कॉमन 'समृध्दी'

‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये सहभागी झालेल्या ७१ लहान-मोठय़ा देशांना एकत्र आणणारा धागा आहे- इंग्रज वसाहतवादाचा वारसा.. ‘कॉमनवेल्थ’ चे समान सूत्र आहे, कला, क्रीडा, संस्कृती यांची ‘कॉमन’ समृद्धी.. ‘कॉमनवेल्थ’ या संकल्पनेला इतिहास आणि राजकारण यांचा पीळ आहे ..
ब रेच लहान-लहान ‘टिकलीएवढे’ देश आणि काही लोकसंख्येने व आकाराने प्रचंड असलेले देश, समानतेच्या तत्त्वावर ‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये सहभागी होत आहेत. या राष्ट्रकुल स्पर्धामध्ये सामील झालेल्या देशांची संख्या ७१ आहे. या सर्व लहान-मोठय़ा देशांना एकत्र आणणारा धागा आहे- इंग्रज साम्राज्यवादाचा वा वसाहतवादाचा वारसा. म्हणजेच सुमारे ५०० वर्षांच्या इतिहासाचा तो वारसा आहे. अगदी काटेकोरपणे पाहिल्यास तो धागा घट्ट होत गेला, तो गेल्या सुमारे २०० वर्षांत. इतिहास आणि राजकारण यांचा पीळ असलेली ‘कॉमनवेल्थ’, लौकिक अर्थाने स्थापन झाली ८० वर्षांपूर्वी. गेल्या आठ दशकात इतकी आवर्तने या राष्ट्रकुलाने पाहिली आहेत की, अनेकदा त्यातून उद्भवलेल्या राजकारणाचा सरळ अर्थ लावणेही अशक्य वाटावे.
सध्या चर्चा चालू आहे ती भ्रष्टाचाराची. निदान अलीकडे राजकारणाचे आणि इतिहासातील संदर्भाचे प्रश्न कुणीही उपस्थित करीत नाही. कम्युनिस्ट, समाजवादी वा संघवाले सर्वानी ‘कॉमनेल्थ’च्या संकल्पनेला आता मान्यता दिली आहे. परंतु भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिली सुमारे १५-२० वर्षे राष्ट्रकुलात आपल्या देशाने सामील व्हावे की नाही याबद्दल उदंड वितंडवाद घातला गेला होता. त्या वितंडवादाची मुळे, वर म्हटल्याप्रमाणे, इतिहासात आहेत.
तसे पाहिले तर इंग्रज साम्राज्याचा युनियन जॅक देशावर साधारणपणे ९० वर्षेच फडकत होता. पहिल्या स्वातंत्र्ययुद्धातील पराभवानंतर, १८५८ साली इंग्रज राज्यकर्त्यांनी भारतातील सुमारे साडेसहाशे संस्थाने बरखास्त करून एका वटहुकुमाद्वारे ‘ब्रिटिश इंडिया’चे पुनर्घटन केले. त्यापूर्वी आपल्या देशात दुहेरी सत्ता होत्या. ईस्ट इंडिया कंपनीचा अनधिकृत अंमल आणि संस्थानिकांची ‘अधिकृत’ सत्ता. संस्थानिकांची राजघराणी वा सुभेदारी त्यांच्यातील परस्पर युद्धातून वा तहातून प्रस्थापित झालेली होती. त्या सत्तांना कोणत्याही राज्यघटनेचा आधार नव्हता किंवा भाषा, संस्कृती, धर्म यांचा पाया नव्हता. होळकर, गायकवाड, शिंदे, भोसले, पटवर्धन इत्यादी अशी संस्थाने होती. पेशवे छत्रपतींच्या नावावर ‘पेशवाई’ चालवीत होते. ईस्ट इंडिया कंपनीचे व्यापारी, अधिकारी, मुत्सद्दय़ांनी बहुतेक संस्थानांच्या कारभारात हस्तक्षेप केला होता. कधी त्यांना वश करून, कधी संस्थानिक घराण्यांमध्ये भाऊबंदकी घडवून आणून, कधी युद्ध करून, तर कधी कारस्थान-कपट करून. भारतीय उपखंडात आलेल्या इंग्रजांची संख्या तशी अत्यल्पच होती. पण प्रथम ‘कंपनी सरकार’ आणि नंतर ‘राणी सरकार’ आपला अंमल टिकवू शकले, ती एतद्देशीय संस्थानिकांच्या पाठिंब्यावरच.
१८५७ साली इंग्रजांना पहिला झटका मिळाला. (सुरुवातीला ते फक्त असंतुष्ट संस्थानिकांचे आणि त्यांच्या अस्वस्थ सैनिकांचे बंड होते. एकूणच त्या बंडाचा विस्तार देशव्यापी नव्हता. पण काही ठिकाणी असंतोष तीव्र होता आणि हिंसा उग्र होती. कंपनीची अनधिकृत राजवट दूर करून लंडनच्या बकिंगहॅम पॅलेसने तो सर्व असंतोष नियंत्रणाखाली आणला आणि इंग्रज राजवटीने आपल्या साम्राज्यावर भारताची- म्हणजे तत्कालिन हिंदुस्थानची मोहोर उमटवली.) परंतु १८५७ नंतर इंग्लंडमध्ये एक विचारप्रवाह असा निर्माण झाला की आज ना उद्या हिंदुस्थानला (वा सर्व हिंदू वा मुस्लिम संस्थानांना) ‘स्वातंत्र्य’ द्यावे लागणार. मात्र प्रश्न फक्त हिंदुस्थानचा नव्हता. कारण इंग्रजांचे साम्राज्य पृथ्वीतलावर चहुदूर पसरलेले होते. ऑस्ट्रेलियापासून कॅनडापर्यंत, बम्र्युडापासून युगांडापर्यंत, नायजेरियापासून न्यूझीलंडपर्यंत. म्हणूनच असे म्हणण्याची प्रथा होती की, ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य कधीही मावळत नाही. त्या साम्राज्यातील सर्व वसाहतींमध्ये पहिल्या महायुद्धानंतर (१९१४-१९१८) अस्वस्थता आणि स्वातंत्र्याची भावना वाढू लागली होती. भारतातील स्वातंत्र्याची भावना १८८५ साली झालेल्या काँग्रेसच्या स्थापनेनंतर व्यापक होऊ लागली होती.
हिंदुस्थान हा इंग्रजांच्या राजमुकुटातील सर्वात तेज:पुंज हिरा होता. ‘ज्यूल इन द क्राऊन’ अशीच हिंदुस्थानची ओळख होती. किंबहुना इतर वसाहतींवरचा वचक, एकूण साम्राज्याच्या व्यवस्थापनाचा खर्च, शस्त्रास्त्रे व सेनादले बाळगण्याचा खर्च आणि इंग्रज राज्यकर्त्यांची ऐषारामी जीवनशैली हे सर्व हिंदुस्थानच्या बेबंद लुटीमुळेच शक्य झाले होते. दादाभाई नौरोजी, गांधीजी, पंडित नेहरू, एम.एन. रॉय आणि खुद्द काही इंग्रज इतिहासकार व अर्थतज्ज्ञ हेसुद्धा पुराव्यानिशी सिद्ध करीत असत की भारताचे दारिद्रय़ त्या लुटीमुळेच निर्माण झाले वा अधिक भीषण झाले.
इंग्रजांच्या इतर वसाहतींमध्ये स्वातंत्र्याची भावना व चळवळ वाढू लागली ती मुख्यत: दोन राजकीय-वैचारिक प्रभावांमुळे. त्यापैकी एक प्रभाव होता भारतातील स्वातंत्र्यलढय़ाचा. (त्यातही विशेष करून गांधीजी व नेहरूंचा. गांधीजींच्या दक्षिण आफ्रिकेतील संघर्षांमुळे ते व त्यांचे सत्याग्रहाचे प्रयोग सर्व वसाहतींमध्ये प्रसिद्ध झाले होते. नेहरूंचा प्रभाव होता तो त्यांच्या लोकशाही- उदारमतवादी-समाजवादी विचारसरणीचा आणि अर्थातच त्यांच्या स्वातंत्र्य आंदोलनातील सहभागाचा.) वसाहतींमध्ये (मग त्या वसाहती इंग्रजांच्या असोत, फ्रेंचांच्या असोत वा स्पेन-पोर्तुगालच्या) दुसरे वारे वेगाने फिरू लागले होते ते कम्युनिस्ट विचारांचे, सुरुवातीला मार्क्‍स-लेनिन आणि दुसऱ्या महायुद्धानंतर माओ व होचिमिन्ह यांच्या क्रांतिलढय़ांचे.
भारताला १९४७ साली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाकी वसाहतीही आज ना उद्या स्वतंत्र होणार, हे उघड होते. इंग्रज सत्ताधारी वर्गातील काही उदारमतवादी मुत्सद्दय़ांनी त्या वसाहती ब्रिटनपासून पूर्ण तुटल्या जाऊ नयेत म्हणून १९३१ पासूनच प्रयत्न सुरू केले होते.
‘ब्रिटिश कॉमनवेल्थ ऑफ नेशन्स’ ही संकल्पना आणि संघटना त्यातूनच जन्माला आली. इंग्रजांच्या एकूण जितक्या वसाहती होत्या, त्यापेक्षा अधिक राष्ट्रे प्रत्यक्षात निर्माण झाली. उदाहरणार्थ ब्रिटिश इंडियातून भारत, पाकिस्तान, नंतर बंगलादेश किंवा आफ्रिकेतून तर अनेक नवस्वतंत्र देश झाले. या सर्व नवस्वतंत्र देशांचा साम्राज्यवादाला, वसाहतवादाला, विस्तारवादाला आणि वंशवादाला विरोध होता. युरोपातील गौरवर्णियांचा वंशवाद हा त्यांच्या वसाहतवादी साम्राज्याचाच घटक होता.
त्यामुळे ब्रिटिशांना १९३१ साली स्थापन केलेल्या ‘कॉमनवेल्थ’ला तसा पाठिंबा मिळाला नाही. पुढेही इजिप्त, इराक, सोमालिया, कुवेत आदी देशांनी कॉमनवेल्थ संकल्पनेचा स्वीकार केला नाही. भारतातही ‘कॉमनवेल्थ’ म्हणजे इंग्रजांनी रचलेला सापळा आहे, ते नववसाहतवादाचेच एक रूप आहे आणि त्यात सामील होणे हे स्वतंत्र-सार्वभौम राष्ट्राला लांच्छनास्पद आहे, असेच डाव्यांचे मत होते. संघपरिवारातही हाच विचार प्रबळ होता. त्यामुळे स्वतंत्र भारतासमोर राष्ट्रकुल ऊर्फ ‘कॉमनवेल्थ’मध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव आला, तेव्हा त्याला डाव्या-उजव्या पक्षांनी विरोध केला. (खरे तर आता ‘ब्रिटिश’ शब्द टाकून देऊन फक्त ‘कॉमनवेल्थ’ ठेवले गेले होते.)
ब्रिटिशांना ‘चले जाव’ सांगितल्यानंतर पुन्हा त्यांची अप्रत्यक्ष लाचारी तरी कशाला हवी, असा सवाल मुख्यत: डाव्यांनी केला. कम्युनिस्ट आणि समाजवादी पक्षांचा जसा विरोध होता, तसाच काँग्रेसमधील काहींचाही होता. पंडित नेहरूंचे ‘ब्रिटनप्रेम’ व त्याचे ‘ओझे’ देशाने का स्वीकारायचे, असा सवाल समाजादी मंडळी करीत असत.
नेहरूंनी मग त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे ठरविले. नेहरूंचा स्वातंत्र्य चळवळीतील सहभाग, त्यासाठी त्यांना भोगावा लागलेला तुरुंगवास आणि त्यांची देशनिष्ठा याबद्दल शंका घेणे कुणालाच शक्य नव्हते. ‘कॉमनवेल्थ’मध्ये जाण्याचे ‘लाभ’ काय आणि ‘तोटे’ काय, यापेक्षाही व्यापक विचार करण्याची गरज आहे- असे नेहरूंनी सांगायला सुरुवात केली. नेहरूंच्या म्हणण्यानुसार, या भूतलावर पूर्व-पश्चिम, उत्तर-दक्षिण अशा भागात इंग्रजांनी त्यांच्या वसाहती केल्या, साम्राज्यविस्तार केला, काही देशांना अंकित केले (प्रोटेक्टोरेट्स्). युरोपियन सिव्हिलायझेशनचा (प्रामुख्याने इंग्रज संस्कृतीचा) प्रभाव या सर्व वसाहतींवर आहे. लोकशाहीच्या आधुनिक संकल्पनांपासून औद्योगिक क्रांतीपर्यंत, आयझ्ॉक न्यूटनपासून शेक्सपियपर्यंत, इंग्रजी भाषेपासून ते इंग्लिश जीवनशैलीपर्यंत (मॅनर्स, एटिकेट्स, वेशभूषा), इतकेच काय क्रिकेट, फूटबॉल, टेनिसपासून ते ऑक्सफर्ड- केंब्रिज व एकूण शिक्षण व्यवस्थेपर्यंत भारतावर आणि सर्व वसाहतींवर तो संस्कार आहे. म्हणजेच या सर्व तेव्हाच्या वसाहती आणि नंतर स्वतंत्र झालेले देश हे एका अर्वाचीन वारशाने जोडले गेले आहेत. इंग्रजांच्या वसाहतवादाला आपण सर्वानी विरोध केलाच आहे आणि आपण स्वतंत्रही झालो आहोत. मग हा समृद्ध आधुनिकतेचा वारसा भिरकावून कशाला द्यायचा? आपण आपल्या संस्कृतीमध्ये, इंग्रज व युरोपियन संस्कृतीमधून आलेल्या वारशाला सहज सामावून घेऊ शकतो. शिवाय ‘कॉमनवेल्थ’ ही संघटना राजकीय असणार नाही. ब्रिटिश राणी-राजा वा राजपुत्र हा त्याचा नामधारी मुख्य प्रतिनिधी राहील, कारण त्याच्या नावाने निर्माण झालेल्या साम्राज्याचेच आपण घटक होतो. (खरे म्हणजे आजची लोकशाही-स्वातंत्र्याची कल्पनाही आपण त्यांच्याचकडून घेतली आहे.) नवस्वतंत्र राष्ट्रांच्या, त्यांनी-त्यांनी निवडलेल्या स्वतंत्र सरकारांचे हे संघटन असेल आणि आपल्यावर ब्रिटिश सरकारचा कोणताही दबाव असणार नाही. ‘कॉमनवेल्थ’ ही मुख्यत: कला, क्रीडा, संस्कृती यांची ‘कॉमन’ समृद्धी असेल.. या विचारातूनच ‘कॉमनवेल्थ गेम्स’ संघटित होऊ लागले.
आजही कित्येकांना ‘कॉमनवेल्थ गेम्स’ आणि ‘एशियन गेम्स’ हे समांतर पण एकाच प्रकारचे क्रीडाप्रदर्शन वाटते. वस्तुत: आशिया खंडात इंग्रजांची वसाहत वा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अंमल हा फक्त हिंदुस्थान (पाकिस्तान-बंगलादेश), श्रीलंका, अफगाणिस्तान येथेच होता. (त्यातही अफगाणिस्तानवर त्यांचे तसे नियंत्रण कधीच प्रस्थापित होऊ शकले नाही.) चीन व जपानवर इंग्रजांची कधीच सत्ता नव्हती. इतर देशांपैकी मुख्यत: आफ्रिकेतील नवस्वतंत्र देश या राष्ट्रकुलात आले. केनिया, बोटस्वाना, घाना, युगांडा, झांबिया, नायजेरिया, मोझांबिक, नामिबिया, मादागास्कर, तांझानिया, सुदान, इत्यादी. ब्रिटनची सर्वात मोठी व समृद्ध वसाहत हिंदुस्थान असली तरी भौगोलिक विस्तार आफ्रिका खंडात होता.
गेल्या ६०-७० वर्षांत कित्येक नवीन देश निर्माण झाले, ज्या प्रदेशावर पूर्वी इंग्रजांचा अंमल होता. उदा. पॅलेस्टिन (ज्यातून पुढे इस्रायल जन्माला आले), भूतान, फिजी, मलेशिया (पूर्वी मलाया परिसरातील बेटे).
सुरुवातीला फक्त ११ देश सदस्य असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत आज जरी ७१ देश असले, तरी यापैकी काही देशांची लोकसंख्या भारतातील पुणे-ठाणे वा औरंगाबाद या शहरांपेक्षाही कमी आहे. परंतु प्रत्येक देशाचा ‘स्वतंत्र संघ’ ही शिस्त एकदा स्वीकारली की भारत आणि बम्र्यूडा एकाच स्तरावर येतात. विषमता इतकी की, भारताची लोकसंख्या १२० कोटी तर बम्र्यूडाची फक्त ६८ हजार! तरी दोहोंचा संघ एकेकच. मात्र शिवाय बम्र्यूडा हा तसा ‘युनायटेड किंगडम’चाच भाग. ‘यूके’ या ब्रिटिश अंमलाखाली असूनही स्वतंत्रपणे भाग घेणारे देश म्हणजे स्कॉटलंड, नॉर्दन आर्यलड, वेल्स, ब्रिटिश चॅनल आयलंड, वेस्ट इंडिज इ.
वर म्हटल्याप्रमाणे पृथ्वीच्या उत्तर गोलार्धात असलेला कॅनडा आणि विषुवृत्ताच्या खाली असलेले ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड, दक्षिण आशियाच्या टोकाला असलेले श्रीलंका आणि दक्षिण अमेरिकेच्या खालच्या पट्टय़ात असलेले फॉकलंड आयलंड, आफ्रिकेच्या उत्तर भागात असलेले सुदान आणि दक्षिणेला असलेले बोटस्वान्त- असे इंग्रजांचे सर्वत्र नियंत्रण होते.
या सर्व देशांमधून सुमारे साडेआठ हजार खेळाडू भारतात येत आहेत. १९३० साली ही संख्या फक्त ४०० खेळाडू इतकीच होती. परंतु भारताव्यतिरिक्त सर्व देशांची लोकसंख्या एकत्र केली, तरी ती फार तर महाराष्ट्र या एका राज्याएवढी असेल. जर भारतातील सर्व राज्यांनी आपल्या देशाचे सार्वभौमत्त्व तसेच ठेवून जर स्वतंत्रपणे या स्पर्धेत ‘एन्ट्री’ घेतली तर स्पर्धेची व्याप्ती वाढेल आणि भारतातील राज्याराज्यांतील शेकडो खेळाडूंना भाग घेत येईल! त्या निमित्ताने भारताला सर्व राज्यांत क्रीडा संस्कृती जोपासायची आणि वाढवायची संधी मिळू शकेल. त्या निमित्ताने विविध खेळांना प्रोत्साहक अशा सोयी-सुविधा ठिकठिकाणी निर्माण केल्या जातील. कोणते राज्य खेळाडूंना उत्तेजन देते, यासाठी चुरस लागेल आणि अद्याप कृश असलेली भारतीय खेळ-संस्कृती बाळसे धरू लागेल. म्हणजेच जागतिक स्तरावरील ‘कॉमनवेल्थ गेम्स’मध्ये भाग घेणारे एक ‘भारतीय उप-कॉमनवेल्थ’ तयार होईल.

कुमार केतकर,
रविवार, ३ ऑक्टोबर २०१०

No comments:

Post a Comment