या जन्मावर, या जगण्यावर.

या जन्मावर, या जगण्यावर..

प्रत्येक माणसाला माहीत असते की आपण कधीतरी मरणार आहोत. परंतु ‘कधीतरी’ म्हणजे नक्की कधी, कुठे, केव्हा, कसे याचा अंदाज फक्त असाध्य रोग होऊन अंथरुणाला खिळलेल्यांना असतो. अगदी (मोजक्या) आत्महत्या करणाऱ्यांनाही असतो. (परंतु त्यांचाही प्रयत्न कधी फसतो आणि आत्महत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा त्यांच्याविरुद्ध दाखल होतो!) बाकी सर्वजण मरेपर्यंत जगतात. मनातल्या मनात सगळ्यांना जाणीव असते, की पुनर्जन्म वगैरे सगळे झूठ आहे. पुनर्जन्मावर ठाम विश्वास व्यक्त करणाऱ्यांनाही अंतर्मनात जाणवत असतेच, की एकदा गेलो- की गेलो! आणि अगदी पुनर्जन्म झालाच तरी त्या जन्मात याच जन्माची ‘कंटिन्यूइटी’ असेल असे कशावरून? त्यामुळे बहुसंख्य माणसांना जगावेसे वाटते. कारण हे आयुष्य एकदाच मिळालेले असते. त्यामुळे जीवनाविषयीचा लोभ निर्माण होतो. तो लोभ समजण्यासारखा आहे.
पण जर प्रत्येकाला हेही माहीत आहे की, तो/ती मरणार आहे आणि एकदा मेल्यावर या जगाशी त्याचा काहीही संबंध असणार नाही; मग संपत्तीचा, स्थावर आणि जंगम मालमत्तेचा, जमिनीचा, सोन्या-चांदीचा, बंगला-गाडीचा मोह वा लोभ शेवटपर्यंत का सुटत नाही? हे प्रश्न ऐहिकतेच्या संबंधातले झाले. कित्येकांना प्रसिद्धीचा, कीर्तीचा, स्मृतींचा, नात्यांचा मोहही सुटत नाही. तीसुद्धा एक प्रकारची ऐहिकताच. एका प्रसिद्ध मराठी लेखकाने पूर्वी, त्यावेळच्या एका संपादकांना कळविले होते की, आपण मेल्यावर, एक प्रदीर्घ अग्रलेख लिहावा. ‘मला नुसत्या बातमीत उडवून टाकू नका!’ अशी विनंती त्या पत्रात होती. एकदा मार्क ट्वेन मेल्याची बातमी प्रसिद्ध झाली. मार्क ट्वेन जिवंतच होते. त्यांनी संपादकाला कळविले की, ‘बातमीतील अतिशयोक्ती वगळता बाकी खरे आहे. शिवाय मी मेल्यावर माझी ‘जागा’ काय आहे, हेही मला बातमीवरून उमजले.’
शकुंतला परांजपेंनी तर आपण मेल्यावरची स्थिती अगदी सविस्तरपणे लिहून ठेवली होती. त्यात जवळच्या कुटुंबियांची मन:स्थिती, त्यांचा शोक, शेवटची आवराआवरी, शेजारी-पाजारी असे सर्व काही होते. त्यानंतर कित्येक वर्षांनी प्रत्यक्षात शकुंतलाबाई मरण पावल्या. जीवनावर ‘शतदा प्रेम’ करणाऱ्या त्या होत्या आणि त्यांचा जीव शेवटी तुटला असेल तर तो त्यांनी पाळलेल्या मांजरांसाठी! ‘मरावे परी कीर्तीरुपी उरावे’ या स्वरूपाची उक्ती सर्व संस्कृतींमध्ये आहे. म्हणजेच जिवंत असताना मरणोत्तर कीर्तीचा लोभ मनात असतो. जसा तो कीर्तीचा असतो, तसाच जमा केलेल्या संपत्तीचा, घराण्याच्या नावाचा आणि आपल्या जिंवतपणाच्या स्मृतींचा व नात्यांचा. मरणाची खात्री असूनही आणि सर्व संत-महंतांनी ‘या मातीतून जन्माला आलास- त्या मातीतच विलिन होणार’ किंवा, ‘एकटाच आलास- एकटाच जाणार’ असे इशारेवजा सांगूनही लोभ का सुटत नाही? तमाम बाबा-बापू-बुवा प्रवचनांमध्ये आणि टीव्हीच्या सर्व वाहिन्यांवरील भक्तिभावाच्या निरुपणांमध्ये, ‘संपत्तीचा, नात्या-गोत्यांचा, इहलोकाचा- जीवनाचाच लोभ/मोह टाळा’ असे सांगत असतात. परंतु खुद्द तेही त्या टीव्ही प्रतिमेच्या, प्रसिद्धीच्या आणि त्यातून येणाऱ्या ऐहिकतेच्या ‘सापळ्यात’ तेवढेच सापडलेले असतात. सध्या अतिशय ख्यातनाम असलेल्या एका ‘महान’ साधुपुरुषाला नोबेल पुरस्काराचा ध्यास लागला आहे. हा पवित्र साधुपुरुष अक्षरश: जगभर ‘मोहातून मुक्ती कशी साधावी’, ‘मन:शांती कशी प्राप्त करावी’, ‘मनातल्या षड्रिपूंशी कसा सामना करून चित्तशुद्धी करावी’ या विषयावर टीव्हीवरून आणि प्रत्यक्षातही प्रवचने देत असतो. भलेभले डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील- अगदी न्यायाधीशसुद्धा त्यांच्या प्रवचनांना हजेरी लावतात. परंतु हे साधू मात्र नोबेल पुरस्कारप्राप्तीच्या इच्छेने झपाटलेले आहेत.

एका बाजूला हा सर्वव्यापी लोभ आपल्या आजुबाजूला दिसत असतानाच शेकडो नव्हे तर हजारो असे तरुण-तरुणी आहेत की जे मरायलाही तयार होत आहेत-कुठल्या तरी ध्येयासाठी वा धर्मासाठी, तत्त्वासाठी वा देशासाठी, विचारांसाठी वा परंपरांसाठी. ‘मानवी बॉम्ब’ नावाची अंतिम त्यागाची कल्पना जरी अलिकडे प्रभाकरनने प्रचलित केली असली तरी तालिबानी आणि ‘अल कायदाचे’चे अनुयायी ते तंत्र सर्रास वापरत आहेत.
धर्मयुद्धात, स्वातंत्र्ययुद्धात, स्वाभिमान जपण्यासाठी, परंपरा आणि संस्कृतीच्या रक्षणार्थ मरणाला सामोरे जाणाऱ्यांची संख्या, मानवी सिव्हिलायझेशनच्या काळात काही कोटींमध्ये जाईल. ‘बुक ऑफ द डेड’ नावाच्या एका ग्रंथात म्हटले आहे की, पूर्वी मरणे तसे सोपेही नव्हते. येशू ख्रिस्ताला सुळावर चढविले, तसेच कित्येकांच्या हाता-पायांना खिळे ठोकून क्रॉसवर जिवंत ठेवले जात असत- काही दिवसांनंतर अन्नपाण्याशिवाय, अपार वेदना सहन करत ते त्याच स्थितीत मरण पावले. परंतु तेव्हाही हजारो लोकांनी तसे मरणे पसंत केले- शरण जाण्यापेक्षा ते अधिक उदात्त मानले. म्हणजेच जीवनावर नितांत प्रेम करणारेही मरायलाही तितक्याच नितांततेने तयार होतात. ही ‘जीवनेच्छा’ आणि मरणेच्छा’ कशी निर्माण होते आणि माणूस सुखाचे जीवन त्याग करायला कसा तयार होतो हाही एक अभ्यासाचा विषय झाला आहे.
काही वर्षांपूर्वी एकूण ३९ श्रीमंत, बुद्धिमान, गोऱ्या अमेरिकनांनी सामूहिक आत्महत्या केली. परंतु त्यांनी लिहून ठेवलेल्या निवेदनाप्रमाणे ती आत्महत्या नव्हतीच. ते एकत्रितपणे, मृत्यूनंतरच्या परलोक प्रवासाला गेले होते. त्या ‘परलोका’चा शोध घेण्यासाठी. तो ‘प्रवास’ सुरू करण्यापूर्वी ते एका आलिशान बंगल्यात एकत्र राहिले. त्यांनी जीवन-मरणाच्या सविस्तर चर्चा केल्या. त्यांच्यापैकी अनेकजण कॉम्प्युटर प्रोग्रॅमर्स होते. काही जण एखाद्या विज्ञानशाखेत संशोधन करीत होते. या ‘प्रवाशांचे’ प्रमुख होते एक साठी ओलांडलेले दाम्पत्य. या ‘प्रवाशांना’ जी माणसे ओळखत होती, त्या सर्वानी नंतर सांगितले की, त्यांच्यापैकी कुणीही ‘वेडे’ वा ‘स्किझोफ्रेनिक’ नव्हते, असाध्य रोगाने पछाडलेले नव्हते, जीवनात अयशस्वी वा दु:खीही नव्हते.
या मंडळींच्या परलोक प्रवासावर त्या वेळच्या (१९९७) ‘टाईम’ ‘न्यूजविक’मध्ये कव्हर स्टोरीज् प्रसिद्ध झाल्या. बडेबडे मानसशास्त्रज्ञ या ‘फिनॉमिनन’चा अभ्यास करू लागले. त्या प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी जे निवेदन लिहून ठेवले होते त्यात म्हटले होते, की एका अतिशय प्रगत, प्रगल्भ आणि आनंदी परलोकाचा (‘सिव्हिलायझेशन’चा) शोध लागला आहे. त्या परलोकात अधिक चांगले जीवन जगण्यासाठी ते जात असल्यामुळे मरणाला सामोरे जाण्याचा वगैरे प्रश्नच नाही. कारण याहूनही अधिक आनंदी जीवन जगण्यासाठी ते जात आहेत. ‘हेल बॉप’ नावाचा धूमकेतू आपले येथील अस्तित्व संपताच आपल्याला परलोकात घेऊन जाणार, हे त्यांनी ‘विज्ञाना’ने जाणले होते. त्या ‘हेल बॉप’विषयी एका ‘मसिहा’ने त्यांना सांगितले होते, असे पुढे शोधपत्रकारांनी लिहिले; परंतु तो ‘मसिहा’ कुठच्या पंथाचा वगैरे नव्हता. या ‘प्रवाशांना’ ज्या परलोक फँटसीने मोहात टाकले ती आजही ‘हेवन्स गेट’ या वेबसाइटवर उपलब्ध आहे. त्या वेळच्या बऱ्याच अमेरिकन वृत्तपत्रांनी आणि मानसशास्त्रज्ञांनी या सामूहिक परलोक प्रवासाबद्दल बरेच काही लिहिले; पण अजूनही त्याचा पूर्ण उलगडा झालेला नाहीच. पण एक नक्की ते अंतिम त्याग करीत नव्हते तर अधिक सुखाच्या लोभाने त्या प्रवासावर निघाले होते. या लोभाचे एक अर्थशास्त्रीय तत्त्वज्ञानही बनविले गेले आहे. ‘इकॉनॉमिक्स ऑफ ग्रीड’ आणि ‘कल्चर ऑफ अ‍ॅक्विझिटिवनेस’ या प्रबंधावर चंगळवादाची नवभांडवलशाही संस्कृती उभी आहे. अमेरिकेतील नव-उदारमतवादी अर्थतज्ज्ञ तर असे मानतात, की जर लोभ आणि ‘मालकी हक्क’ जीवनातून काढून घेतला तर अवघे ‘सिव्हिलायझेशन’च कोसळून पडेल. म्हणूनच ‘चंगळवाद’ ही संज्ञाही त्यांना मान्य नाही. नाही तरी माणसाला राहायला जागा किती लागते? एक खोली, एक वा दोन बीएचके, बाराशे चौरस फुटांचा फ्लॅट, अडीच हजार चौरस फुटांचा बंगला, की प्रचंड मोठे आवार, बाग, अंगण, स्विमिंग पूल असलेला बंगला? भारतात असताना चाळीत (कॉमन बाल्कनी- कॉमन टॉयलेट) राहणारे मध्यमवर्गीय अमेरिकेत गेल्यानंतर त्यांनी तेथे असे प्रशस्त बंगले घेतले. ‘साध्या राहणी’चे तत्त्वज्ञान गरिबीतून नव्हे तर मनाच्या दारिद्रय़ातून येते, असे ते सांगू लागले. त्यांच्या दृष्टिकोनातून त्यांची जीवनराहणी ही चंगळवादी नाही. चंगळवाद हा लोभातून जन्माला येतो, असे मनापासून मानणाऱ्यांनीही त्यांच्या व्याख्या आता बदलल्या आहेत. एक दशकापूर्वी मोबाइल फोन असणे चंगळवाद होता. दोन दशकांपूर्वी कलर टी. व्ही. आणि व्ही. सी. आर. असणे हा चंगळवाद होता. त्यापूर्वी फ्रीज असणे हीसुद्धा चैन होती. या सर्व बाबी आता गरजेच्या मानल्या जात आहेत. परंतु आता जे नवे पर्यावरण-विज्ञान खुद्द अमेरिकेतच प्रतिष्ठा पावते आहे, त्यानुसार लोभ आणि नव-चंगळवाद यामुळे या पृथ्वी ग्रहालाच धोका निर्माण झाला आहे. त्यांच्या मते अमेरिकेचे आजचे आर्थिक अरिष्टही मुख्यत: लोभाच्या अर्थशास्त्रामुळेच आले आहे. आता अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा आणि बरेच विचारवंत सांगू लागले आहेत, की बेफाम चंगळवादी शैलीला आवर घातलाच पाहिजे. तो घातला नाही तर अनावश्यक वस्तूंचे उत्पादन आणि त्यामुळे निसर्गसंपत्तीची बेबंद लूट होऊन ‘ग्लोबल वॉर्मिग’ची शक्यता अधिक जवळ येणार आहे. जितक्या मोटारी तितके प्रदूषण, जितका अधिक विमानप्रवास तितके अधिक कार्बन एमिशन, जितके अधिक अन्नसेवन तितकी अधिक ‘ओबिसिटी’ आणि तितके अधिक व्यर्थ उत्पादन- वगैरे म्हणजेच ज्या लोभ-तत्त्वावर भांडवलशाही तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र उभे होते, त्याच तत्त्वाला आता ग्लोबल वॉर्मिगच्या धोक्यामुळे भांडवलशाहीतच आक्षेप घेतले जाऊ लागले आहेत.
अमेरिकेतील सध्याच्या ‘कॉर्पोरेट कॅपिटॅलिझम’मध्ये एखादे कुटुंब वा व्यक्ती केवळ भांडवलदार नसते. प्रचंड प्रमाणावर असलेले ‘शेअर होल्डर्स’ त्या कंपनीवरचा मालकी हक्क बजावत असतात. या ‘शेअर होल्डर्स’चा अनाठायी लोभ मात्र आर्थिक अरिष्टाला कारणीभूत ठरला. म्हणजेच खासगी संपत्ती (अभिजात अर्थाने) आणि शेअर्सची मालकी यात फरक आहे. शेअर होल्डर हा त्या ‘अपौरुषेय’ अर्थशक्तीचा व अर्थव्यवहाराचा वाहक व समभागी असतो.
भांडवलदाराला तसेच त्या कॉर्पोरेट कंपनीला पैसे नव्हे तर सत्ता हवी असते. सत्ता म्हणजे केवळ राजकीय नव्हे! ‘पॉवर’ म्हणजे केवळ राजकीय सिंहासन नव्हे तर एकूण समाजकारण- अर्थकारण- राजकारण यावरची अप्रत्यक्ष हुकमत. त्या सत्तेचा लोभ हा सर्वात प्रभावी ठरतो आहे.
त्यातूनच प्रश्न पुन्हा मूळ ध्रुपदाकडे जातो. जर मृत्यू अटळ आहे, तर तो स्वाभाविक व अपरिहार्य मानून माणूस निर्लोभी जीवन का जगत नाही?
एका विचारवंताने तर म्हटले आहे, की ‘मृत्युपत्र’ ही संकल्पनाच मरणोत्तर लोभ जपण्याची आहे. किंबहुना म्हणूनच सर्व धनाढय़ मंडळींची मृत्युपत्रे नेहमीच वादग्रस्त ठरली आहेत. कारण त्या लोभाचे वाटेकरी बरेच जण असतात.
म्हणूनच खासगी संपत्ती किंवा ‘राइट टू प्रायव्हेट प्रॉपर्टी’ जोपर्यंत आहे, तोपर्यंत लोभाला कायद्याची आणि सांस्कृतिकतेची प्रतिष्ठा मिळणारच. स्वत:ची कार असणे वेगळे आणि स्वत:ची जमीन असणे वेगळे. त्यामुळेच ‘प्रायव्हेट’ ऊर्फ ‘खासगी’ काय आणि ‘सार्वजनिक’ म्हणजेच ‘पब्लिक’ काय यावर समाजाचे नियोजन बेतायला हवे.
जीवन-मृत्यू रहस्य चक्राचा सरळ अर्थ `Tuesdays with Morrie’ या जगप्रसिद्ध पुस्तकात येतो. अमेरिकेतील प्रोफेसर मॉरिश्वार्टझ् हे एक आदरणीय शिक्षक होते. मिच अ‍ॅल्बॉम हा त्यांचा विद्यार्थी आणि पुढे पत्रकार. अ‍ॅल्बॉमला समजते, की आपले प्रिय शिक्षक गंभीररीत्या आजारी आहेत आणि खरे म्हणजे मृत्युपंथालाच लागले आहेत.
मरणासन्न स्थितीत असलेला माणूस जीवनाकडे आणि मृत्यूकडे कसा पाहतो, कसा व काय विचार करतो हे समजून घ्यावे म्हणून अ‍ॅल्बॉम आपल्या शिक्षकाकडे जातो. त्यांचे शेवटचे काही महिनेच उरले आहेत, हे कळल्यानंतर अ‍ॅल्बॉम दर मंगळवारी आपल्या शिक्षकाची भेट घेतो आणि मोकळेपणाने मारलेल्या त्या गप्पांचे रेकॉर्डिग करून घेतो. या पुस्तकातील संवादांवर आधारित पुढे टी. व्ही. मालिकाही झाली (आणि त्या पुस्तकाची अनेक भाषांमध्ये भाषांतरे होऊन) जगभर लक्षावधी प्रतीही संपल्या. त्या संवादांमधून जीवन-मृत्यू चक्रावर भाष्य करताना एक सूत्र अ‍ॅल्बॉमला उमगते. मृत्यूकडे कसे पाहायचे आणि एकूणच आपल्या गतआयुष्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहायचे हे कळले तरच कसे जगायचे हे समजते, कारण जन्म आणि मृत्यू दोन्ही अटळ आहेत.
कुमार केतकर

No comments:

Post a Comment