदर्भ आहे माणसाच्या स्वातंत्र्याशी!
कुमार केतकर

2 comments:

  1. कुमार केतकर जबरदस्त लिहितात. मी ्पहिल्या पासुन त्यांचा चाहता आहे

    ReplyDelete
  2. स्वभाव या विषयावर विस्तृत विवेचन या लेखात झालं. मात्र एचआरडी या विषयाला केलेला ओझरता स्पर्शही सुखदायक होता. पुढिल लेखात एचआरडीचा सखोल परामर्श घेतल्यास नव्या विषयाची माहिती वाचकांना मिळू शकेल.

    ReplyDelete