सत्याचे प्रयोग: गंभीर आणि गंमतीदार



लहानपणापासून घरात वा शाळेत आपण ऐकत आलेलो असतो, की ‘खोटं बोलू नये- ते पाप आहे!’ तरीही लहानपणीच आपण खोटे बोलायला शिकतो. म्हणजे कुणी शिकवत नाही, आपणच शिकतो. लहान मुलगा वा मुलगी खोटे बोलताना ‘पकडले’ गेले, की गोरे-मोरे होतात, मान खाली घालतात, नजर चुकवतात, डोळ्यात पाणी येते, छाती धडधडते, अंगाला घाम येतो, पाय लटलटतात- असे बरेच शारीरिक आविष्कार आहेत. लहान मुलेच नाही तर मोठी माणसेही धडधडीत खोटेपणा करताना सापडली, की थोडय़ा फार फरकाने तशीच भेदरतात. ‘पाप’ या संकल्पनेची जबरदस्त भीती माणसाच्या मनात असते. अगदी निर्ढावलेले खोटारडे लोक वेळ मारून नेतात, पण चेहऱ्यावर तो ‘गिल्ट’ किंवा पापभाव येऊ दिला नाही तरी तो मनात असतोच. तो मनातला ‘पापभाव’ जाणण्यासाठी गेल्या ५०-६० वर्षांत बरेच विज्ञान-तंत्रज्ञान विकसित केले जात आहे. तरीही मनाच्या अथांगतेत शिरणे या सर्व विज्ञानाला जवळजवळ अशक्य होते आहे. ‘खोटे बोलण्या’चा मुद्दा जितका मानसशास्त्रीय आहे तितकाच समाजशास्त्रीय, नीतिशास्त्रीय आणि मेंदू संबंधातील संशोधनाचा आहे.
माणसे खोटे का बोलतात? किंवा लबाडीने का वागतात? गंडवागंडवी, फसवाफसवी वा बनवाबनवी का करतात? चलाखी किंवा शब्दचलाखी (हातचलाखीच्या चालीवर) का करतात? माणसे फक्त इतरांशीच खोटे बोलतात वा चलाखीने वागतात असेही नाही. स्वत:च्या मनाचीही फसवणूक करतात, स्वत:शीच खोटे बोलतात. त्याला ‘आत्मवंचना’ असा जरा प्रतिष्ठित शब्द आहे! दुसऱ्याची वंचना केली, की आपण त्याला ‘ठकवले’ वगैरेसारखे कठोर शब्द वापरतो. स्वत:शी मनातल्या मनात लबाडी करणे ही मात्र केवळ ‘आत्मवंचना!’
खरे म्हणजे ‘आधुनिक’ आणि तथाकथित ‘धकाधकी’च्या जीवनात सर्वानाच थोडेफार खोटे सतत बोलावेच लागते. किंबहुना त्याशिवाय दिनक्रम व दिनचर्या सुखाने पूर्णच होणार नाही. हे दररोजचे थोडेफार खोटे बोलणे तसे ‘हार्मलेस’ असते. म्हणजे त्यात कुणाला ठकवणे, अफरातफरी करणे, हेराफेरी करणे, फार मोठा मतलब साधणे वा कुणाला धोका देणे- असे काहीही नसते. कित्येक वेळा वेळ मारून नेणे, अप्रिय गोष्ट टाळणे, एखादे मामुली काम चटकन उरकणे किंवा कंटाळवाणी, लांबलचक स्पष्टीकरणे देण्यापेक्षा एखादे फालतू असत्यवचन करणे हे अधिक समाधानकारक व कुणाचेही काहीही नुकसान न करता सोयीचे असते.
अनेकदा तर ‘असत्यवचना’ने माणसांचे संबंध, नातीगोती, स्नेह, प्रेम टिकविता येते वा जोडता येते. डॉक्टर, वकील, समाजकार्यकर्ते (क्वचित प्रसंगी पत्रकारसुद्धा!) लेखक, कवी, साहित्यरसिक असे बरेच जण अगदी शुद्ध हेतूनेसुद्धा खोटे बोलतात. त्यामुळे अनेक कटू प्रसंग टळतात, असहाय माणसाला धीर येतो, दुर्धर आजार झालेल्याला आत्मविश्वास मिळतो, त्या रुग्णाच्या निकटवर्तीयांच्या जिवात जीव येतो.. हे सर्व आपल्याला कळत असते. काही वेळा ते असत्य आहे हे माहीत असूनही आपल्याला जरा बरे वाटते. मनात पापभाव नसतो वा येतही नाही कारण हेतू शुद्ध असतो! एक किंचित अस्वस्थतेचा ओरखडा फार तर येतो.
अर्थातच, इतरही अनेक वेळा अगदी मामुली पेचप्रसंगातून मोकळे होण्यासाठी, कटकट टाळण्यासाठी, नवऱ्याच्या वा बायकोच्या ‘नसत्या’ चौकशा वा ‘प्रश्नमंजुषा’ टाळण्यासाठी खोटे बोलावे लागते. ऑफिसात साहेबाचा संतापज्वर कमी करण्यासाठी, हाऊसिंग सोसायटीत शेजाऱ्या-पाजाऱ्यांबरोबर वितंडवाद टाळण्यासाठी, पोलीसांचा, विशेषत: ट्रॅफिक पोलिसांचा ससेमिरा दूर करण्यासाठी, गैरहजरी लपविण्यासाठी, अ‍ॅपॉइण्टमेंटला झालेला उशीर ‘जस्टिफाय’ करण्यासाठी, कधी कधी तर अ‍ॅपॉइण्टमेंट आहे, हे विसरलोच होतो हे लपविण्यासाठी.. वगैरे प्रसंगांत करावा लागणारा सत्यापलाप तर हा लेख वाचणाऱ्या (व न वाचणाऱ्या) प्रत्येकाने केलेलाच आहे. या थापांमुळे ‘गिल्ट कॉम्प्लेक्स’ येतो; पण बहुतेक जण तो ‘मॅनेज’ करू शकतात. कधी कधी मात्र सहज मारलेली ‘हार्मलेस’ थाप गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतो.
मोबाइल फोन्स आल्यानंतर अशा सत्यापलापांना ‘हाय-टेक’ सुविधा प्राप्त झाली आहे. आपण नक्की कुठे, कुणाबरोबर काय करीत आहोत हे ‘बिंधास’ लपविता येते. (यात अर्थातच असे गृहीत धरले जाते, की ऐकणाऱ्याचा सांगणाऱ्यावर पूर्ण विश्वास आहे! तिकडे ऐकणाराही त्याची थाप मारीत असतो. असो!) जेव्हा फक्त लॅण्डलाइन फोन होते तेव्हा ही सुविधा नव्हती. तुम्ही फोन उचललात तर तुम्ही निदान त्या फोनपाशी, ऑफिसात वा घरी, माहीत / परिचित स्थळी आहात / वा होतात याची खात्री होती. मोबाइलमुळे ते ‘बंधन’ गेले.
काही समाजशास्त्रज्ञ तर असे मानतात, की मोबाइल फोन्समुळे मित्र-मैत्रिणी, नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी, अशा सर्व स्त्री-पुरुष संबंधांमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्वातंत्र्य आले. (स्वातंत्र्य की स्वैराचार या वादाची ही जागा नव्हे. मोबाइल फोनमुळेच नव्हे तर एकूणच टेक्नॉलॉजीमुळे स्वातंत्र्याचा विस्तार आणि तथाकथित नैतिकतेचा संकोच झाला आहे. हे चांगले, की वाईट हे ठरविताना आपली वैचारिक व मूल्यबैठकही तपासायला हवी. ‘टेक्नॉलॉजी इज अ लिबरेटिंग फोर्स’ हे सूत्र आता नव्या जगाने स्वीकारले आहे.)
एकदा हे स्वातंत्र्य प्राप्त झाले, पण प्रत्यक्षात मात्र तशा स्वतंत्रपणे जगता आले नाही, की माणूस स्वाभाविकच खोटे बोलतो म्हणजेच सत्यापलाप करून तो ‘स्वातंत्र्य’ मिळवितो. हे स्वातंत्र्य म्हणजे ‘ऑपरेशनल आणि बिहेवियोरल स्पेस’. प्रत्येक व्यक्तीला एक खासगी ‘स्पेस’ हवी असते, त्याचप्रमाणे एक ‘सोशल स्पेस’ही. कुटुंबात वा कामाच्या ठिकाणी तशी ‘स्पेस’ मिळत नाही. ती स्पेस मिळणे म्हणजे ते स्वातंत्र्य मिळणे.
स्त्रियांना सुरुवातीला नोकरी करायला लागल्यावर ते मिळाले. मग वेशभूषेत, स्नेहसंमेलन-पाटर्य़ा-पिकनिक अशा ‘गेट टुगेदर’च्या माध्यमातून ते मिळत गेले. मोबाइल फोन्समुळे ती ‘स्पेस’ कित्येक पटींनी वाढली आहे. फक्त स्त्रियांनाच (म्हणजे मुलींना, विशेषत:) हे स्वातंत्र्य ऊर्फ ‘स्पेस’ प्राप्त झाले असे नाही, तर प्रत्येकालाच ते मिळाले.
परंतु त्याच प्रमाणात समाजातील वागण्या-व्यवहारातील संकेत, मूल्य, नीतिनियम, अपेक्षा बदलल्या नाहीत. त्यामुळे एक प्रकारची कोंडी तयार झाली. म्हणजेच ‘टेक्नॉलॉजी’ने दिलेली ‘स्पेस’ किंवा ‘मुक्ती’ समाजातील प्रचलित र्निबधांमुळे रोखलीही गेली. या कोंडीतून सुटण्यासाठी खोटे बोलणे, लपवालपवी, अर्धसत्य इत्यादी गोष्टी अपरिहार्यपणे आल्या. अगदी मोबाइलपूर्वीच्या काळातही, त्या त्या वेळच्या तंत्रज्ञानाने स्वातंत्र्याची स्पेस वाढत होती. थोडक्यात, टेक्नॉलॉजीच्या प्रसाराबरोबर खोटे बोलणे आणि आपले स्वातंत्र्य विस्तारून घेणे हे शक्य होत गेले. त्याच प्रमाणात त्यातील ‘गिल्ट कॉम्प्लेक्स’ वा ‘पापभाव’ कमी कमी होत गेला. परंतु कौटुंबिक व सामाजिक संघर्षही वाढले.
या सर्व बाबी विज्ञान-तंत्रज्ञानाला त्यांच्या कक्षेत बसविता न आल्यामुळे त्यांचीही पंचाईत झाली. विशेषत: कोणते खोटे बोलणे अतिशय गंभीर स्वरूपाचे आहे आणि कोणते हलके-फुलके आहे हे ठरविणे अडचणीचेच होते.
एखाद्या प्रसंगाचे नाटय़मय वर्णन करण्यासाठी गप्पांच्या मैफलीत अतिशयोक्ती करणे, कथेत ‘मसाला’ मिसळणे, त्या घटनेत पूर्णत: काल्पनिक प्रसंग व हजर नसलेल्या प्रतिष्ठित व्यक्ती आणणे हे वा असे प्रकार आपण आजूबाजूला पाहात असतोच. आत्मप्रौढी करताना वा बढाया मारताना आपल्या बडय़ा-बडय़ांच्या ओळखी असल्याचे सांगणे, काही प्रतिष्ठित लग्न-समारंभांना आपल्याला कसे विशेष बोलावणे होते याचे रसभरित वर्णन करणे, आपल्याला सतत परदेशवाऱ्या कशा कराव्या लागतात, आपण कोणत्या सरकारी वा आंतरराष्ट्रीय समित्यांवर आहोत हे सांगताना बेधडक ‘नेम ड्रॉपिंग’ करणे हे सत्यापलापाचे प्रकार तसे ‘इनोसण्ट’ असतात. तशा थापा मारणारी व्यक्ती ही कधी चेष्टेचा विषय ठरते, तर कधी मैफलीत रंग भरण्यासाठी अशा व्यक्तीला मुद्दाम बोलाविले जाते. या प्रकारचे खोटे बोलणे आणि खून, कट, दहशतवाद यात सामील होणाऱ्यांनी खोटे बोलणे या दोन गोष्टी एकमेकांपेक्षा पूर्णत: वेगळ्या स्वरूपाच्या असतात.
हलक्या-फुलक्या, ‘इनोसण्ट’ थापांमधूनही कसे गंभीर प्रसंग निर्माण होतात, वरवर निष्पाप वाटणाऱ्या गोष्टी किती गुंतागुंत निर्माण करू शकतात याची शेकडो उदाहरणे कथा-कादंबऱ्या व नाटक-चित्रपटांमध्ये मिळतात. अ‍ॅगाथा ख्रिस्तीच्या कादंबऱ्यांमध्ये होणारे खून अगदी आपल्या आजूबाजूच्या परिसरात व्हावे तसे होतात आणि मिस मार्पलला किंवा हक्र्युल पॉयरॉला त्या खुनांचा लागणारा शोधही तशाच ‘खेळीमेळी’च्या वातावरणातच लागतो. आल्फ्रेड हिचकॉकच्या चित्रपटांमध्येही असे प्रसंग असतात. कारण ख्रिस्ती असो वा हिचकॉक (वा त्यांच्या प्रकारचे लेखक), यांचा भर माणसांच्या स्वभावावर, स्वभावातील दोषांवर वा विकृतींवर (उदा. ‘सायको’, ‘फ्रेन्झी’, ‘व्हर्टिगो’) आधारलेला असतो. त्यांच्या चित्रणात रहस्यापेक्षा वेधक असते ते मनोविश्लेषण; परंतु मानवी स्वभावातील सुप्त व प्रकट खोटेपणा (निष्पाप वा कपटी) हा त्या मनोविश्लेषणाचा एक आशय असतो. अकिरा कुरोसावाच्या ‘राशोमान’ या चित्रपटात चार व्यक्तिरेखा एकाच घटनेचे चार वेगवेगळे वृत्तान्त सादर करतात, तेव्हा त्यातला एक वृत्तान्त सत्य मानायचा तर बाकीचे तीन आपसूक ‘खोटे’ ठरतात. ‘सत्य’ हेच जर व्यक्तिसापेक्ष असेल तर सत्य-असत्याचा निर्णय तरी कसा होणार?
जेव्हा खोटे बोलण्याला गुन्हेगारीचे, हेरगिरीचे, खुनाचे, दहशतवादाचे, कपट-कारस्थानाचे परिमाण लाभते तेव्हा त्याचे स्वरूपच बदलते. म्हणूनच तो विषय वैज्ञानिक संशोधनाचा आणि समाजशास्त्राचा होतो. खोटे बोलण्यावर वा थापा मारण्यावर कुणी गंभीररीत्या संशोधन करील, असे १०० वर्षांपूर्वी कुणाला वाटले नसते. वर म्हटल्याप्रमाणे आता मेंदूवर संशोधन करणारे न्यूरोबायॉलॉजिस्ट्स, मानसशास्त्रज्ञ आणि फोरेन्सिकतज्ज्ञ यांनी या प्रकरणावर प्रकाशझोत टाकायला सुरुवात केली आहे.
अगदी पूर्वी शेजारच्या वा शत्रू देशाच्या घुसखोर सैनिकांना वा हेरांना पकडल्यानंतर त्यांची चौकशी कशी करायची, उलट तपासणी कशी घ्यायची, त्यांच्या निवेदनाची सत्यासत्यता कशी ठरवायची याबद्दल चाणक्य ते क्लॉसेविट्झ्, कन्फ्युशियस ते बिरबल यांनी सांगितलेल्या अनेक क्लृप्त्या आजही प्रचलित आहेत. पहिल्या महायुद्धापासून आधुनिक हेरगिरीला सुरुवात झाली असे मानले तर दुसऱ्या महायुद्धात जगभर हेरांचे एक महाजालच निर्माण झाले. अर्थातच या महाजालात अनेक छोटी-मोठी जाळी होती आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवणारेही कुठच्या तरी जाळ्यात असत. खरे आणि खोटे याविषयीचे संभ्रम व विभ्रम या काळात विलक्षण गुंतागुंतीचे होत गेले. पकडला गेलेला हेर काय खरे सांगतो आहे आणि काय खोटे हे ठरविण्याचे मुख्य साधन होते- कसून चौकशी, उलटतपासणी, प्रश्न-उपप्रश्न-प्रतिप्रश्न, या चौकशीत खरी माहिती मिळावी म्हणून पकडलेल्या व्यक्तीचा अनन्वित छळ करणे, त्याने खरे सांगितल्यास त्याला शिक्षा केली जाणार नाही अशी लालूच त्याला दाखविणे, तिला न बधल्यास पुन्हा अधिकच छळ करणे, त्याला उलटे टांगणे, बेदम मारणे, पाण्यात बुडवून गुदमरायला लागल्यावर बाहेर काढणे, थोडय़ा वेळाने पुन्हा पाण्यात बुडविणे, शॉक देणे, नखे काढणे, बर्फाच्या लादीवर झोपविणे. असे असंख्य प्रकार गेली चार-पाच हजार वर्षे चालू आहेत.
परंतु देशासाठी, धर्मासाठी, ध्येयासाठी, परंपरेसाठी तो छळ सहन करायला तयार असलेल्यांकडून ‘सत्य’ माहिती मिळत नाही. शिवाय अशा छळांच्या क्रूर कहाण्या (जशा सध्या प्रसिद्ध होत आहेत) ऐकल्यानंतर सुसंस्कृत समाजात / देशात या पद्धतीला विरोधही होत असे- आजही होत असतो. तरीही छळछावण्या आणि छळाच्या विविध अमानुष पद्धती वापरल्या जात आहेतच. युनोसारख्या संस्थांनी आणि मानवी हक्क संघटनांनी, आंतरराष्ट्रीय न्यायालये आणि सिव्हिल सोसायटी मूव्हमेण्ट्स् या सर्वानी जागतिक पातळीवर आवाज उठविल्यानंतरही छळवाद कमी झालेला नाही.
गेल्या ३०-४० वर्षांत ‘अत्याधुनिक दहशतवादा’च्या उदयानंतर अमेरिका, युरोप, इस्राएल, रशिया यांनी चौकशा, छळवाद यांच्या जोडीला यंत्रसंस्कृती आणली. लाय डिटेक्टर्स, पॉलिग्राफ मशीन्स, नार्को टेस्ट्स्, ब्रेनमॅपिंग, एमआरआय स्कॅनर्स, कॉम्प्युटर मॉनिटरिंग ऑफ बॉडी असे बरेच तंत्रज्ञान आले. सध्या आपल्या देशातही या तंत्रज्ञानाची भरपूर चर्चा आहे; परंतु लाय डिटेक्टर, नार्को टेस्ट वा ब्रेनमॅपिंगच्या मदतीने मिळणाऱ्या माहितीची सत्यासत्यता ठरविता आलेली नाही. जगातील कोणतेही न्यायालय वा मानवी हक्क संघटना या ‘तंत्रज्ञाननिष्ठ सत्यासत्यते’च्या दाव्याला मान्यता देत नाही.
साहजिकच फोरेन्सिक तज्ज्ञ, पोलीस अधिकारी आणि वकील मंडळी / न्यायालये मानसशास्त्रीय संशोधनालाही तेवढेच महत्त्व देऊ लागली आहेत. त्या संशोधनातून गंभीर, तसेच गंमतीदार हलकी फुलकी थापेबाजी आणि फसवाफसवी / गुन्हेगारी याबाबत बरीच नवीन माहिती उपलब्ध होत असते.
डेस्मॉण्ड मॉरिस यांनी त्यांच्या ‘पीपल वॉचिंग’ या पुस्तकात माणसांच्या हावभावांवर, त्यांच्या मन:स्थितीवर, त्यांच्या कुटुंबातील व समाजातील वागण्यावर अतिशय सखोल निरीक्षणाधारित संशोधन केले आहे. कित्येक तरबेज वा अनुभवी पोलीस अधिकारी आणि मानसशास्त्रज्ञ एखाद्या माणसाशी गप्पा मारीत मारीत त्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेतात. केवळ ‘इण्टरॉगेशन’च्या आधारे त्याचा गुन्ह्यातील सहभाग सिद्ध करतात. काही वेळा त्यांचे कबुलीजबाबही, कोणताही छळ न करता मिळवितात. (ते ‘इण्टरॉगेशन’ हाच एक प्रकारचा छळ असतो, हा भाग वेगळा!)
पोलीस अधिकारी वा इतरही बऱ्याच जणांनी काही निश्चित (पण चुकीचे) ठोकताळेही बसविलेले असतात. खोटे बोलणाऱ्या व्यक्तीची नजर भिरभिरते, डोळ्यात डोळा घालून ती पाहू शकत नाही, तिची जीभ चाचरते, एखाद्या घटनेचे वर्णन करताना त्यातील तपशील ती सारखे बदलते, खांदे पडतात, कपाळावर घामाचे बिंदू उमटतात वगैरे वगैरे. अनेक स्वयंभू तज्ज्ञ आपण ‘खोटय़ा-खऱ्या’चे नेमके ‘जजमेण्ट’ घेऊ शकतो असा दावा करतात, तेव्हा मुख्यत: वर उल्लेखिलेल्या तथाकथित हावभावांचा संदर्भ देतात. परंतु अशाच प्रकारचे हावभाव एखाद्या घाबरलेल्या, गोंधळलेल्या, आकस्मिक विचित्र परिस्थितीत सापडलेल्या व्यक्तीचेही असतात; मग त्याच्यावरही खोटेपणाचा आरोप येऊ शकतो. अर्थातच हावभाव हा जरी एक संकेत असला तरी तो पुरावा नसतो आणि म्हणूनच वर उल्लेखिलेली पॉलिग्राफ, लाय डिटेक्टर, नार्को टेस्टसारखी तंत्रशैली वापरली जाऊ लागली. परंतु त्यातूनही फारसे काही हाती लागत नाही.
जेव्हा धर्मराजाने ‘नरो वा कुंजरो वा’ असे उद्गार काढले तेव्हा ‘लाय डिटेक्टर’ चाचणीनुसार त्याचे निदान काय झाले असते? श्रीकृष्णाने तर ‘लाय डिटेक्टर’लाच खोटे ठरविले असते इतकी त्या भगवानाकडे विलक्षण किमया होती! खरे म्हणजे सत्यवचनी राम, साक्षात येशू वा गौतमबुद्ध किंवा गांधीजी यांची आजच्या ‘अत्याधुनिक’ व विलक्षण गुंतागुंतीच्या काळात खरे बोलता बोलता चांगलीच गोची झाली असती. आजचे सत्याग्रही ‘साखळी उपोषण’ करतात हे पाहून गांधीजींना पुन्हा एकदा ‘सत्याचे (खरे) प्रयोग’ करायची इच्छा झाली असती. कुणी असेही म्हणू शकेल, की सिव्हिलायझेशन जसजसे प्रगत व प्रगल्भ होत जाते, तसतसे खोटेपणाचे आविष्कारही अधिकाधिक सर्जनशील होत जातात!
कुमार केतकर (शनिवार, १९ सप्टेंबर २००९)

No comments:

Post a Comment