अथांगातील तांडव

अथांगातील तांडव
बरोबर ७० वर्षांपूर्वी ऑर्सन वेल्स या विख्यात हॉलीवूड दिग्दर्शक व अभिनेत्याने अमेरिकन रेडिओवरून एका कादंबरीचे वाचन केले होते. ऑर्सनचा आवाज, त्या आवाजाचे शब्दवेधी कंप आणि त्याची नाटय़मयता हे सर्व इतके विलक्षण होते, की त्या कादंबरीचा काही भाग वाचून होताच, सबंध अमेरिकेत एकच घबराट पसरली. लोक भयभीत स्थितीत रस्त्यावर येऊन सैरावैरा पळू लागले. ज्या कथेच्या वाचनाने ही सार्वत्रिक घबराट पसरविली होती तिचे नाव होते- ‘द वॉर ऑफ द वर्ल्डस्!’ एच. जी. वेल्स या जगप्रसिद्ध भविष्यवेधी लेखकाची ती कादंबरी. मंगळावर वस्ती करणाऱ्या ‘माणसांनी’ अवकाशयानातून पृथ्वीवर आक्रमण केले आहे आणि त्यामुळे सर्वत्र हाहाकार माजला आहे, अशा अर्थाचा कथाभाग ऑर्सन वेल्स यांनी आपल्या भेदक आणि वास्तव शैलीत वाचून दाखवला होता. तो आवाज इतका प्रत्यक्षदर्शी होता, की रेडिओवरून ते ऐकणाऱ्या सर्वाना वाटले, की ते साक्षात त्या आक्रमणाचेच वर्णन आहे. त्या काळात टेलिव्हिजन नव्हता. वृत्तपत्रे आणि रेडिओ हीच प्रसारमाध्यमे. रेडिओचा विस्तारही तसा नवाच. लोकांना वाटले की ते आक्रमणाचे थेट प्रक्षेपण ऐकत आहेत आणि त्यामुळे घबराट पसरली.
एकूण वातावरणातही काहीशी भयाकुलता असल्यामुळे आणि युद्धाच्या शक्यतेची जागतिक स्थिती असल्यामुळे लोकांची मने कातर झाली होती। दुसऱ्या महायुद्धाच्या आरंभाच्या अगोदर काही महिने ही कादंबरी रेडिओवरून वाचली गेली होती. युरोपात हिटलरचा उदय झाला होता. त्याच्या वल्गना जग पादाक्रांत करायच्या होत्या. अतिशय बलाढय़ असे सेनादल त्याने उभे केले होते. प्रखर आणि हिंस्र जर्मन राष्ट्रवादी महत्त्वाकांक्षेमुळे जग महायुद्धाच्या वणव्यात लोटले जाईल की काय, अशी भीती व चर्चा सर्वत्र होती. अशा त्या कातरवेळी ऑर्सनचा आवाज रेडिओवरून काळीज कापत-कापत घराघरांत घुसला होता. तसे पाहिले तर ती कादंबरी १८९८ सालची होती. म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस. आणि रेडिओवरचे कादंबरीवाचन झाले १९३८-३९ साली. दुसरे महायुद्ध सुरू झाले ते त्यानंतर काही महिन्यांनी; परंतु १८९८ ची कादंबरी १९३८ साली जिवंत वाटावी (आजही ती कादंबरी क्लासिक्स्च्या बेस्टसेलर्समधील एक आहे.) यावरून लेखकाचे द्रष्टेपण आणि शैलीचा प्रभाव याचा प्रत्यय येऊ शकेल. एच. जी. वेल्स यांची ‘द टाइम मशीन’ ही कादंबरी तर त्याही अगोदरची (१८९५). त्या कादंबरीवर पुढे हॉलीवूडने चित्रपट प्रदर्शित केलेच, पण गेल्या १५-२० वर्षांत स्टिव्हन स्पिलबर्गने दिग्दर्शित केलेल्या ‘बॅक टू फ्युचर’ या तीन चित्रपट मालिकांचा मुख्य आशयही ‘द टाइम मशीन’च्या कथानकावरच आधारलेला होता. वेल्सला इतिहास, वर्तमान आणि भविष्यकाळ यातील भन्नाट संगतीने झपाटलेले होते. म्हणूनच ‘आऊटलाइन ऑफ हिस्टरी’ या पुस्तकात इतिहााचा वेध घेणाऱ्या या लेखकाने ‘द शेप ऑफ थिंग्ज् टू कम’ हे पुस्तकही लिहिले होते. वेल्स जेव्हा हे लेखन करीत होता तेव्हा ‘फ्युचरॉलॉजी’ ही ज्ञानशाखा म्हणून रूढ झालेली नव्हती. वेल्सच्याही अगोदर बरीच वर्षे ज्युल्स व्हर्न या फ्रेंच लेखकाने ‘जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ’ आणि ‘अराउण्ड द वर्ल्ड इन ट्वेण्टी डेज’ अशा कादंबऱ्या लिहिल्या होत्या. विमानाचा शोध लागण्याच्या अगोदर ३० वर्षे व्हर्नच्या साहसी पात्रांनी जगाला ८० दिवसांत प्रदक्षिणा घालण्याचा विडा उचलून तो पारही पाडला होता. आता तसा जगप्रवास करायला ८० तासही लागत नाहीत आणि अवकाशयानाने तर ती यात्रा पुरी करायला आठ तासही खूप झाले. या व अशा अनेक लेखकांना ‘त्रिकाल वेधी’ द्रष्टेपणाने झपाटले होते. अगदी अलीकडे मरण पावलेले ऑर्थर सी क्लार्क हेसुद्धा त्याच ‘त्रिकाल वेधी’ परंपरेतले. ऑर्थर सी. क्लार्क यांची ख्याती शब्दश: ‘दिगंतात’ पसरली ती त्यांच्या 2001-Space Odyssy या चित्रपटामुळे. त्यांनाही अंतराळ प्रवास, विश्वशोध, इतर ग्रहांवरील जीवसृष्टीचा वा अधिक प्रगत व प्रगल्भ माणसाचा शोध या गोष्टींनी झपाटलेले होते. कार्ल सगान या खगोलशास्त्र व विज्ञानलेखकाचाही तोच ध्यास होता. अथांग अंतराळात तसा शोध घेण्यासाठी सोडलेल्या ‘व्हॉयेजर’ या यानाचे ते एक प्रवर्तक होते. याच ‘व्हॉयेजर’मधून पृथ्वी ग्रहाची माहिती, येथील संस्कृती, माणसाची विज्ञानगाथा एका ध्वनिफितीद्वारे अंतराळात पाठविली गेली आहे. कधीतरी, कुठेतरी, त्या अनादि अनंत विश्वात कुणाला तरी ती मिळेल अशी सगान यांना आशा होती. तो व्हॉयेजर प्रकल्प आणि त्याबरोबर पाठविलेले पृथ्वीचे गीत-संगीत ‘ े४१े४१२ ऋ ३ँी एं१३ँ’ या नावाने प्रसिद्ध झालेल्य ग्रंथात संकलित केले गेले आहेत. आपल्याकडेही डॉ. जयंत नारळीकर , चिंतामणी देशमुख व लक्ष्मण लोंढे, अरुण साधू, डॉ. बाळ फोंडके, निरंजन घाटे आदींनी यासंबंधात संकल्पनाविलास करणारे उत्कृष्ट विज्ञानलेखन केले.या अंतरिक्ष भ्रमणातून आणि आकाश-अवकाश निरीक्षणातून माणसाला एका अनामिक संकटाची शक्यता आणि भीतीही वाटते. उल्का पडताना पाहिलेल्या माणसाला फार पूर्वीपासून असे वाटत आले आहे की, कुठचा तरी धूमकेतू, गुरुत्त्वाकर्षणाच्या कक्षेतून बाहेर सटकलेला आणि भरकटलेला लहानमोठा ग्रह-उपग्रह अनपेक्षितपणे पृथ्वीवर येऊन आदळेल आणि सर्वत्र एकच हाहाकार माजेल॥ नाहीतरी आपली सूर्यमालिका अशी तुकडे तुकडे होऊन नाही का विस्तारत गेली? मग एखादा धूमकेतू पृथ्वीवर आदळून आपल्या ग्रहाची शकले झाली तर? अमेरिका, रशिया, युरोप, ऑस्ट्रेलिया, भारत, चीन या सर्व देशांनी त्यांच्या दुर्बिणी, उपग्रहातून सोडलेले रेडिओ-टेलिस्कोप आणि विविध प्रकारच्या उपकरणांद्वारे टिपलेल्या ध्वनीलहरी व प्रकाशलहरी यांच्या मदतीने अशा वांड व ‘दिशाहीन’ धूमकेतूचा शोध चालू ठेवला आहे. आकस्मिकपणे पृथ्वीवर आदळून अशा धुमकेतूने अपघात घडवून आणला तर माणसाने निर्माण केलेली सिव्हिलीझेशन/ सायन्सची प्रतिसृष्टी नष्ट होईलच, पण एकूण जीवसृष्टीच (बहुतांश तरी) लयाला जाईल. म्हणून अशा भरकटणाऱ्या धूमकेतूंचा कसोशीने वेध घेतला जात असतो.माणसाप्रमाणेच पृथ्वीला, आपल्या सूर्यमालिकेला, या विश्वालाही नैसर्गिक वा असा अपघाती मृत्यू येऊ शकतो ही भीती फार पूर्वीपासून असली तरी त्या भीतीचे वैज्ञानिक शक्यतेत रूपांतर झाले ते गेल्या शे-दीडशे वर्षांत. पृथ्वीवर अनेक ठिकाणी महाविवरे आहेत, प्रचंड मोठे तलाव आहेत, बऱ्याच प्रकारच्या ‘कॉस्मिक’ खुणाआहेत, ज्या हे दर्शवितात की असे आघात-अपघात पूर्वी झाले आहेत. त्यातून कित्येक संस्कृती जन्माला येऊन नष्ट झाल्या असाव्यात, उत्क्रांती प्रक्रियेला छेद देणारे (?) जीव निर्माण होऊन कायमचे नष्ट झाले असावेत असे तर्कवितर्क यासंबंधात केले गेले आहेत. एका थिअरीप्रमाणे डायनोसॉरस पर्व असेच नष्ट झाले असावे. काहींच्या मते ‘डायनोसॉरस पर्व’ सुमारे लाख-सव्वा लाख वर्षे हळूहळू लयाला जात होते, तर इतर काहींच्या मते ते अशा अपघातामुळे एका फटक्यात नष्ट झाले. (‘जुरासिक पार्क’ या चित्रपटात डायनोसॉरसच्या डीएनएद्वारे त्यांना पुन्हा निर्माण करता येऊ शकते हा संकल्पना-सिद्धांत मांडला आहे. ती सर्वस्वी फँटसी नाही.) म्हणूनच काही ‘कॅटॅस्ट्रोफीवादी’ ऊर्फ विनाशवादी वैज्ञानिक असे मानतात की ही जीवसृष्टी (माणसासहित) नष्ट झाली तर आश्चर्य वाटायला नको (आणि दु:खही करायला नको- अर्थात तसा विनाश झाला तर दु:ख करायला कुणी उरलेलेच नसेल हा भाग वेगळा!)परंतु माणसाची प्रज्ञा ही या सर्व विचारांच्या केंद्रस्थानी आहे. किंबहुना हे विश्व आहे, तेच आपल्याला त्याची जाणीव आहे म्हणून आहे. प्रज्ञावान माणूसच नसेल तर विश्व असले काय, नसले काय वा कसेही असले यात काय फरक पडतो? या विश्वातील तारे, ग्रह, उपग्रह, कृष्णविवरे, तारकासमूह जर ‘निर्जीव’पणे आणि प्रज्ञाहीन अवस्थेत फिरत राहिले, विस्तारत राहिले, फुटत राहिले तर राहीनात का? म्हणूनच आपण आहोत त्यामुळे या विश्वाला अर्थ आहे आणि विश्वाचा अर्थ-अन्वयार्थ लावणे ही आपली ‘नैतिक’ जबाबदारी आहे. म्हणजेच माणूस व त्याची संस्कृती-प्रगल्भता, अर्थात ज्ञान-विज्ञान-प्रज्ञान टिकविणे हे आपले प्रथम कर्तव्य असायला हवे. समाजजीवनात न्याय, समता, स्वातंत्र्य असावे या विचारांनासुद्धा अर्थ प्राप्त होतो तो त्याच दृष्टिकोनातून. कारण माणसाच्या प्रज्ञेत विश्वज्ञानाचे सर्जनशील सामथ्र्य आहे. तसेच सार्वत्रिक विनाश घडवून आणण्याचे विध्वंसक सामथ्र्यही आहे. आपल्याला ठरवायचे आहे, प्रज्ञेला ‘दिशा’ कोणती द्यायची?रशियन व अमेरिकन वैज्ञानिकांनी काही वर्षांपूर्वी एक प्रकल्प संयुक्तपणे हाती घेतला आहे. त्या प्रकल्पाचे उद्दिष्ट मुख्यत: ही पृथ्वी धूमकेतूसदृश आघात-अपघातांपासून वाचविणे हा आहे. त्या पाठीमागे आहे त्यांचादुर्दम्य आत्मविश्वास आणि विज्ञानाची झेप. त्यातूनच लक्षात आले की, २१ ऑगस्ट २१२६ रोजी (आजपासून ११७ वर्षांनी- म्हणजे निदान आपल्याला चिंता नाही!) ‘स्विफ्ट टट्ल’ नावाचा एक धूमकेतू पृथ्वीवर येऊन आदळणार आहे. तासाला सुमारे ६० हजार मैल किंवा सेकंदाला १० मैल या वेगाने येणारा हा धूमकेतू म्हणजे तीन हजार अब्ज किलो वजनाचा बर्फाळ खडक आहे आणि ध्वनीच्या वेगापेक्षा ७० पटींनी अधिक वेगवान गतीने तो पृथ्वीवर येऊन आदळणार आहे. तो पृथ्वीच्या जवळ आला की लगेचच कदाचित वादळी वारे, सामुद्री लाटा, अंधारलेपण असे होऊ शकेल. निमिषार्धात १० हजार भूकंप अवघ्या पृथ्वीवर व्हावेत इतका महाजबरदस्त असा तो धक्का असेल. उंच इमारती तर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळतील आणि भले मोठे पर्वतही भुईसपाट होतील. समुद्रात तर इतक्या मोठय़ा लाटा उसळतील की जणू ते पाण्याचे महापर्वत वाटावेत.. हिमालयाएवढे वा त्याहूनही उंच असे जलपर्वत. काही ठिकाणी जमीन मुळापासून उखडली जाईल आणि सुप्त ज्वालामुखी जागृत होतील. खडक वितळू लागतील. ज्या ठिकाणी धूमकेतू आपटेल त्या ठिकाणी प्रचंड मोठे विवर निर्माण होईल, इतके खोल की ज्यूल्स व्हर्नच्या ‘जर्नी टू द सेंटर ऑफ द अर्थ’ची आठवण व्हावी. (पण तशी आठवण काढायला कुणीच असणार नाही आणि असा एक धूमकेतू पृथ्वीवर येऊन आदळला ही बातमी छापणे वा दूरचित्रवाणीच्या कोणत्याही वाहिनीवर ‘लाइव्ह’ दाखवायचा प्रश्नच येणार नाही. धूमकेतूने माजवलेल्या महा-हाहाकाराची ‘एक्सक्लूसिव’ दृश्ये आपल्याकडे आहेत असे कोणताही चॅनल म्हणू शकणार नाही!) एकूणच सर्वत्र इतकी प्रचंड उष्णता निर्माण होईल की जंगले पेटतील, वणव्यांनी वेढलेल्या भागात सूर्याला आव्हान देणारी उष्णता व प्रकाश मानता येईल. सर्व जीवसृष्टी- झाडे, प्राणी, पक्षी, मासे- काही सेकंदात नष्ट होतील. या हाहाकारातून पुन्हा पृथ्वी ‘नॉर्मल’ व्हायला हजारो वर्षे लागतील. त्यानंतर पुन्हा जीवसृष्टी निर्माण होईल की ती पृथ्वीची अखेर असेल? हा प्रश्न १५-२० वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांमध्ये चर्चेला होता. परंतु जर धूमकेतू येणारच असेल तर आपल्याला अंतराळयानातून काही क्षेपणास्त्रे सोडून त्याची दिशा बदलता येईल का? तो धूमकेतूच क्षेपणास्त्रांनी उडवून टाकून तो पृथ्वीवर आदळायच्या आत त्याचे तुकडे तुकडे करता येतील का? एखादे अण्वस्त्र-क्षेपणास्त्र त्या धुमकेतूवर सोडून तो अंतराळातच नष्ट करता येईल का? अशा चर्चा सुरू झाल्या. काही वैज्ञानिक म्हणू लागले की, तेवढी आणीबाणी येणारही नाही कदाचित. कारण पृथ्वीच्या अगदी जवळ येऊन तो निघून जाईल. त्याची कक्षा बदलल्याचे दिसत आहे! परंतु हा धूमकेतू पृथ्वीवर आदळला नाही तरी किमान १० हजार धूमकेतूसदृश उल्का आपल्या सूर्यमालिकेच्या परिसरात भटकत आहेत. म्हणजे मुद्दा आपला धर्म, देश, भाषा यांचे संरक्षण करण्याचा नाही तर पृथ्वीचेच र्सवकष रक्षण करण्याचा आहे. ते अशक्य नाही. कारण माणसाला विश्व-व्यवहारातच हस्तक्षेप करण्याचे सामथ्र्य प्रज्ञा-विज्ञानाने दिले आहे. गरज आहे ती वैश्विक विचाराची आणि विवेकाची!

कुमार केतकर

अस्तित्वाच्या ज्ञानाचा वेध

अस्तित्वाच्या ज्ञानाचा वेध
या स्तंभातून ‘फ्युचरॉलॉजी’चे ज्ञान-परिमाण आम्ही वाचकांना सादर करू इच्छितो। वाचकांनी त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात, इतर संदर्भ द्यावेत, नव्या संशोधनाची माहिती द्यावी, योग्य तेव्हा चर्चा वा वादही घालावेत. कारण विश्वाप्रमाणेच ज्ञानही अथांग आहे.पूर्वी असे गृहीतच धरले जात असे, की भूतकाळ हा ‘निश्चित’ आहे. म्हणजे भूतकाळ बदलू शकत नाही; परंतु भविष्य मात्र अनिश्चित आहे. परंतु दोन-अडीचशे वर्षांत इतिहासशास्त्रात आणि इतिहास संशोधन पद्धतीत इतका ‘विकास’ झाला आहे, की आता भूतकाळही निश्चित असल्याचे गृहीत धरता येत नाही. मग तो इतिहास रामायण-महाभारताचा असो, की दुसऱ्या महायुद्धाचा; पेशवाईचा असो वा फाळणीचा. इतिहासाची इतकी पुस्तके असण्याचे खरे तर कारणच नाही. कारण जे सर्व घडून गेले आहे त्याचीच इतिहासात नोंद होते. त्याच घटनांची उजळणी. मतभेद होतात ते त्या घटनांचा कार्यकारणभाव, कारणमीमांसा आणि प्रसंग-संगती ठरविताना. मग हळूहळू इतिहासातील घटनांची आमूलाग्र पुनर्माडणी केली जाऊ लागते. त्यातूनच न संपणाऱ्या वादांचे मोहोळ उठते. असे म्हणतात, की वर्तमानातील प्रत्येक क्षण भूतकाळात जमा होत असतो आणि येणारा क्षण ‘भविष्या’तून येतायेताच वर्तमानातून इतिहासजमा होत असतो.आपण करीत असलेली प्रत्येक कृती त्या अमूर्त ‘भविष्या’ला आकार देत असते. मग ती कृती व्यक्तिगत असो वा कौटुंबिक, सामाजिक असो वा राष्ट्रीय / आंतरराष्ट्रीय! सर्व देश राज्यघटना तयार करतात ती ‘भविष्या’चा आराखडा डोळ्यासमोर ठेवूनच. जगातील कोणत्याही देशात संपूर्ण विषमतानिर्मूलन झालेले नाही. त्याचप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्यही जनतेला बहाल केले गेलेले नाही. न्याय आणि बंधुत्वभावही कुठेही प्रस्थापित झालेला नाही. पण ही सर्व उद्दिष्टे ‘भविष्या’त साकारता येतील, या विश्वासाने राज्यघटना बनविल्या जातात. ती उद्दिष्टे साध्य करण्यासाठी विविध प्रकारच्या संघटना, पक्ष, संस्था उभारल्या जातात. त्या भविष्याचे ‘स्वप्न’ ठेवूनच अनेक प्रकारच्या व प्रकृतीच्या व्यक्ती त्या संस्थेत, संघटनेत, पक्षात वा चळवळीत सामील होतात. त्या व्यक्ती इतिहासजमा झाल्या तरी संस्था राहतात. त्यातूनच ‘भविष्या’ची हमी वाटू लागते. किंबहुना तशी हमी वा किमान आशा नसेल तर कुणीही काहीच करणार नाही.माणसे बचत करतात वा देश गंगाजळी जमवितात, ती त्या भविष्यासाठीच. नाहीतर प्रत्येकाला हे माहीतच असते, की तो वा ती मर्त्य आहे! मग ती व्यक्ती अब्जाधीश उद्योगपती असो वा सामान्य मध्यमवर्गीय कर्मचारी. शेतकरीसुद्धा भविष्यातील ‘बाजारा’चा अंदाज घेऊनच पिके लावतो. कधी तो अंदाज चुकतो, कधी बरोबर येतो. दीर्घ काळ अंदाज चुकत राहिला आणि त्यामुळे कर्जाचा बोजा वाढत गेला, की भविष्य ‘अंधारमय’ दिसू लागते आणि आशाच संपली, की उमेदही हरपते आणि ती व्यक्ती आत्महत्या करते. परंतु एक माणूस हताश होऊन आत्महत्या करील, ‘समाज’ व ‘संस्था’ एकाच वेळेस कधीही आत्महत्या करीत नाहीत. संस्था कालबाह्य़ होतात तेव्हा बंद पडतात, पण तीच किंवा नवी उद्दिष्टे घेऊन नव्या संस्था निर्माण होतात. परंतु समाज हतबल झाला तरी तो सामूहिकरीत्या आत्महत्येचा निर्णय घेत नाही. याचे मुख्य कारण त्या अमूर्त भविष्याबद्दल आशा असते म्हणून. परंतु तशी आशा असणे म्हणजे खात्री असणे नव्हे.नियोजन आयोग असोत किंवा कॉर्पोरेट प्लॅनर्स असोत, त्यांना ‘वर्तमानातील’ घटकांचा, भूतकाळातील संदर्भाचा / अनुभवांचा आधार घेऊनच भविष्याचे नियोजन करावे लागते. नियोजन आयोग वा कॉर्पोरेट प्लॅनर्स वा मिलिटरी स्ट्रॅटेजिस्ट्स त्यांच्या भविष्याचा आलेख काढताना हस्तसामुद्रिकाला वा कुंडलीतज्ज्ञाला विचारीत नाहीत. त्यापैकी एखाद्याचा तशा भाकीत शास्त्रावर म्हणजे ज्योतिषावर विश्वास असेलही; पण कोणतेही बोर्ड ऑफ डायरेक्टर्स किंवा प्लॅनिंग कमिशन वा युनोसारखी संस्था ज्योतिषाचा आधार घेत नाहीत. त्यांना आधारभूत असतात ते वर्तमानातील घटक आणि भूतकाळातील अनुभव.भूगोल, लोकसंख्या, हवामान, अर्थस्थिती, उपलब्ध तंत्रज्ञान, नवतंत्रज्ञानाच्या शक्यता, जनमानस, समाजातील अंतर्विरोध, पूरक व प्रतिकूल घटक, आरोग्य, परंपरा, संभाव्य धोके, आपली शक्तिस्थाने, उणिवा, परिस्थितीतून निर्माण झालेल्या संधी हे व असे अनेक संदर्भ विचारात घेऊन भविष्य-नियोजन केले जाते. भविष्य वेध आणि भविष्य नियोजन यात फरक आहे. काय काय होऊ ‘शकते’ हे भविष्य वेधशास्त्र (फ्युचरॉलॉजी) सांगते आणि काय काय ‘करता येईल’ हे भविष्य नियोजनशास्त्र सांगते. जगातील सर्व सैन्यदलांमध्ये ‘पॉसिबल सिनारिओ बिल्डिंग’ केले जाते. म्हणजे युद्ध झाल्यास केव्हा होईल, कोणकोणत्या टप्प्यातून ते युद्ध जाईल, किती काळ ते लढता येईल, त्यातून काय साध्य होईल, की माणूसहानी होईल, इतर नुकसान काय होऊ शकेल, त्याचे काय व किती दूरगामी परिणाम होतील या व अशा गोष्टींचा विचार त्या संभाव्य ‘सिनारिओज्’मध्ये केला जातो. त्या सर्व शक्यता असतात. युद्ध झालेच नाही तर नुसताच ‘सिनारिओ’ राहतो. पण ‘सिनारिओ’च नसेल तर आकस्मिकपणे युद्ध सुरू झाल्यावर, म्हणजे आक्रमण एकदम आल्यावर गोंधळ उडेल. (जसा गोंधळ बऱ्याच प्रमाणात मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला तेव्हा झाला!)परंतु अशा शक्यता किंवा असे ‘सिनारिओज्’ फक्त युद्धासंबंधातच असतात असे नाही. दैनंदिन व्यक्तिगत जीवनातही आपल्याला सिनारिओंचा विचार करावाच लागतो. लग्न करणे, नोकरी मिळणे, धंदा सुरू करणे, मोठी गुंतवणूक करणे, जागा घेणे, घर बांधणे- अशा सर्व बाबींमध्ये भविष्य वेधशास्त्र आणि भविष्य नियोजनशास्त्रच आपण वापरत असतो. जाणीवपूर्वक वा अजाणता.जेव्हा ते जाणीवपूर्वक, उद्दिष्ट ठरवून, विशिष्ट कालमर्यादेत साध्य करण्याचा विचार होतो तेव्हा त्याचे नाव भविष्य नियोजन हे असते अशा प्रकारचे / काळ विभाजन (म्हणजे भूतकाळ, वर्तमान, भविष्यकाळ) हे मानवी व्यवहाराला अत्यावश्यक आहे. त्याशिवाय, ज्याला आपण ‘विकास’, ‘प्रगती’, ‘व्यवहार’ या गोष्टी शक्य नाहीत त्या गोष्टी नसतील तर आपल्या जीवनात आणि जीवसृष्टीतील इतर प्राणिमात्रात काहीच फरक नसेल. वाघ-सिंहांना, हत्ती-ऊंटांना वा चिमणी-कावळ्यांना असे काळवेळाचे भान नसते. त्यांना काल-आज-उद्या, किंवा गेल्या वर्षी, पुढील वर्षी, २५ वर्षांनी असे कालमापन करता येत नाही.तसे पाहिले तर आपल्या विश्वरचनेचा इतिहास अभ्यासतानाही आपल्याला या कालमापनपद्धतीचा उपयोग होतो. हे विश्व साडेतेरा अब्ज वर्षांपूर्वी जन्माला आले, असे आज गणिताने सिद्ध झाले आहे. अशी अनेक विश्व आहेत हेही सिद्ध झाले आहे. परंतु हे विश्व काळातीत आणि अवकाशातीत आहे. म्हणूनच खगोलशास्त्राच्या अभ्यासात व संशोधनात या काळातीततेलाच काळाचे परिणाम (व गणित) देऊन त्याचा अभ्यास करावा लागते. या अथांग विश्वाचा अभ्यास करण्यासाठी, जे उपग्रह, दुर्बिणी आणि विविध शास्त्रीय उपकरणे आपण अवकाशात, अगदी आपल्या सूर्यमालिकेपलीकडे, त्या अचाट विश्वव्यवस्थेचा शोध घेण्यासाठी पाठवितो, त्या संशोधनाचे नियोजन या भूतलावर होते. त्या एकूण अर्थकारणाचाच तो भाग असतो. म्हणजेच मला अथांगाचा शोध घेण्यासाठी ‘थांगा’चे भान आवश्यक असते. आणखी पाच अब्ज वर्षांनी आपला सूर्य (या जीवसृष्टीचा निर्माता, तारणकर्ता) जळून जाणार आहे. सूर्याच्या या ‘अंता’चे भान त्या सूर्याला नाही, पण आपल्याला आहे.आपल्याला ते भान येण्यासाठी ज्या प्रकारची अर्थरचना, समाजकारण, राजकारण करावे लागते त्यातूनच आधुनिक विज्ञान-तंत्रज्ञान व्यवस्थापनाचा आशय आणि आकार ठरतो. त्यातूनच ‘फ्युचरॉलॉजी’ या ज्ञानशाखेचा जन्म झाला. ‘फ्युचरॉलॉजी’ म्हणजे भविष्यवेध शास्त्रामुळेच आपल्याला ज्वालामुखी, भूकंप, सुनामी, झंझावात, धूमकेतू, उल्कापात आदी गोष्टी कळतात. म्हणजेच ‘ज्ञान’ही या र्सवकष समाजकारणावर अवलंबून आहे. थोडक्यात, ‘फ्युचरॉलॉजी’ हा विषय सर्व ज्ञानशाखांना वेढणारा आणि व्यापणारा आहे. या जगातील हा ‘पुत्र’ पराधीन (लौकीक अर्थाने) राहायचा नसेल तर हे भविष्य वेधाचे र्सवकष शास्त्र समजावून घेणे आवश्यक आहे.‘फ्युचरॉलॉजी’च्या अभ्यासातून फक्त विश्वरचनेचे ज्ञान होत नाही तर आपल्या कुटुंबव्यवस्थेचे, आपल्या आदर्शाचे, मूल्यांचे, विचारांचे, भाव-भावनांचे- आपल्या अस्तित्वाचेच ज्ञान व्हायला मदत होते.या स्तंभातून ते ज्ञान-परिमाण आम्ही वाचकांना सादर करू इच्छितो. वाचकांनी त्यावर प्रतिक्रिया द्याव्यात, इतर संदर्भ द्यावेत, नव्या संशोधनाची माहिती द्यावी, योग्य तेव्हा चर्चा वा वादही घालावेत. कारण विश्वाप्रमाणेच ज्ञानही अथांग आहे.

कुमार केतकर

कोलंबस ते ओबामा

कोलंबस ते ओबामा
बराक हुसेन ओबामांच्या शपथविधी समारंभाच्या वाद्यवृंदात एक ज्यू होता, एक चिनी-अमेरिकन आणि एक कृष्णवर्णीय। जिने कविता म्हटली तीही कृष्णवर्णीय होती. ओबामांच्या मंत्रिमंडळात आणि सल्लागारांमध्ये भारतवंशीय आहेत, जपानी- अमेरिकन आणि ‘हिस्पॅनिक’ आहेत. कृष्णवर्णीयांमध्ये मुख्यत: दोन प्रकार आहेत. ज्यांना आफ्रिकेतून अक्षरश: पायांना शृंखला बांधून गुलाम म्हणून आणले आणि ४०० वर्षे अर्थातच जे तेथेच राहिले, त्यांचे आजचे वंशज आणि विस्तारलेली कुटुंबे असे कृष्णवर्णीय आणि जे सुमारे ४० वर्षांंत आपणहून आफ्रिकेतून अमेरिकेत स्वेच्छेने नोकरी-व्यवसाय-शिक्षणासाठी आले व स्थायिक झाले असे ‘ब्लॅक्स’, हे वेगवेगळ्या वारशाचे व संस्कृतीचे आहेत. त्यांच्यातला समान घटक अर्थातच हा की, त्या सर्वाचा ‘मूळ’ खंड आणि वंश आफ्रिकन आहे. तीच गोष्ट हिस्पॅनिक्सबद्दल, पण वेगळ्या संदर्भात म्हणता येईल. कोलंबस हा मूळचा स्पॅनिश, ज्याने १२ ऑक्टोबर १४९२ रोजी अमेरिका खंडात (आताच्या बहामात) अतिशय साहसी- सामुद्री प्रवासानंतर पाऊल ठेवले. त्यानंतरची काही वर्षे स्थानिक अमेरिकन लोकांना (जे ‘रेड इंडियन्स’ म्हणून ओळखले जात) हद्दपार करून हळूहळू युरोपियन वसाहती तेथे वसू लागल्या. मूळच्या ‘नेटिव अमेरिकन्स’वर अनन्वित अत्याचार केले गेले. मोठय़ा प्रमाणावर त्यांचे हत्याकांड केले गेले आणि बळाच्या जोरावर अमेरिका नावाचा देश निर्माण होऊ लागला. पूर्वीपासून अमेरिकेत आलेले व स्थायिक झालेले स्पॅनिश आणि शे-दीडशे वर्षांत मेक्सिको, क्युबा व दक्षिण अमेरिकेतील इतर देशातून आलेले स्पॅनिश या सर्वाना स्थूलपणे ‘हिस्पॅनिक’ म्हणून ओळखले जाते. ५० वर्षांंत क्युबा व मेक्सिकोतून बेकायदेशीरपणे घुसलेले आणि पुढे रीतसर नागरिकत्व मिळविलेले लाखो स्पॅनिश भाषिक हेही त्याच समूहाचे. परंतु हिस्पॅनिक किंवा एकूण सर्व मूळचे स्पॅनिश भाषिक हे ‘उपरे’ नाहीत. कारण फ्लॉरिडा ही पहिली ‘अधिकृत’ युरोपियन वसाहत १५६५ सालीच स्थापन झाली. पाठोपाठ इंग्लिश, फ्रेंच, डच, जर्मन, स्वीडिश हे सर्वजण अमेरिकेत आले. अस्ताव्यस्त पसरलेली, बऱ्याच भागात सुपीक आणि निसर्गसमृद्ध जमीन पाहून हे युरोपियन्स हरखून गेले होते. त्या काळात खुद्द युरोपियन देश हे दुष्काळ, यादवी आणि आपापसातली युद्धे यामुळे ग्रस्त होते. साधारणपणे याच काळात म्हणजे १४९० ते १८९० या काळात युरोपियन वसाहती जगभर वसवल्या गेल्या होत्या. वास्को द गामा भारतात १४९८ साली आला. ईस्ट इंडिया कंपनी १६०० च्या आसपास आणि अधिकृतपणे राणीचे भारतावर राज्य प्रस्थापित झाले, ते १८५८-१८७४ या काळात (म्हणजे राणीचा जाहीरनामा ते राज्याभिषेक). अमेरिकेत जसे आफ्रिकेतून गुलाम आणले गेले तसे भारतात आणले गेले नाहीत. अमेरिकेत प्रथम शेती व नंतर रेल्वे रुळ आणि त्यानंतर उद्योग यात काम करायला मजूर नव्हते. नेटिव अमेरिकन मजूर व्हायला तयार नव्हते आणि त्यांनी तर या आक्रमक युरोपियनांविरुद्ध युद्धच पुकारले होते. (ज्यात त्यांचा विदारक पाडाव झाला.) भारतात मजूर मिळायचा प्रश्न नव्हता. म्हणजे भारतात बाजारपेठ, हक्काची वसाहत आणि पुढे सत्ता हे सर्व ब्रिटिशांनी काबीज केले. भारतात होती सुमारे साडेसहाशे संस्थाने. जी प्रथम लॉर्ड डलहौसीने खालसा केली आणि ‘ब्रिटिश इंडिया’चा नकाशा तयार होऊ लागला. आजचा अमेरिका आणि ४०० वर्षांपूर्वीचा यांच्या भूगोलातही फरक आहे. ज्याप्रमाणे फ्लॉरिडात पहिली स्पॅनिश वसाहत आली, तशी व्हर्जिनियात पहिली ब्रिटिश वसाहत उभी राहिली. डचांनी ‘न्यू नेदरलँड’ आणि स्वीडिशांनी ‘न्यू स्वीडन’ अशा वसाहती वसवल्या. परंतु ब्रिटिशांनी बहुतेक प्रांत आपल्या कब्जाखाली आणला होता. ज्याला आपण अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध म्हणून संबोधतो, ते युद्ध नेटिव अमेरिकनांच्या स्वातंत्र्यासाठी नव्हते तर युरोपातील अनेक ठिकाणांवरून अमेरिकेत आलेल्या व स्थायिक झालेल्या अमेरिकनांचे ब्रिटिश राजवटीविरुद्ध पुकारलेले युद्ध होते. ते ब्रिटिश सत्तेच्या विरोधात असल्यामुळे फ्रान्स, स्पेनने ‘अमेरिकनांना’ पाठिंबा दिला. अमेरिकन वसाहतींनी १७७६ मध्ये स्वतंत्र झाल्याचे घोषित केले. त्यानतंर ११ वर्षांंनी अमेरिकेची नवी घटना तयार केली गेली. या घटनेच्या शिल्पकारांनी स्वातंत्र्य संकल्पनेची आणि प्रत्येकाला सुखी, स्वतंत्र जीवन साकारायचा अधिकार असल्याची घोषणा केली. ज्याचा उल्लेख ओबामांनी शपथविधीनंतरच्या भाषणात केला. जॉर्ज वॉशिंग्टन या पहिल्या अध्यक्षांनी १७८९ साली, म्हणजे बरोबर २२० वर्षांंपूर्वी शपथ घेतली. त्यावेळचा अमेरिकेचा भूगोल म्हणजे फक्त १३ राज्यांचा (वसाहतींचा) होता. पुढे या स्वतंत्र अमेरिकेने फ्रान्सकडून लुईसियाना, स्पेनकडून फ्लॉरिडा ही राज्ये विकत घेतली. वसाहती विकत घेणे, भेट वा आंदण देणे, सौद्यात आणणे या त्यावेळच्या विस्तारवादी-वसाहतवादी काळात मान्यताप्राप्त गोष्टी होत्या, जसे मुंबई बेट पोर्तुगीजांनी इंग्रजांना एका विवाहसमारंभात आंदण म्हणून देऊन टाकले! ‘स्वतंत्र’ अमेरिकेने हळूहळू विस्तार सुरू केला आणि एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत अमेरिकेतील राज्यांची संख्या १३ वरून ४५ पर्यंत गेली आणि १८९० पर्यंत ती ५० झाली. काही राज्य ‘िजकून’, काही ‘विकत घेऊन’, काही ‘भेटीत’ तर काही ‘सौदा करून’ घेतलेली असल्यामुळे प्रत्येक राज्यातील स्वायत्त सामाजिक परंपरा, कायदे, नियम तसेच ठेवले गेले. त्यामुळेच ‘युनायटेड’ स्टेटस् ऑफ अमेरिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रत्येक राज्यात अनेक परस्परविरोधी कायदे आहेत. १८५० नंतर वाद निर्माण झाला होता, तो कृष्णवर्णीयांच्या गुलामगिरीसंबंधात. दक्षिणेतील ११ राज्यांनी जाहीर केले की ते गुलामगिरी नष्ट करणार नाहीत. उत्तरेकडील राज्यांनी गुलामगिरी नष्ट करायचा आग्रह चालू ठेवला तर त्यांना यादवी युद्धाला तोंड द्यावे लागेल. १८६० साली अब्राहम लिंकन अध्यक्ष म्हणून निवडमून आल्यानंतर त्या यादवीला तोंड फुटले. ‘कॉन्फेडरेट स्टेटस् ऑफ अमेरिका’ असे म्हणविणाऱ्या दक्षिणेतील राज्यांच्या आघाडीचा त्यात पराभव झाला आणि अधिकृतपणे गुलामगिरी नष्ट झाल्याचे घोषित केले गेले. परंतु काळ्यांच्या म्हणजेच निग्रोंच्या, म्हणजेच ज्यांना ‘आफ्रिकन-अमेरिकन’ म्हणून ओळखले जाते, त्यांच्या नागरिकत्वाला अधिष्ठान दिले गेले. तरीही अल्बामा, मिसिसीपी, व्हर्जिनिया अशी काही राज्ये होती की ज्यांनी अगदी ५० वर्षांंपूर्वीपर्यंत ‘ब्लॅक्सना’ नागरी समानता बहाल केली नव्हती. ‘मिसिसीपी बर्निंग’, ‘इन द हीट ऑफ द नाईट’ असे अनेक हॉलीवूडनिर्मित चित्रपट आहेत की ज्यामध्ये ब्लॅक्सवरील अत्याचार, त्यातून निर्माण झालेले दंगे, जाळपोळ, लुटालूट यांचे चित्रण आहे. जॉन केनेडी १९६१ साली अध्यक्ष झाले आणि त्यांनी अब्राहम लिंकनना अभिप्रेत असलेली समानता प्रत्यक्षात आणण्याचा निर्धार केला. परंतु १८६५ मध्ये यशस्वी यादवीनंतर, अब्राहम लिंकन यांची हत्या केली गेली, त्याचप्रमाणे १९६३ साली जॉन केनेडी यांचा खून झाला. त्यानंतर त्यांचे बंधू रॉबर्ट (बॉबी) केनेडी आणि अध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी हा समानतेचा मुद्दा नेटाने पुढे नेण्याचे ठरविले. त्याला उग्र वंशवाद्यांचा तीव्र विरोध होता. तरीही ३ ऑक्टोबर १९६५ रोजी लिंडन जॉन्सन यांनी जगप्रसिद्ध लिबर्टी पुतळ्याच्या पायाशी ऐतिहासिक कायदा जाहीर केला-जो कायदा तेव्हा केला नसता तर आज ओबामा अध्यक्ष होऊच शकले नसते. त्या कायद्याचे नाव आहे ‘इमिग्रेशन अ‍ॅन्ड नॅशनॅलिटी अ‍ॅक्ट’. या देशव्यापी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे कृष्णवर्णीय, समाजाच्या आणि राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊ लागले. पण त्या समानतेच्या विरोधात असलेल्या वंशवादी गोऱ्यांनी अहिंसावादी मर्टिन ल्यूथर किंग यांची १९६८ साली हत्या केली. बरोबर ४० वर्षांंपूर्वी. सनदशीर मार्गाने ‘ब्लॅक्स’ना अमेरिकेत न्याय मिळू शकणार नाही, असे वाटून काही लढाऊ तरुणांनी ‘ब्लॅक पॅन्थर्स’ ही संघर्षवादी संघटना बांधली. (आपल्याकडील ‘दलित पॅन्थर’ त्यांच्याच अनुकरणातून पुढे आले.) ४० वर्षांंत अमेरिकेचा समाज आमूलाग्र बदलला आहे. विविध वंशांच्या लोकसंख्येने, वृत्तीने आणि विचारानेही बदलला आहे. केवळ १३ टक्के ब्लॅक्स असूनही एकूण मतदानाच्या ६६ टक्के मते ओबामांना मिळाली. आजच्या घडीला अमेरिकेत १४ टक्के ‘हिस्पॅनिक’ आहेत आणि पाच टक्के एशियन (म्हणजे भारतीय, चिनी, जपानी, इंडोनेशियन इ. धरून) नजीकच्या भविष्यकाळात (२०५० साली) गोऱ्यांची आजची संख्या ६७ टक्क्यांवरून ४७ टक्क्यांपर्यंत जाईल, असे लोकसंख्याशास्त्र सांगते. परंतु ब्लॅक्सच्या संख्येत मात्र फारशी वाढ होणार नाही. वाढणार आहे ती हिस्पॅनिक्सची संख्या- १४ टक्क्यांवरून २९ टक्क्यांपर्यंत. असेही मानले जाते की अमेरिकेची अधिकृत दुसरी राष्ट्रभाषा स्पॅनिश असेल! फ्लॉरिडा, कॅलिफोर्निया, टेक्सास अशा अनेक राज्यातील फलक, सूचना व घोषणा स्पॅनिश असतात. काहीजण अमेरिकेला ‘मेल्टिंग पॉट’ (अनेक धातू ढवळणारे पात्र) असे म्हणतात. भूतकाळातील अनेक वर्षे वंशवादाने भडकलेल्या अमेरिकेतील भविष्यकाळ मात्र ‘सर्व-वंश-धर्म-समभाव’ या विचाराने घडणार. ‘द क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’ या विघटनवादी आणि विघातक अमेरिकन प्रबंधाला बुश यांच्या कारकीर्दीत प्रतिष्ठा मिळाली होती. ओबामा यांनी शपथविधीनंतरच्या पहिल्याच भाषणात ‘ख्रिश्चन आणि मुस्लिम, ज्यू आणि हिंदू आणि सर्व नास्तिक’ असे सर्वसमावेशक आवाहन केले होते. विनोबांनी सांगितलेला ‘जय जगत’चा विचार त्यात समाविष्ट होता. महात्मा फुलेंनी अब्राहम लिंकन यांना त्यांचे वाङ्मय अर्पण करायचा विचार केला, तेव्हा रेडिओ, टीव्ही, मोबाइल, इंटरनेट असे काहीही नव्हते, तरी लिंकन यांचा विचार फुलेंपर्यंत पोहोचला व भावला होता. आता ओबामांनी लिंकन यांची बायबलची प्रत हातात घेऊन गांधीजी व विनोबा यांच्या विचाराचा पुनरुच्चार केला आहे!

कुमार केतकर

मानसापरी मानूस। राहतो वेड जाना ।अरे व्हतो छापीसनी। कोरा कागद शहाना ।।

मानसापरी मानूस। राहतो वेड जाना ।अरे व्हतो छापीसनी। कोरा कागद शहाना ।।
स्मृती हरपल्यानंतर लहानपणी आत्मसात केलेली भाषाही तिच्याबरोबर जायला हवी, पण तसे होत नाही. शब्दांचे अर्थ कधी कधी लुप्त होतात, पण शब्दोच्चार आणि स्थूल स्वरूपात त्यातील भावना मात्र गडप होत नाहीत. सध्या वैज्ञानिकांमध्ये, विशेषत: मेंदूवर संशोधन करणाऱ्या न्यूरोसायन्टिस्ट कम्युनिटीत हा विषय अगदी आघाडीवर आहे. भाषातज्ज्ञ आणि मनोवैज्ञानिकही हे रहस्य भेदू पाहात आहेत. स्मृती आणि भाषा यांचा काय संबंध आहे? आणि भाषा व जीवन एकमेकांशी कसे निगडित झाले आहेत? या प्रश्नांचा थेट संबंध ‘सिव्हिलाझेशन’शी आहे. म्हणजेच माणसांच्या उत्क्रांती, प्रगती आणि संस्कृतीशी आहे.
तसे पाहिले तर सर्व प्राण्यांची, पक्ष्यांची, माशांची अगदी मुंगी-कीटकांचीही ‘भाषा’ असतेच. ध्वनी हे भाषेचे वाहन मानले जात असले तरी ध्वनिविरहित भाषा असतेच. बहिऱ्या-मुक्यांची भाषा हावभाव व देहबोलीतून व्यक्त होते. मुंगी-कीटक, साप व इतर सरपटणारे प्राणी यांच्या भाषेचे वहन गंध, नजर, स्पर्श, कंपसंवेदना, रंग इ. स्वरूपात असते. वनस्पतीशास्त्रज्ञ तर असे मानतात, की वृक्षवल्लींचीही भाषा असते. सर्व प्राणी व वनस्पतीसृष्टी संगीताला, सूर-तालांना प्रतिसाद देतात हे तर आता सिद्धच झाले आहे. वृक्षवल्ली-झाडे-फुले त्यांची प्रेमाने निगा करणाऱ्यांना प्रतिसाद देतात हाही अनुभव आहेच. म्हणजेच भाषेची अनेकविध रूपे आहेत.माणसाच्या भाषेचा जसा विकास झाला आहे, त्या भाषांना लिपीरूप प्राप्त झाले आहे, त्या भाषांचे संगणकीकरण झाले आहे आणि भाषा या माध्यमाद्वारे तत्त्वज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा र्सवकष विकास झाला आहे, तसा विकास जीवसृष्टीतील अन्य कुणी केलेला नाही. पक्ष्यांचे आवाज, त्यांच्या घरटय़ांच्या पद्धती, अंडी घालणे-उबविणे आणि पिलांची काळजी घेणे असे सर्व काही जेनेटिकली ‘कोडेड’ असते. म्हणजे तीही भाषाच. तशी ‘जेनेटिक भाषा’ सर्वच जीवसृष्टीत निसर्गाने रुजविलेली आहे. म्हणजे त्यांच्या ‘जेनेटिक मेमरी’त ती भाषा व ते ज्ञान ‘प्रोग्रॅम’ केलेले आहे. त्यामुळेच काही संगणकतज्ज्ञ, सॉफ्टवेअर डिझायनर्स आणि न्यूरोसायंटिस्ट आणि अर्थातच फ्युचरॉलॉजिस्ट असे मानतात, की माणूसही काही प्रमाणात ‘प्रोग्रॅम’ केलेला प्राणी आहे. त्या प्रोग्रॅमचा म्हणजे जेनेटिक विधिलिखिताचा तो सचेतन आविष्कार आहे. याचा दुसरा अर्थ हा, की प्रयोगशाळेत ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ तयार करता येईल. माणसाप्रमाणे वा माणसाहून अधिक बुद्धिमान व सक्षम असा कॉम्प्युटर बनविता येईल. आयझ्ॉक अ‍ॅसिमोव, ऑर्थर सी क्लार्क आणि इतर बऱ्याच विज्ञान लेखकांनी असा ‘भाषाप्रभु’, ‘दीर्घायुषी’ (कदाचित ‘अमर’सुद्धा!) आणि इंटेलिजण्ट कॉम्प्युटर ‘एमआयटी’ या मॅसेच्युसेट्स्मधील प्रयोगशाळांमध्ये बनवायलाही घेतला आहे. या आर्टिफिशियली म्हणजे कृत्रिमरीत्या बनविलेल्या संगणक मानवाला भूतकाळ-वर्तमानकाळ-भविष्यकाळाचेही भान असेल आणि मुख्य म्हणजे तो माणसाशी चर्चा-संवाद करू शकेल-अगदी गप्पाही मारू शकेल, असा विश्वास या तंत्रज्ञांना आहे. हा आर्टिफिशियल प्राणी त्याला जी भाषा ‘शिकविली’ जाईल त्या भाषेत बोलेल, असे त्यांचे मत आहे म्हणजेच भाषा ही गोष्ट स्वतंत्रपणे शिकता-शिकविता येते. ‘प्रोग्रॅम’ही करता येते. विशेष म्हणजे अगदी १०० टक्के निरक्षर व्यक्तीही भाषा आत्मसात करतेच. त्यासाठी साक्षरता वा शिक्षणाचीही गरज लागत नाही. शिक्षणामुळे भाषासमृद्धी, शब्दसंख्या, विविध विषयातील आशय समजणे शक्य होते हे खरे पण मूलत: भाषा शिकण्यासाठी साक्षरता व शिक्षण गरजेचे नसते.आपण भाषा शिकतो ती घरात, शेजारी-पाजारी, समाजात वावरत असताना. जगातल्या सर्व भाषा या कुणाच्या ना कुणाच्या मातृभाषाच (म्हणजे मातृबोली) असतात. जन्माला आलेल्या मुलाचा सर्वात जास्त सहवास आईबरोबर असतो व तिच्याकडून तो शब्द शिकत जातो (जे शब्द सुरुवातीस फक्त ध्वनी म्हणून त्याच्या कानावर पडलेले असतात.) त्या शब्दांचे अर्थ (आणि स्वार्थ!) हावभाव, स्पर्श, अनुभव यातून प्रकट होत जातात. लहान मुलांची शिकण्याची गती प्रचंड असते. इतकी की आई-वडील हे वेगळ्या भाषांमधून आलेले असले तर त्या दोघांच्या भाषा, त्याचप्रमाणे शेजार आणखी तिसऱ्या भाषेचा असेल तर ती भाषा, शाळेत गेल्यावर तेथील माध्यम इंग्रजी वा अन्य कुठचे असल्यास ती भाषा आणि बहुसंख्य विद्यार्थी आणखी चौथ्याच भाषेचे असतील तर ती भाषाही वय, वर्षे एक ते नऊ या वयोगटात झपाटय़ाने आत्मसात होते.जन्माला आलेले मूल कोणत्या ‘भाषेत’ रडते? मराठी मूल मराठीत, तामीळ मूल तामीळ भाषेत, हिंदी भाषिक मुले हिंदीत रडत नाहीत; वा चिनी मुले चिनी भाषेत आणि जर्मन मुले जर्मन भाषेत रडत नाहीत. म्हणजेच त्या वेळेस भाषा आत्मसात व्हायची असते. (आता शास्त्रज्ञ असे मानतात, की लहान मुलाच्या कानावर तेव्हाच सूर-ताल पडले तर त्याचा कान सूरसिद्ध होऊ लागतो. अर्थातच पुढे त्याकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले व रियाज केला तरच तो वा ती संगीत क्षेत्रात जाऊ शकेल. केवळ बालपणीच्या सूर-तालाच्या भांडवलावर नव्हे.) साधारणपणे पहिली दीड-दोन वर्षे लहान मुलांचे भाषा शिक्षण असे ‘अनौपचारिक’पणे होत असते. पण तेव्हाच त्या भाषेची घडी मनात पक्की बसू लागते. सर्वसाधारणपणे ती भाषा स्मृतीतून पूर्णपणे पुसली जात नाही. विशेषत: वयाच्या नवव्या वर्षांपर्यंत जर मातृभाषेतच शिक्षण झाले आणि परिसर, शेजार व शाळा मातृभाषेतच असेल तर त्या शब्दकळेला पक्क्या व स्थिर स्मृतीत मेंदू ठेवून देतो. एक प्रकारची ‘हार्ड डिस्क.’ (गेल्या शनिवारच्या ११ जानेवारी- लेखातील ‘एचएम’ने पूर्णपणे स्मृती गमाविल्यानंतरही तो जुजबी संवाद करू शकायचा, याचे कारण त्याची वयाच्या १६ व्या वर्षांपर्यंतची स्मृती शाबूत होती.)जगात अशा किती भाषा व बोली आणि लिपी वा चित्रलिपी, चिन्हभाषा आहेत? मानववंशशास्त्रज्ञ, भाषातज्ज्ञ आणि समाजशास्त्रज्ञ या विषयावर प्रचंड खल करीत आहेत. सर्वच भाषांना लिपीबद्ध केले गेलेले नाही. व्हिएतनामी भाषा रोमन लिपीत व फ्रेंच वळणाने लिहिली जाते. व्हिएतनामवर फ्रान्सची दीर्घकाळ अधिसत्ता होती, त्यामुळेच तीच लिपी तेथे प्रचलित झाली. म्हणजे फ्रेंचांना व्हिएतनामी भाषेतील (पण रोमन लिपीतील) वृत्तपत्र वाचता येईल, असे नव्हे किंवा व्हिएतनामी जनतेला आपसुक फ्रेंच येईल असेही नव्हे. (जगातील सर्व भाषांचे असे रोमन लिपीकरण केले जावे, अशी मोहीमही आहे. मधुकर गोगटे तर मराठी भाषेचे रोमनीकरण करायची चळवळ ‘अकेला चलो रे’च्या तडफेने करीत आहेत. मोबाईल फोन आल्यावर लाखो मराठी, माणसे या गोगटेप्रणीत रोमन मराठीतच ‘एसएमएस’ करू लागली आहेत.) जगातील सुमारे १०,००० अधिकृत भाषा (ज्यांची मानववंशशास्त्रज्ञांनी नोंद करायला घेतली आहे आणि ज्यांना लिपी आहे अशा भाषा) आणि सुमारे दोन लाख बोली (ज्यात संमिश्र भाषा आविष्कार आहे, अशा धरून) आहेत.अगदी सुरुवातीचा मानव, म्हणजे उत्क्रांतीच्या शिडीवरील एप्सनंतरचा असे मानले तर त्याची भाषा म्हणजे विविध प्रकारचे ध्वनी. इतर जंगली प्राणी आणि हा पहिला-वहिला मानव यांच्यात तेव्हा फारसा फरक नव्हता. या मानवाचा मेंदू विकसित होता, तो दोन पायांवर चालू लागला होता आणि हाताची पाच बोटे, विशेषत: अंगठा अतिशय कौशल्याने वापरू शकत होता. टारझनच्या कथेत जो परिसर असतो तसाच माणसाचा परिसर (आणि परिवारही) होता. परंतु माणसाची ‘मानसिक’ आणि ‘सामाजिक’ अवस्था त्याच्या विशिष्ट शारीरिक स्थितीमुळे बदलू लागली. तो इतर प्राण्यांपेक्षा वेगळा असल्याचे त्याला जाणवू लागले. त्याच्या मुखातून येणारे ध्वनी आणि त्याची देहबोली यात वैविध्यता येऊ लागली. त्यातूनच समान अर्थाच्या ध्वनीचे संकलित रूप आकार घेऊ लागले. त्या संयुक्त ध्वनी-समुचयातून शब्द निर्माण होऊ लागले. परंतु त्या विशिष्ट टोळीसदृश माणसांमध्ये एका ध्वनी-समुचयाचा एकच अर्थ तयार झाला नाही तोपर्यंत समानअर्थी भाषा तयार झाली नाही.भाषेचे मुख्य वैशिष्टय़ हेच आहे, की कोणताही शब्द उच्चारणाऱ्याला त्या शब्दोच्चाराचा तोच अर्थ ऐकणाऱ्यापर्यंत पोहोचला जातो आहे, अशी खात्री वाटावयास हवी. जोपर्यंत तशा प्रकारचा ध्वनी-शब्दरूप संवाद सुरू होत नाही तोपर्यंत भाषा विकसित होत नाही.जगाच्या निरनिराळ्या भागात (सुरुवातीला मुख्यत: इथिओपिया व टांझानिया या आफ्रिका खंडातील भागात) ज्या टोळ्या वावरत होत्या त्यांच्यात असे ध्वनी-शब्द-सादृश्य होत गेले आणि बोलीभाषेचा विकास होत गेला. साहजिकच जितक्या टोळ्या तितक्या बोलीभाषा. नागालँडमध्ये तर एका टोळीची बोली दुसऱ्या टोळीला समजेलच अशी स्थिती नसे. तीच गोष्ट आफ्रिकेत. गुहांमध्ये विशिष्ट चिन्ह व चित्र काढून ध्वनी व शब्दांना आकार दिले जाऊ लागले आणि चित्रलिपी तयार होऊ लागली. परंतु कुणीही माणूस लिपी वाचता आली तरी शब्दोच्चार करू शकेलच असे नाही. त्यासाठी सामाजिक व्यवहार आवश्यक आहे, प्रत्यक्ष संवाद व देवाणघेवाण आवश्यक असते. त्याशिवाय भाषेचा विकास होऊच शकत नाही.भाषा निर्मितीला सुमारे १५ लाख वर्षांपूर्वी सुरुवात झाली असे मानले तर प्राथमिक चित्र लिपीला साधारणपणे पाच लाख वर्षांपूर्वी. परंतु हावभाव व ध्वनीपासून शब्द, शब्दापासून समानअर्थी ध्वनीसमुचय, त्यातून ‘वाक्य’, नंतर शब्दांची अर्थपूर्ण साखळी, नंतर लिपी. संपूर्णत: ‘सिद्ध’ स्वरूपात लिपीचा जन्म तर २२ हजार वर्षांपूर्वी ‘मेसापोटेमियात, टीग्रीस आणि यूफ्रेटिस नद्यांच्या खोऱ्यात म्हणजे अरबस्तानात झाला असे आता मानवशास्त्रज्ञ मानतात. गेल्या २२ हजार वर्षांत सुमारे १० हजार लिपी जन्माला आल्या. त्यापैकी काही लयाला गेल्या. कित्येक बोलीभाषाही नाहीशा झाल्या. लिपी सिद्ध झाल्यावर ‘हस्तलिखिते’ तयार झाली. त्यानंतर कित्येक हजार वर्षांनी लाकडी ‘छापे’. छपाईचा शोध लागून सहाशे वर्षेच होत आली आहेत. छपाईद्वारे पुस्तके, मग वृत्तपत्रे आणि आता संगणक. हे सर्व अगदीच अलीकडचे. ज्या भाषेचा व लिपीचा जन्म, विस्तार व विकास आणि मुख्यत: संवादासाठी झाला तीच भाषा विसंवादाचेही मूळ ठरावी हा दैवदुर्विलास नाही तर आपला सार्वत्रिक अविवेक आहे. बहिणाबाईंनी या स्थितीचे नेमके वर्णन केले आहे.किती शिश्याच्या चमटय़ा। ठसे काढले त्यावर।कसे निघती कागद। छापीसनी भराभर।।मानसापरी मानूस। राहतो वेड जाना।अरे व्हतो छापीसनी। कोरा कागद शहाना।।

विस्मृतीचित्रे

लंडनच्या ‘द इकॉनॉमिस्ट’ या साप्ताहिकाच्या वर्षअखेरीच्या विशेषांकात एक मृत्युलेख प्रसिद्ध झाला आहे। ‘द इकॉनॉमिस्ट’मधील ‘ओबिच्युअरी’ म्हणजे मृत्युलेख हे विशेष ख्यातीचे असतात। या स्तंभाची चोखंदळ वाचकांमध्ये इतकी लोकप्रियता आहे की, अलिकडेच न्यूयॉर्कमध्ये या ‘ओबिच्युअरी’चे लेखन-संपादन करणाऱ्या संपादकाची जाहीर मुलाखत आयोजित करण्यात आली होती। त्यानिमित्ताने या मृत्युलेखांच्या चाहत्यांचा एक स्नेहमेळावाही भरविला गेला होता. या मेळाव्यात काही निवडक मृत्युलेखांचा एक संग्रह प्रकाशित करण्यात आला. वस्तुत: कोणत्याच लेखकाचे, वार्ताहराचे वा संपादकाचे नाव ‘द इकॉनॉमिस्ट’मध्ये प्रसिद्ध होत नाही. तरीही संपूर्ण अंक जणू एकाच लेखक-संपादकाकडून एकहाती (किंवा एक-संगणकी आज्ञाशैलीत) लिहिला जात असावा असे वाटावे, अशी अंकाची आशय-शैली असते. ‘द इकॉनॉमिस्ट’च्या ओबिच्युअरी एडिटर्सची, मुख्यत: अ‍ॅन रो या संपादिकेची, ओळख व भेट तेथे जमलेल्या वाचकांना त्याच दिवशी प्रथम झाली. या मृत्युलेखांचे वैशिष्टय़ हे की, ती ‘श्रद्धांजली’ नसते! त्याचप्रमाणे प्रत्येक प्रसिद्ध वा लोकप्रिय व्यक्तीच्या मृत्युची दखल त्या स्तंभात घेतली जाईलच असेही नाही. तो मृत्युलेख म्हणजे अवघ्या एका पानात त्या व्यक्तीच्या जीवनाची, त्याच्या कर्तृत्वाची (वा अपकर्तृत्त्वाची), त्याच्या आयु:शैलीची, त्याच्या संस्कृतीची ओळख असते. तो मृत्युलेख वाचणाऱ्याला जसे आपल्या मर्त्यत्वाचे भान येते. तसेच आपल्या (लहान) आयुष्यात काही माणसे काय काय (!) करू शकतात वा कसे जगतात याचीही चित्तवेधक व भेदक ओळख होते. तो मृत्युलेख ज्या व्यक्तीबद्दल असतो, ती व्यक्ती आपल्याच जीवनात येऊन गेली असेही वाचकाला वाटू लागते. ‘द इकॉनॉमिस्ट’ (२० डिसेंबर- २ जानेवारी) या वर्षअखेर विशेषांकात हेन्री मोलायसन नावाच्या व्यक्तीवरचा मृत्युलेख प्रसिद्ध झाला आहे. हेन्री मोलायसन कोण? कुणीही नाही, म्हणजे अशा अर्थाने की मोलायसन कुणी लेखक, कवी, शास्त्रज्ञ, पुढारी, चित्रकार, अर्थतज्ज्ञ किंवा ‘सेलेब्रिटी’ नाही. हेन्री मोलायसन हा अमेरिकेतील मॅसेच्युसेट्समधील जगप्रसिद्ध एमआयटी संस्थेतील हॉस्पिटलमधला एक रुग्ण किंवा मनोरुग्ण होता. त्याची ओळख फक्त ‘एच.एम्.’ इतकीच करून दिली जात असे. (एम म्हणजे मोलायसन हेसुद्धा त्याच्या मृत्यूनंतरच जाहीर केले गेले.) अशा अनामिक असलेल्या मनोरुग्णावर ‘द इकॉनॉमिस्ट’सारख्या प्रतिष्ठित आणि ‘इंटेलेक्च्युअल’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साप्ताहिकाने मृत्युलेख लिहायचे कारण काय? कारण हे की ‘एचएम’ या मनोरुग्णाने तमाम वैज्ञानिक आणि तत्त्वज्ञांसमोर (मुख्यत: मेंदू व संवेदन प्रक्रियेवर संशोधन व प्रयोग करणाऱ्या शल्यविशारदांसमोर आणि अर्थातच मनोवैज्ञानिकांसमोर) एक आव्हानच उभे केले आहे. तात्त्विक पातळीवरून विचार करताना हे आव्हान तसे बरेच प्राचीन आहे असेही लक्षात येईल. वेदांमध्ये वा ग्रीक तत्त्वज्ञानात ज्या प्रश्नांची चर्चा केली गेली आहे किंवा बौद्ध चिंतनात आणि भगवद्गीतेत (वा ज्ञानेश्वरीत) ज्या गूढ वाटणाऱ्या गोष्टींची लौकिक चिकित्सा आहे, असे मानले जाते, तेच प्रश्न ‘एचएम’ने पुन्हा उपस्थित केले आहेत. परंतु हे प्रश्न तत्त्वज्ञानातून विज्ञानस्तरावर आले ते गेल्या अर्धशतकात. तेव्हापासून तत्त्वज्ञान आणि आधुनिक विज्ञान यांमधील सीमारेषा झपाटय़ाने पुसत चालल्या आहेत. ‘एचएम’ने त्याच्या वयाच्या २७ व्या वर्षी त्याची स्मृती (जवळजवळ) पूर्णपणे गमावली. त्याचे निधन झाले तेव्हा तो ८२ वर्षांचा होता. म्हणजे सुमारे ५५ वर्षे तो विस्मृतीग्रस्त अवस्थेत जगला. विशेष म्हणजे या काळात तशी कोणतीही शारीरिक व्याधी त्याला झाली नाही. शिवाय या ५५ वर्षांच्या काळात त्याचे व्यक्तिमत्व अतिशय प्रसन्न असे आणि येणाऱ्या-जाणाऱ्यांशी (मुख्यत: डॉक्टर्स आणि नर्सेस) तो अतिशय सभ्यतेने व हसतमुखपणे वागत असे. इतका की, हा अतिशय गंभीर स्वरूपाचा मनोरुग्ण आहे, हे कुणाच्या लक्षातही येत नसे. एखादा डॉक्टर वा नर्स फक्त १५-२० मिनिटांनी त्याला परत भेटायला (वा तपासणीला) आले तर त्याला त्यांची पुन्हा ओळख करून द्यावी लागे. (गजिनी या आमीर खानच्या चित्रपटात अशा विस्मृतीग्रस्त व्यक्तीचे काहीसे मनोवैज्ञानिक आणि काहीसे काल्पनिक चित्रण आहे.) ‘एचएम्’ या मनोरुग्ण व्यक्तीला त्याच्या वयाच्या सोळाव्या वर्षी ‘फिट्स’ येऊ लागल्या. कधीही, केव्हाही, कुठेही चक्कर येऊन भान हरपले जाणाऱ्या ‘एचएम’ला वैद्यकीय उपचार सुरू झाले. तेव्हाच त्याच्या मेंदूवर परिणाम व्हायला सुरुवात झाली असणार. कशीबशी शालांत परीक्षा पूर्ण करून तो एका कारखान्यात नोकरी करू लागला. पण तेथे त्याचे चित्त एकाग्र होत नसे आणि ‘फिट्स’ही कमी झाल्या नव्हत्या. एका न्यूरोसर्जननने त्याच्या मेंदूवर ‘सायकोसर्जरी’ केली. त्यामुळे ‘फिट्स’ आटोक्यात आल्या, पण एका फटक्यात स्मृती नष्ट झाली. तेव्हा त्याचे वय २७ होते. त्याचे त्रिकालाचे भान पूर्णत: गेले. आपण कोण, कुठचे, काय करतो, काल- आज- उद्याचे संदर्भ पूर्णत: पुसले गेले. आरशात बघितल्यावर समोरची प्रतिमा आपलीच आहे हेही त्याला कळत नसे. काहीही नवे शिकायचे, इतकेच काय टीव्ही पाहायचे वा रेडिओवर काही ऐकून त्याचे संदर्भ लक्षात घ्यायचे हेही अर्थातच शक्य नव्हते. परंतु तो जेव्हा १६ वर्षांचा होता त्या वेळच्या अगदी नाममात्र आठवणी ढोबळपणे त्याला आठवत. त्याच्या स्मृतीच्या दृष्टिकोनातून विचार करता तो १६ व्या किंवा फार तर २७ व्या वर्षीच स्थळ-काळाच्या पलिकडे गेला होता. त्याचे हे कालातीत अस्तित्व डॉक्टर्स आणि नर्सेस्ना अतिशय लोभस वाटत असे. गायीच्या वासरासारखे किंवा मांजराच्या निरागस पिलासारखे. पण होता तर पूर्ण प्रकृतीचा माणूस. त्यामुळेच मेंदूवर संशोधन करणाऱ्यांना आणि मनोवैज्ञानिकांना त्याचे गूढ वाटत असे. तो मतीमंद नव्हता. त्याला अल्झायमर झालेला नव्हता. जरी त्याची स्मृती हरपली होती तरी त्याला ‘अ‍ॅम्नेशिया’ झालेला नव्हता. तो वेडा नव्हता. स्किझोफ्रेनिक किंवा दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा तो पेशंट नव्हता. त्याच्या वागण्यात- जेवण, खाण, दिनचर्या, झोप, विश्रांती, चालण्या-बोलण्यात कुठेही ‘वेडाचार’ नव्हता. ज्याला त्याच्याविषयी काहीही माहिती नाही, अशांना तर तो पूर्णपणे नॉर्मल वाटत असे. तो व्हायोलेंट होत नसे. कोणत्याच प्रकारची हिंसा वा उग्रता त्याच्या कृतीत वा बोलण्यात नव्हती. तो उदासीन किंवा ‘डिप्रेस’ होत नसे. क्वचित तो ‘शून्यात’ असल्यासारखे डॉक्टरला वाटत असे. मग डॉक्टरने त्याला विचारले की, ‘कसल्या विचारात मग्न आहेस?’ की तो म्हणत असे, ‘मी काही आता लहान मुलगा नाही.’ म्हटले तर हे उत्तर असंबद्ध आहे, म्हटले तर नाही. त्याचे डोळेही तसे इतरांसारखे दिसत. (वेडेपण डोळ्यात चटकन दिसते.) अशा स्थितीत ५५ वर्षे जीवन काढलेल्या या ‘एचएम्’ने अनेक प्रश्न वैज्ञानिकांसमोर ठेवले आहेत. ‘एचएम’चा मेंदू आता संशोधनासाठी प्रयोगशाळेत ठेवला गेला आहे. मेंदूमध्ये ‘हिपोकॅम्पस’ म्हणून जो भाग आहे तेथे स्मृती निर्माण होऊन, नोंद करून साठविल्या जातात, असे मानले जात असे. शस्त्रक्रिया करताना तो ‘हिपोकॅम्पस’ विस्कटला गेला असावा असे सुरुवातीस वाटले होते. पण पुढे पुढे डॉक्टरांना लक्षात येऊ लागले की त्याच्या जीवनविषयक- आत्मचरित्रात्मक- स्मृती कुठेतरी लुप्त झाल्या असल्या तरी त्याची दिनचर्येची स्मृती, त्याचप्रमाणे तेच तेच काम करीत राहिले तर त्यातील सातत्यता, कपडे घालणे, तहान-भूक (ढोबळपणे) त्याच्या ‘स्मरणात’ असत. म्हणजे त्याला ‘प्रोसिजरल मेमरी’ आणि ‘डिक्लरेटिव मेमरी’ होती. याचा अर्थ हा की सांगितलेली गोष्ट करणे आणि ती पुन्हा करण्यासाठी काही काळ लक्षात राहणे शक्य होते. शिवाय प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे रिफ्लेक्सेस्ही ठाकठीक होते. त्यामुळे डॉक्टर व वैज्ञानिकांचा प्रश्न पुढच्या स्तरावर गेला. ‘स्मृती म्हणजे काय? भाषा म्हणजे काय? बोलताना शब्द लागतात, ते कुठून येतात? ‘एचएम’लाच नव्हे तर मतीमंदांनाही बोललेले शब्द, आज्ञा, धाक, प्रेम, राग कळतात. ते कसे? पूर्णपणे स्मृतीहिन माणूस सचेतन असला तरी तो प्रत्यक्षात अचेतनसदृशच नव्हे काय? जर मन केवळ मेंदूत व एकूण संवेदन यंत्रणेत नसेल तर ‘मन’ कुठे असते? मेंदू, मन, कॉन्शियसनेस ऊर्फ जाणीवा- संवेदन- भान, कुतुहल, बुद्धी, स्मृती, भूतकाळ- वर्तमान व भविष्यकाळ याचे व्यक्तिगत व सांस्कृतिक संदर्भ, तसेच अनुवांशिकता, आयडेंटीटी ऊर्फ स्वत:ची ओळख, अस्मिता हे सर्व कसे तयार होते? कारण हे सर्व व इतर बरेच म्हणजेच माणूसपण आणि जीवन. साहजिकच पुन्हा प्रश्न जातो तो तत्त्वज्ञांच्या प्रांगणात. केवळ ‘मी कोण आहे’ ऊर्फ ‘कोऽहं’ असा हा प्रश्न नाही तर ‘मी कुणाचा आहे.’ फक्त ‘हू अ‍ॅम आय?’ इतकेच नव्हे तर ‘हूज अ‍ॅम आय?’ ‘एचएम’ला या दोन्ही प्रश्नांची उत्तरे सांगता आली नसती. त्याच्या डॉक्टरांनाही त्याच्या संबंधातील ती उत्तरे देता आली नसती. पण आपण सर्वजण स्वत:ला सूज्ञ समजतो. आपली स्मृतीही शाबूत आहे. आपल्याला या प्रश्नांची उत्तरे माहीत आहेत?
कुमार केतकर

‘...विश्वाचा आकार केवढा - ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा!



‘...विश्वाचा आकार केवढा - ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा!
आपले जीवन क्षणभंगुर आहे, हे भान माणसाला काही हजार वर्षांपूर्वी आले; परंतु ‘क्षणभंगुर’ म्हणजे किती याचा अंदाज मात्र ‘सरासरी’नेच ठरवावा लागला. हे सरासरी आयुष्यमान अगदी युरोपातही तसे कमीच होते. ‘त्रिकाल’व्यापी शेक्सपियर (१५६४-१६१६) वयाच्या ५२ व्या वर्षीच मरण पावला. कवी शेली (१७९२-१८२२) तर फक्त ३० व्या वर्षी. शिवाजी महाराज-ज्यांच्या पुण्याईवर आणि दिगंत कीर्तीवर अजूनही महाराष्ट्र आपली अस्मिता जपतो-वयाच्या ५० व्या वर्षी (१६३०-१६८०) मरण पावले. केशवसुत वयाच्या ३९ व्या वर्षी (१८६६-१९०५) तर राम गणेश गडकरी वयाच्या फक्त ३४ व्या वर्षी (१८८५-१९१९). दीर्घ आयुष्य असलेली माणसेही असत-अगदी शतायुषीसुद्धा, पण तुलनेने कमी.
त्यामुळे सरासरी आयुष्यमान ४० ते ६० या पट्टय़ात असे। (साठी-एकसष्ठी करण्याची प्रथा त्यामुळे आली आणि निवृत्तीचे वयही प्रथम ५०, नंतर ५५, मग ५८ आणि अलीकडे ६० असे ठरत गेले।) आता जगभरच आयुष्यरेषा बरीच लांब होत गेली आहे. स्वातंत्र्यानंतर भारताचे सरासरी आयुष्यमान ४५-४८ वरून आता ६५-६८ च्या आसपास आले आहे. सध्या जे वैद्यकीय संशोधन चालू आहे, त्यानुसार सर्वसामान्य माणसाचे आयुष्यमान १०० च्या आसपास- अगदी सव्वाशे-दीडशेपर्यंतसुद्धा जाऊ शकेल, असे शास्त्रज्ञ सांगतात. (त्यामुळे निवृत्तीचे वय ८० किंवा ९० असावे असाही विचार काही आयुर्तज्ज्ञांनी मांडला आहे! साहजिकच काही मध्यमवयीन नोकरदार मंडळींची धाबी दणाणली आहेत!) म्हणजे एका बाजूला मोठय़ा प्रमाणावर नरसंहार कसा घडवून आणायचा यावर संशोधन चालू आहे. (अण्वस्त्रे- क्षेपणास्त्रे, जैविक व रासायनिक अस्त्रे) आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यमान वाढविण्याचेही प्रयत्न चालू आहेत.मार्टिन रीज्सारखे जगद्विख्यात ब्रिटीश शास्त्रज्ञ तर अशी भीती व्यक्त करतात की ‘एरर वा टेरर’, म्हणजे चुकीने वा दहशतवादाने पृथ्वीचा विध्वंस होऊ शकतो- अगदी याच शतकातसुद्धा. कारण ‘विवेक विरुद्ध अविवेक’ या महायुद्धात विवेकाचाच विजय होईल असे विधिलिखितही नाही आणि तसे विज्ञानाने सिद्धही करता येणार नाही. विशेषत: ६०-७० वर्षांत, म्हणजे अणुस्फोटाची शक्ती लक्षात आल्यानंतर ही विध्वंसक शक्यता वाढतच गेली आहे. या घडीला जगात सुमारे २५ ते ३५ हजार अण्वस्त्रे-क्षेपणास्त्रे सुसज्ज स्थितीत आहेत आणि त्यांची क्षमता संपूर्ण पृथ्वीचा विध्वंस किमान १०० वेळा करण्याइतकी आहे. अर्थातच एकदा विध्वंस केल्यानंतर (वा झाल्यानंतर) उरलेली संहारक अस्त्रे वापरण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. गेल्या आठवडय़ात पाकिस्तानचे अध्यक्ष झरदारी यांनी म्हटले की, पाकिस्तानात तालिबान्यांची ताकद वाढते आहे आणि ते सत्तेवरही कब्जा करू शकतात. त्यांना असे सुचवायचे आहे की, पाकिस्तानची अण्वस्त्रे तालिबान्यांच्या हातातही पडू शकतात. अमेरिकेला वाटणारी भीतीही नेमकी तीच आहे. पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ आणि बॉम्बनिर्माते ए. क्यू. खान यांनी ते अणुज्ञान (आणि बॉम्ब) उत्तर कोरिया, इराण व इतर काही देशांना पुरविले असल्याचा पुरावा अमेरिकेकडे आहे. जर अतिरेक्यांच्या वा दहशतवाद्यांच्या हातात अण्वस्त्र सत्तेची सूत्रे पडली तर पृथ्वीचा विध्वंस होऊ शकतो ही मार्टिन रीज् यांनी (ड४१ो्रल्लं’ ऌ४१ह्ण या पुस्तकात) व्यक्त केलेली भीती सार्थ वाटू लागते. निराशावाद वा नियतिवाद वा प्रलयवाद यातून ती भीती आलेली नाही, तर वैज्ञानिक वास्तववादातून आली आहे.विज्ञानवादातील एक सूत्र काहीजण असे सांगतात की, प्रत्येक गोष्टीला जन्म, विकास आणि अंत असतो. त्यानुसारच माणसाला मर्त्यत्वाचे, क्षणभंगुरतेचे भान आले. अगदी प्राचीन मानवाला निद्रा आणि मृत्यू यातील फरक कळत नसे. (आजही संशोधनाचा एक मुद्दा हा आहे की सचेतन आणि अचेतन यात नक्की काय फरक आहे? गर्भावस्थेतील जीवात ‘प्राण’ कुठून शिरतो आणि तो जातो म्हणजे नक्की काय होते यावरचे चिंतन-संशोधन आता अगदी सूक्ष्मात गेले आहे!) सचेतन म्हणजे ‘कॉन्शस’ स्थिती; जिच्यात संवेदना, जाणीवा, प्रेरणा, स्मृती, विचार, भूत-वर्तमान-भविष्य स्थितीचे भान अशा गोष्टी आहेत. म्हणूनच आयव्हन इलिच यांच्यासारखे लेखक असा प्रश्न उपस्थित करतात की आयुष्यमान वाढविणे म्हणजे जीवन-क्षमता वाढविणे नव्हे. संवेदनाहीन, स्मृतिक्षीण आणि विचारहीन स्थितीत माणूस दीर्घकाळ जगू शकेल, पण त्याला अर्थ नाही. ‘मेडिकल नेमेसिस’ या ग्रंथात इलिच यांनी आयुष्यमान वाढविण्याच्या आणि वैद्यकीय निकषांनुसार वृद्धावस्था जपण्याच्या अतिरेकी वैज्ञानिक प्रयत्नांवर टीका केली आहे. त्यांच्या मते निसर्गक्रम ‘जन्म-विकास-अंत’ या चक्रातून जातो. तो क्रम जीवन आनंदमय करण्यासाठी उपयुक्त आणि उत्पादक करण्यासाठी जपणे वेगळे आणि केवळ शरीराचे आयुष्यमान वाढविणे वेगळे. इलिच हे नकारात्मक वा अस्तित्ववादीही नाहीत! पृथ्वी सिव्हिलायझेशन आणि मानव/जीवसृष्टी नष्ट होण्याची शक्यता व्यक्त करणारे मार्टिन रीज हे नियतीवादी वा प्रलयवादी नाहीत; त्याचप्रमाणे. हे दोघेही विचारवंत/ शास्त्रज्ञ प्रत्यक्षात जीवसृष्टी व पृथ्वी जपण्याच्या व वाचविण्याच्या प्रयत्नातून तो धोका सांगतात.माणसाला स्वत:च्या आयुष्यमानाचे/ मर्त्यत्वाचे भान काही हजार वर्षांपूर्वी आले, पण आपल्या पृथ्वीचे आणि सूर्यमालिकेचे भान येऊ लागले ते सुमारे पाचशे वर्षांत. कोपर्निकसने (१४७३-१५४३) पृथ्वी ग्रह सूर्याभोवती फिरतो, असे मांडून ख्रिश्चन धर्मगुरूंच्या श्रद्धा-सिद्धांताला आव्हान दिले होते. पण ते प्रत्यक्ष दुर्बिणीच्या मदतीने सिद्ध केले ते गॅलिलिओने, बरोबर चारशे वर्षांपूर्वी. साधारणपणे हाच काळ (१४०० ते १७००) ‘रेनेसाँ’ म्हणजे आधुनिक ज्ञानोदयाचा मानला जातो. याच काळात वैद्यकीय संशोधन, शस्त्रक्रिया, शरीरज्ञान या ज्ञानशाखांमध्येही झपाटय़ाने प्रगती झाली. आजचे मेडिकल क्षेत्रातील बहुतेक प्रयोग आणि रोगचिकित्सा या काळात सुरू झाल्यामुळेच अ‍ॅलोपथी-वैद्यकी भाषेतील बहुतेक मूळ शब्द त्यावेळचे आहेत.मुद्दा हा की माणसाप्रमाणेच पृथ्वीलाही जन्म, ‘विकास’ व अंत असणार, ही संकल्पना तेव्हा मूळ धरू लागली. ‘प्रोसेस ऑफ एजिंग’ म्हणजे प्रौढ व वृद्ध होण्याची प्रक्रिया माणसाची वेगळी आणि पृथ्वीची वेगळी. एकदा पृथ्वीला या प्रक्रियेत आणल्यानंतर आपल्या सूर्यमालिकेच्या जन्माचा, विकासाचा व अंताचा विचार सुरू झाला. साहजिकच त्यानंतर विश्वाच्या जन्माचा आणि अंताचाही!परंतु विश्वाला अंत नाही आणि जन्मही नाही, अशी एक ‘स्टेडी स्टेट थिअरी’ पुढे आली. ‘बिग बँग’ थिअरीने मात्र विश्वाचा जन्म १३ ते १५ अब्ज वर्षांपूर्वी झाला असे म्हटले आहे. बहुतांश खगोलशास्त्रज्ञ बिग बँग सिद्धांत मानतात. हा ‘बिग बँग’ ऊर्फ महाविस्फोट झाल्याबरोबर क्षणार्धात निर्माण झालेले हे अवघे विश्व किती आकाराचे होते? काही शास्त्रज्ञ म्हणतात, फक्त एका वाटाण्याएवढे! या ‘वाटाण्या’चा विस्तार होऊ लागला आणि त्यातून अथांग विश्व तयार झाले.केशवसुतांनी म्हटले आहे, ‘या विश्वाचा आकार केवढा-ज्याच्या त्याच्या डोक्याएवढा.’ केशवसुतांना आधुनिक खगोलशास्त्र, बिग बँग वगैरे गोष्टी माहीत नव्हत्या. परंतु त्या अथांगाला आपल्या बुद्धीच्या कक्षेत सामावता येते असे त्यांना वाटत होते. म्हणून त्यांनी तशा ओळी लिहिल्या; परंतु आता काही शास्त्रज्ञ असे मानतात की, आपल्या बुद्धीच्या वा प्रज्ञेच्याही कक्षेत मावणे शक्य नाही इतका प्रचंड मोठा विस्तार या विश्वाचा आहे. म्हणजेच १३ ते १५ अब्ज वर्षांपूर्वीचा तो वाटाणा आता खरोखरच ‘इन्फिनाईट’ म्हणजे अथांग झाला आहे. इतका की, आता नव्या सिद्धांताप्रमाणे एकच नव्हे तर अनेक महाविस्फोट ऊर्फ ‘बिग बँग’ झाले आहेत. म्हणजेच एकच नव्हे तर अनेक विश्वे आहेत आणि ती सर्व विश्वे सतत विस्तारत आहेत. त्यामुळे या विश्वात किती अब्ज तारे, किती अब्ज ग्रह, किती अब्ज तारकापुंज, किती ब्लॅक होल्स म्हणजे कृष्णविवरे आहेत, हे ‘निश्चित’ सांगता येणे अशक्य आहे. अवकाशात कितीही दुर्बिणी लावल्या, दूर दूर अथांगात कितीही अवकाशयाने सोडली तरी विश्वाचा आकार मानवी डोळ्याला कळणारच नाही.कदाचित म्हणूनच ‘स्टेडी स्टेट’ सिद्धांताचे फ्रेड हॉईल आणि डॉ. जयंत नारळीकर हे जनक असे मांडत आले होते की, विश्वाला ‘जन्म’ वगैरे असा नाहीच. हा सिद्धांत मानणाऱ्यांची संख्या कमी आहे म्हणून तो सिद्धांत मोडीत निघाला आहे असे मात्र नव्हे; परंतु प्रश्न होता तो जन्म-विकास-अंत या प्रक्रियेचा. जन्मच नसेल तर अंत कसा होणार? की जन्म नाही, पण अंत मात्र आहे?या विश्वात अब्जावधी सूर्यमालिका असतील तर अर्थातच त्याच प्रमाणाच पृथ्वीसदृश ग्रह असणार. म्हणजेच लाखो वा कोटी ग्रहांवर जीवसृष्टी आणि कदाचित मानवसदृश ‘प्रगल्भ’ प्राणीही असणार. कोटय़वधी प्रकाशवर्षे दूर असलेल्या या मानवसदृश प्रगल्भ प्राण्याशी आपला संपर्क होण्याची शक्यता फारच कमी. शिवाय तो आपल्याप्रमाणेच असेल असेही धरून चालता येणार नाही. कुणी सांगावे, तो जन्म-विकास-मृत्यू या फे ऱ्यातून सुटला असेल वा तशा फे ऱ्यात अडकलाच नसेल तर एखादा ‘अमर माणूस’ वा तत्सम प्राणीही असेल. मग त्याला डार्विनचे उत्क्रांती नियम लागू पडण्याचा प्रश्नच येणार नाही!परंतु पृथ्वीसदृश ग्रहावर जीवसृष्टी असेल तर मात्र हा फेरा चुकविता येणार नाही. याबाबत शास्त्रज्ञांचे एकमत आहे. फार तर त्या जिवांचे आयुष्यमान वेगळे असेल. कासव पाचशे वर्षे जगते, हत्ती शे-दीडशे वर्षे जगतो आणि माणूस शतायुषी होऊ शकतो, तशी इतर ग्रहांवरची जीवसृष्टी वेगवेगळ्या आयुष्यमानाच्या प्रक्रियेत असू शकते. आपण आपल्या दृष्टिकोनातून पृथ्वीच्या सापेक्षतेतून आणि या सूर्यमालिकेच्या संदर्भात विचार करतो, तेव्हा तो आपल्या ‘डोक्याएवढाच’ विचार असणार हे उघड आहे. साहजिकच त्या जन्म-विकास-मृत्यूला काळाचे परिमाणही त्यानुसारच ठरणार.आज जे ‘एजिंग प्रोसेस’वर संशोधन चालू आहे, त्याद्वारे वृद्धत्वापासून मुक्ती मिळविण्याचा प्रयत्न आहे. (अमरत्व प्राप्त करण्याची संकल्पना तर अगदी महाभारतापासून ते आजच्या काही स्वप्नाळू संशोधकांनाही भारावून टाकत आली आहे. अमृत पेयाचा काल्पनिक ‘शोध’ त्यातूनच लागला.) परंतु वृद्धत्व लांबवले तरी ते व मरण अटळ आहे. म्हणजेच क्षणभंगुरत्वाची वैश्विक व्याख्या फारशी बदलणार नाही- आयुष्यरेषा दीर्घ केली तरीही.शिवाय पृथ्वी ग्रहाचीही निश्चित आयुष्यरेषा आहेच. ती बदलता येणार नाही. कारण आपल्या सूर्यातून जी ऊर्जा बाहेर पडते, तिच्या हिशेबानुसार सूर्याचे एकूण वय १० अब्ज वर्षे आहे. त्यापैकी अर्धे-अधिक सूर्य ‘जगाला’ आहे. जर माणसाने आपल्या ‘कर्माने’ पृथ्वीचा पुढील शंभर-एक वर्षांत विध्वंस केला नाही आणि विज्ञान-तंत्रज्ञानाचा योग्य व नैतिक उपयोग केला तर पृथ्वीला अजून दोन-तीन अब्ज वर्षे ‘मरण’ नाही. लोकसंख्या वाढ, अन्नधान्य, ऊर्जा व पाणी यांची संभाव्य टंचाई, ग्लोबल वॉर्मिग या सर्व समस्यांना वैज्ञानिक उत्तरे आहेत. गरज आहे ती त्या विज्ञानाला व जीवनाला विवेकाचे परिमाण देण्याची!


कुमार केतकर

कलियुगाचे आव्हान


कलियुगाचे आव्हान


या म्हणजे एकविसाव्या शतकाची फक्त आठच वर्षे पूर्ण झाली आहेत। हे शतक पूर्ण होऊन बाविसावे शतक सुरू व्हायला अजून ९२ वर्षे बाकी आहेत. म्हणजे आज किंवा या वर्षी जन्माला आलेले मूल हे शतक संपताना ९२ वर्षांचे असेल. सर्वच मुले नव्हेत; परंतु ज्यांना चांगला परिसर, सकस आहार, योग्य प्रकारची वैद्यकीय मदत, तीही योग्य वेळेला, सुदृढ प्रकृती, अनुकूल कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण- अर्थातच नशीबही (!) लाभेल त्यांना बाविसाव्या शतकाची पहाट उजाडताना पाहायला मिळेल. २०/२५ वर्षांत जे वैद्यकीय संशोधन होणार आहे, त्यामुळे आयुष्यमान वाढणार आहे. शिवाय,
निदान सुस्थितीतील मध्यमवर्गाला ऐहिक स्थितीही बऱ्यापैकी प्राप्त होणार आहे; परंतु त्याच वेळेस समाजात कोटय़वधी (नव्हे, अब्जावधी) लोक असे असणार आहेत, की ज्यांच्या नशिबी (!) तशी सुस्थिती असणार नाही। समृद्धी आणि विषमता, दोन्ही एकाच गतीने वाढत जाणार आहे। ती दरी वाढेल, तेव्हा भडका उडेल, दंगे-धोपे होतील, युद्धही होऊ शकेल। कारणे वेगवेगळी असू शकतील- राष्ट्रवाद, धर्मवाद, सांस्कृतिक अस्मिता, खनिज संपत्तीवरचा कब्जा, पाणी, भाषावाद, विषमता असे बरेच काही!कुणाच्याही आटोक्यात येऊ शकणार नाही, असा दहशतवाद जगभर फोफावतो आहे. तो केव्हा, कुठे आणि कोणत्या स्वरूपात प्रकट होईल हे निश्चितपणे सांगणे अतिशय अवघड होत जाणार आहे. एक वेळ भूकंप, ज्वालामुखी, सुनामी यांचा अंदाज वैज्ञानिक प्रगतीमुळे करता येऊ शकेल; परंतु दहशतवादी हल्ल्यांचा र्सवकष बंदोबस्त वैज्ञानिक (किंवा मनोवैज्ञानिक!) संशोधनातून करता येऊ शकेल, अशी चिन्हे नाहीत. तसे पाहिले तर आपण सर्वच जीवन-मरणाच्या हिंदोळ्यावर असतो; आणि कुणीही अमर्त्य नाही. (अमर्त्य सेनही नाही!) जीवन क्षणभंगूर असल्याचेही आपण लहानपणापासून ऐकत असतो. मृत्यू तर आपल्याला ठायी ठायी दिसतच असतो- वृद्धापकाळामुळे, आजारपणामुळे, अपघातामुळे वगैरे वगैरे, परंतु दहशतवादी हल्ल्यामुळे मरण येणे, हे आणि युद्धामुळे वा युद्धात मरण येणे यात खूप फरक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, मुख्यत: युरोपात प्रत्येकच जण मृत्यूच्या छायेत होता. कुठेही आणि केव्हाही बॉम्बहल्ला होण्याची शक्यता असे. हिरोशिमा-नागासाकीच्या माणसांना तर अगदी आदल्या दिवशीही दुसऱ्या दिवशीच्या हाहाकारी नरसंहाराची कल्पना नव्हती.दुसरे महायुद्ध हे त्या अर्थाने पहिल्या महायुद्धापेक्षाही अधिक विदारक आणि विध्वंसक होते. पहिल्या महायुद्धातही लाखो निष्पाप-नि:शस्त्र नागरिक मारले गेले, पण दुसऱ्या महायुद्धात एकूणच संहाराची व विध्वंसाची व्याप्ती प्रचंड होती. तसे पाहिले तर त्या दोन युद्धात अंतर फारच कमी होते. पहिले महायुद्ध १९१९ साली संपले आणि दुसरे १९३९ साली सुरू झाले. फक्त २० वर्षांनी. याच २० वर्षांच्या काळात हिटलर आणि स्टॅलिन उदयाला आले. युद्ध नसतानाच्या त्या २० वर्षांच्या काळातही त्या दोघांच्या कारकिर्दीत प्रचंड नरसंहार झाला. फक्त ६० लाख ज्यूच नव्हेत तर त्यांच्याबरोबर कम्युनिस्ट, इतर देशांचे युद्धकैदी, विद्रोही लेखक, कवी, विचारवंत, शास्त्रज्ञ यांचेही हत्याकांड हिटलरने केले. स्टॅलिननेही ‘वर्गशत्रू’ म्हणून लाखो शेतकरी वा ‘देशद्रोही’ म्हणून हजारोंना ठार मारले. हिटलर आणि स्टॅलिन, दोघांनी युद्ध नसतानाच्या त्या २० वर्षांत सुमारे (कमीतकमी) एक कोटी माणसे ठार मारली, असे इतिहासकार मानतात. प्रत्यक्ष त्या दोन युद्धात साधारणपणे १० कोटींच्या आसपास माणसे मारली गेली. (त्या संख्येबाबतही इतिहासकारांमध्ये वाद आहेत.)नाझी भस्मासुराचा पाडाव झाल्यानंतर शांततेची पहाट उगवेल, असे सर्वानाच वाटू लागले होते. परंतु दुसरे महायुद्ध संपता-संपताच हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला गेल्यामुळे त्या प्रसन्न उष:कालाला भयाच्या वटवाघळाची दृष्ट लागली होतीच. अमेरिकेने १९४५ साली तो अणुबॉम्ब टाकल्यानंतर चार वर्षांनी, म्हणजे १९४९ साली सोविएत रशियाने ‘कम्युनिस्ट’ अणुस्फोट चाचणी घडवून आणली. त्यामुळे साठीचे दशक उजाडले तेव्हा अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन या चार देशांकडे अण्वस्त्रे होती. पुढे १९६४ साली चीनने अणुस्फोट चाचणी केली. त्यानंतर १९७४ साली भारताने अणुस्फोट घडविला. गेल्या ११ वर्षांत भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया यांनी अण्वस्त्रे बनवली. जाहीरपणे व अधिकृतपणे नाही पण प्रत्यक्षात इस्राएल (व दक्षिण आफ्रिकेकडेही?) तशी सज्जता आहे, असे मानले जाते. इराक अणुबॉम्ब बनवीत आहे, या धास्तीने (किंवा जाणीवपूर्वक केलेल्या खोटय़ा प्रचाराने) अमेरिकेने इराकवर घनघोर बॉम्बहल्ला केला. त्यात पाच वर्षांत पाच लाख इराकी ठार मारले गेले आहेत.इराककडे अण्वस्त्रे नव्हती, हे स्पष्ट झाल्यावर अमेरिकेचे (माजी) अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी ‘आपल्याला चुकीची माहिती मिळाल्यामुळे आपण इराकवर हल्ला केला,’ अशी कबुली दिली. आता इराण अण्वस्त्रे बनविण्याची खटपट करतो आहे, असा प्रचार अमेरिकेत व इस्रायलमध्ये आहे. इराणकडे अण्वस्त्रसज्जता यायच्या आतच त्या देशावर हल्ला करायची सर्व तयारी इस्रायल व अमेरिकेने केली आहे. बराक ओबामांचा प्रयत्न असा आहे, की इराणबरोबर वाटाघाटी करून इराणला अण्वस्त्रे संपादन करण्यापासून परावृत्त करावे. इस्रायलमधील ‘झायोनिस्ट’ उग्रवाद्यांना वाटते, की हा प्रश्न वाटाघाटींनी सुटणार नाही. इराणवर हल्ला करून त्या देशाचे कंबरडेच मोडावे व त्या देशाची अण्वस्त्रक्षमताच नष्ट करावी, असे कडव्या ज्यूंना वाटते. पाकिस्तानचे अण्वस्त्रतज्ज्ञ ए. क्यू. खान यांनी इराणच नव्हे तर आणखीही काही देशांना ते तंत्रज्ञान विकल्याची शंका इस्रायल, ब्रिटन, अमेरिका यांना आहे. त्या शंकेचे ‘निरसन’ इराणवर हल्ला करूनच होईल, असे त्यांना वाटते. ओबामांचे संवादाचे व मुत्सद्देगिरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठीही अमेरिकेतील ‘नीओ-कॉन’ लष्करशहा आणि रिपब्लिकन हे इस्रायलला हाताशी धरून इराणवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.इराणवर तसा हल्ला झाल्यास जगात जेथे जेथे अमेरिकन हितसंबंध असतील तेथे तेथे दहशतवादी हल्ला चढवतील आणि जमल्यास इस्रायलचे अस्तित्वच कायमचे पुसण्यासाठी ‘अंतिम’ संघर्ष सुरू होईल, असे इशारे तेहेरानमधून दिले जाऊ लागले आहेत. म्हणजेच मॅक्डोनॉल्डपासून मायक्रोसॉफ्टपर्यंत आणि हॉलीवूडपासून सीएनएनपर्यंत जी अमेरिकन ‘प्रतिके’ जेथे असतील तेथे ती उद्ध्वस्त केली जातील, असा फतवा इराणच्या शिया राजवटीने काढला आहे. अफगाणिस्तानातील तालिबान्यांनीही अमेरिकेला (आणि इस्रायललाही) तशा धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्करात हजारो तालिबानी आहेत. आयएसआयनेच (सीआयएच्या मदतीने) तालिबानचे भूत उभे केले होते. याचा अर्थ हा, की भारत पुढील बरीच वर्षे दहशतवादाच्या छायेत असणार आहे.पाकिस्तानच्या लष्करशहांची इच्छा अशी आहे, की भारताने त्यांच्यावर हल्ला करावा. तसा हल्ला भारताने केला, की सत्तेची सूत्रे झरदारींकडून लष्कर व आयएसआयकडे जातील. तालिबान्यांनी तर जाहीरच केले आहे, की भारत-पाक युद्ध झाल्यास ४० हजार जिहादी भारतात ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणतील. याशिवाय त्या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून पाकिस्तान अणुबॉम्बचाही वापर करू शकेल. इस्रायल व अमेरिकेला धास्ती त्या पाकिस्तानी अणुबॉम्बची आहे. बरेच वैज्ञानिक आता असेही मानतात, की पुढील २०-२५ वर्षांत (वा त्याही अगोदर) तशा अणुबॉम्बची गरज भासणार नाही. ‘न्युक्लिअर टेररिझम’ म्हणजे ‘आण्विक दहशतवाद’ ही नजीकच्या काळात भेडसावणारी शक्यता आहे. आण्विक दहशतवादी हल्ला करण्यासाठी विमानातून कुठच्याही शहरावर वा प्रदेशावर अणुबॉम्ब टाकायची गरजच असणार नाही. पाच-दहा किलो क्षमतेचे ‘मिनी अणुबॉम्ब’ हातातल्या ऑफीस बॅगेतून नेता येतील. प्रश्न फक्त ते ‘ट्रीगर’ करण्याचा म्हणजे प्रत्यक्ष उडविण्याचा आहे. तसा एखादा मिनी-अणुबॉम्ब जर ताज-ओबेरॉय- चर्चगेट परिसरात ‘ट्रीगर’ केला तर अवघी दक्षिण व मध्य मुंबई काही मिनिटांतच भस्मसात होऊ शकेल, किंवा दिल्लीतील पार्लमेण्टपासून ते कनॉट प्लेस ते करोलबाग आणि ट्रान्सयमुना वसाहत बेचिराख करता येईल. अजून दहशतवाद्यांच्या हातात ते तंत्रज्ञान लागलेले नाही; परंतु ग्रॅहॅम अ‍ॅलिसन यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण ग्रंथात (Nuclear Terrorism: The Risks and Consegnences of the Ultimate Disaster) असे म्हटले आहे, की जगाला आता मुख्य धोका तो आहे. न्यूयॉर्कच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ आणि वॉशिंग्टनच्या पेंटगॉनवर ‘९/११’ रोजी हल्ला झाल्यानंतर बरोबर एक महिन्यानेच, म्हणजे ११ ऑक्टोबर २००१ रोजी अल काइदाने न्यूयॉर्कमध्ये तसा न्युक्लिअर अ‍ॅटॅक करायची योजना केली होती, अशी भीती अमेरिकन हेरखात्याला वाटली. त्यांनी लगेचच मुख्य सरकारी कचेऱ्या, कागदपत्रे आणि अधिकारी यांना ‘भूमिगत’ केले. (अमेरिकेत व रशियात आणि इस्रायलमध्येही असे ‘बंकर्स’ बांधलेले आहेत.)अशा विध्वंसाची शक्यता फक्त वैज्ञानिक वा प्रस्थापित विचारवंतांनाच वाटत नाही तर अध्यात्मवादी डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (ऊर्फ अनिरुद्ध बापू) यांनाही इतिहासाच्या आणि चिंतनाच्या आधारे वाटते आहे.थोडक्यात सांगायचे तर पुढील ४०-५० वर्षांत तसे काही महाविध्वंसक घडले नाही, तर या शतकाचा उत्तरार्ध कदाचित काहीशा शांततेत जाऊ शकेल. मग या विध्वंसक शक्यतांवर मात केल्यावर मानवजातीसमोर प्रश्न उरेल तो जगातील १० ते १५ अब्ज लोकांच्या अन्नधान्याचा, पाण्याचा, ऊर्जेचा, आरोग्याचा, निवाऱ्याचा. जर हे प्रश्न ‘नियती’च्या आणि त्या बिचाऱ्या परमेश्वराच्या माथ्यावर मारायचे नसतील तर माणसालाच व्यक्तिगत, सामाजिक आणि जागतिक स्तरावर त्यांचा विचार करावा लागणार आहे. कारण विध्वंस आपसूक होत नाही तर त्याची नेपथ्यरचना आपल्या (प्रत्येकाच्या) विद्वेषी मनात होते. आव्हान आहे ते त्या विद्वेषावर विजय मिळविण्याचे!

कुमार केतकर

कलियुगाचे आव्हान- २


कलियुगाचे आव्हान- २


प्रत्येक माणसाला ‘चांगले’ जीवन जगायची इच्छा असते. अर्थातच ‘चांगले’ म्हणजे काय याची प्रत्येकाची व्याख्या वेगळी असू शकते. अमेरिकन राज्यघटनेने तर प्रत्येक व्यक्तीला सुख-समाधान प्राप्त करण्याचा मूलभूत हक्क असल्याचे म्हटले आहे. प्रत्येक व्यक्तीची सुख-समाधानाची कल्पना, अपेक्षा आणि इच्छा वेगवेगळी असली तरी काही मूलभूत गोष्टी मात्र सर्वानाच गरजेच्या असतात. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, मूलभूत शिक्षण, शुद्ध हवा, पाणी वगैरे. या मूलभूत गोष्टी दिल्या गेल्यानंतर किंवा प्राप्त झाल्यानंतर प्रत्येकजण स्वत:च्या ‘चांगल्या’ जीवनाच्या कल्पनेनुसार जगण्याचा विचार करू शकेल. काहीजण संगीतसाधना करणे पसंत करतील तर काहीजण गिर्यारोहण, काहीजण वाचनात तर काहीजण संशोधनात. काहींना फक्त रसिक वाचक, श्रोता व प्रेक्षक राहण्यात समाधान मिळू शकेल. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, पाककला, निसर्गयात्रा. आनंद मिळविण्याचे शेकडो मार्ग आहेत. पण त्यासाठी किमान दोन बाबींची खात्री पाहिजे. पहिली म्हणजे मूलभूत गरजा भागतील, याची शाश्वती आणि दुसरी म्हणजे स्वातंत्र्य. इतर कुणाच्याही स्वातंत्र्यावर अधिक्षेप न करता असलेले व्यक्तिस्वातंत्र्य. प्रत्येकाला आरोग्याचा स्वायत्त अधिकार, डॉ. अभय आणि राणी बंग यांनी सुचविल्याप्रमाणे, द्यायचा झाला तर रुग्णसेवाही व्यापक प्रमाणात उपलब्ध असावी लागेल. आज जगात जेवढी संपत्ती व साधने उपलब्ध आहेत आणि निर्माण होत आहेत त्यांचा विचार केला तर जगातील प्रत्येक व्यक्तीला मूलभूत गोष्टी आणि आनंद-स्वातंत्र्य देणे तसे कठीण नाही. प्रत्येकाला म्हणजे साडेसहा अब्ज लोकांना-म्हणजेच ६५० कोटी लोकांना. यापैकी अर्धी लोकसंख्या- सुमारे ३०० कोटीहून जास्त-ही भारतीय उपखंड, चीन आणि उर्वरित आशिया खंडातच आहे. सर्वात जास्त दारिद्रय़, निरक्षरता, अनारोग्य आणि बकाली व हलाखीही याच भागात आहे.त्यामुळेच आपण असे मानतो (आणि ते खरेही आहे) की या मागासलेपणाचे व गरिबीचे कारण लोकसंख्या हे आहे. म्हणूनच चीनने सक्तीचे कुटुंब नियोजन करून एका जोडप्याला एकच मूल असे कायद्यानेच बंधनकारक केले. (जुळे किंवा तिळे झाले तर मात्र ‘कारवाई’ होत नाही. अर्थातच कारवाई म्हणजे तुरुंगवास वगैरे नसतो. पदोन्नती व पगारवाढ रद्द होणे असे शिक्षेचे प्रकार आहेत.) भारतातही कुटुंबनियोजन सक्तीचे करण्याचे प्रस्ताव आले, आणीबाणीत तसा प्रयत्नही झाला, पण तोही मर्यादितच होता. भारताची आजची लोकसंख्या सुमारे ११३ कोटी आहे. चीनची १३५ कोटी. पाकिस्तान १७ कोटी. बांगलादेश १५ कोटी. श्रीलंका दोन कोटी. (म्हणजे अखंड भारताची- श्रीलंकेसहित- लोकसंख्या १४७ कोटी झाली असती.)भारतीय उपखंडाचे एक संघराज्य असावे-भूतान, नेपाळ अगदी अफगाणिस्तानचाही समावेश करून-असा प्रस्तावही बऱ्याच वेळा मांडला गेला आहे. स्वातंत्र्यापूर्वी आणि नंतरही. (अगदी अलिकडे ‘फ्रीडम अ‍ॅट मिडनाइट’ या पुस्तकाचे एक लेखक डोमिनिक लॅपिअर यांनी तर ती नजीकच्या काळातील शक्यता असल्याचेही म्हटले.) जर भारतीय उपखंडाचा एक संघराज्यीय देश निर्माण झाला तर तो जगातील सर्र्वात मोठा देश असेल- लोकसंख्येने आणि भौगोलिकतेनेही. आज या उपखंडातील देश परस्परांपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी आणि दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी दीड लाख कोटी रुपये खर्च करतात. ते सर्व पैसे मग युद्धसज्जतेऐवजी मूलभूत गरजा भागविण्यासाठी आणि आनंद-स्वातंत्र्य बहाल करण्यासाठी खर्च करता येईल. मग जगातील सर्वात समृद्ध आणि बलाढय़ बाजारपेठेचा देश म्हणून भारतीय उपखंडाच्या संघराज्याची ओळख दिली जाऊ शकेल. परंतु हेच स्पष्टीकरण अवघ्या जगाला लागू आहे. म्हणून जगाचा शस्त्रास्त्रनिर्मिती आणि सुरक्षा यंत्रणांवरचा, अण्वस्त्रे व इतर संहारक अस्त्रांवरचा खर्च जर झाला नाही तर जगातील सर्व साडेसहाशे कोटी लोकांना अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण असे सर्व काही सहज पुरविता येईल. आणि प्रत्येकजण स्वत:चा सुख-समाधानाचा मार्गही स्वतंत्रपणे चोखाळू शकेल. मग तो माणूस कोणत्याही देशाचा, धर्माचा, विचाराचा असो. हे वर वर पाहता सध्या अशक्य वाटते, पण तितके अशक्यप्राय नाही.विसाव्या शतकाच्या अगदी पहिल्या दिवशी, म्हणजे १ जानेवारी १९०१ रोजी लंडनहून प्रसिद्ध होणाऱ्या बहुतेक वृत्तपत्रांनी तसे आशावादी चित्र रेखाटले होते. तेव्हा जगात ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या अखत्यारीत ५६ वसाहती होत्या. त्या तत्कालीन आशावादी विचारवंतांना वाटले होते की, ब्रिटिश साम्राज्याच्या उदार छत्राखाली अवघे जग एकवटू शकेल आणि सुखी होईल. तो आशावाद फक्त १३ वर्षांनीच धुळीला मिळाला. पहिले महायुद्ध सुरू झाले आणि ते तब्बल पाच वर्षे चालले. लक्षावधी लोक ठार झाले, कोटय़वधी देशोधडीला लागले. राष्ट्रवादी भावनेला विद्वेषाची तीक्ष्ण धार प्राप्त झाली. तरीही तो आशावाद टिकून होता. ‘लीग ऑफ नेशन्स’ या नावाची एक आंतरराष्ट्रीय संघटना स्थापन झाली. परंतु युरोपियन साम्राज्य आणि वसाहती तशाच होत्या.आफ्रिकेसारखा प्रचंड नैसर्गिक साधन-संपत्ती असलेला खंड त्या वसाहतवादी राजवटीखाली भरडला जात होता. याच खंडातून सोळाव्या शतकात पायांना साखळदंड बांधून आफ्रिकन लोकांना गुलाम म्हणून अमेरिकेत नेले गेले होते. साम्राज्यशाहीच्या जोखडात असलेले जग त्या आदर्शवादी स्वप्नाची पूर्ती करूच शकले नसते. म्हणूनच ‘लीग ऑफ नेशन्स’ या संघटनेने प्रसिद्ध केलेला जाहीरनामा उधळून लावून युरोपातील देश पुन्हा युद्धात उतरले. खरे तर पहिले आणि दुसरे ‘जागतिक’ म्हणून ओळखले जाणारे महायुद्ध हे युरोपियन वसाहतवादाच्या हिंस्र स्पर्धेतून उद्भवले होते.पहिले महायुद्ध सुरू असतानाच रशियात लेनिनच्या नेतृत्वाखाली कामगार क्रांती झाली. या ‘बोल्शेविक’ क्रांतीने पुन्हा एकदा त्या ‘विश्वमानव’ संकल्पनेला उभारी दिली होती. विसावे शतक पूर्ण व्हायच्या आतच अवघे जग ‘समाजवादी’ होईल; न्यायाची, समतेची, शांततेची, सहकार्याची सर्वत्र प्रस्थापना होईल, अशी खात्री तत्कालीन कम्युनिस्टांना वाटत होती. ‘आता क्रांती अगदी समीप आली आहे. रिव्होल्युशन इज जस्ट राऊंड द कॉर्नर’ असे मानणारे लक्षावधी कॉम्रेड्स जगभर होते. दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या नाझी भस्मासुराचा संपूर्ण नि:पात झाल्यानंतर आणि विशेषत: माओंच्या नेतृत्वाखाली झालेल्या चीनमधील कम्युनिस्ट क्रांतीनंतर, ‘समाजवादी जग’ बहुतेकांना अगदी आटोक्यात आल्याचे वाटू लागले होते. खुद्द अमेरिकेतही तशी क्रांती होऊ शकेल, असेही मानणारे अमेरिकन व इतर कम्युनिस्ट होते. युरोप-अमेरिकेतील भांडवलशाही व साम्राज्यवादी देशांनीही या संभाव्य साम्यवादी क्रांतीचा धसका घेतला होता. चीनची क्रांती १९४९ ची. भारत स्वतंत्र झाला होता १९४७ साली. त्यामुळे विसाव्या शतकाच्या दुसऱ्या अर्धशतकात थेट ब्रिटन-अमेरिकेवरच लाल निशाण फडकेल असे जगातल्या अनेक (भाबडय़ा) कम्युनिस्टांना वाटत होते. (लाल किले पे लाल निशान, माँग रहा है हिंदुस्तान- ही घोषणा तर अगदी अनेक लेखक, कवी, नाटककारांनीही मनोमन स्वीकारली होती. इंडियन पीपल्स थिएटर्स असोसिएशनचे (इप्टा) अनेक कलाकार त्याच आशेने आणि इर्षेने काम करीत होते.) परंतु १९८९ साली बर्लिनची भिंत पडल्यानंतर आणि १९९१ साली सोविएत युनियनचे विघटन झाल्यानंतर हे साम्यवादी स्वप्नही लयाला गेले.प्रत्यक्षात दुसऱ्याही स्तरावर असे जग एकवटण्याचे प्रयत्न सुरू होते. ‘युनायटेड नेशन्स’ (युनो) ऊर्फ राष्ट्रसंघ स्थापला गेला तो त्याच उद्देशाने. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धातील विध्वंस अनुभवल्यामुळे जग आता सुज्ञपणे व्यवहार करील, असा आशावाद ‘युनो’च्या संकल्पनेमागे होता. पंडित नेहरूंपासून स्टॅलिनपर्यंत आणि अमेरिकेच्या हॅरि ट्रुमन (त्या वेळचे अध्यक्ष) यांच्यापासून ते फ्रान्सचे युद्धातील सरसेनापती चार्लस् द गॉल आणि ब्रिटनचे विन्स्टन चर्चिल यांच्यापर्यंत सर्वानी ‘युनो’च्या संकल्पनेला पाठिंबा दिला. जगातील सर्व प्रश्न सामंजस्याने, संवादाने आणि समन्वयाने सोडविण्याचे व्यासपीठ म्हणून ‘युनो’ असेल, असे ठरले.आता युनो एकसष्ठीत आली आहे. गेल्या ६१ वर्षांत तिसरे महायुद्ध भडकले नाही हे खरे, पण शीतयुद्धाच्या काळात इतकी लहान-मोठी युद्धे झाली की संहार थांबलाच नाही आणि समन्वय प्रस्थापित झालाच नाही. ‘युनो’ची मुख्य ‘आंतरराष्ट्रीय संसद’ न्यूयॉर्कमध्ये आहे. विशेष म्हणजे एका सत्प्रवृत्त भांडवलदाराने न्यूयॉर्कमधील अतिशय मौलिक जमीन युनोची वास्तू उभारण्यासाठी दिली. पहिली काही वर्षे तशी अतिशय आशादायी होती. ‘युनो’चे सर्वदेशीय सैन्यदल उभे केले गेले (ते अजूनही आहेच.) जेथे जेथे दोन देशांमध्ये मतभेद वा संघर्ष होईल तेथे हे सैन्य पाठवून युद्धविराम घडवून आणेल आणि संवादासाठी वातावरण निर्माण केले जाईल, असे ठरले. (कोरिया, काँगो अशा काही ठिकाणी तसे काही प्रमाणात यशही आले.)याच काळात दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच्या दशकात आफ्रिकेतील वसाहतींनी स्वातंत्र्यलढे सुरू केले. अनेक नवे देश स्वतंत्र व सार्वभौम म्हणून निर्माण झाले आणि युनोचे सदस्यही झाले. या घडीला ‘युनो’च्या आंतरराष्ट्रीय संसदेत १९२ देशांचे प्रतिनिधी आहेत. जागतिक शांतता व सलोखा निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न किती यशस्वी झाले? अमेरिकेने व इस्रायलने अनेक वेळा ‘युनो’च्या ठरावांना कचऱ्याची टोपली दाखविली. संवाद व वाटाघाटी उधळून लावल्या. अगदी अलिकडे म्हणजे इराकवर अमेरिकेने लादलेले युद्ध हे ‘युनो’ला झुगारूनच पुकारले गेले होते. ‘युनो’ आता स्थूल अर्थाने जागतिक नैतिकतेचे व्यासपीठ आहे; परंतु आता बहुतांश दृष्टिकोनांतून ‘युनो’ निष्प्रभ झाले आहे.थोडक्यात, विसाव्या शतकाच्या सुरुवातीला व्यक्त झालेला आशावाद आणि आदर्शवाद जवळजवळ धुळीला मिळाला आहे. (याच राखेतून वा धुळीतून तो पुन्हा नक्कीच निर्माण होईल, पण आजतरी तो निष्प्रभ अवस्थेत आहे.) युनोची स्थापना झाली तेव्हा फक्त दोन ‘अधिकृत’ अण्वस्त्रधारी देश होते. आता सात आहेत. तेव्हा आजच्यासारखा दहशतवाद नव्हता. ‘न्यूक्लिअर टेररिझम’चा धोका तर कल्पनेतही नव्हता. ‘मानवी बॉम्ब’ नव्हते. (ध्येयासाठी मरायला तयार असणे आणि मानवी बॉम्ब होणे यात तसा फरक नाही, पण बेछूट दहशतवादाचे परिमाण मात्र नवे आहे.) ‘युनो’चे विविध देशांच्या अण्वस्त्र-अस्मितांवर नियंत्रण नाही. दहशतवादावर तर अजिबात नाही. दहशतवादाचे निश्चित असे एकच केंद्रही नाही. पाकिस्तान, पॅलेस्टिन, अफगाणिस्तान, सौदी अरेबिया आणि इस्रायल, श्रीलंका अशा अनेक देशांत ती केंद्रे आहेत. पूर्वी कधी नव्हत्या इतक्या अस्मिता-भाषा, संस्कृती, धर्म, वर्ण, वंश,ं जात, देश, प्रांत-आता उफाळून आल्या आहेत. या सर्व अस्मिता कुणाच्या ना कुणाच्या विरोधात आहेत आणि सर्वाचे आविष्कार हिंसक आहेत. विसाव्या शतकात सार्वत्रिक शांतता आणि समन्वय वा समाजवाद प्रस्थापित झाला नाही. हे शतक संपायच्या आत किमान शांतता प्रस्थापित झाली तर बाकी प्रश्न-रोटी-कपडा-मकान आणि आनंद स्वातंत्र्याचे.
कुमार केतकर

कलियुगाचे आव्हान - ३




कलियुगाचे आव्हान - ३
काही तज्ज्ञ आणि ‘फ्यूचरॉलॉजिस्टस्’ म्हणजे विज्ञाननिष्ठ भविष्यवेधी असे मानतात की, या पृथ्वीला दिवसेंदिवस लोकांचा भार वाहणे अशक्य होत आहे. त्यांच्या मते आजची ६५० कोटी, हीच लोकसंख्या किमान तीन पटींनी जास्त आहे. काही डेमोग्राफर्स ऊर्फ लोकसंख्यातज्ज्ञ असे ‘गणित’ मांडतात की, अजून ४१ वर्षांनी म्हणजे २०५० साली ही लोकसंख्या ९५० कोटी किंवा १० अब्जांच्या आसपास असेल आणि त्यानंतर फारशी वाढणार नाही. शतकाच्या अखेपर्यंत (२१९९ सालापर्यंत) १२ ते १५ अब्ज इतकीही लोकसंख्या होऊ शकेल, असे म्हणणारे तज्ज्ञ आहेत. पण आता बहुतेक तज्ज्ञ शतकाच्या अखेपर्यंतची लोकसंख्या १० ते १२ अब्ज याच्या आतच असेल, या निष्कर्षांप्रत आले आहेत. म्हणजे फार फार तर आजच्या लोकसंख्येपेक्षा दुपटीहून थोडी कमीच.
आपण नियोजनासाठी ६ ते १० अब्ज लोकसंख्येचा विचार करू या. ही संख्या प्रचंड आहे (वा भासते) हे खरेच. परंतु बकमिन्स्टर फुलर (१८९६-१९८३) नावाचे अमेरिकन विचारवंत होऊन गेले. त्यांच्या मते पृथ्वी हा ‘भार’ सहज पेलू शकते. आज ते कठीण वा अशक्य वाटत असले तर त्याचे कारण हे की, ही लोकसंख्या अतिशय विषम पद्धतीने विभागली गेली आहे. त्याचप्रमाणे विषम गतीने वाढते आहे. युरोपातील काही देशांमध्ये दर दाम्पत्यामागे एक वा त्याहूनही कमी असा लोकसंख्यावाढीचा ‘हिशेब’ आहे. याउलट आशिया व आफ्रिका खंडात तो अडीच, तीन वा चार इतकाही आहे. आपल्याकडे उद्दिष्ट आहे ‘हम दो, हमारे दो’चे. चीनमध्ये ‘हम दो, हमारा एक’ हे उद्दिष्ट आहे. युरोपातील काही देशांची लोकसंख्या कमी होते आहे. इतकी की २०५० या वर्षांपर्यंत त्यापैकी काही देशांत तरुणांची संख्या खूपच कमी असेल आणि आयुष्यमान वाढल्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वृद्धच त्यांच्या समाजात असतील. बहुसंख्य वृद्ध हे तेव्हा निवृत्त झालेले असल्यामुळे शेतीत, कारखान्यात व सेवा क्षेत्रात काम करणाऱ्या तरुण व मध्यमवर्गीयांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा बोजा उचलावा लागणार आहे. कितीही प्रमाणात विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास झाला तरी माणसाची जागा यंत्रमानव वा संगणक घेऊ शकणार नाहीत. अन्नधान्य उत्पादन, वस्तूंची निर्मिती आणि शिक्षण, आरोग्य, व्यवस्थापन इत्यादी मुख्यत: मानवी श्रमांवर अवलंबून असेल तर काम करण्यासाठी माणसे लागणारच.काही युरोपातील देशांना वाटते की, आशियातील मजूरच नव्हे तर मॅनेजर्ससुद्धा आणि सॉफ्टवेअर इंजिनीअर्सच नव्हेत तर सेवा क्षेत्रातील कर्मचारीसुद्धा ‘आयात’ करूनच विकसित देश श्रम-तुटवडा भरून काढू शकतात. हे देश अमेरिकेचे उदाहरण देतात. अमेरिकेत ५० वषार्ंत पाच-दहा वर्षांचे ‘एच’ जातीचे व्हिसा दिले गेले, ‘ग्रीन कार्ड’ देऊन सर्व स्तरांवरील लोक आयात केले गेले आणि लाखो लोकांना नागरिकत्वही बहाल केले गेले. त्यामुळे अमेरिकेने श्रम-तुटवडय़ावर अशा रीतीने मात करून समृद्धी संपादन केली. कित्येकांचे मत असे आहे की, अमेरिकेचे ‘महासत्ता’ हे स्थान त्यांच्या या धोरणामुळेच त्यांना प्राप्त झाले आहे, शिवाय ‘युनायटेड स्टेट्स्’ म्हणजे विविध राज्यांची स्वायत्तता काही प्रमाणात तशीच ठेवून निर्माण केलेले संयुक्त राष्ट्र हे त्यांच्या विश्वसामर्थ्यांचे कारण आहे.परंतु युरोपातील देशांना अमेरिकेचे धोरण स्वीकारण्यात यश आलेले नाही. भाषेची व राष्ट्रीयतेची अस्मिता, अतिरेकी सांस्कृतिक अभिनिवेश आणि भौगोलिक सीमांसंबंधातले दुराग्रही धोरण यामुळे युरोप त्यांच्या गरजेच्या प्रमाणात ‘खुलेपणाचे’ धोरण स्वीकारू शकणारही नाही. म्हणजेच २०५० पर्यंत युरोपला आपली सुबत्ता टिकविणे आणि वाढविणे अधिकाधिक कठीण होत जाणार आहे.‘युरोपीयन युनियन’चे जे २३ सदस्य आहेत त्यांची एकत्रित लोकसंख्या ५० कोटी आहे- म्हणजे भारताच्या लोकसंख्येच्या निम्म्याहून कमी. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी फक्त सात टक्के लोक युरोपातील या २३ देशांमध्ये राहतात. याउलट फक्त भारताची लोकसंख्या जगाच्या १८ टक्के आणि आशियात तर ५० टक्के. ही आकडेवारी खरे तर समजायला तशी गुंतागुंतीची नाही, पण त्या आकडेवारीमागचे वास्तव मात्र अतिशय विदारक आहे.‘स्लमडॉग मिलीअनेर’ या चित्रपटात मुंबईतील घनदाट वस्तीचे धारावीतील चित्र दिसते ते आणि मुंबईच्या मलबार हिल, पेडर रोड वा पाली हिलचे चित्र आहे ते, हे म्हटले तर एकाच शहराचे चित्र आहे. पण प्रत्यक्षात त्या दोन स्वतंत्र, स्वायत्त, सार्वभौम जीवनशैली आहेत. मलबार हिल-पेडर रोडला राहणाऱ्या लोकांचे संदर्भ लंडन-न्यूयॉर्क-सॅन फ्रॅन्सिस्को येथील सुस्थित व सधन लोकांशी जोडलेले आहेत. याउलट झोपडपट्टय़ांमधील (आणि ग्रामीण दरिद्रय़ातील) जीवन हे भटक्या कुत्र्यांच्या जीवनाच्या जवळपासचे आहे. म्हणजेच एकाच शहरात ‘तीन जगे’ आहेत. श्रीमंत व धनदांडग्यांचे पहिले जग, मध्यमवर्गीयांचे (को- ऑपरेटिव्ह सोसायटय़ांचे) दुसरे जग आणि झोपडपट्टय़ा, फूटपाथ, रेल्वे प्लॅटफॉर्म, पाईपलाइन्स येथील तिसरे जग. युरोप-अमेरिकेतही असे अंतर्गत तिसरे जग आहे, पण तुलनेने त्यांची तेथील संख्या बरीच कमी आहे. मुंबई-कोलकाता-दिल्लीत त्यांची बहुसंख्या आहे.आपण ‘लोकसंख्येची समस्या’ असा विचार करतो तेव्हा आपल्याला दरिद्री, उपेक्षित, दाटीवाटीने राहणारे लोक अभिप्रेत असतात. श्रीमंतांनाच नव्हे तर मध्यमवर्गीयांनाही गरिबांची संख्या ही अडचण वाटते. बकमिन्स्टर फुलर या वर उल्लेखिलेल्या विचारवंताने संख्याशास्त्र व भूगोल या आधारे असे दाखवून दिले की, ‘देश’ नावाची संकल्पना पूर्णपणे रद्दबातल केली तरच ‘लोकसंख्येची समस्या’ दूर होऊ शकेल. फुलर यांच्या मते पृथ्वीवर जगण्यालायक जो भूप्रदेश आहे तो आणि एकूण लोक यांचे शास्त्रशुद्ध वाटप व्हायला हवे. उदा. मुंबई-महामुंबई व परिसर या प्रदेशाची लोकसंख्या दोन कोटींच्या आसपास आहे. अवघ्या ऑस्ट्रेलिया या खंडप्राय देशाचीही तेवढीच लोकसंख्या आहे. म्हणजेच ऑस्ट्रेलियाचा बहुतांश भूप्रदेश जगण्यालायक केला तर आजच्या किमान दहा पट, म्हणजे २० कोटी लोक त्या देशात राहू शकतात. कॅनडाची लोकसंख्या तर फक्त तीन कोटी आहे- म्हणजे महाराष्ट्राच्या एक तृतीयांश; परंतु भूप्रदेश मात्र महाराष्ट्राच्या किमान नऊ पट मोठा. शेतीयोग्य जमीन, जगण्यासारखे हवामान, गरजेप्रमाणे नैसर्गिक साधनसपंत्ती, उत्पादन सुविधा आणि पिण्याच्या व वापरायच्या पाण्याचे आवश्यकतेनुसार वाटप हे वैश्विक नियोजनाचे निकष असायला हवेत. फुलर यांच्या मते सर्वात महत्त्वाचा घटक होता-ऊर्जा. हे ऊर्जावाटप तर इतके विषम आहे की, आफ्रिका व आशियातील कोटय़वधी लोकांना वीज वा इंधन हे गरजेच्या एक-पंचमांशही मिळत नाही तर अमेरिका व युरोपात ते गरजेच्या पाच पट प्रमाणात मिळते. काही भविष्यवेधी विचारवंत मानतात की, या पुढचे जागतिक संघर्ष मुख्यत: पाणी आणि ऊर्जा या दोन मुद्दय़ांवरच होतील. या दोन्ही मुद्दय़ांची तीव्रता महायुद्ध घडवून आणण्याइतकी आहे. जरा विचक्षणपणे भूतकाळाचा आढावा घेतला आणि वर्तमानकाळाकडे कटाक्ष टाकून भविष्यकाळाकडे नजर नेली तर हा प्रश्न किती गंभीर आहे हे लक्षात येऊ शकेल.सुमारे एक हजार वर्षांपूर्वी, म्हणजे इ.स. १००० साली अवघ्या जगाची लोकसंख्या फक्त ३० कोटींच्या आसपास होती. तेव्हाही दारिद्रय़ होते, उपेक्षा होती, श्रीमंत व गरीब वर्ग होते, र्सवकष विषमता होती, पण तेव्हा शेती मागासलेली होती, यंत्रयुग अवतरले नव्हते, गरजा अगदी माफक होत्या आणि गरिबी ही विधिलिखित आहे, असे गृहीत धरले गेले होते. हळूहळू हा नियतीवादाचा पगडा जाऊ लागला. इ.स. १७५० साली जगाची लोकसंख्या ८० कोटी झाली. (म्हणजे अवघ्या जगाची लोकसंख्या तेव्हा, आजच्या भारताच्या लोकसंख्येपेक्षा ३० कोटींनी कमी होती).साधारणपणे १७५० ते १८०० या ५० वर्षांच्या काळात जगात बऱ्याच उलथापालथी झाल्या. युरोपीयन देशांच्या विस्तारवादामुळे जग रुंदावू लागले. नवीन बाजारपेठांच्या शोधांमुळे वसाहती केल्या जाऊ लागल्या. औद्योगिक क्रांतीमुळे जी उत्पादनक्षमता निर्माण झाली होती, तिच्यामुळे बाजारपेठा पादाक्रांत करणे क्रमप्राप्त होत गेले व त्यातूनच साम्राज्यवाद निर्माण झाला. साहजिकच त्याविरुद्ध संघर्षही जन्माला आले. इ.स. १७७६ साली झालेले अमेरिकन स्वातंत्र्ययुद्ध हे ब्रिटिश वसाहतवादाच्या विरोधात होते, तर त्यानंतर १७८९ साली झालेली फ्रेंच राज्यक्रांती ही फ्रान्समधील ‘दुष्ट’ राजेशाहीच्या विरोधात होती. असे म्हणतात की, फ्रेंच राज्यक्रांती मुख्यत: ‘भुकेतून’ जन्माला आली होती. लाखो लोक उपाशी मरत होते आणि त्याच वेळेस सधन राज्यकर्ता वर्ग बेबंद चैनीत जगत होता. त्या राजेशाहीला उखडून काढल्याशिवाय भुकेचा प्रश्न सुटणार नाही, असे तत्कालीन क्रांतिकारकांना वाटले. त्यातूनच समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या संकल्पना निर्माण झाल्या. म्हणजेच आहे त्या समृद्धीचे, संपत्तीचे, अन्नधान्याचे समान वाटप केले तर कुणीच उपेक्षित जीवन जगणार नाही ही त्यामागील साधी संकल्पना. (तीच संकल्पना पुढे समाजवादी विचारवंतांनी आणि फुलरसारख्या भांडवली विचारवंतांनीही मांडली).याच उलथापालथींच्या प्रक्षोभक कॅनव्हासवर थॉमस माल्थस नावाचा विचारवंत पुढे आला. त्याने १७९८ साली अशी मांडणी केली की, भुकेचा प्रश्न केवळ समता व बंधुत्वाच्या प्रस्थापनेने सुटणार नाही. माल्थसच्या मते लोकसंख्या ज्या वेगाने वाढते आहे, त्या वेगाने अन्नधान्य उत्पादन वाढणे अशक्य आहे. म्हणजेच लोकसंख्या आणि अन्नधान्य यांच्या व्यस्त प्रमाणामुळे दंगेधोपे, युद्ध वा दुष्काळ व टंचाई निर्माण होईल व सर्वत्र प्रक्षोभाचे वातावरण निर्माण होईल.परंतु पुढील काही वर्षांत वैज्ञानिक व तंत्रप्रगतीमुळे अन्नधान्याच्या उत्पादनात २५० टक्के वाढ झाली. लोकसंख्येच्या वाढीपेक्षा अधिक प्रमाणात अन्नधान्य व वस्तूंचे उत्पादन करता येऊ शकते हे सिद्ध झाल्यावर माल्थसचा सिद्धांत कालबाह्य़ झाला. परंतु नवीनच प्रश्न निर्माण झाला. लोकसंख्यावाढीची भीतीही बाळगण्याचे कारण नाही इतके उत्पादन करण्याची क्षमता माणसाकडे आली, पण खासगी मालकीचा अतिरेकी हक्क, एकूण उत्पादन-वितरणावरची मक्तेदारी आणि अवास्तव लोभ यामुळे नवी विषमता निर्माण झाली. म्हणजेच माल्थसचा सिद्धांत खोटा ठरूनही त्याने व्यक्त केलेली युद्ध, दुष्काळ, टंचाई ही भीती सार्थ ठरली. जर सहा अब्ज लोकांच्या गरजा पुरविणे शक्य असूनही आपण त्या पुरवीत नसलो तर १० अब्जांच्या कशा पुरविणार?






कुमार केतकर