हे जग बदलते, तरीही...
१९९१ ते २०११ हा गेल्या २० वर्षांचा काळ एकत्रितपणे पाहिला तर तो विलक्षण झंझावाती असल्याचे लक्षात येते. जागतिक शीतयुद्धाची समाप्ती, सोविएत युनियनचे विघटन, जागतिकीकरण, माहिती-तंत्रज्ञान क्रांती, अमेरिकेवरील ९/११ दहशतवादी हल्ला, जागतिक दहशतवादाचे अक्राळविक्राळ होत चाललेले स्वरूप.. अशा बऱ्या-वाईट वेगवान घटनांनी हा कालखंड व्यापलेला आढळून येतो. आगामी दहा वर्षे तर भल्या भल्या भविष्यवेत्त्यांनाही आवाक्यात घेणे आज जिकिरीचे वाटते आहे. ‘दशका’च्या हिशेबातील कालमापन ही सोय असली, तरी जरा मागे नजर टाकली तर लक्षात येते की, बहुतेक सगळेच संदर्भ बदलले आहेत. आणि आता तर ते इतक्या वेगाने बदलत जाणार आहेत, की त्या गतीबरोबर राहायचे तर आपल्या मनाचा वेग आणि लवचिकताही वाढवावी लागेल..
एक जानेवारी २०११ रोजी जी मुले जन्माला आली असतील, ती २०२१ साली दहा वर्षांची होतील. काळाचा आणि आयुष्यमानाचा हिशेब केला तर १९९१ साली जन्माला आलेली मुले आज २० वर्षांची आहेत आणि आणखी दहा वर्षांनी ती तिशीत जातील. ‘मग यात काय विशेष? असेच वर्षांनुवर्षे चालत आले आहे,’ असेच कुणीही म्हणेल. ते खरे आहे. पण १९९१ ते २०११ हा २० वर्षांचा काळ एकत्रितपणे पाहिला तर तो विलक्षण झंझावाती असल्याचे लक्षात येईल. पुढील दहा वर्षे तर भल्या भल्या भविष्यवेध्यांना आज आवाक्यात घेणे जिकिरीचे वाटू लागले आहे. ‘दशका’च्या हिशेबातील कालमापन ही सोय असली, तरी जरा मागे नजर टाकली तर लक्षात येईल की बहुतेक सगळे संदर्भ बदलले आहेत. आणि आता तर ते इतक्या वेगाने बदलत जाणार आहेत, की त्या गतीबरोबर राहायचे तर आपल्या मनाचा वेग आणि लवचिकताही वाढवावी लागेल.
नव्या शतकाची सुरुवात झाली- २०००-२००१ साली- तीच मुळी ‘वायटूके’च्या सनसनाटी पाश्र्वभूमीवर! बहुतेक वाचकांना स्मरत असेल की, नव्या शतकाच्या अगदी पहिल्या तासातच जगातील सर्व कॉम्प्युटर सिस्टीम्स ‘क्रॅश’ होतील, अशी भीती व्यक्त केली गेली होती. ऐनवेळेस जर सॉफ्टवेअरने असा दगा दिला तर विमाने कोसळतील, भल्यामोठय़ा वित्तसंस्थांच्या डेटाबेसमध्ये गडबड होईल, अगदी पेन्टगॉन वा नासाच्या संगणकांमध्ये जर हा ‘वायटूके’ घुसला तर भलेमोठे अरिष्ट निर्माण होईल, अशी धास्ती सर्वत्र होती. वर्षांच्या अखेरच्या दिवशीची/ रात्रीची विमानांच्या तिकिटांची विक्रीही झाली नव्हती! कुणी सांगावे, विमानच कोसळले तर?
फक्त दहा वर्षेच झाली आहेत- ‘गुगल’ म्हणजे काय, हे ९९ टक्के कॉम्प्युटर-फ्रेन्डली मंडळींनाही तेव्हा माहीत नव्हते. ‘एसएमएस’चा (म्हणजे ‘शॉर्ट मेसेज सव्र्हिस’) माहोल तर तयारच झाला नव्हता. कारण इतके मोबाइल फोन्सही नव्हते. शिवाय मोबाइलची इतकी मॉडेल्स, इतक्या फॅसिलिटीज्, इतकी व्हरायटी- आणि तेही इतक्या स्वस्तात उपलब्ध नव्हते. फक्त १५ वर्षांपूर्वी ‘१६ रुपये मिनिट’ असा असलेला कॉलदर २००१ साली उतरला असला तरी ‘आम आदमी का हाथ- मोबाइल के साथ’ अशी स्थिती आलेली नव्हती. केवळ दहा वर्षांत ‘गुगल’शिवाय कुणाचे (मुख्यत: वर्तमानपत्रांचे!) पानही (!) हलत नाही अशी अवस्था आहे. मोबाइल फोन हाताचे आणि कानाचे ‘एक्स्टेन्शन’ झाले आहे आणि ‘२ जी’ वा ‘३ जी’ प्रकरणे एकाच वेळेस महामोबाइल क्रांती व महाभ्रष्टाचाराची प्रतीके झाली आहेत. तेव्हा कुणालाही याची कल्पना नव्हती! परंतु आता मीडियाच्या कंपनीज् आणि ‘फ्यूचर मार्केट प्लॅनर्स’ या सर्व अनुभवाच्या आधारे भविष्याच्या योजना आखू लागले आहेत. म्हणजेच २०११ मध्ये मीडिया, मोबाइल आणि मॅनेजमेन्ट यांच्यात प्रचंड बदल होणार आहेत.
साधारणपणे १९९८ ते २००० या दोन वर्षांच्या काळात भारतातले अक्षरश: हजारो सॉफ्टवेअर इंजिनीयर्स जगाला ‘वायटूके डिझास्टर’पासून वाचवायला अमेरिका-युरोपात गेले होते. किंबहुना भारताची ‘आयटी’ ओळख ही तेव्हापासूनच जगाला झाली आहे. काहीजण म्हणतात की, ‘वायटूके’ची भीती अवास्तव होती. (आणि चलाख भारतीयांनीच ती पसरविली होती!) असो. मुद्दा हा की, ‘वायटूके’ ते आजचे महाजाल हा प्रवास फक्त दहा वर्षांचा आहे आणि पुढील दहा वर्षांत ही टेक्नॉलॉजिकल क्रांती सर्वव्यापी होणार आहे. राजकारण, समाजकारण आणि संस्कृतीकारण यांतही प्रचंड प्रमाणावर उलथापालथ होणार आहे. अर्थातच या उलथापालथींना केवळ टेक्नॉलॉजीच कारणीभूत असणार नाही. लोकांमधील खळबळी, हक्कांबद्दलच्या वाढत्या जाणिवा आणि व्यक्तिवादी तत्त्वज्ञानाचा प्रभाव हे त्याचे प्रमुख घटक असतील. पण या तीनही बाबींवर संस्कार असणार आहे तो वरील तंत्रज्ञानाचा!
खरे म्हणजे २००१ आणि त्यापूर्वी १९९१ या दोन्ही वर्षांतील उलथापालथी जानेवारी-डिसेंबर याच काळात (योगायोगाने) घडलेल्या आहेत. आणखी नऊ महिन्यांनी ‘९/११’ला- म्हणजे वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील दहशतवादी हल्ल्याला दहा वर्षे पूर्ण होतील. तो दहशतवादी हल्ला ११ सप्टेंबर २००१ रोजी झाला होता आणि त्यानंतर ‘जागतिकीकरण’ या संज्ञेचे संदर्भ या एका दिवसात पालटले होते. दहशतवादाविरुद्धची अमेरिकेने पुकारलेली लढाई एकदम ‘ग्लोबल वॉर ऑन टेरर’ झाली. त्या एका घटनेने जगाचे सत्तासमतोलाचे अर्थ बदलले.
त्यापूर्वी बरोबर दहाच वर्षे अगोदर- म्हणजे १९९१ साली सोविएत युनियन कोसळायला सुरुवात झाली- तीही जानेवारीतच. बाल्टिक राज्य म्हणून ओळखली जाणारी तीन राज्ये- लिथुआनिया, लॅटाव्हिया आणि इस्टोनिया- सोविएत केंद्रसत्तेच्या विरोधात बंड करून उठली होती. ते बंड आटोक्यात आणणे मिखाईल गोर्बाचेव्ह यांना अशक्य झाले. सोविएत युनियनच्या विघटनाला तेव्हा सुरुवात झाली. पण तिने वेग घेतला तो कम्युनिस्ट पक्षातील जहाल गटाने गोर्बाचेव्ह यांनाच पदच्यूत करून अटकही केली तेव्हा. तो कट फसला; पण त्यानंतर सोविएत युनियनमध्येच कम्युनिस्ट पक्षावर बंदीसदृश बंधने आली. पक्षच खिळखिळा झाल्यावर त्याच्या नियंत्रणाखाली असलेला देश विस्कटायला वेळ लागला नाही. २५ डिसेंबर १९९१ रोजी सोविएत युनियनची १५ शकले झाली. तेव्हा जगभर, विशेषत: अमेरिकेत सोविएत समाजवादाचा पाडाव आणि भांडवलशाही (अमेरिकेचा) निर्विवाद विजय झाल्याची भावना होती.
पण ‘९/११’च्या घटनेनंतर अमेरिकेच्या आणि जगाच्याही लक्षात आले की, अमेरिकेकडे कितीही बलाढय़ लष्कर असले तरी तो देश ‘अभेद्य’ नाही. फक्त १९ दहशतवाद्यांनी चार वेगवेगळ्या विमानतळांवरून चार विमाने एका तासाच्या आत हायजॅक करून दोन टॉवर्स आणि पेन्टगॉन इमारतीवर ‘हवाई दहशत हल्ला’ चढवला. अमेरिकेवर (पर्ल हार्बरवरील हल्ल्याचा अपवाद वगळता! आणि तोही थेट अमेरिकेच्या गंडस्थळावर नव्हताच.) चढवलेला हा पहिलाच असा हल्ला होता. तो कुठल्याही विशिष्ट देशाने केलेला नव्हता. कम्युनिस्ट संघटनेने, देशाने वा लाल दहशतवाद्यांनीही तो केलेला नव्हता. शीतयुद्धातील कोणत्याही सोविएतवादी देशाने या हल्ल्याचे स्वागत केलेले नव्हते. किंबहुना सुमारे ४० वर्षांच्या शीतयुद्धात अमेरिकेवर असा हल्ला कधीही झालेला नव्हता. केवळ अमेरिकाच नव्हे, तर जागतिक भांडवलशाहीच या हल्ल्याने भयभीत झाली. वस्तुत: तो हल्ला भांडवलशाहीवर नव्हता, तर तो ‘अमेरिका’ नावाच्या ‘हिंस्र व दुष्ट ऐहिक देशा’वर व त्याच्या प्रभुत्ववादावर होता. जरी हल्ला करणारे सर्व दहशतवादी मुस्लिम होते तरी कोणत्याही ‘इस्लामी’ देशाने अधिकृतपणे त्याचे स्वागत केले नव्हते. त्या दहशतवाद्यांपैकी बहुतेकजण सौदी अरेबियाचे होते; पण त्या देशानेही त्यांचे अमेरिकेबरोबरचे स्नेहसंबंध तसेच घट्ट ठेवले होते.
म्हणजेच आता जागतिक सत्ताकारणात एक नवीन (आणि भयानक) घटक निर्माण झाला होता. जगात एकूण ५४ मुस्लिम देश आहेत आणि सुमारे दीड अब्ज मुस्लिम लोक. त्यांच्यापैकी बहुतेकांनी त्या हल्ल्याचा स्पष्ट शब्दात निषेध केला होता. तरीही अनेक देशांतील काही अस्वस्थ व असंतुष्ट मुस्लिम तरुण त्या हल्ल्यानंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे दहशतवादाकडे आणि तशा संघटनांकडे आकृष्ट होऊ लागले. स्वतंत्रपणे व त्याचा परिणाम होऊन ज्यू धर्मातील अतिरेकीही त्या जागतिक लढय़ात (अमेरिका व इस्रायलच्या आशीर्वादाने) उतरले. भारतातही काही हिंदूंना आपणही समांतर दहशतवादी संघटना बांधू शकतो असे वाटू लागले. परंतु या सर्व प्रयत्नांना सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक अधिष्ठान नव्हते; जसे ते समाजवादी/ साम्यवादी विचारसरणीला होते.
म्हणजेच १९९१ पर्यंत- सोविएत युनियनच्या विघटनापर्यंत असलेले जग आणि २००१ नंतरचे (९/११ नंतरचे) जग यांत पूर्ण फरक पडला होता. ज्याप्रमाणे १९९१ च्या घटनांनी त्या दशकाचेच चित्र बदलले, त्याचप्रमाणे २००१ च्या घटनेने गेल्या दहा वर्षांतील राजकारणाचे स्वरूपही बदलले आहे. याचा अर्थ असा अजिबात नाही की, दर दशकाच्या सुरुवातीचे वर्ष येणाऱ्या काळाचे संकेत घेऊन येते. इतिहासाच्या कालमापनाच्या व घटनाक्रम समजून घेण्याच्या सोयीसाठी अशी विभागणी आपण करतो. त्यामुळे इतिहासाचे टप्पे समजायला मदत होते, इतकेच.
या सर्व घटनांमध्ये समान धागा अर्थातच आहे. तो आहे टेक्नॉलॉजीचा- आणि टेक्नॉलॉजीमुळे विस्तारणाऱ्या लोकशाही जाणिवांचा. कम्युनिस्ट रशियात १९८५ साली मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी सूत्रे हाती घेईपर्यंत वृत्तपत्रस्वातंत्र्य नव्हते. ‘ग्लासनोस्त’ ऊर्फ लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेत वृत्तपत्रांबरोबरच सोविएत युनियनमध्ये दूरचित्रवाणीलाही स्वातंत्र्य मिळाले. ते स्वातंत्र्य मिळताच लोक अहमहमिकेने वर्तमानपत्रांतून व टीव्हीमार्फत आपला दबून राहिलेला व दडपून टाकलेला असंतोष व्यक्त करू लागले. माध्यम-तंत्रज्ञानाच्या विस्ताराशिवाय लोकशाही विचारांचा प्रसार अशक्य होता.
ज्या वर्षी सोविएत युनियनचे विघटन झाले, त्याच वर्षी युगोस्लाव्हियातील सप्तरंगी यादवीला सुरुवात झाली. १९९१ ते २००० या काळात युगोस्लाव्हियाची शकले झाली. परंतु याचा अर्थ माध्यम-तंत्रज्ञान विस्तारामुळे विघटन वा विध्वंसच होतो, असे अजिबात नाही. त्याच वर्षी युरोपियन युनियन संघटित करण्याचे प्रयत्न पूर्णत्वास गेले. त्यामुळेच काही वर्षांत युरोपातील अनेक देशांनी आपापल्या देशातील चलन रद्दबातल करून (मार्क, फ्रँक, लीरा इ.) युरो या चलनाचा स्वीकार केला, एका देशातून दुसऱ्या देशात जाण्यासाठी असलेली बंधने शिथिल केली वा नाहीशी केली. परिणामी युरोपातील व्यापारउदीम वाढला.
म्हणूनच आपण म्हणू शकतो की, १९९१ साली भारतातही आर्थिक उदारीकरण सुरू केले गेले आणि जागतिकीकरणाची दालने उघडली गेली, हा योगायोग नव्हता. भारताचा सोविएत युनियनबरोबर आणि पूर्व युरोपातील समाजवादी देशांबरोबरचा रूपी-रुबल व्यापार संपला होता आणि अपरिहार्यपणे आपण जागतिक व्यापार-व्यवहारात येऊन थडकलो होतो. जागतिक व्यापार संघटनेची प्रक्रिया याच सुमाराला सुरू होऊन काही वर्षांतच पूर्ण झाली, हा महिमाही तंत्रज्ञानविस्ताराचा, माध्यम-माहिती क्रांतीचाच होता. जेव्हा भारताने उदारीकरण व जागतिकीकरणाचे दालन उघडले तेव्हा डाव्या-उजव्यांनी त्याला कडाडून विरोध केला. अजूनही काही कडव्यांचा आणि दुराग्रही, पूर्वग्रहदूषितांचा जागतिकीकरण व नव्या अर्थनीतीला विरोध आहेच. याचा अर्थ जग बदलले तरी वृत्ती बदलतातच असे नाही.
म्हणूनच जग बदलले, पण दहशतवादी हिंसेचा धोका आहेच. १९४५ ते १९९१ या काळात शीतयुद्ध भडकून अणुयुद्धाला तोंड फुटेल अशी भीती होती. शीतयुद्ध संपल्यावर तीच अण्वस्त्रे दहशतवाद्यांच्या हातात पडण्याची भीती निर्माण झाली. याच काळात तंत्रज्ञानाच्या विस्तारामुळे सुबत्ता, समृद्धी आली, नवमध्यमवर्ग आणि नवीन ऐहिक जीवनशैलीही आली. पण तरीही त्या समृद्धीमुळे दारिद्रय़ पूर्णत: दूर झाले नाही आणि विषमताही वाढलीच. म्हणजेच सुखाची आणि सुखासीनतेची साधने वाढत असतानाच असमाधान आणि असंतोषही वाढतच राहिला. मग गेल्या २० वर्षांत जग सुधारले की नाही? इंग्रजीत एक प्रवाद आहे- द मोअर यू चेंज, द मोअर यू रिमेन सेम. हे जग बदलले तरीही जोपर्यंत माणूस आपली वृत्ती, स्वभाव आणि नात्यांमधील संबंधांचे स्वरूप बदलत नाही तोपर्यंत..
कुमार केतकर,
रविवार, २ जानेवारी २०११
Subscribe to:
Posts (Atom)