घाशीराम मोदी कोतवाल! ( अग्रलेख)

‘घाशीराम कोतवाल’ या विजय तेंडुलकरांच्या नाटकाच्या अखेरीस नाना फडणवीस फतवा काढतात, ‘त्या घाशीरामाला पकडा, त्याचे डोके भादरा, त्यात शेंदूर फासा आणि त्याची धिंड काढा. त्याला दगडांनी मारा. त्याची भरपूर विटंबना करा.’ नानांना लाचार असलेले पुण्याचे भ्रष्ट, दुष्ट आणि कपटी ब्राह्मण त्या फतव्याबरहुकूम घाशीरामाची शहरात धिंड काढून त्याची विटंबना करतात. याच घाशीरामाने कोतवालीची सूत्रे हातात आल्याबरोबर त्या ब्राह्मणांवर बेबंद जुलूम केला होता, त्यांचा अनन्वित छळ करून त्यांची विटंबना केली होती; परंतु ती विटंबना त्यांना सहन करावी लागत होती. कारण खुद्द नानांच्या हुकुमावरूनच घाशीरामाला कोतवाली दिली गेली होती; परंतु त्या कोतवालीचे रूपांतर मस्तवालीत करून घाशीरामाने पुण्याची छळछावणी बनविली होती. पुढे घाशीराम इतका माजला, की त्याने ब्राह्मणांनाच नव्हे तर नानांनाच आपल्या जरबेत आणायला सुरुवात केली. नानांनीच तर घाशीरामाच्या मुलीचा भोग घेऊन तिला ठार मारले होते- एका सुईणीच्या मदतीने. घाशीराम आता ब्राह्मणांचा आणि नानांचाही वचपा काढू लागल्यावर ब्राह्मण खवळले आणि त्या प्रक्षोभाचा फायदा उठवून नानांनी फतवा काढला होता, ‘घाशीरामाची धिंड काढा. त्याचा वध करा. पण त्या ब्राह्मणांना वाडय़ाच्या दिशेने येऊन देऊ नका. वाडय़ाभोवतीचे पहारे वाढवा!’ हे नाटक ‘अनैतिहासिक’ आहे, असे तेंडुलकरांनी म्हटले होते. सत्तासंघर्षांत होणाऱ्या (अपरिहार्य?) कटकारस्थानांचे, दगाबाजीचे आणि हिंस्रतेचे दर्शन या नाटकात आहे आणि म्हणून ते ‘स्थलकालातीत’ आहे, असेही नाटककाराने आवर्जून नमूद केले होते. या नाटकातील थरारक प्रसंगांची आठवण करून देणारे नाटक सध्या ‘बीसीसीआय-आयपीएल’च्या पेशवाईत चालू आहे. ललित मोदींचा ‘घाशीराम’ करण्यात आला असून, मीडियामार्फत त्यांची धिंड काढली जात आहे आणि आजवर ज्यांनी याच मोदींची चापलूसी करून आपापले मतलब साधले ते सर्व ‘ब्राह्मण’ आता या घाशीरामावर उलटले आहेत. जोपर्यंत ‘आयपीएल’मध्ये कोटय़वधी रुपये गुंतविले जात होते, मॉरिशसपासून ते स्वित्र्झलडपर्यंत साठवून ठेवलेले कृष्णधन अनेकांची उखळे पांढरी करीत होते, तोपर्यंत मोदी यांची जाचक आणि बेमुर्वत बेबंदशाही सर्व लाभार्थी सहन करीत होते. ‘अर्थस्य पुरुषोऽदास:’ या वचनाचा इतका अश्लाघ्य पुरावा दुसरा नसावा. मोदींना ‘आयपीएल’चे ‘कमिशनर’ कुणी केले? कमिशनर म्हणजेच या ठिकाणी कोतवाल! अगदी परवापरवापर्यंत मोदींचे ‘मॅनेजमेण्ट स्किल’, त्यांची अचाट कल्पनाशक्ती, त्यांची बेफाट धडाडी आणि विलक्षण ‘मार्केटिंग स्ट्रॅटेजी’ याची तोंड फाटेपर्यंत जगभर प्रशंसा चालू होती. ‘आयपीएल’ आणि ललित मोदी हे जगातील अनेक ‘मॅनेजमेण्ट’ कॉलेजांमध्ये तमाम अध्यापक व विद्यार्थी वर्गाचे ‘डार्लिग’ झाले होते. ‘आयपीएल’चे व्यवस्थापन, फिनान्शियल स्ट्रॅटेजी आणि यश हे सर्व अभ्यासाचे, चर्चेचे व प्रबंधाचे विषय झाले होते. अवघ्या तीन वर्षांत माऊण्ट एव्हरेस्टचे तेज व उंची कमी भासावी, अशी उंची ‘आयपीएल’ने गाठली होती; परंतु ‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ची ती आभाससृष्टी वास्तवाच्या विवरात कोसळली आहे आणि आता तमाम ‘एमबीए’वाल्यांना त्यांची गृहितके, प्रमेये आणि निष्कर्ष पुन्हा मुळापासून तपासावे लागणार आहेत. ‘आयपीएल’चा ‘झिंगोत्सव’ हा बऱ्याच व्यक्तींच्या, संस्थांच्या व कंपन्यांच्या काळ्या पैशाच्या जोरावर चालू आहे. लोकांवर ‘भूल’ टाकून त्यांच्या खिशातून पैसे काढण्याचा हा राजरोस उद्योग यशस्वी झाला, हे खरेच आहे. किमान अडीचशे रुपयांपासून ते ४० हजारांपर्यंत दर्शनी किंमत असलेली या बेफाम उत्सवाची तिकिटे काळ्या बाजारात अडीच हजारांपासून दोन लाखांपर्यंत विकली जात होती. असे असूनही महाराष्ट्र सरकारने निलाजरेपणा व निगरगट्टपणाचा कळस म्हणून या जुगारावरचा करमणूक करही माफ करून राज्याच्या हजारो कोटी रुपयांच्या उत्पन्नावर पाणी सोडले. म्हणजेच महाराष्ट्र सरकारही या सर्व झिंगोत्सवात सामील होते. महागडी तिकिटे विकत घेणाऱ्यांना क्रिकेट नावाच्या खेळात रस नव्हता, तर खेळानंतर होणाऱ्या बेधुंद पाटर्य़ामध्ये होता. स्पॉन्सर्स, फ्रॅन्चायझी मेंबर्स, सेलिब्रिटीज, बॉलीवूड स्टार्स, मॉडेल्स आणि काळ्या पैशांची सूज असलेले बरेच जण या मद्यधुंद पाटर्य़ामध्ये सामील होतात. तेथे अडीचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत दर्शनी किंमत असलेल्यांना प्रवेश नसतो. म्हणूनच वरच्या किमतीची तिकिटे वाटेल त्या किमतीत विकत घेण्यासाठी धनदांडग्या वर्गात झुंबड उडते आहे. हे सर्व आणि संघ विकत घेताना झालेले लिलाव बीसीसीआयच्या पेशव्यांना माहीत नव्हते? माहीत नसेल तर ते अकार्यक्षमतेचे व बेजबाबदारपणाचे म्हणावे लागेल. माहीत असेल तर त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष का केले जात होते? ललित मोदींनी (नरेंद्र मोदी वा कुणी भाजपच्या गुजरातमधील पुढाऱ्यांनी सांगितल्यावरून) कोचीऐवजी अहमदाबाद संघ लिलावात ‘जिंकून’ दिला असता आणि शशी थरूर यांनी त्याला मान्यता दिली असती तर ‘आयपीएल’ नावाचा जुगार बिनधास्तपणे चालला असता; पण थरूर यांनी कोचीऐवजी अहमदाबादला संघ द्यायचे नाकारले (त्यासाठी त्यांना देऊ केलेली किंमत नाकारून) आणि त्यामुळे खवळलेल्या मोदींनी त्यांच्या ट्विटरवरून थरूर यांच्या संबंधातील कंपनीचे नाव जाहीर केले. हे सर्व व्यवहार गुप्त ठेवले पाहिजेत, असा जो करार अशा बाबतीत असतो तो मोदी यांनी मोडला. विशेष म्हणजे तो त्यांनी मोडला नसता तर ‘आयपीएल गेट’चे दरवाजे उघडलेच गेले नसते. मग मोदीही वाचले असते, थरूर यांचे मंत्रीपद टिकले असते आणि फ्रॅन्चायझी व एकूण आयोजकांची सर्व ‘फळी’ घाशीराम नाटकातील ब्राह्मणांच्या ‘भिंती’प्रमाणे तशीच राहिली असती. म्हणूनच आता मोदींचे काही समर्थक म्हणू लागले आहेत, की मोदींनी उतावीळपणे ‘अहमदाबाद’ प्रकरण जाहीर करून स्वत:ची व टोळीतील इतरांची गोची करून टाकली आहे. त्याचप्रमाणे हेही लक्षात ठेवावयास हवे, की मीडियानेही ‘हमला बोल’ केला तो प्रकरण मोदींच्या ‘मूर्खपणामुळे’ उघडकीला आल्यानंतर. बेभानपणे या जुगारात पैसे लावले जात होते आणि लोकही त्या सामन्यांच्या नशेत मस्त होते, तेव्हा मीडियाने कोणत्याही गैरव्यवहाराकडे लोकांचे लक्ष वेधले नाही. (फक्त ‘लोकसत्ता’ने याबाबत सुरुवातीपासून संशय व्यक्त केला आहे.) खरे तर लोकसभेत वा कोणत्याही विधानसभेतही खासदार-आमदारांनीही याबाबत प्रश्न उपस्थित केला नव्हता. मोदींनी थेट थरूर यांचे नाव चर्चेत आणल्यामुळे लोकसभेत हा प्रश्न आला, नाही तर तेथेही आला नसता. म्हणजेच बीसीसीआय, मीडिया, सर्व राजकीय पक्ष आणि त्यांचे लोकप्रतिनिधी तो जुगार उघडय़ा डोळ्यांनी पाहात होते. याचे मुख्य कारण हेच आहे, की राजकारणातील ‘कृष्णधनी’, बॉलीवूडमधील काळा पैसा, बडय़ा उद्योजकांचे लपविलेले पैसे, खुद्द क्रिकेटमधील सेलिब्रिटीज, काही भ्रष्ट नोकरशहा आणि सेलिब्रिटीज हे सर्वजण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे या महाषड्यंत्रात सामील होते. या षड्यंत्राचे धागेदोरे आता काहींनी थेट ‘डी’ कंपनीशी जोडले आहेत. ते खरे असेल वा नसेल; परंतु हे सगळे धनदांडगे एकत्र आल्यावर त्यांना ‘डी’ कंपनीची तरी काय गरज, असेच कुणीही विचारू शकेल. म्हणजेच जोपर्यंत ‘धाड’ पडत नव्हती तोपर्यंत सगळे बिनधास्त चालू होते. आता सर्वच फ्रॅन्चाइझी आणि संबंधितांच्या घरांवर, कचेऱ्यांवर धाडी पडू लागल्यामुळे एकूण सर्व ‘आयपीएलचा कॅसिनो’ अधिकाधिक रहस्यमय होऊ लागला आहे. हे सर्व प्रकरण मोदींचा बळी देऊन संपवायचे असा संबंधितांचा ‘सर्वपक्षीय’ कटही असू शकतो; परंतु मोदींनी त्यांच्याकडे असलेली सर्व माहिती उघड करायला सुरुवात केली तर भल्याभल्यांची दाणादाण उडू शकेल. किंबहुना बहुतेकांना भीती हीच आहे, की मोदींचा आवाज आता कसा बंद करायचा; परंतु मोदी हे उतावीळ व उद्दाम असले तरी तेच आयपीएलचे ‘डॉन’ असल्यामुळे ते त्यांच्यावर येणाऱ्या दडपणांना बधतील, असे नाही. ‘आयपीएल गेट’ हे आता भारतातील धनदांडग्यांच्या अर्थकारणाचे व जीवनशैलीचे प्रतीक झाले आहे. एका घाशीरामाची धिंड काढून ही स्थिती बदलणार नाही, कारण हा महाजुगार लोकांच्या पाठिंब्यावरच खेळला जात आहे.
 
शुक्रवार, २३ एप्रिल २०१०

2 comments:

  1. एक समाजवादी प्रतिक्रिया

    ReplyDelete
  2. आजचा महाराष्टाची "वाट"चाल लेख अप्रतिम आहे. एक सत्य आपण सरळ भाषेत मांडले आहे.

    लेख खुप आवडला. योग्य तेच आणि जसे लिहायला हवे तसेच आणि ज्या शब्दात लिहायला पाहिजे अगदी तसेच.

    ReplyDelete