जाणिवांचा सांस्कृतिक शोध..

गेले एक वर्ष ‘त्रिकालवेध’ या सदरामधून मानवी संस्कृतीचा, जाणिवांच्या उत्क्रांतीचा, त्या अनुषंगाने माणसाच्या स्वभाववैविध्यांचा आणि विज्ञान- तंत्रज्ञानाने घडवून आणलेल्या अद्भुत क्रांतीचा शोध घेण्याचा प्रयत्न मी केला होता. स्तंभाच्या शब्दमर्यादेत हे अथांग ज्ञानविश्व आवाक्यात घेणे अर्थातच शक्य नाही, परंतु ज्ञानक्षितिजाच्या सीमांवर सुरू असलेल्या चिंतनाची ओळख करून देणे इतकाच या स्तंभाचा हेतू होता. या निमित्ताने या विषयासंबंधातील होत असलेले संशोधन, प्रसिद्ध होणारे ग्रंथ वा जगभरच्या तत्त्वज्ञ-वैज्ञानिक म्हणजे अर्वाचीन ऋषी-मुनींनी केलेले विचारमंथन काही प्रमाणात मी वाचकांसमोर ठेवू शकलो. अजूनही हा स्तंभ मी चालू ठेवावा असा वाचकांचा आग्रह असला तरी या स्वरूपात येत असलेली ही लेखमाला मी स्थगित करीत आहे. वाचकांनी भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल मी त्यांचा आभारी आहे--
-- कुमार केतकर


जाणिवांचा सांस्कृतिक शोध..
चेतना, जाणीव, संवेदना, विचार, भावना या आणि इतरही काही गोष्टी ‘कॉन्शियसनेस ’ या संज्ञा- संकल्पनेत अनुस्यूत आहेत. त्याचप्रमाणे ‘सिव्हिलायझेशन’ या शब्दालाही अनेक छटा आहेत. बरेच वेळा ‘कल्चर’ आणि ‘सिव्हिलायझेशन’ या दोन्ही शब्दांचे भाषांतर मराठीत ‘संस्कृती’ असे केले जाते. हिंदी भाषांतरकारांनी ‘सभ्यता’ हा शब्द ‘सिव्हिलायझेशन’साठी आणि ‘संस्कृती’ हा शब्द ‘कल्चर’साठी रूढ केला आहे. पण ‘संस्कृती’ ही संज्ञा- संकल्पना अधिक व्यापक आहे.


धर्मसंस्थाही उगम पावण्याअगोदर हजारो वर्षे माणसांच्या सांस्कृतिक प्रवासाला सुरुवात झाली. परंपरा, रूढी, कुलदैवते, श्रद्धा- अंधश्रद्धा, मंत्र- तंत्र ते अगदी गणित, विज्ञान - तंत्रज्ञान हे सर्व काही संस्कृतीमध्ये असते. तंत्रज्ञानाचाही जन्म ‘विज्ञाना’च्या हजारो वर्षे अगोदरचा आहे. अलीकडे (विज्ञान आणि तंत्रज्ञान) याही दोन शब्दांचा उपयोग समानार्थी पद्धतीने केला जातो. झाडाच्या अणकुचीदार फांद्यांचा वापर करून प्राचीन माणसाने त्याचे स्वसंरक्षणासाठी आयुध बनविले किंवा अनपेक्षितपणे गारगोटीवर दगड- गारगोटी घासून अग्नी निर्माण केला वा गडगडणाऱ्या दगडावरून पुढे गोलाकार चाक तयार करण्याची कल्पना त्याला सुचली, तेव्हाच ‘तंत्रज्ञान’ जन्माला आले, पण त्या गोष्टींमागचे ‘पदार्थविज्ञान’, कार्यकारणभाव आणि सिद्धांत वा गणित माणसाला त्या काळात माहीत नव्हते. साधे अंकगणित आणि भूमितीची काही प्रमेये ही अडीच हजार वर्षांपूर्वी ग्रीस, चीन व भारतवर्षांत ज्ञात होती. त्यासाठी अर्थात तर्कशास्त्र लागतेच.

परंतु ‘वैज्ञानिक पद्धती’ म्हणून जी मानली जाते, ती आधुनिक अर्थाने ५०० वर्षांपूर्वीची आहे. वैज्ञानिक पद्धतीत एखादा सिद्धांत मांडताना त्याचा कार्यकारणभाव, गणिती सूत्र, (शक्यतो) प्रयोगशीलता, पुन:प्रत्यय, प्रतिवाद निवारण, पर्यायी सिद्धांतांचा प्रतिवाद या व अशा गोष्टींचा समावेश आहे. ए.एन. व्हाइटहेड या विख्यात तत्त्वज्ञ-गणितीने तर म्हटले आहे की, ‘वैज्ञानिक पद्धतीचा शोध हाच सर्वात मोठा शोध आहे की ज्याच्याशिवाय ‘सिव्हिलायझेशन’ आणि ज्ञानविकास शक्यच नव्हते.’ व्हाइटहेडनेही येथे ‘सिव्हिलायझेशन’ ही संज्ञा अधिक व्यापक अर्थाने ‘सांस्कृतिकतेचा प्रवास’ म्हणून वापरली आहे.

हे ‘सिव्हिलायझेशन’ असे किती काळ सतत विकसित होत राहणार आहे? आणखी चार दिवसांनी आपण २०१० या वर्षांत प्रवेश करू. एकविसाव्या शतकातील पहिले दशक पुढील वर्षी संपेल आणि ९० वर्षांनी तर हे एकविसावे शतकच संपेल. या शतकाअखेरीची जगाची स्थिती कशी असेल? जगाची म्हणजेच लोकांची. बरोबर ४० वर्षांपूर्वी जगाची लोकसंख्या सुमारे साडेतीन अब्ज म्हणजे ३५० ते ३७० कोटी इतकी होती. आता ती सात अब्जच्या आसपास म्हणजे दुप्पट झाली आहे. आणखी ४० वर्षांनी तज्ज्ञांच्या मते जगाची लोकसंख्या कमीत कमी आठ अब्ज म्हणजे ८०० कोटी असेल. काहींच्या मते ती त्या सुमाराला स्थिरावेल, पण शतकाच्या अखेरीस १० अब्जांहून अधिक, म्हणजे एक हजार कोटींहून अधिक असेल.

लोकसंख्या वाढीचा दर कधी स्थिरावेल यासंबंधातील वाद सोडून देऊया. शतकाअखेपर्यंत जे आठ ते दहा अब्ज लोक या पृथ्वीवर असतील, त्यांचे अगदी जीवनावश्यक असे रोटी-कपडा-मकान-शिक्षण-आरोग्य हे प्रश्न सुटायचे असतील, तर अन्नधान्य उत्पादनात तिप्पट वाढ व्हावी लागेल.

परंतु ती चिन्हे दिसत नाहीत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तर विदारक रूप धारण करील असे दिसते आहे. हरित क्रांतीचा जनक नॉर्मन बोरलॉग याने नोबेल पुरस्कार स्वीकारताना १९७० सालीच म्हटले होते की, लोकसंख्या वाढीचा दर आटोक्यात आला नाही तर उत्पादन वाढूनही उपयोग होणार नाही. अर्थातच तसे उत्पादन वाढूनही तेव्हा उपासमार होतीच, परंतु त्याचे कारण अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील दोष. या दोषांनी गेल्या ४० वर्षांमध्ये भीषण रूप धारण केले आहे. जेव्हा अन्नधान्य उत्पादन कमी होते, तेव्हाची उपासमार समजण्यासारखी होती. आता एका बाजूला अर्धपोटी लोक आणि दुसऱ्या बाजूला ढेरपोटी माणसे- ही विषमतेची दरी अधिक स्फोटक होत जाणार असे जेफ्री सॅक्स या अर्थतज्ज्ञाचे म्हणणे आहे. त्यांच्या मते दहशतवादापेक्षा अधिक स्फोटक असे सुरुंग या जागतिक विषमतेत आहेत. कोपनहेगन येथे झालेल्या ‘क्लायमेट चेंज’ विषयावरील जागतिक परिषदेमागचा अदृश्य कॅनव्हास हा त्या नजीकच्या भयावह भविष्यचित्राचा होता.

शतकाअखेपर्यंत होत राहणाऱ्या तापमानवाढीमुळे उत्तर ध्रुव, आल्प्स पर्वतरांगा आणि हिमालय वितळतील आणि खचतील व त्यामुळे जो हाहाकार माजू शकेल, त्याला तोंड देण्याची क्षमता आजच्या जागतिक व्यवस्थेकडे नाही. वर म्हटल्याप्रमाणे तो प्रश्न आणखी काही वर्षांनी आठ ते दहा अब्ज लोकांना वेढणार आहे. ‘सिव्हिलायझेशन’ला दुसरा धोका आहे दहशतवादाचा. इस्रायल व अरब राष्ट्रे, भारत-पाकिस्तान-अफगाणिस्तान आणि अर्थातच इराण-अमेरिका (इस्रायलसह) यांच्यातील कलह वैश्विक रूप धारण करू शकतात.

म्हणूनच ‘त्रिकालवेध’मधील पूर्वीच्या एका लेखात मार्टिन रीज या ख्यातनाम वैज्ञानिकाने दिलेला इशारा उद्धृत केला होता. त्याच्या मते हे ‘सिव्हिलायझेशन’ जर योग्यरीत्या सांभाळले नाही, तर ते अखेरच्या घटिका मोजू लागेल. ‘ड४१ो्रल्लं’ ऌ४१’ या पुस्तकात त्याने दिलेला इशारा कोपनहेगनमधील मतभेदांमुळे अधोरेखित केला गेला आहे. जगातील सर्व साधनसामग्री आणि संपत्ती फक्त ४० टक्के लोकांच्या कब्जात आहे. त्यापैकी ३५ टक्क्यांहून अधिक लोक मध्यमवर्गात आहेत. उर्वरित ६० टक्के लोकांबद्दल या मध्यम व श्रीमंत वर्गातील लोकांना पर्वा नाही. म्हणजेच जगाला असलेला धोका या बेपर्वाईचा आहे. सिग्मंड फ्रॉइडने बरोबर ७० वर्षांपूर्वी, वेगळ्याच संदर्भात म्हटले होते की, या ‘सिव्हिलायझेशन’चा पाया झपाटय़ाने खचत चालला आहे. त्याने ती भीती व्यक्त केली तेव्हा दुसऱ्या महायुद्धाचे रौद्र रूप प्रगट व्हायचे होते, अण्वस्त्रांचा शोध लागायचा होता, दहशतवादाने फणा काढलेला नव्हता, वातावरण-पर्यावरणनाशातून होऊ शकणारा हाहाकार जाणवलेला नव्हता आणि लोकसंख्या वाढीचे आव्हान आलेले नव्हते. फ्रॉइडने व्यक्त केलेली भीती ही माणसाच्या मनोविश्लेषणातून त्याला जाणवलेली होती. म्हणजेच फ्रॉइडने माणसाच्या ‘कॉन्शियसनेस’चा संबंध थेट ‘सिव्हिलायझेशन’शी लावला होता. गेल्या ७० वर्षांत या ‘कॉन्शियसनेस’ संबंधात झालेल्या संशोधनाचा अंदाज फ्रॉइडला तेव्हा नसला तरी ‘सिव्हिलायझेशन’चे इमले माणसाच्या मनावर उभे आहेत आणि ते मनच इतके अस्थिर, अस्वस्थ आणि अस्ताव्यस्त झाले आहे की, सांस्कृतिकतेचे ते इमले कोसळायला वेळ लागणार नाही, असे त्याचे मत होते.

म्हणजेच माणसाच्या वैश्विक सांस्कृतिक आविष्काराचा पाया ‘मन’ नावाच्या अजून तरी अमूर्त असलेल्या गोष्टीत आहे आणि ‘सिव्हिलायझेशन’चा अभ्यास माणसाच्या ‘कॉन्शियसनेस’ संबंधातील आकलनाशिवाय पूर्ण होणार नाही. माणसाचा ‘कॉन्शियसनेस’ किंवा त्याच्या जाणिवा, त्याचे सर्जनशील चैतन्य हे इतर जीवसृष्टीपेक्षा वेगळे आहे. किंवा असेही म्हणता येईल की ते अधिक उत्क्रांत, प्रगत आणि प्रगल्भ आहे. नाही तर मुंगीलासुद्धा ‘कॉन्शियसनेस’ आहेच, जसा तो कासवालाही आहे आणि गरुडालाही; परंतु जीवसृष्टीचा अवतार झाल्यापासून त्यांच्यात झालेले सर्व बदल मुख्यत: चार्ल्स डार्विनने विशद केलेल्या उत्क्रांती ‘नियमा’नुसार झाले आहेत, परंतु माणसाने त्या जैविक-शारीरिक-नैसर्गिक मर्यादा ओलांडून आपली समांतर सृष्टी निर्माण केली आहे. ही विश्वनिर्मिती खरोखरच परमेश्वराने निर्माण केलेली असेल तर तोही माणसाच्या या अचाट समांतर सृष्टीकडे पाहून थक्क झाला असता. (परंतु ‘परमेश्वर’ ही संकल्पनाच मानवनिर्मित असल्यामुळे याबद्दलची सर्व चर्चा आणि वाद तेथेच गोल-गोल फिरत राहतात.) फ्रीमन डायसन या वैज्ञानिकाने एका निबंधात म्हटले होते की, नास्तिक दोन प्रकारचे असतात. पहिल्या प्रकारातले नास्तिक हे देवाचे अस्तित्वच मानत नसल्यामुळे ते त्याबद्दलच्या वादातच पडत नाहीत आणि विश्वाचे, जीवसृष्टीचे, मानवी मनाचे गूढ आधुनिक वैज्ञानिक पद्धतीने शोधत राहतात. असे नास्तिक मग श्रद्धाळू लोकांची टिंगलही करीत नाहीत आणि त्यांना गांभीर्यानेही घेत नाहीत. दुसऱ्या प्रकारातले नास्तिक ‘परमेश्वर नाही’ हे सिद्ध करण्यासाठी इतक्या अहमहमिकेने उतरतात की ते जणू थेट परमेश्वरालाच वादात उतरवून त्याला खोटे पाडण्याचा प्रयत्न करतात.

तो वाद बाजूला ठेवूया. डॅनिएल डेनेट (‘द ओरिजिन्स ऑफ कॉन्शियसनेस’चा लेखक) या वैज्ञानिक विचारवंताने म्हटले आहे की परमेश्वराच्या संकल्पनेचा (अस्तित्वाचा!) उदय हाही माणसाच्या मानसिक/वैचारिक उत्क्रांतीतील महत्त्वाचा टप्पा आहे. जीवसृष्टीतील कुणालाही- मुंगी असो वा हत्ती- देवाच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न पडत नाहीत. आपण येथे कसे ‘जन्माला’ आलो याबद्दलचे कुतूहल प्राण्यांना वाटत नाही, अचेतन दगड आणि आपण यात काही फरक आहे हे जीवसृष्टीतील इतर जिवांना कळत नाही आणि या विश्वाचे गूढ उकलवावे अशी जिज्ञासा त्या जिवांच्या ‘कॉन्शियसनेस’मध्ये निर्माण होत नाही. माणसाच्या जिज्ञासेतूनच ‘सिव्हिलायझेशन’ची सुरुवात झाली आणि त्याच जिज्ञासेतूनच आलेले एक ‘हायपोथिसिस’ ऊर्फ संभाव्य तर्कअंदाज म्हणजे परमेश्वराची संकल्पना!

त्याच जिज्ञासेतून आणि (अजूनही न उलगडलेल्या मनाच्या) सर्जनशीलतेतून जन्माला आले संगीत, चित्रकला, साहित्य, नाटक, चित्रपट, विज्ञान, तंत्रज्ञान- ज्यांच्या आधारे माणसाने त्या (परमेश्वरी!) सृष्टीतच बदल करायला सुरुवात केली. त्या बदलांमुळे माणसाला ‘निर्मितीचा आनंद’ (म्हणजे नक्की काय यावर संशोधन चालू आहे!) मिळाला, पण विध्वंसाचे साधनही मिळाले. अणुविभाजनाच्या संशोधनामुळे ऊर्जाही मिळाली आणि अणुबॉम्बही! विशेष म्हणजे त्या व इतर वैज्ञानिक संशोधनांमुळे कलेचे क्षेत्रही प्रचंड प्रमाणावर विकसित झाले. विज्ञान हीच एक कला आहे असे वैज्ञानिक म्हणू लागले आणि वैज्ञानिक प्रयोगशाळांमधील रसायने, धातू, पदार्थ घेऊन प्रचंड आकाराच्या ‘इन्स्टॉलेशन आर्ट’चा जन्म झाला. या ‘इन्स्टॉलेशन आर्ट’ आविष्काराचा जन्म होण्यापूर्वी अजंठा, वेरूळ, कुतुबमिनार, ताजमहाल, आयफेल टावर अशी महान ‘इन्स्टॉलेशन्स’ पूर्वीच्या कलाकारांनी विज्ञान व गणिताची मदत घेऊन उभी केली होती. केनेथ क्लार्क या कला व इतिहास संशोधकाने बीबीसीवर एक चित्तवेधक मालिका सादर केली होती. तिचे नाव होते ‘सिव्हिलायझेशन’. ही मालिका मुख्यत: पाश्चिमात्य सांस्कृतिकतेच्या प्रदीर्घ प्रवासावर आणि कलासंस्कृती आविष्कारावर ऐतिहासिक व कलात्मक प्रकाशझोत टाकणारी होती. या सर्व कला व विज्ञानाचा, सर्जनशीलतेचा प्रेरणास्रोत काय होता याचे उत्तर क्लार्क यांच्याकडेही नव्हते- पण परमेश्वराची हजेरी मात्र जागोजागी होती!

म्हणजेच Consciousness, Creativity and Civilization -- जाणिवा, सर्जनशीलता आणि संस्कृती यांचा शोध एकत्रितपणेच घ्यावा लागणार. असेही म्हणता येईल की खऱ्या अर्थाने इतिहास म्हणजे या प्रेरणास्रोतांचा शोध; परंतु मानवी इतिहास घडविला आहे तो संघर्षांनी, युद्धांनी, हिंसाकांडांनी. म्हणूनच केनेथ क्लार्क यांना त्यांच्या ‘बीबीसी’ मालिकेत त्या ‘असंस्कृत’ गोष्टींचाही आढावा घ्यावा लागला. त्यातूनच त्यांना आणि आजपर्यंतच्या सर्व संशोधकांना पुन्हा माणसाच्या मनाकडे आणि सामूहिक अंतर्मनाकडे वळावे लागले. किंबहुना असेही म्हणता येईल की १८४५ ते १८८५ या ४० वर्षांच्या काळात जेवढे मूलभूत चिंतन माणसाच्या अत:प्रेरणांबद्दल मार्क्‍स, एंजल्स, डार्विन, फ्रॉइड यांनी केले तेवढे खरे म्हणजे, त्यानंतर झालेले नाही. आजही त्यांचा प्रतिवाद करण्यासाठी का होईना, पण त्यांचाच आधार घ्यावा लागतो. कार्ल मार्क्‍सने मानवी प्रेरणांचा शोध माणसाच्या उत्पादन शक्तीत, उत्पादन संबंधात आणि उत्पादन तंत्रांमध्ये घेतला. जर सर्व नैसर्गिक आणि मानवनिर्मित वर्गविद्रोहाच्या अडचणींवर मात करता आली तर सुखी, समाधानी व सुसंस्कृत समाज निर्माण करता येईल, असे मार्क्‍स आणि फ्रेडरिक एंगल्स यांना वाटले.

चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत सांगतानाच ‘The Descent of Man'या प्रबंधातून माणसाच्या जाणिवा, प्रेरणा, पर्याय निवड करताना होणारी त्याची घालमेल व त्यातून घडत जाणारे मन व स्वभाववैशिष्टय़े यांचा शोध घेतला. सिग्मंड फ्रॉइडने मनाचा, अंतर्मनाचा आणि अंतर्मनाच्या गाभाऱ्यात शिरून तेथील गूढाचा पडदा दूर करण्याचा प्रयत्न केला. या सर्व प्रयत्नांनाच समांतर सुरू होते पदार्थविज्ञानशास्त्रातील प्रयोग, खगोलशास्त्रीय वेध आणि विश्वनिर्मितीचे रहस्य भेदण्याचे प्रयत्न. परंतु या सर्वापेक्षा अर्थातच महत्त्वाची होती ती माणसाला झालेली स्वत:बद्दलची, विश्वाबद्दलची, जीवसृष्टीबद्दलची जाणीव. जन्म-मृत्यूचे भान आणि अर्थातच स्वत:च्या ‘कॉन्शियसनेस’चे झालेले ज्ञान.
हा शोध अखंड चालूच राहणार आहे.

कुमार केतकर,
शनिवार, २६ डिसेंबर २००९

चूक बरोबर की बरोबर चूक

प्रत्येक माणसाला सतत ‘चॉईस’ करावा लागत असतो. अगदी पाळण्यात असल्यापासून ते मरेपर्यंत! हा ‘चॉईस’ किंवा ती निवड उपलब्ध पर्यायांमधूनच करावी लागते. पर्याय जितके जास्त तितकी सोयही जास्त; परंतु जितके जास्त पर्याय तितक्याच निवडीतल्या अडचणीही अधिक. तसा हा विरोधाभासच म्हणावा लागेल. बरेच पर्याय असल्यामुळे अधिक ‘अचूक’ वा ‘योग्य’ निवड करणे सोयीचे म्हणावे, तर इतक्या ‘चॉईसेस्’मुळे गोंधळ उडण्याची शक्यताही जास्त. पर्याय जर दोन-तीनच असतील तर त्यापैकी एकाची निवड करणे कितीतरी सोपे.


अगदी लहान मुलासमोर खूप खेळणी टाकली, की त्याचा किती गोंधळ होतो, हे आपण सर्वानी पाहिलेले असते. इतकेच काय, एखाद्या मुलाला, ‘तुला क्रिकेटची बॅट पाहिजे, की सायकल’ आणि मुलीलाही तत्सम, तिच्या कलानुसार ‘ऑप्शन’ दिला तर ते कसे अस्वस्थ होतात वा चिडचिडतात हेही आपण सर्व मध्यमवर्गीय कुटुंबात पाहतो. याचा अर्थ असा नाही, की गरीब माणसाला ‘चॉईस’ नसतो. त्याला ‘ऑप्शन्स’ कमी असतात इतकेच. हमाली करायची, हातगाडी ओढायची, घरकाम करायचे, चणे-शेंगदाणे विकायचे, की आणखी काही हे उपलब्ध पर्यायांवर ठरते. बिहारमधल्या गरीब शेतमजुराला ठरवायचे असते, की मुंबईला जायचे की दिल्लीला, कोलकात्याला जायचे की जालंधरला. पोट भरायचे असते. कुटुंब पोसायचेच असते. जगायचे असतेच.

जगायचे तर ‘चॉईस’ अपरिहार्य आहे. उच्चमध्यमवर्गात वा श्रीमंतांमध्ये तो ‘चॉईस’ जगण्याचा नसतो तर मजेत, चैनीत, सुखात कसे जगायचे हा असतो. या ‘व्हेकेशन’ला सिंगापूरला जायचे, की स्वित्र्झलडला, थायलंडला की युरोपला हे ऐपतीनुसारही ठरते. सांपत्तिक स्थिती जसजशी सुधारत जाते, तसतसा ‘ऑप्शन्स’चा दर्जाही बदलत जातो; पण अशा पर्यायांमध्ये करिअरचे, आकांक्षा-महत्त्वाकांक्षांचे मुद्दे नसतात.

शालान्त परीक्षेनंतर इंजिनीअर व्हायचे की डॉक्टर की प्राध्यापक या मुद्दय़ावर घराघरात वाद झडत असतात. काही वेळा त्या मुलावर वा मुलीवर पर्याय लादले जातात. फक्त शिक्षणाचेच नव्हे तर लग्नाचे, नोकरीचे वा पारंपरिक/कौटुंबिक व्यवसायाचे. राजकारणात उतरलेल्या व्यक्तीला तर कधी कधी अगदी कमी पर्याय उपलब्ध होतात. मग तो ‘कॉम्प्रोमाइज’ला म्हणजे तडजोडीला तयार होतो. इतर (म्हणजे मीडियाही) अशा ‘कॉम्प्रोमाइज’ला संधीसाधूपणा म्हणतात वा लाचारी. ‘अमुक खात्याचे मंत्रीपद घ्या वा पक्षाध्यक्षपद वा एखाद्या महामंडळाचे चेअरमन व्हा..’ असा श्रेष्ठींचा पर्यायनिदर्शक प्रस्ताव आला, की त्यापैकी एकाची निवड करावीच लागते.

हे पर्याय आपले जीवन घडवितात. परंतु तुलनेने या तडजोडी वा ‘चॉईस’ सोपे असतात. खरी गंभीर समस्या उभी ठाकते जेव्हा त्या तडजोडींना वा ‘ऑप्शन्स’ना नैतिकतेचे, राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय धोरणाचे, युद्धाचे वा शांततेचे परिमाण लाभते. त्या परिस्थितीत काय चूक वा काय बरोबर, काय योग्य आणि काय अयोग्य, काय उचित आणि काय अनुचित हे ठरविणे त्या व्यक्तीला कठीण तर असतेच, शिवाय इतिहासकारही दीर्घ काळ त्या ‘चॉईस’बद्दल वाद घालत असतात. त्यातूनच ‘कॉन्स्पिरसी थिअरीज्’, डावपेचांचे सिद्धांत, नैतिकता इत्यादी संबंधातील प्रश्न निर्माण होतात.
जेव्हा एखादी गोष्ट स्पष्टपणे चुकीची आणि एखादी अगदी बरोबर असते, तेव्हा ‘चॉईस’ अर्थातच सोपा असतो. जेव्हा कोणताही ‘ऑप्शन’ चुकीचा (वा अनैतिक!) ठरण्याची शक्यता असते तेव्हा तो अतिशय कठीण असतो; पण परिस्थितीच अशी असते, की तो तथाकथित ‘चुकीचा’ चॉईस करावा लागतो. जेव्हा दोन (वा सर्व) उपलब्ध पर्याय योग्य वा ‘नैतिक’ असतात तेव्हा निर्णय करणे सोपे असते. कारण मग चुकीची शक्यता नसतेच. परंतु अशा ‘क्लिअर कट’ पर्यायांची सोय जवळजवळ नसतेच.
इतिहासकार त्यांचे भाष्य करताना असे म्हणू शकतात, की नेपोलियनने ‘योग्य’ निर्णय घेतला असता तर ‘वॉटर्लू’ची नामुष्की तो टाळू शकला असता. ब्रिटनचे पंतप्रधान चेंबरलेन यांनी हिटलरच्या आक्रमक धोरणाला स्पष्ट आव्हान दिले असते तर दुसरे महायुद्धच टळले असते. चेंबरलेन यांच्यासमोर ‘डायलेमा’ होता, की हिटलरला ‘समजावून’ घ्यायचे (म्हणजे अनुनय करायचा) की आव्हान द्यायचे. चेंबरलेनचा पर्याय चुकला! त्याच संदर्भात आणि त्याच वेळेस स्टॅलिनसमोर पर्याय होता : नाझी जर्मनीबरोबर तह/मैत्री करार करून हिटलरी महत्त्वाकांक्षेला आळा घालायचा आणि रशियाला लष्करी बांधणीसाठी वेळ मिळवायचा, की हिटलरविरुद्ध तेव्हाच शिंग फुंकायचे. अनेक इतिहासकार म्हणतात, की त्या रशिया-जर्मनी करारामुळे हिटलरला मोकळे रान मिळाले, तर इतर काही भाष्यकारांच्या मते शेवटी रशियाची लाल सेना नाझींचा संपूर्ण पाडाव करू शकली कारण त्या करारानंतरच्या दोन वर्षांत रशियन संरक्षण व्यवस्था मजबूत केली गेली. हिटलरचा संपूर्ण पाडाव होऊन त्या भस्मासुराला स्वत:च्याच डोक्यात गोळ्या घालून आत्महत्या करावी लागली, याचे श्रेय बरेच इतिहासकार स्टॅलिनला देतात. भारताच्या अगदी अर्वाचीन इतिहासाबद्दल लिहिताना ‘फाळणी टाळता आली असती जर गांधींनी वा नेहरूंनी वा पटेलांनी (मुख्यत: तिघांनी) नि:संदिग्धपणे अखंड भारताबद्दल ठाम भूमिका घेतली असती तर’ असे म्हणणारे इतिहासकार आहेत त्याचप्रमाणे ‘फाळणी टाळणे अशक्य होते, इतकेच नव्हे तर फाळणीचा पर्याय हाच योग्य पर्याय होता’ असे म्हणणारे इतिहासकारही आहेत. इतिहासात असे अनेक ‘जर-तर’ आहेत, की ज्यातील अन्य ‘ऑप्शन’ घेतले गेले असते तर इतिहासालाच वेगळी कलाटणी मिळाली असती; परंतु कोणत्याही व्यक्तीला निर्णय त्या विशिष्ट परिस्थितीत आणि एका विशिष्ट क्षणाला घ्यावाच लागतो. इतिहासकाराला जे स्वातंत्र्य असते- कुणी, केव्हा, काय करायला हवे होते हे सांगण्याचे ते त्या व्यक्तीला नसते.

‘अ‍ॅन्टिगनी’ या ग्रीक नाटकातील राजा क्रिऑन अ‍ॅन्टिगनीला म्हणतो, ‘नाही म्हणण्याचा पर्याय सोपा आहे. ताकद लागते ती होय म्हणायला. बाह्या सरसावून, घाम गाळून, आयुष्याशी थेट झुंज द्यावीच लागते. ‘नाही’ म्हणणं अगदी सोपं आहे, अ‍ॅन्टिगनी.! कारण एकदा नाही म्हटलं, की मग काहीच करायचं नसतं. निमूटपणे जे होईल ते पाहात राहायचं- आणि तोपर्यंत जगत राहायचं. हा भेकडपणा आहे अ‍ॅन्टिगनी. ‘नाही’ हा माणसाने- भेकड माणसाने- बनविलेला आणि फक्त माणसांच्या जगात ऐकू येणारा शब्द आहे. झाड आपल्या पालवीला ‘नाही’ म्हणू शकेल का? जनावर कधी भुकेला वा तहानेला ‘नाही’ म्हणू शकेल?’

इंदिरा गांधींनी सुवर्णमंदिरात सैन्य पाठविण्याचा घेतलेला निर्णय हा असाच धाडसी होता. त्यांनी ‘नाही’ म्हटले असते तर कदाचित त्या स्वत:ची ‘हत्या’ थोपवू शकल्या असत्या. पण कारवाई केली नसती तर कदाचित अमृतसरच्या सुवर्णमंदिरातून खलिस्तानची घोषणा केली जाणार होती. मग स्वतंत्र भारताची फाळणी झाली असती. पाकिस्तानने बंगलादेशनिर्मितीचा सूड त्या स्वतंत्र खलिस्तानला मदत करून उगवला असता. शीख दहशतवाद्यांना पाकिस्तानची मदत (आणि अमेरिकेचा आशीर्वाद) होतीच.

आजही अमेरिकेतील अनेक मुत्सद्दी अशा मताचे आहेत की, त्यांनी पाकिस्तानऐवजी भारताची बाजू घ्यायला हवी होती, म्हणजे कदाचित दहशतवादाचा भस्मासूर निर्माणच झाला नसता. त्यांच्यापैकी काहीजण असेही म्हणतात की, अमेरिकेने व्हिएतनामविरुद्ध महासंहारक युद्ध पुकारले नसते तर शीतयुद्ध सत्तरीच्या दशकातच संपले असते. शीतयुद्ध संपले असते तर जग अणुयुद्धाच्या सर्वविनाशक छायेतही आले नसते. म्हणजेच अमेरिका व कम्युनिस्ट रशिया या देशांनी जे पर्याय त्या त्या वेळेस स्वीकारले त्यातून आपले आजचे जग निर्माण झाले आहे. मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी ‘लोकशाही आणि आर्थिक पुनर्रचना’ हा उपक्रम हाती घेतला नसता तर सोविएत युनियन टिकू शकले असते असे म्हणणारे कम्युनिस्ट आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी लोकशाहीकरणाची प्रक्रिया तेव्हा सुरू केली नसती तर प्रक्षोभ व हिंसा होऊन सोविएत युनियनचे विघटन झाले असते असे खुद्द गोर्बाचेव्ह यांना वाटते. म्हणजेच मुद्दा हा की उपलब्ध पर्यायातूनच निवड करायची असल्यामुळे तो ‘चॉईस’ हा देशाच्या वा व्यक्तीच्या जीवनात अतिशय कळीचा मुद्दा असतो.

‘इकडे आड आणि तिकडे विहीर’, ‘आगीतून निघून फुफाटय़ात’ किंवा ‘धरले तर चावते आणि सोडले तर पळते’ या प्रकारच्या म्हणी अशा पर्यायहीनतेतूनच निर्माण झाल्या आहेत. असे पर्याय निर्माण झाल्याशिवाय व त्यातून निर्माण होणारे धोके स्वीकारल्याशिवाय ‘सिव्हिलायझेशन’ प्रगत होत गेलेच नसते.
जाणूनबुजून वा मुद्दामहून कुणीच ‘अनैतिक’ वा ‘चुकीचा’ वा ‘अयोग्य’ निर्णय घेत नाही, असे गृहितक या चर्चेत आहे. याचा अर्थ हा की एखादी सर्वसामान्य व्यक्ती वा कंपनीचा डायरेक्टर, पक्षाचा वा संस्थेचा प्रमुख किंवा देशाचा पंतप्रधान/राष्ट्राध्यक्ष इ. कुणीही जो निर्णय घेतात तो त्या त्या वेळेस त्यांच्या दृष्टिकोनातून ‘अपरिहार्य पर्याय’ म्हणून घेतात. परंतु हे गृहितक मान्य केले तर प्रत्येक निर्णयाला तशा अपरिहार्यतेची मान्यता प्राप्त होईल. मग प्रत्येक गुन्हा- मग तो खून असो वा अफरातफर- तथाकथित अपरिहार्यतेच्या निकषावर पास होईल. तसे झाले तर समाजात मोठय़ा प्रमाणावर अराजक माजेल. व्यक्तिगत जीवनात ‘मैं तो चला जिधर चले रस्ता’ किंवा ‘भटकत फिरलो भणंग आणिक’ असे कलंदर जगणे कदाचित सर्जनशीलही ठरू शकेल. अनेक संगीतकार, चित्रकार, साहित्यिक, कवी त्यांचे पर्याय इतर कशाचीही फारशी पर्वा न करता स्वीकारू शकतील. त्यांच्या त्या स्वयंभू-स्वैर वागण्याचे कुटुंबात व आजुबाजूला काही दुष्परिणाम होतील. पण त्यातून सामाजिक अराजक माजण्याची शक्यता नाही. त्या स्वयंभूपणात एक ‘आत्मनिष्ठ नैतिकता’ही असेल. परंतु अशा आत्मनिष्ठ नैतिकतेपेक्षा सापेक्ष नैतिकता वेगळी केली नाही तर सामाजिक नियमनच अशक्य होईल. परंतु ती सापेक्ष नैतिकता कोणत्या निकषांवर ठरवायची हाच एक नव्या युगातील प्रश्न झाला आहे. ते निकष ठरल्याशिवाय पर्याय स्पष्ट होत नाहीत. पर्याय उपलब्ध झाले नाहीत तर आपल्याला निर्णयच घेता येणार नाहीत. अगदी आजुबाजूला दिसणारी उदाहरणे घेतली तर वरवर सोपा वाटणारा हा ‘चॉईस’चा मुद्दा किती जटील होतो हे कळेल.

अमेरिकेत तर ‘प्रो-चॉईस’ आणि ‘अ‍ॅन्टी चॉईस’ असे दोन प्रमुख समाजगट आहेत. ‘प्रो-चॉईस’वाल्यांच्या दृष्टीकोनातून एखाद्या स्त्रीने (विवाहित, अविवाहित असा मुद्दा नाही) गर्भपात करायचा की नाही हा सर्वस्वी तिचा प्रश्न आहे. ‘अ‍ॅन्टिचॉईस’वाद्यांच्या म्हणण्यानुसार धर्म व नीतीशास्त्रानुसार गर्भपात पूर्णत: निषिद्ध आहे. (अ‍ॅन्टिचॉईस’वाले स्वत:ला ‘प्रो-लाईफ’ म्हणवितात. म्हणजे ‘प्रो चॉईस’ची भूमिका घेणारे जीवनविरोधी मानले जातात. अजूनही हा प्रश्न अमेरिकेत ज्वलंत आहे. विशेष म्हणजे स्वत:ला ‘प्रो-लाईफ’ म्हणविणारे, जवळजवळ सर्वजण देहांताच्या शिक्षेच्या बाजूने असतात. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये आजही ‘कॅपिटल पनिशमेंट’ ऊर्फ देहांताची शिक्षा आहे. युरोपियन युनियनमधील सर्व देशांमध्ये देहांताची शिक्षा रद्दबातल ठरविण्यात आली आहे. न्यायसंस्थेला ही शिक्षा देण्याचा पर्याय तेथे नाही.

अलिकडे नव्याने चर्चेत आलेले ‘गे मॅरेजेस’ म्हणजे समलिंगी स्त्रियांचे वा पुरुषांचे विवाह हासुद्धा जगभर प्रचंड वादग्रस्त ठरलेला मुद्दा आहे. ‘लिव्ह इन’ म्हणजे लग्न न करता एकत्र राहण्याचा निर्णय करून, वारसा हक्क अबाधित राखण्याचा मुद्दासुद्धा पर्यायांचाच आहे.
माणसांनी कसे, कुणाबरोबर जगायचे (वा जगायचे नाही!) हाही ‘चॉईस’चा मुद्दा बनल्याने पारंपरिकपणे चालत असलेले निकष कोसळून पडू लागले आहेत. परंतु जगण्याप्रमाणेच मरणाचाही प्रश्न या संबंधात किती गुंतागुंतीचा झाला आहे हे अरुणा शानबागच्या दुर्दैवी घटनेमुळे प्रकर्षांने पुढे आले आहे.
तिला मरण्याचा हक्क वा अधिकार नाही (जसा तो कुणालाच नाही) पण ती लौकिक अर्थाने जगूाही शकत नाही. सुमारे ३६ वर्षांत ‘कोमा’त असलेल्या अरुणाला ‘दयामरण’ही नाकारले गेले आहे. तिच्या बाबतीत इच्छामरणाचाही पर्याय नाही. कारण तशी इच्छा व्यक्त करण्यासाठी ती शुद्धीतही नाही. शिवाय इच्छामरणलाही कायद्याची मान्यता नाहीच! म्हणजे ‘इच्छामरण’ असो वा ‘दया मरण’, दोन्ही मानवी अनुकंपेतून सुचविले गेलेले पर्याय असले तरी ते माणसाला उपलब्ध नाहीत. हे प्रश्न प्राणीसृष्टीत नाहीत. कारण मर्ढेकरांनी म्हटल्याप्रमाणे माणसाला जगण्याचीही सक्ती आहे!’ म्हणूनच जगण्याची सक्ती झाल्यावर ते जीवन कसे जगायचे एवढय़ापुरतेच पर्याय उपलब्ध होतात. अरुणाला तर तोही पर्याय नाही!
कुमार केतकर ,
शनिवार, १९ डिसेंबर २००९