विनाशकाले विपरित 'धर्म'



विनाशकाले विपरित 'धर्म'


अलिकडेच तीन आंतरराष्ट्रीय परिषदा झाल्या। एक मुंबईत, दुसरी ढाका येथे आणि तिसरी ब्रुसेल्सला। तीनही ठिकाणी चर्चासत्रांचा मुख्य विषय होता- ‘धर्म आणि दहशतवाद’. ‘धर्म’ हा हिंसेची वा हत्याकांडाची प्रेरणा कशी होऊ शकतो? गांधीजींची हत्या करणारा नथुराम कोणत्याही व्यक्तिगत स्वार्थाने प्रेरित झालेला नव्हता, तर प्रखर ‘हिंदुत्वाने’भारलेला होता. इंदिरा गांधींना ठार मारणारे शीख सुरक्षा गार्डस् हेही धर्मभावनेने झपाटलेले होते. फाळणीच्या वेळी झालेला लक्षावधी लोकांच्या हिंसेचा आगडोंब, दक्षिण आणि उत्तर आर्यलडमधील कॅथलिक आणि प्रोटेस्टंट ख्रिश्चनांमधील १०० वर्षे चालू राहिलेला हिंसाचार, इस्रायल आणि पॅलेस्टिन यांच्यात आजही चालू असलेले घनघोर युद्ध या सर्वामागे ‘धर्म’ हीच ‘उदात्त प्रेरणा’ आहे. ‘९/११’ आणि ‘२६/११’ या दोन घटनांमध्ये (११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क व वॉशिंग्टनवर आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे) ‘धर्म’ हाच प्रेरणास्रोत होता. ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी म्हटले आहे की, ‘धर्म’ या संकल्पना व संस्थेमागील प्रचंड सामथ्र्य लक्षात घेऊन जगातील दहशतवाद व युद्ध यांना कायमचा विराम देणे शक्य आहे। तिबेटचे दलाई लामा यांनाही वाटते की, धर्म हा जागतिक शांततेचा संदेश देऊ शकतो. काही स्वयंभू विचारवंतांना वाटते की, ‘पूर्वेकडील’ धर्म व तत्त्वज्ञान, संस्कृती व परंपरा या ‘पश्चिमेकडील’ धर्म-परंपरांपेक्षा अधिक प्रगल्भ, शांततावादी आणि उदात्त आहेत. जणू काही तत्त्वज्ञान हे भौगोलिकतेवर अवलंबून आहे, चिंतन-मननावर नाही.या ‘पूर्व’ग्रहातून बौद्ध, हिंदू, इस्लाम हे कुणीच मुक्त नाहीत. पूर्वेकडील देशात ‘अध्यात्म’ आहे आणि पश्चिमेकडे ऐहिकता व चंगळवाद आहे असाही एक समज या ‘पूर्व’सुरींनी प्रसृत केला आहे. कित्येक शतकांमध्ये चीन, जपान, कंबोडिया, भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, श्रीलंका इत्यादी देशांमध्ये झालेला हिंसाचार पाहिला की या तथाकथित पूर्वेच्या तत्त्वज्ञानाबद्दल असलेला प्रचार किती पोकळ आहे, हे सहज लक्षात येईल.हा सर्व इतिहास परिचित असूनही मुंबई व ढाका येथील परिषदांमध्ये जे ‘इस्लाम’चे समर्थक (आणि अर्थातच दहशतवादाचे विरोधक) होते, त्यांच्या मते त्यांच्या धर्माचा चुकीचा व विकृत अर्थ लावला गेल्याने ‘इस्लामी दहशतवाद’ निर्माण झाला व मुस्लिम समाज बदनाम झाला. हिंदुत्त्ववाद्यांचे तर प्रतिपादन असे की, त्यांचा ‘धर्म’ हा खऱ्या अर्थाने ‘वैश्विक’ आणि ‘आध्यात्मिक’ आहे. त्यामुळे इहवाद आणि त्याच्या अनुषंगाने येणारा लोभ, सत्ताकांक्षा, हिंसा, युद्ध हे ‘हिंदू’ तत्त्वज्ञानात व धर्मात बसूच शकत नाही. (आपल्या भूमिकेची चाल न बदलता हे विद्वान तितक्याच ओजस्वीपणे महाभारत, कुरुक्षेत्र आणि कृष्णाचा अर्जुनाला दिलेला युद्धाचा संदेशही सांगतात.) बौद्ध धर्माचा संस्कार असलेल्या जपान व चीनने फक्त विसाव्या शतकातील केलेल्या आक्रमणांची व हिंसाचाराची नोंद घेतली तरी त्या इतिहासाबद्दल तसला ‘गैरसमज’ राहणार नाही. ‘इस्लाम’इतकाच ज्यूंचा धर्म अती-कडवा आहे आणि ज्यूही त्यांच्या विचाराच्या जागतिक प्रतिष्ठापनासाठी विध्वंस करायला तयार आहेत, हे तर दिसतेच आहे.इस्रायलच्या माजी पंतप्रधान गोल्डा मेयर यांनी ‘बीबीसी’च्या पॅनोरमा’ कार्यक्रमात १९७१ साली एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीत त्यांनी म्हटले होते की, ‘इस्रायलला युद्धाचा व त्याच्या अस्तित्वाचा धोका वाटला तरी फक्त सर्व अरब प्रदेशच नव्हे, तर अवघे जग विध्वंसात लोटून द्यायलाही आम्ही मागे-पुढे पाहणार नाही.’इस्रायलने आज प्रत्यक्षात अमेरिकेलाच स्वत:पुढे लोटांगण घालायला लावले आहे. तेही धर्माचा, परंपरांचा आधार घेऊनच. आपला धर्म व आपली पुराणे सर्वात प्राचीन व प्रगल्भ आहेत असे ज्यूंचे मत आहे आणि ‘इस्लाम’ हा त्यांनी त्यांचा आद्य शत्रू मानला आहे. (पूर्वी त्यांचा हा वैरभाव ख्रिश्चनांबद्दल होता.) अर्थातच हे विचार कडव्या, धर्माध ज्यूंचे आहेत, ज्याप्रमाणे कडवे इस्लामीही तशाच इर्षेने पेटलेले आहेत. म्हणूनच इस्रायल-पॅलेस्टिन यांच्यातील संघर्ष हा जगाला विनाशाच्या वणव्यात लोटू शकतो.ज्यूंचा जेहोवाह (किंवा याहवेह) या प्रचंड सामथ्र्य असलेल्या ग्रामदेवतेचा पगडा त्या समाजावर आजही आहे. या जेहोवाहने ज्यूंच्या अब्राहम या पुराणपुरुषाशी एक करार केला आहे. ‘हा कॅनानचा सारा प्रदेश (म्हणजे इस्रायल) अनंतकालपर्यंत तुझ्या वंशजांच्या मालकीचा राहील. त्यांचा देव मीच असेन. तूसुद्धा, तसेच तुझ्या पुढील पिढय़ातील वंशजांनीसुद्धा हा माझ्याबरोबरचा करार पाळण्याचे वचन दिले पाहिजे.’ या करारात जेहोवाहने पुढे आयझ्ॉक, जेकब, मोझेस यांनाच नव्हे तर सर्व ज्यू पिढय़ांना बांधून घेतले आहे. ‘इस्रायल जमात हे माझे पहिले अपत्य आहे. मीच इस्रायलींचा पवित्र आणि तुम्हाला अभय देणारे एकमेव देव!’ मोझेसला दहा आज्ञा फर्मावताना त्याने बजावले आहे की, ‘अन्य कुठल्याही देवाची पूजा करू नका. मला प्रतिस्पर्धी सहन होत नाहीत. जे माझ्याविरुद्ध जातात वा माझा द्वेष करतात त्यांना आणि त्यांच्या तिसऱ्या-चौथ्या पिढीपर्यंतच्या वंशजांनाही मी कडक शिक्षा देतो.’ (संदर्भ व भाषांतर : मानवैकात्मकता- अर्थात मानवजातीच्या पुनर्बाधणीचा नवा विचार. लेखक श्रीराम त्र्यंबक गोडबोले. त्रिदल प्रकाशन, मुंबई)सध्या सर्वत्र असे मानले जाते की दहशतवादी मुख्यत: इस्लाम धर्माचे आहेत. इस्लाममध्ये इतर धर्मीयांना म्हणजेच काफिरांना (!) ठार मारण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संपूर्ण जग ‘इस्लामी’ करण्याचा त्यांचा कार्यक्रम (कट!) आहे आणि त्या ‘उदात्त ध्येयासाठी’ ते मरायला तयार आहेत. प्रत्यक्षात कडवे ज्यू आणि कट्टर इस्लामवादी हे आपल्या प्रखर ‘धर्मप्रेमा’पोटी जगाच्या विनाशाला तयार आहेत.इस्लामचा धर्म म्हणून उदय सुमारे १५०० वर्षांपूर्वी झाला आहे. तिसऱ्या शतकापासून ते सहाव्या शतकापर्यंत पूर्व रोमन साम्राज्याचे सत्ताधीश आणि पर्शियाचे तत्कालिन राज्यकर्ते यांच्यात घमासान संघर्ष चालू होता- सिरिया, इजिप्त आणि आशिया मायनर या भागात स्वत:चा अंमल प्रस्थापित करण्यासाठी. त्यामुळे प्रचंड प्रमाणावर असंतोष आणि अस्थैर्य, अराजक आणि अंदाधुंदी या प्रदेशात माजली होती. ती स्थिती दूर करून स्थैर्य व शांतता प्रस्थापित करण्यासाठी महमद पैगंबरांनी प्रयत्न केला. (पैगंबराचा जन्म ५७१ सालचा वा त्या सुमाराचा.)ख्रिस्ती धर्माचा उदय दोन हजारांहून अधिक वर्षांचा. बेथलहेम, पॅलेस्टिन (त्यावेळचा) येथे हीब्रू प्रवचन करणारा येशू हा मूळचा ज्यू! येशूच्या प्रवचनांमुळे आपले जणू आसनच अस्थिर होते आहे, असे वाटू लागल्यामुळे रोमन सत्ताधीशांच्या अधिकाऱ्यांनी येशूला सुळावर चढविले. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे काही किलोमीटरच्या एकाच परिसरात जन्माला आलेले धर्म परस्परांच्या विरोधात कडवे होण्याचे कारण त्या भागातील अतिशय तीव्र असा सत्तासंघर्ष. त्या सत्तासंघर्षांचे मूळ व्यापारात आणि व्यापारविस्तारातच होते. सामुद्री मार्ग निर्माण होण्यापूर्वी व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे. त्या व्यापारात प्रचंड स्पर्धा असे. ज्याची त्या खुष्कीच्या महामार्गावर सत्ता प्रस्थापित होईल तो त्या भागाचा चक्रवर्ती- हा महामार्ग म्हणजे सिरिया-बाबिलॉनमधून मृतसमुद्र व लालसमुद्रमार्गे इजिप्तला जाणारा पट्टा.त्या काळात, म्हणजे शेतीची अर्थव्यवस्था स्थिर होत असतानाच्या काळात आणि टोळी अवस्थेतून माणूस पूर्णपणे बाहेर यायच्या अगोदर, ज्या देवदेवतांच्या दंतकथा प्रचलित होत्या त्याच वेगवेगळी रुपे धारण करून सर्व धर्माच्या पुराणात गेल्या. परंतु अजून एका प्रश्नाचे निर्णायक उत्तर कुणालाही देता आलेले नाही. इतर प्राणीमात्रात नसलेली विद्वेषाची भावना आणि धर्माग्रहाच्या नावाखाली धर्मांधता ही सिव्हिलायझेशनच्या क्रमात कशामुळे वाढायला लागली असावी? युगोस्लावियाच्या विघटनातही सध्या पसरत असलेली धर्मवादाची लाट प्रकट झाली होती.या पाश्र्वभूमीवरच वर उल्लेखिलेल्या तीन परिषदांचे संयोजन केले गेले होते. ‘धर्म आणि दहशतवाद’ या विषयावरील तेथील चर्चेला आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञानाचे परिमाणही लाभले होते. त्यामुळे मधूनच त्या चर्चेला ‘धर्म आणि विज्ञान’ यांच्यातील परस्पर स्पर्धेचा/ विरोधाचाही रंग येत असे आणि मनोविश्लेषणाचाही!एखादा माणूस दुसऱ्या माणसाला किंवा एखादा समूह दुसऱ्या समूहाला ठार मारायला का व कसा प्रवृत्त होतो? आणि त्यासाठी स्वत:ही ‘फिदायीन’ वा ‘मानवी बॉम्ब’ व्हायला तयार कसा होतो. धर्माचा असा काय पगडा आहे की, ज्यामुळे एखादा तरुण (!) आपले सर्व तारुण्य आणि आयुष्य त्यासाठी उधळून द्यायला तयार होतो? सर्व धर्माची ‘मूळ’ शिकवण करुणा, प्रेम, त्याग आहे, असे सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र आपलाच धर्म श्रेष्ठ, अधिक उदात्त, प्रगल्भ आणि प्राचीन आहे हे सिद्ध करण्यासाठी, नेमक्या त्याच प्रेम व करुणेच्या मूल्यांना झुगारून अपार हिंसेला तयार होतो? फक्त तात्कालिक हिंसेलाच नव्हे तर जगाच्या विध्वंसालाही तो अत्याधुनिक तंत्रज्ञानाने स्वत:ला सिद्ध करतो.त्या विध्वंसाचे मूळ त्या विज्ञान-तंत्रज्ञानात नाही तर मनात आणि त्या तथाकथित धर्मसंस्कारात आहे. सर्व धर्माची शिकवण काहीही असो, त्यांचा व्यवहार हिंसेचा आणि अमानुषतेचाच राहिला आहे. धर्मसंस्थेचा उगम सामाजिक नियमनासाठी आणि तत्त्वचिंतनाला शिस्त आणण्यासाठी झाला असला तरी उदात्ततेच्या स्पर्धेत, आजच्या बाजारपेठीय स्पर्धानाही लाजवेल इतकी, क्रूर स्पर्धा सर्व धर्मामध्ये सुरू झाली आणि एका बाजूला विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास होत असताना, धर्मसंस्थेला आणि दीर्घकाळ टिकून राहिलेल्या धर्मसंस्कारांना आव्हान मिळू लागले. (धर्म आणि विज्ञानात समन्वय आणण्याचे प्रयत्न सुरू झाले ते त्यातून निर्माण झालेल्या अस्थिरतेला व अस्वस्थतेला दूर करण्यासाठी. परंतु कित्येक वैज्ञानिकांचीच मानसिक धारणा धर्म चौकटीतलीच होती आणि आजही असते.) शिवाय ‘धर्म’ या संस्थेप्रमाणे विज्ञान ही काही संस्था नाही. (वैज्ञानिक संस्था आणि विज्ञान नावाचे धर्मसदृश पीठ या वेगळ्या गोष्टी आहेत.) धर्माचा जसा एक ग्रंथ वा एक पीठ वा गुरू वा प्रार्थना वा नीती असते तसे विज्ञानाचे नसते. प्रकांड अभ्यास, प्रयोग व साहस करणारे वैज्ञानिक होते पण त्यांचे निष्कर्ष खोडून काढणारे, समांतर प्रयोग करणारे आणि अधिक संशोधन करून त्या निष्कर्षांच्या आधारे पण वेगळे निष्कर्ष काढणारे वैज्ञानिकही होते. वैज्ञानिकांच्या ‘गुरु-शिष्य’ परंपरेत गुरुला आव्हान देणे बसत होते. धर्मात तसे चालत नाही. प्राचीन परंपरांचे दडपण वा दादागिरी वैज्ञानिकतेत नसते. श्रद्धेपेक्षा चिकित्सेला, आदेश पालनापेक्षा कुतुहलाला आणि उत्तरे स्वीकारण्यापेक्षा प्रश्न विचारण्याला विज्ञानात प्रतिष्ठा असते. धर्मसंस्थेत अर्थातच ते स्वातंत्र्य नसते. मुंबई, ढाका व ब्रुसेल्स येथे भरलेल्या तीनही परिषदांमध्ये धर्मांधतेचे मानसशास्त्र, धर्मवादाचे हिंस्र राजकारण आणि धर्मवेडय़ांनी आत्मसात केलेले नरसंहाराचे ‘हायटेक’ ज्ञान याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले गेले. चर्चा खूप झाली पण उत्तरे कुणाकडेच नव्हती. अखेरीस ‘सिव्हिलायझेशन’चा अंतही हे धर्मच करणार का?


कुमार केतकर

2 comments:

  1. "Men never do evil so completely and cheerfully as when they do it from religious conviction." - Blaise Pascal.

    I understand this quote above and agree. The primary reason for violence is existence of a disbelief in anything else other than your own God which can be so easily exploited!

    So I find it hard to accept any equivalence between Indian society that predominantly believes in "ekam sat vipra bahudha vadanti" with western and middle eastern societies that demonstrate antipathy towards other religions other than their own or sometimes with all religions (as in secularism).

    ReplyDelete
  2. तुमचा वैचारिक गोंधळ होण्याला कारण "religion" चे भाषांतर "धर्म" असे करणे आहे. धर्म ही संकल्पना म्हणजे "religion" नव्हे. "religion" म्हणजे संप्रदाय, मत. वाचा संविधान. dharma and religion are two words not interchangeable ..असे आहे.
    तेव्हा हिंदू हा धर्म आहे आणि त्याला दहशतवाद मान्य नाही. जर दहशतवाद मान्य असेल तर तो हिंदुत्ववादी नाही. एवढे हे स्पष्ट सत्य डोळेझाक करू नये,.

    ReplyDelete