काळा पांढरा (लोकरंग)

गेल्या महिन्यात ‘पुणे’ नावाने क्रिकेटचा संघ ‘आयपीएल’च्या लिलावात १७०० कोटी रुपयांना विकला गेला. कोचीचा १६०० कोटी रुपयांना. एकूण आठ-दहा हजार कोटी रुपयांचे हे संघ आता अक्षरश: खोऱ्याने पैसे खेचत आहेत. देशातील १०० कोटी लोकांपैकी २५ ते ३० कोटी लोक थेट प्रेक्षक म्हणून, टीव्हीचे दर्शक म्हणून, स्पॉन्सर म्हणून, जाहिरातदार म्हणून, पत्रकार-छायाचित्रकार म्हणून, राजकीय पुढारी वा बॉलीवूडचा नट वा नटी म्हणून, मॉडेल म्हणून वा ‘चीअर गर्ल्स’ व त्यांचा चाहता म्हणून या महाजालाच्या आभासविश्वात अडकला आहे.


सगळी सोंगं आणता येतात, पण पैशाची सोंगं आणता येत नाहीत, असे म्हटले जाते. पण येथे तर ‘पैशाची सोंगं’ही आणली गेली आहेत. ‘आयपीएल’ने विकत घेतलेल्या संघांच्या किंमती आंतरराष्ट्रीय सॉकर संघांच्या वा अमेरिकन फूटबॉल, बास्केटबॉल वा बेसबॉल संघांच्या विक्रीच्या किंमतीशी तोडीस तोड आहेत. त्यामुळे जगातले अनेक धनदांडगे, बडय़ा कंपन्या, सेलेब्रिटीज आणि अर्थातच सट्टेवाले आयपीएलकडे एक पैशाचा महान कल्पवृक्ष म्हणून पाहात आहेत. यात ज्याप्रमाणे अब्जावधी पांढरे पैसे गुंतले आहेत, तसे काळे पैसेही आले आहेत. पण हे काळे पैसे येतात कुठून?

पूर्वी शाळेत जाणारी मुले-मुली एकमेकांना कोडी घालत असत. उदाहरणार्थ- ‘तू मनात एक संख्या धर. मग सातने गुणाकार कर. जी संख्या येईल तिच्यासमोर तीन शून्य लिही. जी संख्या येईल ती सांग, म्हणजे तू मनात धरलेली मूळ संख्या मी सांगेन.’ वगैरे वगैरे. कॅलक्यूलेटर्स, मोबाईल फोन्स, कॉम्प्युटर्स आल्यावर कितीही मोठय़ा संख्येचा कोणत्याही मोठय़ा आकडय़ाने गुणाकार-भागाकार करणे सोपे झाले आणि अशी कोडी घालण्याचे खेळ मागे पडत गेले. पाढे म्हणण्यातली मौज गेली, तशी या प्रकारच्या कोडय़ांमधली गंमतही गेली. पण मोबाईल फोन्समधील गेम्स आणि व्हिडिओ गेम्स आल्यानंतर कित्येक पटींनी अधिक मजेशीर व रंगीबेरंगी खेळ व कोडी आली. त्यामुळे ‘जुन्या’ पिढीतल्या माणसांनी पाढे व तशा कोडय़ांची बहुरंगी करमणूक गेल्याची खंत करण्याचे काहीही कारण नाही. टेक्नॉलॉजीने सगळ्याच गोष्टींचा वेग वाढवला, व्याप्ती वाढवली आणि संख्याही प्रचंड मोठय़ा केल्या. सुमारे ५० वर्षांपूर्वी चार आकडय़ांचा पगार असलेली नोकरी म्हणजे एकदम उत्तम मानली जायची. नंतर ती प्रतिष्ठा पाच आकडी पगाराला मिळू लागली. आता मध्यम वर्गातले तरुण-तरुणी दरमहा सहा आकडी पगार असला पाहिजे, अशी अपेक्षा करतात. चार आकडी किंमतीचे तिकीट असलेले आयपीएल सामने पाहतात.

आता आपण दररोज आपल्या आजुबाजूला चालणाऱ्या आणि आपल्या जीवनशैलीवर मोठा परिणाम घडविणाऱ्या खऱ्या-खुऱ्या आकडय़ांच्या खेळाकडे वळू या. गणितात चांगले मार्क्स मिळविणाऱ्या आणि अर्थशास्त्र वा अकौन्टन्सीमध्ये अगदी प्रवीण असणाऱ्यांनाही प्रत्यक्ष जीवनातील ही कोडी समजत नाहीत.. सुटत नाहीत. आज एकूणच जगात अनिश्चितता वाढल्यासारखी दिसते आहे. आणि राजकारणापासून ते परस्परसंबंध वा नाती सर्व काही विस्कटल्यासारखे दिसते-भासते आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे, या संख्यांनी, त्यांच्या गुणाकार- भागाकारांनी उडविलेला अभूतपूर्व गोंधळ आहे. जगातले अर्थशास्त्रज्ञ हा गोंधळ समजून घ्यायचा प्रयत्न करीत आहेत, पण त्यांच्यात एकमत नाही. कुणाकडेही एक सूत्र नाही वा एकच ठाम उत्तर नाही.

कारण, प्रत्येकाने स्वत:च्या मनात एक संख्या धरली आहे. तिला मनात येईल त्या आकडय़ाने गुणले आहे. जी संख्या येईल तिच्यापुढे त्यांना हवी तितकी शून्ये घातली आहेत. विशेष म्हणजे कुणीच, कुणालाही मनात धरलेली खरी संख्या सांगत नाही आणि खेळाचे (म्हणजे कोडी सोडविण्याचे) नियम पाळत नाही.

इतकी ‘कोडय़ात’ टाकणारी प्रस्तावना थांबवून प्रत्यक्ष जीवन-कोडय़ाकडे वळू या. असे गृहित धरू या की हा लेख वाचणाऱ्या कुणाकडेही एकही काळा पैसा नाही (!?!). त्यामुळे एकंदरीत हा काळा पैसा येतो कुठून व कसा, हे आपल्यासारख्या सरळमार्गी मध्यमवर्गीय माणसाला कळणे शक्य नाही. परंतु आपण सर्व सुशिक्षित, प्रामाणिक, सत्प्रवृत्त माणसे असे मानत असतो की, देशात प्रचंड काळा पैसा आहे. त्यापैकी काही स्वीस वा अन्य विदेशी बँकांमध्ये ठेवला गेला आहे. काही पेटय़ा, बॉक्सेस्, खोकी, कपाटे यांत घरात वा कचेऱ्यांत ठेवला गेला आहे. अधूनमधून आपण वर्तमानपत्रांमध्ये बातम्या वाचतो वा छायाचित्रे पाहतो की कुणाकडेतरी पाच-सात कोटी रुपये रोख सापडले, काही कोटी रुपयांची सोनी-नाणी-दागिने मिळाली, वगैरे. मधू कोडांसारख्यांनी चार-पाच हजार कोटी रुपये (४०-५० अब्ज) जमा केल्याचे पोलीस सांगतात. तेलगीसारख्यांनी २५-३० हजार कोटी रुपयांची ‘ब्लॅक’ उलाढाल केल्याचे बोलले जाते. एक हजार म्हणजे एकावर तीन शून्य, एक लाख म्हणजे एकावर पाच शून्य, एक कोटी म्हणजे एकावर सात शून्य, एक अब्ज म्हणजे एकावर नऊ शून्य, पुढे खर्व, निखर्व.. वगैरे वगैरे.

सूर्यमालिकेपलीकडे प्रचंड अंतरावर असलेल्या ताऱ्यांचे अंतर प्रकाशवर्षांत मोजतात. आता जगातील आर्थिक उलाढालीतील आकडे समजण्यासाठीही प्रकाशवर्षांसारखीच एखादी संज्ञा-संकल्पना वापरात आणावी लागणार आहे. त्याशिवाय महाराष्ट्राचा अर्थसंकल्प कळणार नाही आणि अमेरिकेची कित्येक कोटी खर्व-निखर्वात असलेली अक्राळविक्राळ महा-उलाढाल आकलनकक्षेत येणार नाही. अवघ्या जगाचा व्यापार तर आता काही आकडे व आद्याक्षरे यांच्या आधारे ‘शॉर्टफॉर्म’ करूनच सांगितला जातो. अत्याधुनिक कॉम्प्युटर्स, अद्ययावत सॉफ्टवेअर आणि आकडे-आद्याक्षरांचे सिम्बॉल्स असा टेक्नॉलॉजिकल विकास झाला नसता, तर हा अफाट पैशांचा अजस्त्र खेळ उभाच राहिला नसता. या खेळाच्या बुंध्यावरच बांडगुळासारखा वाढलेला समांतर पैशांचा खेळ म्हणजे काळ्या पैशांचा खेळ.

आपण कितीही सत्प्रवृत्त असलो तरी आता त्या खेळात जाणता-अजाणता सामील झालेलो आहोत. ‘पांढरे’ पैसे जितके ‘खरे’ आहेत, तितकेच काळेही ‘खरे’ आहेत. नोट पाहून तर ते कळणे शक्यच नाही. आज छातीठोकपणे कुणीही (!) असे सांगू शकणार नाही की, आपण काळ्या पैशाला हातही लावलेला नाही!

हा काळा पैसा कसा व कुठून येतो? सर्वसाधारणपणे असे ढोबळपणे मानले जाते की, ज्या देवाणघेवाणीची नोंद पावती, चेक, क्रेडिट कार्ड, हुंडी, करारपत्राद्वारे होत नाही, जे पैसे ‘बेहिशेबी’ आहेत आणि ज्याची अधिकृत मिळकत नोंदणीकृत (पगार, नफा, डिव्हिडंड, देणगी, वारसा हक्काने आलेली वा भेट इ.) नाही, ती देवाणघेवाण ‘काळ्या’ पैशांतून होते. (प्राप्तीकर चुकविणे, ऑक्ट्रॉय न देणे, कस्टम-एक्साईज चुकविणे, विक्रीकर न देणे इ. रुपांत) म्हणूनच भ्रष्टाचार हा काळ्या पैशाचा मुख्य स्रोत मानला जातो. त्यामुळे भ्रष्टाचार बंद झाला की, काळा पैसा आटोक्यात येऊन नंतर ‘काळ्या’ पैशांची देवाणघेवाण बंद होईल, असे (भाबडेपणाने!) मानले जाते.

केंद्र वा राज्य सरकारे जो अर्थसंकल्प सादर करतात, तो अर्थातच अधिकृत व्यवहारातून जाहीर झालेल्या संपत्तीच्या नोंदीनुसार असतो. बँकांमध्ये असलेल्या ठेवी, बँकांकडून घेतलेली कर्जे, त्यावर दिले जाणारे वा मिळणारे व्याज, इतर वित्तीय संस्थांमार्फत होणारे अर्थव्यवहार, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांकडून घेतलेली कर्जरुपी रक्कम, त्याची गुंतवणूक, वर्ल्ड बँकेसारख्या संस्थांकडून घेतलेली कर्जे इ. सर्व बाबी अर्थसंकल्पांमधून मांडल्या जातात. कंपन्यांच्या बॅलन्स शीट्स्, बँकांचे अॅन्यूअल रिपोर्ट्स (एनपीए ऊर्फ न फेडलेल्या कर्जासकटची माहिती), व्यापाऱ्यांच्या वह्या या व अशा बाबींमध्येही पांढऱ्या पैशांची नोंद व गणित असते.

काळे पैसे हे स्वतंत्रपणे नोटा छापून बाजारात येत नाहीत. (अर्थात तसेही होत असतेच, पण अब्जावधी रुपयांच्या व्यवहारात त्याचे प्रमाण अत्यल्पपेक्षाही कमी असते. तेलगीने नोटा छापल्या नाहीत, तर स्टॅम्प पेपर छापले, जे अनधिकृतपणे विकले गेले. ते पेपर्स ज्या यंत्रावर छापले, ते यंत्र थेट टाकसाळेतूनच मिळविलेले असल्याने स्टॅम्प पेपर ‘खरे’च होते, पण व्यवहार ‘खोटे’ होते. कारण ते अनधिकृत होते.)

रिझव्र्ह बँक ही एकमेव संस्था आहे की, एकूण किती नोटा (कोणत्या रकमेच्या) छापल्या आहेत, छापायच्या आहेत, प्रत्यक्ष बाजारात आहेत, रद्द करायच्या आहेत- हे ठरविते आणि जाणते. टाकसाळीकडेही नोंद असते, पण अधिकार व धोरण फक्त रिझव्र्ह बँक ठरविते. प्रत्यक्ष सांपत्तिक स्थितीच्या (राष्ट्रीय उत्पन्नाच्या, स्थावर जंगम इ.) कक्षेबाहेर जाऊन जेव्हा नोटा छापायचा निर्णय घेतला जातो, तेव्हा त्याला ‘चलनवाढ’ असे आपण म्हणतो. चलनवाढ म्हणजे महागाई नव्हे, पण महागाईमुळे चलनवाढीला उत्तेजन मिळते. असो. येथे तो विषय नाही. विषय हा की काळा पैसा कुठून व कसा येतो. तर तो अधिकृतपणे छापलेल्या ‘पांढऱ्या’ नोटांमधूनच येतो आणि पांढऱ्या पैशांवरच हळूहळू दादागिरी करू लागतो.. विक्रमाच्या खांद्यावर बसलेल्या वेताळासारखा!

मुंबई हे पांढऱ्या आणि काळ्या पैशांचेही आगर आहे. कारण अर्थातच देशातील सर्व प्रकारच्या व्यापाराचे ते केंद्र आहे. बॉलिवूड असो वा बीसीसीआय, स्टॉक मार्केट असो वा वित्तीय व्यवहाराचे केंद्र, पोर्ट असो वा एअरपोर्ट, आणि देशातील प्रमुख व्यापारी उद्योगपती असोत वा स्मगलर्स आणि माफिया- सर्वाचा मुख्य व्यवहार (डील्स!) मुंबईत होतात. परंतु त्यासंबंधातील सर्व राजकीय-प्रशासकीय निर्णय मात्र दिल्लीत होतात. ते निर्णय करवून घेण्यासाठी वा फिरवण्यासाठी जे पैसे दिले-घेतले जातात, ते अर्थातच अधिकृत पावती देऊन होत नाहीत. म्हणजेच रोखीने (किंवा अन्य मार्गाने- कॅश ऑर काईंड!) होतात आणि पांढरे पैसे काळे होतात.

धीरुभाई अंबानी एकदा खासगी गप्पाष्टकात म्हणाले होते की, आपल्या देशात व देशाबाहेर इतका प्रचंड काळा पैसा आहे की, तो बाहेर काढला तर देशाला एका पैशाचेही कर्ज घ्यावे लागणार नाही. परंतु त्यांनी हे सांगितले नाही की तो सर्व पैसा ‘बाहेर’ काढला, म्हणजेच ‘अधिकृत’ करून व्यवहारात पांढरा पैसा म्हणून आला, तर अवघी व्यवस्थाच कोसळून पडेल. अंबानींचे व तत्सम इतरांचे जगजंबाळ आर्थिक साम्राज्य ज्यांच्यावर अवलंबून आहे, ते सर्वजण म्हणजे राजकीय व्यक्ती, नोकरशहा, पोलीस तसेच न्याययंत्रणा, मीडिया येथपासून ते अगदी छोटा दुकानदार, सरकारी कचेरीतील कारकून वा शिपाई, शिक्षक, प्राध्यापक, जाहिरात एजन्सीज्, पंचतारांकीत हॉटेल्स ते अगदी पानवाला. (ही यादी कितीही मोठी करता येईल.) हे सर्व महाचक्र चालते तेच मुळी काळ्या पैशांच्या ‘ल्यूब्रिकेशन’वर. ते तेल जर या यंत्राच्या चक्रांमध्ये घातले नाही, तर ते जाम होऊन बंद पडेल. ते बंद पडल्यावर अराजक तरी माजेल किंवा क्रांती तरी होईल.

पण क्रांतीसाठी विचारसरणी, संघटित पक्ष, देशव्यापी संघटना आणि नियोजन लागते. तेही संभवत नाही. म्हणजे फक्त अराजकच संभवते. भ्रष्टाचार व काळा पैसा हेही अराजकच आहे, पण जॉन केनेथ गालब्रेथ यांच्या भाषेत ‘इंडिया इज अ फंक्शनिंग अॅनार्की’. भारतीय अराजक स्थितीलाच एक अंतर्गत नियंत्रण-व्यवस्थापन आहे. याचा अर्थ भ्रष्टाचार योग्य (वा अपरिहार्य) आहे आणि काळा पैसा अनिवार्य आहे असा नाही किंवा आपण सर्वजण अनीतीमान आहोत आणि ‘हे असेच चालू राहणार’ असाही नाही.

मुद्दा इतकाच की, या प्रश्नाकडे भाबडेपणाने व आत्म-शुचितेच्या नैतिक गर्वाने पाहून चालणार नाही, तर अधिकृत (पांढरा) व्यवहार सतत विस्तारत ठेवावा लागेल. जी यंत्रणा व व्यवस्था गैर गोष्टींसाठी वापरली जाते, ती योग्य बाबींसाठी वापरता येईल.

गेली काही वर्षे लोकसभेत व माध्यमांमध्येही चर्चा चालू होती की, ज्या भारतीयांनी स्विस बँकेत गुप्तपणे पैसे ठेवले आहेत, ते परत आणण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न सुरू करावेत. त्यासाठी स्वित्र्झलडच्या सरकारबरोबर आणि तेथील बँकांबरोबर त्या अनुषंगाने करार करावेत. हे सर्व प्रकरण वरवर वाटते तितके सोपे व सरळ नाही. बहुतेक (आपल्यासारख्या) लोकांना वाटते की, आपण जसे बँकेत जाऊन पैसे ठेवतो, वेळ येते तेव्हा काढतो, एफ.डी.मध्ये रुपांतर करतो, तसाच स्विस बँकांचाही व्यवहार असेल. फार काय तर गुप्त असेल इतकेच! परंतु त्या बँका ते पैसे ठेवण्यासाठी सव्र्हिस चार्ज घेतात, ठेवींवर व्याज देत नाहीत, तर व्याज लावतात आणि अनेक प्रकारच्या ‘सिक्रेट कोड्स’मार्फत तो व्यवहार चालतो. अशिक्षित(!), ग्रामीण अनभिज्ञ (!!) राजकारण्यांकडेही निवडणुकीच्या काळात व आमदार/ मंत्री झाल्यावर भरमसाठ पैसे येतात, तेही स्विस बँकेत जाण्याचे मार्ग आहेत. ‘हवाला’ या नावाने त्या मार्गाला बहुतेक लोक ओळखतात. या ‘हवाला’चा व्यवहार गुप्त असला तरी अत्यंत विश्वासाने चालतो. ‘हवाला’ एजंटकडे समजा एक कोटी रुपये दिले, (इतके कमी पैसे बहुधा स्विस बँकेत घेत नसावेत!) तर तो त्याचे डॉलर वा युरोमध्ये रुपांतर करतो आणि ते त्या बँकेत ठेवतो.

असे कोटी-कोटी रुपये देणारे कोण असतात? राजकीय पुढारी. (आजी वा माजी मंत्रीच असले पाहिजे असे नाही.) शिवाय सर्व राजकीय पुढारी काळ्या संपत्तीचे मालदार नसतात. उदाहरणार्थ डॉ. मनमोहन सिंग किंवा ए.पी.जे. अब्दुल कलाम अशा व्यक्तींवर कुणी चुकूनही तसा आरोप करणार नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर आरोप आहेत (आणि ते खरे मानले तरी), त्यांचे सर्व पैसे परदेशी बँकेतच असतील असेही नाही. राजकीय पुढाऱ्यांपेक्षाही ‘खतरनाक’ वर्ग आहे तो ज्येष्ठ-वरिष्ठ नोकरशहा, पोलिस अधिकारी वर्ग, प्राप्तीकर अधिकारी, ऑक्ट्रॉय आणि विक्रीकर अधिकारी, कस्टम एक्साईज अधिकारी इत्यादींचा. त्यानंतर (पण त्यांच्याइतकाच) तसा अमाप ‘अनधिकृत’ पैसा जमा करणारे आहेत- तीनही लष्करी दलांमधील अनेक वरिष्ठ अधिकारी. शिवाय आणखी एक समांतर वर्ग आहे तो बडय़ा उद्योगपती, व्यापारी, बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर्स, व घरंदाज/सरंजामदार पिढीजात श्रीमंतांचा. तसेच बॉलीवूड, क्रिकेट, सेलेब्रिटी-फॅशन जगतातील लोकांचा. या पलीकडे सहज प्रकाशात न येणारे लोक म्हणजे जागतिक स्तरावर शस्त्रास्त्रांची दलाली करणारे एजंट वा त्यांच्या कंपन्या. त्याचबरोबर माफिया (विशेषत: लॅण्ड माफिया), ड्रग माफिया हे तर आहेतच.

म्हणजे ही सर्व मंडळी मिळून अंदाजे १० लाख लोक असे असतील की, ज्यांच्याकडे गडगंज काळा पैसा आहे- तो स्विस बँकेत, अन्य परदेशी बँकेत वा भारतातच आहे. परंतु हे गडगंज वेताळ त्यांचे एक प्रचंड नेटवर्क बाळगून असतात. त्या नेटवर्कमध्ये चार्टर्ड अकौंटंट्स्, अगदी ऑडिटर्ससुद्धा असतात. पब्लिक रिलेशन ऑफिसर्स किंवा कंपन्या असतात. स्थानिक राजकीय पुढारी असतात, छोटे-मोठे सेलेब्रिटीज् असतात, फिक्सर्स आणि काही नुसतेच सामाजिक- सांस्कृतिक ‘वळू’सुध्दा असतात. ही सर्व फौज सांभाळाण्यासाठी रोज भरपूर पैसे लागतात- काळे आणि पांढरे.

या सर्व नेटवर्कमधील मंडळी पंचतारांकित हॉटेल्समध्ये आपले व्यवहार करतात, तेथे राहतात, देशात व देशाबाहेर सारखा प्रवास करतात, उंची वस्तू खरेदी करतात, इतरांना ‘एन्टरटेन’ करतात (सर्व श्लील-अश्लील मानल्या गेलेल्या मार्गानी), कित्येक लोकांना (मीडियासकट) खूष ठेवण्यासाठी पैसे खर्च करतात. म्हणजेच त्यांना सारखे पैसे लागतात आणि ते याच ‘सिस्टीम’मध्ये खर्च होत असतात. अवैध मार्गाने जमा केलेले सर्व पैसे ‘अवैध’पणेच खर्च होतात, असे नाही. ते काळे पैसे रीतसर खर्च होऊन त्यांची पावती वा अधिकृत नोंद झाली की ते पांढऱ्या वर्तुळात येतात. पांढरे वर्तुळ सांभाळल्याशिवाय समांतर कृष्णधन जमा होत नाही.

हे समांतर कृष्णधन गेल्या ३० वर्षांत प्रचंड प्रमाणात वाढल्यासारखे दिसत-भासत असले, तरी त्या अगोदर म्हणजे स्वातंत्र्यानंतर लगेचच ते जमा होऊ लागले आणि निवडणुकांपासून ते शिक्षणसंस्था उभ्या करण्यापर्यंत, साठेबाजी करण्यापासून ते शेअर बाजारापर्यंत, वायदेबाजारात गुंतवण्यापासून ते जमीन/फ्लॅट खरेदी करण्यापर्यंत सर्व व्यवहारात आणले गेले.

एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबाचा ३० वर्षांपूर्वी काही लाखांत घेतलेला शहराच्या मध्यवर्ती भागातला फ्लॅट आज (७०/३० किंवा ८०/२० प्रमाणात) एक कोटी रुपयांवर विकला जातो, तेव्हा त्या सत्प्रवृत्त, प्रामाणिक मध्यमवर्गीय व्यक्तीलाही त्यातील २० वा ३० टक्के रक्कम ही रोख (म्हणजे काळ्या पैशात घ्यावी व द्यावी लागते.) परंतु ते काळे पैसे पुन्हा अशा रीतीने गुंतवले जातात की त्यातून त्याच प्रमाणात काळे व पांढरे पैसे निर्माण होतात.

जेव्हा जगाला मंदीचा झटका बसला, तेव्हा भारतातील उद्योगपती, व्यापारी, बिल्डर-कॉन्ट्रॅक्टर्स यांनाही तो बसला. बॉलीवूड आणि क्रिकेटलाही बसला. दीड वर्षांपूर्वी अशी भाकिते केली जात होती की, भारतीय अर्थव्यवस्था हा धक्का सहन करू शकणार नाही. ते भाकित मुख्यत: अधिकृत अर्थयंत्रणेकडे पाहून, बॅलन्स शीट्स् पाहून व बँकिंग व्यवहार पाहून केले गेले होते. त्यानुसार ते बरोबर होते.

तरीही भारताची अर्थव्यवस्था सावरली आणि अर्थमंत्री पुन्हा ८-९ टक्के आर्थिक वाढीच्या दराची चर्चा करू लागले! पहिल्या सहा महिन्यांत अर्थव्यवस्थेला बसलेला ‘सात रिश्टर’चा धक्का कमी कमी होत गेला आणि आता तर आयपीएलने सिद्ध केले की, ते मायाविश्व विकत घ्यायलाही कोटय़वधी/अब्जावधी रुपये आहेत आणि ते पाहायला जाणाऱ्यांनाही महागडी तिकीटे परवडत आहेत. त्यासाठी फ्लॅट स्क्रीन टीव्ही सेट्स् विकले जात आहेत आणि सेलेब्रिटी जग पंचतारांकित जीवनशैली जगत आहे.

याचे मुख्य कारण तो सर्व काळा पैसा- देशात व विदेशात ठेवलेला- परत अर्थव्यवस्थेत आला आहे. त्या पैशानेच मंदीचा धक्का पेलला आणि महा-उलथापालथीपासून अर्थव्यवस्था वाचवली. अर्थातच हा परत आलेला पैसा पुन्हा त्याच वा अधिक गतीने आणखी काळा पैसा जमा करू लागला आहे. मुंबईतील ‘कन्स्ट्रक्शन बूम’ हा (आयपीएलप्रमाणेच आणखी एक) पुरावा आहे.

म्हणजेच पांढऱ्या आणि काळ्या पैशांची आता इतकी जोडून (सयामी ट्विन्सप्रमाणे) वाढ होत आहे की, हे जुळे एकमेकांपासून विभक्त करणे (निदान नजीकच्या काळात तरी) अशक्य आहे!
 
कुमार केतकर
रविवार, ४ एप्रिल २०१०

3 comments:

  1. नमस्कार,

    एकदम सहमत. आमच्या मनातलं तुमच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरलं, याचा आनंद आहे.

    ज्यांना महिन्याला दहा हजारही मिळत नाहीत ते लोक एक ते पाच हजार रुपयांना विकली जाणारी आयपीएलची तिकीटे विकत घेण्याची मानसिकता जोपासतात, तो पर्यंत यात बदल संभवत नाही.

    देशाच्या गंभीर समस्या बाजूला ठेऊन तथाकथित नेते मंडळी या सामन्यात दंग होतात, तो पर्यंत बदल संभवत नाही.

    दिल्लीतल्या काही आमदारांनी फिरोजशहा कोटला मैदानाच्या समोर निदर्शने केली. त्यांच्या पक्षाचे किती नेते आजवर या सामन्यात हजेरी लावून, त्या निदर्शक आमदारांच्या दृष्टीने आक्षेपार्ह असलेल्या गोष्टींचा आनंद घेऊन गेले, याचा हिशोब त्यांनी ठेवला आहे का?

    असो. केतकरसाहेब, तुमच्या लेखनातून जनजागृती होऊन यातील फोलपण, अर्थकारण व दिशाभूल समाजासमोर येवो ह्या सदिच्छा.

    पुढील लेखनासाठी तुम्हांला शुभेच्छा

    आपला,
    (वाचक) धोंडोपंत

    ReplyDelete
  2. दिनांक ९ मे २०१० रोजी दादर, मुंबई येथे मराठी ब्लॉगर्स स्नेह मेळावा आयोजीत केला आहे. येथे येणॆ आपल्याला जमेल काय ?

    Read more: http://www.mogaraafulalaa.com/2010/04/blog-post_06.html#ixzz0kJREldan

    ReplyDelete
  3. agadi yogya ahe, Bhrashtacharala vachha phodnyache ekmev sadhan mhanje lekhni, matra tyachadekhil vapar ha yogyaritya jhala pahilje

    ReplyDelete