इतिहासाचे नवे आवर्तन


इतिहासाचे नवे आवर्तन
बहुतेक भारतीयांना ‘फोरेन’ म्हणजे मुख्यत: युरोप-अमेरिका, फार तर जपान हे देश वाटतात. मादागास्कर, सुदान किंवा लाओस, कंबोडिया वा उरुग्वे, निकारागुआ या व अशा सुमारे दीडशेहून अधिक देशांना ‘फोरेन स्टेटस’ नाही. त्यातसुद्धा अमेरिकेला जाण्याची ‘क्रेझ’ ही १९६० च्या दशकात सुरू झाली आणि १९९० तर ती असंख्य मध्यमवर्गीयांचा ध्यासच बनून गेली. अमेरिकेची ‘क्रेझ’ प्रथम आयआयटीच्या (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी) बी.टेक. कोर्सपासून सुरू झाली आणि नंतर आयआयएमने (इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट) ती लाट अधिकच उंचावर नेली.अमेरिकेबद्दल इतके विलक्षण आकर्षण कशामुळे आणि कधी निर्माण झाले? आनंदीबाई जोशी सव्वाशे वर्षांपूर्वीच अमेरिकेला गेल्या होत्या, पण पुण्या-मुंबईच्या ब्राह्मण वर्गात तशी उत्सुकता त्यानंतर फारशी निर्माण झाली नाही. भारतातल्या शहरी, सुशिक्षित मध्यमवर्गात हॉलिवूडच्या चित्रपटांचे आकर्षण होते. अगदी १९३० ते १९५० च्या काळात ग्रेटा गाबरेपासून ते कॅथरिन हेपबर्नपर्यंत, जेम्स स्टय़ुअर्टपासून क्लार्क गेबलपर्यंत (असे खूप ‘स्टार्स’ आहेत की ज्यांनी मध्यमवर्गीयांच्या हृदयात घर केले होते) आणि लॉरेल हार्डी, मार्क्‍स ब्रदर्स, चार्ली चॅप्लिनपर्यंत कित्येक नावे घराघरात पोचली होती. हॉलिवूडने अमेरिका नावाची प्रतिमा, एक स्वप्ननगरी भारतात आणली होती. तेव्हा हिंदी चित्रपटसृष्टीही बहरलेली होती. (‘बॉलिवूड’ या नावाने तिचे बारसे झालेले नव्हते) दिलीपकुमार, राज कपूर तसेच नर्गिस-गीता बाली अशा अनेक नटय़ा, आताच्या परिभाषेत तरुणांच्या ‘हार्ट थ्रॉब्स’ झाल्या होत्या. त्या वेळच्या हिंदी चित्रपटांवरही मुख्य संस्कार हॉलिवूडचाच होता. सगळे नायक त्यांच्या विरहाची गाणी दर्दभऱ्या आवाजात पियानोवर बसून म्हणत. नायक आणि खलनायक लांबलचक अमेरिकन मोटारींमधून-प्लायमाऊथ, फोर्ड वगैरे-फिरत. (तेव्हा अगदी मोजक्या सरंजामी श्रीमंतांकडेच त्या मोटारी असत.) अमेरिकन सिगारेट्सची फॅशनही तेव्हाच रुजली. असे असूनही प्रत्यक्ष अमेरिकेला जाण्याची ‘क्रेझ’ मात्र १९६० च्या अखेरीस सुरू झाली. म्हणजे ज्या मध्यमवर्गीयांना हॉलिवूडने १९३० ते १९५० च्या काळात भारावून टाकले त्यांच्या नातवंडांपर्यंत अमेरिका मध्यमवर्गीयांची ‘मक्का’ झाली नव्हती.एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपासून ते अगदी १९६०-७० पर्यंत ‘फोरेन’ म्हणजे मुख्यत: इंग्लंड! पूर्ण ब्रिटनसुद्धा नव्हे. फक्त इंग्लंड आणि त्यातही लंडन हे मुख्य आकर्षण. मधल्या काळात म्हणजे साधारणपणे १९२५ ते १९३५ या दशकाच्या अलीकडे-पलीकडे जर्मनीबद्दल आकर्षण होते. पुण्या-मुंबईतच नव्हे तर अगदी कलकत्त्यातही जर्मनी, तसेच फ्रान्स हे देश सुशिक्षित मध्यमवर्गीयांना आकर्षून घेत असत. जर्मन व फ्रेंच भाषा शिकण्याची (समांतर) फॅशन तेव्हा रुजू झाली. काही जणांचे जर्मनीबद्दलचे आकर्षण तर थेट नाझी व हिटलर यांच्यापर्यंत होते. (अजूनही त्या आकर्षणाचे वारसदार आहेत.)पोर्तुगालची गोव्यात वसाहत होती, पण पोर्तुगालबद्दल देशात तसे कुतूहल निर्माण झाले नाही. पहिली ईस्ट इंडिया कंपनी डच होती, पण तितके नेदरलँडबद्दलही आकर्षण नव्हते. इंग्रजांचे राज्य होते आणि त्यांनी इंग्रजी भाषाच नव्हे तर त्यांच्या साहित्य-कलाही या मध्यमवर्गात रुजविल्या होत्या. शेक्सपियर, शेली ते शॉ आणि वर्डस्वर्थ ते वुडहाऊस हे इंग्रजी शिकलेल्यांचे ‘आयकॉन्स’ होते. शेरलॉक होम्स ते अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या कथा-कादंबऱ्या या वर्गात चवीने (आणि प्रतिष्ठेने) वाचल्या जात.लंडनला जाऊन शिक्षण घेणे याला तर प्रचंड प्रतिष्ठा होती. पंडित नेहरू असोत वा स्वा. सावरकर, सी.डी. देशमुख असोत वा स.गो. बर्वे, रँग्लर परांजपे असोत वा जयंत नारळीकर, इंग्लंडला भारतीय सुशिक्षितांच्या जीवनात अनन्यसाधारण महत्त्व होते. विशेष म्हणजे स्वातंत्र्यचळवळीत-अगदी स्वदेशी मोहीम चालू असतानाही इंग्लंडबद्दल द्वेष वा नफरत वा शत्रुत्वाची तशी भावना नव्हती.त्या काळचे कित्येक कम्युनिस्ट तर इंग्लंडला प्रथम फक्त शिकायला गेले आणि तिकडून येताना मार्क्‍स-लेनिनवाद बरोबर घेऊन आले. भारतातल्या कम्युनिस्टांची वैचारिक व सांस्कृतिक नाळ ही इंग्लंडशी (ब्रिटिश कम्युनिस्ट पार्टीशी) जोडलेली होती. कम्युनिस्टांची टवाळी उडवताना समाजवादी आणि संघवाले म्हणत की, ‘मॉस्कोत पाऊस पडू लागल्यावर, भारतातले कॉम्रेड्स् इकडे छत्र्या उघडतात.’ परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्ष सोविएत युनियनच्या (म्हणजे प्रत्यक्षात रशियाच्याच) बाजूचा असला तरी इथल्या कॉम्रेड्स्वर मॉस्कोचा संस्कार कमी आहे. याचे एक कारण इंग्रजी भाषा आणि दुसरे कारण म्हणजे मार्क्‍स-एंगल्सचे सर्व वाङ्मय भारतात आले ते इंग्लंडमधून. मॉरिस डॉब आणि हॅरॉल्ड लास्की यांच्यासारख्या डाव्या ब्रिटिश मंडळींकडून समाजवादी-साम्यवादी विचार भारतात आला. इंग्रजी साम्राज्यवादाच्या विरोधात लढणारे महात्मा गांधी असोत वा सुभाषचंद्र बोस वा अगदी मोहमद अली जीना हे सर्व ‘बॅरिस्टर’ होते!डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अमेरिकेतील शिक्षणाचाही संस्कार असला तरी त्यांची उदारमतवादी, चिकित्सक आणि समाजशास्त्रीय विचारपद्धती मुख्यत: ब्रिटिश वारशातूनच आली होती. फाळणीअगोदर आणि नंतर हजारो सुशिक्षित मुस्लिमांनाही आधार इंग्लंडचाच होता. त्या काळात म्हणजे १९७० च्या अगोदर इंग्लंडमध्ये स्थायिक झालेल्या हिंदू-मुस्लिमांची आता तेथे तिसरी-चौथी आणि पाचवीही पिढी ‘लंडनस्तानी’ झाली आहे. (याच नावाने गौतम मलवानी यांची कादंबरीही प्रसिद्ध झाली आहे.)स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इंग्लंडची राणी एलिझाबेथ प्रथमच भारतात आली असताना तिचे ‘दर्शन’ घ्यायला जी अलोट गर्दी जमली होती, ती पाहून ब्रिटिश राज्यकर्त्यांनाही खात्री पटली की आपल्याविरोधात ‘चले जाव’ असा आदेश जरी काढला गेला होता तरी आपल्याबद्दल येथे शत्रुत्वाची भावना अजिबात नाही.त्या काळी इंग्लंडला कुणी जात, तेव्हा तो ‘विलायते’ला गेला असे म्हटले जात असे. जणू ‘विलायत’ म्हणजे फोरेन’ आणि ‘फोरेन’ म्हणजे इंग्लंड! वस्तुत: ‘विलायत’ या नावाचा प्रांत आहे तुर्कस्तानात आणि तो भाग मुस्लिम व्यापाऱ्यांनी व्यापलेला आहे. जेव्हा युरोपबरोबर व्यापार खुष्कीच्या मार्गाने होत असे (वास्को-द-गामाच्या सामुद्री मार्गाच्या साहसी शोधापूर्वी) तेव्हा हिंदू व मुस्लिम व्यापाऱ्यांना तुर्कस्तानमधून जावे लागत असे. ‘विलायत’ हा युरोपला जातानाचा एक मोठा ‘ट्रेड हॉल्ट’ किंवा व्यापाऱ्यांचा थांबा. तुर्कस्तानमध्ये, विशेषत: इस्तंबूलमध्येही, बहुसंख्य मुस्लिम लोकच असले तरी त्यांची जीवनशैली मात्र युरोपियन आहे. चर्च आणि मशिदी या देशात एकाच ठिकाणी आहेत. जगातले लाखो पर्यटक हा धर्म-बंधुत्वाचा वास्तुशास्त्रीय वारसा बघायला इस्तंबूलला जातात. टर्कीला ‘नाटो’चे (नॉर्थ अ‍ॅटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) सदस्यत्व मिळाले आहे, पण युरोपियन संघात तुर्कस्तानला सामील करून घ्यायला काही देशांचा विरोध आहे. (म्हणजे तुर्कस्तानने धर्मबंधुत्वाचे धोरण घेतले असले तरी युरोपातील ख्रिश्चन राष्ट्रांना मात्र त्यांचा ‘इस्लाम’ अजूनही काहीसा ठसठसतो.)सुमारे हजार वर्षांपूर्वीच्या ख्रिश्चन व मुस्लिमांच्या हिंस्र संघर्षांमुळे-क्रूसेड्समुळे-अजूनही पारंपरिक युरोपियनांच्या मनात ठसठस आहे. म्हणूनच अमेरिकेने इराकवर (आणि अफाणिस्तानवर) केलेल्या हल्ल्यांना जॉर्ज बुश यांनी अनावधानाने (?) ‘क्रूसेड्स्’ असेच संबोधले होते. ब्रिटन थेट अमेरिकेबरोबर युद्धात उतरले आणि सुरुवातीला विरोध करून शेवटी फ्रान्स व जर्मनी (बाकी युरोपनेही) त्या युद्धाला पाठिंबा दिला. त्यामुळे ‘क्रूसेड्स्’च्या जखमा भळभळू लागल्या आणि टर्कीवरही नव्याने इस्लामचा शिक्का मारला गेला.सुमारे ५०० वर्षांपूर्वी कॉन्स्टॅन्टिनोपल (म्हणजेच इस्तंबूल) या तुर्की राजधानीवरचा युरोपचा ताबा युद्ध व यादवी यामुळे सुटला. त्यामुळे भारतीय उपखंडातून विलायतमार्गे युरोपला जाणाऱ्या व्यापाऱ्यांचा मार्ग खुंटला. युरोपला मसाल्याचे पदार्थ, सिल्क व इतर बऱ्याच वस्तू आशियातून जात. तो व्यापार चालू ठेवायचा असेल तर नवीन मार्ग शोधायला हवा. त्यातूनच कोलंबस आणि वास्को-द-गामा हे साहसी खलाशी हिंदुस्तानच्या शोधाला निघाले. कोलंबस स्पॅनिश आणि वास्को-द-गामा हा पोर्तुगीज. कोलंबस थडकला तो अमेरिकेच्या किनाऱ्यावर. त्याला वाटले, भारतीय उपखंड गवसला. प्रत्यक्षात त्याला ‘सापडली’ होती अमेरिका. खरे म्हणजे अमेरिकेला त्यापूर्वी, सामुद्री मार्गाने चिनीही गेले होते. शिवाय अमेरिका ‘शोधून’ काढण्याचा प्रश्न नव्हताच. कारण त्या विशाल भूभागावर वस्ती होती, प्राथमिक स्वरूपातील शेती होती आणि स्थानिक संस्कृतीही होती. पण कोलंबसच्या ‘शोधा’नंतर युरोपियन तिकडे जाऊन, स्थानिकांना ठार मारून वा त्यांना देशोधडीला लावून तेथे प्रस्थापित झाले. म्हणूनच युरोपातील काही इतिहासकार अमेरिकेला युरोपचे व रेनेसाँचे ‘एक्स्टेन्शन’ किंवा ‘सिव्हिलायझेशन’चा विस्तार मानतात.परंतु या गडबडीत कोलंबसच्या हातातून हिंदुस्तान मात्र निसटला होता. तो वास्को-द-गामाला (१४९८ साली) ‘सापडला.’ भारतीय उपखंडात प्रगल्भ आणि प्रगत समाजव्यवस्था होती, उत्पादनतंत्र होते, प्रशासन व तत्त्वज्ञानही होते. (अगदी जातीव्यवस्थेच्या उतरंडीसहित!) वास्को-द-गामाच्या मार्गाने मग इतर युरोपियन भारताच्या दिशेने येऊ लागले. जर्मन (१५०३ साली) आणि त्यानंतरच्या शतकभरात डच, फ्रेंच, ब्रिटिश व्यापारासाठी आले. या युरोपियनांना आपल्या भाषा येत नव्हत्या. हवामान, शेतीव्यवस्था माहीत नव्हती. इथल्या छोटय़ा राजवटींची कल्पना नव्हती. आपल्याकडचे टोळीजीवन, सुसंघटित कुटुंबजीवन, रीतिरिवाज, नीतिनियम काहीही माहीत नव्हते. या भागात आपल्याला सत्ता काबीज करता येईल वा करावी असे वाटण्याचाही तसा प्रश्न नव्हता. त्यांना फक्त व्यापार करायचा होता.परंतु खुद्द युरोपात तेव्हा आपापसात प्रचंड धुमश्चक्री चालू होती. इंग्लंडविरुद्ध फ्रान्स, स्पेन विरुद्ध पोर्तुगाल, रशिया विरुद्ध फ्रान्स असे तुफानी संघर्ष चालू होते. ते मुख्यत: व्यापाराच्या स्पर्धेतूनच चालले होते. साहजिकच ते सर्व संघर्ष आपल्या भूमीपर्यंत येऊन थडकले. युरोपातील परस्परांच्या युद्धात कोण जिंकते वा हरते यावर भारतीय उपखंडातील व्यापारावर कोणाचा कब्जा राहणार हे ठरू लागले होते. पोर्तुगीजांनी ‘शोधून’ काढलेल्या हिंदुस्तानमध्ये डचांची ईस्ट इंडिया कंपनी आली आणि पुढे प्लासीला फ्रान्स आणि इंग्लंडची लढाई होऊन फ्रेंच हरले आणि भारत हळूहळू ब्रिटिशांची वसाहत बनला. याच काळात युरोपियन देश अशाच लढाया, स्पर्धा, तह आणि तंटे अमेरिकेतही करीत होते.भारतात इंग्रजांनी १७५७ साली फ्रेंचांना अखेर नामोहरम केले, पण १७७६ साली इंग्रजांनाच ‘अमेरिकनांनी’ पराभूत करून ‘स्वतंत्र अमेरिका’ घोषित केली. त्यामुळे पुन्हा एकदा जागतिक व्यापार-व्यवस्थेत खळबळ माजली. अमेरिकनांच्या ‘स्वातंत्र्ययुद्धात’ फ्रान्सने मदत केली होती. त्याच फ्रान्समध्ये त्यानंतर १७८९ साली क्रांती झाली आणि युरोपातील आधुनिक विचारांच्या पर्वाला सुरुवात झाली-त्याचबरोबर औद्योगिक क्रांतीला आणि बाजारपेठांच्या विस्तारालाही. युरोपातील तत्त्वज्ञान, साहित्य-कला, जीवनशैली आणि एकूणच व्यापार-संस्कृतीही त्या विस्तारित साम्राज्याबरोबर पसरली. युरोपबद्दल भारतीयांना वाटणारे आकर्षण तेव्हापासूनचे आहे. तेव्हा ब्रिटनने इतर युरोपियन देशांच्या पुढे आघाडी मारलेली असल्यामुळे एकूणच ‘इंग्लिश’ भाषा व संस्कृतीचा प्रसार झाला. भारतात आधुनिकता (युरोपियन अर्थाने) आली ती इंग्लंडमधून आणि म्हणूनच अगदी स्वातंत्र्यचळवळीतही महात्मा गांधी म्हणत, ‘आम्ही ब्रिटिशांच्या विरुद्ध अजिबात नाही-फक्त त्यांनी येथे राज्य करू नये, ते आमचे आम्ही करायला समर्थ आहोत!’दुसरे महायुद्ध संपल्यानंतरच्या २० वर्षांत ब्रिटिश साम्राज्यावरचा सूर्य झपाटय़ाने मावळू लागला. त्यांचे साम्राज्य लयाला जाऊ लागले तसतसा अमेरिकेचा दबदबा वाढू लागला. कारण आता समृद्धीची दालने अमेरिकेत खुली होत होती. जर्मनी, फ्रान्स, इंग्लंड- यांच्याबद्दलचे आकर्षण कमी होत गेले. ३०-४० वर्षांत अमेरिकेने तंत्रज्ञान आणि भांडवली अर्थकारण याद्वारे जागतिक प्रभुत्व प्रस्थापित केले. त्यातूनच अमेरिकेला जाण्याची ‘क्रेझ’ निर्माण झाली.आता इतिहास नवीन आवर्तन घेतो आहे. अमेरिकेला मंदीने वेढा टाकला आहे आणि त्यांच्या समृद्धीचा सूर्यही मावळतीला लागला आहे।
कुमार केतकर

No comments:

Post a Comment