कलियुगाचे आव्हान


कलियुगाचे आव्हान


या म्हणजे एकविसाव्या शतकाची फक्त आठच वर्षे पूर्ण झाली आहेत। हे शतक पूर्ण होऊन बाविसावे शतक सुरू व्हायला अजून ९२ वर्षे बाकी आहेत. म्हणजे आज किंवा या वर्षी जन्माला आलेले मूल हे शतक संपताना ९२ वर्षांचे असेल. सर्वच मुले नव्हेत; परंतु ज्यांना चांगला परिसर, सकस आहार, योग्य प्रकारची वैद्यकीय मदत, तीही योग्य वेळेला, सुदृढ प्रकृती, अनुकूल कौटुंबिक आणि सामाजिक वातावरण- अर्थातच नशीबही (!) लाभेल त्यांना बाविसाव्या शतकाची पहाट उजाडताना पाहायला मिळेल. २०/२५ वर्षांत जे वैद्यकीय संशोधन होणार आहे, त्यामुळे आयुष्यमान वाढणार आहे. शिवाय,
निदान सुस्थितीतील मध्यमवर्गाला ऐहिक स्थितीही बऱ्यापैकी प्राप्त होणार आहे; परंतु त्याच वेळेस समाजात कोटय़वधी (नव्हे, अब्जावधी) लोक असे असणार आहेत, की ज्यांच्या नशिबी (!) तशी सुस्थिती असणार नाही। समृद्धी आणि विषमता, दोन्ही एकाच गतीने वाढत जाणार आहे। ती दरी वाढेल, तेव्हा भडका उडेल, दंगे-धोपे होतील, युद्धही होऊ शकेल। कारणे वेगवेगळी असू शकतील- राष्ट्रवाद, धर्मवाद, सांस्कृतिक अस्मिता, खनिज संपत्तीवरचा कब्जा, पाणी, भाषावाद, विषमता असे बरेच काही!कुणाच्याही आटोक्यात येऊ शकणार नाही, असा दहशतवाद जगभर फोफावतो आहे. तो केव्हा, कुठे आणि कोणत्या स्वरूपात प्रकट होईल हे निश्चितपणे सांगणे अतिशय अवघड होत जाणार आहे. एक वेळ भूकंप, ज्वालामुखी, सुनामी यांचा अंदाज वैज्ञानिक प्रगतीमुळे करता येऊ शकेल; परंतु दहशतवादी हल्ल्यांचा र्सवकष बंदोबस्त वैज्ञानिक (किंवा मनोवैज्ञानिक!) संशोधनातून करता येऊ शकेल, अशी चिन्हे नाहीत. तसे पाहिले तर आपण सर्वच जीवन-मरणाच्या हिंदोळ्यावर असतो; आणि कुणीही अमर्त्य नाही. (अमर्त्य सेनही नाही!) जीवन क्षणभंगूर असल्याचेही आपण लहानपणापासून ऐकत असतो. मृत्यू तर आपल्याला ठायी ठायी दिसतच असतो- वृद्धापकाळामुळे, आजारपणामुळे, अपघातामुळे वगैरे वगैरे, परंतु दहशतवादी हल्ल्यामुळे मरण येणे, हे आणि युद्धामुळे वा युद्धात मरण येणे यात खूप फरक आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात, मुख्यत: युरोपात प्रत्येकच जण मृत्यूच्या छायेत होता. कुठेही आणि केव्हाही बॉम्बहल्ला होण्याची शक्यता असे. हिरोशिमा-नागासाकीच्या माणसांना तर अगदी आदल्या दिवशीही दुसऱ्या दिवशीच्या हाहाकारी नरसंहाराची कल्पना नव्हती.दुसरे महायुद्ध हे त्या अर्थाने पहिल्या महायुद्धापेक्षाही अधिक विदारक आणि विध्वंसक होते. पहिल्या महायुद्धातही लाखो निष्पाप-नि:शस्त्र नागरिक मारले गेले, पण दुसऱ्या महायुद्धात एकूणच संहाराची व विध्वंसाची व्याप्ती प्रचंड होती. तसे पाहिले तर त्या दोन युद्धात अंतर फारच कमी होते. पहिले महायुद्ध १९१९ साली संपले आणि दुसरे १९३९ साली सुरू झाले. फक्त २० वर्षांनी. याच २० वर्षांच्या काळात हिटलर आणि स्टॅलिन उदयाला आले. युद्ध नसतानाच्या त्या २० वर्षांच्या काळातही त्या दोघांच्या कारकिर्दीत प्रचंड नरसंहार झाला. फक्त ६० लाख ज्यूच नव्हेत तर त्यांच्याबरोबर कम्युनिस्ट, इतर देशांचे युद्धकैदी, विद्रोही लेखक, कवी, विचारवंत, शास्त्रज्ञ यांचेही हत्याकांड हिटलरने केले. स्टॅलिननेही ‘वर्गशत्रू’ म्हणून लाखो शेतकरी वा ‘देशद्रोही’ म्हणून हजारोंना ठार मारले. हिटलर आणि स्टॅलिन, दोघांनी युद्ध नसतानाच्या त्या २० वर्षांत सुमारे (कमीतकमी) एक कोटी माणसे ठार मारली, असे इतिहासकार मानतात. प्रत्यक्ष त्या दोन युद्धात साधारणपणे १० कोटींच्या आसपास माणसे मारली गेली. (त्या संख्येबाबतही इतिहासकारांमध्ये वाद आहेत.)नाझी भस्मासुराचा पाडाव झाल्यानंतर शांततेची पहाट उगवेल, असे सर्वानाच वाटू लागले होते. परंतु दुसरे महायुद्ध संपता-संपताच हिरोशिमा-नागासाकीवर अणुबॉम्ब टाकला गेल्यामुळे त्या प्रसन्न उष:कालाला भयाच्या वटवाघळाची दृष्ट लागली होतीच. अमेरिकेने १९४५ साली तो अणुबॉम्ब टाकल्यानंतर चार वर्षांनी, म्हणजे १९४९ साली सोविएत रशियाने ‘कम्युनिस्ट’ अणुस्फोट चाचणी घडवून आणली. त्यामुळे साठीचे दशक उजाडले तेव्हा अमेरिका, रशिया, फ्रान्स, ब्रिटन या चार देशांकडे अण्वस्त्रे होती. पुढे १९६४ साली चीनने अणुस्फोट चाचणी केली. त्यानंतर १९७४ साली भारताने अणुस्फोट घडविला. गेल्या ११ वर्षांत भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया यांनी अण्वस्त्रे बनवली. जाहीरपणे व अधिकृतपणे नाही पण प्रत्यक्षात इस्राएल (व दक्षिण आफ्रिकेकडेही?) तशी सज्जता आहे, असे मानले जाते. इराक अणुबॉम्ब बनवीत आहे, या धास्तीने (किंवा जाणीवपूर्वक केलेल्या खोटय़ा प्रचाराने) अमेरिकेने इराकवर घनघोर बॉम्बहल्ला केला. त्यात पाच वर्षांत पाच लाख इराकी ठार मारले गेले आहेत.इराककडे अण्वस्त्रे नव्हती, हे स्पष्ट झाल्यावर अमेरिकेचे (माजी) अध्यक्ष जॉर्ज डब्ल्यू बुश यांनी ‘आपल्याला चुकीची माहिती मिळाल्यामुळे आपण इराकवर हल्ला केला,’ अशी कबुली दिली. आता इराण अण्वस्त्रे बनविण्याची खटपट करतो आहे, असा प्रचार अमेरिकेत व इस्रायलमध्ये आहे. इराणकडे अण्वस्त्रसज्जता यायच्या आतच त्या देशावर हल्ला करायची सर्व तयारी इस्रायल व अमेरिकेने केली आहे. बराक ओबामांचा प्रयत्न असा आहे, की इराणबरोबर वाटाघाटी करून इराणला अण्वस्त्रे संपादन करण्यापासून परावृत्त करावे. इस्रायलमधील ‘झायोनिस्ट’ उग्रवाद्यांना वाटते, की हा प्रश्न वाटाघाटींनी सुटणार नाही. इराणवर हल्ला करून त्या देशाचे कंबरडेच मोडावे व त्या देशाची अण्वस्त्रक्षमताच नष्ट करावी, असे कडव्या ज्यूंना वाटते. पाकिस्तानचे अण्वस्त्रतज्ज्ञ ए. क्यू. खान यांनी इराणच नव्हे तर आणखीही काही देशांना ते तंत्रज्ञान विकल्याची शंका इस्रायल, ब्रिटन, अमेरिका यांना आहे. त्या शंकेचे ‘निरसन’ इराणवर हल्ला करूनच होईल, असे त्यांना वाटते. ओबामांचे संवादाचे व मुत्सद्देगिरीचे प्रयत्न हाणून पाडण्यासाठीही अमेरिकेतील ‘नीओ-कॉन’ लष्करशहा आणि रिपब्लिकन हे इस्रायलला हाताशी धरून इराणवर हल्ला करण्याची शक्यता नाकारता येत नाही.इराणवर तसा हल्ला झाल्यास जगात जेथे जेथे अमेरिकन हितसंबंध असतील तेथे तेथे दहशतवादी हल्ला चढवतील आणि जमल्यास इस्रायलचे अस्तित्वच कायमचे पुसण्यासाठी ‘अंतिम’ संघर्ष सुरू होईल, असे इशारे तेहेरानमधून दिले जाऊ लागले आहेत. म्हणजेच मॅक्डोनॉल्डपासून मायक्रोसॉफ्टपर्यंत आणि हॉलीवूडपासून सीएनएनपर्यंत जी अमेरिकन ‘प्रतिके’ जेथे असतील तेथे ती उद्ध्वस्त केली जातील, असा फतवा इराणच्या शिया राजवटीने काढला आहे. अफगाणिस्तानातील तालिबान्यांनीही अमेरिकेला (आणि इस्रायललाही) तशा धमक्या द्यायला सुरुवात केली आहे. पाकिस्तानी लष्करात हजारो तालिबानी आहेत. आयएसआयनेच (सीआयएच्या मदतीने) तालिबानचे भूत उभे केले होते. याचा अर्थ हा, की भारत पुढील बरीच वर्षे दहशतवादाच्या छायेत असणार आहे.पाकिस्तानच्या लष्करशहांची इच्छा अशी आहे, की भारताने त्यांच्यावर हल्ला करावा. तसा हल्ला भारताने केला, की सत्तेची सूत्रे झरदारींकडून लष्कर व आयएसआयकडे जातील. तालिबान्यांनी तर जाहीरच केले आहे, की भारत-पाक युद्ध झाल्यास ४० हजार जिहादी भारतात ठिकठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणतील. याशिवाय त्या हल्ल्याचा प्रतिकार म्हणून पाकिस्तान अणुबॉम्बचाही वापर करू शकेल. इस्रायल व अमेरिकेला धास्ती त्या पाकिस्तानी अणुबॉम्बची आहे. बरेच वैज्ञानिक आता असेही मानतात, की पुढील २०-२५ वर्षांत (वा त्याही अगोदर) तशा अणुबॉम्बची गरज भासणार नाही. ‘न्युक्लिअर टेररिझम’ म्हणजे ‘आण्विक दहशतवाद’ ही नजीकच्या काळात भेडसावणारी शक्यता आहे. आण्विक दहशतवादी हल्ला करण्यासाठी विमानातून कुठच्याही शहरावर वा प्रदेशावर अणुबॉम्ब टाकायची गरजच असणार नाही. पाच-दहा किलो क्षमतेचे ‘मिनी अणुबॉम्ब’ हातातल्या ऑफीस बॅगेतून नेता येतील. प्रश्न फक्त ते ‘ट्रीगर’ करण्याचा म्हणजे प्रत्यक्ष उडविण्याचा आहे. तसा एखादा मिनी-अणुबॉम्ब जर ताज-ओबेरॉय- चर्चगेट परिसरात ‘ट्रीगर’ केला तर अवघी दक्षिण व मध्य मुंबई काही मिनिटांतच भस्मसात होऊ शकेल, किंवा दिल्लीतील पार्लमेण्टपासून ते कनॉट प्लेस ते करोलबाग आणि ट्रान्सयमुना वसाहत बेचिराख करता येईल. अजून दहशतवाद्यांच्या हातात ते तंत्रज्ञान लागलेले नाही; परंतु ग्रॅहॅम अ‍ॅलिसन यांनी लिहिलेल्या अभ्यासपूर्ण ग्रंथात (Nuclear Terrorism: The Risks and Consegnences of the Ultimate Disaster) असे म्हटले आहे, की जगाला आता मुख्य धोका तो आहे. न्यूयॉर्कच्या ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’ आणि वॉशिंग्टनच्या पेंटगॉनवर ‘९/११’ रोजी हल्ला झाल्यानंतर बरोबर एक महिन्यानेच, म्हणजे ११ ऑक्टोबर २००१ रोजी अल काइदाने न्यूयॉर्कमध्ये तसा न्युक्लिअर अ‍ॅटॅक करायची योजना केली होती, अशी भीती अमेरिकन हेरखात्याला वाटली. त्यांनी लगेचच मुख्य सरकारी कचेऱ्या, कागदपत्रे आणि अधिकारी यांना ‘भूमिगत’ केले. (अमेरिकेत व रशियात आणि इस्रायलमध्येही असे ‘बंकर्स’ बांधलेले आहेत.)अशा विध्वंसाची शक्यता फक्त वैज्ञानिक वा प्रस्थापित विचारवंतांनाच वाटत नाही तर अध्यात्मवादी डॉ. अनिरुद्ध धैर्यधर जोशी (ऊर्फ अनिरुद्ध बापू) यांनाही इतिहासाच्या आणि चिंतनाच्या आधारे वाटते आहे.थोडक्यात सांगायचे तर पुढील ४०-५० वर्षांत तसे काही महाविध्वंसक घडले नाही, तर या शतकाचा उत्तरार्ध कदाचित काहीशा शांततेत जाऊ शकेल. मग या विध्वंसक शक्यतांवर मात केल्यावर मानवजातीसमोर प्रश्न उरेल तो जगातील १० ते १५ अब्ज लोकांच्या अन्नधान्याचा, पाण्याचा, ऊर्जेचा, आरोग्याचा, निवाऱ्याचा. जर हे प्रश्न ‘नियती’च्या आणि त्या बिचाऱ्या परमेश्वराच्या माथ्यावर मारायचे नसतील तर माणसालाच व्यक्तिगत, सामाजिक आणि जागतिक स्तरावर त्यांचा विचार करावा लागणार आहे. कारण विध्वंस आपसूक होत नाही तर त्याची नेपथ्यरचना आपल्या (प्रत्येकाच्या) विद्वेषी मनात होते. आव्हान आहे ते त्या विद्वेषावर विजय मिळविण्याचे!

कुमार केतकर

No comments:

Post a Comment