.. शब्दांच्या पलीकडले
कुमार केतकर
रुद्राक्षी’ पत्रसंग्रह- एक पत्र

रुद्राक्षी’ पत्रसंग्रह तसा व्यक्तिगत असला तरी त्यातील मुद्दे व मांडणी त्या कक्षेपलीकडे जाते।‘रुद्राक्षी’चे लौकिक अर्थाने ‘परीक्षण’ करणे अशक्य आहे. हे पुस्तक म्हणजे ‘फिक्शन’ नाही आणि प्रचलित अर्थाने ‘नॉनफिक्शन’ही नाही. त्यातून आत्मकथन प्रकटते, पण ते आत्मकथनही नाही. कित्येक पत्रांमध्ये कथा-कादंबऱ्यांचे ‘जम्र्स’ आहेत. काही पत्रे म्हणजे मनस्वी समीक्षा आहे जी प्राध्यापकी चौकटीबाहेरची आणि मुक्तचिंतनात्मक आहे.
प्रिय श्री। मनोहर सप्रे,
खरं म्हणजे वरील मायना लिहितानाच मला प्रश्न पडला होता की तुम्हाला (की तुला?) हे पत्र लिहिताना एकारात शैलीत नुसते ‘मनोहर’ म्हणून संबोधावे की बहुवचनी ‘श्री मनोहर सप्रे’ अशी सुरुवात करावी. कारण माझ्यापेक्षा तुम्ही सुमारे १२ वर्षांनी मोठे आहात. शिवाय आपले तसे दीर्घकाळचे संबंध नाहीत. जरी आपल्याबद्दल मी ऐकून होतो, आपला प्रत्यक्ष परिचय तसा अलीकडलाच. मी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने चंद्रपूरला आलो होतो. (त्या वेळी मला मिळालेल्या पुरस्काराचे ‘ग्रंथशिल्प’ तुम्हीच तयार केल्याचे कळले.) कार्यक्रमानंतर तुमच्या घरी आलो आणि तुमच्या चित्रकलेने, उत्कट काष्ठशिल्पांनी, सर्जनशील कलामांडणीने एकदम प्रभावित झालो. तितकाच थक्क झालो आपल्या गप्पांनी, त्यातील उपमा-उत्प्रेक्षांनी, पुस्तकांच्या संदर्भानी आणि अर्थातच चिंतनाने. आणि बहुवचनी ‘श्री. मनोहर सप्रे’ असाच मायना करायचे ठरवले.गप्पांनंतर तुमचा ग्रंथसंग्रह पाहिला. पुस्तके पाहणे, ती चाळणे, त्यातील मुख्य आशय-विषयाचा शोध घेणे, लेखनशैलीची ओळख करून घेणे, लेखकाचा दृष्टिकोन आणि त्याची माहिती समजून घेणे हा माझा छंद आहे. त्यामुळे पुस्तकाच्या दुकानात असो वा ग्रंथालयात, कुणाच्या घरातील पुस्तक संग्रहात असो वा अगदी रद्दी पुस्तकाच्या कोपऱ्यावरच्या स्टॉलवर माझी नजर तसा शोध घेत असते। ग्रंथप्रेमी (मराठी आणि विशेषत: इंग्रजी) मुंबईकरांना एक सुप्त गर्व असतो। विशेषत: ज्यांना युरोप-अमेरिका वा चीन, पाकिस्तान इत्यादी भागांत (जगभर!) फिरण्याची संधी असते (म्हणजे माझ्यासारख्याला!) की एकूण ‘जागतिक’ ग्रंथविश्वाची आपल्यालाच चांगली ओळख आहे. तुमचा ग्रंथसंग्रह पाहणाऱ्याचे नक्कीच गर्वहरण होईल. प्रश्न किती पुस्तकांचा संग्रह आहे हा नाही तर कोणती, कुणी लिहिलेली, कोणत्या विषयांवरची ‘मूलगामी’ वा सर्जनशील वा शैलीदार पुस्तके त्या संग्रहात आहेत. गप्पा मारता मारता मार्टिन रीज् या जगप्रसिद्ध वैज्ञानिकाच्या 'ड४१ो्रल्लं’ ऌ४१' या पुस्तकाचा संदर्भ तुम्ही दिला. अक्षरश: पाच मिनिटांत आपल्या दोघांचे त्या पुस्तकातील भूमिकेविषयी एकमत झाले. अनेकांना निराशावाद, नियतीवाद, प्रलयवाद, वैज्ञानिक वास्तववाद, शास्त्रशुद्ध भविष्यवेधी अरिष्ट‘वाद’ यातील फरक कळत नाही. त्यामुळे (बिचाऱ्या!) मार्टिन रीज्वरही नकारात्मक व निराशावादी दृष्टिकोनाचा आरोप झाला. ग्लोबल वॉर्मिग खरोखरच हाहाकारी ठरू शकतो हे तर जेम्स लव्हलॉक (‘गाथा’ संकल्पनेचा प्रवर्तक) या विख्यात वैज्ञानिक विचारवंताचेही मत आहे. रीज् यांना ग्लोबल वॉर्मिग, टेररिझम आणि विवेकशून्य वैज्ञानिक प्रयोग यामुळे पृथ्वीला धोका आहे आणि याच शतकात तो धोका आहे असे वाटते. ती शक्यता नि:संदिग्ध शब्दात ते मांडतात ती ‘भाकीत’ म्हणून नव्हे, तर इशारा म्हणून. तसा इशाराच नसेल तर तो धोका परतवता येणार नाही; परंतु मुद्दा मार्टिन रीज् यांच्या पुस्तकाचा नाही. चंद्रपूरसारख्या दूरच्या (मागासलेल्या मानल्या जाणाऱ्या!) ठिकाणी तुम्ही जसा ‘वैश्विक’ विचार करीत होता, तसा करणाऱ्या व्यक्ती आणि त्यांचे ग्रंथसंग्रह कमी आहेत. स्वत:ला पुरोगामी आणि ‘इंटेलेक्च्युअल’ मानणारा महाराष्ट्र किती झपाटय़ाने गर्तेत कोसळत आहे आणि हा ऱ्हास गेल्या २५-३० वर्षांत किती वेगाने झाला आहे, याविषयी आपले एकमत झाले आणि गप्पांना ‘बौद्धिक’ परिमाण प्राप्त झाले.तुमच्या विलक्षण आर्ट कलेक्शन आणि आर्ट क्रिएशन्स यांना त्या पुस्तकांचे आणि चर्चेचे परिमाण लाभल्याने माझी चंद्रपूर भेट एकदमच अर्थपूर्ण झाली. तेव्हापासून आजपर्यंत तुम्ही विलक्षण इंटरेस्टिंग अशी ई-मेल्स मला पाठवीत आहात. बहुतेक वेळा त्यांची पोचही मी देऊ शकलेलो नाही, पण त्या मेल्समधून तुम्ही जी चित्रे, व्यंगचित्रे, विनोद, संदर्भ वा विचार पाठवता, त्यामुळे मला तरी त्या गप्पा अखंड चालूच असल्यासारखे वाटते. अगदी निघता निघता तुम्ही तुमचा ‘रुद्राक्षी’ नावाचा पत्रसंग्रह भेट दिला. तो नुकताच प्रसिद्ध झाला होता. त्या पुस्तकावर मी लिहावे असे मला तुम्ही सुचवले. मीसुद्धा (कसलेल्या) पत्रकाराप्रमाणे आश्वासनही दिले. पण तुम्हीही चांगलेच कसलेले असणार. एका टेलिफोनिक गप्पांमध्ये तुम्ही त्या आश्वासनाचे अगदी अस्पष्ट स्मरण दिले, पण कधीही तो विषय पुन्हा काढला नाही. व्यावसायिक पत्रकार किती निर्ढावलेले असतात याचा अंदाज तुम्हाला असणारच. तितपत भान (आणि चलाखी) तुम्हाला आहे. तुमच्या गप्पांमधूनही व्यावहारिक जगाबद्दलचा रास्त सीनिसिझम् आणि ती चलाखी, ती वितंडवादी क्षमता आणि ती भेदक बौद्धिक चमक लक्षात येते. म्हणूनच तुमच्याबरोबरचा तो वेळ कसा गेला हे लक्षात येत नाही आणि प्रत्यक्ष परिचय कमी काळाचा असूनही ते (ई-मेल्समुळेही) जाणवतही नाही.तुमचा ‘रुद्राक्षी’ पत्रसंग्रह तसा व्यक्तिगत असला तरी त्यातील मुद्दे व मांडणी त्या कक्षेपलीकडे जाते. तुम्ही ज्यांना पत्रे लिहिली आहेत त्यांना- सर्वाना- मी थेट ओळखत नसलो तरी काहींचा परिचय आहे, काहींबद्दल माहिती आहे आणि बाकीच्यांची ओळख या पत्रांतून झाली.‘रुद्राक्षी’चे लौकिक अर्थाने ‘परीक्षण’ करणे अशक्य आहे. हे पुस्तक म्हणजे ‘फिक्शन’ नाही आणि प्रचलित अर्थाने ‘नॉनफिक्शन’ही नाही. त्यातून आत्मकथन प्रकटते, पण ते आत्मकथनही नाही. (‘सांजी’ व ‘रुद्राक्षी’ ही दोन्ही पुस्तके मिळून तुमची ‘सायको-बायॉग्राफी’ लिहिणे मात्र शक्य आहे!) कित्येक पत्रांमध्ये कथा-कादंबऱ्यांचे ‘जम्र्स’ आहेत. काही पत्रे म्हणजे मनस्वी समीक्षा आहे (जी प्राध्यापकी चौकटीबाहेरची आणि मुक्तचिंतनात्मक आहे). मला कौतुक आणि आश्चर्य वाटले ते इतकी आणि अशी पत्रे लिहिण्याच्या तुमच्या मानसिक क्षमतेचे! तुमचे कलाप्रेम आणि ‘जीए प्रेम’ तर मला विशेषच जाणवले. (तितकेच अनुरूप विवेक रानडेंचे मुखपृष्ठही!)मला धड सरळ रेषाही काढता येत नाही. माझे रंगज्ञानही अगाध आहे. चित्र मला समजतातच असा दावा मी करू शकणार नाही. (पण जर समजली नाहीत तर न्यूनगंड वाटतो.) मला कविता करता येत नाहीत. मी कथा-कादंबरी लिहिलेली नाही. सर्व प्रकारची शिल्पकला व तत्सदृश कलाविष्कार माझ्याकडे नाहीत. माझे निसर्गज्ञानही तसेच अगाध आहे. बरीचशी झाडं, फुलं, फळं तर मी ओळखूही शकत नाही.अशा गद्य पत्रकाराला ‘रुद्राक्षी’चे परीक्षण वा तथाकथित ‘मूल्यमापन’ करायला सुचविणे म्हणजे तुमचे धाडसच होते. पण तुमची प्रकाशित पत्रे वाचून त्याबद्दल काही लिहिणे हे मला कर्तव्य वाटत होते. सुमारे वर्षभरानंतर मी तुम्हाला दिलेले आश्वासन परीक्षण न लिहिताच पूर्ण करण्याचा आविर्भाव आणतो आहे. म्हणूनच हा ‘पत्रा’चाच फॉर्म वापरणे मला उचित वाटले. तुमचे ई-मेलवर उत्तर येईलच.
आपला,
कुमार केतकर