‘मनुष्य’ नावाचा प्राणी

‘मनुष्य’ नावाचा प्राणी


माणसाचा स्वभाव जन्मत:च ‘कंडिशण्ड’ किंवा ‘प्रोग्रॅम’ झालेला असतो की तो परिस्थितीनुसार घडतो म्हणजे ‘कंडिशन’ होतो, याबद्दलचा वाद वैज्ञानिक स्तरावर सुरू झाला इव्हान पावलॉव या रशियन शास्त्रज्ञाच्या प्रयोगांमुळे। सुमारे दीडशे वर्षांपूर्वी पावलॉव यांनी एक अगदी साधा प्रयोग केला। तो त्याने पाळलेल्या कुत्र्यांना विशिष्ट वेळेला खायला देत असे. परंतु कुत्र्याच्या बशीत खायचा पदार्थ टाकण्यापूर्वी घंटी वाजवीत असे. अशा प्रकारे घंटी वाजल्याबरोबर बशीत काही तरी चविष्ट येऊन पडते हे कुत्र्यांच्या संवेदनयंत्रणेत ‘प्रोग्रॅम’ झाले आहे, हे निश्चित झाल्यावर पावलॉव नंतर फक्त घंटी वाजवीत असे; परंतु बशीत काहीच देत नसे. त्या वेळेस कुत्र्याचे अस्वस्थ होणे आणि त्याच्या तोंडात वाढलेले लाळेचे प्रमाण हे तो मोजत असे. खरे तर या प्रयोगात ‘प्रयोग’ म्हणण्यासारखे काही नव्हते. कुत्रा पाळणाऱ्यांच्या दैनंदिन अनुभवाचा तो भाग आहे; परंतु असे इतरही काही प्रयोग करून पावलॉवने ‘क्लासिकल कंडिशनिंग’चा सिद्धांत मांडला. वरवर साध्या वाटणाऱ्या या ‘प्रयोगा’च्या आधारे पुढे प्राणीजीवनाचा अभ्यास करणाऱ्यांनी इतरही बरेच ‘कंडिशनिंग’संबंधातले निष्कर्ष काढले. ‘बॉर्न फ्री’, ‘लिव्हिंग फ्री’ आणि ‘फॉरएव्हर फ्री’ या तीन खंडांच्या ग्रंथात सिंहाच्या, सिंहिणीच्या व त्यांच्या छाव्यांच्या जीवनाविषयी जॉय व जॉर्ज अ‍ॅडॅम्सन या पती-पत्नींनी जे निष्कर्ष काढले ते सिंह- कुटुंबाच्या स्वभावशैलीसंबंधातील होते. प्राणीजीवनाचे निरीक्षण करून त्या आधारे ‘स्टिम्युलस-रिस्पॉन्स’ ऊर्फ ैर-फह्ण अशी एक सैद्धांतिक मांडणीच केली जाऊ लागली. माणूस हासुद्धा प्राणीच आहे त्यामुळे तोसुद्धा या ‘एस-आर’ म्हणजे ‘प्रेरणा- प्रतिसादा’च्या प्रक्रियेतच वागतो, असे मानणारे आज अनेक मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ आहेत. तीव्र मतभेद आहेत ते हे ‘प्रेरणा-प्रतिसादा’चे कंडिशनिंग जन्मत:च म्हणजे ‘जेनेटिकली’ ठरते की ‘सोशल’ कंडिशनिंगनुसार, याविषयी.बट्र्राड रसेल या जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ- गणिती- विचारवंताच्या म्हणण्यानुसार माणूस हा ‘प्राणी’ आहे हे जरी खरे असले तरी माणसाला निसर्गाने जो मेंदू, जी प्रज्ञा आणि कॉन्शिअसनेस ऊर्फ र्सवकष जाणीवसंपन्नता दिली आहे, त्यामुळे त्याची तुलना एका मर्यादेपलीकडे प्राणीविश्वाशी करणे हे अशास्त्रीय आहे. ‘एस-आर’ ऊर्फ ‘प्रेरणा-प्रतिसाद’ प्रक्रियेनुसार काही ढोबळ गोष्टींचा उलगडा होत असला तरी त्यातून ‘स्वभावशास्त्र’ निर्माण करता येणार नाही. माणूस स्वयंप्रज्ञेने स्वत:चा स्वभाव, वृत्ती, संवेदनशीलता घडवू शकतो. माणूस जसे व जे शिकू शकतो, तसे कोणताही प्राणी करू शकत नाही; त्यामुळे कुत्रे असोत वा सिंह, मुंग्या असोत वा डॉल्फिन्स, कबुतरे असोत वा गरुड, त्यांचा कितीही सखोल अभ्यास केला तरी त्या आधारे निश्चित स्वरूपाचे स्वभावशास्त्र तयार करता येणार नाही.मुंग्या आणि त्यांची ‘सामूहिक जीवनशैली’ हा संशोधनाचा एक मोठा विषय मानला जातो. मुंगी माणसाला (किंवा कुणालाही!) का चावते येथपासून ते सामूहिकपणे ती वारूळ कसे बांधते, साखर कशी जमा करते आणि तिच्या स्वत:च्या वजनापेक्षा (व क्षमतेपेक्षा) कित्येकपटींनी जास्त वजनाचा असलेला साखरेचा कण कसा उचलते व बरेच अंतर तो कण अंगावर कसा वाहून नेऊ शकते यावर बरेच वैज्ञानिक संशोधन करीत आहेत. अत्यंत सूक्ष्म मेंदू असलेला हा कीटक साखरेचा डबा, गोड पदार्थ, मेलेले झुरळ इत्यादी गोष्टी कशा शोधून काढतो? इतर मुंग्यांना ती ‘बातमी’ कशी पोचवली जाते, मुंग्यांचे पुनरुत्पादन कसे होते, त्या एवढय़ा ‘शिस्तीत’ कशा राहतात (संघाच्या शाखेवर न जाता), त्या मुंग्यांमध्ये संघर्ष-मारामाऱ्या होतात की नाही, त्यांची Survival instinct’ ऊर्फ जिवंत राहण्याची-जगण्याची इच्छा आणि त्यांचे ‘आयुष्यमान’ हाही त्या संशोधनाचा भाग आहे.सर्व कीटक, सरपटणारे प्राणी, चतुष्पाद प्राणी, सस्तन प्राणी, पक्षी, मासे, कासवे इतकेच काय वनस्पती, बुरशी, शेवाळे अशा सर्व जीवसृष्टीसंबंधात संशोधन चालू आहे. या सृष्टीला लाभलेला परिसर, त्यातील घटकांना असणारे ‘मन’, त्यांच्या ‘प्रेरणा-प्रतिसादा’चे रहस्य हासुद्धा एकूण व्यापक अशा स्वभावशास्त्राचा भाग झाल्यामुळे हा विषय आता केवळ मानसशास्त्रज्ञांच्या कक्षेपुरता उरलेला नाही.‘नॅशनल जिऑग्राफिक’, ‘डिस्कव्हरी’ आणि ‘अ‍ॅनिमल प्लॅनेट’ यांसारख्या चॅनल्सवरून जे प्राणीदर्शन आणि निसर्गदर्शन होते तेही अखेरीस स्वभावशास्त्राच्या दिशेनेच जाणारे असते. म्हणूनच आता प्राण्यांसाठी फक्त व्हेटरनरी डॉक्टर्स नाहीत तर त्यांचे स्वतंत्र ‘व्हेटरनरी सायकिअ‍ॅट्रिस्टस्’ म्हणजे प्राण्यांचे मानसशास्त्रज्ञही निर्माण झाले आहेत. परंतु या पशुमानसशास्त्रज्ञांना माणसाच्या स्वयंप्रज्ञेचा, नैसर्गिक प्रवृत्तीच्या विरोधात जाऊन व्यवहार करण्याच्या ‘स्वभावाचा’, नवीन शिकण्याचा, कला-संगीत निर्मिती करणाऱ्या सृजनशीलतेचा आणि भाषासमृद्धी व त्या आधारे निर्माण झालेल्या सिव्हिलायझेशनचा अर्थ लावता येत नाही.काही जण तर स्वभाव आणि ‘सिव्हिलायझेशन’ यांचा बादरायणसंबंध कशाला लावायचा, असाही प्रश्न उपस्थित करतात; परंतु त्याला उत्तर देताना काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात की, ‘सिव्हिलायझेशन’ हे ‘वेगळेपण’ असणाऱ्या, अनेकदा ‘तऱ्हेवाईक’ वाटणाऱ्या, पण सृजनशील माणसांमुळे निर्माण झाले आहे. बहुतेक थोर शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ, संगीतकार, लेखक, नाटककार, चित्रकार वा जगाचा शोध घेणारे साहसी दर्यावर्दी वा प्रवासी हे सर्वसाधारण माणसांसारखे नव्हते (वा नसतात). त्यांचे वेगळेपण केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेपुरते, अचाट परिश्रमापुरते वा जिद्दीपुरते मर्यादित नव्हते. ते वेगळेपण असते ते त्यांच्या स्वभावात.प्राणीसृष्टीशी तुलना करून मानवी स्वभावाची चिकित्सा केली तर कदाचित ती थोडय़ाफार प्रमाणात तरी समान प्रकारची असल्याचे दाखविता येईल; परंतु त्या तथाकथित सर्वसाधारण माणसांच्या समानतेतही इतके वैविध्य आहे की, त्याचा शोध घेणे अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागले आहे. विशेषत: त्या असंख्य लोकांच्या स्वभावाचा लघुत्तम साधारण विभाज्य (लसावि) काढताना.कॉन्रॅड लॉरेन्झ (१९०३-१९८९) या प्रख्यात ऑस्ट्रियन प्राणीशास्त्रज्ञाने प्राण्यांच्या प्रेरणास्रोताचा प्रदीर्घ अभ्यास केला होता. माणसाचे स्वभाव कसे घडतात हे समजून घ्यायचे असेल तर प्राण्यांच्या इन्स्टिंक्टस्, इंटय़ूशन्स आणि इंटेलिजन्स, म्हणजे स्वाभाविक व प्रतिक्षिप्त क्रिया, उत्स्फूर्तता आणि बौद्धिकता यांचा अभ्यास करायला हवा, असे त्यांचे मत होते. वैद्यकीय शास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर लॉरेन्स यांनी शरीरशास्त्राचा अभ्यास केला. शरीरशास्त्राचा अभ्यास करताना त्यांनी इतर सस्तन प्राण्यांच्या शरीरांतर्गत रचनेचा अभ्यास केला. माणसाच्या मेंदूची महती गृहीत धरली तरी माणसाचे ‘कंडिशनिंग’ प्राण्यासारखेच होते, असे मानणाऱ्या लॉरेन्झने बट्र्राड रसेलपेक्षा इव्हान पावलॉव यांच्याच प्रणालीचा विस्तार करायचे ठरविले होते. म्हणून त्यांनी मानसशास्त्राचा अभ्यास केला. जर्मनीतील कोनिग्जबर्ग विद्यापीठात ते मानसशास्त्र शिकवीत असत. परंतु १९२५-१९४५ हा २० वर्षांचा काळ नाझीवादाने व्यापलेला होता. आर्य वंशाची श्रेष्ठता प्रस्थापित करू पाहणाऱ्या नाझींनी त्याच काळात स्वभाव नियंत्रणाचे तंत्रही विकसित करायचा प्रयत्न सुरू केला होता. लॉरेन्झ यांना नाझीवादाचे आकर्षण वाटू लागले ते त्यामुळेच. त्यांनी नाझी पक्षाचे सदस्यत्व तर घेतलेच, पण त्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने संशोधनही सुरू केले. परंतु पुढे १९७३ साली त्यांना जेव्हा नोबेल पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्यांनी आपल्या नाझी भूतकाळाविषयी खेद प्रकट केला. आपण संशोधन वृत्तीने प्रेरित झालो होतो- नाझी विचारांनी नव्हे. नाझीवादातील हिंस्रता लक्षात आल्यावरच आपण त्या विचारापासून फारकत घ्यायला सुरुवात केली होती, असे त्यांनी म्हटले.परंतु माणूस विशिष्ट परिस्थितीत काही विशिष्ट पद्धतीनेच वागतो आणि सामूहिक अवस्थेत तर तो समूहवादाच्या प्रवृत्तींना बळी पडतो असे त्यांच्या निदर्शनास आले होते. धार्मिक वा जातीय दंगलींमध्ये बेभानपणे सामील होणारी व खून-जाळपोळ करणारी माणसे गुन्हेगारी प्रवृत्तीचीच असतात असे नाही, पण ती गुन्हा करतातच. त्यांच्यातील आक्रमकता, हिंसा आणि बुद्धी व संवेदना त्या समूहाकडे ‘गहाण’ ठेवल्या जातात. (अलीकडेच उदाहरण म्हणजे बाबरी मशीद उद्ध्वस्त करणाऱ्यांचा वा गुजरात दंगलींमधील सहभागी झालेल्यांचा उन्माद किंवा तालिबान्यांनी संघटितपणे केलेले हिंसाकांड). लॉरेन्स यांनी ‘सायकोहैड्रॉलिक मॉडेल ऑफ मोटिव्हेशन’ नावाचा प्रबंध त्या दृष्टिकोनातून मांडला होता.त्यांचा गाजलेला ग्रंथ म्हणजे ‘ऑन अ‍ॅग्रेशन.’ या ग्रंथामुळे ‘माणूस मुळातच हिंसक प्रवृत्तीचा असल्याचे वैज्ञानिक दृष्टिकोनातून सिद्ध झाले आहे’, असा दावा सर्वदूर केला जाऊ लागला. (विजय तेंडुलकरांनी या विचाराला नाटय़रूप तर दिलेच, पण सांस्कृतिक प्रतिष्ठाही प्राप्त करून दिली.) परंतु लॉरेन्झ यांचा तितका गाजावाजा न झालेला ग्रंथ म्हणजे : ‘kBehind the Mirror : A Search for a Natural History of Human Knowledge.’ या ग्रंथात त्यांनी आपल्याला आजूबाजूच्या जगाचे भान कसे येते, त्या आकलनात वास्तव किती, अवास्तव किती, सत्य किती, कल्पनाविलास किती यासंबंधी चर्चा केली आहे. आपण आपल्या पंचेंद्रियांवर व बुद्धीवर विसंबूनच निसर्गाशी सामना करू शकतो, पण त्यामुळेच आपल्याला त्याहीपलीकडेही जाता आले पाहिजे, असा विचार ते मांडू लागले होते. परंतु या सर्व स्वभाव-संशोधनाचा उपयोग काय? स्वभावशैलीच्या फटक्यामुळे काय घडते- वा घडू शकते? शिवाय ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे सूत्र गृहीत धरल्यावर बाकी संशोधनाची काय गरज? दोन जुळ्या भावांपैकी एक खूप आनंदी स्वभावाचा आणि दुसरा अंतर्मुख किंवा एकाच कुटुंबातील चार-पाच बहीण-भाऊ अगदी परस्परविरोधी स्वभावांचे, त्याचप्रमाणे एकाच परिसरात, शाळेत, कौटुंबिक वातावरणात वाढलेल्या समवयस्कांच्या वेगळ्या आवडीनिवडी- अशा अनेक बाबींचे आपल्याला जसे कुतूहल वाटते तसेच ते स्वभावशास्त्रज्ञांनाही वाटते, पण त्यांचा प्रयत्न असतो तो त्या स्वभावातील मूळ घटकांचा, कार्यकारणभावाचा आणि संस्कारांचा व कण्डिशनिंगचा.भांडवलदारांच्या ‘अधिकृत’ विचारवंतांनी तर स्वभावशास्त्राच्या आधारे बाजारपेठेचा विस्तार करता येईल, कंपनीची प्रतिष्ठा (व त्यायोगे कंपनीच्या शेअरचा भाव!) वाढवता येईल आणि मग आपला सामाजिक-सांस्कृतिक प्रभावही वाढवता येईल, असे गृहीतच धरलेले आहे. भांडवली- बाजारपेठीय विचाराला ज्या कम्युनिस्ट विचारसरणीने आव्हान दिले, त्या विचारसरणीतही पुढे स्वभावनियंत्रणाचा घातक विचार घुसला. धर्मप्रसार करणाऱ्यांनी, भांडवलशाहीच्या प्रवक्त्यांनी आणि कम्युनिस्टांनी आपापल्या पद्धतीने स्वभावशैलीच्या माध्यमातून जग बदलायचा कसा प्रयत्न केला त्याचा ऊहापोह पुढील लेखात.
कुमार केतकर

No comments:

Post a Comment