टारझन पुढच्या वर्षी ९९ वर्ष पूर्ण करून शंभरीत प्रवेश करील. वयाने ‘जंगल बुक’चा मोगली टारझनपेक्षा मोठा. एडगर राइस बरोज् (१८७५-१९५०) या अमेरिकन कादंबरीकाराचा ‘टारझन’ हा मानसपुत्र. त्याचे कथारूप बरोज् यांनी सिद्ध केले १९१० साली. पण ‘टारझन अॅन्ड द एप्स’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली, १९११/१२ साली. कादंबरी आणि अर्थातच मुख्य पात्र टारझन यांचा परिसर आफ्रिकेतला. घनदाट जंगल आणि एप जातीची माकडं, वाघ, सिंह, अस्वल असा टारझनचा परिवार. स्वत: बरोज् कधीही आफ्रिकेत गेले नव्हते. जंगलातील प्राण्यांबरोबर राहण्याचाही त्यांना अनुभव नव्हता. एडगर राइस बरोज् हा लेखक पुढे जगद्विख्यात झाला, त्याच्या टारझन कथेचे २२ भाग त्याच्या हयातीतच प्रसिद्ध झाले। पुढे आणखीही काही भाग नव्याने लिहिले गेले किंवा त्या सर्व कथांचे कॉमिक स्ट्रीप्स, टीव्ही सीरियल्स, चित्रपट असे अनेक अवतार झाले आणि टारझनचे साम्राज्य वाढतच गेले. जगातल्या बहुतेक सर्व भाषांमध्ये टारझनची भाषांतरे झाली. टारझनचे काम करणारा हॉलिवूडचा नट जॉनी वेसमुल्लर हा मुलांच्याच नव्हे तर मोठय़ांच्याही गळ्यातला ताईत बनला. महिलाही त्याच्या शरीरयष्टीवर फिदा झाल्या. त्या काळात ‘सिक्स पॅक अॅब्ज’ वगैरे प्रकार फॅशनमध्ये नव्हते, पण जॉनी वेसमुल्लरसारखे देखणे व शक्तीमान शरीर आपल्याला असावे, अशी बहुसंख्य तरुणांची मनीषा होती. जॉनी वेसमुल्लरचे चित्रपट १९३२ ते १९४८ या काळातले. म्हणजे त्या चित्रपटांनाही ६० वर्षे होऊन गेली आहेत. पण वेसमुल्लरची, म्हणजेच टारझनची ‘लेजंड’ अजूनही टिकून आहे. टारझन एका झाडावरून दुसऱ्या झाडावर वानरांच्या चपळाईने जात असे, हिंस्र श्वापदांबरोबर सामना करीत असे, शरीरयष्टी कितीही ताकदीची असली तरी सिंह वा वाघ वा हत्ती यांच्याबरोबर मैत्री, मस्ती वा मारामारी करणे सोपे नव्हते. टारझन ते लिलया करीत असे. किंबहुना म्हणूनच अगदी बालपणापासून जंगलातील सर्व प्राण्यांबरोबर तो अगदी ‘समानते’ने वागू शकत असे. वेगळा असूनही त्याला वा त्या प्राण्यांना, परस्परांमधला फरकही कळत नसे, इतके त्यांचे जीवन एकरुप झाले होते. टारझन हा जंगलांमध्ये वाढलेला आणि तेथेच रमणारा ‘माणूसप्राणी’ आहे. टारझनला एक नैतिक बाज आहे. त्या प्राणीविश्वातही तो ती नैतिकता जपतो! टारझनचा जन्म अस्वस्थतेतून झाला होता. शहरीकरणाची आणि बेफाम औद्योगिकरणाची सुरुवात झाल्यावर, माणसाचा निसर्गसंपर्कच तुटतो आहे की काय अशी भीती निर्माण होऊ लागली होती. विकास व समृद्धीबरोबर लबाडी, खोटेपणा, भ्रष्टाचार वाढू लागला होता. ‘एज ऑफ इनोसन्स’ म्हणजे माणसाचे निरागसपण या धामधुमीत लोप पावणार, अशी धास्ती समाजाच्या अंतर्मनात ठसठसू लागली होती. टारझनने जंगलातील प्राणीसृष्टीत असलेली निरागसता, तेथील वृक्षवल्लींमध्ये असलेले सौंदर्य, त्या ‘अन्सिव्हिलाईज्ड’ विश्वातली सुसंस्कृतता आणि माणुसकी दाखवून दिली. आनंदी जीवन जगण्यासाठी चंगळवादी वस्तूंची खैरात लागत नाही, पैसे लागत नाहीत, उंची कपडे, बंगले, मोटारी लागत नाहीत. एकूण निसर्गाबरोबर एकरुप झाले की तो आनंद मिळतोच. त्या प्राणीसृष्टीबरोबर राहताना महत्त्वाकांक्षा गळून पडतात, लोभ लयाला जातो, चैन-चंगळीची वखवख नाहीशी होते. हत्ती, वाघ, सिंह, वानर, अस्वल यांच्याबरोबरच्या जीवनात चढाओढ, स्पर्धा, हेवा, मत्सर, द्वेष (प्रमोशन-इन्क्रीमेंट-ट्रान्स्फर!) नसतो. (प्राण्यांमध्ये आणि माणसांमधील दिसणारा क्रोध, स्पर्धा यात प्राणीतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ खूपच फरक करतात). असो. मुद्दा हा की, टारझन माणसाच्या वास्तविक स्थितीतून बाहेर पडण्यासाठी केलेला अवास्तव कल्पनाविलास आहे. ‘फँटसी’ ही निराधार माणसाला वाटणारी संजीवनी आहे. तथाकथित वास्तववादाच्या नावाखाली साहित्य-कलेतून ‘फँटसी’ला बाद केले तर जीवनातील आनंदच नाहीसा होईल. ‘फँटसी’ हे सर्जनशील कलाकाराला मिळालेले वरदान आहे. म्हणूनच टारझन इतका दीर्घकाळ माणसाच्या मनावर अधिराज्य करू शकला आहे. जॉनी वेसमुल्लर हा लोकमानसातील टारझनचे रुप बनला.रुडयार्ड किपलिंगच्या (१८६५-१९३६) ‘जंगलबुक’मधील मोगलीमध्ये निरागसता आहे, पण अचाट सामथ्र्य नाही; तो प्राण्यांबरोबर एकरुप होतो, त्यांच्याबरोबर खेळतो, भांडतो पण तरीही सर्व मुलांना तो आपल्यातलाच एक वाटतो. मोगलीचा जन्म १८९४ चा! म्हणजे टारझनच्या अगोदर सुमारे १७ वर्षे. किपलिंग जरी इंग्रज असला तरी त्याचा जन्म भारतातला. शिवाय तो कवी होता, कथाकार होता, कादंबरीकार होता. त्या ‘साहित्यिक’ दृष्टिकोनातून टारझनचा जनक बरोज् हा तसा लेखक नव्हता. बरोज् प्रभावीत झाला होता तो एकोणिसाव्या शतकातील वैज्ञानिक-तांत्रिक क्रांतीमुळे. एच. जी. वेल्सप्रमाणे त्याला मंगळ, चंद्र, सूर्यमालिका, इतर ग्रहांवरील संभाव्य जीवसृष्टी यांचा ध्यास होता. किपलिंगला विज्ञानापेक्षा कलात्मक आनंदाने, सामाजिक नातेसंबंधातील उत्कटतेने भारलेले होते. ‘जंगल बुक’मधील ‘मोगली’ हा आपल्या मनातील निसर्गात्मकतेचा आणि कुतुहलाचा, गंमती-जमतीचा आणि निखळ आनंदाचा प्रतीक आहे. (गुलजार यांनी ते कुतुहल व तो आनंद तितक्याच तरलतेने हिंदीत ओतप्रोत आणला आहे.)परंतु या सर्व विवेचनातून एक मुद्दा निर्माण होतोच. तो हा की मोगली वा टारझन यांना संवादासाठी, जगण्यासाठी भाषेची फारशी गरज भासत नाही. प्राण्यांच्या आवाज वैविध्यावर आणि निसर्गातील ध्वनीसमृद्धीवर ते त्यांचे सर्व व्यवहार करू शकतात. टारझन किंवा जंगलबुक पाहणाऱ्यालाही ‘भाषे’ची गरज वाटत नाही. शब्दांच्या पलिकडले ते भावविश्व असते.अलीकडे अनेक मानसशास्त्रज्ञ या शब्दांपलिकडल्या भावविश्वाचा शोध घेत आहेत. एका बाजूने भाषा हे भावविश्वाचे प्रभावी माध्यम म्हणून ओळखले जाते-कवी, लेखक, नाटककार यांची महती त्या भाषासमृद्धीवर ठरते तर दुसऱ्या बाजूला संगीतकार, चित्रकार, शिल्पकार हे भाषा बाजूला ठेवून आपल्या भावविश्वाला भिडतात. किशोरी आमोणकर-कुमार गंधर्व असोत वा येहुदी मेनुहीन-रवीशंकर, ते आपल्याला अशा अनुभूतीत नेतात की त्याला शब्दात सादर करणे म्हणजे त्या अनुभूतीचे अवमूल्यन केल्यासारखे वाटते. जे कृष्णमूर्ती तर अथांग शांततेतच प्रेमाची आणि सौंदर्याची खरी अनुभूती प्राप्त होते असे म्हणतात. अलिकडेच किशोरी आमोणकर म्हणाल्या की, गायक आणि तो गात असलेला राग इतके एकरुप होतात की, त्यांना समोरच्या श्रोत्यांची, आजुबाजूच्या वातावरणाची, शब्दांची गरजच भासत नाही. तो संवाद असतो चिरंतनाबरोबरचा आणि त्यासाठी शब्द नव्हे तर भावरुप व्हावे लागते. यालाच काहीजण साक्षात्कारही म्हणतात.भाषा ही व्यवहारातून, सामूहिक गरजेतून, प्रतिकूल परिस्थितीत कराव्या लागणाऱ्या जगण्याच्या संघर्षांतून निर्माण झाली आहे. किंबहुना भाषेच्या मर्यादा समजावून सांगायला ही भाषाच लागते. गणितात भाषा नव्हे तर चिन्ह, संकल्पना, भाषाहीन तत्त्वचिंतन हेच महत्त्वाचे असते. बहुतेक गणिती त्यांच्या संख्याविश्वात वा अमूर्त प्रमेयांमध्ये आणि नि:शब्द सूत्रांमध्ये इतके मग्न असतात की त्यांना आजुबाजूच्या जगाची शुद्धही नसते. (‘द ब्यूटिफूल माईंड’मधील नोबेल सन्मानप्राप्त गणिती नॅश!) तरीही गणिताची एक भाषा असतेच, असे सर्व गणिती एकमेकांशी चर्चा करताना गृहित धरतातच.प्राणीसृष्टीत संवाद साधण्याची भाषा म्हणजे ध्वनी, गंध, हावभाव, स्पंदने, कंपने, नजर, देहबोली- असे आविष्कार असले तरी माणसांप्रमाणे त्यांच्या भाषा विकसित झाल्या नाहीत. (गणित, संगीत, चित्रकला, शिल्पकला इत्यादी गोष्टी तर प्राणीसृष्टीच्या ‘भाषाहीन’ जगात येणेच शक्य नाही.) जर भाषा विकसित झाली नसती तर ‘सिव्हिलायझेशन’च निर्माण झाले नसते. (E.T. या हॉलिवूड चित्रपटात परग्रहावरील प्राणी पृथ्वीवरील एका मुलाशी केवळ देहबोली, नजर, ध्वनी याद्वारे संवाद साधत असतो. एका विकसित संस्कृतीचा दुसऱ्या अगम्य संस्कृतीशी असलेला तो संवाद सर्वानीच एका वेगळ्या ‘भावविश्वात’ घेऊन जातो.)शब्दांच्या पलिकडे जायलाही भाषामाध्यमातूनच जावे लागते. नाहीतर प्रत्येक प्राणी हा जन्मत:च साक्षात्कारी अध्यात्मवादी झाला असता. तसे झाले नाही. होणारही नाही. म्हणूनच तर या पृथ्वीग्रहावरील हे सिव्हिलायझेशन, ही सांस्कृतिकता टिकविण्याची आत्यंतिक गरज आहे. अन्य कुठेही जीवसृष्टी वा माणसापेक्षाही प्रगल्भ प्राणी असला तरी तो कित्येक प्रकाशवर्षे दूर असणार आहे. म्हणजेच त्याच्याशी थेट संवाद अशक्य आहे. रेडिओ वा लाईट सिग्नल्सच्या माध्यमातून (व त्या भाषेतून) संवाद साधायचा, तरीही भाषा ही लागणारच. साक्षात्कारी, अमूर्त व मूक पद्धतीने तो साधता येणार नाही.गेल्या आठवडय़ात ‘केप्लर’ नावाचे अवकाशयान त्या अथांग अंतराळात सोडले गेले आहे. या अवकाशयानात जी उपकरणे, रेडिओ टेलिस्कोप व इतर संदेशवाहक यंत्रणा आहेत, त्यांचे मुख्य काम हे असणार आहे की, अन्य कुठे माणूससदृश प्रज्ञा/बुद्धीसंपन्न सृष्टी आहे का? असल्यास त्या ‘माणसाशी’ कसा आणि कोणत्या भाषेत संपर्क साधायचा? हे अवकाशयान ज्या वैज्ञानिकाच्या नावाचे आहे, तो जोहान केप्लर (१५७१-१६३०) जर्मन खगोलशास्त्रज्ञ व गणिती होता. त्याने गणिती संशोधनाद्वारे असे प्रतिपादन केले होते की, पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि या सर्व ग्रह-ताऱ्यांच्या गतीचे निश्चित नियम आहेत! या विश्वात कोटय़वधी पृथ्वीसदृश ग्रह आहेत आणि कदाचित तेथेही ‘इंटेलिजंट लाईफ’ असू शकेल, याची केप्लरला मात्र कल्पना आली नाही. म्हणूनच या घडीला आघाडीवर चालू असलेले ‘कॉन्शियसनेस’ संबंधातील संशोधन हे भाषा-संशोधन आहे. स्मृती, संवेदना, बौद्धिकता, भाव-भावना या सर्वाचा प्रथम भाषेशी, मग लिपीशी आणि त्यानंतर सुसूत्र मांडणीशी संबंध येतो.मोगली, टारझन यांच्या जीवनात बऱ्याच अंशी भाषाहीन सुसूत्रता आहे. त्यात माणसाला आपल्या (गमावलेल्या!) निरागसतेचा ‘साक्षात्कार’ होतो हे खरे, पण ते जीवन कितीही लोभस वाटले तरी तसे प्रत्यक्ष जगायला कुणीही तयार होणार नाही. संस्कृतीपूर्व किंवा ‘प्री-सिव्हिलायझेशन’ स्मृती आपल्या मेंदूत, पेशींमध्ये, डीएनएमध्ये साठवलेल्या आहेत. संस्कृतीबरोबर गुंतागुंत आली, त्यातून मोगली वा टारझनला कधीही न पडणारे प्रश्न निर्माण झाले, त्यातून नव-प्रगल्भता आली. संगीत, कला, गणित हे त्या नवप्रगल्भतेतून आले आहेत. आपण कितीही म्हटले तरी आता ‘प्री-सिव्हिलायझेशन’ जीवनशैली आपण स्वीकारू शकणार नाही. मग तरीही मोगली वा टारझनची आस का वाटते? कारण आपल्याला दोन्हीही हवे आहे. आजचे सिव्हिलायझेशन आणि त्यावेळचा इनोसन्स! आजची ऐहिकता आणि त्यावेळची निरागसता. आजची बौद्धिकता आणि त्यावेळची निव्र्याजता. आजची वैज्ञानिकता आणि त्यावेळची भाषाहीन ‘सांस्कृतिक अप्रगल्भता.’ या दोन्ही परस्परविरोधी टोकांना जोडणे तेव्हाच शक्य होईल जेव्हा ऐहिकतेतून विरक्ती होईल आणि शब्दांमधूनच शब्दांच्या पलीकडे जाता येईल.
कुमार केतकर
No comments:
Post a Comment